शनिवार, १८ मे, २०२४

1140. शेवटी उमजले

 रात्रीचे दहा वाजले होते. दूधाचा कप घेऊन उदयने खोलीत प्रवेश केला. त्याने पाहिले की त्याची पत्नी उल्का भिंतीकडे तोंड करून पलंगावर पडली होती
उदय म्हणाला “ उल्का, ऊठ. आईने हे हळदीचे दूध दिलेआहे ते पी. जेवायला का नाही आलीस तू?  काय झाले तुला?”
उल्का उठून बसली व म्हणाली “ वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस. गेले आठ दिवसांपासून मी तुला काही सांगते आहे पण तू ढिम्म लक्ष देत नाहीस.”
उदय म्हणाला “ ओह ! म्हणून तू क्रोधागरात जाऊन बसलीस. उल्का तुझे डोके फिरले आहे का? शांतपणे आयुष्य चालू आहे आपले. व्यवस्थित घडी बसली आहे आपल्या दिनक्रमाची. त्यात तुला खळबळ नाही भूकंप का माजवायचा आहे? बरं, ज्या गोष्टीचा तू हट्ट धरून बसली आहेस, ते आपल्याला लाभदायक आहे का याचा विचार कर.”
उल्का म्हणाली “ दर वेळेस तोलून मोलून वागायचे असते का? कधी कधी आपल्या मनाला येईल तसे वागायला नको का? या जन्मात आपली हौस नाही पुरवायची तर मग केव्हा?
उदय तडकून म्हणाला “ आपल्या प्रेमाच्या माणसांना सोडून दूर कुठल्यातरी उपनगरात रहायला जायचे ही तुझी हौस. या घरात तुला काही त्रास आहे का असे विचारले तर नाही म्हणतेस. काय कारण आहे असा वेडा हट्ट धरण्याचा?”
उल्का म्हणाली “ मला माझा स्वत:चा संसार हवा आहे. छोटेसे का होईना माझे स्वत:चे घर हवे आहे.”
उदय तिला समजावत म्हणाला “ हे प्रशस्त, आधुनिक सोयीने सुसज्ज घर तुझेच आहे. आपण दोघांनी विवाहाचा निर्णय घेण्याअगोदर मी तुला नीट समजावले होते की एकत्र कुटुंबात रहावे लागणार म्हणून. त्या वेळेस तुझा काहीही आक्षेप नव्हता.”
त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली “नव्हता. पण माणसाचे विचार बदलतात. त्याच्या आवडीनिवडी बदलतात. शिवाय आपण भांडूनतंडून घराबाहेर पडत नाही आहोत.”
उदयच्या रागाचा पारा चढला. तो म्हणाला “ महामूर्ख आणि अप्पलपोटी आहेस तू. तुला काही समजवायचे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे.”                    
रागाच्या भरात तो खोलीबाहेर आला व घराबाहेर जाण्याचा दरवाजा उघडला नाही तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. चमकून त्याने मागे पाहिले. पाठीमागे त्याचे वडील उभे होते.
त्यांनी विचारले “येवढ्या रात्रीचा कुठे निघाला होतास?”
तो म्हणाला “ मोकळ्या हवेत. डोके भणभणतेय माझे.”
त्याचे वडील म्हणाले “चल आमच्या खोलीत. बोलायचे आहे तुझ्याशी.”
तो मुकाटयाने वडिलांबरोबर त्यांच्या खोलीत गेला. त्याची आई जागीच होती. ती म्हणाली “ ये. बस माझ्याजवळ आणि मन हलके कर तुझे. तुम्हा दोघांमध्ये कशावरून धुसफुस चालली आहे याची कल्पना आहे आम्हाला.”
“आई, उल्काला वेगळा संसार मांडायचा आहे. मला ती कल्पनाही सहन होत नाही. तुम्हा सर्वांना सोडून दूर रहायला मला नाही जमणार.”
आई म्हणाली “ कोणाकडून काही त्रास आहे का तिला?”
उदय म्हणाला “ तसे काहीच नाही. सर्वजण तिच्याशी प्रेमाने वागतात असे ती म्हणते. फक्त तिला स्वत:चा संसार हवा आहे. हा निव्वळ पोरकटपणा आहे.”
बाबा म्हणाले “ पोरकटपणा तर आहेच पण होऊन जाऊ दे तिच्या मनासारखे.”
उदय म्हणाला “ काय बोलत आहात बाबा तुम्ही!”
बाबा म्हणाले “ एकदा का वैवाहिक आयुष्यात पदार्पण केले की तडजोड ही करायलाच लागते. पती पत्नीला एकमेकांच्या सुखाचा विचार करावाच लागतो. “
उदय म्हणाला “मान्य आहे मला. वेगळे घर करण्यामध्ये फायदा आहे की तोटा याचा विचार करायला नको? घरभाडे, येण्याजाण्याचा खर्च वाढणार. आमच्या कामाच्या जागा या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. आमचे दोघांचे पगार काही खास नाहीत तरीपण आम्ही दोघेजण छानछोकीत राहू शकतो शिवाय दरमहा चांगली बचत करू शकतो. हे सर्व आपण एकत्र राहतो म्हणून शक्य आहे हे उल्काच्या लक्षात का येत नाही.”
बाबा म्हणाले “ अगदी बरोबर पण उल्काच्या लक्षात येत नाही. ती मनस्वी स्वभावाची आहे. तुम्हा दोघांचे काहीतरी बिनसले आहे हे जसे आम्हाला उमजले तसे घरातील इतरांनापण उमजले असणार. आतापर्यंत तरी आपण सर्वजण गुण्यागोविंदाने  राहत आहोत. एक दुसऱ्याला समजून घेण्याची कुवत सर्वांकडे आहे. उल्का अशीच धुसफुसत राहिली तर त्याची सावली घरावर पडण्याची शक्यता आहे. मला व आईला ते नको आहे कारण तुम्हा तीन मुलांना एकत्र ठेवण्यासाठी आम्ही खूप झटलो आहोत. ते एक कारण. तरूणपणात वैवाहिक जीवनाची मजा लुटण्याऐवजी तुम्ही एकमेकावर नाराज होऊन बसलात. तडजोड करण्यात शहाणपणा आहे. जा उल्काकडे. सांग तिला की तिच्या इच्छेप्रमाणे होईल मात्र आमच्या काही अटी आहेत.”
उदयने विचारले “ त्या कोणत्या?”
बाबा म्हणाले “ आपल्या इमारतीचा पुनर्विकास झाला तेव्हा आपण शेजारची सदनिका विकत घेतली. आपल्याकडे पैसे नव्हतेच पण भविष्यात सर्वांचे वाढते कुटुंब लक्षात घेऊन आपण कर्ज काढले व ती सदनिका विकत घेतली. त्या नंतर इमारतीच्या पुनर्विकासाबरोबरच सदनिकेचे नूतनीकरण करणे आवश्यक होऊन बसले. जी काय तोडफोड करायची ती एकदाच केलेली बरी म्हणून आपण वास्तुविशारद नेमला. घरासाठी उत्कृष्ट प्रतीचे सामान वापरले व ही सुरेख, प्रशस्त वास्तु अस्तित्वात आली. आपल्या मुलांचे संसार या वास्तुत व्यतीत होत आहेत म्हणून आम्हाला खूप संतोष वाटतो कारण आम्ही कित्येक वर्ष जागेची टंचाई अनुभवली होती. सांगण्याचा उद्देश्य हा की तुम्ही तिघा भावांनी कर्जाचे हफ्ते भरण्याची जबाबदारी घेतली व ती आजपर्यंत चालू ठेवली. तू जरी वेगळा झालास तरी तुझ्या हिश्शाचा कर्जाचा हफ्ता तुला भरायला लागेल.”
उदय म्हणाला “ मान्य आहे मला. या बाबतीत मी वचनबद्ध आहे व मी दिलेले वचन पूर्ण करेन.”
बाबा पुढे म्हणाले “ दुसरे म्हणजे तुम्हाला परत येण्याची एकच संधि मिळेल. परत आले, परत गेले असे चालणार नाही. अटी मान्य असतील तर आम्हाला सांग. त्या नंतर आम्ही घरातील इतर मंडळींच्या कानावर घालू. आपल्या नात्यात कुठलाही कडवटपणा येणार नाही याची काळजी घेऊ. असे बघ उदय, पाण्यात उतरल्याशिवाय ते कीती खोल आहे हे समजत नाही.”
उदय खोलीत शिरताच उल्काने विचारले “. झाले डोके शांत? येवढ्या रात्री घराबाहेर जायचे कारण काय होते? उगाच माझ्या जीवाला घोर.”
उदय तिला जवळ घेत म्हणाला “ तुझे म्हणणे पटले मला. तुला येवढे प्रकर्षांने वाटते तर आपण दुसरा, फक्त आपला संसार मांडू या.”
उल्का ताड्कन उठून बसली व म्हणाली “ काय? म्हणतोस काय?”
उदय म्हणाला “ मी नीट विचार केला की आपण भांडूनतंडून घराबाहेर पडत नाही आहोत मग तुझ्या मनासारखे होऊ द्यायला काय हरकत आहे? मी उद्या परवाकडे आई बाबांना सांगेन. बघू काय म्हणतात ते. सर्व प्रथम घर शोधायला लागेल.”
उल्का म्हणाली “ घराची काळजी करू नको. माझी मैत्रीण सुस्मिता आहे नं तिच्या शेजारची सदनिका आज बरेच दिवसांपासून रिकामी आहे. सुस्मिता म्हणाली की तुझे नक्की झाले की सांग म्हणजे ती घरमालकाशी बोलेल. ते तिच्या ओळखीचे आहेत.”
उदय म्हणाला “ अरे वा!अर्धी चिंता दूर झाली. “
उल्का म्हणाली “ जरा लांब आहे पण सुस्मिता म्हणाली की थोडा प्रवासाचा त्रास होतो पण घरी आले की खूप शांत, निवांत वाटते. त्या बाजुला भरपूर झाडी आहे व रहदारी पण कमी आहे.”
उदय म्हणाला “ उद्याच फोन कर सुस्मिताला आणि आपला होकार कळव.”
       दोन दिवसांनी  उदयने त्याच्या आईवडीलांना  त्याचा व उल्काचा निर्णय पक्का असल्याचे कळविले. उदयचा निर्णय कळताच बाबांनी त्यांच्या दोन्ही मुलांना व सूनांना उदय व उल्का दुसरीकडे रहायला जात असल्याचे कळविले. बाबांचे बोलणे ऐकून सर्वजण चकित झाले. सर्वांच्या चेहेऱ्यावर पण का? हे प्रश्नचिन्ह उमटले.                    बाबा म्हणाले “उल्काला तिचा वेगळा संसार हवा आहे. उदयला ते पटत नाही पण संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी नवरा बायकोचे एकमत असणे आवश्यक असते. तेव्हा त्याने उल्काच्या मनासारखे करावे. नाराज होऊन एकत्र राहण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. माझी तुम्हा सर्वांकडून एकच अपेक्षा आहे की आपल्या नात्यात कडवटपणा यायला नको.”
बाबांचा वडील मुलगा म्हणाला “ आई, बाबा  तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्वजण सांभाळून घेऊ.”
दुसऱ्याच दिवशी उल्काने सुस्मिताला घराबद्दल फोन केला व तिला धक्काच बसला. 
सुस्मिता म्हणाली “ उल्का, अगं ते घर गेले. घरमालकाचा भाचा कुठूनतरी बदलून आला. तो रहात आहे त्या सदनिकेत."
    रात्री जेव्हा उदय व उल्का झोपायला आले तेव्हा उल्काने त्याला घराबद्दल सांगितले तेव्हा उदय म्हणाला “ हरकत नाही. दुसरीकडे मिळेल की घर. जरा शोधायला लागेल.” उद्यापासून आपण घरे बघायला सुरवात करू. झोप आता. दुसऱ्यादिवशीपासून उदय व उल्का घर शोधायला निघाली पण मनासारखे घर मिळेना. एक तर ते राहत असलेल्या घरापुढे सर्व घरे फिकी पडत. शिवाय उल्काचे घराबाबत काही ठोकताळे होते त्यात कुठलेच घर बसेना.
उल्काला ऐसपैस स्वयंपाकघर हवे होते. बाल्कनी तर हवीच होती जिथे ते दोघे संध्याकाळी चहा पीत  बसणार होते. बाल्कनीसमोर मोकळे मैदान हवे होते. घर तिसऱ्या किंवा चौथ्या  मजल्यावर असायला हवे होते. लिफ्ट तर असायलाच हवी होती. शेवटी एका सहजीवनात तिसऱ्या मजल्यावरची एक सदनिका त्यांनी निश्चित केली. उल्का थोडी फार नाखूशच होती. उदयने तिला स्पष्ट शब्दात सांगितले की तिने सध्या राहत असलेल्या घराशी तुलना करू नये. ते घर भरपूर पैसा खर्च करून व उत्कृष्ट प्रतीचे सामान वापरून बाबांनी स्वत:च्या नजरेखालून बांधले होते.  त्या नंतर ती दोघे उल्काच्या आई बाबांना ते दुसरीकडे रहायला जाणार आहेत ही बातमी द्यायला गेले.
बातमी ऐकताच उल्काच्या घरचे त्या दोघांवर तुटून पडले. उल्काची आई म्हणाली “ ही काय अवदसा आठवली तुम्हाला? देवमाणसे तुझ्या सासरची मंडळी. त्यांना सोडून दुसरीकडे रहायला जायचे कारणच काय? घर. म्हटले की भांड्याला भांडे लागणारच.” उल्काच्या आईचा राग अनावर झाला.
बाबांनी तिला कसेबसे शांत केले. ते उदय जवळ गेले व म्हणाले “हे काय खूळ घातले डोक्यात? अहो, गोकुळासारखे घर तुमचे. सर्वजण प्रशंसा करतात तुमच्यामध्ये असलेल्या एकीची. प्रत्येक कुटुंबात वादावादी होतेच पण वेगळे व्हायच्या टोकाला जाऊ नका.”
उदयने बाबांचा हात हातात घेतला व म्हणाला “ बाबा, गैरसमज करून घेऊ नका. आमचे घरच्या लोकांशी काहीही वादाविवाद झाले नाहीत. उल्काला तिचा स्वत:चा वेगळा संसार हवा आहे. तिचे स्वत:चे छोटे का होईना घर हवे आहे. आम्हाला घरून संमति मिळालेली आहे.”
     सर्वांनी तिच्यावर तोफा डागायला सुरवात केली. ते सहन न होऊन उल्का घराबाहेर पडली व तिच्या पाठोपाठ उदय पण निघाला. डोळ्यातून येणारे पाणी निपटत उल्का म्हणाली “ माझीच माणसे पण कशी तुटून पडली माझ्यावर.”
उदय तिला म्हणाला “ नको वाईट वाटून घेऊ. आपल्या निर्णयावर उलट, सुलट प्रतिक्रिया होणारच. त्याला तोंड द्यायची तयारी ठेव. हळू हळू उल्काच्या घराचे बस्तान बसले. उल्काला सर्वच नवीन हवे होते म्हणून नवीन भांडी, नवीन फर्निचर, रेफ्रिजरेटर, वॅाशिंग मशीन इत्यादी वस्तुंची खरेदी झाली. उल्का स्वत:च्या घरावर खुश झाली. शेजारी राहणाऱ्या मीराताईंकडे घरकाम करणाऱ्या कालिंदीला कामाबद्दल विचारले व तिने त्वरित होकार दिला. आगगाडीचा प्रवास तसा त्रासदायक होता पण उल्काने जुळवून घेतले. संध्याकाळी स्टेशनवरून येतांना ती भाजी, इतर सामान विकत आणत असे. घरी आले की कालिंदीने चकाचक केलेले घर पाहून ती खूश होत असे. नंतर चहा, उदयशी गप्पाटप्पा करत ती स्वयंपाक करत असे. जेवतांना मात्र तिच्या वाट्याला निराशा येत असे. कीतीही प्रयत्न केला तरीही घरच्या जेवणाची चव तिने रांधलेल्या पदार्थांत उतरत नसे त्यामुळे पोट भरले तरी मन भरत नसे. त्या संध्याकाळी उल्का व उदय दोघेही एकाच गाडीने पोहोचले. दोघेही गप्पा मारत घरी आले. उल्काने घराचा दरवाजा उघडला व तिला धक्काच बसला. सर्व घर अस्ताव्यस्त पडले होते. स्वयंपाकघरात ओट्यावरचा पसारा जसाच्यातसा पडला होता. सिंकमध्ये रात्रीची भांडी पडली होती. बिछान्यावर चादरी तशाच अस्ताव्यस्त पडल्या होत्या. वॅाशिंग मशीनमध्ये कपडे तसेच पडले होते. आपल्या घराचे असे बेरूप पाहून उल्काला उबग आला. 
उदय म्हणाला “ कालिंदी कामावर आलेली दिसत नाही.”
तेव्हाच शेजारच्या मीराताई आल्या व म्हणाल्या “ उल्का, आज कालिंदीने बुट्टी मारली. असेच करते ती. अधूनमधून खाडे केल्याशिवाय रहात नाही.”
उल्का म्हणाली “ असे असेल तर मी तिचे खाड्याचे पैसे पगारातून कापेन.”               
मीराताई चट्कन म्हणाल्या “ असे करू नकोस बाई. आसपासच्या सर्वच कामवाल्या बाया खाडे करतात. निदान कालिंदी कामात चोख आहे.”
      शेवटी उल्का व उदयने कामे आटोपली तोपर्यंत स्वयंपाक करायला उशीर झाला. उदय समोरच्या पोळीभाजी केंद्रावर गेला व जेवण घेऊन आला. ते दोघे जेवायला बसले. मसुऱ्याची उसळ पाहून उल्का किंचाळली “ ही उसळ का आणलीस? तुला माहित आहे ना मला आवडत नाही आणि भोपळ्याची भाजी. मला नाही जेवायचे.”
उदयने तिची समजूत काढली. तो म्हणाला “ सर्व पदार्थ संपले होते. मी उगाच तुला नावडणारे पदार्थ आणीन का? संसार म्हटले की अडीअडचणी येणारच. चल. जेवून घेऊ या. दोघेजण चुपचाप जेवले व झोपी गेले. 
     दुसऱ्या दिवसापासून रहाटगाडगं व्यवस्थित चालू झाले. त्यानंतर एक दिवस रात्री जेवतांना उदय म्हणाला “ मला उद्या कामावरून येतांना प्रथम घरी जावे लागेल .बाबांना त्यांच्या आर्थिक व्यवहारात काही मदत हवी आहे. मी जेवूनच येईन. तू वाट बघू नकोस.”
उल्का म्हणाली “. ठीक आहे. लवकर ये.”
