बिल्डिंगच्या बाहेर स्कुटर काढताना शचीला दारात एक मेटाडोर दिसली. साधारण तिच्याच वयाचा एक उंच, स्मार्ट मुलगा उभा होता.
“ए हॅलो ! माझी काही मदत हवी असेल तर...” शचीनं त्या मुलाला विचारलं.
देवराजनं वळून पाहिलं. हेल्मेट घातलेली, स्कुटीवर बसलेली एक मुलगी त्याला विचारत होती. हेल्मेटमुळं चेहरा अस्पष्ट दिसला.
“नो, थँक्स अ लॉट.” देवराजनं सामान उतरवायला सुरुवात केली.
“कितवा मजला?”
“पाचवा मजला.” देवराजनं परत वळून सांगितलं.
“ओह! म्हणजे आमच्याच शेजारी. एका मजल्यावर चार फ्लॅट्स आहेत आणि आमच्या बाजूचाच भाड्यानं द्यायचा होता. मी हे बारीक-सारीक सामान न्यायला मदत करू का?”
“नको, ती माणसं नेतील सगळं.”
“अहो,क्रॉकरी असेल तर फुटू शकते!”
देवराज आता वैतागला. काय करावं ह्या मुलीचं! हिची बडबड संपतच नाही.
“मॅम, मी करतो मॅनेज. तुम्ही बाहेर निघालात ना? तुमचा वेळ जाईल.”
“ए हॅलो, ते मॅम वगैरे नको हं! शची पेंडसे नाव आहे माझं! शची कोण होती,माहिती आहे न? स्वर्गाचा राजा इंद्र… त्याची बायको शची! आणि मला भरपूर वेळ आहे हो! मी मैत्रीणीकडे गप्पा मारायला निघाले होते… तुमचं नाव?”
देवराज दोन मिनिटं शांत राहिला. ‘इंद्राची बायको शची’,असं ही आत्ताच म्हणाली आणि माझं नाव ‘देवराज’ म्हणजे इंद्रच!
काही क्षणानं तो बोलला, “माझं नाव राजप्रसाद नाईक. अजून काही माहिती हवीय?”
“छे हो ! ती तुम्ही शेजारी आलात की मिळेलच आणि संध्याकाळच्या खाण्याची काळजी करू नका. मी डबा घेऊन येते… बाय!”
शचीने स्टार्टर ऑन केलं आणि झरकन स्कुटर घेऊन गेली सुद्धा ! देवराज अवाक् होऊन पाहत राहिला… काय मुलगी आहे! ओळख ना पाळख ! तोंडाची टकळी थांबतच नव्हती. त्यानं एक एक सामान मजुरांना लिफ्टनं वर न्यायला सांगितलं.
संध्याकाळी बेल वाजली म्हणून देवराजनं दार उघडलं.
“हाय ! मी शची. आपण सकाळी भेटलो होतो. तुम्हाला माझा चेहरा दिसला नसेल पण मी तुम्हाला पाहिलं होतं.”
शची आत आली आणि तिनं टिफिन टेबलवर ठेवला. देवराजनं तिच्याकडे पाहिलं. निरागस सौंदर्य त्याच्यापुढं उभं होतं. गोरा, नितळ रंग, थोडंस अपरं नाक आणि गुलाबी ओठांवरचं गोड हसू!
“ए हॅलो ! डब्यात पोळी-भाजी, मसालेभात आणि कैरीचं लोणचं दिलंय. व्यवस्थित जेवण करा. मसालेभात मी केलाय हं ! कसा झाला ते उद्या सांगा.”
“तुम्ही कशाला तसदी घेतली? मी बाहेरून मागवलं असतं.” देवराज संकोचून म्हणाला.
“आमच्या घरी पद्धत आहे. नवीन भाडेकरू कुणी आले की त्या दिवशी डबा नेऊन द्यायचा. मी निघते. उद्या डबा घ्यायला येते. रिकामा !” शची खळखळून हसत म्हणाली आणि निघाली.
देवराजला गम्मत वाटली. ह्या मुलीला बोलायला आणि हसायला काही कारणच लागत नाही असं दिसतंय.
