तिने फोन करुन त्याला गोड बातमी सांगितली. प्रचंड खुश झाला होता तो ती बातमी ऐकून. अगदी ह्या क्षणी ऑफिसमधून निघावं. नी तिच्यापाशी पोहोचावं, असं झालेलं त्याला. पण ते अर्थातच शक्य नव्हतं. खूप महत्वाच्या मिटिंग्ज ऑलरेडी लाईन्ड-अप होत्या. त्याने त्यामुळे आता कामावर काँन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. मग पुर्ण दिवसभरात त्याला अजिबातच वेळही मिळाला नाही, तिला काॅलही करायचा. रात्री आठच्या सुमारास ऑफिसमधून सुटल्यावर, घरी जाण्याकरता म्हणून तो कारमध्ये बसला त्याच्या. आणि तेवढ्यात त्याला समोर एक लहानशी मुलगी दिसली, टोपलीत गजरे घेऊन बसलेली. त्याने विचार केला की, आज बायकोसाठी मस्त गजरा घेऊन जाऊ. त्याने गाडी बाजूला लावली, नी त्या मुलीला बोलावलं. ती मुलगी तिची टोपली घेऊनच आली. त्याने त्या मुलीला सांगितलं, कुठलातरी एक गजरा द्यायला. त्या मुलीने त्याला विचारलं. "किसके वास्ते ले रहे हो?". त्या इवल्या मुलीच्या ह्या आगाऊ प्रश्नाचं, त्या क्षणी हसूच आलं त्याला. तो बोलला. "तेरी भाभी अब माँ बनने जा रही है". हे ऐकून त्या मुलीचे डोळे एकदम लकाकले, नी तिने पटकन एक गजरा काढून दिला त्याला. त्या गजर्याची फुलं जरा वेगळीच वाटली त्याला, कधीही न पाहिलेली अशी. त्याने विचारलं त्या मुलीला. "अरे ये कौनसे फुलोंका गजरा है?". ती मुलगी शांतपणे बोलली. "कभीभी ना मुरझानेवाले फुलोंका". आणि झप्पकन वळत, निघूनही गेली ती. पैसेही मागितले नव्हते तिने. तो तिला हाक मारेपर्यंत, ती मुलगी नाहीशीही झाली होती.
घरी गेल्यावर बायकोला सगळं सांगत त्याने तो गजरा, आपणहून तिच्या केसात माळला. पण गजर्याला कणभराचाही सुवास येईना. तिने तो काढला केसांतून, नी नाकाशी नेऊन जोराने हुंगला. पण छे...अजिबातच वास नव्हता गजर्याला. ती हसायला लागली त्याच्यावर, नी म्हणाली. "काय पण रे तू... एक लहानशी मुलगी तुला फसवून गेली. कसे काय क्लाएंट्स हँडल करतोस आॅफिसमध्ये कोण जाणे". अर्थात त्या मुलीने पैसे न घेतल्याचं, त्याने सांगितलं नव्हतं तिला. पण आपण पुर्णपणे फसवलो गेलेलो नाहीयोत, ह्याचं एक मध्यमवर्गीय समाधान वाटून गेलं त्याला. आणि तेवढ्यात आठवलं त्याला, त्या मुलीने म्हंटलेलं... "कभीभी ना मुरझानेवाले फुलोंका गजरा है ये". तो लगेच बोलला बायकोला. "एक काम करशील? तो गजरा भले माळू नकोस केसांत, पण कायम जवळ ठेवशील?". ती म्हणाली. "अरे हा गजरा कुठल्याशा रानटी फुलांचा दिसतोय. दिवसभरात सुकूनही जाईल बघ". तो म्हणाला... "ते बघू. पण निदान सुकेपर्यंत तरी ठेवशील जवळ?". ती सुद्धा हो म्हणाली होती मग.
.
.
.
.
.
आज त्यांच्या बाळाचा जन्म झाला. अतिशय सुंदर नी गुटगुटीत असं बाळ होतं. पण त्याला पाजायला, तिच्या छातीला अगदी नावालाही दुध येत नव्हतं. डाॅक्टरांनी लगेचच औषधं वगैरेही, अर्थातच सुरु केली होती. आणि... आणि... तिने उशीखाली ठेवलेला तो गजरा, अचानकच सुकलेला दिसला तिला. गेले नऊ महिने आश्चर्यकारकरीत्या तो गजरा. जसाच्या तसा टवटवीत राहिलेला, भले त्याला गंध नसूदे. हा एक अविश्वसनीय असा चमत्कारच होता. ती गजरेवाली मुलगीही ह्या गेल्या नऊ महिन्यांत, त्याला एकदाही दिसली नव्हती. सुकलेल्या गजर्याकडे बघून, एकमेकांकडे बघत बसले दोघेही. आणि कुठलंसं काहूर आलं दाटून, मनांतून त्यांच्या. तेवढ्यात हाॅस्पिटलच्या दारावर टकटक झाली. त्याने दार उघडलं, तर ती गजरेवाली मुलगीच होती दारात उभी. तिला इतक्या महिन्यांनी आपणहून समोर आलेलं पाहून, त्याला कमालीचं आश्चर्यच वाटलं. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघत, किंचितसं हसली ती मुलगी. नी सरळ आत शिरली. त्या दोघांकडेही आळीपाळीने बघत, मंदसर हसत होती ती. मग पाळण्यातील बाळाकडे बघितलं तिने, नी एकाएकी डोळे भरुन आले तिचे. आपल्या हातातील टोपली खाली ठेवत. आपले दोन्ही हात बाळाभोवती ओवाळत, कडाडकन बोटं मोडली तिने कानांवर. खाली ठेवलेली टोपली पुन्हा हातात घेतली तिने, आणि त्यातून एक गजरा काढला.
तो गजरा त्याच्याच हातात देत ती म्हणाली. "ये लो साब. इसका खुसबू भोत अच्छा है. आपका बच्चा भी इसी तरह महकेगा दूर दूर तक.". त्याने विचारलं त्या मुलीला. "ये फुल तो वैसेही दिख रहे है, जैसे पहलेवाले गजरेमें थे. तो उनमे खुशबू नही थी, और इनमे है. ऐसे क्यों?" ती मुलगी म्हणाली... "साब. तब आपका बच्चा भाभीके पेटमें था ना. तो तभी खुसबूसेभी जादा जरुरी था, उसका मुरझा ना जाना." ते दोघेही थक्क होऊन, बघतच बसले त्या मुलीकडे. ती पुढे म्हणाली. "मै चलती है साब. बस वो सुका हुवा गजरा दे दो मेरेको, मै वो उसी जगह मिट्टीमे डाल दुंगी" त्याने विचारलं. "कौनसी जगह?". ती मुलगी शांतपणे बोलली. "मेरा छोटा भाई जनमके पहलेही, अम्मा के पेट में मर गया था. ऑपरेशन करके उसको निकाला और एक जगह दफना दिया. उसी जगहपे एक पेड आया है, जिसको ये ऐसे फुल आते है. मै बस जाके फुल चुनती हूँ. बाकी वो पेड तय करता है के उससे बननेवाला गजरा, ना मुरझानेवाला बनेगा या फिर खुसबू देनेवाला." इतकं बोलून ती मुलगी, पुन्हा किंचितसं हसत निघून गेली. आत्ताही गजर्याचे पैसे न मागताच.
काही वेळ लागला त्या दोघांनाही भानावर यायला. पण लगेच मग त्याने तो गजरा, बायकोच्या हातात ठेवला. तिने तो नाकापाशी नेत त्यांचा अलौकीक असा गंध, स्वतःच्या छातीत खोलपर्यंत भरुन घेतला. आणि...आणि तिला जाणवलं, अचानकच तिला पान्हा फुटल्याचं. लगबगीने तिने आपल्या बाळाला उचलत, घट्ट छातीशी लावलं. आणि तो दर्वळणारा गजरा, पुन्हा स्वतःच्या उशीखाली ठेवला तिने. तिच्या बाजूला बसत. खांद्याभोवती हात टाकत तिच्या, अलगदपणे जवळ घेतलं त्याने तिला. तिच्या छातीतून दुध आणि डोळ्यांतून पाणी आता अगदी भरभरुन वहात होतं.
- सचिन श. देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा