बुधवार, २२ मे, २०२४

1155. आई तू जेवलीस कां ?

      १५ एप्रिल २०२४. दुपारची वेळ. मला आमच्या येथील नावाजलेले फिसिशियन डॉक्टर गोरड यांचा फोन आला की एक अकरा वर्षाचा मुलगा आहे. लिव्हर इंजुरी आहे. त्याला तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. लगेच रूग्ण पाठवतो आहे. तुमच्याकडे म्यानेज होईल का ? सर्व तपासण्या केल्या आहेत. लिव्हर जवळ जवळ आठ ते दहा सेंटिमीटर फाटलेले आहे, पोटात रक्तस्राव खुप झाला आहे. मी सांगीतले 
"आमचेकडे होईल सगळं काही. नातेवाईक बरोबर पाहिजेत." रक्त औषधे, तपासण्या आणि विशेष म्हणजे त्याचे गांभीर्य समजणारे नातेवाईक जवळ हवेत. दहा मिनिटात तो मुलगा, त्याचे बरेच नातेवाईक त्याला घेऊन आले. डॉक्टरांनी त्यांना आधीच व्यवस्थित समजावून सांगितले होते. माझे एक काम जरा सोपे झाले. आल्यावर त्याच्या आजाराची हिस्टरी घेतली. दोन दिवसापूर्वी म्हणजे १३ एप्रिलला त्या मुलाचा, ऋतुराजचां अक्रव्वा वाढदिवस होता. नुकतीच सहावीची परीक्षा दिली होती. आता यंदा सातवीत. ऋतुराज खुप खेळकर, लोणंद पासून आठ किलोमिटर एका छोट्या खेड्यातला. वाढदिवस साजरा करायचा तर केक हवाच. त्याने सकाळी लवकर उठून त्याच गावात एक जण केक बनवतात त्यांच्याकडे शाकाहारी केकची ऑर्डर देऊन टाकली. संध्याकाळी  सर्व मित्रांना घरी बोलावले. संध्याकाळी पाच साडेपाच वाजता घरी आईला म्हणाला की मी केक घेऊन येतो. त्याचे वडील म्हणाले थांब मी पण तुझ्याबरोबर येतो. पण उत्साहाच्या भरात ऋतुराजने सायकल काढली आणि मित्राला घेऊन पसार झाला केक आणायला. वडील थोडे नाराज झाले होते. वडील शेतकरी. कुक्कुटपालन हा जोडधंदा. खुप कष्टाळू नवरा बायको. एक मुलगा आणि एक मुलगी. सुखी समाधानी कुटुंबं. हल्ली वाढदिवस म्हणजे केक हे समीकरणच बनले आहे. ब्रिटिश गेले, त्यांची शिस्त गेली पण त्यांचे केक आणि मद्य संस्कृती आम्ही भारतीयांनी जपून ठेवली आहे.असो. ऋतुराज सायकलवर बसुन गेला आणि पाचच मिनिटात निरोप आला की सायकलवरून पडला आहे, जोरात मार लागला आहे, पोटाच्या वर उजव्या बरगड्या वर मार लागला आहे. थोडेसे खरचटले आहे. त्याला कसाबसा उचलून घरी आणला.केक शिवाय.
     सुरुवातीला एका फॅमिली डॉक्टर यांच्याकडे दाखविले. त्यांच्या मते किरकोळ खरचटले आहे. गोळ्या औषधे इंजेक्शन देउन घरी आणले. परंतु पोटात खूपच दुखू लागले होते. नातेवाईकांनी निर्णय घेतला की मोठ्या हॉस्पिटल मधे नेऊ आणि सर्व तपासण्या करु. त्यानी डॉक्टर गोरड MD physician यांचेकडे ICU मधे दाखल केलें. तिथे सर्व तपासण्या झाल्या. काही पूनार्तपासण्या केल्या गेल्या. ही सर्जरी ची केस आहे असे लक्षात आलेवर त्यांनी मला फोन केला आणि रुग्ण शिफ्ट केला. ऋतुराज आणला तेंव्हा पांढराफट्टक पडला होता. त्याचा पोटाचा ct scan केला तेंव्हा त्याला उजव्या बाजूच्या लिव्हर जवळजवळ १०x ६ x ६ सेंटिमीटर वेडेवाकडे फाटलेले होते.तिथून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होत होता. ऋतुराज वैद्यकीय भाषेत 'शॉक 'मधे होता. नाडीचे ठोके १३५ पर्यंत होते. नातेवाईकांना सर्व कल्पना दिली. गांभीर्य सांगीतले."दोन ऑपरेशन करावी लागतील. ऑपरेशन मधे जीवाला धोका आहे, नंतरही धोका आहे. कसलीही खात्री देऊ शकत नाही. तुम्हाला दुसरीकडे कुठे न्यायचे असेल तर नेऊ शकता "हा रूग्ण कुठेही शिफ्ट करणे शक्य नव्हते. ते स्पष्ट दिसत होतं. एव्हाना नातेवाईकांच्या लक्षात आलं होतं. नातेवाईक खुप समंजस होते. त्यांच्या घरातील जवळजवळ १५ते २० जणांना मी covid c  च्या जागतिक महामारीत हॉस्पिटल मधे ऍडमिट न करता उपचार केले होते. तेंव्हा गोळ्या औषधे देउन "शेतात राहा, बिन्धास्त राहा." असा सल्ला दिला आणि खरोखरच सगळे चांगलें, ठणठणीत झाले होते. त्यांचा विश्वास होता खुप.
    पाचं बाटल्या रक्त आणले, भुलीसाठी  डॉक्टर काळे यांना बोलावले. सर्व टीम तयार झाली.हे सारे काही पावणे दोन तासात...challenge केस आली की आमच्या हॉस्पिटल मधे सगळा स्टाफ सुध्दा खूष असतो. मला challenges आवडतात. पेशंटला पूर्ण भुल दिली ऑपरेशन सुरू केले. पोटात प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला होता. अजुनही रक्त वाहत होते. लिवरच्या उजव्या वरच्या भागाला नांगर फिरवावा अशी वेडीवाकडी जखम झाली होती. सोनोग्राफी किवा CT scan मध्ये जे मोजमाप दर्शविले होते त्यापेक्षा नक्कीच मोठी आणि खोलवर. लिव्हर हा अवयव शिवणे खुप कठीण असते. साधारण घट्ट खरवसाला आपण कापले आणि शिवायचय असे समजा ना. आणि ते केल्याशिवाय रक्त स्त्राव थांबत नाही. त्यात ते वेडवाकडं फाटलेले. मी अशा केसेस पूर्वीपासून हेंडल केल्या आहेत. वाहत्या, रक्त स्त्रावात लिव्हर शिवण्याचा प्रयत्न केला. त्यावर हळदीचा मोठा लेप लावला.एक mob त्यावर ठेवला. नातेवाईकांना operation रूम मधे बोलावून ते सर्व दाखविले. फोटो घेतले, सह्या घेतल्या. रूग्ण वाचवायला दुसरा कोणताच उपाय सद्य स्थितीत नाही. हा mob अठ्ठेचाळीस तास पोटात ठेवून परत दुसरे ऑपरेशन करून तो काढणार आहे. हे करण्यामागचे धोके सांगीतले. रूग्ण ventilator वर असणार आहे याची कल्पना दिली. दोन दिवस ऋतुराज ventilator वर होता. अठ्ठेचाळीस तासानंतर पुनः re-open. तोपर्यंत ऋतुराजचे नाडीचे ठोके, सुधारणा झाली होती. आम्ही खुप आशावादी होतों.
दुसरे ऑपरेशन.
तेही व्यवस्थित पार पडले. जो मोब आणि त्याला हळदीचा घट्ट लेप लावला होता, तिथून सर्व रक्त स्त्राव पूर्णपणे थांबला होता. टाकेही व्यवस्थित होतें. नांगरलेला लिव्हर एकदम सपाट गुळगुळीत दिसत होता. ऑपरेशन थिएटर मध्ये सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले. ऑपरेशन नंतर ऋतुराज पुन्हा एकदा ventilator वर. अशा प्रकारच्या सहा cases लिव्हर injury च्या मी लोणंद येथे गेल्या छत्तीस वर्षात manage केल्या आहेत. सगळ्या केसेस वाचवू शकलो. हळदीचे मी असेच प्रयोग surgical practise मधे यशस्विरीत्या केलें आहेत. रूग्ण, त्यांच्या नातेवाईकांचा विश्र्वास, सावित्री हॉस्पिटलचां स्टाफ, टीम आणि ईश्वराचे आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले. पुढील दोन दिवस ऋतुराज ventilator वर stable होता. अचानक त्यांची छाती भरू लागली, धाप चालु झाली नाडीचे ठोके ८०वरून १३५ ते १४०  झाले. दुपारची वेळ होती. त्याचा spo2 एकदम 60 झाला. छातीत घरघर. आमचें बरोबर Dr अमित धायगुडे physician होते. पुन्हा टेन्शन, स्ट्रेस, हातात आलेला रूग्ण. Ventilators बदलले. छाती भरलेली, त्याची injection सुरू केली. दोन ते अडीच तास तिथेच बसून होतों. ऋतुराजला साडेपाच लिटर लघवी झाली.spO 2 जेव्हा 95 वर स्थिरावला तेंव्हा मी ICU तून बाहेर पडलो. बाहेर नातेवाईकांची तोबा गर्दी. त्यात त्याची आईं सतत अश्रुंच्या धारेत असायची. मला विचारले "काय झाले डॉक्टर ?"
मी गंभीरपणे हसलो."
असे होतें कधीकधी .
आता ठीक आहे ऋतुराज"
एवढे म्हणालो. नंतर ऋतुराज stable राहिला. रात्रीतून मी स्वतः दोन वेळा पाहून आलो. दुसऱ्या दिवशी तर पठ्ठ्या एकदम टकाटक. तो पूर्ण जागा होता. मॉनिटर वर सर्व काही स्थिर होतें. हातवारे करीत होता. आजचा त्याचा व्हेंटिलेटर वरचा सहावा दिवस. आम्हाला तो सतत खुणा करायचा. तोंडात, नाकात, पोटात, लघवीच्या जागेत, सगळ्या मिळुन सहा नळ्या होत्या. त्याला बोलायचे होते. पण बोलता येत नव्हते. शेवटी आमच्या एका सिस्टरने त्याला एक कागद पेन दिला...
ऋतुराज व्हेंटिलेटर वर होता.ऋतुराजने कागदावर लिहिले.
"आईं तु जेवलीस का?"
पक्षांना खायला घातले कां?"
या दोन वाक्यान्नी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हल्लीं mother's day, father's day वगैरे साजरे करतात. या अकरा वर्षाच्या मुलाने जगाला दाखवीला  'Mother's day'. खेड्यातल्या पोरांना निसर्ग शिकवावा लागत नाही. गुरा ढोरांवरचं प्रेम, पक्षी, पाखरे, झाडी, फुलं काहीं शिकवावं लागत नाही. ते नैसर्गिकपणे येतं.लहानपणी सातवीपर्यंत सगळ्या शिव्या सुध्धा अशाच शिकतात. तेही निरागस अजाणतेपणे. आईवर्च प्रेम शिकवावं लागत नाही. त्याला त्या कोंबड्यांची पण काळजी. पोरगा व्हेंटिलेटर वर आणि त्याचे विचार पहा. लेखक, कवी, विचारवंत सगळे मोठ्या शहरातच असतात का? Medical Research म्हणजे only ICMR. दुसऱ्या दिवशी ऋतुराजची व्हेंटिलेटरची आवश्यकता संपली. पुढच्या चार दिवसात एकेक नळ्या आपले आपले काम चोख बजावून बाहेर निघाल्या. ऋतुराज २५ दिवस हॉस्पिटलमध्ये होता. तो पूर्णपणे बरा झाला. जायच्या दिवशी त्याच्या आईं वडील, इतर प्रमुख व्यक्ती, त्या गावचे सरपंच ओपीडी मधे आले. १३ एप्रिल रोजी केक कापायचा राहिला होता. वाढदिवस साजरा झाला नव्हता. सावित्री हॉस्पिटल लोणंद येथे जाताना पुनर्जन्मचा वाढदिवस मस्त मस्त साजरा झाला. १५ मेला तो फेरतपासणी साठीआला. एकदम झक्कास. सगळे टाके काढले. त्याला मी एक पेन बक्षीस दिला. त्याचं ते वाक्य मनात माझ्या कायम घर करून राहिलं.
"आईं तु जेवलीस का "

@
सदासुत. संजय सदाशिव शिवदे. लोणंद. १६मे २०२४ पहाटे चार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...