गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2713. निलिमा..!

   सकाळचे नऊ वाजले होते. निलिमाची ऑफीसला निघायची वेळ झाली होती.
निलिमा बेटा..एक दहा मिनिटं थांबतेस का. आज होळी  असल्यामुळं स्वयंपाकाला  थोडा उशीर होतोय. तुझी आवडती पुरणंपोळी करतेय !"
किचनमधून तिच्या सासूबाईनी, वर्षाताईंनी आवाज दिला. 
 " आई..आज महत्वाची मिटींग आहे, मला नाही थांबता येणार. " निघण्याच्या घाईत असलेल्या निलिमानं बाहेरूनच सांगितलं आणि  जेवण्याचा डबा न घेताच तिनं लॅपटॉप खांद्यावरच्या सॅकमध्ये टाकला आणि दाराजवळच्या  शू रॅकमधले सँडल काढून पायात अडकवायला सुरवात केलीआणि इतक्यात हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या तिच्या सासरयांनी. मोठ्या बाबांनी तिला हाक मारली. तिचे सासरे सगळ्या भावात वडील त्यामुळं सगळे त्यांना 'मोठे बाबा' म्हणायचे.
 "निलिमा ..पोरी.. स्कूटर जरा सावकाश चालव बर का..! आत्ताच मी वाचलं चांदणी चौकात स्कूटर  आणि भरधाव कारची धडक झाली म्हणून..!" आणि ते ऐकताच कामासाठी बाहेर जाताना  हटकू नये हे तिच्या मैत्रीणीचं नेहमीच वाक्य तिला एकदम आठवलं.
"बाबा मी काहीं लहान  नाहीय..मागची वीस वर्षे मी गाडी चालवतीय.."
      निलिमानं तिरसटपणे त्यांना उत्तर दिलं आणि डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर पडली. मागच्या आठवड्यात कंपनीत एचओडीच्या पोस्टसाठी तिचा इंटरव्हयू झाला होता आणि आज डायरेक्टर मिटींगमध्ये तिचा निर्णय होणार होता आणि नेमकं निघताना  बाबांनी तिला हटकलं  होतं.   
    मागच्या महिन्यातही असंच आईंनी  एका रिसेप्शनला जाण्यासाठी बाहेर पडताना "निलिमा..शालू छान दिसतोय गं तुला..आल्यावर दृष्ट काढ बाई..!" म्हणून कौतुक केलं होत आणि नेमकं सँडलमध्ये पाय अडकून ती पडली होती.!  निलिमाचा अशा कालबाह्य समजुतीवर आणि शकुनावर फार विश्वास होता. तसं बघायला गेलं तर अशा पोरकट श्रद्धा आणि समजूती यावर तिच्या मैत्रिणीनं अनेकवेळा तिच्याबरोबर वाद घातला होता. 
 "काय फालतूपणा आहे..! म्हणे बाहेर जाताना कुणी अडवलं की काम होत नाही आणि काय  तर म्हणे उंबरठ्यावर शिंकलं की अशुभ असतं..पाल चुकचुकली की अशुभ असतं. आता शिंक येणं ही शरीराची नॅचरल ॲक्ट आहे.. त्यात काय अशुभ..!"
      तिच्या मैत्रिणींनी अनेकवेळा तिची अशी टिंगल आणि चेष्टा केली होती. पण निलिमा आपल्या विश्वासावर आणि अशा शुभाशुभ संकेतावर ठाम होती आणि आज नेमकं तेच तिच्या बाबतीत घडलं होत ! मोठ्या बाबांनी ऐन ऑफीसला निघायच्या वेळी दिलेली ती सुचना तिला थोडिशी खटकलीच होती. खरं तर ती आणि निलेश दोघही  चांगल्या पोस्टवर होते. छोट्या वेदला सांभाळायला घरातलं कुणीतरी पाहिजे म्हणून तिनंच निलेशच्या मागे लागून आईबाबांना गावाकडून बोलावून  घेतलं होतं आणि त्यांनाही तसं निलिमाचं फार अप्रूप आणि कौतुक होतं. तस निलेशचं आणि तीच लव्हमॅरेज होतं.  श्रीमंत घरची लेक असूनही तिनं मम्मीपप्पांच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं आणि त्यांनी मग तिच्याबरोबरचे सगळे संबंध, नातं तोडलं होतं.
