शनिवार, ११ मे, २०२४

1121. पस्तिशी नंतरची प्रेम कहाणी

     श्री चा सकाळचा व्यायाम नुकताच आटोपला होता. हवालदार पदावर मुंबई पोलिसात भरती झालेल्या श्रीकांत ची गेली अठरा वर्षे सेवा होवून तो आता हेड कॉन्स्टेबल पदावर येऊन पोहोचला होता. लवकरच त्याचे वरिष्ठ ' सब इन्स्पेक्टर ' पदासाठी त्याची शिफारस करणार असे ऐकिवात होते. पोलिसांच्या कामाच्या वेळा अनियमित असूनही आपला चालण्याचा आणि व्यायामाचा दिनक्रम श्रीकांत कसोशीने पाळायचा. बरेच दिवसांनी आज सुट्टी मिळाल्याने निवांत होऊन तो सोफ्यावर पहुडला.
" श्री...आज सुट्टी आहे तर सोफ्यावर ताणून देऊन नुसता टीव्ही बघत बसू नको. जरा घराच्या साफसफाई कडे बघ. रद्दी जमा झाली आहे बरेच दिवसांची. आज कसं पण करून देऊन टाक. डी मार्ट मध्ये जाऊन यादी करून ठेवले ते सामान आणून टाक." अनघाने.. त्याच्या बायकोने पायात चपला सरकवताना घराबाहेर पडताना श्री ला ताकीद दिली. बाहेरच्या जगात पोलिसी खाक्या दाखवणारा श्रीकांत अनघा समोर मात्र निमूट असे. त्याने नेहमीप्रमाणे अनु काय सांगते तिकडे दुर्लक्ष केलं आणि मग टीव्हीवर आपली आवडती वेब सिरीज शोधू लागला. श्रीकांतला आठवलं वीस वर्षांपूर्वी उत्साहाने सळसळणारे, पिळदार शरीराचे,  मिशी  किंचितही न ठेवलेलं त्याचे रूप. पोलिसात जायचं हे आधीच ठरवून त्याने स्वतःला अगदी फिट ठेवलं होतं. पन्नास एक सूर्यनमस्कार,भरपूर डंबेल्स चा व्यायाम केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. पुढे दोन अडीच वर्ष नोकरीत झाल्यावर खात्यात कायम झाल्यावर अनघाचे स्थळ सांगून आलं. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि मग प्रत्येक नवविवाहित दांपत्याच्या आयुष्यात येतात तसेच सोनेरी दिवस आले. पहारा, गस्त आणि एस्कॉर्ट ड्युटी सारख्या कामांमध्ये प्रचंड व्यग्र असलेला श्रीकांत घरी येताच अनघाला पाहून मोहरुन जायचा. त्याचा सगळा थकवा जणू निघून जाऊन प्रसन्न व्हायचा.
    दोघांच्या पहिल्या मुलाच्या शशांकच्या जन्मानंतर नवदाम्पत्याचे नवलाईचे दिवस संपून दोघांवर  पालकत्वाची जबाबदारी आली. शशांक ला सांभाळण्यात आणि संसाराला मदत म्हणुन नवीनच सुरू केलेल्या छोट्या व्यवसायात अनघा सुद्धा व्यग्र झाली. दोघांच्याही जीवनातली प्रणयातुरता कमी झाली. आपसूकच दोघे एकमेकाला जरूर तितका वेळ देऊ शकत नसत. आजही सुट्टीचा दिवस असताना नवऱ्याच्या नावानं कामाचं फर्मान करणाऱ्या अनुवर श्री वैतागलाच होता. आपले आयुष्य आपलं असतं. त्याची तुलना शक्यतो दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी करू नये हा विचार श्रीला कळत होता पण वळत नव्हता. नकळतच तो त्याच्या वैवाहिक आयुष्याची तुलना  त्याच्या जवळच्या मित्राच्या आयुष्याशी करायचा. त्याचा मित्र मंदार आणि मंदारची बायको अक्षया हे एक आदर्श जोडपं होतं त्याच्या दृष्टीने. अगदी  'रब ने बनादी जोडी ' स्वरूपाचं... किंवा  मग 'एक दुजे के लिये ' सारखं.
    मंदार कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीला लागला तेव्हा अक्षया त्याची विद्यार्थिनी होती. पण मग नित्याच्या परिचयातून दोघांच्या मनाच्या तारा जुळल्या. खरंतर अक्षयानेच पुढाकार घेऊन मंदारला विचारलं असणार की माझा पती म्हणून व्हायला आवडेल का तुला. कारण त्या दोघांमध्ये अक्षया जरा जास्त धीट होती. आणि अक्षयाला तिच्यासारख्या सौंदर्यवतीला नाही म्हणणारा मूर्खच म्हटला पाहिजे. मंदार तर खूपच हुशार समजूतदार होता आणि सगळे प्लस पॉईंट्स मंदारच्या बाजूनेच होते. मुंबईतल्या नामवंत खालसा कॉलेजात प्राध्यापक म्हणजे व्यवस्थित पगार, चांगली वर्तवणूक आणि स्वभाव हसतमुख शिवाय लाघवी. समोरच्याला आपलेसे करणारे व्यक्तिमत्व होते मंदारचं. शिवाय पुढे असलेलं आशादायक भवितव्य ही तर मोठीच जमेची बाजू. अक्षयाने सुद्धा कदाचित हे सर्व पाहूनच पाऊल उचलले असणार.
    मंदारने आणि श्रीकांतने आपापल्या  बायकांबरोबर काढलेल्या तीन - चार वेळा एकत्र सहलीच्या वेळी श्रीकांतला मंदारचे प्रेम जवळून पाहायला मिळालं. अक्षयाने एकदम योग्य जोडीदार निवडला होता त्याची प्रचिती लग्नानंतरच्या काही दिवसातच आली असणार. प्रणयाराधनाच्या त्या काळात मंदारने अक्षयाच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या. अगदी सकाळी उठल्यापासून त्याचा तिच्यावरील प्रेमाचा वर्षाव सुरू व्हायचा.  ' थोडं अजून झोप... रात्री उशीर झालेला झोपायला असं मिश्किलपणे बोलून तो तिला पुन्हा मायेने झोपवायचा. उठायला उशीर झाला तर मस्करीत सुद्धा टोमणा न मारता तू रोजच चहा करतेस. तू ब्रश करून घे.  मी चहा करतो असं म्हणून छान आलं, दालचिनी वगैरे टाकून केलेल्या गरम चहाचा कप अक्षयाच्या हातात द्यायचा. चहा घेताना तिच्याशी गोड बोलून तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा. आंघोळीला बाथरूम मध्ये जाण्यापासून ते स्वतःच्या कामावर जाताना आपणच सर्व तयारी करायचा. कामावर जायच्या आधी नक्कीच मंदार तिच्याकडे नक्कीच प्रेमळपणे पाहत असणार. दीड दोन वाजता अक्षयाने दिलेल्या डब्यातल्या चपाती भाजीचं फारच मस्त झाली आहे असं कौतुक करून." तू अजून जेवलीस की नाही? " अशी प्रेमळ विचारणा करत असणार. संध्याकाळी घरी परतल्यावर अक्षयाची बडबड पूर्णपणे ऐकून घेत. स्वतःचं थकव्याचं कौतुक न करता आज स्वयंपाक करू नकोस. आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असं नक्कीच मंदार म्हणत असणार. वरचेवर अक्षयला शॉपिंग करायला नेऊन कपाळावर आठ्या न पाडता तुला आवडणारा कोणताही ड्रेस घे असा लाडीक हट्ट सुद्धा करत असणार.
          आणि मग ऑक्टोबरच्या एका सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास ती बातमी वृत्तपत्रात आली. पहाटे साडेपाचला मोटरसायकल वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मॉर्निंग वॉक साठी म्हणून निघालेल्या एका जोडप्यातल्या महिलेला ठार केले आणि तिच्या पतीला जबर जखमी केले. मीरा रोडच्या निर्मनुष्य रस्त्यावर दरोड्याच्या हेतूने ही भयंकर घटना घडली. श्रीकांत तसेही हल्ली वर्तमानपत्र कमीच वाचायचा. त्याचा बराचसा वेळ हल्ली सोशल मीडिया आणि वेब सिरीज बघण्यात जायचा. तेव्हा त्याच्या मित्र वर्तुळातील कोणी त्याला ही बातमी फोन करून सांगितली. खरं तर मुंबई महानगरात घडणाऱ्या असंख्य आणि अनाकलनीय घटनांपैकी ही एक घटना होती. एरवी अशा घटनेकडे श्रीकांतने विशेष लक्ष दिले नसतं. पण या घटनेतील दुर्दैवी महिला ही दस्तूरखुद्द अक्षया होती आणि तिचा जखमी झालेला मंदार नवरा. हे कळल्यावर श्री चा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.
 "अक्षयाचा गळा चिरला..?? तो पण एका सोन्याच्या चेनसाठी??" अविश्र्वासाने त्यानं फोन करणाऱ्याला विचारलं. हे असे चेन वगैरे चोरणारे भुरटे चोर. आपल्या लक्ष्याचे जीव घेत नाहीत.
"अरे... मंदारने त्याची सोन्याची साखळी आणि जी रोख रक्कम होती ती  त्यांना दिली. पण अक्षयाने कानातले काढून द्यायला नकार दिला. या झटापटीत दोघांपैकी एकाने तिच्या गळ्यावर वार केला आणि तिच्या मदतीला धावून आलेल्या मंदारला पण जखमी केलं."
       जवळून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटना  पाहिली होती. तसे त्याने मिरा रोड पोलीस स्थानकाला कळवले देखील होते. दोघा जखमींना तातडीने वेदांत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी अक्षयाला मृत घोषित केलं आणि मंदारला अतिदक्षता विभागात ठेवलं. दोघांचे मोबाईल फोन सुद्धा चोरट्याने काढून घेतले होते.
  योगायोग म्हणजे मंदार - अक्षयाचा मुलगा आदित्यचा वाढदिवस एका आठवड्याच्या अंतरावर होता. वृत्तपत्रात ही बातमी आली तेव्हा सारे जण हळहळले. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच. माणसाला कल्पना सुद्धा नसते की नियती कोणता फासा कधी आणि कसा टाकेल ते. मंदार हॉस्पिटल मधून घरी आल्यावर साधारण पंधरा-वीस दिवसांमध्ये त्याला भेटून यायचं असं श्रीने ठरवले.
        श्री आणि त्याचे दोन मित्र एक्सर रोड बोरिवलीतील मंदारच्या फ्लॅटवर भेटण्यासाठी आले. अक्षयाचे सर्व विधी या फ्लॅट वर च होणार होते. शिवाय मंदार अक्षयाचे बरेचसे नातेवाईक त्या भागात होते.  अशा दुःखद प्रसंगी काय बोलायचं हा एक अवघड प्रश्न श्री पुढे होताच. ज्याची प्रिय व्यक्ती त्याला सोडून गेलेली असते तो अतिशय दुःखात असतो आणि भेटायला येणारे मात्र त्या दुःखावरची खपली काढून ती जखम पुन्हा उघडी करत असतात. तरी पवारने काहीतरी बोलायचं म्हणून तो प्रश्न विचारलाच.." काय झालं नेमकं त्या दिवशी..??"
       मंदार अत्यंत नाखुशीनेच खरे तर बोलत होता. आपण आलेलं त्याला आवडलेले नाहीये हे तिघांच्या लक्षात आलं होतं. महत्वाचं म्हणजे त्याचं वागणं शोकग्रस्त विधुरासारखे नव्हतं तर चक्क उद्धटपणाचे वाटत होतं. केवळ ' मंदार अक्षया ' या अनुरूप सुंदर जोडप्यापायी वाटणारी अनुकंपा म्हणून सगळं सहन करावं लागणार होतं. आत्ताही तसंच वैतागून तो म्हणाला." मी तरी एकच गोष्ट किती लोकांना आणि कितीदा सांगायची..!!"
