शुक्रवार, ३१ मे, २०२४

1186. प्रत्येक स्त्रीने असेच राहिले पाहिजे भक्कम

       बाळाला बघायला सुलोचनाच्या सासरची मंडळी आली होती. सुलोचनाला बाळंतीण होऊन दोन महिने झाले होते. ती माहेरीच होती. या काळात नातेवाईकांची भेटण्यासाठी रीघ लागलेली. लेकीचं बाळंतपण म्हणजे आईची खरी कसरत. एकीकडे मुलगी आणि बाळ सांभाळायचं, दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं बघायचं. घराकडे बघायचं. त्यात बाळ रात्रभर जागरण करणार, मग मुलीला झोप मिळावी म्हणून आई रात्रभर जगणार आणि सकाळी सगळं बळ एकटवून पुन्हा कामाला लागणार. या काळात आईकडे इतकं बळ कुठून येतं कोण जाणे ! आज सुलोचनाच्या सासरच्या काही बायका बाळाला पाहायला आल्या होत्या. बाळाचं कोडकौतुक झालं, गप्पा झाल्या, जेवणं उरकली. त्यांनी बाळाच्या हातात सोन्याची अंगठी चढवली. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे, बाळाला सोनं चढवलं की लगेच त्या बाईला साडी नेसवायची. हातात 100-200 रुपये दिले तर त्याच रेंज मधली साडी, अंगठी केली तर जरा महागातली. पद्धतच तशी घालून दिली असल्याने सुलोचनाच्या आईनेही साड्या आणून ठेवलेल्या. पण एकही साडी हलकी आणली नव्हती. कुणी अगदी 50 रुपये जरी हातात दिले तरी तिच्या आईने चांगल्यातली साडी तिला नेसवली. नातवाच्या येण्याच्या आनंदापुढे आईला हा खर्च काहीच वाटत नव्हता.
"चला साड्या नेसून घ्या...या आत"
अंगठीचा कार्यक्रम झाल्यावर सुलोचनाच्या आईने बायकांना आत बोलावलं.
"अहो कशाला, राहु द्या की"
बायकांनी बळेच औपचारिकता म्हणून नको म्हटलं, पण आतून खूप उकळ्या फुटत होत्या. हो नको हो नको करत बायका आत गेल्या. साड्या खूप छान होत्या पण त्या बायकांचं काही समाधान झालेलं दिसलं नाही. त्यांनी निमूटपणे साड्या नेसल्या आणि निरोप घेतला. सुलोचनाची आई खूप दमली होती. बायका गेल्यावर तिने जरा निःश्वास टाकला आणि जरावेळ पडून घेतलं. सुलोचनाने विचारलं,
"आई सर्वांना कशाला साड्या नेसवल्या? अंगठी तर दोनच बायकांनी दिलेली"
"असुदेत गं...माझ्या नातवाच्या कौतुकापुढे सगळं मातीमोल आहे."
सुलोचनाच्या हातातल्या त्या गोंडस बाळाकडे बघत सुलोचनाची आई त्याची दृष्ट काढू लागली. 
"आणि हो, सासरच्या मंडळींचा मान ठेवावाच लागतो. तुला उद्या आमच्यामुळे काही बोल लागायला नको, कुणी टोमणे मारायला नको...म्हणून ही धडपड."
दोघीजणी काहीवेळ पडल्या.  डोळा लागत नाही तोच सुलोचनाला फोन. नुकत्याच निरोप घेतलेल्या त्या बायकांचा फोन होता.
"हॅलो..सुलोचना साड्या नेसल्या खरं आम्ही पण आम्हाला काही आवडल्या नाहीत हो साड्या. जरा चांगल्या साड्या नेसवायला हव्या होत्या तुझ्या आईने."
सुलोचनाच्या पोटात खड्डाच पडला. आई जवळच होती, मोबाईलचा आवाज मोठा असल्याने आईला सगळं ऐकू गेलं. या बायकांनी गाडीतून परतत असतांना काय चुगल्या केल्या कोण जाणे पण उलट फोन करून हे सांगण्याचं मूर्खासारखं धाडसही केलं. सुलोचनाला कळेना काय बोलावं. आईला सांगितलं तर आई पुन्हा त्यांची टोलतोल करणार. पुन्हा नव्या साड्या आणायला पायपीट करत जाणार. खर्च होईल तो आणखी वेगळाच. किती करावं आईने तरी? सुलोचनाला सासरच्या मंडळींचा राग आला पण आई समोर होती, काही बोलू शकली नाही. पण आईने तिच्या जवळचा फोन घेतला..
"हॅलो, नमस्कार ताई..पोचलात का?"
"नाही अजून..."
"बरं तुम्हाला साड्या आवडल्या नाहीत तर सांगायचं की लगेच, तुम्ही एक काम करा...परत या, लगेच"
त्या बायकांची कळी खुलली. नव्या साड्या मिळणार म्हणून अर्ध्या रस्त्यात गाडी मागे फिरवायला लावली.
"आई? अगं काय प्रकार आहे हा? इतकी तोलतोल चांगली नाही."
आई काहीही बोलली नाही. काही वेळाने त्या बायका मोठ्या मिजाशीत परत आल्या. इकडेतिकडे पाहू लागल्या. नवीन साड्यांचे बॉक्स दिसताय का ते पाहायला.
"या या..तुमचीच वाट बघत होतो."
बायका आतुर झाल्या.
आईने हळूच बाळाच्या हातातील अंगठी काढून त्यांच्या हातात ठेवली आणि म्हणाली.
"तुम्ही बाळाला आशीर्वाद दिलात हेच खूप. सोनं वगैरे काही नको बाळाला. आणि हो घरी गेलात की अंगावरच्या साड्या जशाच्या तश्या परत करा. जरा सुसंस्कृत लोकांना देता येतील."
सुलोचना आईचं हे रूप बघतच राहिली. त्या बायका अपमानित होऊन तावातावाने निघून गेल्या. 
"आई?"
"हो बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जोपर्यंत समोरचा नम्र असेल तोवर त्याला मानपान द्यायचा. ज्यादिवशी तो स्वतःची पायरी सोडून वागेल त्यादिवशी मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा. याबद्दल तुला सासरी कुणी बोललं तर त्याची माझ्याशी गाठ असेल."
आईपण आणि त्यातही बाळंतीण लेकीचं मातृत्व. बाईला प्रचंड खंबीर बनवतं हेच खरं !
 (सत्य घटनेवर आधारित) 

- संजना इंगळे ©  ✍️
 प्रत्येक स्त्रीने असेच राहिले पाहिजे भक्कम

1185. ऋणानुबंध

  "थोडी भारी दाखवा ना दोन हजारच्या पुढे  पण चालेल आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लिज." ह्या महेशच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला. तेंव्हा असावरीने न राहवून महेशला मांडीला चिमटा काढत खुणावलं आणि हातानेच काय असं विचारलं.महेश म्हणाला, "बोलू या नंतर साड्या बघ आधी."
ती नाक मुरडत म्हणाली,"मला चॉकलेटी साडी नको. त्यावर महेश हसत म्हणाला, "तुला नाही ग?" आसावरीने परत डोळे मोठे करत मग दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग. त्यावर महेश म्हणाला,"त्यांना पण नाही. देशमुख काकूच्या मुलीच लग्न ठरलंय ना." त्याच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली.
"काय देशमुख काकूंना दोन हजाराची साडी?" तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक,आणि आजूबाजूचे गिऱ्हाईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे. अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या. तिला ते जाणवलं आणि ती जराशी चपापली आणि खर्ज्यात आवाज लावत म्हणाली, "अरे पोळ्यावाली आहे ती आपली. तिला कशाला एवढी महाग साडी? घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्या आहेत त्यातली देऊ." तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता महेशला आठवणीत होती तशीच मोठया काठांची सोनेरी बुट्ट्या असलेली चॉकलेटी साडी  या नवीन गठ्ठ्यात दिसली त्याने ती साडी पटकन उचलली. किंमत तीन हजार सहाशे होती पण त्याने लगेच ही साडी पॅक करा असं सांगितलं आणि तो असावरीकडे न बघताच काऊंटर कडे चालू लागला. 
    आसावरी मनातून प्रचंड चिडली होती. तिथे न थांबता तणक्यात ती गाडीत येऊन बसली. महेशने साडीच पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सिट बेल्ट लावत म्हणाला, "छान आहे ना ग साडी. अगदी मला हवी तशी मिळाली." आसावरीचा रागाचा भडकाच उडाला,"अरे,काय पायातली वाहाण छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण."
महेश म्हणाला, "असावरी तुला काही माहीत नाही बोलू आपण निवांत."त्यावर चिडून आसावरी म्हणाली,
"सगळं माहीत आहे मला, अण्णा बोलले होते मागे ह्या देशमुखबाईचे फार उपकार आहेत आपल्यावर. म्हणून काय एवढी महाग साडी?"
महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली. आसावरी तणक्यानेच टेबलवर बसली. महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला, "माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिम्मत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं. शेतीचं उत्पन्न कमी आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला. पण एकदा कळलं गावातले देशमुख शहरात राहायला येणार .गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे. त्यामुळे रोजच्या उठण्याबसण्यातल्या ओळखी होत्या. आजोबांनी शब्द टाकला,"पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल. शिक्षणाचा खर्च पेलत नाही. एक वेळ चहा नाष्टा धकवतो. खरंतर रोज पूजेला आला असता पण कॉलेजची वेळ सकाळची."आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्क झालं. ही मायमाऊली तेव्हां पासून माझी अन्नपूर्णा आहे. मला छोटीमोठी काम त्या घरात सांगितली जायची. कधी दळण आणायचं,कधी भाजी आणून द्यायची. मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं. मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता. आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा यायचा .कसं होईल आपलं?खोलीचे भाडे, चहा नाश्ता बिल जीव घाबरून जायचा. त्यादिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही तेंव्हा देशमुख काकु डोक्यावरून हात फिरवून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या. म्हणायच्या, "येतील आजोबा नको काळजी करुस." जेवताना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे. आईचा स्पर्श आठवायचा.असे ते दिवस होते.
    एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितल्या गेलं. तश्या काकु बाहेर येऊन म्हणाल्या,"अहो असं रागावून का सांगता त्याला आणि त्याला सवय नसेल इस्त्री करण्याची. पण त्यादिवशी देशमुख काका रागातच होते. त्यांचा माझ्यासोबत बारावी शिकणारा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो. तो रागच होता उपकाराचा. त्यादिवशी त्यांचा मुलगा. ही आता लग्न ठरलेली चिमी तर आठच वर्षांची होती ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती. काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या. "खुप खुप मोठा हो."
       काकांनी परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्याच इर्षेने मला इस्त्री करायला बसवलं. मी घाबरत इस्त्री करायला लागलो. कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं. आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती. शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होतो. पण ही देशमुख इस्त्री चांगली जड होती. भीतभीत फिरवायला लागलो. दोन पाच कपडे मस्त जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. काकूंची साडी जळाली. मन घाबर घुबर झालं. तो जळका भाग घडीत लपवला. थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या सगळ्यात खाली ती साडी घातली. त्यादिवशी न जेवताच तिथून पोबारा केला. दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती. डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले. तिसऱ्या दिवशी निरोप आलाच काकूंनी बोलावलंय. जावं तर लागणार आजच मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो. मनात निश्चय केला फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ.
     दबकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठे तरी निघण्याच्या बेतात. प्रत्येकानेच आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते. तेवढ्यात देशमुख काकु बाहेर आल्या, तेंव्हा काका ओरडले, "अहो ती चॉकलेटी साडी नसणार होत्या ना तुम्ही खास इस्त्री केलेली?" माझं हृदय धडधडायला लागलं. सगळ्या अंगाला घाम फुटला पण काकु म्हणाल्या, "मला त्याचे काठ खुप टोचतात. तशीही माझ्या माहेरची साडी ती तुम्हाला जसं माझं माहेर टोचत तशीच झाली ती साडी. त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणीचे छान, मऊसूत आहे. उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढू मला त्रास होतो. देशमुख अगदीच खुलले आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरावर असं बोलते म्हणून. लगेच म्हणाले नकाच नेसू ती टोचकी साडी. आपण अश्याच साड्या घेऊ तुम्हाला मऊसूत. तेवढ्यात काकु माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या, "महेश छान थालपीठं केली आहेत जेवून घे. काही थालपीठं जळाली आहेत त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस." काकूंच म्हणणं फक्त मला समजलं. आज मला त्यांनी वाचवलं होतं. जेवताना कळलं थालपीठं जळाली नव्हतीच पण ते वाक्य साडीवरून होतं मनाला लावून घेऊ नकोस. पुढे काही महिनेच मी तिथे होतो परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं. तिथे कोणी देशमुख नव्हते. हळूहळू काळही बदलला. छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं. जेवणाचे प्रश्न मिटले .पुढे नोकरी, लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली. त्यात नेमकं ह्या अपार्टमेंट मध्ये ह्याच काकु पोळ्याला भेटणं. काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं. काका वारले, मुलगा दारूकडे वळला. आता काकु पोळ्या करून उदर निर्वाह करतात. त्यात चिमीचं लग्न ठरलं. आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची मला प्लिज त्या संधीचा आंनद घेऊ दे. खरंतर त्या माऊलीने तेंव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो. तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाही मग ही संधी आहे. मला त्याचा फायदा घेऊ दे. आसावरी आवक झाली. किती वेगळं असतं रे प्रत्येकाच आयुष्य. आज तुझ्या यशामागे किती तरी अदृश्य हात आहेत. महेश हसला म्हणाला," हो त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात. त्यांच्या कायम ऋणात राहायचं पण संधी आली तर त्या समोरच्याला आंनदी करायचं.'
तो उठून कॉफी बिल पे करायला गेला. आसावरी गाडीत येऊन बसली तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती ती म्हणाली ."छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना म्हणत त्या साडीवर आसावरी हात फिरवू लागली."
    महेश गाडी चालावत होता पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा, देशमुख काका, काकु आणि इस्त्री दिसत होती. शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता. त्याचे डोळे भरून आले. आठवनींनी, मायेने की ऋणानुबंधामुळे त्यालाच कळेना. (repost)

      वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा. अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास ९८२२८७५७८० ह्या no वर संदेश  करा. धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)छ. संभाजीनगर.