   सहा बेडरूमच्या आलिशान बंगल्यात राहणारया निलीमानं स्वतःला शैलेशच्या टू बी एच के फ्लॅटमध्ये एडजेस्ट केलं होतं. स्वाभिमानी निलिमानं न डगमगता एक मोठी कंपनी जॉईन केली होती. कंपनीत  चांगल्या पोस्टवर असलेल्या निलिमानं  नोकरी करून  आपलं घर व्यवस्थित सांभाळलं  होतं आणि तिच्या या कर्तृत्वाचा  तिच्या सासूसासर्यांना, शैलेशच्या आईबाबांना   सार्थ अभिमान होता. निलिमानं आपली 'ज्युपीटर' स्टार्ट केली आणि ती आजच्या डायरेक्टर मिटींगचा  विचार करतच रस्त्यावरच्या  ट्रॅफिकमध्ये शिरली.   
     आणि कधी नव्हे ते चौकात ट्रॅफिक पोलीसांच्या 'चेकिंग स्क्वॉड'नं तिला आडवलं. नेमकं 'पोल्युशन सर्टिफिकेट'ची मुदत संपलेली. पंधरावीस मिनीट गेली ती गेलीच पण पाचशे रूपये भुर्दंडही बसला..! अजून बाहेर पडून दहा मिनिटही झाली नव्हती आणि तिला पोलिसांना सामोरं जाव लागलं होतं आणि पैसे गेले ते वेगळेच. पुन्हा एकदा तिला घरून निघतानाच्या बाबांच्या त्या  'टोकण्या'ची आठवण  झाली आणि मनातल्या मनात ती पुन्हा थोडीशी अस्वस्थ झाली.  अर्धा पाऊण तासात ती ऑफिसला पोहोचली..आपल्या केबीनमध्ये जाऊन तिनं लॅपटॉप ऑन केला आणि   आज आलेले  मेल चेक करायला लागली.
     तासाभरात दोन तीन महत्त्वाचे कॉल एटेंड केले आणि रूटीन काम संपवलं. थोडासा ब्रेक घेऊन तिन कॉफी मागवली. पण तिच मन आता सैरभैर झालं होतं. बारा वाजता सुरू होणारी डायरेक्टर बोर्डाची मिटींग अजूनही   सुरू झाली नव्हतीआणि जसजसा उशीर होऊ लागला तिची अस्वस्थता वाढू लागली. न राहवून तिनं जी.एम.ना कॉल लावला.  
"एम. डी. सरांचा मुलगा यु.एस.ला चाललाय..सर तिकडे गेले आहेत. मिटींग होईल की नाही सांगता येत नाही.."
 तिनं काहीं विचारायच्या आधीच जी.एम.नी उत्तर दिलं..! आता मात्र आज आपलं प्रमोशनच काम होईल की नाही याची तिला शंका वाटू लागली. सकाळचं बाबांच  ते बोलणं आठवून काहीं कारण नसताना तिला त्यांचा राग यायला लागला होता आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची फाईल अटेंड करता करता एवढ्याशा कारणानं चिडलेल्या निलिमाच्या डोक्यात  आजचं  सिलेक्शन जर पुढे गेलं  तर आईबाबांना गावाकडे परत पाठवावं असा आततायी विचारही क्षणभर  येऊन गेला..!   
     दोन वाजून गेले होते. लंचची वेळ झाली होती. डबा आणलेला  नसल्यामुळे ती लंचसाठी शेजारच्या 'फुडकोर्ट'कडे जायला निघाली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला..! समोर मोठे बाबा तिचा लंचबॉक्स घेऊन उभे होते..!  उन्हातून आल्यामुळे त्यांचा चेहरा घामानं निथळत होता. त्यांच्या डोळ्यातनं आपल्या सुनेबद्दलची  आपुलकी  ओसंडून वहात होती..!
   निलिमा..अग.. सकाळी तू डबा न घेता घाईनं घाईनं तशीच निघून  आलीस. सकाळपासून ही सारखं  घोकत  होती. 'पोरगी न जेवता, न डबा घेता गेली म्हणून..' शेवटी मी म्हटलं डबा दे माझ्या जवळं.. मी नेऊन देतो..! आज होळी आहे ना..त्यामुळं आईंनी खास  तुझ्या आवडत्या खरपूस  पुरणाच्या पोळ्या   पाठवून 
दिल्या आहेत..हा घे डबा.. !"
