प्रेमाची व्याख्या काय? लालभडक गुलाब, सिनेमातले रोमँटिक डायलॉग्स की सोशल मीडियाच्या फिल्टरमधून दिसणारे गुळगुळीत, निर्दोष चेहरे? आपण प्रेमाला कायम शरीराच्या, तारुण्याच्या आणि सौंदर्याच्या चौकटीत मोजत आलोय. पण शारीब हाश्मी आणि त्याची पत्नी नसरीन यांचा हा फोटो पाहिला आणि काळजात कुठेतरी लक्कन खड्डा पडला. या फोटोतल्या 'Then' आणि 'Now' (कधीकाळी आणि आता) या दोन शब्दांच्या मध्ये एका भयानक वास्तवाची, अथांग वेदनेची आणि तरीही न हरलेल्या प्रेमाची एक जिवंत कहाणी दडली आहे.
कर्करोग... तोही तोंडाचा. कॅन्सर फक्त शरीराचे लचके तोडत नाही, तो माणसाच्या अस्तित्वाची, त्याच्या आत्मविश्वासाची चाळण करतो. साठ रेडिएशन... ऐकायला सोपं वाटतं. पण त्या अदृश्य आगीतून जाताना शरीराची होणारी राख, चेहऱ्याचं हरवत जाणारं मूळ रूप आणि आरशात स्वतःला पाहताना रोज नव्याने मरण्याची ती भावना... या सगळ्यातून नसरीन गेली. पण कमाल या स्त्रीची आहे! एका बाजूला मृत्यूशी झुंज सुरू असताना, दुसऱ्या बाजूला ती नवऱ्याच्या मोडक्या स्वप्नांना आधार देत होती.
नात्यातले चढ-उतार म्हणजे काय फक्त रुसवे-फुगवे नसतात. खरा गुंता तिथे सुरू होतो, जेव्हा खिशात पैसे नसतात, नवऱ्याचा अभिनय क्षेत्रातला स्ट्रगल सुरू असतो, भविष्याची कोणतीही शाश्वती नसते आणि त्याच वेळी बायकोच्या शरीरात मृत्यूच्या पेशी फोफावत असतात. दवाखान्याचे ते उग्र वास, पैशांची जुळवाजुळव करताना येणारी हतबलता, आणि वेदनेने विव्हळणारी रात्र... अशा वेळी 'मी तुझ्यावर प्रेम करतो' हे वाक्य ओठांवरून नाही, तर एकमेकांचे थरथरणारे हात घट्ट धरण्यातून व्यक्त होतं.
नसरीनने स्वतःच्या वेदनांना गिळून शारीबच्या संघर्षाला बळ दिलं. स्त्रीच्या आत दडलेली ही आदिमायाच असते, जी स्वतः कोसळत असतानाही आपल्या माणसासाठी आभाळ होऊन उभी राहते. आपला चेहरा बदलतोय, तो पूर्वीसारखा राहिला नाही, हे पाहताना तिच्या आत किती स्फोट झाले असतील? पण त्या विद्रूपतेलाही तिने एक अलंकार मानलं, कारण तिच्या प्रेमाची मुळं वरवरच्या सौंदर्यात नव्हे, तर शारीबच्या अस्तित्वात रुजली होती.
आणि शारीब... त्यानेही हे सिद्ध केलं की खरा पुरुष तोच, जो बायकोच्या पडत्या काळात तिची सावली बनतो. 'ती आता पूर्वीसारखी दिसत नाही' हा विचार आजूबाजूच्या जगाला आला असेल, पण शारीबच्या डोळ्यांत तिचं तेच रूप साठलेलं आहे. कारण त्याला माहित आहे, आज तो यशाच्या ज्या शिखरावर उभा आहे, त्याचा पाया या स्त्रीने स्वतःच्या रक्तामांसाने रचला आहे.
हा फोटो फक्त एका अभिनेत्याचा नाही. हा फोटो एका जिवंत, धगधगत्या प्रेमाचा आहे. प्रेम म्हणजे शरीराचं आकर्षण नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या भळभळत्या जखमांवर हळुवार फुंकर घालणं. एकमेकांच्या उणिवांसकट, आजारांसकट एकमेकांना घट्ट कवेत घेणं. नसरीनच्या चेहऱ्यावरील आजचा तो प्रगल्भ, शांत भाव आणि शारीबच्या चेहऱ्यावरचं ते कृतज्ञ हास्य... हेच तर खरं प्रेम आहे.
जिथं तारुण्य आणि सौंदर्य संपतं, तिथून जे उरतं... ते फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम असतं. डोळ्यात पाणी आणणारी ही कहाणी सांगते की, आयुष्य कितीही क्रूर झालं, तरी दोन जीव एकमेकांच्या आधाराने कोणतंही वादळ पेलू शकतात.
Sharib Hashmi तू चित्रपटातून, वेबसिरीज मधून मनावर राज्य केलं होतंस आज हृदयावरही ❤️.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा