आई उठवायची वाट बघत लोळत पडलो होतो पण आई उठवायला येईना. दादा फिरून परत यायच्या आत किमान माझा पहिला चहा तरी होणं आव्यष्यक होतं. चहाच्या काळजीने उठलो, पाहिलं तर हाँलमधे आई सून्न होऊन बसलेली. काय झालं विचारावच लागलं नाही मला समोर बघितल्यावरच आई उन्मळून म्हणाली,
"सरदेसाई गेले..."
" काsssय.." मी भितीयुक्तं स्वरात चिरकलोच.. काल रात्री उशीरा पर्यंत
आम्च्याकडे गप्पा झोडून गेलेले सरदेसाई काका गेले? तुला कोणी सांगितलं? मी कापर्या आवाजात विचारलं.
"तुझ्या मनूचा फोन होता अत्ता."
"मनूचा? मी विचारात पडत म्हणालो. बरोबर त्याला कळणारच त्याच्या समोरच तर ते राहयचे. सरदेसाई काका आमच्या वडिलांचे जिवलग मित्र. आमचे दादा एक नंबरचे तिरसट जरा बिनसलं की चल चालता हो म्हणायचे काकाना मग काका सुद्धा तिरमिरत पायात चपला सरक्वून पुढच्या दारातून बाहेर पडायचे आणि आईने समजूतीची हाक मारली "भावजीssss..."की निमूट मागच्या दाराने आत येयचे वहीनी माझं काही चुकलं का? असं आर्तं स्वरात विचारायचे. नेहमीचा वर्षोंवर्ष वारंवार घडणारा प्रकार. पण काल तर दादा त्याना चल चालता हो सुद्धा म्हणाले नव्हते. मग कसे गेले आणि गेले तर गेले आमच्या घराचं मागचं दार विसरले की काय? कोणी गेल्याचं अचानक कळलं की दू:खाची जाणीव जरा नंतर होते आधी तो आता आपल्यात नाही या वास्तवाशी आपल्यालाच सामना करावा लागतो. आमचं अत्ता तसच झालं मन्याला फोन लावत होतो तर तो फोन उचलेना. निघायची घाई करावी तर आई जागची हलेना. दादाना कळवावं तर दादाना कसं आणि काय सांगायचं हा प्रश्न? पन्नास वर्षांची सोबत.. दादा इंगळीहून मुंबईला आले आणि लागोपाठ पाठ धरून आल्यासारखे सरदेसाई काका पण आले तेंव्हापण दादा वैतागून म्हणाले होते म्हणे चल चालता हो इथे धड माझ्या पोटाला नाही खायला तुला काय घालू? पण तेंव्हाही आईने सीतामाईच्या थाटात या दीराला धीर दिला आणि सरदेसाई काका पक्के मुंबईकर झाले. काका कधी कधी हिम्मत करून म्हणायचे हे वहिनीचं सुद्धा घर आहे ती जा म्हणाली तर जाईन. दादाना हसायला यायचं तू लाडाऊन ठेवलयस याला असं ते म्हणायचे. सहाफुट दोन ईंच ऊंची असलेले काका रंगानं सावळे पण दिसायला रमेश देव सारखे . पण अशिक्षीत दादानी शिकवायचा प्रयत्न केला पण.पालथ्या घड्यावर पाणी..दादा भिडे वाडीत स्थाईक झाले आणि काकाना त्यानी रामवाडीत खोली घेऊन ठेवायला लावली. खोली काय करायची आहे? मी सारखा इथेच तर असतो काका म्हणाले होते. दादानी त्याना नोकरी लावली तशी खोलीही घ्यायला लावली पण काकांच बाशींगच जड होतं लग्न काही जमता जमेना. रामवाडीच्या मालकाची मुलगी होती ’सुगंधा” नाकी डोळी लोभस पण अंगाने गलेलठ्ठं. मालकानी काकांसमोर तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्या बदल्यात घरभाडं रद्दं होणार होतं. इतकच नाही तर रामवाडी मालकीची होणार होती. कारण सुगंधा एकुलती एक होती. लग्नाच्या नावाखाली सौदा करायचा?काकाना हे पटेना. पण आई दादानीच समजावलं सौदा बाजुला ठेव सुगंधाचा मुलगी म्हणून विचार कर. मुलगी म्हणून काय वाईट आहे? घरकामात हुशार आहे स्वभावाने सालस आहे. काकानी काय विचार केला कोण जाणे पण लग्नाला तयार झाले पण अवघडलेपण जाईना. दोघानाही असच वाटायला लागलं आपण दोघानी एकमेकाना पत्करलय. पत्करणं आणि पसंत करणं यात खूप फरक आहे. काकाना वाटायचं हिला कोणी नवरा मिळत नव्हता म्हणून हिने माझ्यासारख्या खेडूताला स्विकारलं आण काकूला वाटायचं घराची फुकट सोय झाली रामवाडी मालकीची होईल म्हणून हे लग्नाला हो म्हणाले. शेवटी आईनेच पुढाकार घेऊन समजावलं" भावजी शंभरातली नव्वद लग्नं एकजण दुसर्याला पत्करतो म्हणूनच होतात तुमचं जगावेगळं काही झालेलं नाही. तुमच्या मित्रानी मला पत्करली कारण त्याना धट्टीकट्टी आल्या परिस्तिथीशी सामना करणारी बायको हवी होती आणि मला काही करून मुंबईत स्थाईक व्हायचं होतं यांचा इरादाही तोच दिसला म्हणून आम्ही एक्मेकाला पत्करलं. दादा बघतच राहीले" छाया काय बोलतेस काय असच त्याना म्हणायचं होतं.
आई म्हणाली माणूस आवडायला लागणं जिव्हाळा वाटणं अधिकार निर्माण होणं हे सहवासाने घडतं. त्याला काही काळ जावा लागतो पण त्यासाठी माणूस समजून घेण्याचे प्रयत्न करावे लागतात. अगदी मोकळेपणाने वागावं लागतं. वावरावं लागतं आणि अचानक निरगाठ सुटल्यासारखं झालं आईने मग काकूलाही समजावलं जरा मनावर घे. सडपातळ व्हायचा प्रयत्न कर एकमेकाला समजून घ्या आणि खरच हळू हळू गाडी रुळावर आली. दोघांचा सूखाचां संसार झाला दोन मुलींनंतर तिसरा मुलगा काकानी दत्तक घेतला कौस्तुभ नाव ठेवलं. तो ही छान शिकला सवरला. मुली आपाअपल्या घरी सुखानं नांदतायत नुकतेच दोघेजण सिंगापूर पटायाची टूर करून आले. काल आमच्या कडे रात्री उशिरा पर्यंत. हसत खेळत गप्पा झोडून गेले काही सुचेनासं होऊन गेलं.
तेव्हढ्यात मन्याचा फोन आला" अजून निघाला नाहीस?
मी म्हणालो हो निघतो पण आई जवळ कोण, दादा पण.आले नाहीत अजून.. मन्या वैतागलाच
आई दादा कशाला हवेत?
मी म्हणालो अरे असा काय? सरदेसाई काका गेलेना? मन्याने बहुतेक डॊक्यावर हात मारला असेल? काय झालं? त्याने घेतलेला पाँझ संपेना म्हणून मीच विचारलं. मन्या म्हणाला जाड्या सगळं विसरलास काय लेका. अरे आपली कोठसकरांची व्यायामशाळा? तिथले देसाई सर? त्याना तू नं चुकता सरदेसाई म्हणायचास.? तुझ्या लक्षात यावं म्हणून मी आईला सरदेसाई गेले म्हणालो. तुझे काका गेले असते तर मी घरीच सांगायला आलो असतो ना? एक एक उलगडा होत जावा तसा माझा चेहरा तणावातून मोकळा होत होता. आई समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. तेव्हढ्यात दादा बाहेरून तणतणतच आले म्हणाले त्या सरदेसायाला मी बजाऊन आलोय पून्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. आम्ही दोघानी एकमेकांकडॆ बघितलं काय झालं? का एव्हढे चिडलाय हा प्रश्न सुद्धा आईनी विचारणं जरूरीचं मानलं नाही. फोन ताब्यात घेत तिने काकाना फोन लावला "भावजी आज जेवायला इथेच या तुमचा आवडीचा सुधारस करते, मसाले भात सुद्धा. सुगंधाला म्हणावं काही करू नकोस. दादा उभ्या उभ्या तणतणत होते पण त्यात दम नव्हता आमच्या घराचं मागचं दार उगाचच जरासं हसल्या सारखं मला वाटलं. गृहप्रवेश जरी पुढल्या दारातून होत असला तरी मागच्या दाराचा मान वेगळाच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा