मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून माळशिरस मध्ये सकाळी दहा वाजता हजर झालो. कुठल्यातरी ग्राउंड वर मंडप टाकून वेगवेगळ्या टेबल क्रमांकावर काही कर्मचारी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठले गाव आले आहे त्याप्रमाणे ऑर्डर वाटप करीत होते. बाजूला भले मोठे चार-पाच डिजिटल पोस्टर लावलेले होते. त्यावर आपण आपला क्रमांक शोधून गाव पाहायचे व पुन्हा त्या त्या टेबल क्रमांकावर जाऊन ऑर्डर घ्यायच्या अशी साधारण रचना होती. मंडपामध्ये वेंटिलेशन नव्हते त्यामुळे सकाळी सुद्धा उकाडा जाणवत होता. काही बांधव भगिनी खालच्या तळवटावर घोळक्याने बसून होते. त्या घोळक्यातून वाट काढीत आणि आपल्या बॅगा सांभाळत मास्तरांची इकडून तिकडे धावण्याची कसरत चालू होती. डिजिटल जवळ स्त्री पुरुषांची अक्षरशः रेटारेटी सुरू होती. त्याच्या बाजूला जेवणाचा एक टेबल होता तिथेही मला तुलाची गर्दी होती. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की भाजी संपलीय चपात्या नाहीत. माणसं इकडे तिकडे बसून मिळालेले चार घास पोटात ढकलत होते.
मी माझा नंबर शोधला व गाव पाहून जरा बरे वाटले. शिवपुरी बंगला एकशिव. म्हटलं पहिल्यांदाच बंगला चला बरे झाले.. मनातल्या मनात मांडे खात ज्या मंडपात ट्रेनिंग चालू झाले होते तिकडे गेलो. निवडणूक निर्णय अधिकारी साहेबा माइक वरून याला त्याला दम देत होत्या. एकेरीवर बोलत होत्या. कामात चुका झाल्या, हे झाले ते झाले तर तुम्हाला सुट्टी नाही. नोकरी जाईल, खडी फोडाल. हे होईल ते होईल हे आपलं त्यांचं चालू होतं. मुळातच कसलीही किंमत नसणारा अति शूद्रातील शूद्र प्राणी म्हणजे शिक्षक. अशी माझी आता आतापर्यंत धारणा बनत चालली आहे. तुमची बुद्धी,ज्ञान, कौशल्य,क्षमता पी.एच.ड्या नेटी सेटी काय नाय. इथं तुम्हाला कुत्रं किंमत देत नाही. एकीकडे संस्थाचालक फाट्याने हाणतात (सन्माननीय अपवाद वगळून) तर पालक विचारत नाहीत. विद्यार्थ्यांना बरे शिकवले तर ते बाहेर भेटल्यावर चहा पाण्याचे विचारतात.
माझे वडीलही शिक्षक होते. ते ज्या कोपर्डी गावात होते ते गाव सोडून आम्हाला चाळीस वर्षे झालीत आणि वडिलांना जाऊन वीस वर्षे. तरीही त्या गावात कधी मी जातो तेव्हा त्यांच्या आठवणीने गहिवरणारी माणसे मी पाहतो. त्यांच्याच मुळे आम्ही घडलो हे सांगणारी पिढी आता रिटायर्ड होतेय. तर 40 वर्षानंतरही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय इथले झेंडावंदन होत नाही हे ऐकल्यावर तर मला काय बोलावे हे सूचेना. एनीवे वो भी एक दौर था.. ये भी एक दौर है.
तर उन्हाच्या तडाख्यात ढकला ढकली करून तीन बॅलेट युनिट, एक कंट्रोल, युनिट तर एक व्हीव्हीपॅट मशीन, त्याच्यासोबत वजनदार झापडी, साहित्याचे पोते आणि या साऱ्या भानगडी गोळा करून साधारण एक वाजता टीम सदस्यांबरोबर बस कडे रवाना झालो.. तर बस अक्षरशः गर्मीने उकळत होती. अजून एसटीत एक टीम यायची बाकी असल्याने आम्ही बसून होतो. बाजूला चिकटून बाकीच्या बसेस उभ्या असल्याने हवा यायला संधी नव्हती. साधारण अर्धा एक तास भीषण गर्मीचा आस्वाद घेतल्यावर बस निघाली, तर मागचा एक मास्तर विव्हळत बोलला, " अंड्रेड सुद्धा वल्ली झाली राव.."
