बुधवार, २२ मे, २०२४

1156. होर्डिंग

 नवीन घेतलेल्या अल्टो कारमध्ये बसून सचिन आणि संगीता आज खूप दिवसांनी चौपाटीवर फिरायला निघाले होते. चौपाटीवर फिरायला जायचं म्हणून संगीताने छान आवरलं होतं. कपाळी चंद्रकोर लावली होती. सचिनही तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. संगीता सचिनला म्हणाली 
"अहो काय पाहता एवढं टक लावून?"
तसा सचिन रोमँटिक मूडमध्ये तिला म्हणाला, 
"अगं चंद्र आणि माझ्या कारमध्ये आणि तो ही माझ्या बाजूला, कारची लाईट बंद केली तरी चालेल, तुझ्या लख्ख प्रकाशातच रस्ता उजळून निघेल."
तशी संगीता लाजत सचिनच्या हाताला बिलगली.  कारमध्ये पण रेडिओवर रोमँटिक गाणं चालू होतं 
"मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यांत मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यांत मन नाजुकशी मोतीमाळ मन नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकशा गळ्यात"
         दोघांनाही घाटकोपरला राहायला येऊन जवळजवळ आठ ते नऊ महिने होत आले होते.  मोठ्या मेहनतीने सचिनने घाटकोपरच्या सोसायटीत वन बीएचके फ्लॅट विकत घेतला होता. फ्लॅट सोबत पार्किंगही होती. सचिन आणि  संगीताच्या जोडीने मोठ्या आनंदाने कार विकत घेतली होती. त्यांना नवीन कार घेऊन चार महिने होत आले होते.  एकेक स्वप्न ते साकार करत होते. पण स्वप्नांचा पाठलाग करत असताना. स्वतःचा आनंद जगायला त्यांना वेळ मिळत नव्हता. आता दोघांचाही ठरलं होतं, ह्या मे महिन्यात कुठेतरी फिरायला जायचं. लग्न झाल्यापासून ते दोघे कुठेच हनिमूनला गेले नव्हते. आज खूप दिवसांनी सचिन तिला चौपाटीवर फिरायला घेऊन चालला होता. घराजवळ असणाऱ्या नेहमीच्या पेट्रोल पंपावर त्यांनी पेट्रोल भरले. बाजूला एक भले मोठे जाहिरातीचे होर्डींग होते. त्या होर्डिंग वर विदेशात फिरायला जाण्याच्या जाहिराती होत्या. एका नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची जाहिरात त्या होर्डिंग वर लागली होती. संगीता मोठ्या कुतूहलाने जाहिराती वाचत होती. सचिन तिला पाहत म्हणाला
"सब्र का फल मीठा है मेरी जान, आपण जाऊ नक्की ह्या महिन्यात, फिरायला"  
"तुझं तर ना सचिन नेहमीचच आहे, कधी जायचं ते नक्की ठरवा आता." संगीता कधी आवजाव तर कधी अरे तुरे घालून सचिनशी बोलत असे. 
      कडक उन्हाळा चालू झाला होता. नियमित सचिन संगीताला तिच्या ऑफिस जवळ ड्रॉप करत असे. ऑफिसला येता जाताना नेहमीच त्यांचं लक्ष पेट्रोल पंपा जवळ असणाऱ्या होल्डिंग कडे जात असे.  त्या होर्डिंगकडे पाहून दोघेही सुट्ट्यांची स्वप्न रंगवत होते. जवळपास एक महिनाभर झालं. जाहिरात बदलत होत्या पण वेगवेगळ्या ठिकाण फिरायला जाण्याच्या सवलतींच्या आकर्षक जाहिराती तिथे लागत होत्या. येताना जाताना नेहमी त्या होर्डिंगकडे ते दोघे बघणार आणि थोडी तरी चर्चा फिरायला जाण्याविषयी दोघांमध्ये होणार. त्या दोघांमध्ये हा नित्याचा क्रम झाला होता. हे होर्डिंग घराच्या बाल्कनीमधून पण दिसत असे. त्यामुळे अधून मधून बाल्कनीमध्ये चहा घेतानासुद्धा फिरायला जाण्याची चर्चा त्यां दोघांमध्ये नेहमी होत असे. पण कारमध्ये मात्र नेहमी होर्डिंग जवळ आलं की संगीता त्याला  एक प्रश्न विचार  असे.
"अहो कधी जायचं आपण फिरायला?"
     बोल बोल म्हणता वीस पंचवीस दिवस झाले होते. १ मे आला.  महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्यामुळे दोघांनी कश्मीरला जाण्याचा सर्व प्लॅन एका टूर्स कंपनीमध्ये ठरवला. 1३ मे ला जाण्याचे पक्के झाले.  इकडे पेट्रोल पंपावरती असणाऱ्या होल्डिंगची पण जाहिरात काढली गेली. तरीसुद्धा येताना जाताना त्या होर्डिंगकडे बघून, काही ना काही चर्चा दोघांमध्ये होत असे.  दोघेही खुश होते. एक एक दिवस जवळ येत चालला होता. अखेर १३ मे तारीख आली. संगीता आणि सचिनची आवरा आवर झाली. सामान थोडे जास्त झालं होत. दोघांनाही बॅग कमी पडली. म्हणून सचिन तिला म्हणाला 
"मी आलोच बॅग घेऊन. दुपारचे चार वाजले होते. आज थोडं वारं सुटलं होतं. बाहेर पावसाचे चिन्ह होते. संगीता सचिनला म्हणाली 
"जाऊ दे ना, आपण दुसरी घरातली बॅग नेऊ, बाहेर पाऊस येईल, नका जाऊ तुम्ही बाहेर"
सचिन तिला समजावत म्हणाला
"आत्ता गेलो आणि आत्ता आलो, एक बॅग तर घेऊन यायची आहे, आलो की जेवण करू आणि थेट एअरपोर्टला निघू."
सचिन बाहेर पडला, थोडा वादळ वारा होता. आभाळभर काळे ढग गर्दी करू लागले होते. त्याच्याही मनात थोडी शंका आली. जाऊ की नको. पण मनाचा निश्चय करत त्यांने अल्टो काढली. तसा थोडा भूर भूर पाऊस येऊ लागला. येणाऱ्या वाऱ्यामुळे सोसायटीत झाडे अगदी वाकू लागली होती. गाडी गेटच्या बाजुला येताच सचिनचं लक्ष पेट्रोल काट्यावर गेलं. कारमध्ये थोडेही पेट्रोल नव्हते. वॉचमन  सचिन जवळ येत नमस्कार घालत सचिनला विचारू लागला.
"क्या हो गया साहब, पेट्रोल खतम हो गया क्या?"
सचिनने मान डोलवत होकार दिला आणि सचिनची गाडी जवळच असणाऱ्या पेट्रोल पंपकडे वळाली. आज पंपावरती थोडी जास्त लाईन होती. पण सचिनचा नाईलाज होता. पेट्रोल भरावेच लागणार होते. जवळपास शंभर एक लोक पंपावर होती. इकडे संगीता बाल्कनीत उभी राहून बाहेरील पाऊस पाहत होती. सहज तिने मोबाईल काढला आणि ती पावसाच शूटिंग करू लागली. हवेत गारवा असून सुद्धा संगीताला घाम येत होता. तिला थोडी काळजी वाटत होती. कारण सचिन आत्ताच बाहेर पडला होता. तिचं लक्ष सहज पेट्रोल पंपाजवळील होल्डिंगवर गेलं. वारा एवढा जोरात होता की, होर्डिंग वरील सर्व फ्लेक्स फाटून हवेत उडत होता. होर्डिंग जणू काही मोकळत झालं होतं. त्याचा लोखंडी हाडांचा सापळात दिसू लागला होता. आणि त्याच होर्डिंग खाली असणाऱ्या पंपावर थांबून सचिन पेट्रोल भरत होता. संगीता हे सर्व करत रेकॉर्ड करत होती. तेवढ्यात विजेचा कडकडात झाला आणि काही क्षणातच कडाड आवाज होत पंपाच्या शेजारी असणारे होल्डिंग पंपावरती कोसळलं. सचिन त्याच पंपाखाली होता. कोणालाही पळण्याची थोडी सुद्धा संधी मिळाली नाही. 
होर्डिंग पंपावर कोसळले. पंपाखाली असणाऱ्या गाड्या त्यामध्ये चेंबून गेल्या. सचिनही कारमध्ये होता. सचिनची नवी कोरी सिल्वर अल्टो कारही होर्डिंग खाली अडकून पडली. इकडे संगीता त्या वादळी वाऱ्याचे रूप पाहून घाबरून गेली. तिने व्हिडिओ बंद केला आणि सचिनला फोन केला.  फोन वाजत होता पण कोणीही फोन उचलत नव्हते. संगीताला काळजी वाटू लागली. हे तर गेले नसतील ना पंपावर. की अजून खालीच असतील पार्किंग मध्ये. ती मनाशीच पूट पूटू लागली. तिने क्षणात घराचा दरवाजा उघडला आणि ती पार्किंग मध्ये गेली. तसा वॉचमन तिच्या जवळ येत संगीताला म्हणाला 
"मेमसाब अभी गये साहेब पेट्रोल भरणे को."
हे ऐकलं आणि संगीताने पेट्रोल पंपाकडे धाव घेत ती म्हणाली
"अरे होल्डिंग तो गिर गया"  मागोमाग वॉचमेन येऊ लागला. सोसायटीतली अजून एक दोन लोक संगीता मागे पळाली. भर पावसात संगीता पेट्रोल पंपावर आली. होर्डिंगहोर्डिंग एवढं मोठं होतं की, पूर्ण पेट्रोल पंप त्याखाली दबून गेला होता. संगीताला काही सुचत नव्हतं. जमलेली लोक होईल तशी मदत करत होती. वॉचमन आणि संगीता वाकून वाकून आत पाहत होते. काही लोक घायाळ होऊन सरपटप पेट्रोल पंपा बाहेर पडत होती. वॉचमनने आणि संगीताने वाकून पाहिलं, तर सचिनची गाडी दिसत होती. 
गाडी पाहताच, संगीताने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. 
"कोणी वाचवा हो माझ्या नवऱ्याला, असे म्हणत ती रस्त्यावरच पटकन बसली. तिला कशाचेही भान राहिले नव्हते.  सोसायटीमधील माणसे तिला सावरत होती. काही लोक आपला जीव वाचून पेट्रोल पंपा बाहेर येत होती. तर काही पूर्ण पेट्रोल पंपामध्ये अडकली होती. काही क्षणातच फायर ब्रिगेड आणि पोलीस यंत्रणा तिथे आली. संगीताला सावरत एका बाजूला बसवण्यात आलं. पण तिचा जीव काही थाऱ्यावर नव्हता. पावसाने भिजलेली संगीता हे सगळं पाहून अजूनच थंड पडली होती. तिचे अश्रूही भर पावसात दिसत नव्हते. तिच्या तोंडात एकच शब्द होता 
"सचिन ये सचिन, ये रे बाहेर, अरे मी आले रे इथे, ये ना रे बाहेर, जाऊ लगेच आपण घरी." 
  तब्बल एक तास होत आला होता. सचिनच्या गाडीत न सचिनला बाहेर काढण्यात आलं होतं. सचिनने पूर्ण मान टाकलेली दिसत होती. सचिनला पाहताच संगीता त्याला बिलगली. 
"अरे सचिन उठ ना रे, जायचं ना आपल्याला फिरायला. उठ लवकर" वेडी पीशी होऊन ती सचिनच्या बॉडीकडे पाहत बोलत होती. सचिनची बॉडी ॲम्बुलन्समध्ये घालण्यात आली. सोबत संगीता, वॉचमन आणि सोसायटीतली दोन-तीन लोकही बसली. संगीता हंबरडा फोडून रडत होती. 
"तुला म्हणाले होते ना रे सचिन, बाहेर नको जाऊ म्हणून, अरे काय करू मी आता एकटी. उठ ना रे, जायचं ना आपल्याला फिरायला, अरे आज आपली फ्लाईट आहे ना, उठ ना रे, आणि तुझ्याशिवाय आहे कोण रे मला कोणाचाही आधार नाही. उठ ना रे सचिन." 
संगीता सचिनच्या डेड बॉडीला धरून गदागत हलवत होती. सचिनच्या डोक्यातून निघालेले रक्ताने संगीताच्या हात भरले होते.  आजूबाजूची लोक तिला सावरत होती.  अधून मधून तिल फिटही येत होती. तिला कशाचही भान राहिलं नव्हतं. थोड्याफार फरकाने इतरांचीही परिस्थिती अशीच होती. जवळपास 14 लोक त्या दुर्घटनेत मरण पावले. ज्या होर्डिंग वरील जाहिराती पाहून त्यांनी फिरायला जाण्याची स्वप्न रंगवली होती. त्याच होर्डिंगने आज घात केला होता. तिला काही सुचत नव्हतं. बाहेरचा वादळी पाऊस आणि डोळ्यातील दुःखद अश्रू अखंड वाहतच होते.
आज मुंबई आणि पुण्यामध्ये अशी कितीतरी अनाधिकृत होर्डिंग आहेत जे लोकांचा काळ बनून उभी आहेत. कधी कोणता होर्डिंग कोणावर झडप घालेल, हे सांगता येत नाही. तरीही प्रशासन झोपीच गेलेले आहे. एखादी होर्डिंगची घटना घडली की, चार दिवस सर्व होर्डिंगच्या चौकशी केल्या जातात आणि काही दिवसात प्रकरण पुन्हा शांत होत.  पण आधीपासूनच होर्डिंग बाबत प्रशासन जागरूक का राहत नाही? मागील वर्षीही  पुण्यात जुन्या बाजार जवळ असंच होर्डिंग कोसळलं होतं. हे होर्डिंग फक्त होर्डिंग खाली चेंबूर जाणाऱ्याचा जीवच घेत नसून ते मृत होणाऱ्या  व्यक्तीसोबत त्यांच्या कुटुंबांच्या स्वप्नांचाही चुराडा त्या होर्डिंग खाली होतोय.  13 तारखेला ही घटना पाहिली आणि मनामध्ये हा विचार आला. वरील कथा काल्पनिक आहे. पण ह्या कथेतून मी त्या जीवांना श्रद्धांजली वाहत आहे आणि अजून कोणताही गुन्हा नसणाऱ्या निरपरधी लोकांचा जीव जाऊ नये. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा करूयात.
 
विशाल अंजना सर्जेराव शिंदे 
औंध पुणे ७
८८०५१५८३११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...