    बाबा रुमालानं चेहरयावरचा घाम  थरथरत्या हातानं टिपत म्हणाले. मोठ्या बाबांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशनस् झाली होती आणि काठीशिवाय त्यांना चालता येत नव्हतं. केवळ तिला पुरणपोळी आवडते म्हणून सहसा घराबाहेर न पडणारे पंचाहत्तर वर्षाचे बाबा उन्हातान्हात आईंनी दिलेला तो 'प्रेमा'नं ओथंबलेला  डबा घेऊन इतक्या लांब कंटाळा न करता आले होते..!!  निलिमा  स्तब्ध झाली होती..तिला आता गहिंवरून आलं होतं..!
   पुरणपोळी खायच्या आधीच तिचं पोट आज तृप्त झालं होतं. लग्न झाल्यापासून तिचे मम्मीपप्पा एकदाही तिला भेटायला आले नव्हते की कधी तिची चौकशी केली होती आणि इथं तिचे वयोवृद्ध सासरे भर उन्हात तिच्या आवडत्या  पुरणपोळीचा  डबा द्यायला धावत पळत इतक्या लांब आले होते.  शैलेशच्याआईंनं,  सासूबाईनी मायेनं पाठवलेल्या त्या पुरणपोळीवरच्या साजूक  तुपात तिचं र्हदय विरघळून गेलं होतं.      
       एका अदृष्ट प्रेमाची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली होती..!! आणि एका पोरकट समजुतीपायी थोड्या वेळापुर्वीच आपण त्यांना गावाकडे परत पाठवण्याचा विचार करत होतो  याची तिला आता लाज वाटायला लागली होती. तिनं हात धरून मोठ्या बाबांना खुर्चीवर बसवलं.  ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या  हातात देत म्हणाली.
 "बाबा कशाला एवढ्या उन्हात इतक्या लांब आलात. मी  आल्यावर रात्री  खाल्ल्या असत्या ना पोळ्या.! पण आता सांगून ठेवते. इथून पुढे तुम्हाला  कधीही कुठे  बाहेर जायचं असेल तर मला फोन करायचा. मी टॅक्सी पाठवुन देत जाईन.."    
      प्रमोशन हे आता तिच्या दृष्टीनं गौण झालं होतं..! तिनं जी.एम.ना कॉल लावला..सर मी आज जरा लवकर घरी जातेय. माझे सासरे मला घ्यायला आले आहेत.  महत्वाचं फॅमिली काम आहे. तशी गरज असल्यास मी  'ऑनलाईन' अव्हेलेबल असेनच. सॉरी.! " तासाभरात तिनं समोरचं काम आवरत घेतलं आणि ती बाबांना घेऊन ती निघाली.  बऱ्याच दिवसापूर्वी तिला बाबांनी डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे म्हणून सांगितलं होतं. जाता जाता तिनं नंबर चेक करून नवीन फ्रेम करायला टाकली आणि आईंसाठी एक छानसा गजरा विकत  घेतला. घरी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सोसायटीच्या होलिकोत्सवात गृपमधल्या मैत्रीणींबरोबर तिनं भाग घेतला. सकाळचं मोठ्या बाबांबरोबरचं आपलं बोलणं तिला आठवलं आणि तिला ओशाळं झालं. वातावरणातल्या अशुभ आणि दुषित उर्जेबरोबरच आपल्या मन आणि अंतःकरणांत गोचीडासारखं घट्ट चिकटून बसलेल्या अशा कालबाह्य आणि पोरकट समजूतींच तिनं आता 'होलिकादहन' केलं होतं..!!
          दुसरया दिवशी ती नेहमीच्या वेळी जागी झाली. उशालगत ठेवलेला मोबाईल तिनं ऑन केला आणि व्हॉटसअपवर मेसेज चेक करायला सुरवात केली आणि पहिलाच मेसेज तिच्या जी.एम.चा होता.
   "निलिमा मॅडम..रात्री उशीरा 'बोर्ड मिटींग' झाली..तुमचं 'हेड ऑफ डिपार्टमेंट' म्हणून सिलेक्शन झालंय.. अभिनंदन..!"  
    निलिमानं अंगावरचं पांघरुण बाजूला फेकून दिलं  आणि ती मोठ्या बाबांच्या रूमकडे धावत निघाली..! ती आनंदाची बातमी तिला आज सगळ्यांच्या आधी आपल्या मोठ्या बाबांना सांगायची होती..!! 
     त्यांचे कालचे 'ते' शब्द आज तिच्यासाठी आशिर्वाद होऊन आले होते..!!!

कृष्णकेशव देशमुख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...