दुसऱ्या दिवशी देवराज डबा परत द्यायला निघणार, इतक्यात त्याला आठवलं की, आई कुणाचाही डबा देताना कधीच रिकामा देत नाही. त्यात साखर तरी घालतेच. त्यानं डब्यात साखर घातली आणि तो नेऊन द्यायला निघाला.
बाकीच्या तीन फ्लॅटपैकी जिथं पेंडसे नाव दिसलं ती बेल त्यानं वाजवली. साधारण पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या एका स्त्रीनं दार उघडलं.
“नमस्कार, मी राज नाईक… शेजारी राहायला आलोय. तुमचा डबा…” त्यानं डबा पुढे केला."
“या, आत या. शचीनं मला तुमचं नावं सांगितलं. आवडली का भाजी, मसालेभात?”
“हो, फारच चविष्ट… पण तुम्ही उगाच त्रास घेतलात.”
“त्रास कसला हो त्यात! आमच्या शचीचं ऐकावं लागतं. तिनंच हे ठरवलंय.”
“हो, काल त्या मला सांगत होत्या.”
“ए हॅलो! ‘त्या’ वगैरे नको म्हणू हं! मला एकेरी हाक मारणार असशील तरच आपली मैत्री होईल.” शची खोलीतून बाहेर येत म्हणाली.
पांढराशुभ्र शर्ट, नेव्ही ब्ल्यू जीन्स, एक छोटासा पोनी आणि मध्यम बांधा आणि तेच गोड हसू! देवराज शचीकडे बघत असताना ती जोरात हसली.
“ए हॅलो! असं काय बघतोस? काही ॲबनॉर्मल आहे का माझ्यात?”
देवराज एकदम कावराबावरा झाला. त्याची नजर खाली गेली. तो जायला निघाला इतक्यात शची म्हणाली,
“चहा घेऊनच जा… बाय द वे, ही माझी आई, शरयू पेंडसे आणि माझ्या बाबांचे नाव श्रीधर पेंडसे. बाबा ऑफिसमधून आले की तुला भेटतीलच. मी चहा करून आणते.”
दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून घरी आल्यावर, त्याला लिफ्टमध्ये एक व्यक्ती दिसली. देवराजनं लिफ्टचे पाच नंबरचं बटन ऑन केलं.
“तुम्हीच राज का?”
“हो, आपण?”
“मी शचीचा बाबा… श्रीधर पेंडसे. चला आमच्या घरी. मस्त चहा आणि गप्पांची मैफल करू.”
“काका नको, परत कधीतरी येईन.”
“हे ‘परत कधीतरी’ कधीच येत नसतं… चला, मस्त गरमागरम समोसे आणलेत. चहासोबत खाऊ.”
देवराजला जबरदस्तीने श्रीधरनं घरी नेलं. “शरू,राज आलाय. फक्कड चहा कर आणि त्यासोबत हे समोसे!”
“आता दोन तास बघायला नको. श्रीधर… पण राजला बोलायला आवडतं का? तू आणि शची म्हणजे समोरच्या माणसाला इच्छा नसेल, तरी बोलायला लावता.”
“नाही काकू, तसं काही नाही…” देवराज हसत म्हणाला.
“राज, तुझ्या घरी कोण कोण असतं?” श्रीधरनं विचारलं.
“मी आणि आई! आता आई एकटीच सोलापूरला असते. शाळेत मराठीची शिक्षिका आहे. बाबा मी पाच वर्षांचा असताना अल्पशा आजारानं गेले. आईनं माझ्यावर उत्तम संस्कार केले. बाबांची उणीव कधी भासू दिली नाही. तिचीही नोकरी असल्यामुळं ती इथे माझ्याबरोबर पुण्यात राहू शकत नाही. एक वर्ष मी बंगलोरला होतो… आता पुण्यात जॉब मिळालाय.”
“गुड, आमच्या घरी केव्हाही निःसंकोचपणे येत जा. आपलंच घर समज. शचीची ओळख झालीच असेल ना?”
“ओळख? तिची बडबड ऐकून तो कंटाळला असेल.” शरयू चहाचे कप टेबलवर ठेवत म्हणाली.
“गेली कुठंय आत्ता?”
“मैत्रिणीच्या लग्नाचं संगीत… शची हवीच न सगळीकडे. तिचा उत्साह दांडगा असतो.”
“माझी मुलगी आहेच तशी… आनंद घेणारी आणि आनंद देणारी!”
देवराजनं श्रीधरकडे पाहिलं… मुलीचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
देवराज फारसा बोलका नसला तरी शचीसमोर त्याला बोलावंच लागायचं. ती रोज संध्याकाळी देवराजशी गप्पा मारायला यायची. तिचं सतत येणं, तिचं भरभरून बोलणं, तिचं खळखळून हसणं देवराजला हवंहवंसं वाटायला लागलं.
त्याला शची आवडायला लागली होती. थोडा शचीच्या मनाचा अंदाज आला की तो तिच्याजवळ मन मोकळं करणार होता. नेहमीसारखी शची गप्पा मारायला आली…
“ए हॅलो! राज…”
“एक मिनिट शची! प्रत्येक वाक्याच्या आधी ‘ए हॅलो’ म्हणायलाच हवं का?”
“अरे वो मेरी स्टाईल है! माझी ओळख आहे.” तिचं ते जीवघेणं हसणं आणि ते अपरं नाक बघून देवराज परत भाळला.
“राज, माझ्यासाठी आई-बाबा वरसंशोधन करताहेत.”
“म्हणजे तू अजून सिंगल आहेस?”
“ए हॅलो! तुला काय म्हणायचंय? मी अगदीच सिंगल आहे.”
“कसा हवा तुला नवरा?”
“मला श्रीमंत नवरा हवाय… मस्त मोठ्ठा फ्लॅट, दारात पॉश गाडी, भरपूर बँक बॅलन्स असलेला…”
“थोडक्यात तुला श्रीमंत पतीची राणी व्हायचंय. मग तो मुलगा कसाही असू दे!”
“ए हॅलो! चांगला मुलगा आणि त्याबरोबर हे पण सगळं मला हवंय.”
“तुझ्या मनासारखं होऊ दे…!”
“राज, माझ्या लग्नात तू सतत मला माझ्याबरोबर हवास.”
“कशाला? पु लं चा नारायण करणार आहेस का तू मला?”
“जोक्स अपार्ट राज! तुझ्याइतका सच्चा मित्र माझा कुणीच नाहीय.”
शची आपल्याला फक्त मित्र मानते हे देवराजला कळलं आणि त्याची प्रीत अबोलच राहिली.
वधुवर सूचक मंडळातून शचीचं लग्न ठरलं. मुलगा मुंबईचा होता. अगदी शचीला हवा तसाच! देवराजनं लग्नात एखाद्या घरच्या व्यक्तीसारखी जबाबदारी घेतली. श्रीधर आणि शरयू तर त्याला मुलगाच मानायला लागले.
लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. श्रीधरनं सगळी हौस केली. मुंबईला निघताना शची देवराजजवळ आली. रडत रडत त्याला म्हणाली,
“आईबाबांकडे लक्ष ठेवशील. त्यांना तुझा आधार वाटतो.”
“ए हॅलो ! आधी डोळे पूस. तू तुझ्या राजाला सुखी कर. आईबाबांची काळजी करू नको. मी आहे.”
राजचं ‘ए हॅलो’ ऐकून शची रडतानाच खुदकन हसली.
शचीचे लग्न होऊन महिना होऊन गेला होता. एक दिवस देवराज ऑफिसमधून आल्यावर श्रीधरकडे गप्पा करायला आला. दार शचीनंच उघडलं. तिला बघून देवराजला आश्चर्यच वाटलं.
“काय ग गधडे, कधी आलीस? काही सांगितलं पण नाहीस येणार आहेस ते !”
“प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का?” इतकं बोलून शची आत निघून गेली.
ही अशी शची देवराज पहिल्यांदाच बघत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहरा काळवंडून गेलेला.
“राज...अरे बस. शची आलीय.”
“तिनंच तर दार उघडलं. काय झालं काका? एनी प्रॉब्लेम? शची अशी का दिसतेय?”
“काही बोलत नाहीये रे. आल्यापासून गप्पच आहे. जास्त विचारलं तर चिडते.”
“ओह! थोडा वेळ जाऊ दे. सांगेल ती.”
दुसऱ्याच दिवशी देवराजला शची परत मुंबईला गेल्याचं कळलं. त्यानं मग फार खोदून विचारलं नाही पण महिन्याभरानं शची परत आली आणि ती देखील कायमची. सासर सोडून!