बुधवार, २९ मे, २०२४

1184. गजरा

       तिने फोन करुन त्याला गोड बातमी सांगितली. प्रचंड खुश झाला होता तो ती बातमी ऐकून. अगदी ह्या क्षणी ऑफिसमधून निघावं. नी तिच्यापाशी पोहोचावं, असं झालेलं त्याला. पण ते अर्थातच शक्य नव्हतं. खूप महत्वाच्या मिटिंग्ज ऑलरेडी लाईन्ड-अप होत्या. त्याने त्यामुळे आता कामावर काँन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. मग पुर्ण दिवसभरात त्याला अजिबातच वेळही मिळाला नाही, तिला काॅलही करायचा. रात्री आठच्या सुमारास ऑफिसमधून सुटल्यावर, घरी जाण्याकरता म्हणून तो कारमध्ये बसला त्याच्या. आणि तेवढ्यात त्याला समोर एक लहानशी मुलगी दिसली, टोपलीत गजरे घेऊन बसलेली. त्याने विचार केला की, आज बायकोसाठी मस्त गजरा घेऊन जाऊ. त्याने गाडी बाजूला लावली, नी त्या मुलीला बोलावलं. ती मुलगी तिची टोपली घेऊनच आली. त्याने त्या मुलीला सांगितलं, कुठलातरी एक गजरा द्यायला. त्या मुलीने त्याला विचारलं. "किसके वास्ते ले रहे हो?". त्या इवल्या मुलीच्या ह्या आगाऊ प्रश्नाचं, त्या क्षणी हसूच आलं त्याला. तो बोलला. "तेरी भाभी अब माँ बनने जा रही है". हे ऐकून त्या मुलीचे डोळे एकदम लकाकले, नी तिने पटकन एक गजरा काढून दिला त्याला. त्या गजर्‍याची फुलं जरा वेगळीच वाटली त्याला, कधीही न पाहिलेली अशी. त्याने विचारलं त्या मुलीला. "अरे ये कौनसे फुलोंका गजरा है?". ती मुलगी शांतपणे बोलली. "कभीभी ना मुरझानेवाले फुलोंका". आणि झप्पकन वळत, निघूनही गेली ती. पैसेही मागितले नव्हते तिने. तो तिला हाक मारेपर्यंत, ती मुलगी नाहीशीही झाली होती. 
     घरी गेल्यावर बायकोला सगळं सांगत त्याने तो गजरा, आपणहून तिच्या केसात माळला. पण गजर्‍याला कणभराचाही सुवास येईना. तिने तो काढला केसांतून, नी नाकाशी नेऊन जोराने हुंगला. पण छे...अजिबातच वास नव्हता गजर्‍याला. ती हसायला लागली त्याच्यावर, नी म्हणाली. "काय पण रे तू... एक लहानशी मुलगी तुला फसवून गेली. कसे काय क्लाएंट्स हँडल करतोस आॅफिसमध्ये कोण जाणे". अर्थात त्या मुलीने पैसे न घेतल्याचं, त्याने सांगितलं नव्हतं तिला. पण आपण पुर्णपणे फसवलो गेलेलो नाहीयोत, ह्याचं एक मध्यमवर्गीय समाधान वाटून गेलं त्याला. आणि तेवढ्यात आठवलं त्याला, त्या मुलीने म्हंटलेलं... "कभीभी ना मुरझानेवाले फुलोंका गजरा है ये". तो लगेच बोलला बायकोला. "एक काम करशील? तो गजरा भले माळू नकोस केसांत, पण कायम जवळ ठेवशील?". ती म्हणाली. "अरे हा गजरा कुठल्याशा रानटी फुलांचा दिसतोय. दिवसभरात सुकूनही जाईल बघ". तो म्हणाला... "ते बघू. पण निदान सुकेपर्यंत तरी ठेवशील जवळ?". ती सुद्धा हो म्हणाली होती मग. 
.
.
.
.
.
     आज त्यांच्या बाळाचा जन्म झाला. अतिशय सुंदर नी गुटगुटीत असं बाळ होतं. पण त्याला पाजायला, तिच्या छातीला अगदी नावालाही दुध येत नव्हतं. डाॅक्टरांनी लगेचच औषधं वगैरेही, अर्थातच सुरु केली होती. आणि... आणि... तिने उशीखाली ठेवलेला तो गजरा, अचानकच सुकलेला दिसला तिला. गेले नऊ महिने आश्चर्यकारकरीत्या तो गजरा. जसाच्या तसा टवटवीत राहिलेला, भले त्याला गंध नसूदे. हा एक अविश्वसनीय असा चमत्कारच होता. ती गजरेवाली मुलगीही ह्या गेल्या नऊ महिन्यांत, त्याला एकदाही दिसली नव्हती. सुकलेल्या गजर्‍याकडे बघून, एकमेकांकडे बघत बसले दोघेही. आणि कुठलंसं काहूर आलं दाटून, मनांतून त्यांच्या. तेवढ्यात हाॅस्पिटलच्या दारावर टकटक झाली. त्याने दार उघडलं, तर ती गजरेवाली मुलगीच होती दारात उभी. तिला इतक्या महिन्यांनी आपणहून समोर आलेलं पाहून, त्याला कमालीचं आश्चर्यच वाटलं. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघत, किंचितसं हसली ती मुलगी. नी सरळ आत शिरली. त्या दोघांकडेही आळीपाळीने बघत, मंदसर हसत होती ती. मग पाळण्यातील बाळाकडे बघितलं तिने, नी एकाएकी डोळे भरुन आले तिचे. आपल्या हातातील टोपली खाली ठेवत. आपले दोन्ही हात बाळाभोवती ओवाळत, कडाडकन बोटं मोडली तिने कानांवर. खाली ठेवलेली टोपली पुन्हा हातात घेतली तिने, आणि त्यातून एक गजरा काढला. 
    तो गजरा त्याच्याच हातात देत ती म्हणाली. "ये लो साब. इसका खुसबू भोत अच्छा है. आपका बच्चा भी इसी तरह महकेगा दूर दूर तक.". त्याने विचारलं त्या मुलीला. "ये फुल तो वैसेही दिख रहे है, जैसे पहलेवाले गजरेमें थे. तो उनमे खुशबू नही थी, और इनमे है. ऐसे क्यों?" ती मुलगी म्हणाली... "साब. तब आपका बच्चा भाभीके पेटमें था ना. तो तभी खुसबूसेभी जादा जरुरी था, उसका मुरझा ना जाना." ते दोघेही थक्क होऊन, बघतच बसले त्या मुलीकडे. ती पुढे म्हणाली. "मै चलती है साब. बस वो सुका हुवा गजरा दे दो मेरेको, मै वो उसी जगह मिट्टीमे डाल दुंगी" त्याने विचारलं. "कौनसी जगह?". ती मुलगी शांतपणे बोलली. "मेरा छोटा भाई जनमके पहलेही, अम्मा के पेट में मर गया था. ऑपरेशन करके उसको निकाला और एक जगह दफना दिया. उसी जगहपे एक पेड आया है, जिसको ये ऐसे फुल आते है. मै बस जाके फुल चुनती हूँ. बाकी वो पेड तय करता है के उससे बननेवाला गजरा, ना मुरझानेवाला बनेगा या फिर खुसबू देनेवाला." इतकं बोलून ती मुलगी, पुन्हा किंचितसं हसत निघून गेली. आत्ताही गजर्‍याचे पैसे न मागताच.
      काही वेळ लागला त्या दोघांनाही भानावर यायला. पण लगेच मग त्याने तो गजरा, बायकोच्या हातात ठेवला. तिने तो नाकापाशी नेत त्यांचा अलौकीक असा गंध, स्वतःच्या छातीत खोलपर्यंत भरुन घेतला. आणि...आणि तिला जाणवलं, अचानकच तिला पान्हा फुटल्याचं. लगबगीने तिने आपल्या बाळाला उचलत, घट्ट छातीशी लावलं. आणि तो दर्वळणारा गजरा, पुन्हा स्वतःच्या उशीखाली ठेवला तिने. तिच्या बाजूला बसत. खांद्याभोवती हात टाकत तिच्या, अलगदपणे जवळ घेतलं त्याने तिला. तिच्या छातीतून दुध आणि डोळ्यांतून पाणी आता अगदी भरभरुन वहात होतं.

- सचिन श. देशपांडे

1183. तेथे कर माझे जुळती

       लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. निवडणुका कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडावे याकरिता मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कुशल व  प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबई पोलीस दलाने मरगळ  झटकून कंबर कसली होती. अभिलेखावरील उपद्रवी आरोपींवर प्रतिबंधक कारवाया करून त्यांचा बीमोड करणे, अवैध धंद्यांवर धडक कारवाया करून त्यांचे उच्चाटन करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता गोपनीय माहिती मिळवून वेळीच प्रतिबंधक उपाय योजना करणे. अशा धडक कारवाया एकीकडे सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीच्या बंदोबस्ता करीता आवश्यक असणाऱ्या मनुष्य बळाचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी करीता घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा  देखील धडाका सुरू होता. मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी या लोकसभा निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता  संपूर्ण मुंबई पोलीस दलास भावनिक आवाहन केल्याने ,त्यामुळे प्रेरित होवून संपूर्ण मुंबई  पोलीस दल युद्ध पातळीवर कामास जुंपले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्या नात्याने पोलीस ठाणे स्तरावर देखील आमची जोरदार तयारी सुरू होती. मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता रजेवर असलेल्या,  गैरहजर असलेले, कर्तव्य टाळून गैरहजर रहाण्यात आणि वारंवार खोट्या सबबी सांगून रुग्ण निवेदन करण्यात निर्ढावलेले पट्टीचे कामचुकार अधिकारी व अंमलदार, यांना आवाहन करून प्रसंगी शिस्तीचा धाक दाखवून कर्तव्यावर हजर करून घेतले जात होते. निवडणुकीशी संबंधित कामाबरोबरच पोलीस ठाण्याशी निगडित इतर दैनंदिन कामे हाताळताना सर्वांचीच पुरती दमछाक होत होती.
        दिनांक २०/०५/२०२४. लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येवू लागली तसा तसा  बैठका, मॉक ड्रिल, प्रतिबंधक कारवाया, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी कार्यांना वेग आला होता.क्षणाचीही उसंत मिळत नव्हती. रजा मिळणार नाहीत याबाबत निक्षून सांगण्यात आल्याने अधिकारी व अंमलदार रजेचे अर्ज पुढे करण्यास धजावत नव्हते. अशा परिस्थितीत दिनांक १५/०५/२०२४ रोजी मी माझे दैनंदिन काम करण्यात गर्क असतानासुमारे २०.३० वा. माझा सहायक पो. ह. फड  माझ्या केबिनमध्ये आला आणि  बोलू.. की ...नको ! ,अशा संभ्रमावस्थेत चुळबुळ करीत माझे   टेबल जवळ उभा असल्याची जाणीव झाल्याने माझ्या कामाची तंद्री भंगली.
काय रे !, ...काय काम आहे ? मी थोड्या त्रासिक मुद्रेनेच विचारले,
सर, रागावणार नसलात तर सांगतो !. फड चाचरत चाचरत म्हणाला. एव्हाना मी थोडा नॉर्मल झालो होतो. 
सांग एवढं काय अर्जंट काम आहे. मी शांत स्वरात विचारले.
तसं काही विशेष नाही. मला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याकरिता  शर्थीचे प्रयत्न करीत आहात अशा परिस्थितीत मी काही सांगणं योग्य होणार नाही !...पण !. अगदी संथ लयीत परंतु परिस्थितीचा आणि  माझ्या मुडचा अंदाज घेत सावधपणे फड उद्गारला.
नक्की काय झालंय ? तुझा काही प्रॉब्लेम आहे का ? मी उत्कंठावर्धक स्वरात त्याला विचारले.
अगदी बिनधास्त सांग ! ...मी त्यास पुन्हा आश्वस्त करीत म्हटलं.
आपले एएसआय कदम आहेत ना ! त्यांची आई सिरीअस आहे. ते तुम्हाला भेटण्या करीता सकाळ पासून दोन - तीनदा येवून गेले परंतु तुम्ही सतत कामात होता म्हणून त्यांची तुम्हाला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आताही ते केबिनच्या बाहेर उभे आहेत  फडने एवढा वेळ मनात साठवून ठेवलेलं सगळं एका दमात सांगून टाकलं.
ठीक आहे !,आत पाठव त्यांना. असे सांगताच फड ने एएसआय कदमनां  आत बोलावलं.
एक सॅल्युट. मारून एएसआय कदम चाचरत म्हणाले.
सर, एक रिक्वेस्ट होती !
कोणती?
सर. गेल्या दिड दोन महिन्यांपासून गावी माझी आई अत्यंत आजारी आहे. गावाहून बरेचदा, येऊन जा म्हणून फोन येत आहेत पण निवडणुकीचे कारण सांगून मी आता पर्यंत टाळत आलो. परंतु आता डॉक्टरांनी गॅरंटी नाही. हृदयाची झडप फक्त २० टक्के काम करीत आहे कधीही काहीही होवू शकते.  
सर, कसं आणि कोणत्या तोंडाने विचारू कळत नाही , पण मला दोन दिवस रजा मिळेल का? गावी जावून आईला भेटतो आणि लगेच परत येतो. इलेक्शन होईस्तोवर आई राहील की नाही याची शाश्वती नाही. घशाला कोरड पडलेल्या आवाजात एएसआय कदमांनी मला विनंती केली. मलूल चेहऱ्यावरील चष्म्याचे आतील पाणावलेले डोळे एएसआय कदमांची अगतिकता स्पष्ट पणे अधोरेखित करीत होते. एएसआय कदमांच्या विनंतीवर मेंदूने विचार करण्या अगोदरच हृदयाने जीभेचा ताबा घेतला. कदम साहेब आपण द्या आपला अर्ज आणि जावून या क्षणाचीही विलंब न लावता मी भावविवश होवून परवानगी देवून टाकली. धन्यवाद ! म्हणून पुन्हा एक सॅल्युट करून एएसआय कदम रवाना झाले आणि मी पुन्हा माझ्या कामात गर्क झालो. जेम ते एक दिवस मध्ये गेला असेल. प्रभारी हवालदार गायकवाड यांनी मला येवून सांगितले की , एएसआय कदमांची आई गेली. अरेरे ! वाईट झाले. असो, पण एएसआय कदमांची नेमणूक निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे ना? मी प्रभारी हवालदारांना विचारले. होय साहेब ! आता त्यांची निवडणूक बंदोबस्ताकरीता येण्याची शक्यता नाही. आपल्याला दुसरी अरेंजमेंट करावी लागेल ! प्रभारी हवालदारांनी आपला अभिप्राय सांगितला. 
बरोबर आहे तुमचं ! अशा दुःखद प्रसंगी त्यांना कर्तव्यावर या म्हणून सांगणं संवेदनशून्य पणाचं ठरेल ! ते काही नाही,  तूम्ही दुसरी रीप्लेसमेंट शोधा !...मी प्रभारी हवालदारांना फर्मावले.
सायंकाळी सातच्या सुमारास एएसआय कदमांचा फोन आला. मी काही बोलणार इतक्यात ते म्हणाले, "साहेब तुमच्या मुळे आईला जिवंतपणी शेवटचं पाहू शकलो. सकाळीच अंत्यविधी उरकला. रात्रीच्या गाडीत बसतोय. उद्या सकाळी ड्युटी जॉईन करतोय. असे सांगून एएसआय कदमांनी फोन ठेवला. काय बोलावं तेच कळत नव्हतं. एकीकडे काहीतरी क्षुल्लक सबब सांगून कर्तव्य टाळणारे महाभाग कुठे ! आणि स्वत:च्या जन्मदात्रीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून कर्तव्यास प्राधान्य देणारे, प्रामाणिकपणाचा वसा जपणारे एएसआय कदम कुठे ! माझ्यासाठी हा आश्चर्य आणि एएसआय कदमां प्रती आदर अशा संमिश्र भावनांचा उमाळा आणणारा अविस्मरणीय प्रसंग होता. शब्द दिल्याप्रमाणे एएसआय कदम दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर रुजू झालेआणि यथावकाश निवडणुकाही  निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडल्या.
       घोडखिंडीत अतुलनीय पराक्रम करून बाजीप्रभू जरी मराठ्यांच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले तरी देखील त्यांचे सोबत सिद्धी जौहरच्या बलाढ्य फौजेशी लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कित्येक अनामिक बांदल  वीरांचा पराक्रम देखील बाजी प्रभूंच्याच तोलामोलाचा होता हे विसरून चालणार नाही ! त्याचप्रमाणे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या पोलीस बांधवांमध्ये एएसआय कदमांसारख्या कोणाच्याही खिजगणतीतही  नसलेल्या  प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांचे योगदान हे निश्चितच कौतुकास्पद व गौरवास पात्र ठरणारे आहे. यथावकाश एक दिड वर्षात एएसआय कदम सेवा निवृत्त होतील आणि काळाच्या ओघात लोकांच्या विस्मृतीत जातील. त्याअगोदर  त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांसाठी निरंतर प्रेरणादायी ठरावी याकरीता हा लेखन प्रपंच. अत्यंत दुःखद प्रसंगीही भावनेपेक्षा कर्तव्यपूर्तीस अग्रक्रम देणाऱ्या ह्या पोलीस वीरास माझा मानाचा मुजरा.

