“कसले ग तुझे हट्ट, ‘जुनी सगळी भांडी ठेवा.’ म्हणून ! इथं तुझं तुला होत नाही आणि तू काय ह्या भांड्याना स्वच्छ ठेवणार?”
माहेरी आलेल्या सुमी आणि पमी दोघी चिडून बडबडत होत्या. वर्षभर सासरी राबराब राबायचं. जरा दोन दिवस माहेरी यावं, तर त्यात आईच्या आजारपणामुळं कामं साठून पडलेली असायची.
बरीच वर्षं केलं दोघींनी. आईची जुनी आजीच्या आठवणीतली तांबे-पितळेची भांडी-कुंडी सगळं लख्ख करायच्या. आईला होत होतं, तेव्हा ती करतच होती, हे सगळं त्या बघून होत्या. पण आता त्या दोघींनी चाळीशी ओलांडली होती. त्यामुळं त्यांची चिडचिड व्हायची,
“आई, जरा दोन दिवस राहू दे ग निवांत.” असं म्हणत यंदा तर मोर्चा ते भांडे विकण्यावरच निघाला होता. आई मात्र टपटप पाणी गाळत होती. ते बघून रवी आईजवळ येऊन बसला. तिला जवळ घेतलं,
“आई, अग काही गोष्टींचे मोह सोडायला हवे ना? माझी चाळीशी आली तरी मला बायको मिळेना. आपलं दोघांचं आणि नोकरी करता करता मी दमून जातो ग ! ताई तरी किती लक्ष घालणार आणि तुला तर ती सगळी भांडी अशी माळ्यावर अडगळीत दिसली की किती हळहळ वाटते. त्यापेक्षा विकून टाकू देऊ. म्हणजे बघून बघून त्रास करून घेणं नको ना.”
आई उदास हसली. आपले डोळे पुसत म्हणाली, “खरंच, कालपर्यंत ज्या वस्तू माझा संसार होता, ती आज अडगळ झाली. तो बंब आठवतोय ना, मागच्या अंगणात कसा पाय रोवून मस्त उभा होता. आजी आणि मी आठ दिवसाला लख्ख करत होतो.
“ते बाबांच्या पूजेच ताम्हण. ते तर रोजच चमकत असायचं. त्यात नितळ पाणी असायचं आणि चकचकणारे देव. किती सुंदर दिसायचं ते दृश्य ! देवांचं अभ्यंग त्या तांब्याच्या ताम्हणात खुलून यायचं.
“ती मोठी समई तर मंदपणे तेवत असायची देवघरात. देवीच्या चेहऱ्यावर मंद प्रकाश देत. ती पण सोन्यासारखी लख्ख घासायचो. माझ्या रुखवतात आईनं दिली होती ती.
“त्या घागरी, तो दागिन्यांचा डबा. ह्यांच्या आजारपणात सगळे दागिने गेले. तो डबा बिचारा रिकामा झाला आणि आता हे पण मोडायचं?”
आईच्या बोलण्यावर सुमी म्हणाली, “आई, अगं हे सगळं सुख तुम्ही उपभोगलं, यातच सगळं आलं ना ! आता परिस्थिती तशी आली, बाबांच्या आजारपणाचा एवढा खर्च त्याने तरी कसा फेडायचा? आम्ही दिलेले पैसे तुमचे जावई कधी मागणार नाहीत. पण त्याला बाकी लोकांची देणी फेडावी लागेल ना !
“आणि वर्षश्रद्धाला अनाथ मुलांना सम्पूर्ण शैक्षणिक साहित्य द्यावं, हीच बाबांची इच्छा होती ना? मग त्यांची इच्छा पूर्ण करून त्या मुलांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद मोठा की माळ्यावर अडगळ म्हणून तुझ्या आठवणी?
“आणि रवीच्या पगारात तुमचं धकतंय ना? मग तेच समाधान मानायचं.”
तिचं बोलणं मध्येच तोडत पमी म्हणाली, “त्या बाबतीत माझ्या सासूबाईंचं मला पटतं. कशाचा मोह नको. आठवणी मनात जपायच्या; वस्तूत अडकवून नाही ठेवायच्या आणि आता काळ बदलला आहे ग. देवघरातलं ते छोटं ताम्हण, ती छोटी समई. त्याला जे सोपं जातं, ते तो वापरतो. म्हणून काय लगेच देव रुसलेत का आपले?
“आणि परवा आलेल्या ठिकाणातली मुलगी सुद्धा घरगुती व्यवसाय करणारी आहे. ती त्यांचा संसार बघेल का तुझ्या ह्या आठवणी स्वच्छ करत राहील?
“आणि आमच्याकडून तर तू अपेक्षाच ठेवू नको ग. घरी आहे तेच इतकं काम पुरतं की, इकडे येऊन करायला ताकद राहात नाही !”
आईनं सगळ्या वस्तुंवरून हात फिरवले. म्हणाली, “खरं आहे तुमचंही. वस्तूत किती अडकून पडावं ना शेवटी? आता माळा मोकळा झाला. आता माझंही सारखं तिकडे लक्ष जाणार नाही. जिथं पाच माळी जपत होते, तिथं आता दहा होतील कदाचित ! शिवाय आपल्या गरजेला त्या वस्तू तेव्हाही कामी आल्या आणि आजही.
“टाका विकून. फक्त तेवढी समई ठेवा ग त्या कोपऱ्यात. नाही घासून झाली तरी, मनात मंद प्रकाश माझ्या आठवण क्षणांचा तेवत ठेवेल.”
सुमी पमी दोघी हसल्या. “बरं बाई...” म्हणत त्यांनी समई कोपऱ्यात ठेवली. सगळी भांडी दुकानात गेली. गरजेपुरते पैसे मिळाले. बाबाच्या वर्षश्रद्धाला अनाथ मुलांना साहित्य वाटप झालं. ते समाधान आईनं टिपलं. मनात म्हणाली,
‘आठवणींना परत जगायला मिळालं. माळ्यावर काय आठवणी धूळ खात पडल्या असत्या.’
संध्याकाळी सुमीनं ती कोपऱ्यातील समई पेटवलीच. तिचा प्रकाश आईच्या चेहेऱ्यावर पडला. आई आता दुःखी दिसत नव्हती. उलट मोहाच्या वस्तुतून निघाल्याचं आणि त्या मुलांना घडण्यासाठी काही देऊ शकल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अगदी देवघरातील देवीच्या दिसायचं तसंच !
- स्वप्ना मुळे (मायी), छ.संभाजीनगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा