गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2738. चहा आणि यू-टर्न

 सावीनं चादरीमधून जरा डोकावलं, तर उन्हाची तिरीप बरोबर डोळ्यावर चमकली. म्हणजे आठ वाजलेत आणि आपल्याला जाग आली नाही. आईनं पण हाक मारली नाही! 
आज तर कोर्टात जायचंय, आपल्या वकिलाचा सल्ला घ्यायला. ‘मुळात आपला निर्णय आईला मान्य नाही, म्हणून कदाचित आईनं उठवलं नसेल आपल्याला. पण बाबा? त्यांना तर कळतंय ना मी किती प्रगल्भ विचारांची आहे… पण कदाचित कुटुंबाच्या बाबतीत ही विचारांची प्रगल्भता त्यांना देखील मान्य नाही, म्हणून त्यांनी हाक मारली नसेल आपल्याला.’ हा विचार करत तिनं अंगावरची चादर दूर केली.
‘किती दिवसांनी कदाचित महिन्यांनी, आपण असं उशिरा उठलोत’ असं स्वतःशी पुटपुटत तिनं सहज फोन हातात घेतला. 
शेखर…? मिस कॉल आणि मेसेज पण दिसतोय! तोंड वाकडं करत तिने व्हॉट्सअप उघडलं… शेखरच्या ‘डीपी’वर अजूनही दोघांच्या लग्नाचा फोटो आणि मेसेज. मोबाईल बंद केला.
“मी नाहीच माघार घेणार. सतत मला त्रास देतो आणि मग असं सॉरी म्हणतो. आता नाहीच!” म्हणत ती डायनिंग जवळ आली. 
आई म्हणाली, “दात घास. चहा टाकते आमच्यासोबत.” 
ती म्हणाली, “आई, आठ वाजले तरी तुम्ही दोघांनी चहा घेतला नाही? कमाल आहे!” 
वडील हसत म्हणाले, “अग हा दुसरा चहा… खास गप्पांचा! तुझी आई मी ऑफिसला निघताना खास थोडा तरी चहा करायची आणि त्याला नाव द्यायची– ‘संवाद चहा’! अग तू आणि तुझा भाऊ… सकाळची शाळा, डबे, तयारी, त्यात तो चहा माझा पेपरमध्ये आणि तिचा पोळ्या करत होऊन जायचा! तुमची चिवचिव संपली की शांतपणे आणि बोलत बसण्यासाठी पाचच मिनिटाचा आमचा हा गप्पा चहा असायचा… दोघंही नोकरी करत असलो तरी संवादाची वीण त्यामुळं तिनं पक्की ठेवली!”
बाबांचा बोलण्याचा रोग कदाचित आपल्यावर आहे, असं समजत ती बेसिनकडे वळली. दात घासताना आणि आरशात बघताना तिला शेखर कसा दुसरा चहा देऊन आपल्याला बळंच स्वतःजवळ बसवतो… ‘बोल काहीतरी’, असं म्हणतो. 
त्याचं हेच म्हणणं असतं, “संवादाची वीण घट्ट हवी… जोपर्यंत तुला किंवा मला एकमेकांचा काय त्रास होतो, हे संवादानं सांगितलं जाणार नाही, तोपर्यंत कसं कळेल; स्वतःत काय बदल करायचे? 
“त्यात आपल्याला बाळ झाल्यावर परिस्थिती आणखी बदलेल… थोडीफार ओढाताण तर होईलच, पण हा काळ देखील निघून जाईल… थोडा धीर धरावा लागेल.’ 
आपल्याला मात्र त्याच्या बोलण्यात काही स्वारस्य नसतं. आपला ‘ऑनलाईन बिझनेस’. त्यातच आपण एवढं गुंतलो आहोत आणि ‘संवाद आवडतच नाही. फक्त वाद, हेच कळतं हिला!’ असं आई पण म्हणत असते ना? 
ती विचारात गुंतली आणि बाबांची हाक आली, 
“‘संवाद चहा’ थंड होतोय.” 
तिला हसू आलं… ‘संवाद चहा’... बाबा पण ना! 
आज मैफिल तिघांची होती. बाबा म्हणाले, 
“किती वर्षांनी आपण एकत्र निवांत चहा घेतोय ना! तसा तुझी आई आणि मी कायम घेतो… पण पूर्वी खूप गडबडीत घ्यायचो. आता अगदी निवांतपणे घेतो.” 
त्यावर आई म्हणाली, “पण तेव्हाही ‘चहा सोबत संवाद’ हाच मुद्दा होता आणि आजही… फक्त काळ बदलला, जबाबदाऱ्या कमी झाल्या; पण म्हणून आपल्या दोघांचं आयुष्य थांबतं का? विषय बदलले तरी त्यात संवाद असल्याशिवाय थोडंच पुढचं मार्गक्रमण होणार! नाही का ग सावी?”
आईचा रोख सावीनं ओळखला. म्हणाली, “आई, अग बायकांना संवादात गुरफटून पुरुष स्वतःची प्रगती साधतात. त्यांना स्त्रीनं पुढं जाणं सहनच होत नसतं ग!” 
या वाक्यावर बाबा हसत म्हणाले, “अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे सावी तुझं! अग, जी माणसं आपल्या जोडीदाराशी संवाद साधत जगत असतात ना, तीच खरं आयुष्यात प्रगती करतात. उलट वाद किंवा काही न बोलता स्वतःला जे करायचं आहे तेच करणारी माणसं, जोडीदाराला एकटं पाडून पुढे जात असतात… 
“अर्थात तुला जर वाद घालूनच वकिलाकडे जायचंय, तर तू जा… पण परत विचार कर. जबाबदाऱ्या काळानुरूप बदलत असतात. फक्त पैसा, करिअर हे आयुष्य नसतंच ग! त्याहीपेक्षा आपलं कुटुंब हा विचार आधी खूप महत्त्वाचा आहे; आणि शेखरचं तर हेच मत आहे. पण तुला त्या मतावर ‘संवादच नको’ असं तू त्यालाही बोलून आलीस! आता तूच ठरव काय करायचं ते…”
आई-बाबांशी झालेला हा चहा संवाद तिला दिवसभर डोक्यात घोळत होता. ती वकिलाकडे गेली. मैत्रीणच वकील होती. सगळं ऐकून वकील मॅडम पण म्हणाल्या, 
“रोज खूप कुटुंब अशी तुटताना बघतो. त्याला कारण त्या नात्यातली संवादाची कडीच निखळलेली असते! म्हणून वाटतं, या सगळ्या जोडप्यांना सांगावं, तुझ्या आई बाबांसारखं ‘संवादाचा चहा’ दहा मिनिटांचा असावाच; कोणत्याही नात्यात!” 
सावीनं कोर्टात काही वेळेस घालवला आणि तिला वास्तविकता किती भयाण आहे याची जाणीव झाली. मनातल्या विचारांचा खूप मोठा यु-टर्न तिनं घेतला आणि सरळ आपलं घर गाठलं. 
शेखर ऑफिसातून आला आणि तिनं चहाचा कप त्याच्यासमोर धरला.
तो म्हणाला, “हे काय?” 
ती हसत म्हणाली, “'संवादाचा चहा!’ आता रोज घ्यायचाच. म्हणजे मला अशी उपरती होणार नाही!” 
शेखरचा दोन दिवसापासून आलेला ताण हलका झाला. त्यानं हसत आपला कप तिच्या कपावर हलकेच आढळला आणि म्हणाला,
“आयुष्यभराच्या संवादाचा चिअर्स!” 
दोन्ही कपांची कानाशी कुजबूज सुरू झाली.

— स्वप्ना मुळे (मायी), औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...