शनिवार, १८ मे, २०२४

1143. तिचा वाढदिवस

      अंगणातील खुर्चीवर बसून ती आपल्या लेकाची वाट पाहत होती.सकाळीच तिला त्याने आज लवकर येतो असे सांगितले होते.कारणही तसेच होते आज तिचा वाढदिवस होता.लेकाची वाट पाहत असताना तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ एकदम एखाद्या चित्रपटाप्रमाणे झळकू लागला.लग्नानंतर अचानक नवरा तिला कायमचा सोडून गेला तेव्हा हाच तिचा लाडका लेक पोटात होता अजून त्याने जग पाहिलेच नव्हते.पण जन्म घेऊन ह्या जगात येण्याअगोदर त्याच्या नशिबात दुर्भाग्य येवून जणू त्याची वाट पाहत थांबले होते.पण ती खचून गेली नाही अतिशय कष्टातून तिने ते हलाखीचे दिवस पार पाडले आपल्या बापाला न पाहिलेल्या लेकाची ती आई आणि बाप दोन्ही बनून गेली होती.लेकाला तिने कधीही काहीही कमी पडू दिले नाही.स्वतः अर्धपोटी राहून लेकाचे पोट भरेल याची ती काळजी घेत असायची.मोठा होऊन त्याला छानशी नोकरी मिळाली हिचे देखील आता शरीर थकले होते.आजपर्यंत आपल्या लेकाचे सारे हट्ट पुरे करणाऱ्या तिने त्याला त्याच्या ऑफिसमधील स्वतःच्या आवडीच्या मुली बरोबर लग्न करायला परवानगी दिली.तिला त्याच्या लहान पनापासून सारे म्हणायचे लेकाचे सगळेच हट्ट पूर्ण करायचे नसतात पण तिला अभिमान होता की तिने आजपर्यंत त्याचे सगळे हट्ट पूर्ण केले आणि आज तो देखील लग्न करून खुश होता.हे सगळे चित्र डोळ्यासमोरून जात असतानाच तिचा लाडका लेक आपल्या कारमधून आला   आईला त्याने एक फुलाचा गुच्छ दिला.सोबत आणलेला केक कापला आणि आईसोबत त्याने एक फोटो देखील काढला.सगळे छान झाले होते फक्त त्याच्या फोटो मध्ये पाठीमागे दिसणारी 'मातोश्री वृध्दाश्रम' ही पाटी तेवढी आता खटकत होती...!!!
 
✍️ गिरीश मिठारी. 9561404599
टीप: ईमोजी नको दोन शब्द लिहा जे कथा वाचून मनात येतील ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...