शनिवार, ११ मे, २०२४

1124. संगत किती महत्वाची असते ?

       तो एक फार सुखी मनुष्य होता. आपल्या लाडक्या बायको आणि एकुलत्या एका मुलासोबत  तो फार सुखाने राहत होता. त्याची बदली दुसऱ्या शहरात झाली तिथे काही नवे मित्र त्याला मिळाले. त्यांच्यासोबत तो बाहेर पार्टी वगैरे करायला जात असे. दारू आणि सिगारेट तो पित असे आणि हे त्याच्या बायकोला माहीत होते पण तो गेल्या कित्येक वर्षापासून हे व्यसन करत होता पण एक ठराविक मर्यादा त्याने कधीच ओलांडली नव्हती त्यामुळे ती देखील त्याला काही बोलत नव्हती. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते हा आपल्या मित्रांबरोबर आयपीएल सामने पहायचा आनंद लुटण्यासाठी जात असे. घरी त्याची बायको आणि लहान मुलगा एकटेच असत पण त्याची बायको आपल्या नवऱ्याला मिळणारा आनंद आपण हिरावून घ्यायला नको असा विचार करून ती त्याला काही बोलत नसे. एके दिवशी तो मैदानावर सामना पाहत असताना बायकोचा फोन आला आणि ती रडवेल्या आवाजात त्याला लगेच घरी यायला सांगत होती.तो तडक घरी आला घरी त्याला त्याचा लहान मुलगा दिसून येत नव्हता. त्यानं काळजीने तिला काय झालं विचारले असता त्याला समजले की कुणीतरी अंगणात खेळत असताना तिच्या लहान मुलाला उचलून नेले आणि ते शेजारी राहणाऱ्या काकांनी दुरून पाहिले आणि आवाज दिला तेव्हढ्यात ती गाडी त्यांच्या मुलाला घेऊन वेगात निघून गेली. ह्याला काहीच सुचेना आपल्या सारख्या नोकरदार माणसाच्या मुलाला पळवून नेऊन कुणाला काय मिळणार आहे.पोलिसांत तक्रार द्यावी असा तो विचार करत असतानाच त्याला फोन आला आणि मुलगा जिवंत हवा असेल तर दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. सोबत आलेला मूलाचा व्हिडीओ पाहून त्याला आणि बायकोला रडू आवरेना. पोलिसात जावे तर आजकाल पोलीस पैसे खाल्ल्याशिवाय काही काम करत नाहीत आणि मुलगा हातचा जाईल ह्या भीतीने ते दोघे काय करायचे याचा विचार करू लागले. त्याने आपले आणि बायकोच्या जॉइंट अकाउंट वरील पैसे पाहिले पाच लाख होत होते. अजून पाच लाख कमी पडत होते.बायको ने तिच्या वडिलांना खोटे कारण सांगून पाच लाख मागून घेतले नुकतेच ते रिटायर झाले होते आणि फंड आला होता. ह्या दोघांना एक कळून चुकले की आजकाल मोठ्या रकमेसाठी मोठ मोठ्या लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा मध्यम वर्गीय लोकांना ब्लॅकमेल करणे सोपे झाले आहे शिवाय त्यांचा पोलिसांवर विश्वास नसतो आणि पोलीस देखील जितकी तत्परता पैसेवान लोकांच्या बाबत दाखवतात तशी गोर गरीब लोकांबाबत दाखवत नाहीत असेच मध्यमवर्गीय लोकांना वाटत राहते त्यामुळे हा वर्ग सहज शिकार होऊन जातो. ह्याने देखील कुणालाही न कळवता ठरलेल्या पत्त्यावर दहा लाख रुपये कॅश घेऊन बायकोचा निरोप घेऊन गेला. बायकोने त्याला सांगितले की बाळाला सुखरूप आणा अजून पैसे लागले तर माझे दागिने मोडू पण त्याला काही होऊ देऊ नका. बराच वेळ गेला आणि दाराची बेल वाजली.
     तिने फार आनंदाने दार उघडले तर तिच्या समोर तो उभा होता आणि त्याच्या हातात त्या दोघांच्या लाडक्या लहान बाळाचा रक्ताने माखलेला देह होता. लाडक्या बाळाला दहा लाख रुपये देऊन सोडवून परत असताना अपघात झाला आणि तो बाळ निपचीप होऊन गेला. तो तिच्या पायाजवळ बाळाला घेऊन बसला आणि खूप खूप धाय मोकलून रडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर गेल्या काही महिन्यांतील गोष्टी समोर येवू लागल्या. नवीन मित्रांसोबत त्याला क्रिकेट सामने पहायचा नाद लागला त्यातच तो मजेने म्हणून सट्टा लावू लागला आणि त्यात वाहवत गेला. एक बुकिकडे त्याचे मोठे कर्ज होऊन गेले आणि आता त्याला ते परतफेड करणे अशक्य होऊन गेले. ज्या मित्रांसोबत तो सट्टा लावायचा त्याच मित्रांसोबत त्याने एक निर्णय घेतला आणि बायकोच्या मदतीने पैसे उभे करून बुकीचे कर्ज फेडायचे त्याने ठरवले. पण तो लावत असलेला सट्टा आणि त्याचे बुकीशी असणारे संबंध जर कुणाला कळले तर त्याला नातेवाईक आणि बायकोच्या नजरेत काहीच किंमत राहणार नव्हती आणि म्हणूनच त्याने त्याचे मित्र ज्यांचा गुन्हेगार लोकांशी संबंध आहे  त्यांच्या मदतीने हा प्लॅन आखला होता. सगळे काही व्यवस्थित झाले होते पण त्याच्या मुलाला जाग आली आणि त्याने त्या गुन्हेगार लोकांचे चेहरे पाहिले आणि म्हणून त्याला त्यांनी मारून टाकले आणि अपघाताचा बनाव केला. हा देखील त्यांच्यात सामील असल्याने हा तक्रार करू शकणार नव्हता की कुणाला सत्य सांगू शकणार नव्हता. आज त्याला कळून चुकले की ही अशी लोकं ही कुणाचीच नसतात. शिवाय आपली संगत किती महत्वाची असते बाहेर वेळ घालवण्यापेक्षा आपण जर बायको आणि मुलासोबत घरीच ती वेळ घालवला असता तर ही वेळ आलीच नसती. पण आज त्याला ह्या गोष्टी समजून काय उपयोग होता त्याने तर त्याचा जीवाचा तुकडा गमवला होता जो परत त्याला कधीच मिळणार नव्हता. आता ते निपचीप पडलेले बाळ त्याला जणू विचारत होते "बाबा....माझा काय रे दोष होता??"
         
✍️ गिरीश मिठारी 9561404599
टीप: आपल्या अभिप्रायचे स्वागत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...