शनिवार, ११ मे, २०२४

1120. पित्रुसत्ताक उन्मत्तपणाचे पुरूषबळी विजूकाका

     काही वर्षापूर्वी आमच्या शेजारी एक आत्याबाई रहात होत्या. अत्यंत प्रेमळ-समंजस-आल्यागेल्याचं हसतमुखानं करणार्या. त्यांच्याकडे एक ग्रुहस्थ विजूराव नियमितपणे यायचे. माझं आत्याबाईंकडे रोजचच  येणं-जाणं असल्यामुळे मी त्यांना ओळखत होते. एके दिवशी असंच मी सहज आत्याबाईंकडे बसायला म्हणून गेले असता मला एक वेगळंच द्रुश्य दिसलं. विजूराव सोफ्यावर बसून हमसाहमशी रडत होते. आत्याबाई हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या होत्या. काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव होऊन मी दारातच थबकले. आत्याबाईंनी त्यांना शांत केलं. पाणी प्यायला दिलं. काही क्षणानंतर आत्याबाई स्वैपाकघरात गेल्या. मीही त्यांच्या मागोमाग आत गेले. त्यांनी विजूरावांसाठी चहा ठेवला. माझ्या प्रश्नार्थक चेहर्याकडे पाहून त्या म्हणाल्या, "विजयरावांची सुनिता चार-पाच दिवसापूर्वी घर सोडून गेली. तिनं गल्लीतल्या परदेशी पोराशी लग्न केलंय. काल रात्री परदेशाच्या घरी रिसेप्शन झालं. विजूरावांना बोलावलं पण नाही."
आम्ही चहा घेऊन बाहेर आलो. हातात कपबशी घेऊन विजूराव घटाघट चहा प्यायले. ते खूप उपाशी असावेत. त्यांचा चेहरा रडून-रडून सुकला होता.  कपबशी खाली ठेवून त्यांनी रूमाल काढला. चेहरा पुसला. शून्य मनस्थितीत बसून राहिले. स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला आपल्याला कुणी बोलावू नये याचं दु:ख त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. अचानक झटका यावा तसा मोठा हुंदका देऊन ते बोलू लागले.
"नमाताई सुन्तीनं मला सांगितलं असतं तर मी लग्न लावून दिलं नसतं का तिचं? गपचूप निघून गेली. रम्या (त्यांचा मोठा मुलगा) पण मला काही विचारत नाही. माझ्याशी दोन शब्दसुद्धा धड बोलत नाही. रम्या एकटा रिसेप्शनला गेला. सगळी गल्ली तिथं गोडधोड जेवली आणि मी सख्खा बाप घरात उपाशी बसलो. मला काही किंमत आहे की नाही. आज उषा असती तर किती बरं झालं असतं. तिनं तरी पोरीला चार शब्द समजावून सांगितले असते."
हे बोलता बोलता विजूराव एकदम अस्वस्थ झाले. एकदम वेड्यापिशासारखे मोठ्याने बोलायला लागले,
"मी, मी मारलं उषा तुला. खेड्यातली गरीबाची बायको आणली. ढोरासारखं काम करायची. कधी तक्रार नाही, कधी काही मागणं नाही. काम करत रहायची. आईनं चुगल्या केल्या की मी तिला काठीनं ठोकायचो. लेकरं पोटात असतानासुधा मार खायची, रडायची, उपाशी झोपायची. मी कधी जवळ घेतलं नाही. दोन प्रेमाचे शब्द बोललो नाही. मला जवानीची रग होती. मी दुसर्या बायकांकडं जायचो. उषा घरात चिंबल्यासारखी राबली. मी मारायला लागलो की आई भरीला घालायची. सुन्ती सहा वर्षाची होती. एकदा रात्री मी असंच तिला बडवलं. तिच्या अंगात ताप होता. ती नको नको म्हणून हात जोडत होती. दोन्ही पोरं घाबरून रडत होते. पण मला दया आली नाही. मी आणि आई जेवलो. पोरं उपाशी झोपले. दुसर्या दिवशी हातपाय वाकडे झाले म्हणून तिला सरकारी दवाखान्यात भरती केलं. सातव्या दिवशी उषा आम्हाला सोडून गेली. पुढं काही दिवस आई घरात काम करायची. सुन्ती आज्जीला मदत करायची. मग आईच्यानं काम होईना. सुनेला छळून मारल्याचा आईला पश्चाताप व्हाय लागला. आईचा स्वभाव माहित असल्यामुळं मला कुणी दुसरी बायको देईना. घराचा वनवास झाला. नातेवाईक कुणीच मदतीला आले नाहीत. पोरं माझ्यापासून तुटले. जवानीची नशा उतरली. पोरगी वीस वर्षाची झाली पण कधी माझ्याशी मनातलं बोलली नाही. रम्या माझा रागराग करतो. का नाही करणार? मी त्यांची आई मारली. स्वत:ची लेकरं मी पोरकी केली.  आज उषी असती तर सुन्ती अशी घर सोडून गेली नसती. मी एकटा पडलो नमाताई. जगात कुणीच नाही राह्यलं माझं. मला माहिते, असाच एकटा मरीन पण पोरं मला कधीच विचारणार नाहीत." विजूकाका भडाभडा बोलत होते. सगळ्या पापाची झाडाझडती देत होते. तरूणपणी बायकोला लाथाडल्याचा माज पूरेपूर उतरला होता. डोळ्यापुढं दिसणारं एकाकी म्हातारपण पाहून घाबरले होते. आईचं ऐकून बायकोला झण्णकन् वाजवल्याची गुर्मी जिरली होती. एकेकाळी बायकोला उपाशी ठेवून आईसोबत वचावचा जेवलेलं हे गिधाड आज पोरीच्या लग्नात जेवायला न मिळाल्यामुळ दुसर्याच्या घरी टाचा खुरडत बसलं होतं.
     आपल्या आई आणि बहिणींना वशीभूत होऊन बायकोला तडपवणारे असे असंख्य विजूकाका आजही समाजात आहेत. ज्यांच्या अंगात त्यांच्या कमाईचा, जवानीचा, आईच्या पाठिंब्याचा पूरेपूर माज भरलेला असतो. पण आई मेल्यानंतर, बहिणी स्वत:च्या संसाराला गेल्यानंतर त्यांची सख्खी पोरंसुद्धा त्यांना विचारत नाहीत. बायकोने तर कधीच असल्या विजूकाकांना मनातून हद्दपार केलेलं असतं. जवानीचा बहर ओसरलेला असतो. पोरं तुटलेली असतात. बायको हुंगत नसते. अशावेळी संध्याकाळी कुटुंबवत्सल माणसं आपल्या लेकराबाळांच्या गराड्यात हसत-खेळत बसलेले असताना असले कितीतरी  विजूकाका तुम्हाला एखाद्या देवळाच्या अंधार्या कोपर्यात हताश बसलेले दिसतील.

अम्रुता खंडेराव...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...