आदळत आपटत शिवपुरी बंगल्याकडे आम्ही निघालो. तासा भरात शिवपुरीत पोचलो. आजूबाजूला उंच उंच पिंपळाची, वडाची जुनाट झाडी होती. तर त्यामध्ये लपलेल्या 60 च्या दशकात बांधलेल्या कळकटलेल्या दगडी बांधणीच्या इमारती. साऱ्या बंद अवस्थेत. रामसे बंधूंच्या सिनेमात पाहिलेल्या भुताटकीच्या गावाची आठवण झाली. सारे कसे साम सुम होते. एका बाजूला एका ओळीत उतरत्या पत्रांच्या छपराची दगडी घरे होती.. त्यातून काही कुटुंबे राहताना दिसली. शिपायाला विचारल्यावर त्याने सांगितले की इथे वालचंद शेठची उसाची शेती होती. आणि इथूनच रेल्वेतून ऊस तीन किलोमीटर अंतरावरच्या वालचंद नगरला जात होता. तेव्हा इथल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही घरे शेठजींनी बांधली होती. गुरांचे गोठे होते .घोड्यांचे तबेले होते. भाटघर धरणाचे अव्याहत वाहणारे पाणी होते. एकूण 22 हजार एकराचे सारे क्षेत्र होते. इथे हे विजेचे पोल पहा. इथे शेठजींची खाजगी वीज व्यवस्था होती. लोखंडाचे ते मजबूत पोल पाहून मला आश्चर्य वाटले. आता त्या राबत्या जागेचा भूतखाना झाला होता. शेठजींनी 99 वर्षाच्या करारावर घेतलेल्या जमिनी कालांतराने ज्याच्या त्याच्या वारसाकडे गेल्या. ती माणसे आपापल्या शेतात राहू लागली. काहींचे कोर्टकज्जे सुरू झाले, तर पुणे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील ताई दादांनी इथे चार चार हजार एकर जमिनी सरकारी दरबारी आपले वजन वापरून ताब्यात घेतल्या. हे ऐकून मी चक्रावलो. दूर पर्यंत सपाट पसरलेली काळ्याभोर मातीची शेती होती. वादातील जमिनीत बाभळी तर इतर ठिकाणी ऊस दिसला. शिपाई म्हणाला सर येथे बघायला कोणी नाही त्यामुळे दरवर्षी हे ऊस वाले शेतकरी पाटा दोन पाटा बांध कोरतात.
मग तो आम्हाला बूथकडे घेऊन गेला.. जुन्या काळातील पत्र्याची दोन्ही बाजूला उतरत्याच्या छपराची ती जुनाट शाळा होती.. पुढे पत्र्याचीच उतरती ओसरी होती. शिपायाने रूम उघडली तर आत मध्ये अंधार होता. डोळ्याला थोडे दिसू लागल्यावर ती रूम कधी उघडली होती का नाही याची शंका यावी इतकी अस्वच्छ होती. फ्लोरिंग फुटलेले होते. जाळ्या जळमटं कचरा धूळ यांची भरमार होती. बाजूच्या खिडक्या उघडल्यावर थोडा उजेड आत आला. प्रचंड उकाडा होता. हे सारे बघून आम्हाला आमचीच कीव वाटली. एक महिना आधी बूथ इन्स्पेक्शन होते. पीडब्ल्यूडी वाले येऊन दुरुस्ती करतात, सफाई करतात, त्याप्रमाणे रिपोर्टिंग होते. इसी ला कळवले जाते, पण इथे असलं काहीच नव्हतं. उद्या दिवसभर यातच मरायचे या कल्पनेने अंगावर काटा आला. तर भ्रष्ट व्यवस्थेची नेहमीप्रमाणे चिड आली. पण करणार काय शिक्षक ना. या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली नक्की पैसे खाल्ले असणार. इलेक्शन म्हटलं की अधिकाऱ्यांची चांदी असते. कितीतरी पैसा येतो ( साधारण तालुक्याला पस्तीस कोटी येतात असे ऐकले.. खरे खोटे देव जाणे..)पण त्याचे ऑडिट होत नाही असे समजले. त्यामुळे वरपासून खालपर्यंतचे बारीक चिरीक अधिकारी दाबून पैसा खातात. त्यामुळे आता कुठे कोणी मुलगा एमपीएससी पास झाला तर मला त्याचे कौतुक करावेसे वाटत नाही किंवा त्याच्या सत्कार सोहळ्यात मी सामील होत नाही.. कारण भविष्यात हा मुलगा जिथून मिळेल तिथून पैसा खाणारच असतो.. त्यामुळे त्याचे कौतुक ते काय?
इथे इसी म्हणते की मतदान कर्मचाऱ्यांची कसलीच गैरसोय होणार नाही पण प्रत्यक्षात वास्तव भयानक होते. आत मध्ये टेबलं अस्ताव्यस्त होती.. दोन मिनिट सुद्धा त्या गर्मीत थांबू वाटत नव्हते.. फॅन नव्हता नंतर तो आणला.. शिपायाला रूम साफ करायला सांगितली तर त्याची टंगळ मंगळ सुरू झाली. त्या तिरीमिरीतच झेड.ओ. ला फोन लावला. म्हटलं इथं असं असं आहे. इथले फोटो व्हिडिओ काढून डायरेक्ट ईसी ला पाठवतो. मग त्यांनी बी.एल.ओ ला फोन केला. ते धावत पळत आले. म्हणाले "सर आम्ही सारखा रूम बदलण्यासाठी रिपोर्ट करतो पण ही प्रक्रिया वरून असल्याने तिकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे बदलत नाही. इथे कोणताही वर्ग भरत नाही. फक्त निवडणुकीपूर्ती ही रूम उघडली जाते." पत्र्याचे पार्टिशन मारून पलीकडे सारे स्क्रॅप टाकलेले होते... वा रे लोकशाहीचा उत्सव. मग आम्ही इकडून तिकडे टेबलं लावली.. बूथ बनवले आणि झेड ओला म्हटले आम्ही इथे झोपणार नाही.. साहित्य चोरीला गेले किंवा काय झालं तर गेलं खड्ड्यात. मग त्यांनी बाजूचीच त्यातल्या त्यात बरी, वर्ग भरणारी एक खोली उघडून दिली. येथे डगमगणारा फॅन होता. खाली कसले झाडलेले नव्हते. शिपायाने व तिथल्याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कुठून तरी खूप मळलेली सतरंजी साऱ्या व्हरांड्यातल्या धुळीतून ओढत आणली व ती तशीच त्या खोलीत धुळीत अंथरली.साऱ्या खोली भर धुराळा उडाला.. वरचा फॅन नुसता धडपडत होता. रात्रीचा मुक्काम तिथेच केला ..रात्री गोम सदृश कीटक नाइट पॅन्ट मधून आत शिरून मांडीला चावला तर त्याकडे दुर्लक्ष करून पहाटे चार ची वाट पाहत झोप आणण्याचा प्रयत्न केला.. अधून मधून मच्छर चावतच होते. पहाटे चारला उठून अंधारातच संडासाचे डबडे हुडकून मोबाईल बॅटरीने शेताडीकडे गेलो. नुसता अंधार होता.. त्यात अधून मधून पिंपळाची सळसळ ऐकू येत होती.
सारे आवरावर करून साडेपाचला आम्ही मॉक पोल सुरू केला. तीन बॅलेट युनिट, 32 उमेदवार व एक नोटा.. त्या साऱ्या मशीनची जोडणी व्यवस्थित केली. ज्याला घरातल्या सुद्धा लोकांची मते पडणार नाहीत अशी मंडळी निवडणुकीला उभी राहिली होती. कशाला उभे राहतात कोणास ठाऊक. संविधानाचा, संविधानाने दिलेला अधिकाराचा किती गैरफायदा घ्यायचा? यंत्रणेवर, ती राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा किती ताण येतो याची त्यांना काही कल्पना असते का? की संविधानाने दिला आहे उभा राहण्याचा अधिकार म्हणून स्वतःला 100 मतेही पडणार नाहीत याची खात्री असताना सुद्धा खुशाल उभे राहायचे?? कधी कधी वाटते इसी ने ना निवडणुकीचे डिपॉझिट पाच लाख करावे किंवा घटनेत बदल ,( च्यायला आले का तिथेच..) करून अशा निवडणुकांमध्ये उभे राहण्याचे निकष जरा काटेकोर करायला हवेत.. काही बदल करायला हवेत.. हे वाचून एखादा वाचक म्हणू शकतो मग काय गरिबांनी उभे राहूच नये की काय?? काय बोलताय तुम्ही?? गरीब को इज्जत नही होती क्या??? वगैरे. इथून पुढे खरी मजा सुरू झाली.. आमच्या बुथवर कॅमेरा होता. वेब कास्टिंग चालू होते.. सकाळी सात वाजता बुथ समोर जी लोकांची गर्दी होती ना, ती संध्याकाळी सात पर्यंत संपलेली नव्हती. आमचे काय हाल झाले त्याची सांगता सोय नाही.. प्रचंड उकाडा... ही गर्दी.. तणातनी, वादावादी.. लोक ऊन म्हणत नव्हते.. कामाला जायच्या अगोदर गर्दी.. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत गर्दी... काम बुडवून गर्दी.. कोण कोणासाठी काम थांबवून, बुडवून मताला येईल म्हणजे किती पैसा वाटलेला असणार?? सारे मजूर कामगार मंडळी.. आपण फक्त पैसे मिळालेत म्हणून मतदान करतो. एवढेच माहीत असणारी ही मंडळी होती. बाकी काही नाही.. कळकट कपड्यातले मळकट कार्यकर्ते उत्साहाने म्हाताऱ्या कोताऱ्यांना मतासाठी धरून आणत होते. बोटाला शाई वगैरे लावल्यावर म्हणतायेत साहेब यांना दिसत नाही मी त्यांचं मतदान करतो. मग आम्ही नाही म्हणतो. कॅमेरा चालू आहे असं सांगतो. पण त्याचा त्यांच्यावर काही फरक पडत नसतो. मग आम्ही खिशातून दहाची नोट काढून हे किती रुपये आहेत असे त्या म्हातार्यांना विचारतो तर ते लगेच ती नोट ओळखतात. मग त्यांना दिसत नाही हा मुद्दा आम्ही बाद करतो. म्हातारा बूथ मध्ये जाऊन नुसता उभा राहतो. कुठलं काय दाबावं याबाबत गोंधळलेला असतो. मग केंद्राध्यक्ष त्यांना समजावून सांगतो. कसं बसं बटन दाबून म्हातारा निघून जातो. काही वेळेला तिसरच काहीतरी दाबल्यासारखे करून म्हातारं बाहेर पडतं. कंट्रोल युनिट जवळ बसलेल्या मॅडमचे लक्ष थोडे विचलित झालेले असते. त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. तोपर्यंत दुसराच कोणी बूथ मध्ये शिरलेला असतो. अगोदरच्या म्हाताऱ्यासाठी बॅलट सोडलेलेच असते त्यामुळे पटकन बटन दाबून तो मत देऊन मोकळा होतो. मग मॅडमच्या ध्यानात येते की कंट्रोल युनिट मधील टोटल आणि 17 ए या वहीवरची टोटल जुळत नाही. कंट्रोल युनिट मध्ये एक मत कमी असते. मग लक्षात येते मघाच्या म्हाताऱ्याने बटन दाबलेच नाही. केंद्राध्यक्ष गोंधळतात.. त्या म्हाताऱ्याने बटन दाबले नाही हे कळल्यावर कार्यकर्ते बाहेर पळत जाऊन त्याला पुन्हा कुठून तरी धरून आणतात. पुन्हा त्याला सर्व समजावून त्याच्याकडून वोटिंग करून घेतले जाते.
हे असले भारतीय नागरिक ढिगाने प्रत्येक गावात सापडतात. त्यांना लोकसभा, संसद देश, परदेश काय माहीत नसते. ही साधी माणसं असतात.. त्यांना राजकीय छक्के पंजे कळत नाहीत.. यांच्या जीवावर आपण आणि आपली लोकशाही असते. आपल्यासारखी खूप सारी माणसे अधून मधून लोकशाही धोक्यात आहे असा नारा सातत्याने मुद्दाम देत असतात. पण मला वाटते की या असल्या माणसामुळेच खरी लोकशाही धोक्यात येते हे आपण जाणीवपूर्वक विसरतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतो. लोकशाही कमकुवत करून टाकतो. तसे यावर बोलणे म्हणजे शिव्या खाणे. म्हणूनच कुणी बोलणार ही नाही. बारा वाजता जेवणाचा निरोप येतो पण गर्दीच इतकी असते की एकाही कर्मचाऱ्याला हलणे शक्य नव्हते. मी ओळख पटवतोय.. मतदाराच्या नोंदवहीत मतदाराचा क्रमांक शोधून त्यावर आडवी रेघ मारतोय.. स्त्री पुरुष अशी वर्गवारी करतोय.. ओळखपत्र मागतोय. मग माझ्या शेजारचे सर त्याचा क्रमांक, ओळख क्रमांक 17 ए या वहीत मांडून त्याची सही घेतायेत. मॅडम त्याच्या बोटाला शाई लावून बॅलेट सोडतात आणि त्याला बूथ मध्ये पाठवून तो खरेच मतदान करतोय का ते काटेकोर बघतायेत. केंद्राध्यक्ष कागदाच्या पसाऱ्यात गोंधळून गेलेत. पोलिंग एजंट अधून मधून त्यांचे डोके खात आहेत. ते वैतागलेत. इकडे आमच्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतेय. दुपारी दोन वाजता एक एक जण जाऊन वसावासा खाऊन आला. तोपर्यंत केंद्राध्यक्ष त्यांच्या जागेवर खिंड लढवत बसले. त्यांना माहित नसल्याने त्यांच्या चुका नंतर आम्ही निस्तारल्या तो भाग वेगळा.. सहाला मतदान संपल्यावर बाहेरच्या 47 लोकांना चिठ्ठ्या दिल्या.. नंतर आलेले पाच 50 माघारी गेले.
सात वाजता मशिनी बंद केल्या. सिलिंग वगैरे झाले. मग कागदपत्रे, पाकिटे बनवण्याची धडपड. आदल्या रात्री मी सर्व पाकिटांचे त्यात योग्य तो कागद घालून सॉर्टिंग करून ठेवलेले. पण केंद्राध्यक्षांनी सारा राडा केलेला.. त्यांना सारे सांगूनही त्यांनी करायचे तेच केलेले होते.त्यामुळे माझी चिडचिड झाली. रात्री काहीतरी चावले होते ते बऱ्यापैकी ठणकत होते. बाहेर जाऊन पाणी पिऊन जरा पाच मिनिटे निवांत बसलो.. तेवढ्याच शिपाई आला. म्हणाला, "सर केंद्राध्यक्ष कागदाच्या ढिगार्यात बसलेत. त्यांना काय सुधारत नाही." त्यानंतर साडेनऊ दहा पर्यंत पाकिटे बनवली. सील केली. दहा वाजता मोकळा झालो. सारा कचरा गोळा करून बसची वाट पाहत बसलो. बस आली.. पुन्हा माळशिरस. एक नंबर ला साऱ्या मशिनी जमा करायच्या तर तिथे ही रेटारेटी. अर्धा एक तासाने नंबर आला. बऱ्याच लोकांच्या तोंडाची दुर्गंधी सहन करीत मशीन जमा केल्या वर जरा बरे वाटले. पुन्हा 25 नंबर वर पाकिटे जमा करण्यासाठी गेलो तर तिथेही ढकलाढकली. तिथेही हे भरा ते भरा हे पाकीट फोडा पुन्हा सील करा असे करीत अर्धा पाऊण तास गेला. तिथलं संपल्यावर 14 नंबर वर झापडी व इतर साहित्य जमा करायला पळालो. तिथे तेवढीच गर्दी. त्यांना सर्व शिक्के, पितळी मोहर हातात हवी होती. आम्ही ती पाकीट बंद केलेली. पुन्हा ती पाकीट फोडली. ते शिक्के बाहेर काढले पुन्हा नंबरवर उभा राहिलो.
सर्व साहित्य जमा करेपर्यंत साडेबारा झालेले. जेवण संपलेलं असते. मी नुस्ता पाणी पितोय. एक वाजता करमाळा बस मध्ये बसलो तर कंडक्टर तिकीट फाडतोय. 150 रु. तिकिटाचे पैसे दिले. हे सारे पहिल्यांदा घडत होते. एकूण 1300 रुपये मिळाले होते त्यातले १५० तिकिटाचे गेले. अकलूजला येऊन ट्रेनिंग घेतले त्याचा आमचा खर्च साडेआठशे झाला. सर्व मिळून 950 रुपये खर्च ऑलरेडी झालेला होता. त्यात गावातील ट्रेनिंग आणि प्रचंड शारीरिक मानसिक त्रास. हे सर्व देशासाठी सहन करून 350 रुपये हातात पडले. रात्री तीनला घरी आलो. सकाळी आंघोळ करताना पाहिले तर मांडीला चावलेल्या त्या ठिकाणी चांगली जखम झालेली होती. सकाळी दहा वाजता जेवण करून दवाखाना गाठला. इंजेक्शन गोळ्याच्या वगैरे 650 रुपये गेले. एकूणच या इलेक्शनला मी असा मायनस मध्ये गेलो. मग मनात आले धन्य ते इलेक्शन धन्य ती लोकशाही. कोणाला वाटेल देशासाठी दोन दिवस तुम्हाला त्रास सोसला नाही लगेच बसला लिहित. पण राव माझी नेमणूक पोरांना शिकवण्यासाठी झालेली असताना उद्या तुम्ही जर मला देशासाठी सीमेवर पाठवायला लागलात तर ते योग्य होईल का?? देशासाठी काही पण हे नुसतं म्हणायला चांगला असतं. एकूणच कोणी काही इलेक्शनचा फार चांगला अनुभव आला असं अजून तरी म्हणाला नाही हे विशेष.
भीष्मा चांदणे
करमाळा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा