आकाशला जगप्रसिध्द आयटी कंपनीकडून इंटरव्हयू आला म्हणून आकाश ठेंगणं झालं होतं. गेली १० वर्षे सतत केलेले कष्ट, अभ्यास, परीक्षा याचे फळ मिळण्याची वेळ आली होती. त्याने महिनाभर इंटरव्ह्यूची खूप तयारी केली होती. Out of the box प्रश्न कसे हाताळायचे याचा अभ्यास केला होता. त्या कंपनीत नोकरी मिळाल्यास त्याच्या करिअरचा आलेख वर जाण्यास खूप मदत होणार होती.
इंटरव्ह्यू अगदी चार दिवसावर आल्याने त्याने बॅग भरली. सकाळची फ्लाईट होती. संध्याकाळ पर्यंत तो कंपनी पासून पाऊण तासावर असलेल्या हिल्टन हॅाटेल मधे येऊन पोचला होता. हलकासा आहार घेऊन तो रूमवर गेला. परत एकदा सर्व नोटस् बघितल्या. बुटाला परत पॅालीश केलं व रात्री ९ ला झोपून गेला. सकाळी भल्या भल्यांपुढे त्याचं प्रेझेंटेशन होतं त्यामुळे नीट झोप घेणे फारच जरूरीचे होते.
पहाटे पाच वाजता तो गजर होण्यापूर्वीच जागा झाला. सातला बाहेर पडायचे होते. तो आंघोळ करून नाश्ता घ्यायला तिथल्या रेस्टॅारंट मधे गेला. गरम कॅाफी, ॲाम्लेट, टोस्ट खाऊन होईपर्यंत साडेसहा झाले होते. दहा मिनिटात कडक इस्त्री केलेले कपडे घालून बाहेर पडायचे म्हणून तो रूमवर आला. डोक्यात सतत रिव्हिजन सुरू होती.
त्याने नेव्ही रंगाच्या सुटाची पॅंट घातली. पांढराशुभ्र शर्ट घालून त्यावर टाय लावण्यासाठी बॅग उघडली पण तो शर्ट दिसला नाही. सगळ्यात खाली तो शर्ट ठेवला असणार म्हणून त्याने वरचे कपडे थोडेसे उचलून खाली बघितले पण पांढरा शर्ट दिसला नाही. आता मात्र त्याने सगळी बॅग उपडी केली. तरी पांढरा शर्ट सापडेना. त्याला दरदरून घाम फुटला. कुठे गेला पांढरा शर्ट? बाकी सगळं बॅगेत जिथल्या तिथे होतं पण पांढरा शर्ट नव्हता.असा कसा विसरलो शर्ट?
आता एकच पर्याय होता की पटकन् बाहेर जाऊन नवा पांढरा शर्ट घेणे पण नवीन गावात दुकाने कुठे आहेत, किती लांब आहेत हे स्वत: शोधण्यापेक्षा तो सरळ हॉटेलच्या लॅाबीमघे मॅनेजर कडे गेला. मॅनेजर एका गिऱ्हाईकाशी बोलत होता. हा तिथे अत्यंत अस्वस्थ पणे त्यांचं बोलणं कधी संपेल याची वाट बघत उभा होता.
तेवढ्यात मॅनेजरने विचारलं, “Sir, May I help you?” कावऱ्याबावऱ्या चेहऱ्यानं त्यानं त्याचा इंटरव्ह्यू साठी लागणारा पांढरा शर्ट विसरला आहे हे सांगितले व जवळपास एखादे दुकान आहे का विचारले. मॅनेजर म्हणाला,”दुकान आहे पण तिथे जाऊन शर्ट घेण्यास किमान अर्धा तास लागेल. तेवढा वेळ नाहीये तुझ्याकडे.”
आता काय करावे या चिंतेत असताना साधारण त्याच्याच उंचीच्या मॅनेजरने स्वत:चा पांढरा शर्ट तिथेच काढला व त्याला म्हणाला, “हा शर्ट बसतो का बघ. तसा जुना आहे पण स्वच्छ धुवून इस्त्री केलेला आहे. आत्तापुरता तुझ्या कामी येईल.” आकाशने तो शर्ट घालून बघितला. अगदी उत्तम नाही पण बरा बसला शर्ट. त्यावर टाय व कोट आल्याने कमी जास्त फिटींगकडे कुणाचे लक्ष जाणार नाही असे वाटून तो मॅनेजरला म्हणाला, “Thank you so much. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला निघायला पाहिजे इंटरव्ह्यू साठी.. पण मी परत आलो की आपण शांतपणे बोलू.”
मॅनेजर म्हणाला, “जा लवकर.. ट्रॅफिक वाढण्यापूर्वी बाहेर पड. Good luck and do well!” मॅनेजरचा हात हातात घेऊन आकाशने शब्दाशिवाय डोळ्यांनी व स्पर्शाने त्याला शतशः धन्यवाद दिले. तो लगेच बाहेर पडला व वेळेवर कंपनी मधे वेळेवर पोचला.
आकाशचा इंटरव्ह्यू उत्तम झाला. तो संध्याकाळी हॉटेलवर परत येताच मॅनेजरला शोधू लागला. मॅनेजर दिसताच त्याने त्याला कडकडून मिठी मारली व इंटरव्ह्यू चांगला गेल्याचे सांगितले. मॅनेजरला आपण एकत्र जेवू म्हणून बाहेर घेऊन आला. त्याचे नाव जिम असल्याचे समजले.
“मी मॅनेजर नाही..मी दोन आठवड्यापूर्वी इथे कामाला लागलो आहे.. जिम म्हणाला. “मला घरच्या परिस्थिती मुळे कॅालेज परवडलं नाही. कॉलेजसाठी पैसे जमवण्यासाठी मी ही नोकरी मिळवली आहे. बरं ते जाऊदे. तुला नोकरी मिळाली तर परत भेट होईलच. नक्की कळव मला काय होते ते!”
आकाशने त्याचा निरोप घेतला. त्याच्या मनात आलं, कोण कुठला हा माणूस.. कधी न बघितलेला...जो बेताच्या पगारावर नुकताच कामाला लागला होता त्याने क्षणार्घात स्वत:चा शर्ट काढून दिला होता..अगदी भावासारखा..अगदी जीवश्चकंठश्च मित्रा सारखा! देण्यासाठी पैसा असावा लागत नाही.. फक्त इच्छा असावी लागते. दिल असावं लागतं. निर्मळ मन असावं लागतं. दुकानाचं नाव सांगून मोकळं व्हायचं ते सोडून ट्रॅफिक मधे मी अडकणार याची चिंता करण्याची त्याला काही गरज नव्हती. स्वत:च्या अंगावरचा शर्ट क्षणार्घात काढून देणारा आकाशला भेटला होता.
त्यात घरची परिस्थिती बेताची. कॉलेजला जायला मिळाले नसताना! प्लेटोने म्हटलंय ना..
“Be kind, for everyone you meet is fighting a hard battle”
आकाशला वाटलं.. नोकरी मिळेल न मिळेल माझ्या हातात नाही पण हा अनुभव माझं आयुष्य बदलणारा आहे!
सहा महिन्यांनी जिम दिवसभर काम करून संध्याकाळच्या कॅालेजमघे कॉम्प्युटर सायन्स चे क्लासेस घेताना दिसू लागला. त्याला काही जमत नसल्यास आकाश त्याला शिकवत असे. आकाशला त्या आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. आकाशने त्याच्या बॉसला जिमने दिलेल्या शर्टाबद्दल सांगितले होते. बॉस हसला या म्हणाला," तरीच एवढा सैल शर्ट तू का घातला होतास असे वाटलेच आम्हाला!“ कंपनीमध्ये सेक्रेटरीच्या नोकरीसाठी जिम ने अर्ज करावा असे बॉसने सुचवले कारण कंपनी मधे काम करणाऱ्यांना कंपनी कॅालेजचा अर्धा खर्च देत असे.
आकाशने जिमच्या कंपनी इंटरव्ह्यू साठी नवा कोरा पांढरा शर्ट आणला होता. जिमने तो शर्ट घालून इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याला ती नोकरी मिळाली होती.
एका पांढऱ्या शर्टानं एक नवं वाटणारे नातं जागवले होते. माणुसकीचे नाते. वरवर अनोळखी वाटणारे...पण खूप ओळखीचं! सामान्य वाटणारा माणूस अशा लहानशा प्रसंगातून त्याचं असामान्यत्व जेव्हा सिद्ध करते तेव्हा तो क्षण भारून टाकणारा असतो. ते दिव्य नातं जपत दोन अनोळखी वाटणाऱ्या व्यक्ती कायमच्या जवळ आल्या होत्या!
एका स्त्रोतापासून निर्माण झालेले आपण सारे कायमचे माणूसकीच्या नात्याने बांधले गेले आहोत. त्या नात्याचा मान राखून वागलो तर सर्व भांडण-तंटे-द्वेष-इर्षा संपून जातील आणि जगाचे नंदनवन होईल.
©® ज्योती रानडे
©️2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा