गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2768. वचन

      ती काहिशी मोरपीशी, काहिशी शेवाळी साडी शोधत राम अभ्यंकर खूप फिरला आणि अखेर त्याला, तिला प्रचंड आवडणार्‍या डिट्टो कलरची साडी मिळाली होती. त्यानं एक मस्त असा दोन हात मोगर्‍याचा गजरा आणि बदामाच्या आकाराचा कुंकवाचा करंडाही घेतला. ‘आता रमा किती खूष होणारेय हे सगळं बघून.’ असा विचार करत राम अभ्यंकर स्वतःवरच खूष झाला होता.
     रमा अभ्यंकर. पुर्वाश्रमीची रमा कार्व्हालो. एका ख्रिस्ती-हिंदू दांपत्याची एकुलती एक मुलगी. बँकेत काम करणार्‍या रामची पंजीमला बदली झाली आणि तिथंच हे फिक्स्ड डिपाॅझीट त्याच्या हातात आलं होतं. ते ही क्युमिलेटिव्ह. प्रेमाचं व्याज वर्षागणिक वाढवत जाणारं ! मग नानाविध क्लृप्त्या लढवत, निरुपद्रवी लांड्या-लबाड्या करत अखेर ही दोघं लग्नबंधनात अडकली. ह्यांचं 'डोळे ते शरिर व्हाया मनं' जुळण्याचा हा प्रवास म्हणजे हृषिकेश मुखर्जींचा एखादा हलकाफुलका चित्रपटच होता.
   कुठल्याशा कर्कश्य हाॅर्ननं रामची तंद्री भंगली. तो जरासं जोरात बोललाही, 
“हळू रे बाबांनो...शांत झोपलेत इथं सगळे!”
गेटमधून आत शिरत राम, रमापाशी. रमाच्या थडग्यापाशी जाऊन उभा राहिला. आणलेलं सगळं सामान त्यानं त्या थडग्यावर ठेवलं.
‘आज असती, तर साठीची असती रमा. कशी दिसली असती वार्धक्याकडे जाऊ लागलेली ती?’ हा विचार मनातून येत त्याला हसू आलं आणि त्यानं स्वतःचे डोळे टिपले.
     तिला साडीत, ठसठशीत कुंकवात, गजरा माळलेल्या केसांत बघायचं होतं रामला. पण ते स्वप्नच राहिलं होतं. तिच्या धर्माचा यथोचीत मान राखत, अभ्यंकरांनी रमाचे अंत्यविधी मग ख्रिस्ती रिवाजांना अनुसरुनच केले होते.  अभ्यंकरांकडे आज थोरा-पोरांची वर्दळ होती. शिजवलेल्या वरणभाताचा गंध आसमंतात भरला होता. एका ताटात मुदभर भात, त्यावर गोडं वरण, वरून तुपाची धार, लिंबाची पाव फोड, वाटीत अळूची पातळ भाजी आणि डावीकडे खमंग काकडी. असं रामच्या आवडीचं जेवण, प्रसाद दाखवण्याकरता सजून तयार होतं आणि...
आणि ती बसली होती तिथं, सगळ्यांच्या मध्ये.  पण कुणालाच न दिसणारी, कुणालाच न जाणवणारी... रमा.
रमा अभ्यंकर ह्या दिवशी दरवर्षी येत असे. कारण आज श्राद्ध होतं. रमाचं आणि… आणि… रामचंही !
‘जर जिवंत असता, तर पासष्ठीचा असता आज राम. कसा दिसला असता तो म्हातारा होऊ घातलेला !’ असा विचार मनात येऊन रमाला हसू आलं आणि डोळे तिनं टिपले. 
लग्न झाल्यावर फिरायला जातानाच राम-रमाच्या विमानाचा ह्याच दिवशी अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षांपासून, ह्या दिवशी ह्या दिवसापुरतेच शरिर नसलेले ते दोन आत्मे एकत्र येत होते. राम बान्द्र्याच्या ग्रेव्हयार्डमधून निघालेला अन् इथं दादरच्या हिंदू काॅलनीतल्या अभ्यंकरांच्या घरी, रमाचे डोळे, तब्बल वर्षभरानं भेटणार्‍या रामला पाहण्याकरता कधीचे व्याकुळ झाले होते.
रामच्या मिठीत येत, पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचं 'वचन' घेत, रमाला लगेचच निघायचं होतं.

- सचिन श देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...