जिल्हा न्यायालयाची न्यायाधीश म्हणून न्या. स्वातीचा आज शेवटचा दिवस. संध्याकाळी निरोपाचा एक छोटेखानी कार्यक्रम झाला की स्वाती सध्यापुरती निवृत्त होणार होती. सध्यापुरती हे यासाठी की यानंतरही विविध बोर्डवर काम करण्यासाठी अर्ज, परिक्षा ,मुलाखती यातून ती अजून पूढे जाणारच होती. कारण तिचा निर्णय आणि निश्चय अगदी पक्का होता . आता तर शरदचाही काहीच विरोध नसायचा ,उलट प्रोत्साहनच असायचं. ‘मिसेस शरद' ही तिची ओळख तिच्या चिकाटी ,प्रयत्न आणि जिद्दीमुळे ‘मा. न्या. स्वाती‘ अशी केव्हाच बदलली होती. शरदलाही आता काही ठिकाणी ‘मि. स्वाती ‘ ही ओळख अंगवळणी पाडून घ्यावी लागली होती. इतकं सोपं होतं का हे सगळं? खरंच इतका सहज असतो का हा स्वीकार? बहुतेक वेळा नाहीच. एखादाच असतो मोठ्या मनाचा, खिलाडूवृत्तीने बायकोला प्रोत्साहन देणारा किंवा तिच्या हुशारीची कदर करून तिचं पूढे असणं स्वीकारणारा. अन्यथा घरातच पूढे जाण्यापासून रोखणाऱ्या असंख्य आणि अदृश्य चौकटी लावलेल्या असतात. अजूनही आम्ही तिला जॅाब करायला ‘परवानगी ‘ दिली याचा मोठेपणा मिरवणारे कितीतरी दिसतातच.
स्वाती आणि शरद, ठरवून ,चहापोह्यांचा कार्यक्रम करून एक झालेलं जोडपं. दोघंही उच्चशिक्षित. शरद इंजिनिअर ,पोस्टग्रॅजूएट . लग्नाच्या वेळी स्वतःचं छोटं स्टार्टअप होतं. पाचसहा माणसांचा स्टाफ काम करायचा त्याच्या वर्कशॅापमध्ये. बघता बघता त्याच्या कामाने बरीच मोठी झेप घेतली. छोट्या वर्कशॅापचं मोठ्या कंपनीत रूपांतर झालंय. कमी वेळात मिळालेल्या यशासेबत गर्व ,अहंकार हे सोबतीही सहजच वावरत होते त्याच्यासोबत. सौम्य स्वभावाची स्वाती कायद्याची पदवीधर. लग्नाच्यावेळी एका प्रथितयश वकीलाच्या फर्ममधे काम करायची. सोबत पुढच्या शिक्षणासाठी ॲडमिशनही घेतलेलं होतं. स्वतःचही असं मोठं ॲाफिस असावं, क्लाएंटची गर्दी असावी हे तिचं स्वप्न ! पण लग्न झालं आणि पदव्यूत्तर शिक्षण घ्यायचं मागे पडलं. स्वप्नांवरही पडदा पडला.नवा संसार, नवी माणसं ,नवे नातेसंबंध यात तिची इच्छा बाजूलाच राहिली. ठेवावी लागली. संसार आणि शरदची कंपनी दोन्ही वाढत होते. एक मुलगा आणि एक मुलगी आता शाळेत जाऊ लागले. स्वातीला आता बऱ्यापैकी वेळ मिळू लागला. पहिल्यासारखंच कुठेतरी काम करण्याची इच्छा जोर धरू लागली.
“अहो,मी परत जॅाईन करू का माझं पहिलं काम?” एक दिवस शरदचा चांगला मूड पाहून स्वातीने विचारलं.
“ कशाला? अन् काही आठवतं तरी का कायद्याचं?” तिची खिल्ली उडवत त्याने तो विषय तिथेच संपवला.
परत काही दिवसांनी तिने विषय काढला.
“ वेळ जाण्यासाठी काही तरी करावं म्हणते…करू का जॅाब?”
“ सात आठ वर्षे झाली काम सोडायला. आता कसं जमेल? उगाच स्वतःसोबत माझंही हसं करशील. आता ह्या शहरात विशेष ओळख आहे माझी आणि त्यामुळेच तुझीही आणि दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायला आता तु काही साधी व्यक्ती नाहीस. ’मिसेस शरद‘ अशी ओळख आहे तुझी” अहंकाराचा दर्प स्वातीचं मनोबल कमी करण्यात यशस्वी होत होता.
“पण… पार्टटाईम का होईना मला एखाद्या लॅा फर्म मधे काम करायचंय” या वेळी ती जरा जास्तच आग्रही होती. तिला तिचं राहिलेलं शिक्षणही पूर्ण करायचं होतं.
“जॅाब कशाला हवा तर वेळ जाण्यासाठी. काहीतरीच काय? मस्त ऐश कर, सिनेमे पहा, मैत्रीणींसोबत फिरायला जात जा. मला पैसे माग, मी हवे तितके देतो की.” पाचशेच्या नोटांचं बंडल तिच्या पुढे नाचवत त्याने तिला नाकार दिला.
शेवटी हो नाही करत, स्वतःच्याच फॅक्टरीत काम करण्याचं त्याने तिला सुचवलं. स्वाती आता तीनचार तासांसाठी नियमीतपणे फॅक्टरीत येऊ लागली. तिच्यावर सोपवलेलं काम अगदी चोख करायची. तिच्या स्वभावामुळे तिने सर्वांनाच आपलंसं केलं. ती आल्यापासून कंपनीची प्रॅाडक्टीव्हीटीही वाढली. बघता बघता गेल्या सात आठ वर्षात ती तिथे चांगलीच रूळली. तिच्या काही सल्ल्यांमुळे फायदाही होत होता. शरदही कामाच्या बाबतीत तिच्यावर बऱ्यापैकी डिपेंडंट राहू लागला. आता तिथल्या सगळ्यांच्याच डोळ्यात मॅडम बद्दल प्रेम ,आदर आणि कौतुक दिसायचं. सहाजिकच अहंकारी शरदला स्वातीचं हे वाढतं महत्व मान्य होणं शक्यच नव्हतं. त्याचा राग तो घरी आल्यावर काढू लागला. स्वाती जो वेळ कंपनीसाठी देत होती तो अर्थातच घर आणि घरपण सांभाळूनच. पूर्वीपासूनच घरात सगळ्या कामांना मदतनीस होते, त्यात आताच बदल झाला असं काही नव्हतंच ,पण शरदला चिडायला एखादी क्षुल्लक गोष्टही पुरायची आणि सगळा राग स्वातीवर काढू लागला. लहानसहान कारणांवरून करबूरी होत होत मोठं स्वरूप धारण करू लागल्या. कामामुळे वाढलेला आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि बोलण्यातला स्पष्टपणा स्वातीच्याही व्यक्तीमत्वात बदल घडवत होता.
“कंपनी माझी आहे. त्यात तू अजिबात लुडबूड करू नकोस,तुझी अक्कल पाजळू नकोस. कितीही हुशारी दाखवलीस तरी तुझं स्वतःचं असं काय योगदान आहे इथे? मी संधी दिली म्हणून तू काम करतेय, इतकंच ! बाकीच्या एम्लॅाईज सारखंच. काहीही केलं तरी कंपनी माझी, नाव माझं आणि तुला मिळालेली ओळखही माझ्यामुळेच. तुझं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही हे लक्षात ठेव.” एक दिवस सर्वांसमक्ष शरदचा तोल सुटला आणि स्वाती मनाशी काही निश्चय करूनच घरी परतली.
काही दिवस अबोला, तुटक वागणं असं होत होत वरकरणी परत पहिल्यासारखं सुरू झालं. मुलांचा विचार करून तिला माघार घेणं क्रमप्राप्तच होतं. दरम्यान ती अतिशय उत्तम ग्रेडने कायद्याची मास्टर्स झाली. दोन वर्षांनी मुलंही शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडली. स्वातीचीही चाळीशी जवळ येत होती.
“मी जाणार म्हणजे जाणार.” स्वातीचा स्वर आता अगदी ठाम होता.
“बघ तुला काय करायचं ते. चांगला आराम सोडून तुला मरमर करण्याचेच डोहाळे लागले तर मी तरी काय करणार त्याला.” शरदचा उपरोधिक स्वर.
“मरमर करायचे नाही तर मला माझी स्वतंत्र काही तरी ओळख असावी ही इच्छा काही गैर नाही. मीही शिक्षण घेताना काही स्वप्न पाहिलंय. प्रयत्न तर केलाच पाहिजे ना त्यासाठी?” स्वातीचा विचार पक्काच दिसत होता.
“काहीही केलं तरी तुझी पहिली ओळख ‘मिसेस शरद ‘ हीच असणार आहे. म्हणजे माझ्यामुळेच असणार हे लक्षात ठेव !” शरद छद्मीपणे हसत बोलला.
स्वातीने एका मोठ्या लॅा फर्ममध्ये जायला सुरूवात केली. कारण डिग्रीत जरी गोल्ड मेडल असलं तरी प्रॅक्टिकल ॲप्रोच जास्त महत्वाचा. लवकरच तिचा वकील म्हणून स्वतंत्र प्रवास सुरू झाला. घरूनच विरोध असल्याने प्रवास नक्कीच सोपा नव्हता पण तिने जिद्दीने आणि नेटाने पूढे पाऊल टाकणं सोडलं नाही. सुरूवातीला शरदही तिचं मानसिक खच्चीकरण करण्याची संधी सोडत नव्हताच. पण म्हणतात ना, गर हौसलें है बुलंद तो सारी कायनात आपके साथ है… ॲड. स्वाती ते मा. न्या. स्वाती हा प्रवास तिने जिद्दीने पूर्ण केला आणि ‘स्व’ ला ओळखत स्वतःची ओळख निर्माण केली.
पण अशा किती तरी उच्चशिक्षित मुलींचं टॅलेंट नवऱ्याच्या व्यवसायात थोडीफार मदत करण्यातच वापरल्या जातं. एकाच फिल्डचे असले तर ही शक्यता अजूनच वाढते. त्याही मुलांसाठी, परीवारासाठी स्वतःची स्वप्नं विसरून हाच योग्य पर्याय मानायला लागतात. अर्थात स्वखुशीने एक पाऊल मागे राहणाऱ्या कुटूंबवत्सल महिलांमुळेच आज आपली कुटूंबव्यवस्था टिकून आहे. त्या नक्कीच आदरणीय आहेत. पण संधी मिळाल्यावर, तिचं सोनं करत स्वतःची वैयक्तिक ओळख जपणाऱ्या जास्त प्रेरणादायी. शरद सारखे केवळ अहंकारापायी असणारे घरातलेच अडथळे नेटाने पार करू शकणाऱ्या तर नक्कीच वंदनीय !
©️रश्मी # rashmi lahoti
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा