शेजारी झोपलेल्या अभीचा पाय तिच्या अंगावर आपटताच तिला दचकून जाग आली. मघाशी सरळ झोपलेला अभी झोपेतच चुळबूळ करत, आडवातिडवा होत मधूनमधून हातपाय आपटत होता. त्याला पुन्हा सरळ करून तिनं बिछान्याला पाठ टेकवली आणि स्वतःही पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली. उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर अडीच वाजले होते. साधारण एक वाजेपर्यंत तर तिला झोपच लागलेली नव्हती. कशी लागेल? डोक्यात असंख्य विचार घोळत असताना झोप लागते? 'हं... लागलीच होती की. अभीमुळे उठलो आपण' तिनं मनातल्या मनात स्वतःशीच प्रतिवाद केला. परत डोळे मिटून झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. उद्या काय होईल? कसं होई ? या काळजीने आणि विचाराने तिचं डोकं फुटायची वेळ आली. कधीकधी उद्याचा दिवस उगवायलाच नको असं वाटतं. आताही तसंच वाटतंय. पण वाटून काय उपयोग? थांब म्हणून थांबत नाही आणि जा म्हणून जात नाही असं हटखोर काम असतं वेळेचं. वेळेला थांबवता आलं असतं, तर तिनं सतीश असतानाचे दिवस कधीही हातातून निसटू दिले नसते. पण ते निसटले आणि सतीशही एका अपघाताचं निमित्त होऊन काळाच्या पटावर थांबला एकाच ठिकाणी. काय झालं? कसं झालं? हे आठवत हळहळत बसणं, हा तर तिच्या मनाचा नेहमीचाच उद्योग. पण सद्या मात्र तिला वेगळीच काळजी लागली होती. सकाळी तिला दादासोबत अकोल्याला जावं लागणार होतं. दुसऱ्या लग्नासाठी चालून आलेलं ठिकाण पाहायला.
खरंतर पुन्हा पुन्हा विचारणा झाल्यावरही तिनं दुसऱ्या लग्नासाठी कितीतरी वेळा नकार दिला होता. कुण्या दुसऱ्या पुरुषाला आपल्या आयुष्यात स्थान देणं, एखाद्या बाईसाठी ती दोनदोन पोरांची आई असताना इतकं सोपं असतं का? नसतंच मुळी. पण काही कठीण प्रश्नांना 'दुसरं लग्न' ह्यासारखं कठीण उत्तरच लागू पडणार असेल तर नकाराचाही नाईलाज होतो. नकाराची धार बोथट होते. विशेषतः आर्थिक बाबतीत बाई आपल्या पायावर नसेल, तर तिला होकार द्यावाच लागतो. जसा तिने आत्ता दिलाय. ठिकाणं पाहण्यासाठी तिच्या होकाराने कोणी खुश असेल, तर ती आहे वहिनी. 'साहजिकच आहे म्हणा. दोनदोन पोरांसह कायमच माहेरी येऊन राहिलेल्या नणंदेने दुसऱ्या लग्नाला होकार देण्यावर वहिनीच्या संसाराचे भवितव्य बऱ्यापैकी अवलंबून असले तर वहिनीला आनंद होणारच. तिनं कूस बदलली आणि त्याचवेळी गाढ झोपेत हातपाय पोटाशी घेऊन शांत झोपलेल्या मनूनं सैल होत तिला बिलगत तिच्या गळ्यात हात घातला. ती आपल्याच विचारात गुंग असताना साडेपाचचा गजर झाला. अभीला जाग येऊ नये, म्हणून तिनं घाईघाईतच तो बंद केला. अभी उठून बसला तर सगळा गोंधळ होईल. अकोल्याला जाण्यासाठी तो सुद्धा मागे लागेल. आपल्या जागेवर सतीश असता तर? त्याला इतका विचार करावा लागला असता का? किंवा त्यानं दुसऱ्या लग्नाला नकार दिला असता का? नाहीच. मग आपल्याच बाबतीत का असं होतंय? आपण बाई आहोत म्हणून? एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असे करत करत असंख्य प्रश्न सभोवती फेर धरून नाचताहेत असा भास तिला झाला. रात्रभराचं जागरण आणि डोक्यात विचारांचं थैमान ह्यामुळे कमालीचा थकवा शरीरभर