शनिवार, १८ मे, २०२४

1144. शिकवण

       पेशंट सोबत बोलत असताना त्याचं लक्ष सहजच टेबलावरच्या सीसीटीव्ही फुटेजकडे गेलं आणि त्याला दवाखान्याच्या काचेला बळंच ढकलताना दमलेले, सुरकूतलेलं ते हात दिसले. त्या दाराला ढकलायलाही त्रास होत असून चेहरा अगदी प्रसन्न, हसरा आणि तेंव्हा सारखाच पण जरा थकलेला कदाचित वयामुळे असेल. त्याने पटकन बेल दाबली वॉर्ड बॉय धावत आला, तसं त्याने सूचना केल्या,
"आता हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या त्या फिकट गुलाबी साडी नसलेल्या बाईंना पाणी दे आणि बसायला सांग."
डॉक्टरच्या सुचनांनी वाॅर्ड बॉय गोंधळला. एवढं काय झालं डॉकटरला. साहेबाची आई आहे की काय म्हणत त्या बाईकडे आला. पाणी दिलं आणि बसायला सांगितलं. बाई खुणेनेच पाणी नको म्हणत गोड हसल्या. खुणेनेच त्यांनी किती वेळ लागेल असं फाईल दाखवत विचारलं,  वॉर्ड बॉयने रिसेप्शनिस्ट कडे यादी बघितली. दोन पेशंट नंतर नाव होतं. त्याने फाईल देत खुणावलं तसं बाईंनी मान डोलवली. दोन पेशंट झाले आणि बाई उठत डॉकटर केबिनकडे गेल्या. त्या आत शिरल्या, तर समोर खुर्चीवर डॉक्टर नव्हते म्हणून त्या भोवताली बघणार तितक्यात त्यांच्या पायावर डोकं ठेवलं डॉक्टरांनी.  मॅडम आज शिक्षक दिन आणि आज सतरा वर्षांनी तुम्ही भेटलात माझं अहो भाग्य. बाईंनी त्यांनां उठवलं. मागच्या वेळी असलेले हे डॉक्टर नव्हते.. नवीन रुजू झाले होते, हे बाईंच्या लक्षात आलं आणि ते देखील कधी काळी आपला विद्यार्थी असतील म्हणून हा नमस्कार बाई नेहमी सारख्या फक्त हसल्या.
तसे डॉक्टर म्हणाले, "मॅडम मला ओळखलं नाही आणि नसेलच कदाचित, पण मी तुम्हाला विसरू शकत नाही. बाई तुम्ही सगळ्या तासांच्या नंतर दर शनिवारी शिकवण तास घ्यायच्या. मी खुप बंड. नेहमी दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल, हाच विचार करणारा, तुमच्या त्या तासात एकदा सगळ्यांना त्रास द्यायला शिरलो होतो. तेंव्हा तुम्ही एक शिकवण दिली होती आणि माझे डोळेच उघडले. तुम्ही तासात सगळ्यांशी बोलत होता, "दुःख प्रत्येकाला असतात, पण आपली दुःखं बाजूला ठेवून जरा दुसऱ्याचं दुःख कमी करता येणारा खरा माणूस असतो. तो कोणीही असू शकतो पोलीस, डॉक्टर, शिक्षक किंवा एखादा मजुरही असेल. पण जरा दुसऱ्याशी संवाद साधुन त्याच्या दुःखाची झळ कमी करता यायला हवी, आणि हिच असते शिकवण माणुसकीची. तुम्ही आता विद्यार्थी आहात, पण पुढे काहीही झालात, तरी ही शिकवण सगळीकडे लक्षात ठेवा. वर्गात सगळ्यांना त्रास द्यायला आलेला मी तुमच्या बोलण्यावर विचार करत राहिलो आणि आज तुमच्या समोर आहे. मॅडम तुमच्या शिकवणीने विश्व बदललं हो माझं. बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचेही डोळे पाणावलेले होते. त्याने बाईंना खुर्चीवर बसवलं आणि फाईल बघत तो ही जागेवर बसला. त्याच्या डोळ्यात साचलेलं पाणी आता घळाघळा गालावर वहात होतं, त्याने बाईंकडे बघितलं  बाई तितक्याच शांत होत्या. मला माहित आहे सगळं अशी मान डोलवत बाईंनी टेबलावरचा त्याचा हात थोपटला. तो मात्र बाईंना झालेला स्वरयंत्राचा कॅन्सर, जो बरा होणारा नव्हता त्याचे रिपोर्ट बघत होता. बाईंचा आवाज हा पूर्ण गेला होता. शिकवण देणारा गळा आता बंद झाला आहे, हे त्याला इतकं मनाला लागलं की, तो त्याचं रडणं थांबवू शकत नव्हता. बाईंनी मात्र शांतपणे सगळं स्वीकारलेलं दिसत होतं. त्यांनी बाजूला असलेला कोरा पॅड घेतला आणि लिहिलं,
"जगण्याचे भोग प्रत्येकाला चुकत नाहीत. खरंतर मला खुप आयुष्य घडवण्याचं सुंदर काम देवाने दिलं होतं ते तुझ्या सारख्या मुलांकडे बघुन अगदी पूर्ण झाल्याच जाणवतं. फक्त एक मागणी करेन तुला. शाळांमध्ये आजही तुझ्या सारखी मुलं असतात पण शिकवण असा तास घेणारा शिक्षक नसतो. तो शोध आणि जमेल तेवढ्या शाळेत असा शनिवारचा वैयक्तिक तास एखाद्या ट्रस्ट द्वारे सुरू कर. सैरभैर झालेल्या अनेक मुलांना तो तास काहीतरी घडवेल, कारण त्यात पुस्तकाचं ज्ञान असं काही नसेल. त्या तासात असेल, जगण्यासाठी मनात येणारी सकारात्मक ऊर्जा. बघ तेवढं जमलं तर." बाईंनी कागद डॉकटर कडे सरकवला. डॉक्टर काहीही बोलू शकत नव्हते. त्यांनी अंवढा गिळला आणि मान डोलावली. थोड्याफार तपासणी करत गोळ्या लिहून दिल्या. बाई निघाल्या. एकट्याच आलात ? असं विचारताच हसल्या. मी एकटीच असते असं खुणेने दाखवत गेल्या. डॉक्टरने ड्रायव्हरला फोन करून पायऱ्या उतरणाऱ्या मॅडमला घरी सोडायला सांगितलं.
      पुढचा पेशंट आला, तरी डॉक्टर डोळे पुसत होते. बंद पडलेल्या मनाला बाई उभारी देऊ शकत होत्या. पण त्यांच्या बंद पडलेल्या स्वरयंत्राला आता आपण काहीच करू शकणार नव्हतो. खरंच शेवटी बाईंची शिकवणच मोठी होती. ह्या सगळ्या शिक्षणापेक्षा. कारण ती मनाला शिकवणारी होती असं म्हणत डॉक्टर पुढच्या पेशंट कडे वळले.

वाचकहो, शिक्षक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. कथा कशी वाटली नक्की सांगा आणि अश्याच कथा असलेले पुस्तक मागवण्यासाठी 7038332429 ह्या no वर msg करा,..धन्यवाद.

©स्वप्ना मुळे (मायी) औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...