तुझ्या आयुष्यात पहिलं पान होण्याची माझी कधीच इच्छा नव्हती.
कारण पहिल्या पानावर नावं असतात, ओळखी असतात, पण भावना अजून पूर्णपणे उमललेल्या नसतात. ते पान सुंदर असतं, पण त्यात अजून अनुभवांची खोली नसते. ते फक्त सुरुवात असते.
पण मला तुझ्या आयुष्यातलं शेवटचं पान व्हायचं आहे.
कारण शेवटच्या पानावर माणूस खरा असतो. तिथे तो कोणताही मुखवटा लावत नाही. तिथे तो आपल्या मनातलं सगळं लिहितो त्याच्या भावना, त्याचे अनुभव, त्याचं खरं प्रेम.
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात अनेक पानं असतील.
काहींवर कुणाच्या आठवणी असतील, काहींवर दुःखाच्या छटा असतील, काही पानं तुटलेली असतील, तर काही अजून रिकामी असतील. पण त्या सगळ्या पानांनंतर जे शेवटचं पान असेल ना, तिथे फक्त “मी आणि तू” असावं असं मला वाटतं.
मी तुझ्या आयुष्यात असा यावं असं मला वाटतं की.
तू जे काही गमावलं आहेस, त्याची खंत तुला राहू नये.
तुझ्या प्रत्येक दुःखाला मी हळूवार स्पर्श करून शांत करावं.
तुझ्या प्रत्येक अश्रूंना मी माझ्या हसण्यात विरघळवावं.
कारण मला फक्त तुझ्या आयुष्यातला एक भाग बनायचं नाही.
मला तुझ्या आयुष्याचं सार बनायचं आहे.
तू जेव्हा थकशील, तेव्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून विसावशील.
तू जेव्हा हसशील, तेव्हा त्या हसण्यामागे माझं कारण असेल.
आणि तू जेव्हा आयुष्याचा हिशोब मांडशील, तेव्हा तुला वाटेल
“हो… शेवटी सगळं योग्य ठरलं, कारण तो माझ्या आयुष्यात आला.”
माझं प्रेम तुझ्यासाठी फक्त शब्द नाहीत…
ते एक अशी भावना आहे जी तुला प्रत्येक क्षणी जाणवेल…
तुझ्या नजरेतलं न बोललेलंही मला समजेल…
तुझ्या शांततेतही मला तुझं मन ऐकू येईल…
मला तुझ्या आयुष्यात असं स्थान हवंय की…
जे कुणी कधीच घेऊ शकणार नाही…
तुझ्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक स्वप्नात, प्रत्येक श्वासात…
मी कायमचा राहावं.
तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानावर माझं नाव असावं,
असं नाही की ते मोठ्या अक्षरात लिहिलेलं असावं…
पण इतकं खोलवर कोरलेलं असावं की,
ते कधीच पुसलं जाऊ नये.
कारण मला तुझ्यासाठी “पहिली गोष्ट” व्हायचं नाही…
मला तुझ्यासाठी “शेवटचं सत्य” व्हायचं आहे.
जिथे तू सगळं काही माझ्यासमोर मोकळं करशील…
जिथे तुझं मन माझ्याशी पूर्णपणे जोडलेलं असेल…
तू जेव्हा आयुष्याच्या शेवटी उभी राहशील,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य असावं…
आणि त्या हास्यामागे माझं प्रेम असावं.
मला तुझ्यासाठी ती शेवटची ओळ व्हायची आहे…
जी वाचताना तुझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू येतील…
जी वाचून तुला वाटेल
“ही कहाणी इथे संपली, पण प्रेम अजूनही जिवंत आहे…”
तुझ्या आयुष्यात अनेक लोक येतील, जातील…
काही कायम राहतील, काही फक्त आठवण बनून जातील…
पण मला असा यायचं आहे की…
मी फक्त एक आठवण न राहता…
मी तुझ्या आयुष्याचा शेवटचा अध्याय असावा…
कारण शेवटचं पान कधीच विसरलं जात नाही…
ते पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं…
ते मनात कायमचं जपलं जातं…
आणि हो…
मला तुझ्या आयुष्यातलं ते शेवटचं पान व्हायचं आहे…
जिथे तू तुझं सगळं मन मोकळं करशील…
जिथे तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल…
आणि जिथे तू प्रेमाचा खरा अर्थ जाणशील…
कारण माझ्यासाठी तू फक्त एक व्यक्ती नाहीस…
तू माझं संपूर्ण जग आहेस…
आणि त्या जगाच्या शेवटच्या पानावर
फक्त “मी आणि तू” असावं… कायमचं…
©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा