गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2751. एका निस्वार्थ, निर्व्याज प्रेमाची परिपूर्ती

 "अहो अजून चहा नाही का संपवला?. गार होऊन जाईल ना तो." माधवीने निमिषला आवाज देत म्हंटल. निमिष वर्तमानपत्रात डोकं घालून एका बातमीत व त्यावरील फोटोकडे मन लावून पहात होता. त्याच्या जरासं जवळ जात माधवीने त्याच्या मागूनच तो काय एवढं तल्लीन होऊन वाचतोय हे बघायला पेपर मध्ये डोकावलं आणि तो वाचत असलेल्या बातमीकडे आणि त्यावरील फोटोकडे पाहून ती क्षणभर स्तब्ध झाली. तिला काही सुचलेचं नाही पण ती लगेच सावरली. हातातलं काम बाजूला ठेऊन ती निमिषच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसली.
"ऐकताय का?...मी काय म्हणते?..." तिच्या या वाक्याने त्याची तंद्री भंगली. चेहऱ्यावरचा जरासा मलूल भाव लपवत तिच्याकडे बघतं तो म्हणाला "हा बोल काय म्हणत होतीस?"
"मी काय म्हणते तुम्ही जरा जाऊन येता का नाशिकला? भेटून या तिला. अशावेळी तरी सगळं बाजूला ठेवा आणि मनापासून भेटा तिला. आता आपल्या सगळ्यांचीच पन्नाशी आलीय. आता काय, कसला आणि कोणाचा विचार करायचा...?"
" अगं पण..."  तो काही म्हणायला गेला तसं त्या मध्येच त्याला तोडत माधवी पुढे म्हणाली.
"बाकी सगळं बाजूला ठेवा आणि जा भेटा तिला. मी ही येत नाही. तुम्ही एकटेच जा. एकटे गेलात तर रस्त्यात जाताना मागच्या जुन्या आठवणीत रमालं. जुने दिवस आठवालं. तेच तर काही क्षण हवेत तिला. एक माणूस म्हणून भेटा आणि लगोलग परत या."
त्याने फक्त माधवीकडे पाहिलं. माधवीने निमिषचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर जरासं थापटलं. तिच्या त्या आश्वासक नजरेने त्याच्या मनानं जराशी उभारी घेतली.
"तुझं म्हणणं बरोबर आहे. चल उद्याचं जाऊन येतो. माझी तयारी कर. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येईन." असं म्हणून ते दोघेही आपापल्या कामाला लागले.
निमिष, माधवी आणि निर्मला. हे तिघेही अगदी शाळेपासूनचे मित्र. निमिष हा अत्यंत हुशार मुलगा. शाळेतल्या सगळ्या गोष्टीत तो सगळ्यात अव्वल असायचा. दिसायला ही अगदी चुणचुणीत, रुबाबदार असल्याने सगळे त्यावर लट्टू असायचे. पुढे शाळा संपली आणि तिघांनीही कॉलेजला प्रवेश घेतला. निर्मलाच्या मनात निमिष विषयी एक हळवा कॉर्नर होता. पण हे कोणाला माहीत नव्हतं अगदी माधवीला सुद्धा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना काही महिने बाकी असताना निर्मलाने स्वतःहून आपल्या भावना निमिषपाशी व्यक्त केल्या. तिच्या त्या अचानक विचारण्याने निमिष त्यावेळी अगदी अचंबित झाला होता. क्षणभर तो चक्रावून गेला. तो एक अभ्यासू आणि करिअरच्या मागे धावतं उत्तुंग स्वप्न पाहणारा एक विद्यार्थी तरुण होता. त्यांच्या मनात यत्किंचितही असले काही विचार कधी कोणाच्या बाबतीत आले नाही. तो, निर्मला आणि माधवी हे अगदी जिगरी मित्र होते यापलिकडे कधी कोणी विचारचं केला नव्हता. निर्मलाच्या अचानक अशा विचारण्याने तो जरासा भांबावला पण त्याने स्वतःला लगेच सावरले. त्याला अवघडलेल्या परिस्थितीची जाणीव झाली. त्याने मग ही परिस्थिती अगदी प्रगल्भपणे हाताळली. निर्मलाला न दुखावता आणि त्यांच्यात असलेल्या निर्भेळ नात्यात कोणताही दुरावा निर्माण होणार याची काळजी घेत त्याने निर्मला समोर आपली बाजू मांडली. त्याचं आयुष्य, त्याच्या भविष्यातील योजना, त्याची ध्येय, त्याची पुढची करिअर वाटचाल याविषयी तिला व्यवस्थित समजून सांगत त्याने तिच्या मनात त्याच्या विषयी कोणताही किंतु राहणार नाही याची काळजी घेत तो विषय संपवला. पुढे मग ते असेच हसतखेळत भेटतं राहिले. कॉलेज संपले. जो तो आपल्याला मार्गी लागला. पुढील शिक्षणाला निमिष परदेशी निघून गेला. निर्मला वेगळ्या शहरात निघून गेली. माधवीला नोकरी लागली आणि ती आपल्या आयुष्यात व्यस्त झाली. पुढचे तीन चार वर्षे अशीच गेली. सुरुवातीचे काही दिवस ते एकमेकांच्या संपर्कात राहिले पण काळाच्या ओघात तिघांचेही बोलणे, भेटणे कमी कमी होत गेले आणि जो तो आपल्या विश्वात रममाण झाला.
    चार वर्षांनी निमिष शिक्षण आणि काही दिवसांची नोकरी करून भारतात परतला. भारतात आल्यावर त्याने पुण्यात स्वतःची एक कंपनी सुरू केली आणि काही दिवसांत ती चांगली नावारूपाला आली. माधवीशी संपर्क करून त्याने तिला आपल्याच कंपनीत मदतीला बोलावून घेतले. निर्मलाने मात्र आपला वेगळा मार्ग जोखाळला होता. ती आता एका प्रतिष्ठित कॉलेजात प्रोफेसर म्हणून काम करत होती आणि ती आता एक नामांकित साहित्यिक झाली होती. तिच्या कथा, लेख, कविता वेगवेगळ्या पेपरात, मासिकात छापून येत होत्या. सलग काही वर्षे काम केल्यावर माधवी आणि निमिषने सहमतीने अगदी घरचांच्या परवानगीने लग्न करायचा विचार केला आणि त्यांचे लग्नही झाले. निर्मला आवर्जून लग्नाला आली होती आणि अगदी उत्साहाने आनंदाने तिनं संपूर्ण लग्नात माधवीची साथ केली होती. लग्न झाले आणि माधवी-निमिष आपल्या संसारात आणि कंपनीच्या कामात व्यग्र झाले.
     निर्मलाने मात्र लग्न केलेच नाही. साहित्य क्षेत्रात तिचं खूप नाव होऊ लागलं होतं. पुढे तिची काही पुस्तके निघाली होती. वेगवेगळ्या संस्थाचे आणि सरकारचे अनेक पुरस्कार तिला मिळायला लागले होते. अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तिला  बोलावलं जायचं. अनेक मासिक, पेपरात तिचे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे फोटो आणि लेख छापून यायचे. माधवी आणि निर्मला ते सर्व आवर्जून वाचत असतं. एक मात्र गोष्ट खास होती. निर्मलाच्या लेखात कवितांत, कथेत 'निमिष' हा शब्द कोठेना ना कोठे असायचाचं. निमिषने माधवीला आधीच सर्व सांगितले होते त्यामुळे दोघांनाही ते विशेष काही वाटायचं नाही. निर्मलाच्या कवितेत आवर्जून डोकावणारा 'निमिष' हा शब्द खरंतर बरंच काही सांगून जायचा.
      वर्षे सरत होती. माधवी निमिषची कंपनी मोठी होत होती आणि इकडे निर्मला आता निर्मलाबाई  झाल्या होत्या. साहित्य वर्गात ते आता एक उत्तुंग नाव झालं होतं. अनेक टीव्ही चॅनलवर, अनेक परिसंवाद आणि कार्यक्रमात ती झळकत होती. परदेशात ही तिच्या व्याख्यानाला आणि भाषणाला बरीच मागणी असायची. निर्मलाविषयी सगळं या दोघांना म्हणजे निमिष-माधवीला पेपरमधून आणि टीव्ही वरून समजतं होत. कधीमधी फोन सोडला तर तसा आताशा त्यांचा एकमेकांशी थेट संपर्क राहिला नव्हता.
     बघता बघता आता पन्नाशी जवळ आली होतो आणि काही महिन्यांपूर्वी निर्मलाबाई एका ठिकाणी व्याख्यान देत असताना अचानक व्यासपीठावर कोसळल्या. पटापट चक्रे हलली. अनेक चाचण्या झाल्या आणि नको ती दुःखद बातमी हाती आली. निर्मलाला कॅन्सर झाला होता आणि त्याच निदान अगदी शेवटच्या क्षणी झालं होतं. आता तिच्याकडे काहीच महिने उरले होते. निर्मलाने आपलं बस्तान आपल्या मूळ गावी नाशिकला हलवलं. आताशा तिचे सगळे कार्यक्रम बंद झाले होते. तिच्या तब्येती विषयीच्या बातम्या टीव्ही आणि पेपर मधून समजत होत्या. आजच्या पेपरातली अशीच एक बातमी वाचून निमिष जरासा हळवा झाला होता. निर्मला आता अत्यव्यस्थ असून तिला दवाखान्यात ICU मध्ये भरती केल्याची ती बातमी होती आणि त्याचं बातमीने निमिष आतून जरासा हलला होता. अगदी सहा महिन्यापूर्वी निर्मला पुण्यात आली होती आणि त्यावेळी नेमकं ही दोघे पुण्याच्या बाहेर गेली होती आणि त्यामुळे या तिघांनी भेट होता होता राहिली होती. निर्मलाच्या मनात निमिष विषयी एक हळवा कोपरा आहे याची माधवीला पुरेपूर जाणीव होती आणि म्हणूनच तिनं निमिषबरोबर नाशिकला जायचं टाळलं होतं.
निमिष नाशिकला पोहोचला. दवाखान्यात त्याने पाऊल टाकलं आणि एक माणूस धावत पळत त्याच्यापाशी आला...
"तुम्ही निमिष सर का?..."
निमिषने आश्चर्यचकित होऊन "हो" म्हंटल
"या मी तुमचीच वाट बघत होतो. मी निर्मलाताईंचा स्वीय सहाय्यक. त्या मागे मला म्हणाल्या होत्या की तुम्ही त्यांना भेटायला जरूर यालं. त्यांनी तसं मला सांगूनचं ठेवलं होतं. चला मी तुम्हाला घेऊन चलतो."
निमिष अगदी भारावलेल्या अवस्थेत त्याच्यामागून ICU मध्ये पोहोचलो. त्याने निमिषला निर्मलाच्या खोलीपाशी सोडले. दरवाज्याच्या तावदानातून आत बोट दाखवत तो निमिषला म्हणाला.
" सर निर्मलाताई तुमचीच वाट पहात आहेत..."
दरवाजा ढकलून तो आत आला. निरव शांतता रुमभर भरलेली होती. यंत्राची होणारी टिकटिक तेवढी ऐकू येत होती. हातापायांना लावलेल्या वेगवेगळ्या नळ्या आणि तोंडावर मास्क लावलेली निर्मला अगदी निस्तेज होऊन त्या बेडवर पहुडलेली होती. आज कित्येक वर्षांनी तो निर्मलाला पहात होता. त्याला काय करावे ते क्षणभर सुचेना. तो तसाच तिच्या त्या बेडजवळ गेला. बाजूच्या स्टूलला बेडजवळ आणत तो तिथे बसला. निर्मला शांत डोळे मिटून पडली होती.
तेवढ्यात एक नर्स आत आली, तिनं काही गोष्टी चेक केल्या. निर्मलाताईंच्या जवळ जात तिनं त्यांना हलके हलवत आवाज दिला.
"ताई ओ ताई जरा डोळे उघडा, कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय..."
निर्मलाने अगदी जड पापण्यांनी किलकिल्या डोळ्यांनी समोर पाहिलं. धूसर अंधुक नजरेतुन त्यांना निमिषचा चेहरा ओळखू आला. निमिषला समोर बघून त्यांच्या डोळ्यात अचानक एक चमक आली.
"निमे, अगं ओळखलं का? .मी निमिष...तुला भेटायला आलोय." अगदी कातर आवाजात निमिष म्हणाला. निर्मलाच्या त्या अवस्थेकडे त्याला बघवतं नव्हतं.
निमिषच्या आवाजाने तिने अजून थोडेसे डोळे उघडे केले. खरोखरचं निमिष समोर बघून तिच्या चेहऱ्यावर त्याही अवस्थेत एक आनंदाची लकेर चमकून गेली. निमिष बसायचा स्टूल अजून जरासा पुढे करत बेडपाशी आला. त्याने अलगदपणे निर्मलाचा हात आपल्या दोन्ही तळहातात धरला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्याला बोलायला कंठ फुटेना. गळ्यात आवंढा दाटून आला. छाती भरून आली. डोकं जड झालं होतं. तिच्या हातावर फक्त आपला हात थोपटत तो निर्मलाकडे बघत होता. काही वर्षांपूर्वी कॉलेजातील आपल्या या मैत्रिणीची अवस्था त्याला बघवत नव्हती. त्याच्याकडे बोलण्यासारखे खूप होते पण शब्द फुटत नव्हते. एकटक तो निर्मलाकडे बघत होता. निर्मला अगदी जमेल तसे डोळे उघडून त्याच्याकडे बघत होती. बहुदा तिलाही काही म्हणायचे होते पण तिच्या तोंडी शब्द येत नव्हते. तिचे ओठ काही बोलण्यासाठी थरथरत होते. जरासं जोर लावून काही बोलण्यासाठी तिनं अगदी ताकद लावून आपली मान किंचितशी वर केली. तिच्या ओठात शब्द आले आणि क्षणात सगळं शांत झालं.
एका अनामिक अविरत तृप्तीचा, समाधानाचा भाव तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. मशिनची टिकटिक थांबली होती. निमिषच्या डाव्या डोळ्यातून अश्रूंचा एक ओघळ बाहेर पडला आणि तो त्याने तिच्या हातात धरलेल्या हातावर पडला.
एका निस्वार्थ, निर्व्याज प्रेमाची परिपूर्ती झाली होती.

कुलकर्ण्यांचा " ....... " प्रशांत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...