सोमवार, १३ मे, २०२४

1136. गुंता

     देशपांडे आजी आणि आजोबांना मी  माझ्या clinic मधे बघितले त्याला जवळपास 3/4 वर्ष  होत आली. सेवानिवृत्तीनंतर  मुंबईतला  बंगला विकून  पुण्यात  उर्वरित  आयुष्य  शांतपणे घालवायचे हा या मागचा हेतु ही कधीतरी हसर्‍या  आणि बडबड्या आजींनी  मला सांगितला  होता. एकुलता एक मुलगा "आनंद". हुषार, कर्तबगार खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर  होता. त्याच्या बद्दल  बोलतांना आजींचा आवाज जास्तच मधाळ होई आणि अभिमानाने मान ताठ. आजी साधारण 50/55 वयाच्या. स्वतःची  विशेष  काळजी घेणाऱ्या. उत्तम दर्जाची किमती साडी .नेहमी व्यवस्थित पिनअप केलेली. साडीला मॅचिंग नाजूक  पण देखणी ज्वेलरी. गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र. (मला नेहमी प्रश्न पडे या क्लिनिक  ला येतांना एवढ्या व्यवस्थित येतात तर समारंभाला जातांना यांचा  "थाट " एकदा बघायलाच  हवा.)आजोबा एकदम  शांत. चेहर्‍यावर  एक मिस्कील हास्य. सदैव आजींना सांभाळणारे. मोजकेच  पण व्यवहारी बोलणारे. दोघांच्या तब्येतीच्या विशेषशा तक्रारी नव्हत्या.किरकोळ कारणा साठी महिना दोन  महिन्यातून एखादी चक्कर मारत. तेही clinic संपायच्या वेळेस  त्यामुळे मला ही थोडा जास्त  वेळ त्यांना देता येई. आजींना मुळातच माणसांची आवड. नेहमी मला घरी बोलवायच्या. माझी "मुलगी ग तू "म्हणून पाठीवरून  हात  फिरवायच्या.पहिले मला फार संकोच  वाटे.पटकन  मोकळं  होणं  हा माझा स्वभाव  नाही. पण नंतर  याची ही सवय झाली. आजींना आता आनंदच्या लग्नाचे वेध लागले होते.
      माझ्याशी बोलतांना म्हणत एकुलता एक मुलगा. मला मुलीची फार हौस  पण नशीबात नव्हते.आता घरी येणारी सुन माझी मुलगीच असेल. तिला मी इतके प्रेम देईन की ती "माहेर" विसरेल.यावर शांत स्वरात पण ठामपणे आजोबा सांगत डाॅक्टर  समजवा या वेडाबाईला.फार  मोठी आणि अवघड  स्वप्न  बघू नकोस. स्वप्नरंजन  हे मनाला कमजोर  करते. झालं. एवढे बोलायचा अवकाश आजींचे शब्द लाह्या सारखे तडतडत बाहेर  येत. आजोबा आजींना चिडवत अग पंख फुटलेली पाखरं ती आता वळचणीला का बसणार आहेत. आंधळीमाया करू नकोस. आजी फुसफुसत म्हणत की आभाळ भेदायची शक्ति पण त्या पंखांना आपणच दिली आहे ना? संध्याकाळी ती याच घरट्यात विसाव्या साठी परतणार बघा. लिहून  ठेवा तुम्ही माझे शब्द ! मध्यंतरी बरेच दिवस झाले आजी आजोबांचे  दर्शन  झाले नाही. या दोघां मुळे मी माझा दिवसभराचा ताण विसरत असे. आता मलाही त्यांची सवय झाली होती. मी ही नकळत त्यांची वाट  बघत असे.पण कामाच्या व्यापात  तीही गोष्ट  नजरेआड होत गेली. एक दिवस clinic संपता संपता आजोबा आजी आत आले आजोबा शेंदरी रंगाच्या शेरवानीत होते.गळयात बोटभर जाड साखळी त्यात भलेमोठे  वाघनख. प्रफुल्लित  चेहरा.आजी तर आज विशेष  नटून  आल्या होत्या. केशरी रंगाची जरतरी कांजीवरम. पोवळयांचा नेकलेस,हातात एक जाडजूड कंगन. कानातल्या कुड्यात हिरे आणि पोवळे विशेषच  दिसत होते. मी माझ्या स्टार्च केलेल्या कलकत्ता साडी कडे विझलेल्या नजरेने  बघीतले.आज दोघेही भरभरून  बोलत होते.आनंद ने त्याच्याच ऑफिस  मधे काम करणारी मुलगी पसंत  केली होती. साखरपुडा अगदी घरगुती झाला आता सर्व हौस मौज लग्नासाठी राखून ठेवली होती मुलगी एकुलती एक. वडील  नाही. आईच सर्व  बघणार  म्हणून  आजी म्हणाल्या तुम्ही काही काळजी करू नका सर्व  आम्ही करतो. मुलगी हुषार आहे.माझी मुलीची हौस पूर्ण  होईल  बघा आता. लग्न  आणि स्वागत समारंभाचे आग्रहाचे निमंत्रण  करून  थोड्या घाईतच दोघे ही निघून  गेले. जातांना मला  एक सुरेख  सिल्क ची साडी पण भेट  म्हणून  देऊन गेले. काहीतरी खटकत होते पण काय ते सांगता येत  नव्हते. संध्याकाळी अहों ना दुपारचा प्रसंग  सांगितला आणि स्वागत समारंभाला जायचे नक्की केले .आजच वेळ काढून  एक  डिझायनर साडी आणि त्याला मॅचिंग  ज्वेलरी बाजूला काढून ठेवली. नवरा मोठ्ठे डोळे करून  हसून  म्हणाला आजींचा वाण नाही पण गुण उतरला .मी ही मोकळे हसून  दाद दिली. पण डिझायनर  साडी आणि ज्वेलरी अंगाला लागण्याचा काही योग आला नाही. माझी जीवाभावाची मैत्रिण त्या दिवशी हाॅस्पिटल  मधे admit झाली जीवावर बेतले होते. तिची सोबत सोय करण्यात  दोन तीन  दिवस  निघून  गेले. सर्व  स्थिरस्थावर  झाल्यावर  लक्षात  आले की आजी आजोबांकडचा  स्वागत  समारंभ होऊन गेला .मनाशी ठरवले की एक दिवस  फोन  करून  नवी सुनेशी ओळख  करून  घ्यायला जाऊ या. पण तो दिवस  ही उजाडलाच नाही.
     मध्यंतरी बरेच  महिने लोटले .ना ते दोघे आले ना त्यांचा काही फोन. मनाशी विचार  केला सुनेचे कोडकौतुक  करण्यात  गुंग  आहेत  बहुतेक. मधूनच  आठवण होई पण उठून  घरी जावे ते काही शक्य  झाले नाही. आता तर मी जवळ जवळ देशपांडे आजी आजोबांना विसरत चालले होते. clinic चा पसारा दिवसागणिक  वाढत  होता. कधी तरी एखादा सुंदर साडी किंवा नवीन दागिना डोळ्यासमोर आला की आज्जीं ची हमखास आठवण. आज सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आले होते. पाऊस कधी आणि किती कोसळणार हे त्या काळ्याकुट्ट  ढगांकडे  बघून  ठरवावे तर उरात धडकी भरत होती.वाटत होतं एक मोठ्ठे दाभण एका ढगात  खुपसावे आणि कोसळू द्यावे त्याला मनसोक्त. सर्व पेशंट बघून आता घरी निघायच्या विचारात होते तोच  दारा बाहेर  चढ्या आवाजात आमची नंदा कोणाशी तरी बोलत होती.नंदाचा आवाज  सायलेन्सर लावून  कमी करायची किती गरज आहे हे मला परत एकदा तीव्रतेने जाणवले.मॅडम आता भेटणार नाहीत. तुम्ही वेळ ठरवून  मग या. '.तुम्ही सांगा त्यांना मी आलेय म्हणून.' दुसरा आवाज मी ताबडतोब ओळखला देशपांडे आजी होत्या त्या .मी नंदाला त्यांना आत पाठवायला सांगितले. क्षणभर मी आजींना ओळखलेच नाही.  आज ना सुंदर  साडी होती ना मॅचिंग  दागिने. वजन ही 7/8किलो कमी झाले होते. डोळ्या भोवती डार्क सर्कल,नेहमीचा चेहरा आज एका पेशंट  चा वाटत होता. टेबलाचा आधार घेत त्या खुर्चीत बसल्या. ठसठशीत  मंगळसूत्राविना ओकाबोका गळा, अर्ध्या राहिलेल्या सोबतीची कहाणी सांगत  होता. मी आजींना  पाणी दिले. आता आभाळ आजींच्या डोळ्यातून  कोसळत होते. काही  वेळ तसाच  गेला, आजी भानावर आल्या.
     संसारात शिरलेल्या 'कैकयी' ची कहाणी सांगू लागल्या. आनंदचे लग्न  मस्त  पार पडले काही दिवस  कोडकौतुकात गेले. आता आई तिकडे एकटी कशी राहणार  म्हणून  बंगल्यातली एक खोली तिच्या आवडी नुसार  सजवली आणि आई घरी रहायला आली. आज्जी खुश होत्या या वयात  एक समवयस्क  मैत्रिण मिळाली म्हणून. पण ह्या खुशीला  हळूहळू गालबोट  लागत होते. घरातल्या प्रत्येक  गोष्टीवर ,खाण्या पिण्यावर आईची नजर असे. आज्जी मुळातच हौशी, हातात  पैसाही होता  त्यामुळे काटकसर त्यांना माहीत  नव्हती. हलकेच  घरातल्या  किमती वस्तु जागेवर दिसेनात. घरातल्या मावशी विश्वासाच्या होत्या पण एक दिवस  त्यांच्यावर  चोरीचा आरोप  केला आणि त्या निघून गेल्या. आता परत विस्कटून गेलेली घडी सावरत आणली होती. कामाच्या वेळेस आई घरात "पाहुण्या " बनून  रहात आणि इतर वेळेस  "राणी "बनून. आता दूध,  तूप, फळं फळावळं या वर ही बंधने आली होती. पहिले मुलांना त्रास  नको म्हणून  या विषयावर  बोलायचे टाळले, पण असह्य  झाल्यावर  बोलले तर घरात  अबोला सुरू झाला. आनंद म्हणत होता आम्हाला कामाचे भरपूर  टेंशन  असते या गोष्टींवर  तुम्हीच  तोडगा काढा. आजोबा आता दिवस दिवस  बाहेर  पडत नसत .आजी बाहेर जाऊ म्हणाल्या की आई ला चक्कर  येई हे आणि असे नाना प्रकार." होम अरेस्ट" अनुभवत होतो आम्ही.आणि एक दिवस  बरं नाही म्हणून आजोबा झोपले ते कायमचेच. आता घरात  विषय आहे मालकी हक्काचा. आज्जी सांगत  होत्या विरोध करायची ताकद  नाही आणि मालकी हक्क  सोडला तर कदाचित  वार्‍यावरच रहावे लागले. आज सगळे बाहेर  गेले आहेत  ती वेळ साधून  तुमच्या कडे आले. मला पैशांचे व्यवहार, f.d., इतर ठिकाणी ठेवलेले पैसे माहीत  आहेत. एखाद्या  चांगल्या वृध्दाश्रमाची माहीती द्याल  तर मी तिथे जाईन. परिस्थिती फार  भयाण होती.मी सांगितले दोन  दिवस  वेळ द्या मी काहीतरी मार्ग  काढते. यावर आज्जी म्हणाल्या घर नावावर  केले नाही तर "कौटुंबिक  छळ करतात"  अशी तक्रार  करणार  आहेत  पोलीस  ठाण्यात. काही तरी मार्ग  असेल ना? आज बरोबर  दोन  महिने झाले. आजी नेहमी प्रमाणे व्यवस्थित  तयार होऊन  त्यांच्या 4 मैत्रिणींबरोबर मला भेटायला आल्या होत्या. त्यांची तब्येत ठीक ठेवण्याची जबाबदारी एक डाॅक्टर  म्हणून  मी घेतलीच आहे. पण एक मानलेली मुलगी म्हणून  ही मी माझे कर्तव्य  पार पाडले आहे. मध्यंतरी एक दिवस घराची कागदपत्रे घेऊन आम्ही पोलीस  स्टेशन वर गेलो. सिनीयर सिटीझन्सला सोसावा लागणारा मानसिक त्रास  आणि वेदना याची योग्य  ती दखल  तिथे घेतली गेली .आज्जींचा हक्क  त्यांना  फारसा त्रास न होता मिळाला. आजोबांनी केलेले मृत्युपत्र  कामास आले. आभाळ भरारी घेणारे पाखरू आता विसाव्या साठी  नवीन  वळचणीला गेले. आजी त्यांच्या चार मैत्रिणींबरोबर  घरात राहतात. आनंदात असे नाही म्हणणार पण आता नव्याने जगायला शिकत आहेत  एवढे मात्र  खरे.

शोभा गोडबोले जोशी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...