        श्रीकांत आणि त्याच्याबरोबर आलेले दोघे मित्र नाही म्हटलं तरी पोलीस खात्यातले होते. माणसांचा आणि परिस्थितीचा त्यांचा अंदाज पक्का होता. तिघेही हे ऐकताच चपापले. एक अनामिक अस्वस्थपणाची जाणीव त्यांना झाली. ती झटकून टाकून चालणार नव्हतं. त्याचवेळी नेमके मंदारला भेटायला काही पाहुणे आले आणि मग तिघांनी तिथून काढता पाय घेतला. श्रीकांतने आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी ही घटना गुन्हे अन्वेषण विभागाच्या त्यांच्या वरिष्ठांना सांगितली. घटनेचा एक वेगळाच पैलू समोर येऊ पाहत होता. तसं तर घटना घडली तेथील सर्व साखळी चोरांची आणि भुरट्या चोरांची चौकशी चालू होतीच . मंदारचे सीडीआर रेकॉर्ड फोनवरून गेलेल्या आणि आलेल्या कॉलचा तपशील मागवला गेला. त्या सर्व कॉल्सचा माग काढला गेला. आश्चर्यकारकरीत्या तपासाची सुई मंदार कडे दर्शवू लागली. त्यादिवशी ही घटना घडली त्याच्या बरोबर आधी अर्ध्या तासात मंदार कडून दोघांना कॉल केले गेले होते. त्या दोघा संशयित लोकांना शोधण्यात आले. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. त्यातला एक लवकरच गुन्हा कबूल करून बसला. अक्षयाला ओळखण्यासाठी म्हणून दिलेले तिचे छायाचित्र अजूनही त्याच्या पाकिटात होते. मंदारने त्या फोटो मागे अक्षता असं लिहिलेलं होतं. मंदारकडून त्या दोघांनी अक्षयला ठार मारण्याची तीन लाख रुपयाची सुपारी घेतली होती.
       मंदारला ताब्यात घेतले गेले. सर्वांनी तोंडे उघडली म्हटल्यावर त्याचाही बांध फुटला. तो हमसाहमशी रडायला लागला. कदाचित त्याला खरंच पश्चाताप होत असावा. त्याने कबूल केले की अक्षयाशी त्याचे संबंध गेल्या काही वर्षात बिघडले होते. छोट्या छोट्या कारणावरून दोघात खटके उडत. अक्षया सुद्धा मंदार ला उगाचच हिणवायची. त्याची तुलना इतर बायकांच्या श्रीमंत नवऱ्यांबरोबर करायची. टोमणे मारायची. गेल्या सात-आठ वर्षात त्यांच्यात नवरा बायकोचे शारीरिक संबंध सुद्धा झालेले नव्हते. मंदार अक्षयाची भावजय मीनाच्या प्रेमात पडला. तिनेही मंदारला प्रतिसाद दिला. परस्पर संमतीने वेगळे होण्यास अक्षया तयार नव्हती. शेवटी मंदार ने तिला कायमचे संपवायचे ठरवले. त्यासाठी त्याने व्यावसायिक मारेकरी निवडले. या कृत्याला भुरट्या साखळी चोरीची बिनसलेली योजना असं स्वरूप द्यायची शक्कल त्याला सुचली. त्याआधी दोन वेळा त्याने प्रयत्न करून पाहिला पण मग त्या जागा गर्दीच्या असल्याने तिथं हा खून करणं धोकादायक ठरले असते .म्हणूनच ही दुष्ट योजना पुढे ढकलावी लागली.
       टीव्हीचा आवाज अचानक वाढला. कसल्या तरी जाहिरातीच्या मोठ्या संगीताने श्रीकांत अचानक भानावर आला. नुकत्याच सोडवलेल्या केसच्या घटना त्याच्या डोळ्यासमोर एखाद्या चलतचित्रांसारख्या तरळून गेल्या होत्या.  खरंच प्रेम असं असतं? शारीरिक वासना. मोह संपल्यावर खरंतर प्रेमाचं उदात्त स्वरूप जे शेवटपर्यंत शाश्वत राहिले पाहिजे त्याकडे वाटचाल व्हायला हवी. या वाटेवरती फसलेले प्रेम मग असं बीभत्स स्वरूप धारण करत असावं. श्री विचार करु लागला.
        रविवार तर सुट्टीचा दिवस. असं असूनही संसाराला हातभार लावू पाहणाऱ्या अनघा विषयी त्याला अचानक प्रेम वाटायला लागलं. खरंतर तिला भेटायची आतुरता पूर्वीसारखीच त्याच्या मनामध्ये निर्माण झाली.  तीन दिवसांपूर्वी जी बोनस ची रक्कम त्याच्या खात्यावर जमा झाली होती ती खरं तर मित्रांबरोबर सहलीसाठी वापरणार होता. ती सर्व रक्कम आपल्या प्रिय पत्नी च्या ताब्यात देण्याचा निर्णय श्रीकांतने घेतला आणि हो...अनघा येईल त्यावेळी स्वतः बनवलेला अगदी आले, दालचिनी घालून केलेला गरम चहाचा वाफाळणारा कप तो आज तिला देणार होता.

#योगेश साळवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...