प्रवीण राणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक 
समता नगर पोलीस ठाणे,मुंबई

1182. निसर्गाची ती प्रियतमा

     गाडी धीम्या गतीने स्टेशनात शिरत असतानाच तिने मला स्पाॅट करत जोरात हाक मारली. मी तिला खिडकीतून हात केला. ती माझ्याकडे बघून हसत गाडीला समांतर पळत होती. आजूबाजूचे लोक प्रचंड आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. पण तिला कुणाचीच तमा नव्हती. शहरी शिष्टाचार वगैरे तिने कधीचेच बासनात गुंडाळून ठेवले होते. तिचे अनिमिष नेत्र फक्त माझ्यावर खिळले होते. मावळत्या सूर्यकिरणांनी तिच्या घामेजलेल्या चेहऱ्याला एक लोभसवाणा लुक दिला होता. काही क्षणांतच गाडी थांबली आणि मी  उतरलो. मी उतरल्याक्षणी तिने माझा ताबा घेतला आणि थेट घरी नेले. थोड्याफार गप्पा व जेवण झाल्यावर प्रवासाचा शीण आल्याने मला गाढ झोप लागली. सकाळी तिने हलकेच मला उठवले. डोळे उघडून बघितले तर ती चहाचा वाफाळता कप घेऊन हसतमुखाने उभी होती. मी चहा घेत असतानाच तिने पलंगाखाली सुरक्षितपणे ठेवलेली लहानशी शेगडी हलकेच काढली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की रात्री थंडी का वाजली नाही ते. आत्ता मात्र हवेत प्रचंड गारठा जाणवत होता. मी चहा घेऊन आळोखेपिळोखे देत अंगणात आलो. वर बघतो तर काय, एक अतिशय पिटुकला कापसाच्या फुटबाॅलसारखा ढग जस्ट तिच्या घराच्या छतावर येऊन टेकला होता. तो माझ्याकडे बघून खुदकन् हसला आणि सारे वातावरणच बदलून गेले. मला एकदम मस्त मस्त वाटायला लागले. तेवढ्यात तिने आतून आवाज दिला, "आवर रे , आपल्याला निघायचं आहे. " 
माझं आवरुन होईपर्यंत तिने आमचा डबा तयार केला. मी म्हणालो, " रस्त्यात ढाब्यावर जेवलो असतो ना. तू उगीच त्रास घेतलास. " ती हसून म्हणाली, "ढाबा ? आपल्या पूर्ण प्रवासात एकही माणूस दिसणार नाही."  मग आम्ही निघालो. काही वेळ मुख्य रस्त्याने चालल्यावर आम्ही आडवाटेला वळलो. सुरुवातीला विरळ असलेली झाडी हळूहळू दाट होत गेली. ती चालताना मला वनस्पतींची इंटरेस्टिंग माहिती देत होती. बराच वेळ चालल्यावर अचानक एक अतिशय सुंदर फुलांचा ताटवा दिसला. मी तिला म्हटलं, " हे फूल तू घालावंस असं मला वाटत. तुला खूप छान दिसेल. " 
ती अवखळ नजरेने पहात उत्तरली, 
"तुला तसं वाटतंय तर तूच घाल ना  माझ्या केसांत." 
या अनपेक्षित उत्तराने मी गडबडलो,  "अगं पण...... कसं घालायचं मला माहित नाही ना. " 
ती म्हणाली, " मी शिकवते. तू ट्राय तर कर." 
तिने अलगदपणे फूल खुडून माझ्या हातात दिले व माझ्याकडे पाठ करुन उभी राहिली. एकतर मला कुठून सुरुवात करायची काही कळत नव्हतं. त्यातच तिच्या केसांच्या प्रमत्त गंधाने माझं डोकं पार कामातून गेलं होतं. शेवटी मनाचा हिय्या करून मी तिच्या केसांवर हात ठेवले. पण आता क्लिप काढून फूल लावायचं की क्लिपमध्ये घुसवायचं हा प्रश्न पडला. माझी बिकट अवस्था ओळखून तिने तिचे हात मागे घेत माझ्या हातांवर ठेवले. बोटांमध्ये बोटे गुंफत एखाद्या निष्णात पियानोवादकाच्या कुशलतेने ती फूल, केस आणि क्लिप यांची सिंफनी तयार करु लागली. पण त्या सिंफनीचे सप्तसूर मात्र माझ्या ह्रदयात झंकारत होते. फूल परफ़ेक्ट बसल्यावर ती गर्रकन वळून म्हणाली, " कशी दिसते सांग."
आधीच्या संभाषणाचा धागा पकडत मी तिची फिरकी घेतली, "खूपच सुरेख दिसत आहेस पण या फुलावर तू साडीच नेसली पाहिजेस असं मला वाटतंय." असं बोलून मी अर्थपूर्ण नजरेने तिच्याकडे पाहिलं. माझ्या बोलण्यातला गर्भित आशय समजून  ती अशी काही लाजली की डोंगरमाथा येईपर्यंत गप्पच झाली. फक्त अधूनमधून कृतककोपाने कटाक्ष टाकत होती तितकंच. डोंगरमाथ्यावर आम्ही थोडी जागा साफ करुन डबा उघडला. इतकं चालल्यावर तिने केलेला स्वयंपाक खूपच चवदार लागत होता. रानभाजी तर केवळ अफलातूनच. जेवण संपतासंपता अकस्मात वातावरण बदलले. काळे ढग दाटून येत तुफान पावसाला सुरुवात झाली. डोंगरमाथ्यावर कोसळता पाऊस अनुभवायचं थ्रिल वेगळंच. जलधारांचा एक पारदर्शक पडदा तयार होऊन अत्यंत रमणीय डायनॅमिक कॅनव्हास चितारला गेला होता. ते पारदर्शक जलचित्र बघतानाच एका जिवंत जलशिल्पावर माझी नजर खिळून राहिली. अक्षरशः देहभान विसरुन ती चिंब भिजत उभी होती. तिच्या कमनीय देहाचा अणू- रेणू पावसाच्या प्रत्येकथेंबाला आसुसून प्रतिसाद देत होता. तिचा प्राणसखा निसर्गाने सहस्त्रबाहूंनी तिला कवेत घेतल्याने ती अंतर्बाह्य फुलून आली होती. 
पाऊस जसा अचानक आला तसाच थांबला. ती भानावर आली. मी तसाच मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. ती माझ्याकडे बघून मिश्किलपणे म्हणाली, " असं चिंब भिजल्यावर काहीतरी करतात असं ऐकलं होतं. तू गप्पच कसा काय? "
मी हसलो, " तू म्हणतेस ते खरं आहे पण तसं करायला माझं पाऊलच उचलत नव्हतं इतका मी स्पेलबाउंड झालो होतो. त्या प्रचंड पावसात एक मंत्रमुग्ध करणारं निसर्गचित्र बनलं होतं. त्या चित्राचं तू एक अभिन्न अंग बनली होतीस. कोसळणाऱ्या प्रत्येक थेंबाला तुझं शरीर आसुसून प्रतिसाद देत होतं , त्याचा स्नायू न् स्नायू तटतटला होता. तुझ्या विलग झालेल्या ओठांचं चुंबन घेत जलधारा जमिनीकडे झेपावत होत्या. निसर्गाशी तनामनाने एकरुप होऊन अतीव सुखाने तुझे नेत्र अर्धवट मिटले होते. हनुवटी किंचित उचलली गेली होती. बेफाम पावसात वाहत्या पाण्यावर असे जिवंत चित्र रेखाटण्याची किमया फक्त निसर्गच करु शकतो. त्या चित्रात मी खूपच विसंगत दिसलो असतो.  नाही का ? "
तिने माझे बोलणे ऐकताना खालचा ओठ दातांनी गच्च दाबून धरलेला होता. तिला स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड झाले होते. माझे बोलणे संपताच ती माझ्याजवळ आली. तिने माझा हात गच्च धरला. त्या क्षणी मला तिच्या कोवळ्या हातातील जबरदस्त ताकद जाणवली. काही कळायच्या आत माझ्या हाताला जोरदार हिसका बसला. हिमालयाच्या कुशीतून अवखळपणे खाली झेपावणाऱ्या श्वेतगंगेसारखी ती झपाट्याने डोंगर उतरु लागली. खालून वर येणाऱ्या वाऱ्याने तिच्या घनदाट कुंतलांत अडकलेले जलतुषार माझा चेहरा ओलाचिंब करु लागले. तिचा झपाटा विलक्षण होता. मी जीवाच्या आकांताने तिचा वेग गाठण्याचा प्रयत्न करत होतो. डोंगराच्या शेवटच्या टप्प्यात तर ती अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने उतरु लागली. तिची पावलं जणू डोंगराला टेकतच नव्हती. माझ्या काळजाचा मात्र थरकाप उडाला होता. जीवनात काही प्रसंग काही कळायच्या आत आपल्यावर कोसळत असतात. तेव्हा त्या प्रवाहात वाहत जाणे एवढेच आपल्या हातात उरते. अगदी अशीच स्थिती माझी झाली होती. शेवटी एकदाचा डोंगर संपला. आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. 
    रात्री जेवण करुन मस्तपैकी सतरंजीवर गप्पा मारत बसलो होतो. गप्पा रंगल्या असतानाच अचानक तिचा स्वर हळवा झाला. माझ्याकडे बघत ती म्हणाली, "तू परत जाऊ नकोस रे...प्लीज. माझ्यासोबत राहा ना इथेच ,या निसर्गाच्या कुशीत." गप्पांना गंभीर वळण लागलेले पाहून मी थोडावेळ शांत बसलो. मग म्हणालो, "महर्षी विश्वामित्रांची कथा तुला माहीत असेलच. त्यांना स्वर्गात प्रवेश नाकारला म्हणून त्यांनी प्रतिसृष्टी उभी केली. त्यासारखीच मी एक अमूर्त प्रतिसृष्टी उभी केली आहे. ती माझ्या स्वतंत्र विचारांची प्रतिसृष्टी आहे. आपल्या सभोवताली असलेल्या सृष्टीचे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून आकलन करुन घेत मी माझी प्रतिसृष्टी तयार केली आहे. त्यात माझे कोणत्याही विचारसरणीला, रुढीला, परंपरेला बांधील नसलेले संपूर्ण स्वतंत्र विचार आहेत. या  विचारांना कोणतीही सीमा नाही, मर्यादा नाही. भोवतालचा निसर्ग, जग, पृथ्वी यांना पार करत तारे- तारका, ग्रहमाला, आकाशगंगा ओलांडून अपरिमित वेगाने हे विचार धावत असतात. त्यांच्यामागे धावताना तुझी दमछाक होईल. तू आजवर जपलेली गृहीतके मुळापासून हादरुन जातील. खरं म्हणजे तू निसर्गाचीच प्रियतमा आहेस. त्याच्याशी एकरुप झालेली आहेस. आता तू हळूहळू त्याच्यात सामावून जा. पण त्यासाठी तुला फक्त जाणीवांनी निसर्गाचा अनुभव घेऊन चालणार नाही तर नेणीवांनी तुला त्याची अनुभूती घेता आली पाहिजे. त्यासाठी मनाच्या तळाशी असलेल्या नेणीवांना तुला मनाच्या पृष्ठभागावर आणावं लागेल."
माझं बोलणं संपताच ती उठून  माझ्याजवळ येत गुडघे टेकून बसली आणि पुढे झुकत दोन्ही हात माझ्या खांद्यांवर ठेवत म्हणाली, "तू अनंताचा प्रवासी आहेस हे माझ्या लक्षात आलं आहे. उद्या सकाळी तू इथून निघणार आहेस. त्यापूर्वी आजच्या रात्री मला तुझ्या विलक्षण प्रतिसृष्टीच्या अनोख्या सफरीवर घेऊन चल. आज रात्री तुझ्या विचारांचीच मैफल सजवू यात. अशी भारावलेली रात्र पुन्हा क्षितिजावर उतरणार नाही. या धुंद करणाऱ्या जादूई क्षणांमध्ये तुझ्या विचारांच्या चंद्रफुलांनी हे नभांगण दीप्तिमान होऊन अवघे विश्व उजळून निघू दे. तुझ्या प्रतिसृष्टीतील निळ्या डोंगरांवर बरसणाऱ्या सोनेरी प्रकाशधारांत मी आज न्हाऊन निघणार आहे."
एवढं बोलून ती शांतपणे माझ्या मांडीवर डोकं ठेवून पहुडली आणि मी तिच्या केसांतून बोटं फिरवत बोलत राहिलो ...अनंतकाळ... युगानुयुगे. 

जितेंद्र अभ्यंकर 
8605396156

1181. हरे कृष्ण

     परवा पुण्यात तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडलं यावर मी लिहावं असं अनेकांनी मला सुचवलं. खरं तर अशा घटनेकडे एक माध्यम म्हणुन मी पहाते. कारण कुठलीही घटना ही उगीच घडत नाही. भगवंताने केलेला तो प्लॅन असतो. या आणि अशा घटनेकडे इमोशनली न पहाता शांत बसून विचार करा. मला कायम वाटतं, चांगल्या मार्गाने भरपुर पैसा कमावता येतो का? त्यामागे अनेकांची हाय असते. कारण अनेकांना मुंडकीवर मारुन जमिनी लुटलेल्या असतात त्यामुळे वाममार्गाने येणारा पैसा हा तसाच जातो पण तो जाताना  आपल्या डोक्यावर पापाचं माप ठेवून जातो. या जन्मात नाही तर नंतर ते माप आपल्या प्रत्येकाला रितं करायचच आहे. इतका साधा विचार केला आणि जगायला लागणारा पैसा प्रामाणिकपणे मिळवला तर फक्त सुखच आहे.
    या केसमधे अशा पध्दतीने आलेला पैसा आणि त्यामुळे आलेला गर्व आणि अहंकार हा क्षणीक होता. या घटनेनंतर त्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेकांची अंडीपिल्ली बाहेर आली. त्यामधे पब आहे. त्यामध्ये यंत्रणा आहे. त्यामध्ये गैरव्यवहार करणारे त्यांचे धंदे असतील हे सगळं बाहेर काढायला भगवंताला कोणाला तरी दुख द्यावं लागलं. त्या दोन कुटुंबाना दुख देण्यामागे सुध्दा भगवंताचा काहीतरी विचार असेलच ना. कुठल्याही घटनेकडे एकाच बाजूने विचार करु नका. यामधून आपण सगळे काय धडा घेतो ते महत्वाचे आहे. आपल्या मुलांवर लक्ष देणं असेल. पैसा देताना तो विचार करुन देणं असेल. त्याची संगत कोणासोबत आहे हे पहाणं असेल. त्याला वाचन, व्यायाम याची आवड लावणे असेल. घरी स्वतः कुकींग करुन नवनवीन पदार्थ खाउ घालणं असेल म्हणजे तो बाहेर होटेलींग करणार नाही. त्यासाठी त्या बाईचा पाय घरात टिकायला हवा आणि पालकांनी व्यसनं बंद करुन मुलांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी नाळ जोडायला शिकवणं असेल हे आपल्याच हातात आहे.  पैसा वाईट नाही तर तो कमावण्याचा मार्ग वाईट असु शकतो.  मी कायम अध्यात्मावर यासाठीच लिहीते. अध्यात्माची कास धरली तर आपण अशा विकृतीपासून आपोआप दुर जातो. श्रीमंत मित्र जोडण्यापेक्षा संस्कारी मित्र जोडा आणि श्रीमंत विचारसरणी असु द्या.
      काल संध्याकाळी मी आणि माझे मित्र पराठे घेउन टेकडीवर गेलो. इतकी सुंदर हवा होती. त्या टेकडीवर कोणीही नव्हतं. एका झाडाखालीं बसून खुप गप्पा मारल्या. अनेक विचारांची देवाणघेवाण झाली. मस्त लोणचं पराठे असं डिनर केलं आणि वेळेत घरी येवून झोपलो म्हणजेच काय तर आम्हीही पबला किवा होटेलला जाऊ शकत होतो पण एकही रुपया खर्च न करता घरचं खाऊन आम्ही ऑक्सिजन आणि आनंद घेउन घरी आलो.  निसर्ग आपली वाट पहातोय. वेळ मिळेल तेव्हा झाडाखाली बसुन भाजी भाकरी खा आणि उत्तम आरोग्य मिळवा. या मायावी दुनियेत सुध्दा आपण आपलं वेगळेपण जपू शकतो आणि निसर्गाने दिलेलं सुंदर शरीर आणि मन जपून समाजाला उत्तम आदर्श देउ शकतो. या आणि अशा घटना चार दिवसांत आपण विसरुन जातो. पुन्हा येरे माझ्या मागल्या. आपण यातून काहीही शिकत नाही. पैशाला आपल्यावर हावी होवु देउ नका तर त्याच्याकडे  गरज म्हणून पहा तरच आपल्याला सुख मिळेल.
     या आणि अशा घटनाना खुप वेगवेगळे कंगोरे आहेत पण त्याच्या जास्त खोलात न जाता जसा अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास ठेवला तसाच आपण ठेउन आपल्याला दिलेले कार्य प्रामाणिकपणे करत राहुयात. निष्काम कर्म केल्याने मिळणारं फळ आणि आनंद ही उच्च लेव्हलची तृप्ती आहे. सगळं भगवंताचं आहे आणि मी हे त्याच्यासाठी करते / करतो असा भाव जेव्हा मनात येइल तेव्हा आपण चुकीचे वागणारच नाही. ही संपूर्ण सृष्टी त्याची आहे यावर तर कोणाचं दुमत नसावं. आपण प्रत्येक जीव हा भाडेकरु आहोत. मग इथे अहंकार इगो. माज हे शब्द येतीलच कसे? पहा विचार करुन. ज्याचं आहे त्यालाच ते अर्पण करा. आपल्या लायकीनुसार त्यातील वाटा तो आपल्याला देणारच आहे.
     मी आशा करते की माझ्या लेखणीतून आलेले शब्द सुध्दा त्यानेच सुचवले आहेत यावर तुम्ही विश्वास ठेवाल आणि त्यातून जे जे उत्तम आहे ते वेचुन स्वतःला समृद्ध कराल.
हरे कृष्ण.
 
सोनल गोडबोले

1180. देवाचे लक्ष आहे बरका !

    एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, "बोला ! काय काम आहे?"
ते म्हणाले, "ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ." 
मी म्हटले, "माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही."
तेव्हा ते म्हणाले, "बंधू ! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे."
मी चिडत म्हटलं, "ही काय मस्करी आहे?"  
"ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही ! "
काही बोलणार इतक्यात मागून आई आली.
"एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी." आईला काही तो दिसला नाही. आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो. 
"अग आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?" एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, "अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे." 
मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे.
मी म्हटले, " प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊदे."
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता. ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये ! तुझे काम होईल आज".
     ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे.  होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली. आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, "भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा." प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. घरी पोहचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. "प्रभू ! प्रथम तुम्ही घास घ्या." मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, "आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास ! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?"
मी म्हटले, "आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते !"
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी. प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, "आज तुला झोप येण्यासाठी, संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही." खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की, 'तो' पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगलेच घडेल !           
देवाचे लक्ष आहे बरका !

- अग्रेषित.

1179. रिकाम्या जागा

 " बबड्या, भेट ना आज प्लिज, एवढा का भाव खातीयेस. म्हणालोय मी सॉरी तुला. तुझ्या त्या आवडत्या कॅफेमध्ये जायचं का हाय स्ट्रीटला आहे त्या. मस्त पिझ्झा खाऊ काय म्हणतेस."
" बाबा प्लिज ना, किती मस्का मारतोएस. बरं येते. माझा क्लास संपला की येते आणि हो मी आईला सांगून येणार आहे बरं का."
" ए बाई, नको ना. तू ये तर खरी मग बोलू. नको सांगूस तिला."
" बघते, किती वाजता पोचशील तू?"
" एक्झॅक्ट 7.30ला पोचतो.."
" म्हणजे मी 8 ला यायचं ना.."
" नाही गं राणी. आज वेळेत येतो की नाही ते बघच. वाट बघतो मी, तू लवकर पोहोच हं. भेटू चल.'
अगदीच हलकं वाटलं श्रीपादला अस्मीशी म्हणजे आपल्या एकुलत्या एक लेकीशी बोलल्यावरआणि वाटणार कसे नाही, तब्बल सहा दिवसांनी बोलत होता आज तो तिच्याशी. नव्हेच ती त्याच्याशी. कितीदा ट्राय केल्यानंतर आज फोन घेतला होता तिने त्याचा. खरंतर असं पहिल्यांदा झालं होतं आयुष्यात, एवढंच काय, आश्लेषाशी सुद्धा अबोला असण्याची ही पहिलीच तर वेळ होती. पण हे पहिल्यांदा आणि शेवटचं. असं मनोमन ठरवलं होतं त्याने. चुकही त्याचीच होती ना.
     त्या दिवशी अचानक इंटर हाऊस मिटिंग ठरली होती आणि ती उगाचच वाहवत गेल्यासारखी लांबली देखील होती. कारणही काय तर कंपनीचं कल्चरल फेस्ट, तीन वर्षातून एकदा होणारं. सिनियर मॅनेजर असलेला श्रीपाद म्हणजे अगदी उत्साही कार्यकर्ता. जितका कामात चोख अन स्मार्ट तितकाच इतर गोष्टीत पुढे, जितका टेक्निकल स्ट्रॉंग तितकाच लोकांना एकत्र मिळवून असे कार्यक्रम करण्यात इंटरेस्टेड. पण हेच त्याचं मल्टी टॅलेंटेड असणं गळ्याशी येत असे त्याच्या कधीकधी. स्वतःच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टीचा विसर पडे त्याला. आज पटापट कामं डेलिगेट करून ऑफिसमधून निघाला तो, कदाचित पहिल्यांदाच स्वतः उच्चपदस्थ असल्याचं प्रिव्हिलेज घेतलं होतं त्याने. आपली टिम ऑफिसमध्ये काम करत बसलेली असतांना वैयक्तिक कामासाठी लवकर बाहेर पडून. अस्मीला प्रॉमिस केल्याप्रमाणे वेळेत पोचणार होता तो त्या कॉफी शॉपमध्ये. मागच्या केलेल्या चुकीची भरपाई करायची होती त्याला.
" वॉव बाबा.आज चक्क तू पोचला आहेस माझ्याही आधी, un-believable. तुझ्या ऑफिसमध्ये आग लागेल ना तुझ्या  ऍबसेन्समध्ये."
" बास की गं आता. किती छळणार आहात. पुरे झाली मला शिक्षा तुम्ही मायलेकींनी दिलेली."
" शिक्षा वाटली का तुला ती, बरंच झालं."
"नाहीतर काय. असं करतं का कोणी. आठवडाभर कसं वाटलं माहित्ये मला.अन तुम्ही तिकडे मामाकडे मजा केली असणार."
" प्लिज हं बाबा. तुला सोडून आम्ही खरंच मजा केली असेल असं वाटतंय तुला. तेही आई तुझ्याशी अशी भांडून गेल्यानंतर मजेत राहील तिकडे."
" बरं गेलात ते गेलात पण फोन घ्यावा तरी मी इतक्यांदा केल्यावर."
" कधी केलास बाबा, आम्ही इकडून गेल्यावर तिसऱ्या दिवशी अन आई घेईल कसा तुझा फोन. तिने नाही उचलला तर तू मेसेज टाकून फक्त एवढंच विचारलंस की माझा अमूक एक टाय कुठे ठेवला आहेस. अन तिचा राग रास्तच होता ना ह्यावेळी."
     श्रीपाद, आश्लेषा अन अस्मी. एक मस्त त्रिकोणी कुटुंब. श्रीपाद एका मल्टिनॅशनल कंपनीत सिनियर मॅनेजर. कामात गढून जाण्याचा त्याचा स्वभाव. अस्मीच्या बालपणीच आश्लेषाने नोकरी सोडली, ती शाळेत जाऊ लागली तसे आश्लेषाने छंद म्हणून होम बेकिंग सुरु केले. बाकी पूर्ण वेळ अस्मीच्या शाळा, अभ्यास, अदर ऍक्टिव्हिटी साठी राखून ठेवला. तसंही ऑफिस कामासाठी श्रीपादला सदैव दौरे असायचे. शनिवार रविवार तो बायको मुलीसाठी राखून ठेवायचा पण इतर दिवशी तो फक्त कामाला वाहून घ्यायचा. तसं सगळंच अलबेल होतं फक्त लेकीच्या छोट्यामोठ्या अनेक गोष्टींचं साक्षीदार होता आलं नव्हतं त्याला ह्याच कारणाने. आश्लेषाने एकहाती सांभाळलं होतं हे सगळं. ती अनेकदा म्हणायची देखील त्याला,
" श्री, अरे थोडासा वेळ काढावा रे इतर दिवशीही आमच्यासाठी. पिल्लू भराभर मोठं होतंय, कधी भुर्रकन उडून जाईल कळणार देखील नाही, खूप मिस करशील हे सगळं नंतर."
अस्मी सुद्धा अगदीच गुणी होती हुशार अन समजूतदार. जशी अभ्यासात हुशार तशीच इतर गोष्टीतही. प्रचंड अभिमान वाटावा अशीच होती ती. महिन्याभरपूर्वीच ती taekwondo under eighteen category साठी भारताला international level वर रेप्रेसेंट करून आली होती. त्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांच्या क्लास मध्ये. सगळ्या पेरेन्ट्सना खास इंव्हीटेशन होते. आश्लेषाने याबद्दल बरंच आधी श्रीला सांगून ठेवलं होतं. लेकीचं कौतुक पाहायला मला तू सोबत हवा आहेस म्हणाली होती ती अन त्यानेही ऑफिसमधली कामं मॅनेज करून येतो असे प्रॉमिस केले होते दोघींना. पण ऐनवेळी त्या मिटिंगच्या नादात तो विसरला. खूपवेळ फोनही बघितला नाही त्याने अन फार उशिरा त्याला या गोष्टीची जाणीव झाली. ऑफिसमधून निघताना त्याने लेकीला फक्त मेसेज केला,
" सॉरी पिल्लू, विसरलो गं. मी आल्यावर बाहेर जाऊ मस्त जेवायला..सेलिब्रेशन म्हणून."
अस्मीला रडूच आले होते तिचं कौतुक बघायला बाबा नव्हता म्हणून, अन नंतरचा त्याचा मेसेज बघून तर ती खूपच रुसली होती. म्हणाली होती मी नाहीच बोलणार बाबाशी. अन लेकीला असं रडताना पाहून खूप वाईट वाटलं होतं आश्लेषाला सुद्धा आणि म्हणूनच श्रीपाद घरी येण्या आधीच फक्त दोन ओळींची चिठ्ठी फ्रीज मॅग्नेटला अडकवून निघून गेल्या होत्या दोघीही शहरातच असलेल्या अस्मीच्या मामाकडे. खरंतर आपण विसरलोय हे जाणवल्यावर खूप गिल्ट आलं होतं श्रीपादला पण दोघीही घरात न दिसल्याने तो थोडा रागावलाच होता. त्यावर असं चिट्ठी लिहून आश्लेषा निघून गेल्यामुळे तर अधिकच चिडचिड झाली त्याची. मग तिसऱ्या दिवशी मिटींगला जाताना त्याचा टाय सापडत नव्हता म्हणून त्याने फोन केलेला तिला, अर्थात तो घेतला नव्हताच तिने आणि तसंच अस्मीला सुद्धा बजावून ठेवलं होतं, म्हणाली होती.
" करू देत तुझ्या बाबाला ऑफिसची कामं, वाहून घेतलंय नुसतं स्वतःला. तो किती काय काय मिस करतोय हे नाहीच कळते त्याला. आपल्या शिवाय कसं वाटतंय घरात बघूच दे जरा त्याला अनुभवून. आपण दोघी कितीदा तरी एकट्या असतो तो ऑफिस टूरला जातो तेंव्हा, आता राहा म्हणावं एकटाच.." 
त्यावर आज अस्मीने त्याचा फोन घेतला म्हणून बाप लेकीला असे भेटता आले होते.
" किती गं दूर पडत असेल तुला क्लासेस ला जायला तिकडून, तू चल आत्ताच घरी माझ्याबरोबर."
" वा, ग्रेटच आहेस की तू. अन आईला काय सांगू.."
" कशाला काही सांगायचं तिला, तू घरी आलीस म्हणल्यावर आपोआप येईल ती पण उद्या. तिला एवढं रुसलेलं नव्हतं बुवा बघितलं मी कधी. मान्य आहे माझं चुकलं पण तरीही. किती तो अबोला."
" का नाही रुसणार ती तुझ्यावर. जरा उशीरच केला मी तर म्हणीन. खूप लाडावून ठेवलंय तिने तुला.."
" हं..ते झालंच म्हणा."
श्रीपाद डोळे मिचकावत म्हणाला तसं अस्मीने त्याला विचारलं.
"पण मला सांग बाबा, तू चुकला आहेस..रॅदर अनेकदा चुकतोस,  यावेळी नेमकी उपरती झाली कशी."
" हं..झाली म्हणायचं. खूप वेडं असतो गं आपण. आपण म्हणजे आम्ही मोठे लोक. खूप काही गोळा करण्याच्या नादात हातात असलेलं निसटून जाऊ देतो. उगाचच आयुष्यात रिकाम्या जागा निर्माण करतो."
" wow baba..Soo philosophical..काय झालंय तुला एकदम, हे इतकं जड जड का बोलतोय?"
" ती पण एक गंमतच आहे, तू हसशील ऐकून पण खरं सांगतो, कधी कधी सहज साध्या गोष्टी आपल्यासाठी eye opener ठरून जातात, असंच काहीसं झालं माझ्याबरोबर."
" अरे बापरे, एवढं काय झालं..कुणाचं प्रवचन ऐकायला गेला होतास आम्ही नसताना? "
" अगं तुमचं ते न्यूज चॅनेल नाही का. तुम्ही गेल्या त्यानंतर दोन तीन दिवस आलीच नाही ती.."
" कोण रेखामवशी. अरे ती सुट्टीवर गेली होती ना.."
रेखा त्यांच्या घरातील मदतनीस होती. आश्लेषा श्रीपादचे लग्न झाले तेंव्हापासून जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली होती आता, ती घरातला एक मेंबर असल्यासारखीच होती अगदी.
"हो तेच, मला नव्हतं माहिती. ती आली तीन दिवसानंतर. त्यादिवशी मला आधीच टाय सापडत नव्हता. मग मी म्हणालो तिला की तुला तुझी ताई सांगून गेली का आता कामाला येऊ नकोस, काही गरज नाही. दादा करतील त्यांचं त्यांचं."
तर म्हणते कशी.
" असं कशाला सांगतील ताई, उलट त्या मला नीट सगळ्या सूचना देऊन गेल्या आहेत, काळजी वाटते त्यांना खूप."
" काळजी वाटत असती तर अशी गेलीच नसती.."
" आहो दादा वाईट वाटतं कधी कधी, यावेळी लागलं त्यांच्या मनाला फार, तुम्ही कौतुक पाहायला नव्हतात म्हणून लेक नाराज झाली. त्यामुळे तर फारच वाईट वाटलं ताईला."
"अगं हो, पण मी कामात अडकलो होतो ना. टेंशन्स असतात.."
" तेच की, तुम्ही ऑफिसर लोक. तुम्हाला खूप लोड असतंय कामाचं. पण आमचं तसं काही नाही. तुम्हाला सांगते दादा, लाहानीचं गॅदरिंग होतं. संध्याकाळी ठेवलं होतं शाळेनं. मी म्हंटलं नवऱ्याला तू यू नकोस. नुकसान हुईल दिड दोन हजाराचं. भुर्जीची गाडी लावतो ना तो. तर म्हणतो कसा, पैसा काय रोज कमावता येतो गं. लेकराचं कौतुक रोज रोज पाहायला मिळत नाही. त्यांचं बालपन येनार आहे होय परत. तुम्हाला सांगते कधीकधी वाटतं तुमच्यापेक्षा आम्हीच जास्ती सुखी. पण तुम्ही मोठे लोक, तुमच्या जबाबदाऱ्या जास्त. काम तुमच्यासाठी फॅमिली पेक्षा मोठं असतंय. असो. म्हणून म्हणलं आम्ही खरंच जास्त सुखी आहे दादा."
" तुला सांगतो मनी, मी स्पिचलेस झालो होतो गं, काहीही बोललो नाही मी यावर. बोलूच शकलो नाही. तिचं सहज असं बोलणं मला विचार करायला भाग पाडून गेलं. वाटलं खरंच किती सुखी आहे ही आपल्यापेक्षा, किंवा आपल्याला आपलं सुख सांभाळता येत नाहीये का. ते असतं बघ. रिकाम्या जागा. एखाद्या शब्दावाचून एखाद्या वाक्याला अर्थ उरत नाही, तसंच काहीसं. आयुष्यात अश्या अनेक रिकाम्या जागा असतात ना..Rather we create it..अगदी तसं वाटलं मला त्या दिवशी."
" हं. असं सगळं झालं तर, त्या दिवशी तुला खरं realize झालं आणि तू आम्हाला फोन करत सुटला बरोबर ना."
"अगदी बरोबर..असो. बरं ऎक मी काय म्हणतोय, मी महाबळेश्वरचं बुकिंग केलंय, saturday-sunday, उद्या सकाळी घ्यायला येतो, सोमवारी सकाळी परत येऊ, माझी सुट्टी आहे सोमवारची पण तुझे क्लासेस मिस व्हायला नको, तुझ्या आईला तेवढं तयार करण्याचं काम तुझं.."
" Wait, wait..Wait a minute, नाही म्हणजे प्लॅन भारी आहे तुझा पण मला त्यात पकडू नकोस.  in fact तुला आणि आईला गरज आहे या ब्रेकची. मी कशाला उगाच कबाब मे हड्डी. मी नाही येणार.."
" ए बाई, नाही हं. तू तर पाहिजेच आहेस. मी एकटा नाही जाणार तिच्या सोबत. मला भीती वाटते.."
यावर दिघेही टाळ्या देत खळखळून हसले, अस्मी म्हणाली,
"खरंच बाबा, जा तुम्ही दोघेच. मी राहीन मामाकडे दोन दिवस. पण सोमवारी परत या. दुपारी जाऊ आपण एखादा मुव्ही बघायला आणि हो मी तिला नाही सांगितलं की आज तुला भेटायला आलेय ते. तिची बॅग पॅक करून ठेवते आज रात्री मी. उद्याची तुमची ट्रिप सरप्राईज असेल तिला."
" नको गं अशी मोठी झाल्यासारखी वागूस, मला नाही झेपणार तू एवढ्या लवकर मोठी झालेली. माझ्यासाठी तू अजून छोटीशी मनीमाऊच आहेस. तुझी आई म्हणते ते खरंय. मी खूप मिस केलंय तुझं बालपण. पण आता नाही, अजून वेळ गेली नाहीये."
" बास की बाबा मस्का लावणं. मी म्हंटल ना मी नाही येणार तुमच्या सोबत."
" गप गं, आगाऊ. बरं चल सोडतो तुला.."
" नको मी जाते नीट, तू ये ठरल्या वेळेत उद्या."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
न सांगताच अस्मीने बॅग भरून ठेवली होती आईची अन सकाळी लवकर तयार हो आपल्याला बाहेर जायचे आहे असेही सांगितले होते. श्रीपाद घ्यायला आल्यानंतर सगळा उलगडा झाला होता तिला खरंतर. त्याने मनापासून सॉरी म्हंटले होते तिला सगळं सांगून. तिला मनवण्यासाठी वेगवेगळी गाणी म्हणत होता तो प्रवासात, तिला मनातून हसूच येत होते खरंतर पण आधी उगाचच लटका राग दाखवत नंतर मिटवले होते तिने हे तात्पुरते भांडण. हा आठवड्याभराचा अबोला जीवघेणाच होता तिच्यासाठी आणि अशाप्रकारे तो मिटल्यानंतर मनातून खूप सुखावली होती ती. श्रीपादनेही प्रॉमिस केले होते तिला पुन्हा अशी वेळ येऊ देणार नाही असे आणि दोघेही मिळून आता या छोट्यामोठ्या रिकाम्या जागा भरून काढणार होते.

प्राजक्ता राजदेरकर

1178. नव साहित्यिकाची प्रेमकथा

     शैलेश एकटाच बसला होता चौपाटीवर. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा पाहत. दुपारचं उन चांगलच तापल होतं. या उन्हात फिरायला आलेल कोणी नव्हतं. दूरवर उभा असलेला भेळ वाला, काही कॉलेज चुकवून फिरायला आलेली मुलं, एक-दोन जोडपी दिसत होती. शैलेश झाडाखाली सावलीत बसला होता. त्याने शर्वरीला म्हणजे त्याच्या प्रेयसीला भेटायला बोलावल होतं आणि ती आता कोणत्याही क्षणी प्रकट होणार होती. थोड्या वेळाने त्याला लांबून शर्वरी येताना दिसली. त्याने उभं राहून तिला खुणावल. तीने हात दाखवला. शर्वरीने डोक्यावर ओढणी घेतली होती. पटपट चालत येत ती शैलेश जवळ पोचली.
"उशीर झाला का?" तीने विचारलं.
"नाही. मी तुझ्यासाठी संध्याकाळपर्यंत सुद्धा थांबलो असतो."  शैलेशने हसून म्हटलं.
शर्वरी पण हसली.
"तू मला एवढ्या लांबून कस ओळखलस?"
"तुझ्या चालण्याच्या शैलीमुळे. प्रथम तुझी तुरुतुरु चाल दिसली. नंतर तुझा गौरवर्ण. थोडं पुढे आल्यावर तुझ्या या पुढे आलेल्या दंतावरील गुलाबी अधर. आणि...."
"बस !बस ! एवढा दातांचा त्रास होतो तर तार लावून घेते आतमध्ये घ्यायला."
"नको या दातांवर पण माझं प्रेम आहे आणि तारेचा पुढे आपल्या प्रणयात अडथळा येईल."
"चावट आहेस अगदी." शैलेशच्या खांद्यावर चापट मारत शर्वरी म्हणाली.
"आणि काय रे एवढ्या उन्हाच कशाला बोलावल आहेस? कोणी चिटपाखरु तरी आहे का?"
"आपण दोघे आहोत हेच पुरे आहे. सृष्टीच्या निर्मिती आधी कसे आदम आणि ईव्ह होते ! आणि उन्हाच बोलशील तर तू भर उन्हातून जेव्हा मला भेटायला येतेस ना, तेव्हा तुझ्या गोऱ्या गालावर लाली येते. ती मला ठार करते." शैलेश म्हणाला.
"काय म्हणालास? ठार करते ! तू काय दुपारीच टाकून आलास की काय?"
"नाही. शर्वरी या नव उपमा आहेत. मला दुसरा शब्दच सुचला नाही. माझ्या साहित्यात असे शब्द वापरुन मी मराठी साहित्य समृद्ध करणार आहे."
"कर बाबा. पण  तुला एक महत्त्वाच सांगायचय. बाबा लग्न करताहेत."
"परत !" शैलेश आक्ष्चर्याने म्हणाला.
"फालतू विनोद करु नकोस. माझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत."
"मग."
"मग ! तुला काहीच वाटत नाही ! घरी येऊन बोल बाबांशी आपल्याबद्दल."
"केव्हा? आज येऊ का?" शैलेशने विचारलं.
"आज नको. रविवारी ये."
"अच्छा. मग रविवारी सात वाजता येतो."
"सात वाजता नको. त्यावेळी बाबा ढकलायला बसतात."
"काय?" यावर शर्वरीने अंगठा तोंडाजवळ नेला.
"मग तर छानच आहे. पिता पीता बोलू."
"हे बघ शैल्या ! जास्त स्वप्न बघू नको. पाच वाजता ये. बाबांशी नीट बोल. तुझी काव्यमय आणि रसिक भाषा नको. बाबा कडक शिस्तीचे आहेत." शर्वरी कठोर सूरात म्हणाली.
"काय हे शर्वरी ! आल्यापासून नुसती तोफ डागते आहेस. ना प्रेमाच बोलणं की काही. जरा माझ्याजवळ बस तरी." शर्वरीचा हात पकडून तिला बाजूला बसवत शैलेश म्हणाला.
"मला तुला नीट डोळे भरुन पाहू दे तरी !" शैलेश तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. आता मात्र शर्वरी लाजली.
"तू पण असा आहेस ना." एवढं बोलून  शर्वरी शैलेशला बिलगली. शैलेशने तिचा हात आपल्या हातात घेतला. शर्वरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"केव्हा कळणार तुला दुनियेचे नियम? जगण म्हणजे काव्य नाही रे. खूप वेगळं असत ते." शर्वरी काळजीच्या सूरात म्हणाली.
"बाकीचे जगताहेत ना. मला त्यापेक्षा वेगळ जगू दे. मी साहित्याच्या क्षेत्रात करियर करणार."
"त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. नकार पचवावे लागतात."
"करेन ना. कोणत्याही महान कामाची सुरुवातीला टिंगल केली जाते. नंतर विरोध केला जातो आणि नंतर ती स्विकारली जाते." शैलेश म्हणाला.
"म्हणजे तू महान साहित्यिक होणार तर."शर्वरी मिश्किल हसत म्हणाली.
"का नाही." तो अजून पुढे काही बोलण्याआधीच शर्वरीने त्याचा हात पकडला.
"अरे, बस खाली. मी काय सांगते, ऐकतोस का जरा?"
"शर्वे !आता काही बोलू नकोस. तुझ्याबरोबरचे हे क्षण मला पूर्णपणे जगू दे." शैलेश म्हणाला आणि तिला जवळ घेतलं. दोघेही थोडा वेळ शांत बसले.  थोड्या वेळाने शर्वरी भानावर आली.
"अरे बापरे ! पावणे दोन वाजले. मी ऑफिसमधून लंचटाईममध्ये निघाले. आता जायला हवं."
"जातेस?" शैलेश थोडासा हिरमुसला होऊन म्हणाला.
"मग काय ! आम्ही तुमच्यासारखे..."
"रिकामटेकडे नाही असच ना." शैलेश तीच वाक्य मध्ये तोडत म्हणाला.
"मला अस म्हणायच नव्हतं रे." शर्वरी त्याला समजावत म्हणाली.
"असू दे. मला नीट निरोप तरी दे."
"म्हणजे?" शर्वरीने विचारलं.
       यावर शैलेशने तिचा उजवा हात हातात घेतला आणि त्याच चुंबन घेतलं.
"आई शप्पथ, कसला रोमँटीक आहेस  तू !" अस बोलून शर्वरीने शैलेशच्या कुरळ्या केसात हात फिरवला.
"चल येते माझ्या राजा." अस बोलून शर्वरीने शैलेशचा निरोप घेतला.
    रविवारच्या दिवशी शैलेश मस्त तयार होऊन शर्वरीच्या घरी गेला. पांढरा शॉर्ट सदरा, डार्क जीन्स आणि व्यवस्थित विस्कटलेले केस. त्याने दरवाजाची बेल वाजवली. शर्वरीनेच दरवाजा उघडला.त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य आल.
"छान दिसतो आहेस. ये आत ये." शर्वरी म्हणाली.
शैलेश आत गेला तेव्हा बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर शर्वरीचे बाबा बसले होते. सदरा पायजमा असा साधा वेश. पण दणकट शरीरयष्टी, पिळदार मिशा यामुळे बघताक्षणी दरारा वाटेल अस व्यक्तीमत्व होतं.
"या ! बसा." त्यांनी भारदस्त आवाजात म्हटलं. शैलेश त्यांच्या समोरील खुर्चीवर जाऊन बसला.
"नाव काय तुमच?"
"शैलेश."
"पूर्ण नाव काय?"
"म्हणजे तुम्हाला माझं आडनाव जाणून घ्यायच आहे. माझी जात वगैरे समजायला. सॉरी. पण मी माणूस म्हणून संबंध जोडतो लोकांशी."
"अच्छा ! ते कळेलच शर्वरीकडून. करता काय आपण?" बाबांनी विचारलं.
"कविता. कथालेखन." शैलेशने उत्तर दिलं.
"ते ठिक आहे. पण चरितार्थासाठी काय करता?"
"मी संपूर्ण वेळ लेखन करतो. तुम्हाला ऑस्कर वाईल्ड हेमिंग्वे माहित आहेत का?"
"नवीन व्हिस्कीचे ब्रँड आहेत का?" शर्वरीच्या बाबांनी विचारलं.
आता मात्र शैलेश उडालाच.
"नाही हो. संपूर्ण जीवन लेखनासाठी वाहिलेले लेखक आहेत ते."
"त्यांच जाऊ दे. तुम्ही काय करणार उपजिवीकेसाठी? लग्नानंतर तुमच्यावर शर्वरीची पण जबाबदारी आहे."
"आजची स्त्री कर्तृत्ववान आहे. ती पुरुषावर अवलंबून नाही. शर्वरी सुद्धा कर्तबगार आहे." शैलेश म्हणाला. यावर बाबांनी डोळे मोठे केले.
"मला सांगा, तुमची आणि शर्वरीची ओळख कशी?" बाबांनी विचारलं.
"आम्ही एकाच कॉलेजला होतो. तिथेच आमचं प्रेम जडल एकमेकांवर."
"खरोखर प्रेम करता शर्वरीवर?"
"हो मग ! मी समुद्र तर ती किनारा. मी देह तर ती प्राण. मी सूर तर ती ताल."
"पूरे ! मी कोणी संपादक नाही ज्याला तुम्ही आपली कविता ऐकवत आहात. तुम्ही माझ्याकडे माझ्या मुलीचा हात मागायला आला आहात." शर्वरीचे बाबा त्रासून म्हणाले.
"फक्त हात कशाला ? मला पूर्ण शर्वरी पाहिजे."
"हे बघा. फालतू विनोद करु नका. जीवनाविषयी गांभीर्य ठेवा. संसार करणे म्हणजे चेष्टा नाही."
"मी सर्वसामान्य माणसासारखं जगणार नाही." शैलेश म्हणाला.
"म्हणजे?"
"लोकलच्या गर्दीतून मेंढरासारखा प्रवास करायचा आणि महिन्याअखेरीस मिळणाऱ्या पगारासाठी बॉस नावाच्या फालतू माणसाची हांजी हांजी करायची."
"यालाच प्रामाणिकपणे जगून संसार करणे म्हणतात."
"माझी उद्दीष्टे वेगळी आहेत. मी तुम्हाला मघाशी सांगितल्याप्रमाणे मी साहित्याच्या क्षेत्रात काहितरी करुन दाखवणार आहे. याला शर्वरीचा सुद्धा पाठींबा आहे."
"हो का ग शर्वरी?" बाबांनी शर्वरीला आवाज दिला.
"काय बाबा?" शर्वरीने बाहेर येत विचारलं.
"हे काय बोलतायत ते खर आहे का? तुला पण यांच साहित्यिक होण पसंद आहे म्हणे."
"हो बाबा. मी यांच्या पाठीशी आहे. आणि सतत राहीन."  शर्वरीने एकदम ठासून सांगितल.
"बर.लेखनाव्यतिरिक्त अजून काही..." बाबांनी विचारलं.
"हो, आठवलं. आमची आंब्याची झाडं आहेत गावाकडे. त्या बिजनेसमध्ये बाबांना मदत करतो."
"हापूस आंबे का?"
"हो."
"त्याच उत्पन्न पण दरवर्षी समाधानकारक नसतं."
"मला तर तुमच्या आयुष्यात ठोस आणि ठाम अस काही दिसत नाही. हे पाहा, मी मुलांच्या मागे दरडावून ऐकायला लावणारा बाप नाही. जरी मी तसा वाटत असलो तरी." म्हणजे शर्वरीच्या वडिलांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव  होती.
"शर्वरी हुशार मुलगी आहे. माझा तिच्यावर विश्वास आहे. तिचा निर्णय चुकणार नाही. पण तुमच्या पेक्षा जास्त पावसाळे मी नक्कीच पाहिले आहेत. मी तुम्हाला एक डेड लाईन दतो. कथा लिहा, कविता लिहा, पुस्तक काढा. तुमच्या क्षेत्रातल काहितरी करा. मला काहितरी कॉंक्रीट करून दाखवा. हे सर्व सहा महिन्यात व्हायला पाहिजे."
"सहा महिन्यात !" शैलेश एकदम घाईत ओरडला.
"हो सहा महिन्यात. आयुष्यात काही करायच असेल तर भक्कम योजना आखावी लागते. प्रयत्न करावे लागतात. तरच यश मिळतं. अस काही करा. मी तुम्हाला शर्वरी देतो. काय शर्वरी?" बाबा शर्वरी कडे पाहत म्हणाले.
"थँक्स बाबा." शर्वरी हसत म्हणाली.
बाबांनी शैलेशकडे चेंडू टोलवला होता. आता उत्तर द्यायची पाळी शैलेशची होती. शर्वरी खूप अपेक्षेने शैलेश कडे पाहत होती. शैलेशने तिच्या डोळ्यातील भाव वाचले.
"ठरलं ! घेतल आव्हान." शैलेश उत्साहाने म्हणाला.
"बघा. विचार करुन बोला."
"आता कसला विचार ! इरादा पक्का." अस बोलून शैलेश उठला.
"अरे पोहे तरी खाऊन जा. तुला आवडतात तसे मसाला पोहे बनवलेत." शर्वरी म्हणाली.
"नको. आता कोणीतरी बनूनच येईन तुला मागणी घालायला. चला येतो सासरे बुवा." असं बोलून शैलेशने शर्वरीला डोळा मारला. शर्वरी लाजून घरात पळाली आणि शैलेश हसत हसत घराबाहेर पडला.
------------समाप्त-------

लेखक- शैलेश कांबळी

मंगळवार, २८ मे, २०२४

1177. बांधणी

        'इचलकरंजी ' म्हटलं तर शहर. म्हटलं तर गाव. लोकसंख्या मध्यम, पण एक प्रमुख उलाढालींची बाजारपेठ. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या या शहराला सूत आणि कापड उद्योगाची शतक- भराची स्वर्णिम परंपरा आहे .एके काळी  गल्लो गल्ली असणारे सूत उद्योग आणि घरो घरी ' कीटिर किट' आवाज करणारे हातमाग यामुळे प्रत्येकाला काम मिळायचं, बाजारात भरभराट होती आणि हजारो कुटुंब सुखाने नांदत होती .परंतु औद्योगिक क्रांती आणि आधुनिकीकरणाच्या झपाट्यात सूत गिरण्यातील कामगारांची जागा आधुनिक अश्या यंत्रांनी घेतली आणि हातमागा चे काम पॉवर लूम्स नी लाटले. पैश्या चा प्रवाह मोठ्या उद्योगांकडे वाहू लागला आणि अनेक कुटुंबांचा रोजगार नाहीसा झाला . इचलकरंजी हे सीमा भागातील शहर. त्यामुळे या भरभराटी मध्ये ज्यांचा हातभार होता अशी अनेक कुटुंब शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र या राज्यातून इथे येऊन वसली होती .पण हातचे काम जाताच उदरनिर्वाहासाठी सर्वांनी आपापल्या मूळ गावाचा रस्ता धरला.  अश्याच कुटुंबां पैकी एक कुटुंब ' सिद्राम ' चे होते .बायको ' सुनीता ' हिच्या सह इचलकरंजी ला आपली कर्म भूमी मानून कष्ट करून तो इथे जगत होता. पण तो जिथे काम करायचा तो ' मंगलदास सूत उद्योग ' बंद पडल्यावर इतर कुटुंबां प्रमाणे स्वगृही परतण्याचे त्याचे  दोर  मात्र केव्हाच कापले गेले होते. गावाकडील त्याच्या वाटणी ची जमीन मोठ्या भावांनी हडपली आणि सिद्राम अक्षरशः रस्त्यावर आला. हातचं काम आणि राहतं घर हातून गेलं आणि या ओढाताणीत मुलाला जन्म देऊन त्या प्रसूती वेदनांसोबतच सुनीता ने हे जग सोडलं आणि नवजात ' मल्लेश' ची जबाबदारी सिद्राम वर येऊन पडली.
     ह्या धक्क्यातून सावरत सावरत सिद्राम या ' इचलकरंजीत 'पुन्हा स्वतः चा जम बसवण्या चा प्रयत्न करू लागला. जीवापाड मेहनत करून छोट्या मल्लेश ची काळजी घेऊ लागला, त्याला मोठं करू लागला. ह्या सर्व स्थित्यंतरात सिद्राम तग धरून होता. तरला होता याचं कारण त्याच्या मध्ये असणारी अतिशय सुंदर अशी बांधणी चे काम करण्याची कला आणि एकमेकात  मिसळू  न देता अतिशय पक्क्या आणि आकर्षक रंग संगतीत बांधणीचे वेगवेगळे नक्षीदार नमुने निर्माण करण्याचे कौशल्य !  सूत उद्योग बंद पडल्यावर त्याने स्वतः च घराच्या  अंगणात ही बांधणी ची कला कुसर करण्याचा उद्योग सुरू केला होता. आकर्षक आणि पक्के रंग आणि नाजूक अश्या सुंदर सुंदर नक्षी कामामुळे लवकरच त्याच्या कामाची ख्याती सर्वदूर पसरली, शहरातील अनेक घरगुती आणि छोट्या छोट्या दुकानांच्या कामाच्या ऑर्डर त्याला मिळू लागल्या पण सिद्राम चा मूळ स्वभाव अत्यंत गरीब , सोशिक आणि भिडस्त असल्याने मिळेल तो भाव स्वीकारून तो स्वतः ची कला विकत होता. पारखी आणि चोखंदळ गिऱ्हाईकं , इतरांपेक्षा कमी मोल देऊन त्याचा माल घेऊन जायची पण आहे त्यात समाधान मानणारा सिद्राम मात्र त्यामुळे तश्याच आर्थिक परिस्थितीत जगत होता . अर्थात परिस्थिती कशी ही असली तरी सिद्राम ने मल्लेश  ला काही कमी पडू दिले नव्हते. घराजवळ असलेल्या एका नगरपालिका शाळेत त्याला घातले होते स्वतः दोघांसाठी रोज स्वयंपाक करायचा .वेळेवर डबा बनवून त्याला शाळेत सोडून यायचा ,दुपारी शाळा सुटल्यावर मात्र त्याचा मित्र सीताराम स्वतः च्या मुलासोबत मल्लेश ला घरी घेऊन यायचा. आपण स्वतः अशिक्षित असलो तरी आपल्या मुलाने मात्र शिकून सवरून फाड फाड इंग्लिश बोलणारा साहेब बनावं हेच सिद्राम चे स्वप्न होते. चौथीत शिकणाऱ्या मल्लेश ला  सिद्राम चे म्हणजे त्याच्या ' अप्पाचे ' हे रंगाचे काम बघायला खूप आवडत असे , तासन् तास तो हे पांढऱ्या कापडावर इंद्रधनू प्रमाणे पसरणाऱ्या त्या  निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाची जादू आणि मेणाच्या गाठी मुळे होणारी बांधणीची नक्षी  पहात बसायचा. कधी तरी लहर आली की एखादा कापडाचा तुकडा घेऊन त्यावर ' डाय ' चे रंग घेऊन काहीतरी रंगकाम करीत बसायचा.
     एके दिवशी मल्लेश नेहमी पेक्षा जरा लवकरच घरी आला ,चेहऱ्यावर काही तरी बिनासल्याचे भाव होते .रोज प्रमाणे आल्या आल्या शाळेतील गमती जमती सांगत 'अप्पा' ला खेटून न बसता आज स्वारी तडक आतल्या खोलीत गेली तसं सिद्राम ला जरा नवल वाटलं पण नेमकं त्याच वेळी नेहमीच्या गिऱ्हाईकां पैकी असलेल्या ठाकूर बाई बांधणी च्या ओढणीची ऑर्डर द्यायला आल्या होत्या त्यामुळे त्याला काही बोलता आलं नाही. थोड्या वेळाने सिद्राम हातातलं काम ठेऊन आत गेला आणि तोंड फुगवून खुर्चीत शांत पणे बसलेल्या मल्लेश जवळ गेला आणि काही विचारण्या आधीच 
"आप्पा मी शाळेत जाणार न्हाय" अशी रडक्या आवाजात घोषणा झाली.
" का रे मन्या ? काय झालं ? कोणी रागावलं  का ? " 
त्याचे डोळे पुसत सिद्राम विचारत होता आणि एकी कडे त्याचा गणवेश ही बदलत होता.
" न्हाय" एव्हढंच उत्तर मिळालं त्याला.
" मंग ?? का न्हाय जायचं ?"  सिद्राम चा पुढील प्रश्न.
"आप्पा शाळतील मुलं खूप त्रास देतात, शिव्या देतात. ह्ये बघा.  शर्ट पण खराब केला आज शाई ओतून "
असं म्हणत रडत रडत मल्लेश ने पुराव्या दाखल शर्ट वर पडलेला भला मोठा शाई चा डाग दाखवला.
" अरे...त्यात काय झालं. आण तो शर्ट दोन मिनिटात ब्लिच करून डाग घालवू आपण " हसत हसत सिद्राम म्हणाला.
" तरी पण मी न्हाय जाणार." मल्लेश चा हट्ट कायम होता.
" बरं बरं ...आधी हात पाय धुवून जेवून घे.
बाळा. मग बघू आणि आता उद्या अन् परवा सुट्टीच आहे ना. आता शाळेत जायचंय नाहीय. " वेळ मारून नेत सिद्राम म्हणाला आणि त्याचा शर्ट, दप्तर हे उचलू लागला.
"तसं नाही आप्पा " मल्लेशचा आग्रह सुरूच होता. " मला आता दुसऱ्या शाळेत जायचय.  त्या कॉन्व्हेन्ट शाळेत सेंट पीटर्स मध्ये. गंगावेशी जवळ." 
हे ऐकुन सिद्राम एकदम थबकला. आता हे खूळ ह्याच्या डोक्यात कुठून आलं? गल्लीत रोज पीटर्स शाळेची बस येते आणि त्यातून छान छान कोट टाय घातलेली एकदम टापटीप  मुलं जाताना दिसतात त्याचं मल्लेश ला आकर्षण होतं हे त्याला ठाऊक होतं. पण एव्हढा हट्ट त्याला अपेक्षित नव्हता. मल्लेश मात्र ऐकायला तयार नव्हता. तो आता हट्टालाच पेटला होता. त्या हट्टा पायी त्याने चक्क स्वतःच्या 'अप्पा' शी अबोला धरला .सकाळी आणि रात्री झोपताना त्याच्या साठी भरलेला दुधाचा ग्लास तसाच राहू लागला. तो एकटा एकटा बसून राहू लागला. जेवायला ही तयार होईना. सिद्राम ची मात्र पंचायत झाली. पोराची समजूत कशी काढावी हे त्याला समजेना. अखेर सिद्राम ने त्याला पुढील वर्षासाठी म्हणजे जून पासून सेंट पीटर्स शाळेत घालायचं वचन दिलं आणि मग कुठं मल्लेश ची गाडी रुळावर आली. सिद्रामच्या गळ्यात पडून त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आणि मग सोमवारी शाळेत जायला तयार झाला. 
     पोराला वचन तर दिलं पण आता हे निभवायाचं कसं? हा मोठा प्रश्न होता. कारण सेंट पीटर्स ही शहरातील एकमेव अशी प्रतिष्ठित मोठी इंग्रजी शाळा होती. श्रीमंत आणि मोठ्या घरातली मुलं तिथे जायची. कारण तिथली फी , डोनेशन हे सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरच होतं पण मल्लेशच्या चेहऱ्यावरील आनंदा पुढे ही समस्या त्याला दुय्यम वाटू लागली. पण जेव्हा उन्हाळी सुट्ट्या संपल्या आणि पाचवी च्या वर्षासाठी प्रवेश घ्यायची वेळ आली तसं सिद्राम च्या पोटात गोळा उठला. तो स्वतः अशिक्षित असल्याने आता एव्हढ्या मोठ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी काय सव्यापसव्य करावी लागतात हे त्याला कुठलं ठाऊक? बरं स्वभाव ही पडला भिडस्त आणि शांत त्यामुळे याबाबत कोणाशी बोलावं, काय करावं हे समजत नव्हतं. अखेर काही न सुचून त्याने याबाबत  खास मित्र  सीताराम शी सल्ला मसलत केली. अर्थात तो ही काही त्यातला मोठा तज्ञ नव्हता पण चर्चेतून मार्ग निघतात या न्यायाने त्याने एक उपाय सुचवला.
"अरे तुझ्याकडं त्या पाटील मॅडम येतात नव्हं जवाहरनगर मधल्या. नाही का लाल रंगाच्या मोटारीतून." सीताराम ने आठवण करून दिली.
" कोण ...? हां‌ हां ..त्या होय ? साडी ची ऑर्डर वाल्या ..." पाटील मॅडम कोण हे लक्षात येऊन सिद्राम म्हणाला.
" होय...त्या मॅडम त्याच पीटर्स शाळेत आहेत .त्यांनला बोलून बग काय मदत होतीय काय ! " सीताराम ने माहिती अधिक सल्ला देऊन टाकलं. हा आशेचा किरण दिसताच सिद्राम ने प्रयत्न करायचं ठरवलं. कारण पाटील मॅडम त्याच्याकडून नियमित काम करून न्यायच्या. घरगुती कार्यक्रम असो वा भेट देण्यासाठी असो, बांधणी सिद्राम चीच असायची. दोन तीन दिवसांनी त्याला संधी मिळाली आणि चाचपडत घाबरत त्याने त्यांच्याकडे प्रवेशा साठी शब्द टाकला .
" हे बघ सिद्राम, मी सेंट पीटर्स मध्ये आहे हे बरोबर पण मी केवळ एक शिक्षिका आहे. स्कूल अॅडमिशन वगैरे सगळं मॅनेजमेंट ठरवतात. सो...." पाटील मॅडम नी उत्तर दिलं 
"बघा ना मॅडम काही तरी प्रयत्न करून. काही काम होतंय का ! पोरानं लै मनावर घेतलाय हो !! " सिद्राम विनवण्या करू लागला.
"बघू या ! मी प्रयत्न करून बघते आणि सांगते दोन चार दिवसांत ही साडी न्यायला आल्यावर." असं मोघम आश्वासन देऊन पाटील मॅडम गेल्या. बहुदा सिद्राम च दैव बलवत्तर असावं .कारण पाटील मॅडम नी त्याला सांगितलं की" हे पहा पाचवीच्या वर्गासाठी तसं तर सर्व अॅडमिशन फुल आहेत पण एका रद्द झालेल्या जागेवर तुझ्या मुलाला प्रवेश मिळू शकेल. अर्थात त्यासाठी फी आणि डोनेशन मात्र भरावं लागेल. आहे का तयारी ?? " 
डोनेशन चा उल्लेख होताच सिद्रामच्या आनंदाचा फुगा फाडकन फुटला. फी भरणं हे थोडीफार ओढाताण आणि काटकसर करून शक्य होतं पण हे डोनेशन च काय तरी नवीनच उपटलं होतं जे भरण शक्य नव्हतं . पण पाटील मॅडमला काही तरी निर्णय कळवणं आवश्यक होतं. नाही तर ते अॅडमिशन दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाणार होतं. खूप विचार करून अखेर त्याने पाटील मॅडम ला अॅडमिशन साठी हो म्हणून सांगितलं पण डोनेशनसाठी मात्र काही सवलत किंवा ते भरण्यासाठी वाढीव मुदत मिळवण्याची विनंती केली. आणि सिद्रामचा प्रामाणिकपणा मेहनती आणि चांगला स्वभाव या भांडवलावर पाटील मॅडमनी शाळेच्या व्यवस्थापकांशी बोलून डोनेशन एक वर्षानंतर भरण्याची मुभा मिळवली आणि अखेर मल्लेश च्या इच्छेनुसार त्याला सेंट पीटर्स शाळेत प्रवेश मिळाला. हे समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि डोळ्यात आलेली चमक आणि खुश होत त्याच्या "अप्पा " ला त्याने मारलेली मिठी हे सर्व सिद्राम साठी अनमोल होतं. सिद्राम आता मोठ्या शाळेत जाऊ लागला. स्वारी भलतीच खुश होती. नवीन युनिफॉर्म, नवे नवे आणि मोठ्या घरातले मित्र, ती बस आणि शाळेचं भलं मोठं प्रांगण, ती शिस्त, अँग्लो इंडियन शिक्षक ह्या सर्वांनी तो भारावून गेला होता. सगळं कसं छान सुरू होतं आणि सीतारामने " पुढील वर्षी तरी तू डोनेशन कुठून भरणार सिद्राम?" हा प्रश्न विचारून सिद्राम ला भानावर आणलं.
" बघू ...करू काही तरी कुठं कर्ज मिळतय का बघू ..नाही तर...." सिद्राम बोलताना जरा थबकला 
" नाही तर काय ?" तोच धागा पकडून सीताराम ने विचारले
" काय नाय..ह्यो हातमाग विकून टाकू. नाही तरी पडूनच हाय की" जड पणाने त्या हातमागावर हात ठेवत तो उद्गारला.
" अरं खुळा हायस की काय ? हित इचलकरंजीत संसाराला सुरुवात केलीस. तेव्हा "मंगलदास कंपनी" बंद पडताना तुझ्या मेहनती वर अन् कले वर खूश होऊन स्वतः मंगलदास शेठ नी एव्हढ्या सगळ्या कामगारांमध्ये फक्त तुला ह्यो माग भेट दिला व्हता. की कधी काळी तुला यातून रोजगार मिळेल... अन् तू
तेच विकायला निघालास? "  सीताराम पोट तिडकीने बोलत होता 
" अरं मंग काय करू ? कुठून आणू चाळीस हजार? डोनेशन तर भरायला नको ? " सिद्राम ची उद्विग्नता.
" बघू काही तरी मार्ग निघल. चल झोप आता जाऊन." असं सीताराम म्हणाला आणि सिद्राम च्या घराबाहेरील ओट्यावरची बैठक संपवली. मल्लेश आता नव्या शाळेत रुळला होता. पण पूर्वी सारखं तो रोज शाळेतून आल्यावर आप्पाला बिलगून बसून शाळेतील गमती जमती  सांगत नव्हता. त्याचा त्याचा एकटं बसून काही बाही लिहीत बसायचा. पण मोठी शाळा म्हटल्यावर अभ्यास पण जास्त असावा ही सिद्राम ची समजूत होती. 
"अप्पा. तुम्ही पण बाकीच्या मुलांच्या अप्पा सारखं पँट शर्ट आणि बूट का नाही घालत ओ?"  इतक्या वर्षांत मल्लेशने पहिल्यांदाच विचारलेल्या या प्रश्नांनी सिद्राम ला आश्चर्य वाटले.
" का रे मन्या... काय झालं ? काय वाईट हाय माझ्या लुंगी आणि सदर्‍यात?" सिद्राम ने हसत हसत उत्तर दिलं
" न्हाय.. तसं न्हाय पण शाळेत मीटिंग ला सगळ्या मुलांचे अप्पा मस्त पँट शर्ट आणि बूट घालून येतात टीचर संग इंग्लिश बोलतात पण तुम्ही ..." मल्लेश थोडा खिन्न झाला होता.
" अरे...शाळेत मीटिंग झाली? कधी? तू बोलला का न्हाई? " सिद्रामने चकित होत विचारलं. पण खाली मान घालून बसलेल्या मल्लेश कडून उत्तर नाही आलं.
" बरं मी येईन आता शाळेत हं. तुझ्या टीचरला भेटायला." सिद्राम समजावणी च्या सुरात म्हणाला तसं एकदम चमकून मल्लेशनी उत्तर दिलं " नको नको. तुम्ही नाही यायचं शाळेत. मी सगळ्या मित्रांना सांगितलंय की तुमची पॉवर लूम हाय मोठी आणि  बिझनेस हाय कापडाचा. तुम्ही नका येऊ मला सगळी मुलं हसतील." रडवेला होत मल्लेश म्हणाला आणि त्याला जवळ घेत पाठीवर हात फिरवून  समजूत घालताना सिद्राम मात्र मनातून रडवेला झाला होता.
" बरं बरं...न्हाई येणार बरं पोरा. जा झोप आता उशीर झाला. सकाळी लवकर उठायचं हाय न्हवं?" त्याला समजावत त्याने झोपवलं. पुढे दोन तीन दिवसांनी पाटील मॅडम आणि स्कूल च्या एक दोन सहकारी टीचर संध्याकाळी सिद्राम च्या घरी आल्या. त्या सगळ्यांना पाहताच एखाद्या उंदराने बिळात शिरावं तसं अंगणात खेळणारा मल्लेश घरात पळाला. मग पाटील मॅडम आणि त्या टीचर्स अंगणात सिद्राम सोबत काही तरी चर्चा करताना त्याला दिसल्या तसा तो विचारात पडला. पण दुसरे दिवशी मात्र शाळेत मधल्या सुट्टीत मित्रांसोबत ग्राउंड वर खेळताना मल्लेशला शाळेच्या गेट मधून एका हाताने लुंगी सावरत, वर नवीन शर्ट घालून आणि पायात नव्या कोल्हापुरी वहाणा घालून सिद्राम येताना दिसला आणि त्याला मोठा धक्का बसला. आता काय झालं असावं, काल पाटील मॅडम घरी आल्या होत्या. त्यांनी काही सांगितलं असेल का? या विचाराने तो कावरा बावरा झाला आणि सिद्राम ने पाहू नये म्हणून एका झाडामागे लपून तो पाहू लागला. सिद्राम ची नजर मात्र त्याच्या ' मन्या ' ला शोधत होती. त्याला मल्लेश ला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता पण एव्हढ्या सगळ्या एकसारख्या युनिफॉर्म वाल्या मुलांमधून मल्लेश ला शोधणं जरा अवघड होतं.  गेट वरचा वॉचमन जेव्हां सिद्राम ला घेऊन तडक प्रिन्सिपॉल च्या ऑफिस मध्ये घेऊन गेला तसं मात्र मल्लेश च्या पोटात गोळा उठला. दुपारी शाळा सुटल्यावर मल्लेश घरी आला आणि सिद्राम च्या चेहऱ्याकडे पाहून आज काय झालं असावं याचा अंदाज घेऊ लागला. पण सिद्राम एका मोठ्या कॉटन ताग्यासाठी रंग तयार करण्यात गुंतला होता. पण मल्लेश ला पाहताच सिद्राम ची काळी खुलली आणि हातातलं काम टाकून तो त्याच्या कडे धावला " मन्या अरे आज मी शाळेत आलो होतो तुझ्या. पण तू कुठं दिसला न्हाय कसा? " मल्लेश च्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळत सिद्राम म्हणाला पण आश्चर्य आणि आनंद या पेक्षा सावध पवित्रा घेत मल्लेशने विचारले "कशाला आला होता? 
"अरे मस्त गंमत आहे  सांगतो थांब. काल पाटील मॅडम आल्या होत्या. त्यांच्या सोबत तुमच्या कोणी तर अजून एक मोठ्या मॅडम पण होत्या. तुमच्या शाळेत आता पंधरा ऑगस्टला मोठा कार्यक्रम आहे. भरपूर पाहुणे येणार आहेत. आणि त्या कार्यक्रमात सगळ्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी केशरी, हिरवे आणि पांढरे असे तिरंगी बांधणीचे फेटे मी बनवून देऊ शकेन का विचारत होते." अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सिद्राम मल्लेशला सांगत होता.पण मल्लेश च्या चेहऱ्यावर वेगळीच चिंता  प्रकट झाली होती.
" मग ? तुम्ही काय सांगितलं अप्पा ?"त्याने विचारलं 
" अरे हे काम लै मोठं हाय. जर सगळं नीट झालं तर आपल्याला तुझं डोनेशन भराया लागणार न्हाय. पण तयारी आणि मेहनत पण तेव्हढीच करावी लागणार. म्हणून मग उद्या सांगतो असं त्यांना सांगून आलोय. एकदा सीताराम काकाशी पण मला बोलावं लागंल."   सिद्राम ने उत्तर दिलं
मल्लेश जरा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला " अप्पा तुम्ही हे काम घेऊ नका " 
" का रं बाळा ? काय झालं ?" धक्का बसून सिद्रामने विचारले 
"अप्पा आमची शाळा खूप कडक आहे. त्यांना जरा पण काम इकडचं तिकडं झालेलं खपत न्हाय आणि एव्हढ मोठं काम जर तुम्हाला न्हाय जमलं वेळेवर करून द्यायला तर फजिती होईल आपली." मल्लेश विचार करून बोलू लागला.
" काम मोठ आहे ह्यें बरोबर आहे.  खूप कमी वेळात जास्त मेहनत करावी लागणार हे पण बरोबर आहे. लेकरा... पण काम केलं तर खूप पैसा मिळल बघ."  आशावादी सुरात सिद्राम म्हणाला. त्यावर मात्र मल्लेश थोडासा चिडून तिथून उठला आणि आत जाऊन झोपला. जेवायला पण आला नाही, भूक नाही म्हणून कारण पुढे करीत तसाच पडून राहिला. त्यानंतर मात्र तो थोडासा नाराज, अबोल राहू लागला. आपल्या अप्पा चा मोठा सूत उद्योग नसून तो फक्त बांधणी रंगवणारा कलाकार आहे हे सर्वांना समजणार  होतं. इकडे सिद्राम ची पण द्विधा मनःस्थिती झाली होती. काम स्वीकारावं तर मुलगा नाराज होत होता आणि न स्वीकारावं तर एव्हढी मोठी रक्कम हातची जाणार होती .अखेर पुन्हा एकदा सीताराम ला बोलावून त्यानं ही समस्या त्याच्या समोर मांडली.
"अरं पोराचं काय ऐकु नको. त्याला काय अक्कल हाय !  अशी कामं रोज रोज येत न्हाईत. बिनधास्त हो म्हणून सांग आणि थोडे पैसे आगाऊ म्हणून घे आणि काम सुरू कर. मी हाय तुझ्या मदतीला, निभावू आपण." सीताराम कडून मिळालेला हा आधार सिद्राम साठी खूप दिलासा दायक आणि हुरूप वाढवणारा होता. त्याने त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाऊन काम स्वीकारायला होकार दिला आणि बाराशे मुलं आणि टीचर यांच्या साठी फेटे बनवण्याच काम स्वीकारलं. काम मात्र वेळेच्या आधी आणि चांगलं करावं लागेल ही ताकीद देखील त्याला शाळेने दिली होती. अर्धा मोबदला त्याला आगाऊ मिळाला होता त्यामुळे त्याने कापड, रंग आदी सामान जातीने विकत घेऊन काम सुरू केलं, रात्र दिवस राबून त्याने या स्वतः ला या कामाला जुंपून घेतलं होतं. दिवस कमी आणि कामाचा डोंगर मोठा होता. त्यामुळे त्याची ओढाताण होऊ लागली. त्यात मुलाची नाराजी वेगळीच. अर्थात सीताराम ची मदत होत होती पण शेवटी रंगाचं आणि गाठी बांधण्याचं अवघड काम त्यालाच करावं लागणार होतं. आता मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आठ दिवस जेमतेम उरले होते आणि निसर्गाने आपला रंग दाखवला. संपूर्ण कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगफुटी झाली आणि जणू आभाळच फाटलं. दोन दिवस अश्या धारा बरसल्या की जणू संपूर्ण शहर पाण्यातच बुडालं. सिद्राम ने आत्ता पर्यंत केलेल्या बांधणीचे रंग त्या पावसाने धुवून टाकले. वाळवणासाठी टाकलेले कापड पुन्हा एव्हढे भिजले की त्यावर नक्षीकाम होणे शक्य नव्हते. आता उरलेल्या दिवसात हे कापड  वाळून पुन्हा रंगकाम करणे हे जवळ जवळ अशक्य काम होतं. शाळेकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत करणं आवाक्याबाहेरच होतं आणि त्याहून ही अवघड होतं ते शाळेला स्वतः च्या मुलाला आणि बाहेर समाजात तोंड दाखवणं. पूर्ण पणें हतबल झाला होता सिद्राम आता.
     अखेर दोन दिवसांनी पावसाने  उघडीप दिली आणि उगवतीच्या सूर्य किरणात त्याला ही आशेचा किरण दिसला. आणि एक नवीन सुरुवात करत त्याने पुन्हा कापडाचे तागे वाळवणं. मेणाच्या गाठी बांधणं‌ आणि रंग काम सुरू केलं. रंग काम झालेले तागे वाळवणासाठी सीताराम च्या घरी ठेवण्यात आलें आणि अखेर हे  कामाचं शिव धनुष्य सिद्रामने यशस्वी पणाने पेललं आणि चौदा तारखेलाच म्हणजे मुख्य कार्यक्रमाच्या रंगीत तालमीला सर्व फेटे शाळेत पोहचवले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. पंधरा ऑगस्ट निमित्त झेंडा वंदन, परेड आणि इतर देश भक्तिपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. अनेक नामांकित आणि मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिद्रामला देखील या खास कार्यक्रमाचे आमंत्रण होते. त्याची जायची खूप इच्छा होती पण इतके दिवस अंगतोड मेहनत केल्यामुळे तब्येतीने ऐन वेळी साथ सोडली आणि सिद्राम तापाने फणफणला. अंग दुखू लागले आणि त्याला बिछान्यावर वर झोपून आराम करणं‌  भाग पडलं. औषधां मुळे त्याला ग्लानी आली होती आणि दुपार कधी उलटुन गेली ते त्याला समजले ही नाही. चार वाजण्याच्या सुमारास  खोलीचे दार उघडले आणि मल्लेश आत आला. डोक्यावर त्याच्या अप्पानेच रंगवलेला केशरी बांधणीचा फेटा शोभत होता. सोबत सीताराम आणि पाटील मॅडम ही  होत्या. त्यांना पाहून सिद्राम उठून बसायचा प्रयत्न करू लागला आणि तेव्हढ्यात मल्लेश पळत आला आणि सिद्राम च्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागला. सिद्राम ला काही समजेना. रडणाऱ्या पोराची समजूत काढावी की घरात आलेल्या पाटील मॅडम ची विचारपूस करावी या विचारात तो पडला. पाटील मॅडम नीच मग मल्लेश च्या पाठीवरून हात फिरवत बोलायला सुरुवात केली.
" मल्लेशचे अप्पा.आज तुम्ही कार्यक्रमाला यायला हवं होतं आणि तुमच्या कामाची जादू बघायला हवी होती. तुमच्या बांधणीच्या पक्क्या रंगाच्या फेट्यांचा तिरंगा मैदानात खूप खुलून दिसत होता. आमचे स्कूल मिशन चे ट्रस्टी , प्रिन्सिपल सर आणि सर्व प्रमुख पाहुणे खूप खुश होते. तुमचं काम खूप आवडलं त्यांना आणि त्यामुळे माझं ही थोडंसं कौतुक झालं." शेवटचं वाक्य हसत हसत त्यांनी पूर्ण केलं. सिद्राम साठी हे सगळं अनपेक्षित होतं. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं त्याला. मुळातच मितभाषी असलेला सिद्राम जणू मुका झाला होता. हात जोडून त्याने केवळ कृतज्ञता व्यक्त केली.
"आणि...तुमचं बाकीचं पेमेंट सोमवारी शाळेत मिळेल तुम्हाला आणि हो आमच्या स्कूल च्या मिशन अंतर्गत असलेल्या कोल्हापूर आणि पन्हाळ्याच्या शाळांनी आता त्यांच्या साठी सव्वीस जानेवारी च्या कार्यक्रमाची ऑर्डर तुम्हालाच द्यायला सांगितली आहे. तुम्हाला तयारी करावी लागेल हं "  एव्हढ बोलून पाटील मॅडम नी निरोप घेतला. तोपर्यंत रडून रडून दमलेला मल्लेश आता बोलू लागला 
"अप्पा मला माफ कर. माझं चुकलं. तुझ्या कपड्याची, कामाची मला लाज वाटायची म्हणून मी तुला कधी शाळेत घेऊन गेलो नाही. मला वाटायचं सगळे हसतील मला." 
"अरे त्यात काय एवढं. त्यासाठी कशाला उगीच रडायचं मन्या? काही होत नाही. बघ फेटा कसा मस्त दिसतोय तुला." त्याचे डोळे पुसत पुसत सिद्राम म्हणाला
"अप्पा माझ्या सगळ्या मित्रांना तुला भेटायचं आहे. आपलं हे बांधणीच काम कसं करतात ते बघायचं आहे ! " मल्लेशचा मूड आता जरा रुळावर आला होता.
सोमवारी ही बाप - लेकाची जोडी मोठ्या अभिमानाने शाळेत गेली होती .आणि सर्व मित्र मंडळीं कडून कौतुक आणि अभिनंदन स्वीकारत मल्लेश त्याच्या ' अप्पा ' चा हात धरून त्याला ऑफिसकडे घेऊन चालला होता 
आज दोघांच्या नात्याच्या " बांधणीचा " रंग आणि बंध अजूनच पक्के झाले होते.

सागर जोशी , पुणे

1176. तो एक बाप असतो

 हा लेख मी अॅड. विनोद दरेकर म्हणून नाहीतर स्वानुभवातून एक बाप म्हणून लिहिला आहे. जगातील सर्व बाबांना समर्पित 👏👏👏

तर बाप ह्या वेड्या माणसाची सत्यकथा सुरू होते. 
जेंव्हा त्याच्या होणाऱ्या बाळाची आई 
दवाखान्यातल्या बेडवर कळा घेत असते आणि
अस्वस्थ होऊन जो दवाखान्याबाहेर चकरा मारत असतो 
तो एक बाप असतो. 

बाळाच्या रडण्याचा आवाज येतो 
तेंव्हा डोळ्यात आश्रू येऊन  
जो हात जोडून देवाचे आभार मानतो 
तो एक बाप असतो.

आपल्या बाळाला सुखरूपपणे 
या जगात आणलं म्हणून
 केवळ डॉक्टरच नाहीतर तिथे 
उपस्थित नर्सचे सुदधा पाय धरतो 
तो एक बाप असतो.

खुशीत पागल होऊन जो 
सगळ्या लोकांच्या तोंडात 
पेढा बर्फी घालतो 
तो एक बाप असतो.

मुलगा आणि मुलगी सारखीच नव्हे 
तर मुलीवर कांकणभर 
जास्तच जीव असणारा 
तो एक बाप असतो.

बाळ घरी आल्यावर 
स्वतःच्या हाताने जो 
त्याच्यासाठी अंथरुण तयार करतो 
तो एक बाप असतो.

रोज कामावरून येताना 
आपल्या बाळासाठी खाऊचा पूडा 
आणि खेळणं घेऊन येतो 
तो एक बाप असतो.

बाळ दचकू नये म्हणून 
बाहेरच आपले बूट काढून 
दबक्या पावलांनी घरात येतो 
तो एक बाप असतो.  

रात्री पाळण्यात बाळ हलून 
पाळणा तिरका होऊन 
बाळ पडू नये म्हणून 
उठून पाळण्यात सारखं बघणारा 
तो एक बाप असतो.
 
शेजारी बाळ झोपलंय 
ते आपल्या अंगाखाली येऊ नये 
म्हणून कित्येक रात्री न झोपलेला 
तो एक बाप असतो.

बाळ झोपेत खालीवर 
तर सरकलं नाही ना 
म्हणून झोपेत शंभर वेळा चाचपडणारा 
तो एक बाप असतो.

बाळाला उभं करताना 
अजून त्याची पायाची हाडं नाजूक आहेत 
त्याला बाक तर येणार नाही ना 
म्हणून उभं न करता परत बाळाला झोपावणारा 
तो एक बाप असतो.

बाळाचा हात घट्ट पकडून 
ते पडू नये याची काळजी घेऊन  
चालायला शिकवणारा 
तो एक बाप असतो.

बाळाला शाळेत पहिल्या दिवशी सोडून 
ते रडतंय म्हणून हिरमुसला होऊन 
शाळासुटेपर्यंत शाळेच्या व्हरांड्यातच अडखळलेला 
तो  एक बाप असतो.

शिक्षक फी साठी मुलांना काही बोलू नयेत 
म्हणून कामावर बॉसच्या शिव्या खाऊन 
अपमानित होऊन सुद्धा ऍडव्हान्स पगार घेणारा 
तो एक बाप असतो.

मुलांना कमी मार्क्स पडले तर 
प्रसंगी काळजावर दगड ठेऊन 
कडक शब्दांत समज देऊन 
त्यांच्या नजरेत हिटलर ठरणारा 
तो एक बाप असतो.

पुढे मुलीचे लग्न जमवताना 
अनेकांचे उंबरे झिजवणारा 
तो एक बाप असतो.
 
पसंती झाल्यावर घेतलेला निर्णय 
नक्की बरोबर आहे ना म्हणून 
रात्ररात्र अंथरुणावर कूस बदलणारा 
तो एक बाप असतो.

नवरदेवाची बारीक चौकशी करण्यासाठी 
जीवाचं रान करणारा 
तो एक बाप असतो.

लग्नमंडपात केविलवाणे 
सगळ्या वऱ्हाडाला वारंवार हात जोडून
नमस्कार करतो 
तो एक बाप असतो.
 
मुलगी सासरी जाताना 
तिची चुकभुल सांभाळून घ्या 
लहान आहे अजून 
मी आधीच तुमची माफी मागतो 
म्हणून तिच्या सासरकडच्यांचे पाय धरणारा 
तो एक बाप असतो.

तिची आई मनसोक्तपणे रडत असते 
पण डोळ्यात आलेले आश्रू धीराने थांबवून 
तिची गाडी गेल्यावर कोणाला दिसू नये म्हणून 
मांडवाच्या कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडणारा 
तो एक बाप असतो.

मुलीच्या सासरी सारखा फोन करणे बरोबर नाही म्हणून, 
लग्नात आधीच जाणूनबुजून तिच्या शेजारच्यांची ओळख काढून, 
त्यांना रोज दहा वेळा फ़ोन करून आमची ताई दिसली का हो? 
ती ठीक होती ना? हसत होती ना? काय दुखत तर नाही ना? 
म्हणून चौकशी करून परत अदबीने तुम्हाला उगीच त्रास दिला असं म्हणून,  
तिच्या घरच्यांना सांगू नका असे विनवणारा
 तो एक बाप असतो.

मुलांना गरुडभरारी घेताना 
त्यांच्या पंखात बळ यावं म्हणून 
स्वतःची कुवत नसताना 
उडी घेऊन परिणामी धडपडणारा, ठेचकळणारा 
तो एक बाप असतो.

मुलांना आकाशाला गवसणी घालता यावी
 म्हणून उर फुटलं तरी 
आयुष्यभर घोड्यासारखा धावणारा 
तो एक बाप असतो.

मुलांनी इप्सित धेय्य गाठलं की 
कृतार्थ होऊन देवाला 
आता मला बोलावलं तरी चालेल म्हणणारा 
तो एक बाप असतो.

आपल्या ऑफिसर मुलांचे कपडे 
कडक इस्त्री करण्यात तासंतास घालवण्यात 
ज्याला खेद ना खंत वाटते 
तो एक बाप असतो.

दुधापेक्षा दुधाच्या सायीवर म्हणजे 
तुमच्या मुलांवर प्रेम करणारा 
तो एक बाप असतो.

तुम्ही तुमच्या मुलांना ओरडला तरी 
तुम्हाला काहीही न बोलता 
नातवंडांना जवळ घेऊन 
आतल्या आत धायमुकुल रडणारा 
तो एक बाप असतो.

मित्रांनो त्या बाप नावाच्या वेड्याला ना गाडी-बंगल्याची अपेक्षा असते ना शान शौकतीची, ना पंचपक्वानाची ना पिझ्झा-बर्गरची. त्याला तुम्ही तुमच्यातली चटणी भाकरी दिली तरी तो आनंदानी खातो. त्याला दिवाळीला एखादा कपडा आणला तरी कुबेराची संपत्ती मिळाल्याचा त्याला भास होतो. असा हा बाप. मातृत्वाची सर कोणालाच येणार नाही पण मित्रांनो बाप नावाचं हे छत्र सतत तुमचं रक्षण, पालन-पोषण करत असतं. काहीही अपेक्षा न करता तुमच्यावर निर्व्याज प्रेम करत असतं. तुमच्या नकळत. काहीही न बोलता तुमची काळजी करत असतं. ते वेळेवर उमगलं तर ठीकच नाहीतर...😢

( ह्या लेखातील प्रत्येक अनुभव या जगातील सर्व बापानं एकदा ना एकदा घेतलाच असेल. त्या सगळ्यांची कहाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. आपल्याला आलेले अनुभव पण नक्की शेअर करा.) 

1175. चमत्कार

     त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची  काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता. त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला.  कौतुकाने व प्रेमाने म्हणाला, 
"काय पाहिजे तुला बेटा?
"मला चमत्कार पाहिजे."
केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले, "बेटा तुला काय पाहिजे?"
ती पुन्हा म्हणाली,  "मला चमत्कार पाहिजे."
केमिस्ट तिला म्हणाला, "बेटा इथे चमत्कार मिळत नाही."
ती पुन्हा म्हणाली, "इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल ! "
केमिस्टने विचारले,  बेटा तुला हे कोणी सांगितले?"
 तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..
"माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत. जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत. त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्टचे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी? तिने आपली  छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते. तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला. बेटा, तु चमत्कार विकत घेतलास. चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल. तो पाहुणा, जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन "डॉ. जॉर्ज अँडरसन" होता. त्या सर्जनने  मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना  डॉ. जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला,
"बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही?  जरुर मिळतो. जरुर मिळतो. ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली. जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो. हाच आस्थेचा चमत्कार आहे. 
जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल आणि तुम्हची ही  इतरांसाठी समर्पण भावना आसेल तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच. आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
 निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...