सोमवार, ६ मे, २०२४

1113. संधी मिळत नसते - मिळवावी लागते

 प्रत्येक व्यक्तीची एक कहाणी असते, फक्त ती आपल्याला ऐकता आली पाहिजे. गेल्या आठवड्यात उबरने घरी परत येत होते. ज्याने बुकिंग घेतली तो माणूस साधारण तिशी-पस्तिशीचा वाटत होता. गाडी वॅगन आर होती, जुनी असल्यामुळे जरा रडत-खडतच चालली होती. पण मला फार दूर जायचं नव्हतं म्हणून काही बोलले नाही. गाडी चालवता चालवताच चालकाचा फोन वाजला. 
स्पीकरवर टाकून त्याने फोन घेतला, ‘सर, ऑक्सिजन सिलिंडर पाहिजे, सध्या एकच स्पेर आहे. उद्या सकाळपर्यंत तरी अरेन्ज करा, पेशंट सिरीयस आहे.’ पलीकडून आवाज आला. एखाद्या नर्सचा असावा. ‘हो, करतो, पण काय सिम्टम आहेत?’ माझ्या चालकाने विचारले. ‘लंग कॅन्सर आहे, पण आता हार्टबीट खूप फास्ट होतेय’ ‘ हम्म, टॅकीकार्डिया, ठीक आहे करतो व्यवस्था’ म्हणून चालकाने फोन ठेवला. 
एव्हाना माझे कुतूहल चाळवले गेले होते, ‘तुम्ही वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहात का?’ मी विचारले. ’थांबा, आधी ऑक्सिजनची व्यवस्था करतो आणि मग सांगतो’, तो म्हणाला, आणि त्याने कुणाला तरी फोन लावला, ‘मी अमुक अमुक हॉस्पिटलचा डायरेक्टर बोलतोय, उद्या सकाळी दहापर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पाहिजे’ त्याने म्हटले आणि फोन ठेवून दिला. मला राहवेना, ‘तुम्ही हॉस्पिटल चालवता?’ मी विचारलं. तो म्हणाला ‘हो, मी आणि माझे दोन पार्टनर्स मिळून आम्ही हल्लीच एक खासगी हॉस्पिटल चालवायला घेतलंय. लॉंग टर्म पेलिएटिव्ह केअर देतो आम्ही’. 
‘मग उबर कसे चालवताय?’ मी न राहवून विचारलं. तो हसला, म्हणाला, ‘हा साईड बिजिनेस आहे, तीन वॅगन आर उबरला लावल्यात मी, ड्रायव्हर ठेवलेत. आज एक ड्रायव्हर आला नाही. माझा डे ऑफ होता, म्हटलं स्वतःच जावं. तसेही आपण सुट्टीच्या दिवशी काय करतो? लॉंग ड्राइव्हलाच जातो ना, उबेरचे बुकींग घेतले की माझा लॉंग ड्राईव्ह पण होतो, पैसे पण मिळतात आणि वेगवेगळी माणसे पण भेटतात तुमच्यासारखी. तसाही मी पुण्यात एकटाच राहतो, मग घरी बसून तरी काय करू?’  चालक म्हणाला. 
आता माझे कुतूहल चांगलेच चाळवले होते, ‘काय आहे तुमची स्टोरी? सांगा?’ मी विचारले. तो परत हसला आणि म्हणाला ’मोठी स्टोरी आहे मॅडम’. ’सांगा, वेळ आहे आपल्याकडे पंधरा-वीस मिनिटे’, मी म्हणाले आणि त्याने त्याची गोष्ट सांगायला सुरवात केली. तो होता कुठेतरी परभणीकडच्या भागातला. वडिलांचं मेडिकल स्टोर होतं, ते पुढे चालवावं म्हणून ह्याला डी-फार्मला घातलं. तिथे शेवटच्या वर्षाला याचे पेपर राहिले आणि वर्ष वाया गेलं म्हणून हा घरी होता. रात्रभर नेटफ्लिक्स आणि दिवसभर झोप आणि उंडारणं हेच चालू होतं, त्यामुळे घरी भांडण व्हायचं. शेवटी वडील वैतागून म्हणाले, ‘तुझं तू बघ आता, घरातून बाहेर पड, पोटापुरती नोकरी कर, काहीही कर, पण घरी बसून आयतं खाऊ नको’. 
ते याला लागलं, आणि ह्याने नोकरीची शोधाशोध सुरु केली. एका मित्राने सांगितलं की पुण्यात एका छोट्या हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल स्टोअर मध्ये कामाला माणूस पाहिजे, पगार बेताचा आहे पण हॉस्पिटलच्या कँटीन मध्ये स्वस्त खाणं मिळेल आणि राहण्यासाठी तिथेच टेरेसवर खोली. हा हो म्हणाला आणि पुण्याला आला. हॉस्पिटलमध्येच राहत असल्यामुळे तिथल्या सगळ्या घडामोडी जवळून पाहायला मिळाल्या. छोटं, खासगी हॉस्पिटल होतं त्यामुळे मेडिकल स्टोर बघता बघता हा इतरही कामे करायला लागला, हळूहळू सलाईन लावणे, बेसिक चार्ट वाचणे वगैरे गोष्टीही शिकत गेला. पुण्यात फारसे कोणी ओळखीचे नव्हते त्यामुळे ते हॉस्पिटलच त्याचं विश्व बनलं. 
दोनेक वर्षे अशीच गेली. पुढे त्या हॉस्पिटलच्या दोघा पार्टनरची भांडणे झाली आणि ते वेगळे झाले. एका पार्टनरने स्वतःचं वेगळं हॉस्पिटल काढलं. हा मेहनती होता, पडेल ते काम करणारा होता हे दोघांनाही एव्हाना कळलं होतं, त्यामुळे दोघांनीही ह्याला नोकरीची ऑफर दिली. तर हा पठ्ठ्या एकाच वेळी दोन्ही हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर मध्ये नोकरी करायला लागला, एकीकडे डे शिफ्ट आणि दुसरीकडे रात्रपाळी! त्यातच अभ्यास करून डी.फार्मचे उरलेले पेपर क्लियर केले.  हे काही महिने चाललं, नंतर अर्थातच उघडकीला आलं आणि एकीकडची नोकरी गेली. 
पण ह्याचं नशीब असं की त्याच दरम्यान कोविडची पहिली वेव्ह आली. साध्या साध्या हॉस्पिटलमध्ये देखील खाटा मिळेनाशा झाल्या. त्या काळात ह्याने अठरा अठरा तास काम केलं, अक्षरशः पडेल ते, नर्स, वॉर्डबॉय, फार्मासिस्ट आणि प्रसंगी प्रेत स्मशानात नेणारा ड्रायव्हर म्हणून देखील. त्याची मेहनत बघून ज्याचं हॉस्पिटल होतं त्या डॉक्टरने ह्याला पगाराव्यतिरिक्त पर्सेंटेज द्यायला सुरवात केली. कोविडच्या दुसऱ्या वेव्हमध्ये सर्वच खासगी हॉस्पिटलांनी संधीचा फायदा घेऊन लाखो रुपये कमावले. त्यात यालाही पंचवीस-तीस लाख रुपये मिळाले. अनुभव मिळाला होताच. 
कोव्हीडची लाट ओसरली तेव्हा काही खासगी हॉस्पिटल डबघाईला आली, असंच एक छोटं खासगी हॉस्पिटल याने आणि याच्या दोघा डॉक्टर मित्रांनी मिळून चालवायला घेतलं. ह्याचं काम आहे ऍडमिन पाहणं. जे पैसे कोव्हीड मध्ये कमावले होते ते ह्यात घातले. जे दोन-तीन लाख वर उरले त्यातून जुन्या तीन वॅगन आर गाड्या घेतल्या आणि त्या उबरला लावल्या. ’अजून मी चौदा-चौदा तास काम करतो मॅडम’ तो म्हणाला. 
‘मिळालेल्या संधीचा चांगलाच फायदा घेतला तुम्ही’, मी म्हणाले, ‘संधी मिळत नसते मॅडम, मिळवावी लागते’ तो म्हणाला. ’ही हॉस्पिटल  चालवायला घेण्याची ऑफर आली तेव्हा साशंक होतो मी. आपल्याला जमेल की नाही असं वाटत होतं, मग विचार केला, माणसाला कुठे ना कुठे तरी शिकायला सुरवात करावीच लागते. कोणी जन्मापासून काही शिकून येत नाही. आणि कोव्हीड मध्ये इतकं सारं पाहिलंय, शिकलोय आपण की जमेल आपल्याला आणि घेतली उडी, सोपं नक्कीच नाही, पण घरी राहिलो असतो तर तेच मेडिकल स्टोअर सांभाळत राहिलो असतो. आता छोटं का होईना पूर्ण हॉस्पिटल चालवतोय’. 
त्याची कहाणी ऐकून मी अवाकच झाले होते. मनात आलं, वडिलांनी ह्याला घरातून जायला सांगितलं नसतं तर ह्याच्या आयुष्याची ट्रॅजेक्टरी कशी झाली असती? त्या एका प्रसंगाने ह्याच्या मधले कर्तृत्वाचे सुप्त स्फुल्लिंग जागृत झाले. त्यानंतर त्याच्या वाट्याला जी जी संधी आली ती त्याने घेतली. दोन्ही हातांनी कवटाळली आणि अपार मेहनत केली. त्याच्या विजिगिषु वृत्तीला मनोमन सलाम करतच मी गाडीतून उतरले. 

शेफाली वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...