काल ११ एप्रिलची ती पहाट राजंदा (अकोला) मधील एका कुटुंबासाठी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. अवघ्या १४ वर्षांची मुलगी, जिचे पाऊल अजून नीट संसारात पडले नाही, ती रागाच्या भरात घर सोडून शिर्डी गाठते. ही घटना केवळ बातमी नाही, तर आपल्या सर्वांच्या 'घर' नावाच्या सुरक्षित किल्ल्याला पडलेले एक भगदाड आहे. सुदैवाने ती त्याच दिवशी सापडली, पण त्या काही तासांच्या प्रवासात तिच्या कोवळ्या जिवावर काय बेतले असेल, याचा विचार करून अंगावर काटा येतो.
मित्रांनो, मुलीसाठी तिची आई ही जगातील सर्वात मोठा आधार असते. पण आई, जेव्हा तुझ्या आणि तिच्यात संवादापेक्षा 'वाद' जास्त होऊ लागतात, तेव्हा ती मुलगी हळूहळू स्वतःच्या कोषात जाते. आपल्या लेकीशी असं नातं विणा की, तिला मनातली भीती, एखादी चूक किंवा अगदी प्रेमाची गोष्ट सांगतानाही भीती वाटू नये. तिची आई होण्यापूर्वी तिची 'मैत्रीण' बना. तिला हे उमजू द्या की, जगाने पाठ फिरवली तरी माझी आई माझ्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. जेव्हा आई मैत्रीण होते, तेव्हा मुलीला घराबाहेर आधार शोधण्याची गरज पडत नाही.
घरात केवळ आई-वडीलच नाहीत, तर बहीण-भावाचं नातंही तितकंच घट्ट हवं. भाऊ-बहिणीमध्ये स्पर्धा किंवा कटकटी नसाव्यात, तर ते एकमेकांचे 'सिक्रेट शेअरींग पार्टनर' असावेत. भावाने बहिणीचा असा विश्वास संपादन करावा की, तिला वाटलं पाहिजे "माझा भाऊ माझ्या सोबत आहे, मला घाबरण्याचं कारण नाही." घरात जेव्हा भावंडं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतात, तेव्हा अर्ध्या समस्या तिथेच सुटतात. मित्रांनो कौटुंबिक वादात आपण इतके आंधळे होतो का, की पोटच्या गोळ्याचं रडणारं मन आपल्याला दिसत नाही?
विचार करा, जर काल ती मुलगी मिळाली नसती आणि एखाद्या नराधमाच्या तावडीत सापडली असती, तर तुमच्या त्या 'रागाचं' आणि 'अहंकाराचं' काय मूल्य उरलं असतं?
आजची ही घटना एक 'अलार्म' आहे !
मुलांना महागड्या वस्तू, ब्रँडेड कपडे किंवा मोठे फोन नको आहेत. त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि कान. त्यांना ऐकून घ्या. त्यांच्या चुकांवर ओरडण्यापेक्षा त्या का झाल्या, हे समजून घेण्याची संवेदनशीलता दाखवा. जर घराचं वातावरण 'नर्क' झालं असेल, तर मुलं बाहेरच्या 'खोट्या स्वर्गाच्या' शोधात भरकटणारच!
लक्षात ठेवा मित्रानो हरवलेली मुलं पुन्हा मिळतीलही, पण तुमच्याबद्दलचा त्यांचा 'आदर' आणि 'विश्वास' एकदा हरवला, तर तो पुन्हा कधीच मिळणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा