‘राहुल देशपांडे’च्या मैफलीची दोन तिकिटं राधाच्या हातात पडली नी तिनं सुटकेचा निश्वास टाकला. बराच खाटाटोप करून, फोनाफोनी करून, पियुनला इथं तिथं पिटाळून. अखेर ही तिकीटं तिच्यावर मेहेरबान झाली होती.
फायनली आज रात्री राधा, जुईलीला घेऊन ‘राहुल देशपांडे’ यांच्या क्लासिकल गाण्यांचा शो बघायला रविन्द्र नाट्य मंदिरला जाणार होती.
जुईली…राधाची आई. राधाचं सर्व काही. पहिलीतल्या इवल्या राधाला आणि तिशीलाही न पोहोचलेल्या जुईलीला माघारी ठेऊन, पराग दुसर्या जगात गेला होता. कधीच न परतण्यासाठी. तेव्हापासूनच या दोघी अक्षरशः सयामी जुळ्या असल्यासारख्या एकमेकींना चिकटून असत.
आधी लोक राधाला जुईलीचं शेपूट म्हणत असत, नी आताशा जुईलीला राधाचं ! बाविसाव्या वर्षी जुईलीला झालेली राधा आज स्वतः बावीस वर्षांची होती. चार्टर्ड अकौंटन्ट ईन फर्स्ट अटेम्ट होऊन, मग लगोलग एका फाॅरेन बॅन्केच्या मोठ्ठ्या केबिनमधल्या मोठ्ठ्या पोस्टवर रुजूही झाली होती. जुईलीही बी.ए.आर.सी.मध्ये होती आणि आपल्या याच नोकरीच्या बळावर तिनं एकहाती राधाला सांभाळत, एव्हढं मोठ्ठं केलं होतं.
पण आता जुईली थकली होती. डिप्रेशनवर औषध-पाणी चालू होतं. कामावरून व्ही.आर.एस. घेऊन ती सध्या घरीच असे . Hysterectomyचं ऑपरेशन झाल्यापासुनच जुईली अकाली खचली होती. चव्वेचाळीस वय हे तारुण्यात जरी मोडत नसलं, तरी वार्धक्य लागल्यासारखं वाटून, घरी बसून माळा ओढण्याचंही नव्हतं.
पण का कोणास ठाऊक, जुईली विरक्त मात्र होत चालली होती. ही संगीत मैफलीची तिकिटं काढून, याच तिच्या कोषातून तिला बाहेर काढण्याचा, राधानं केलेला हा एक छोटासा प्रयत्न होता. कारण आपल्या मागोमाग जगात आपल्या आईला, जर का काही प्रिय असेल, तर ते फक्त क्लासिकल म्युझिक, हे ती पक्कं जाणून होती.
घरी जातांनाच राधानं जुईलीसाठी चांगला चार हात मोगर्याचा गजरा नी दोन चाफ्याची फुलंही घेतली होती… अगदी ‘पुरे घरके बदल डालुंगा’ सारखं. आज ती आग्रह करून, जबरदस्तीनंच म्हणा हवं तर… पण आईला लिपस्टीकही लावायला भाग पाडणार होती.
बावीस वर्षांची तरुण राधा, आपल्या मध्यमवयीन आईला कसं नटवायचं याच चिंतेत जास्त होती. लाल काठांच्या काळ्या नी त्यावर लाल टिकल्या असलेल्या साडीत, प्रमाणात लाल असलेली लिपस्टीक लावून, प्रायमर, फाऊंडेशन, आय लायनर वगैरे वगैरे आटोपशीर प्रमाणात वापरून, मोकळ्या केसांतुन गजरा माळून, पीनेत दोन चाफ्याची फुलं खोवून जेव्हा जुईली तयार झाली, तेव्हा राधानं उत्स्फुर्तपणे शिट्टी मारली होती आणि म्हणाली होती,
“आज देशपांडे बुवा तुलाच डेडीकेट करणार ‘कट्यार काळजात घुसली’ बहुतेक!” आणि त्यावर जुईलीची एक लाडिक चापटीही खाल्ली होती.
पण खरंच आज राधा, तीच्या जुन्या 'आयुडी' ला पुन्हा बघून खूप खूश होती. या निमित्तानं तिला आयुष्याच्या मैफलीतून उडून गेलेले रंग, पुन्हा चढण्याची चिन्हं दिसू लागली होती.
डीम लाईट असतांनाच दोघी आत शिरल्या. सीट्स हुडकून काढत आपापल्या जागी बसल्यावर पुढचे तीन-चार तास आईची निर्विघ्नपणे समाधी लागावी, म्हणुनच राधानं छान तिसर्या लाईनीतली बरोब्बर मधली दोन तिकिटं काढली होती.
जुईलीही तिचा बारीक काड्यांचा, फिकट गुलाबी बाॅर्डरचा चश्मा डोळ्यांना लावून, ब्रम्हानंदी टाळी लावून घेण्यास, कधीची सज्ज होऊन बसली होती. त्या झालेल्या अंधारातुनही राधाला आईच्या अंतरातुन चेहर्यावर आलेला अन् ओसंडून वाहणारा अपार आनंद दिसत होता. मैफल सुरू झाली. ऊत्तरोत्तर रंगत गेली. पीक पाॅईन्टला असतांनाच मध्यांतर झालं. आ वासुन बघणारी तमाम लोकं जादुई सुरांच्या दुनियेतून, कढईतल्या सामोशांच्या वास्तविक दुनियेत आली. पटकन् जाऊन जागेवर पुन्हा येऊन बसण्याची, लोकांत होड लागली.
पण… पण जुईलीचं काहितरी बिनसलं होतं. ती अस्वस्थ होती.
“राधे, माझ्या जागेवर बसशील?” तिनं विचारलं. राधाही, तिला आपली जागा देत जुईलीच्या जागेवर येऊन बसली. दुसरा भाग जुईलीनं बर्यापैकी एन्जाॅय केला, पण तरीही ती आज शंभर टक्के कार्यक्रमात नव्हती. का अस्वस्थ होती जुईली? का चलबिचल चालू होती मनात तीच्या…??
कार्यक्रम संपला. जुईलीनं पटकन्न राधाचा हात पकडला नी डावीकडून चालू पडली. राधालाही कळेना काय झालं. ते बाहेर लाॅबीमध्ये आले आणि जुईलीला ज्याची भीती वाटत होती तेच झालं…
पाठीमागुन एक पुरुषी आवाज आला, “एक्सक्युज मी प्लीज…”
सहा फुट उंची… मजबुत अंगकाठी… पिकलेले, वाढलेले, मध्ये भांग पाडून बसवलेले नी थोडे विस्कटुन कपाळावर आलेले सुळसुळीत केस… ट्रीम केलेली पांढरी दाढी... डोळ्यांवर रीमलेस बारीक काड्यांचा चश्मा… ब्लू डेनिममध्ये ब्लॅक हाफ स्लीव्ज टी-शर्ट खोचलेला… पायात अवाढव्य साईजचे वुडलॅन्डचे शूज… साधारण पन्नाशीचा… पण बघताच क्षणी कोणावरही छाप पडेल असा ‘तो' रुबाबदारपणे चालत, त्या थांबलेल्या दोघींकडे आला.
“हाय्, तुम्ही जुईली सरदेसाई तर नाही? आय मीन, मे बी पुर्वाश्रमीच्या… इफ् ॲम नॉट मिस्टेकन्…” त्यानं जुईलीकडे पहात थेट विचारलं.
“बाय द वे… मी आशिष साठ्ये… ‘ठे’ नाही हां, ‘ठ्ये’…" कुणीही न मागता स्वतःचं इन्ट्रोडक्शन स्वतःच देऊन हसला. जुईलीच्या मनात आलं, ‘ह्या ठे आणि ठ्ये ला ठो केलं असतं हातात पिस्तुल असतं तर…’ पण तिनं ‘काय हे भलतंच!’ परत मनाशीच म्हणत, आपली जीभ चावली.
आईची त्रेधा उडतीये पाहून राधा मैदानात आली “हो, ही माहेरची जुईली सरदेसाईच. आताची जुईली क्षिरसागर. माझी आई. मी राधा क्षिरसागर. आपण ओळखता माझ्या आईला?”
आशिष किंचीत हसून म्हणाला, “ऑफ् कोर्स यस्… हाऊ वुड बी आय एबल टू फर्गेट माय फर्स्ट क्रश?” आणि पुन्हा गडगडाटी हसला.
‘आता मात्र हद्दच झाली या माणसाची. आगाऊपणाचा कळसच दिसतोय हा ! काय समजतो काय स्वतःला? बिनडोक कुठला.’ जुईलीच्या मनाचे घोडे चौखूर उधळले होते.
“अहो, नका एव्हढी कडाक्कड बोटं मोडू माझ्या नावानं मनात. इथवर येतोय आवाज त्यांचा…!” आणि पुन्हा एक गडगडाटी हास्य.
जुईली चांगलीच वरमली. नी राधा. ती तर पार हबकली होती.
“इफ् यू डोन्ट माईंड, कॅन वी हॅव असं कप ऑफ कॉफी टुगेदर? या समोरच्या शेट्टीकडची काॅफी तुफान असते. तथाकथित ऊच्चभ्रू काॅफी पाॅईंट्सपेक्षाही सौ गुना बेहतर… आय इन्सिस्ट…प्लीज.”
राधानं आईकडे पाहिलं. जुईलीनं डोळे वटारले. राधा पटकन् म्हणाली, “ओह् यस, व्हाय नॉट…!” जुईलीनं मनातल्या मनात कपाळावर जोरात हात मारला.
काॅफीची ऑर्डर देऊन तिघं बसले होते. राधा आशिषकडे, आशिष जुईलीकडे नी जुईली राधाकडे पाहत. राधा सुपर एक्साईटेड होती. आशिष तिच्याकडे पाहून हसला, नी तिच्या डोळ्यांतून ग्रीन सिग्नल मिळाल्याप्रमाणन त्याची आठवणींची ट्रेन हलली. त्यानं सुरुवात केली…
“आय वॉज जस्ट ट्वेन्टी फाईव्ह, हेल्पिंग माय बॅग इन सीए बिझनेस. बट ऑनेस्टली वॉजन्ट सिरियस ॲट ऑल टुवर्ड्स लाईफ. मित्रांबरोबर दंगा, मस्ती, पार्ट्या करण्यांत दिवस जात होते.
“माझी आई घरीच असे. क्लासिकल म्युझिकची प्रचंड शौकीन. एकदा जबरदस्तीनं मला इथं 'रविन्द्र'लाच एका क्लासिकल डान्स प्रोग्रामला घेऊन आली. ‘ईगल्स’, ‘बिटल्स’, ‘गन्स एन रोजेस’वाला मी. नाखुषीनंच आलो तिच्यासोबत.
“आणि इथं जुईली सरदेसाईनं भरतनाट्यम सादर केलं होतं. तिचा तो सर्वांगसुंदर पर्फार्मन्स बघून शी गॉट अ स्टँडिंग अवेशन आणि मी एकटा बसून होतो खुर्चीवर. भान हरपून, टोपली लॉस्ट! आई टाळ्या वाजवून खाली बसली नी मी तिला म्हणालो, ‘मला या मुलीशी लग्न करायचंय!’ त्यानंतर त्या पूर्ण शांत सभागृहात माझी आई एकटीच टाळ्या वाजवत होती. अत्यानंदानं!
“नंतर आईनं तिच्या नावावरून, तिचा पत्ता शोधून काढत घरी जाऊन लग्नाची रीतसर मागणी घातली होती. पण तिनं नकार दिला. म्हणाली, ‘ॲम ऑलरेडी एन्गेज्ड.’
“खूप वाईट वाटलं मला. हृदयभंग का काय तो म्हणतात ना, तसं झालं. त्याच दरम्यान नेमके माझे बाबा गेले, ॲन्ड माय प्रेऑरिटीज् चेंज्ड ऑल द वे. स्वतःचा विचार करणंच बंद झालं. दोन बहिणींची लग्न करुन देऊन, त्यांना मार्गी लावण्याकरता प्रचंड झटलो. एकट्या आईचं मनातून दाटलेलं एकाकी म्हातारपण सुकर करण्यासाठी अतोनात खपलो.
“माझ्या बागेतल्या प्रत्येक झुडूपाची निगा राखणारा मी, त्याचं एकही पान पिकू नये म्हणून, काळजी घेणारा मी… माझे केस कधी पिकले, हे मात्र ओळखू शकलो नाही. एके दिवशी सकाळी चहा करुन आईला उठवायला गेलो, तर ती उठलीच नाही. बसून राहिलो तिच्या उशाशी बराच वेळ. शी लेफ्ट, कीपिंग हर विश अनफुलफिल्ड इन हर माईंड…
“माझं लग्न झालेलं बघायचं होतं तिला. पण खरं सांगू, माझा लग्नातला इन्टरेस्ट तेव्हाच संपला होता, जेव्हा ह्या मला नाही म्हणाल्या. काटा जेव्हढा खोल रुततो, तेव्हढं जास्त रक्त निघतं तो बाहेर काढल्यावर. तसाच ह्यांचा विषय सोडून देतांना, लग्नाची इच्छाही संपवून गेला तो आतून कायमचीच !
_“बरीच स्थळं आली मला त्यानंतरही. पण प्रत्येकाला मी एकच उत्तर दिलं, ‘ॲम ऑलरेडी एन्गेज्ड’. खूप आवडलं होतं मला ह्यांचं उत्तर.”
असं म्हणून आशिष साठ्ये पुन्हा एकदा गडगडाटी हसला आणि व्हाॅलेटमधून त्याने रंग उडालेली, जीर्ण अशी दोन तिकीटं काढून, ती जुईलीच्या समोर ठेवली. ज्यांवर दिनांक होता २५ जानेवारी १९९५.
चार दिवस उलटून गेल्यावरही राधाच्या डोक्यातून ती जपलेली तिकीटं अन् ती जपून ठेवणारा हा साठ्ये काही जाईना. तिने मनाशी काहीतरी ठरवलं. आता तिची पाळी होती, एका नावावरुन पत्ता शोधायची.
चोविस वर्षांपूर्वी एका आईनं मुलाकरता एक पत्ता शोधून काढला होता, आता एक मुलगी आईसाठी पत्ता शोधणार होती. ठाण्याच्या भास्कर काॅलनीतल्या एका बैठ्या घराची बेल वाजली. आशिष साठ्येनं दरवाजा उघडला. दारात राधा क्षिरसागर हातात एक बुके आणि जुईलीचा एक जुना भरतनाट्यम मधील मुद्रेचा फोटो घेऊन हसतमुख उभी होती.
“माझ्या आईसाठी मी तुम्हाला मागणी घालायला आलेय. होप यू वोन्ट से, ‘ॲम ऑलरेडी एन्गेज्ड’.
“नो, आय वुईल ॲब्सोल्युटली नॉट…” राधानं त्याच्याकडे दिलेल्या जुईलीच्या फोटोकडे, भरल्या डोळ्यांनी बघत, गडगडाटी हसत, वेळ न दवडता आशिषनं उत्तर दिलं.
श्रावणातल्या पावसात कडक ऊन पडतं कधितरी, तसा राधाला आभास झाला, नी आता या कधीच्या रिकाम्या आभाळावर इंद्रधनुष्यही उमटणार याची खात्री पटली. तेव्हाच घरात शिरलेल्या वार्याच्या झुळुकीमुळं मागं भिंतीवर लावलेल्या आशिषच्या आईंच्या तसबिरीवरचा चंदनाचा हार, राधाला उगीच जरा हलल्यासारखा वाटला. ग्रामोफोनवरून वसंतराव देशपांडे यांचा दैवी स्वर कानांवर येत होता…
‘साँवरिया से नैना हो गये चार,
लागी करेजवाँ कटार!’
- सचिन श देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा