शनिवार, ४ मे, २०२४

1110. उद्या (आणि रोजच) नाश्त्याला काय ?

 आई - बायको - बहीण इ.इ. सगळ्या ती ला समर्पित

"आई ऐक ना" !
"काय रे? सारखं आई आई" माझ्या प्रश्नाचा रोख तिच्या लक्षात आलेला असायचा.
"उद्या सकाळी काय करणारेस खायला?"
हा प्रश्न मी नेहमी आदल्या दिवशी विचारायचो.  दिवसभराच्या कामाने ती थकलेली असायची, आणि नको वाटणारा आणि तिच्याही डोक्यात घोळत असणारा माझा प्रश्न तिच्यासमोर उभा राहायचा.  ती वैतागून बोलणं संपवायला म्हणायची,
"मी नाही ठरवलंय रे अजून काही...."
पण मी माझं घोडं पुढे दामटायचो,
"सांग ना ग...मी सांगू ?"
आणि तिच्या संमतीची वाट न पहाता सांगायचो,
"उद्या ना साबुदाण्याची खिचडी नाहीतर वडे कर, किंवा बटाटेवडे कर....."
माझ्या फर्माईशीने आईचा पारा चढायचा,
"काय हॉटेल उघडलय का घरात ? डोक्यात आलेलं सुचवतोयस ते? तुला पटापटा सांगायला काय जातंय, जे चटकन बोललास ते करायला किती वेळ लागतो, किती तयारी करावी लागते याची थोडी तरी कल्पना आहे का ?"
"काही मदत करायला येतोस का आईला?"
तिच्या या सगळ्या बोलण्याकडे माझं लक्षच नसायचं.  डोळ्यांसमोर फक्त वडे, खिचडी दिसत असायचे, त्यामुळे फक्त उद्या काय करणार खायला ? याकडे कान लागलेले असायचे. आईचं सुरू असायचं,
"सकाळ झाली की नाश्त्याला काय? ते झालं की जेवणाचं काय? आणि ते जिरेपर्यंत रात्रीच्या जेवणाचं काय? रात्रीचं जेवण झालं की पुन्हा उद्या काय? संपूर्ण दिवस फक्त हाच विचार. किचनमध्येच बसून रहाते आता मी...."
"हे कर ते कर, हे नको आणि ते नको सांगून मोकळं व्हायचं.  रोज रोज काय करायचं नवीन? एक दिवस मला खा वेगळं म्हणून.."
     आई नेहमी फारशी बोलत नसे, पण एकदा संयम संपला, की तिचं तोंड सुरू व्हायचं आणि ते मला उद्देशून असलं, तरी घरातल्या सगळ्यांसाठी असे. अर्थात ते वय(माझं) तिचा वैताग समजून घेण्याचं नव्हतं.  पण माझं लग्न झाल्यानंतर, पुढे मी आणि माझी मुलं जेव्हां हेच करू लागलो, माझ्या बायकोची अशीच चिडचिड होऊ लागली आणि खरंच हे समस्त स्त्रियांचं दुःख जाणवू लागलं. अगदी काही दिवसांपूर्वीच एका तरुण स्त्री रंगकर्मींची मुलाखत पहात होतो.  त्यात ती म्हणाली,
"आम्ही स्त्रिया अनेक क्षेत्र काबीज करतोय. विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतोय. स्त्री ही अबला नसून सबला झालीय. तरीही आपलं कार्यक्षेत्र गाजवून घरी परतल्यावर, उद्याच्या नाश्त्याला, जेवणाला काय? हा प्रश्न समोर उभा राहतोच, तो काही सरत नाही." का हा प्रश्न फक्त स्त्रीलाच सतावतो ? का हे टेन्शन फक्त तिनेच घ्यायचं ? का तीचा नवरा किंवा लेक असं म्हणत नाही की,
"अगं, उद्या सकाळच्या नाश्त्याला मी मस्तपैकी अमुक बनवतो किंवा उद्याच्या जेवणाचा मेन्यू ना मी अमुक ठरवलाय आणि तो मीच करणार, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस.  केव्हढा relief मिळून जाईल तिला. अगदी आजचीच गोष्ट, सकाळी वॉक घेऊन बायको जरा उशिराच परतली.  पाहिल्यावर जरा जास्तच थकलेली वाटली.  विचारल्यावर म्हणाली, 
"जरा लिंबू पाणी करून देतोस का? सोबत एक गुळाचा खडा दे." तिने सांगितलेलं पुढे ठेवलं.  रविवार असल्याने आज नाश्त्याला तिने ऑमलेट ब्रेडचा बेत केला होता.  मी सहज म्हटलं,
"मी करू का ऑमलेट?"
माझ्या प्रश्नाने तिला जो रिलीफ मिळाला आणि आलेला थकवा गायब झाला तो शब्दात सांगणं कठीण आहे.  हे मी माझा मोठेपणा सांगण्यासाठी किंवा मी किती समजूतदार आहे हे दाखवण्यासाठी नाही सांगितलं, तर या लेखात मी मांडत असलेला मुद्दा लक्षात यावा इतकाच हेतू.
 एक दिवस तरी, "आज किंवा उद्या काय" ? हा तिच्या डोक्यावरचा प्रश्न कुणीतरी आपल्या डोक्यावर घेतलेला असतो. आणि सांगू का ? हे सगळं आपल्याला कळत असतंही, फक्त वळत मात्र नाही.  कारण ते वळण शरीराला मनाला लागलेलंच नसतं. आणि दुसरं कारण म्हणजे  चुकीच्या किंवा परंपरागत (मुलगा मुलगी) पद्धतीने अगदी आजही होत असलेलं मुलांचं संगोपन.  उदा. लेकीला लहानपणी काय आणून द्यायचं? तर बाहुली.  पूर्वी चुक् चुक् वाजणारी प्लॅस्टिकची असायची, आता महागडी असते इतकाच फरक. का? तर तिला पुढे गृहिणीच व्हायचंय. लेकाला डॉक्टर सेट,  लेकीला किचन सेट, पूर्वी प्लास्टिक किंवा धार असलेल्या स्टीलचा असायचा, आता अद्ययावत गुळगुळीत किचन सेट असतो, इतकाच फरक.  पुन्हा तोच प्रश्न, का ? तर तिला पुढे गृहिणी व्हायचंय. लेकाला fix o bricks सारखे डोक्याला चालना देणारे खेळ, तिला दोरीच्या उड्या. लेक जरा मोठी झाल्यावर, तिच्यासमोर स्वयंपाक, बाजारहाट, महागाई या गोष्टी करायच्या.  घर कसं सांभाळावं लागतं, घरच्या  घरातल्या सगळ्यांना कसं सांभाळून घ्यावं लागतं याचे सतत धडे, कारण पुन्हा तेच पुढे ती.गृ. व्हा. लेक मोठा झाल्यावर, क्रिकेटचं शिबिर, मित्रांसोबत सहली इ. गोष्टींना भरपूर वाव द्यायचा.  तो घरी आला की, लेकीला त्याला पाणी, खाणं नेऊन द्यायला सांगायचं.  अगदी आजही अनेक सुशिक्षित कुटुंबात मुलाला घरातली कामं करायला सांगितली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.  हेच विचार पुढे मनात तसेच रुजत, वाढत आणि घट्ट होत जातात.  अर्थात आज हे बरचसं कमी झालय. कारण नवरा बायको दोघंही आपापल्या करिअरमध्ये व्यग्र असतात. त्यामुळे मनापासून कितीही वाटत नसलं तरी कुकर लावणं, भाजी निवडून ठेवणं, नाश्त्याला मदत करणं, स्वयंपाकात काही मदत करणं जमत नसेल तर जेवणानंतर मागचं आवरणं हे पुरुषांना करावच लागतं आणि करायला हवंच.  म्हणाजे मला बायको सुंदर, उच्चशिक्षित, भरपूर कमावणारी पाहिजे पण मी घरातली इकडची काडी तिकडे करणार नाही, हा attitude चालतच नाही. अर्थात हे सगळे बदल झाले असतील किंवा होतही असतील तरीही, उद्याच्या नाश्त्याला, जेवणाला काय करायचं हा सार्वत्रिक गृहिणींना त्रास देणारा प्रश्न मात्र आजही त्यांची पाठ सोडत नाही. आमच्या किंवा थोड्या आमच्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियाही नोकरी करतच होत्या.  प्रवासातही छळणाऱ्या त्या दुसऱ्या दिवसाच्या मेन्यूचा विचार आणि तयारी करतच त्या घरी पोहोचायच्या आणि आमच्यासारखी पुरुष मंडळी त्या घरी पोहोचताच, महत्प्रयासाने घरातल्या सगळ्यांच्या आवडी लक्षात घेऊन फायनल केलेल्या तिचा मेन्यू उधळून लावत काही वेगळाच पदार्थ करायला सांगायचे. बायको जीव टाकत घरी शिरते न शिरते तोच, 
"अगं ऐक ना, खूप दिवसांत तुझ्या हातचा तो अमुक पदार्थ केलाच नाहीस, आज कर ना.  आईलाही खूप आवडतो तो."
झालं ! तिने सहजसोप्पा खिचडी, पोह्याचा पापड असा ठरवलेला सगळा बेत बदलून जातो, आणि त्याहीपेक्षा नवऱ्याने उच्चारलेले शेवटचे तीन शब्द जरा जास्तीच राग आणतात. मनात येतं, बहुधा सासूबाईंनी आपल्या लेकाच्या मार्फत स्वतःची  फरमाईश पुढे केलीय. पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षाही गृहिणींना (housewife) उद्याच्या नाश्त्याला जेवणाला काय? हा प्रश्न जास्त छळतो.  आपली बायको/आई घरीच असल्यामुळे, आई काय करते ? असा विचार करून तिला गृहीत धरत विविध फरमाईशी रोज येत असतात. असे कित्येक पुरुष आहेत जे अगदी अभिमानाने किंवा सहजपणे सांगतात,
"आपण नाही बुवा कधी घरच्या कामात बायकोला मदत करायला गेलो, आपल्याला ते जमतच नाही."
मग सुचवायला आणि हादडायला कसं जमतं ?  काय अर्थ काय या बोलण्याचा ? शनिवार रविवारी तर आम्ही मस्त तंगड्या पसरून विचारणार,
"उद्या काय करणार आहेस ग सकाळी नाश्त्याला ?"
या प्रश्नाने तिच्या डोक्यात किती तिडीक जात असेल याचा विचारच आम्ही कधी करत नाही आणि,
"उद्या जेवणाचा बेत काहीतरी मस्त कर."
म्हणजे काय? कारण तिने एक बेत ठरवला की मुलं नाकं मुरडणार. दुसऱ्या बेताला पतिराज तोंड वाकडं करणार. तर तिसऱ्या बेताला सासूबाई भुवया उंचावणार.  सगळे कौरव बनून तिचा अभिमन्यू करतात, आता अभिमन्यू का? तर या सगळ्या फरमाईशी विचारात घेत आणि प्रयत्नपूर्वक त्यातून एक फायनल तोडगा काढत, ती हा चक्रव्यूह भेदत असते खरी, पण ती तरी किती पुरी पडणार? तिचा, तिच्या आवडींचा, तिला काय हवंय याचा जराही विचार न करता, फरमाईशीच्या चक्रव्यूहात अडकवून तिचा अभिमन्यु करतात. रविवार असाच संपतो, आणि पुन्हा एकदा तिच्यापुढे, उद्याच्या नास्त्याला जेवणाला काय ? हा प्रश्र्न आ वासून उभा रहातो.
      खरंच जरासा घरकामात हातभार लावावा लागला, की आम्ही वैतागत फडफडत रहातो. मग अगदी रोजच्या रोज डोक्याला लागणारा उद्याच्या नाश्त्याला हा भुंगा ती कसा पेलत, सहन करत असेल? आणि मनातल्या मनात किती वैतागत...पेक्षाही कंटाळत असेल ? समस्त पुरुष वर्गाने विचार करण्यासारखा आणि विचार करून उत्तर मिळालंच तर तिथेच न थांबता, कळलेलं, लक्षात आलेलं, मिळालेलं या प्रश्नाचं उत्तर खरोखर जेव्हा वळेल तेव्हा, "उद्याच्या नाश्त्याला/जेवणाला काय ? हा प्रश्न कदाचित तीच्यापुरताच न रहाता खरोखर यातून ती सुटेल इतकंच.

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...