जाणवू लागला. पण वहिनी उठल्याचा आवाज आल्यामुळे सगळा थकवा बळेच बाजूला करून तिनं पांघरुणाची घडी केली. अकोल्याच्या स्थळाविषयी सांगताना परवा दादा म्हणत होता- "मी माहिती काढलीय. मनुष्य चांगल्या नोकरीवर आहे. मागच्याच वर्षी पहिली बायको कॅन्सरनं गेली. एक मुलगा आहे. सद्या इंजिनिअरिंगला. स्वतःचं घर आहे. एक बहीण आहे लग्न होऊन परदेशी स्थायिक झालेली. एवढं मोठं घर पण करायला कोणी नाही. बाई नसली की माणसाचे हाल हाल होतात. म्हणून लग्न करायचं म्हणतोय. बघूया बरं वाटलं तर. शिवाय त्यांनाही आपलं सगळं पटलं पाहिजे." आपलं सगळं पटलं पाहिजे? 'म्हणजे काय? दादा असं का म्हणाला? कितीतरी गोंधळ तिच्या मनात निर्माण झाला, पण त्याला काही विचारावंसं तिला वाटलं नाही. ती गप्प राहिली. आपण मनापासून कुठे होकार दिला? आणि आता दिलाच होकार तर जे समोर येईल ते स्विकारत जायचंय एवढंच तिनं मनाशी ठरवलं.
अरुण जाधव नावाच्या त्या लग्नाळू बिजवराच्या घरी जाऊन पोहोचेपर्यंत तिच्या मनात स्वतःशीच सुरू असलेलं द्वंद्व थांबलं नव्हतं. कुठल्याशा सुंदर कॉलनीतील एकसारख्या दिसणाऱ्या टुमदार बंगलेवजा घरांच्या ओळीतल्या एका बंगल्यात एकटाच राहणारा अरुण जाधव आपल्या दुबईस्थित परंतु सद्या आठपंधरा दिवसांसाठी भारतात आलेल्या बहिणीसोबत स्वतःसाठी स्थळं बघत होता. औपचारिक गप्पा आणि ओळख होत असताना नेव्ही ब्लु पॅन्ट आणि स्वच्छ पांढरा शर्ट घातलेल्या उंच, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुण जाधव नामक साधारण पंचेचाळीशीच्या आसपास वय असणाऱ्या त्या मनुष्याचे दादांशी बोलताना आपल्याकडेही लक्ष आहे हे तिला सारखे जाणवत होते. त्यामुळे तिला जरा अवघडल्यासारखेही वाटत होते. तिला वाटलं सतीश आपल्याला पाहायला आला, तेव्हाही किती अवघडलेलो होतो आपण ! गोंधळलोही होतोच. शांततेने चाललेल्या गप्पा तितक्याच शांतपणे केवळ ऐकून घेत असताना मध्येच- "ह्या दोघांनाही बोलू देऊया का काही वेळ?" असं म्हणत अरुण जाधवच्या बहिणीने दादाची संमती मागितली आणि दादा "हो" म्हणाला तेव्हा तिला डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखे जाणवले.
"मला शिंगं आहेत का हो?" असं आपल्या भारदस्त पुरुषी आवाजात त्यानं विचारलं त्यावेळी त्यानं असं का विचारलं म्हणून प्रश्नार्थक नजरेनं वर बघत तिनं नकारार्थी मान हलवली तेव्हा "मग घाबरताय काय इतक्या" असं विचारत अरुण जाधव खो खो करून हसला. थोडावेळ असाच शांततेत गेल्यावर अरुण जाधवनं पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"मघाच्या आगाऊपणाबद्दल सॉरी.." - मग एक मोठ्ठा पॉझ घेत- "गेल्या पाचसहा दिवसात चार ठिकाणं पाहीली आहेत. तुम्ही पाचव्या." पुन्हा शांतता. "खरंतर दुसरं लग्न करायचंच नाही असं ठरवलं होतं मी. वसू केवळ माझी बायकोच नाही तर मैत्रीणही होती. मी लग्न करावं हा तिचाच हट्ट. शिवाय ताईचाही." अरुण जाधव त्याच्या मनातलं सगळं सांगत होता. ती नुसती ऐकत होती. त्याच्या बायकोबद्दल सांगताना गहिवरलेला त्याचा स्वर तिला आवडला. त्यातलं प्रेम आवडलं, सय आवडली. शिवाय त्याच्या शब्दातून जाणवलेली त्याची बायको वसूही आवडलीच.
"मला आवडला आहात तुम्ही."- असं मोकळेपणाने बोलून संवाद सुरू करत अरुण जाधव पुढे म्हणाला- "तुम्हालाही काही बोलायचं असेल तर बोलू शकता."
अनपेक्षितपणे समोरासमोर त्याने दिलेला होकार तिला अगदी अंगावर आल्यासारखा वाटला. त्या होकाराच्या ओझ्याखाली काही बोलणे तिला आणखीनच कठीण वाटू लागले. त्याच गोंधळात काहीतरी मनाशी ठरवत जरा धिटाईने पण चाचरत ती म्हणाली- "मला दोन मुलं आहेत. मुलगी मिनाक्षी नुकतंच बारावं लागलेली. मुलगा अभिजित सात वर्षांचा."
"हं..."- तिचं पूर्ण बोलणं ऐकून घेण्याची मानसिकता दाखवत त्यानं नुसता हुंकार भरला.
"त्या दोघांचं शिक्षण वगैरे सगळी जबाबदारी ह्या दुसऱ्या लग्नानंतरही माझीच राहील. मी काहीही कमवत नाही. माझ्याशी लग्न म्हणजे तुम्हाला एकावर आणखी दोन जबाबदाऱ्या फ्री मिळाल्यासारख्या होतील. ते तुम्हाला कितपत चालेल?"
"हं...तुमच्या पूर्वायुष्याविषयी माहिती होतंच मला."- तिचा प्रश्न ऐकून घेत तो म्हणाला- "त्याविषयी ताईशी बोलणं झालंच होतं माझं. तिचं म्हणणं आहे दोन मुलांची जबाबदारी ही फार मोठी गोष्ट आहे."
"आणि तरीही तुम्ही हो म्हणताय?"- तिनं आश्चर्यानं विचारलं.
"हो... होच म्हणतोय. पण एका अटीवर."- तो म्हणाला- "लग्नानंतर मी फक्त एकाचीच जबाबदारी घेईन. एकतर मुलीची नाहीतर मुलाची."
त्याचे शब्द गरम तेलासारखे आपल्या कानात ओतल्या जात आहेत असं तिला वाटलं. संताप झाला पण आपला संताप निरर्थक असल्याचं जाणवलं. जिथे अ सारखा तिऱ्हाईत माणूस आपल्यासह आपल्या एका मुलाची नाहीतर मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्याला दोष देऊन काय उपयोग !
"तुम्ही आत्ताच नका देऊ उत्तर. नंतर सावकाश काय ते ठरवा. मग मला कळवा. उद्यापर्यंत." - त्यानं सांगितलं. स्वतःचा फोननंबर तिला दिला आणि तिचाही सेव्ह करून घेतला.
पुन्हा रात्र. पुन्हा तिच्या दोन्ही बाजूने तिला रेलून, ती जवळच आहे ह्या भावनेने निर्धास्त होऊन झोपलेली मुले. पुन्हा विचार आणि पुन्हा जागरण. अरुण जाधवने उद्यापर्यंत उत्तर मागितलंय म्हणून सांगत होता दादा. अरुण जाधव तिच्याशी बोलला तेच त्याच्या ताईने दादाला सांगितले. खरंतर एखाद्या लेकराची त्याच्या आईपासून ताटातूट करावी लागेल ह्या विचाराने दादा मनातून दुखावला होता पण तरीही- "तुझा होकार असेल तर मीही अभी किंवा मनू यापैकी एकाची जबाबदारी घ्यायला तयार आहे." असं सांगून पुढचा निर्णय तिच्यावर टाकून मोकळा झाला.
आता तिच्यासमोर हो म्हणावे, की नाही असा एक मोठ्ठा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला रात्रीचा दाट काळोख सोबतीला होता. काय करावं बरं. हो म्हणावं 'मला आवडला आहात तुम्ही' त्याचे हे शब्द वारंवार तिच्या कानात घुमू लागले. आपल्याला तो आवडलाय का? तिनं स्वतःला विचारून पाहिलं. 'होय... आवडलाय' तिला आतून उत्तर आलं तेव्हा तिची तीच शहारली. कितीतरी दिवसानंतर एका पुरुषी नजरेचा स्पर्श तिनं अनुभवला होता. हॉलमध्ये इतर कुणीही नसतानाचं अरुण जाधवच्या सोबतीचं एकटेपण तिला आवडलं होतं. सतीश गेल्यामुळे आपण नक्की कशाकशाला मुकलो आहोत ह्याचं खरं उत्तर तिला मिळालं होतं. पण... पण त्याची ती अट. समजा आपण होकार दिलाच तर कोणाला दादाजवळ ठेवायचं? मनूला? की अभीला? तिचे विचार कुठल्या कुठे धावू लागले. मनू काही दिवसात मोठी होईल. तिला आईची गरज जास्त आहे. शिवाय पोरीची जात... आईपासून दूर कशी ठेवायची?… पण अभी आपल्याला सोडून राहू शकेल? आजच सकाळी उठल्यावर आई कुठे आहे म्हणून त्यानं चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगत होती वहिनी. दिवसभर त्याच्या मनासारखं वागून वागून मेटाकुटीस आली बिचारी. कालचं जागरण आणि आज दिवसभराची दगदग. शिवाय विचार करकरून दमलेला मेंदू जड झाल्यासारखा तिला वाटला. डोळे बंद करून पडून राहिल्यानंतर काही वेळाने आलेल्या गुंगीत तिनं तिलाच विचारलं. समजा अरुण जाधवला दोन मुलं असते तर...तर त्यांनं तोडलं असतं एक मूल स्वतःपासून? नाही नं? मग आपल्याकडून का ही अपेक्षा? कदाचित माझं एकच तर तुझंही एकच लेकरू असा हिशेब तर नसेल? सुषुप्तीच्या त्या अवकाशात तिने कधीही न पाहिलेली वसू तिला दिसली. म्हणाली- "बाई काय तो योग्य निर्णय घे. माझ्या नवऱ्याची गैरसोय नको व्हायला."- अर्धवट झोपेला स्वप्नातील वसुच्या असल्या बोलण्याने तिला जाग आली. स्वप्नातल्या वसूनं 'माझा नवरा' म्हंटलेलं तिला चांगलंच बोचलं. वसू म्हणाली म्हणून हा अरुण जाधव लग्न करतोय. ती या जगात नसूनही आपल्याकडून तिच्या नवऱ्याची सोय करून घेणार आणि आपण या जगात असूनही आपलं लेकरू अनाथ असल्यासारखं जगणार. नाही. अजिबात नाही.
आपण आपल्या पोरांशिवाय नाही जगू शकणार. केवळ आर्थिक अडचणीमुळे जर मुलं दूर करण्यासारखा निर्णय घ्यावा लागणार असेल तर आपण काहीतरी करायला हवं आता आपणच हिंमतीनं आपल्या पायावर उभं रहायचं. घरी राहून कमवता येण्यासारखी ढिगानं कामं पडली आहेत जगात. त्यातलंच काही शिकता येईल. करता येईल. दादाशी बोलून त्याविषयी ठरवू. पण पोरांना दूर नाही ठेवायचं. आपल्या विचारांवर अधिकच ठाम होत तिनं आपला निर्णय दादाला सकाळी बोलून दाखवायचं ठरवलं. तेव्हा तिचं तिलाच बरं वाटलं. मोकळं वाटलं. रोजच्यासारख्या उगवलेल्या दिवसात रोजच्यासारखी तयारी करताना तिला आपल्या मोबाईलची रिंग ऐकू आली. स्क्रिनवर नाव होतं- "अरुण जाधव" धडधडत्या हृदयानं त्याला नकार देण्यासाठी फोन उचलताच तिकडून त्याच भारदस्त पुरुषी आवाजात अरुण जाधव म्हणाला- "हॅलो..."
त्याचा तोच आवाज ऐकून 'मला आवडला आहात तुम्ही' हे वाक्य पुन्हा तिच्या कानात घुमत गेलं. कुठून सुरुवात करावी असा विचार करत मनाचा हिय्या करून ती म्हणाली- "जरा स्पष्ट बोलू?"
* "बोला.."*
"खरंतर मलाही आवडला आहात तुम्ही पण तरीही माझा नकार आहे या लग्नाला."
"का? मला कळू शकेल" एकाच वेळी तिच्या बोलण्यातील होकाराने सुखावत आणि नकाराने हळव्या होत गेलेल्या आवाजात त्याने विचारले.
"कारण तुमची अट मला मान्य नाही."
तिने हे सांगताच तो किंचित हसल्याचा आवाज तिला आला. तिचा चेहरा प्रश्नार्थक होत गेला. त्याच्या हसण्याचं कारण विचारण्याआधीच तो म्हणाला- "एक सांगू?…"
"हं..."
"तुम्ही अट मान्य केली असती ना, तर मीच तुम्हाला नकार देणार होतो."
"म्हणजे?"- तिने गोंधळून विचारले.
"काल ती अट घालताना मी फक्त तुमची परीक्षा पाहत होतो."
"परीक्षा? माझी?"
"होय..."
"पण का? कशासाठी?"
"सगळं सांगतो. पण त्याहीआधी त्या अटीसाठी सॉरी."- असं म्हणून एक मोठ्ठा श्वास घेत त्यानं पुढे बोलायला सुरुवात केली- "काल आपल्या पहिल्याच भेटीत मला तुम्ही आवडला आहात हे सांगून मी मोकळा झालो होतो. हे नवीन नातं त्यातील जबाबदाऱ्यांसह माझ्याशी जोडलं जाणार आहे हे जाणण्याइतका समजूतदारपणा आहे माझ्यात. पण का कोण जाणे मला तुमचा अंदाज येत नव्हता. तुमचा म्हणजे तुमच्या निर्णयाचा."- मग पुन्हा एक पॉझ घेत त्याने बोलायला सुरुवात केली- "त्या दिवशी कुठल्यातरी दबावाखाली असणारा तुमचा वावर मला अस्वस्थ करत होता. जाणवत होतं की आपण आढेवेढे न घेता आत्ता सरळ सरळ हो म्हणालो तर तुम्हाला स्वतःला 'हो' 'नाही' म्हणण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही. तुमचा होकार फक्त 'तुमचा' असणार नाही. म्हणून मी ती अट घातली. त्याशिवाय तुमचा स्वतःचा निर्णय जाणून घेण्याचा, तुम्हाला जाणून घेण्याचा कोणताच पर्याय माझ्याकडे नव्हता आणि समजा ती अट तुम्ही कबूल केली असती, तर एक आई म्हणून माझ्या नजरेतून उतरला असता तुम्ही. मग मी 'हो' म्हणूच शकलो नसतो."
"......"- इतकं सगळं ऐकून तिला काय बोलावं तेच सुचेना. पण अरुण जाधवच्या एका साध्या अटीने कालपासून उठलेलं वादळ आणि त्याच वादळानंतर तिला तिचे मत असल्याचा नव्याने लागलेला शोध हे सगळं आठवून ती सुखावली.
"हॅलो... ऐकताय नं"- पलीकडून त्याचा आवाज आला, तशी विचारांच्या वर्तुळातून बाहेर येत तिनं फक्त- "हं..." म्हणत आपण आहोत म्हणून हुंकार भरला. त्याबरोबर तो म्हणाला-
"मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. कुठल्याही अटींशिवाय."
त्याचं बोलणं ऐकताना आणि त्या शब्दांचा अर्थ कळताना तिचे डोळे झरू लागले... नकळत...
लेखिका: विनया पिंगळे...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा