बुधवार, ८ मे, २०२४

1118. शब्दाविना ओठातले कळले मला कळले तुला

 ती हसायची तेंव्हा तिच्या गालावर पडणाऱ्या खळीत त्याचा जीव अडकायचा. वर्गातली सर्वात सुंदर नसली तरी हुशार आणि देखणी  मुलगी होती ती. सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणारी आणि बक्षीसं पटकावणारी ती.
   हा मात्र अभ्यासात मध्यम होता. दिसायला ही बरा होता पण लाजरा बुजरा होता तो. ती आली होती त्याच्या शाळेत आठवीत असताना अचानक मिड टर्ममध्ये  आणि दहावीपर्यंत होती त्याच्याबरोबर शिकत.  तो तिला चोरून चोरून पहायचा. दहावीच्या सेंडऑफमध्ये अबोली साडीत कसली कातील दिसली होती ती. त्याच्या तर काळजावर घालाच घातला होता तिने. ती भाषणात म्हणाली होती शाळा सोडून जाताना एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे पण याच्या तर दोन्ही डोळ्यात पाणी होतं कारण ती आता नंतर कुठे जाणार? काय करणार? आपल्याला परत कधी भेटणार की नाही? असे  अनेक प्रश्न त्याच्या मनात पिंगा घालत होते. ती जशी अचानक आली तशीच निघून ही गेली. तिच्या वडिलांची पुन्हा बदली झाली होती म्हणे.
  तो जुने फोटो पाहताना शाळेतला सेंडऑफचा फोटो पाहताना आठवणीत हरवून गेला. होता आणि त्याच्या शेजारी उभी ती त्यालाच पाहत आहे असं त्याच्या लक्षात आज किती तरी वर्षांनी आले होते.
‛अरे आपण किती वेळा हा फोटो पाहिला असेल पण आपल्या लक्षात कसे आले नाही हे? आणि तेंव्हा ही कसे लक्षात नाही आले आपल्या?’ तो स्वतःशीच पुटपुटत होता. आणि मागे त्याची बायको येऊन उभी होती.
“ झालं का पाहून?” कमरेवर हात ठेवून तिने त्याला विचारलं.
“ काही नाही गं ते असंच ’” तो गडबडून म्हणाला.
“ तू ना बुध्दू आहेस आणि होतास. तसाच लाजरा बुजरा. म्हणून तर लक्षात नाही आली ना तेंव्हा माझ्या डोळ्यांची भाषा पण मला कळली होती तुझ्या डोळ्यांची भाषा म्हणून तर fb वर तुझा शोध घेतला तुझा मोबाईल नंबर मिळवला आणि शिक्षण पूर्ण झाले की आले ना धावत पळत तुझ्याजवळ परत. आणि करून टाकलं प्रपोज तुला. तुला ही नोकरी लागलीच होती तोपर्यंत ! तेंव्हाही  पी.एस.आय होऊन रुबाबात फिरणारा तू लाजला होतास.” ती हसून बोलत होती.
“ हो ना तू जे केलंस ते अनपेक्षित होतं ना माझ्यासाठी. आणि आहे मी लाजरा बुजरा त्या बाबतीत आज ही. पण तू आहेस ना निर्लज्ज मग झालं. पण खरंच गं मला इतक्या वर्षात इतक्या वेळा हा फोटो पाहून लक्षात कसं आलं नाही की तू माझ्याकडेच  पाहत आहेस ते?” त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं.
“ कारण तेंव्हा  माझ्या डोळ्यात पाहण्याची हिम्मत  नव्हती तुझी आणि फोटो तू नुसते पाहत होतास जगत नव्हतास. जुने फोटो म्हणजे आपले नुसते प्रतिबिंब नसते रे तर आपण जगलेले क्षण असतात. ते पाहून पुन्हा आपण भूतकाळात जाऊन ते  क्षण पुन्हा जगू शकतो. म्हणून तर फोटो काढतो ना आपण ! आणि असू दे मी निर्लज्ज पण माझ्या निर्लज्जपणा मुळेच आपण आज एकत्र आहोत ना? नाही तर माझ्या गालावरच्या खळीत जीव देणारा मला दुसरा कोण भेटणार होता?”ती हसून त्याचे केस विस्कटत म्हणाली.
“तेही आहेच म्हणा. जज साहिबा !” तो तिच्या डोळ्यात पाहत तिला जवळ घेत म्हणाला.
तुम्हाला काय वाटलं ही पण एक अधुरी प्रेम कहाणी असेल? नाही हो काही प्रेम कहाण्या पूर्ण करायच्या असतात.
😊
©स्वामिनी चौगुले

अशाच सुंदर सुंदर कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन  पेजला लाईक आणि फॉलो करा.
तळ टीप- बाकी कथा कॉपी राईटेड आहे तर खूल्ली आहे म्हणून उचलू नका आणि लेखकाचे नाव काढून निनावी देखील फिरवू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...