दुसऱ्या दिवशी रात्री उशिराने घरी आला. उल्का जेवण आटोपून  मोबाईलवर संदेश बघत बसली होती.
उदयला पाहताच तिने विचारले “ झाले काम?”
उदय म्हणाला “ होय. जास्त काम नव्हते. बाबांचा गोंधळ उडत होता.”
उल्का म्हणाली “ वय झाले त्यांचे. असे होणारच.” नंतर तिने सहज विचारले “ काय जेवूनआलास रे?”
उदय म्हणाला “ नेहमीचे जेवण. भरली वांगी, मुगाची भजी घालून कढी आणि बाजरीची भाकरी. खास म्हणजे खरवस होता. अस्सल खरवस. वांग्याच्या भाजीत कोवळे तुरीच्या शेंगांचे दाणे टाकले होते. मस्त लागत होते. बरं, मी दोन चार तांबे अंगावर टाकून येतो. घामेजून गेलो आहे.”
      उल्का मनात म्हणू लागली की हा चांगला जेवणावर हात मारून आला असेल. माझ्यासाठी मात्र आईंनी काही पाठवले नाही. निदान खरवस तरी पाठवायचा. दृष्टि आड सृष्टी म्हणतात तेच खरे. तेवढ्यात उदयच्या हाका तिच्या कानावर पडल्या. त्याला काय हवे आहे ते ती बघायला गेली तर उदय म्हणाला “ माझ्या बॅगमध्ये डबा आहे. आईने पाठवला आहे तुझ्यासाठी.”
    हे शब्द कानावर पडताच उल्काने उतावीळपणे बॅग उघडली व एक तीन कप्प्यांचा डबा काढला. डबा उघडताच उल्का खूश झाली. सर्वात खालच्या डब्यात होती तिला आवडणारी भरली वांगी. दुसऱ्या कप्प्यात बाजरीची भाकरी व मुगाची भजी व वरच्या कप्प्यात दोन गुबगुबीत खरवसाच्या वड्या होत्या. उल्काने एका ताटलीत जेवण वाढून घेतले व अधाशासारखी खाऊ लागली. ते पाहून उदय म्हणाला “ जेवण झाले आहे ना तुझे?”
त्यावर उल्का म्हणाली “ पोट भरले होते पण मन भरले नव्हते. मजा आली जेवायला.”        
दोन चार दिवसांनी ते जेवायला बसले असतांना उदय म्हणाला “ उल्का, मला उद्या दोन दिवसांसाठी इंदोरला जावे लागणार आहे.”
       त्याचे बोलणे पुरे झाले नाही तोच उल्का म्हणाली “हे काय नवीन? आजपर्यंत तू कधी कामानिमित्त बाहेरगावी गेला नव्हतास.”
उदय म्हणाला “ होय पण आता जावे लागणार आहे. वरिष्ठांनी एक नवीनच काम माझ्या गळ्यात टाकले आहे. तू हवी तर घरी जा की इथे एकटे राहण्यापेक्षा.”
उल्का म्हणाली “ दोनच दिवसांचा प्रश्न आहे. मी इथेच राहीन.”
दुसऱ्या दिवशी  उल्का कामावरून आली. थोड्याच वेळात तिला उदयची अनुपस्थिती जाणवू लागली. नेहमी अवतीभवती माणसांच्या चाहुलीची सवय असल्यामुळे, तिला खूप एकटे वाटू लागले. होईल हळूहळू सवय असे म्हणत ती दहा वाजताच्या सुमारास झोपी गेली. अचानक ती दारावरच्या घंटीच्या आवाजाने जागी झाली. तिने घड्याळात पाहिले तर साडे अकरा वाजले होते. अशा अवेळी घंटी कोण वाजवणार या विचाराने तिचा भीतीने थरकाप झाला. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. सर्वत्र निजानीज झाली होती. परत घंटी वाजली. उल्काने घरातले दिवे लावले तोच परत घंटीचा आवाज तिच्या कानावर पडला. की होल मधून बघण्याची तिची हिंमत होईना. शेवटी तिने उदयला फोन केला. उदय बिचारा दिवसभर काम करून झोपला होता. फोनचा आवाज ऐकून तो ताड्कन उठला. उल्काचा फोन बघून तो घाबरला.
त्याने विचारले “ उल्का, काय झाले? तू ठीक तर आहेस ना?
रडवेल्या आवाजात उल्का म्हणाली “ उदय, कोणीतरी सारखी घंटी वाजवत आहे. रात्रीचे पावणे बारा झालेत. मला खूप भीती वाटतेय.”
उदयने विचारले “ तू घराचे सर्व दरवाजे नीट बंद केले का?
उल्का म्हणाली “ होय रे. सर्व नीट बंद आहे. “
उदय म्हणाला “ हे पहा उल्का, चोर काही घंटी वाजवून येत नाही. कोणीतरी व्रात्य मुले तुला घाबरवत आहेत. परवा बाल्कनीत चेंडू फेकला म्हणून तू त्या मुलांवर केवढी ओरडलीस. त्याचा ती मुले वचपा काढत आहेत. दिवे बंद कर. घंटी वाजली तर लक्ष देऊ नकोस आणि निवांतपणे झोपून जा.*”
     उल्काने उदयने सांगितल्याप्रमाणे केले व ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिला उशिरा जाग आली त्यामुळे नेहमीचे वेळापत्रक बिघडले. तिला भाजीपोळीचा डबा बनवायला वेळ मिळाला नाही. नेहमीची गाडी चुकली. कामावर पोहोचायला उशीर झाला व ती दिवसभर चिडचिड करत राहिली. उदय परत आला व सर्व जैसे थे झाले. एका रविवारी सकाळचा नाश्ता झाला तसे उदय बाहेर जायला निघाला.
उल्काने विचारले “ हे काय? तू कुठे निघालास ?”
उदय म्हणाला “ समोरच्या मैदानात मुले क्रिकेट खेळत आहेत ते बघायला जातो. आलोच थोड्या वेळात.”
उल्का म्हणाली “ लवकर ये. मला फर्निचर हलवायला मदत हवी आहे.”
उदय गेला तो एक वाजता उगवला. 
उल्का म्हणाली “ गेला तो तिकडचाच झालास. चल जेवायला बसू.
उदय म्हणाला “ येवढी लहान मुले पण काय छान खेळतात. मी पण मारले दोन चार फटके. मजा आली.”
       त्यानंतर उदय दर रविवारी क्रिकेट खेळायला जाऊ लागला. तो नाही गेला तर मुले त्याला येण्याबद्दल भंडावून सोडायची. जेवणे झाली की तो ताणून देत असे. उल्काला मागचे सर्व एकटीने आटोपायला लागायचे. उदयचा मी तुला घरकामात मदत करण्याचा वायदा हवेत विरून गेला. रविवार म्हणजे क्रिकेट हे समीकरण ठरून गेले. बघता बघता उदय मुलांमध्ये लोकप्रिय झाला. उदय त्याची क्रिकेट खेळण्याची हौस पूरी करू लागला. उदयच्या वयाची काहीजण पण मैदानावर हजेरी लावू लागले. उदयचे मित्रमंडळ वाढू लागले. ते सर्वजण जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गप्पा मारू लागले. रविवारी उदयचा वेळ क्रिकेट खेळण्यात जाऊ लागला. त्या नंतर नवीनच जोडलेल्या मित्रांमध्ये तो रमू लागला. त्याच्या रविवारी घरी नसल्याबद्दल उल्काने कुरकुर केली तेव्हा उदय म्हणाला “ हे बघ उल्का, आपण जिथे राहतो तिथल्या लोकांशी जोडून रहायला पाहिजे. तू का नाही खाली येत? काहीजणी तर क्रिकेटचा खेळ बघायला येतात. काय सतत घरकामात गुंतवून बसतेस स्वत:ला?” 
उल्का फुरंगटून म्हणाली “ मला माझे घर चकाचक, व्यवस्थित असलेले आवडते. कालिंदी काय वरवरचे साफ करते. रविवारी आपण नको करायला?”
उदय चिडून म्हणाला “ मग बस झाड, पूस, धू करत .”
       त्या रात्री उल्काला झोप लागेना. तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. ती स्वत:ला विचारू लागली की वेगळा संसार थाटून आपण काय मिळवले. रोज काहीतरी नवीन कटकट उभी राहते. कधी कालिंदीची सुट्टी असते तर कधी स्वयंपाकघरात पाणी तुंबते. एक ना दोन. शिवाय घरासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तुंची खरेदी करता करता नाकी नऊ येतात. एक आणले तर एक विसरल्या जाते. त्यात कधी नव्हे ते पैशाची तंगी जाणवू लागली आहे. त्या घरी मजा चालली आहे. आई बाबांनी इंदूताईंना नेहमीकरता कामावर ठेवले आहे. त्यांची पण नड भागली व आई बाबांना दिवसभरासाठी सोबत झाली. दोघी जाऊबाईंना संध्याकाळच्या स्वयंपाकापासून सुट्टी मिळाली. मोकळा वेळ मिळाला तसे दोघीजणी व्यायामशाळेत जातात जवळच्या. आपण तिथे असतो तर कत्थकची तालीम सुरू केली असती. विचारांचे जाळे विणता विणता तिला झोप लागली. त्या दिवशी सकाळच्या विमानाने उदय इंदोरला गेला. कामावर जायची तयारी करतांना उल्काला थोडी कसकस जाणवू लागली. तिने एक क्रोसीनची गोळी  घेतली व कामावर निघाली.
    अॅाफिसमध्ये पोहोचल्यावर थोड्या वेळाने तिचे डोके ठणकू लागले. बघता बघता अंगात फणफणून ताप भरला. काय करावे तिला सुचेना. तिच्या बरोबर काम करणाऱ्या सुचेताने तिला घरी जाण्याबद्दल सुचविले. घरी असे अचानक जाणे तिला प्रशस्त वाटेना व स्वत:च्या घरी येवढ्या लांब जाणे जमण्यासारखे नव्हते हे तिने जाणले. शेवटी नाईलाजाने वरीष्ठांची परवानगी घेऊन ती घरी गेली. तिला असे अचानक आलेली पाहून आई, बाबा गडबडून गेले. त्यांनी स्वत:ला सावरले व उल्काला तिच्या खोलीत नेऊन झोपवले. अंगावर पांघरूण घातले. ईंदूताईंनी कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवायला सुरवात केली. त्यांच्याच इमारतीत तळमजल्यावर बाबांच्या नात्यातल्या डॅाक्टर सुभाषचा दवाखाना होता. बाबांनी त्यांना फोन करताच ते म्हणाले “ मी थोड्याच वेळात दवाखाना बंद करतो व घरी जाण्याअगोदर वर येतो. घाबरण्याचे कारण नाही. सध्या सर्दी तापाची साथ पसरली आहे.”
डॅाक्टरांनी उल्काला तपासले व म्हणाले “ ताप उतरायला मी औषध देतो. ऊद्या संध्याकाळपर्यंत ताप उतरला नाही तर परवा रक्त तपासणी करायला लागेल. भरपूर द्रव पदार्थ द्या आणि उल्का, नीट आराम कर. बरे वाटेल तुला.”
आई, बाबांचा जीव भांड्यात पडला. बाबांनी उल्काला विचारले “ तू उदयला कळविले आहेस का?”
उल्काने नकारात्मक उत्तर देताच बाबा म्हणाले “ आज कळवत नाही त्याला. उगाच काळजी करत बसेल. उद्या त्याच्या निघायच्या वेळेस कळवतो.”
       संध्याकाळी मंडळी कामावरून आली. सर्वचजण चिंतातुर झाले. सर्वांनी उल्काला लवकर बरी होशील असा दिलासा दिला. रात्री मोठ्या वहिनींनी उल्काला गरम गरम खिमट भरविले. रात्री  इंदूताई उल्काच्या खोलीत  झोपल्या. मायेची उबदार शाल लपेटून उल्का पडून राहिली. दुसऱ्या दिवशी उल्काचा ताप कमी झाला परन्तु पूर्णपणे निघाला नाही. संध्याकाळी जरा उशिराने उदय घरी पोहोचला. उल्काची स्थिती पाहून तो भांबावून गेला. 
 तो आईला म्हणाला “ असा कसा ताप आला हिला? इथे आहे म्हणून ठीक आहे. आमच्या घरी असती तर काय केले असते?”
 आई म्हणाली “ तू नकोस काळजी करु. येतो कधी कधी ताप. आम्ही आहोत ना?”
 रात्री उल्काचा ताप सरसरून उतरला. डोके दुखायचे थांबले व तिला निवांत झोप लागली.  सकाळी उल्काला थोडेफार ताजेतवाने पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला.       
आई म्हणाली “ उल्का, मला वाटते की तू आता सोमवारीच कामावर जा. तोपर्यंत तापामुळे आलेला थकवा कमी होईल. रविवारी जेवूनखावून दुपारी तुमच्या घरी जा. तुला पण घर आवरायला वेळ मिळेल.”
तिने जवळच उभ्या असलेल्या उदयला विचारले “ काय म्हणतोस तू?”
उदय म्हणाला “ अगदी बरोबर. रविवारी आम्ही आमच्या घरी  जाऊ.”
      त्यांचा संवाद ऐकून उल्काच्या पोटात धस्स झाले. तिच्या एका मनाने विचारले “ परत त्या एकट्या घरी जायचे? इथले सुरक्षित, मायेने ओतप्रोत वातावरण सोडून?” 
तिच्या दुसऱ्या मनाने म्हटले “ अगं, तुलाच हवा होता ना एकटीचा संसार? चकाकणारी भांडी, झुळझुळणारे पडदे, बाल्कनीत बसून दोघांनीच चहा पिणे.  तुला सर्वांमध्ये राहण्याचा उबग आला होता. आता काय झाले?”
ती निपचित पडून राहिली. नकळत तिच्या डोळ्यातून आसवे गळू लागली.
तिला अश्रू ढाळतांना पाहून उदय घाबरला. तो म्हणाला “ काय झाले? काही दुखत आहे का?”
उल्का म्हणाली “ उदय, आपण आणखी काही दिवस राहू शकत नाही का?”
उदयने विचारले “ का? तुझी तब्येत चांगली सुधारली आहे. आज कोलंबीचे कालवण ओरपून ओरपून खात होतीस. इथे राहण्याचे  प्रयोजन काय? आपण वेगळा संसार थाटला आहे. तो नीट चालवायला नको? कमी पैसा ओतला आहे आपण त्या घरावर? उल्काताई, संसार आपणहून चालत नाही. तो चालवायला लागतो. मेहनत करावी लागते. जीवापाड कष्ट करायला लागतात. आई, बाबांनी त्यांचा त्यांनी जोपासलेला संसार आपल्या सुपुर्द केला होता. पण तुला त्याची महती समजली नाही.”
उल्का हमसाहमशी रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकताच आई, बाबा खोलीत आले.
आईने उदयला विचारले “झाले काय हिला रडायला? नुकतीच तापातून उठली आहे. तू काही बोललास का?”
उदय म्हणाला “ मी कशाला काही म्हणू? हिला अजून काही दिवस इथेच रहायचे आहे. आवश्यकता काय आहे रहायची? दोन दिवसांपासून ताप नाही. आज तर वहिनींबरोबर बाजारात पण गेली होती.”
त्यावर आई म्हणाली “बरोबर आहे उदय म्हणतो ते. कीती दिवस घर बंद ठेवणार? उल्का, तू राहिलीस तर आम्हाला आनंदच आहे पण बाबांना हे असे चार दिवस इथे तर चार दिवस तिथे आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही जा कसे.”
उल्का निराश होऊन पडून राहिली. शनिवारी रात्री सर्वजण झोपायला गेले तसे उल्का आई, बाबांच्या खोलीत गेली. तिला असे अचानक आलेली पाहून त्या दोघांना खूप आश्चर्य वाटले.
आईने विचारले “ सर्व ठीक आहे नं उल्का? उदय कुठे आहे?”
खोलीत शिरत उदय म्हणाला “ हा मी इथे आहे. ही काय करत आहे तुमच्या खोलीत?”
उल्का म्हणाली “ मला आई, बाबांशी बोलायचे आहे.”
आई, बाबांकडे वळून ती म्हणाली “ आई , बाबा माझे चुकले. मी वेगळा संसार मांडायचा विनाकारण हट्ट धरला. मला तुमच्या सर्वांबरोबर रहायचे आहे. मी कुठल्या भ्रमात होते कुणास ठाऊक पण मी मोठ्ठी चूक केली. तुम्हा सर्वांना दुखावले. माझ्या आई, बाबांनी तर माझ्याशी बोलणे टाकले.”
उल्काच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले.
बाबा म्हणाले “ उल्का, पूस ते डोळे. तू पोरकटासारखी वागलीस यात संदेह नाही. तुला  त्या वेळेस समजवण्यात काही अर्थ नव्हता. तू आपलेच खरे केले असतेस कारण तुमची पीढी शिक्षित आहे. शिक्षणाच्या जोरावर नोकऱ्या मिळतात. हातात चार पैसे खुळखुळतात व स्वातंत्र्याच्या भलत्याच कल्पना डोक्यात शिरतात.
उदयला वेगळे घर घेऊन सर्वांपासून दूर कधीच रहायचे नव्हते हे तू जाणून होतीस पण त्याच्यासाठी तू स्वत:च्या हट्टाचा त्याग करायला तयार नव्हतीस. मुली, आपल्या माणसासाठी त्याग करण्यात जो आनंद असतो तो दुसऱ्या कशात नसतो. तापामुळे तुझे शरीर व मन अशक्त झाले आहे. योग्य निर्णय घेण्याची क्षमता सध्या तुझ्यात नाही  त्यामुळे परतण्याचा निर्णय घेऊ नकोस. तुम्ही दोघे जा व घराचे लीज संपेपर्यंत रहा. तो पर्यंत नीट विचार करून परत या. कदाचित तुम्ही नवीन आयुष्याशी जुळवून घ्याल. नवीन नाती जोडाल. नवीन ओळखी करून घ्याल व तुम्हाला परत यावेसे वाटणार नाही.”
     ठरल्याप्रमाणे उल्का व उदय रविवारी त्यांच्या घरी जायला निघाले. घरातले सर्वजण त्यांना निरोप द्यायला दरवाज्यापाशी आले. उल्काला त्यांना निरोप द्यायला खूप जड जात होते. उंबरठा ओलांडतांना तिचे पाय जड झाले. तिला आठवले अडीच तीन वर्षांपूर्वी उदयचा हात धरून नववधूच्या वेशात तिने हसतमुखाने टाळ्यांच्या कडकडाटात या घराचा ऊंबरठा ओलांडला होता. सर्वजण तिला आपल्यात सामावून घ्यायला उत्सुक होते. तिच्यावर कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव झाला होता पण आज तिने स्वत:वर काय वेळ आणली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...