ह्या नाजूक प्रकरणात आपण फार विचारणं, देवराजला योग्य वाटलं नाही. पण एक दिवस रात्री अकरा वाजता तो झोपायच्या तयारीत असताना बेल वाजली. दार उघडलं तर श्रीधरकाका समोर! देवराजने त्यांना आत घेतलं आणि दार लावलं. दार लावल्याबरोबर श्रीधर रडायला लागले.
“राज, माझ्या मुलीची फसवणूक झालीय रे!”
“काका, शांत व्हा… आणि मला समजेल असं सांगा प्लिज. काय झालं?”
“राज, शचीचा नवरा तिला वैवाहिक सुख द्यायला असमर्थ आहे!”
देवराज ते ऐकून चरकला. श्रीधरचं सांत्वन कसं करावं त्याला कळेना. तो फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. हे फारच धक्कादायक आणि अनपेक्षित होतं.
शचीनं घराबाहेर पडणं बंद केलं होतं. अशा परिस्थितीत देवराजचं त्यांच्याकडे जाणं कमी झालं. गप्पा बंद झाल्या. घटस्फोटाची सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत जवळपास वर्ष गेलं. देवराज आणि श्रीधर, दोघंही बाहेर भेटत आणि बोलत. श्रीधरला हा धक्का पचवणं जड जात होतं.
“राज, माझ्या मुलीच्या संसाराचा ‘आरंभ’ होता होता शेवटच झाला!”
देवराजनं मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो श्रीधरला म्हणाला, “काका, शचीच्या संसाराचा परत सुखारंभ होऊ शकतो…”
“अरे, तुला म्हणायचंय तरी काय?”
“मला शचीशी लग्न करायचंय.”
“वेडा आहेस का? तुझ्यासारखा इतका सालस, उपवर मुलगा आणि शचीसारख्या घटस्फोटितेशी लग्न?”
“काका, तुमचा होकार की नकार ते फक्त मला सांगा.”
“अरे, तुझ्या आईचा विचार केलास का? त्या माऊलीची काय चूक?”
“आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करेन ते योग्यच असेल, ही तिला खात्री असते.”
“राज, मला शचीशी बोलावं लागेल…”
“अर्थात काका, तिची इच्छा असेल तरच!”
दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून आला, त्यानं दार उघडलं आणि बंद करणार इतक्यात शची आत आली. तिनं दार लावून घेतलं.
“का करतोयस माझ्यावर उपकार? मी तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून? की शेजारधर्म? माझ्या आयुष्याचं यापुढं काय करायचं ते मी ठरवेन. तुझ्या उपकारांची मला गरज नाही.” इतकं बोलून ती जायला वळली.
“शची थांब ! झालं तुझं बोलून? आता मी काय सांगतो ते ऐक. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एक गोड, निरागस, बडबडी मुलगी एवढीच ओळख माझ्या मनात होती. पण तुझ्या सहवासात आलो. तुझं निर्मळ मन, माणसं जोडण्याची वृत्ती, दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी. हे सगळं जवळून बघितलं आणि तू आवडायला लागलीस. “तुझ्यात मी माझी प्रेयसी बघायला लागलो. पण आयुष्याच्या जोडीदाराच्या तुझ्या अपेक्षा ऐकून मी माझ्या भावना मनातच ठेवल्या. माझं प्रेम मी व्यक्त केलं नाही. मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाहीय. फक्त तुला साद घालतोय. मला साद द्यायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे.”
शचीचे डोळे भरून वाहायला लागले. ती तशीच मागं वळली आणि देवराजच्या कुशीत शिरून रडायला लागली.
“ही तुझी साद समजू का?” देवराजनं विचारलं.
शचीनं रडत रडत मानेनं होकार दिला.
“ए हॅलो ! इंद्राची बायको शची.”
शचीने प्रश्नार्थक नजरेनं देवराजकडे पाहिलं.
“माझं नाव ‘देवराज’ आहे.”
“काय?” शचीनं आश्चर्यानं विचारलं.
“हो, आता देवराज आणि शचीच्या संसाराचा गोड आरंभ होणार आहे.”
देवराजनं शचीला जवळ घेतलं. त्याची प्रिया त्याच्या बाहुपाशात होती.
- सौ मधुर कुलकर्णी, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा