सोमवार, १३ मे, २०२४

1132. गोष्ट तिची आणि मायलेकीचीही

      कोल्हापूर मध्ये आपल्या गाडीच्या समोर पंधरा-वीस म्हशींचा तांडा येणं, हे नेहमीचच. अशावेळी  असाह्यपणे त्या रस्त्याच्या बाजूला कधी एकदा होतात, हे पहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.  किती हि राग आला तरी काही गोष्टी आपल्या हाता बाहेरच्या असतात. रागावर काबू कसा मिळवायचा हे अध्यात्मात सांगितलं जाणारं तत्वज्ञान या म्हशी आपल्याला शिकवून जातात. मला म्हशींचा राग येतो, तसा एखाद्या गायीचा मात्र राग येत नाही. उलट तिच्याबद्दल दया, कींव वाटते. गाय ही बुद्धिमान, भावनाशील आणि खूप जवळची वाटते.  पांढरीशुभ्र किंवा तांबूस रंगाची धष्टपुष्ट, देखणी गाय रस्त्यात डौलदारपणे चालताना दिसते. जणूकाही एखादी घरंदाज हळदीकुंकू समारंभाला निघालेली स्त्रीच.
     गोष्ट आहे अश्याच एका गायीची. मायलेकीची आणि तिची ही. दुपारपासून एक गाय खाली पार्किंगमध्ये बराच वेळ घुटमळत होती. सोसायटी मधल्या दोन मुलानी तिला हुसकावून लावण्याचा पण प्रयत्न केला. पण ती काही बाहेर पडायला तयार नव्हती. कमरे एवढ्या ऊंचीच्या भिंतीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली. संध्याकाळी वर राहणाऱ्या मृणालने आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये उभी केली. मृणालचं लक्ष त्या गायीकडे वळलं. तिच्या लगेचच लक्षांत आलं. त्या गाईचे दिवस भरत आले होते. गायीच्या डोळ्यांतल्या  प्रसूतिवेदना तिला जाणवल्या. काही क्षणातच ती गाय विणार आणि आपल्या लेकराला जन्म देणार हे मृणालनं ओळखलं. आणि एखाद्या अनुभवी सुईणी सारखी ती कामाला लागली. तिच्या लहानपणी तिच्या मालवणातल्या घरी असलेल्या गोठ्यात तिने अनेक गाई आणि म्हशी विताना पाहिल्या होत्या.ते सगळं ज्ञान क्षणांत मृणालच्या मनांत जागृत झालं. घरी जाऊन तीनं दोन मोठी गोणपाटंआणि काही फडकी आणली. मृणालला फार वेळ वाट पहावी लागली नाही. वासराच्या डोक्याचा भाग आणि पुढचा पाय बाहेर आला. काही क्षणातच वासराचा जन्म झाला. मृणालनं नाळ कापून वासराला आईपासून वेगळं केलं. आईनं लेकीला जन्म दिला होता. लेकीनं आईचंच देखणं रूप घेतलं होतं. पांढरीशुभ्र काही तांबूस टिपके, आणि डोक्यावर काळा नाम  जन्मताच वासरू उभं राहण्याचा प्रयत्न करीत होतं. पण पडत होतं तीनं मऊ फडक्यानं वासराला पूर्ण कोरड स्वच्छ केलं. त्याच्या पायांच्या खुरांची गेळं कापली. गेळं म्हणजे आपल्या नखांसारखा खुरांचा वाढलेला भाग गेळं असताना वासरू पाय जमिनीवर टेकू शकत नाही. गेळं कापल्यावर ते छान ऊभं राहिलं. आणि प्रेमभरानं गाय आपल्या लेकरा चाटू लागली अर्ध्या तासात गाईची वार पडली. अशा वेळेला आपल्याला लक्ष द्यावं लागतं. नाहीतर ती खाऊन टाकण्याकडे गुरांचा कल असतो. जनावरांनी वार खाल्ली तर त्याचा परिणाम दुधावर होतो.  दूध कमी होतं मृणालने पडलेली वार शिताफीने बाजूला केली. हे सर्व घडत असताना बरीच प्रेक्षक मंडळी आजूबाजूला जमा झाली होती. पण ती सोडून गायीच्या जवळ जाण्याचं धाडस कोणी करत नव्हतं.काहीजणांनी आपल्या आयुष्यात प्रथम गाय विताना पाहिली होती. काही उत्साही मंडळींनी आपल्या घरातून गायीला खाण्यासाठी केळी, घरातील शीळ अन्न असं काही काही आणलं. पण ती गाय कशाला हि तोंड लावायला तयार नव्हती. अशा वेळेला काय खायला घालायचं ते मृणालच्या लक्षांत आलं. उमजलं.
     ती घरी गेली. एका मोठ्या पातेल्यात चार वाट्या तांदूळ दोन तीन वाट्या हरभऱ्याची डाळ, एक वाटी ऊडीद असं सारं, खूपस पाणी घालून शिजत ठेवलं. ते चांगलं शिजल्यावर दोन वाट्या तेल आणि एक मोठा गुळाचा खडा त्यात घातला आणि ते गरम गरम तयार झालेलं खाणं, तिनं गाईच्या समोर आणून ठेवलं. गायीच्या पोटात काही नव्हतं. श्रमानी तिला खूप थकवा आला होता. गरम गरम खाणं तिच्या पोटात गेलं. ती खूप ताजीतवानी. हुशार झाली. आता गाईचं दूध काढायला हव होतं. त्या नवजात वासराला पण त्याच्या आईच्या दुधाची तहान लागली होती. एका म्हशींच्या तबेल्यात काम केलेला इसम तुढे सरसावला. हातात एक दोरी घेऊन. त्याचा गाईचे मागचे पाय बांधून दूध काढण्याचा बेत होता. गायीनं त्याला आपल्या आसपास येऊ दिलं नाही. आता मृणालने गाईच्या पाठीवरून हात फिरवला. मानेच्या खाली खाजवलं. हळू हळू तिच्या डोळ्यांवर, तोंडावर हात फिरवला एकमेकींच्या डोळ्याला डोळे भिडले भावना आतपर्यंत पोहोचल्या. एकीच्या डोळ्यात कृतज्ञता तर दुसरीच्या डोळ्यात अपार प्रेम आणि कणव तिने कोमट पाणी आणून तिचे आचळ स्वच्छ धुतले. वासराला जवळ आणून त्याच्या तोंडात एक आचळ दिला. गाईच्या कासेत, आचळांत चांगलाच ताठरपणा आला होता. वासराच्या तोंडात आचळ गेल्याबरोबर तिला पान्हा फुटला. चांगलं जाड आणि घट्ट पौष्टिक दूध वासराच्या पोटांत शिरलं आणि ते गाईला चांगल्या ढूशा मारू लागलं. त्या मायलेकराना झालेला आनंद त्यांच्या देहबोली वरून जाणवत होता. तीने सावकाश दूध काढायला सुरुवात केली. तिला गाई-म्हशींचे दूध काढायला लहानपणा पासून येत होतं. चांगली दोन मोठी भांडी भरून दूध निघालं. गाईचा मालक गाईला शोधत सोसायटीत येऊन पोहोचला. गाईनं त्याला लगेच ओळखलं. म्हणत होता डॉक्टरनी आठ दिवसानंतर ची तारीख दिली होती. ही सर्वांचा डोळा चुकवून कुठे गेली हे आम्हा कोणाला कळलं नाही. त्याने मृणालकडे कृतज्ञता व्यक्त केली. तिचे आभार मानले. आणि तो क्षण येऊन ठेपला आता तो गाईला आणि वासराला आपल्या घरी घेऊन जाणार होता. पण ते वासरू त्याला कुठे ओळखत होतं. ते तिला सोडायला तयार नव्हतं. गाय एकदा मालकाकडे बघायची आणि एकदा वासराकडे. आणि तिच्याकडे पण. त्या गाईची झालेली व्दिधा मनस्थिती तिच्या लक्षांत आली. मग मृणालनेच पुढाकार घेउन त्या वासराला गाई जवळ आणलं आणि त्या दोघीना तिच्या मालकाच्या स्वाधीन केलं.
"काढलेल्या दुधावर खरा हक्क तुमचाच आहे ताई" असं तो म्हणत होता पण मृणालने त्याचं ऐकलं नाही आणि ते दूध पण त्याच्या स्वाधीन केलं. ती तिघं ही दूर जाई पर्यंत ती त्यांच्याकडे बराच वेळ पहात राहिली. बाहेर चांगलाच काळोख पडला होता. गेले तीन-चार तास कसे गेले याचं तिला भान नव्हतं तिला घराची आठवण झाली. देवापुढे दिवा लावायचा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...