नेहमीप्रमाणेच ऑफिसमधून घरी आला तो आणि रिकामं केलं त्याने स्वतःला, शर्ट - पॅन्टच्या खिशांमधून भरलेला ऐवज बाहेर काढून. "आता हे असं टिपाॅयवर दुकान मांडून चालणार नाही. कोणी नाहीये आता, आपली प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेऊन द्यायला आणि पुन्हा दुसर्या दिवशी निघतांना, हातात आणून द्यायला". स्वतःशीच बोलला तो. पुन्हा एक हुंदका, खोलातून बाहेर येता येता आवरला त्याने. चार खोल्यांचा स्वतःचा फ्लॅट त्याला आता, शनिवार वाड्यासारखा भासू लागला. नको एवढा मोठा, नी छाती दडपून टाकणारा असा मोकळा. "एवढं रिकामेपणही काय कामाचं?". त्याचं स्वगत चालूच होतं. एकटा पडला होता तो.
सागर सुखात्मे. एका मोठ्या जबाबदारीतून, मोकळा झाला होता. नुकतंच त्याने त्याच्या एकुलत्या एका लेकिचं. सायलीचं, लग्न लाऊन दिलं होतं. पंधरा दिवस रजा घेतलेली असूनही, सागर दहाव्या दिवशीच कामावर रुजू झाला होता. घर खायला उठत होतं त्याला एकट्याला. गेली अठरा वर्ष त्याला, नी त्याच्या ह्या घराला. जास्तच सवय झाली होती सायलीच्या असण्याची. तिच्यामुळेच तर तो तगून राहिला होता, त्या कठिण काळातही. जेव्हा सरिता मागे सोडून गेली होती त्याला, नी अवघ्या पाच वर्षांच्या सायलीला. सोडून गेली होती सरिता सागरला? अ हं... खरंतर निघून गेली होती ती, त्याला न सांगता आणि म्हणूनच बाहेरच्या लोकांलेखी तर, पळून गेली होती ती. होय... सरिता पळून गेली होती एकाबरोबर. लग्न झालं असूनही, पदरात एक मूल असूनही. नेसत्या कपड्यांवर, अगदी काहीही न घेता घरातून निघून गेली होती ती. तो धक्का सागर पचवू शकला होता, ते फक्त नी फक्त सायलीकडे बघूनच. आणि तेव्हापासूनच सागर आणि सायली, विश्व बनले होते एकमेकांचं. सागर तिचा बाप नी आई दोन्ही होता... तर आताशा, सायलीही सागरची आई बनत होती प्रसंगी. सागर दरवाजा उघडून सायलीच्या बेडरुममध्ये गेला. बेडवर बसला तिच्या. काॅर्नरपीसवर असलेला तिचा फोटो, हातात घेतला त्याने...आणि ओक्साबोक्शी रडू लागला तो, ती फोटोफ्रेम कवटाळून छातीशी. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, काॅर्नरपीसवरुन उडू पाहणार्या एका चिठ्ठीवर. जी ठेवली होती, त्याच फोटोफ्रेमच्या वजनाखाली. रडता रडता थांबला सागर, नी भुवयांचं प्रश्नचीन्ह करत त्याने चिठ्ठी उचलली. ह्युमन सायकाॅलाॅजीप्रमाणे, त्याने पहिल्यांदा चिठ्ठीच्या शेवटाला पाहिलं तर सायलीचं नाव दिसलं त्याला. त्याच्या डोक्यात विचार आला. "आपणही काय अगदी खाली बघतोय? सायलीशिवाय लिहिणारच कोण आहे आपल्याला?". सागरने चिठ्ठी वाचायला घेतली...
प्रिय बाबा,
बघ... मला करेक्ट माहिती होतं की, चिठ्ठी कुठे ठेवली म्हणजे तूला ती लगेच मिळेल. गॅरेन्टी होती मला की आज ना उद्या तू माझ्या रुममध्ये येऊन, माझा फोटो नक्की उचलून घेणार. छातीशी कवटाळून घेणार. म्हणूनच त्या फोटोफ्रेम खालीच ठेवली मी चिठ्ठी. तूला माहितीये, मी जेव्हा केव्हा बाहेर जायचे. पिकनीकला म्हण, किंवा हल्ली ऑफिसच्या कामाकरता म्हण. मी मुद्दामहून ती फ्रेम एका ठराविक ऍन्गलला सेट करुन जायचे. बेडची चादरही कडक खोचून जायचे. आणि जेव्हा परतून यायचे घरी, पहिल्यांदा आत जाऊन मी ती फ्रेम बघत असे. नी कळत असे मला तिची पोझिशन बदललेली, दिसत असत मला दोन-चार सुरकुत्याही पडलेल्या बेडशीटवर. मग मला लगेच कळायचं की तू आत येऊन, बसून गेलायस इथे. माझा फोटो हातात धरुन, त्याच्याकडे बराचवेळ बघत. भरल्या डोळ्यांनी, कदाचित वाहत्याही. वयाच्या दहाव्या वर्षी मी पोळ्या करायला शिकले. तूला आठवतंय मी केलेली पहिली पोळी, तू तूझ्या हातात घेऊन बसला होतास कितीतरी वेळ भारावून बघत. ही खावी तरी कशी हा विचार करत. माझ्या शाळेच्या गॅदरिंगला एकेवर्षी, आयत्यावेळी काही कारणाने माझा डान्स रद्द केला गेला. कसला भांडलेलास तू वरपर्यंत जाऊन. माझा रडवेला झालेला चेहरा बघून, कासाविस झालेलास तू. माझा डान्स शेड्युलप्रमाणेच, घालायला लावला होतास तू मग. दहावीच्या बोर्ड एक्झामला, मला प्रत्येक पेपरला तू सोडायला आलेलास. मैत्रीणी साॅल्लिड हसायच्या मला. पण मी तूला ते कधीच सांगितलं नाही, कारण मला खूप आवडायचं बघायला. ते समाधान तूझ्या चेहर्यावर पसरलेलं. अगदी काॅलेजपर्यंत तूच माझे कपडे घेत होतास. मला काकूबाई चिडवायचे काॅलेजात. but I never ever bothered about that. मी हॅप्पी असायचे, तू जे काही आणशील ते घालण्यात. पण एके दिवशी तू आपणहून मला कॅश दिलीस, नी म्हणालास. आजपासून तू तूझ्या आवडीचं घेत जा. रोहनची कसली चौकशी केली होतीस तू, when I told u that we have fallen in love with each other. शप्पथ हादरला होतास तू. मी तूझ्यापासून कधीनाकधी दुरावणार, ही पाॅसिबिलीटी लक्षातच घेतली नव्हतीस तू. आपल्यावरही कधीतरी एकटं रहायची वेळ येइल, असं वाटलंच नव्हतं ना कधी तूला? पण... पण 'ती' तर गेली पंधरा वर्ष एकटी राहतीये रे. मी आठवीत होते. प्रचंड उलथापालथ चालू होती शरीरात, खूप काही घडत होतं आतल्याआत. तू माझा कितीही सुपर बाबा असलास, तरी काही गोष्टी मी तूला सांगू शकत नव्हते रे. वाढत्या वयाच्या आपल्या मूलीच्या प्राॅब्लेम्सपासून, तू कंप्लिट अनभिज्ञ होतास. हे असंही काही असतं याबद्दल अजाण. मी मात्र अगदीच हतबल झाले होते. आणि... आणि अशात मला 'ती' आठवली. इथून तिथून तिची माहिती काढत, तिला शोधत. मी तिच्यापर्यंत जाऊन पोहोचले. मला पुढ्यात बघून, मी कोण आहे हे कळून तासभर 'ती' फक्त रडत होती. मी ही दिलं होतं तिला पोटभर रडून. केव्हाची भुकेली होती रे ती, स्वतःच्या कोणाच्या स्पर्शाची. आणि मुलीच्या त्या नाजूक वयातली अडचण, तिच्या स्वतःच्या आईशिवाय अजून कोणाला कळणार? अगदी त्या दिवसापासून आम्ही एकमेकींना सतत भेटत होतो. कधी बाहेर, कधी तिच्या लेडिज हाॅस्टेलच्या रुमवर. पण आपल्या घरी मात्र, ती कधीच आली नाही. ती ज्याच्याबरोबर पळून गेली होती, तो जेमतेम तीन वर्षांतच गेला आणि तेव्हापासून ती एकटी राहतीये. तिचं खूप प्रेम होतं रे त्याच्यावर. तो खूप बोलायचा तिच्याशी, खूप काळजी घ्यायचा तिची. तिला प्रचंड मानसिक आधार मिळायचा त्याच्याकडून. तिच्या स्त्रीत्वाचा मान राखायचा तो, तिच्या प्रत्येक वेदनेवर फुंकर घालायचा तो. आणि हेच सगळं तिला तुझ्याकडून कधीच मिळालं नव्हतं. शारीरीक गरजच सगळं काही नसतं ना. मनालाही खंबिर आधार लागतोच की. आणि तोच आधार त्याने दिला तिला. तो कंबरेखालून कंप्लिटली पॅरलाईज्ड आहे. हे माहित असूनही, ती त्याच्याकडे गेली. Because her priorities were different, her needs were different. ज्या तू कधीच समजू शकला नाहीस बाबा. पाच वर्षांच्या मला मागे ठेऊन जाणं, हे तूला तूझ्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचाच एक भाग होता. नाहीतर तो तिला, अगदी माझ्यासहीत स्विकारायला तयार होता. हे सगळं फेस टू फेस तूला सांगणं अवघड गेलं असतं मला, म्हणून ही चिठ्ठी. मी तिच्या कृतीचं, आंधळं समर्थन अजिबातच करत नाहीये. त्यावेळी, त्या परिस्थितीत तिला जे सुचलं ते तिने केलं. ते चूक होतं की बरोबर माहित नाही, पण तिने स्वतःच्या हिंमतीवर तो निर्णय घेतला होता. ज्याचे परिणामही तिने हिंमतीने एकटीने भोगले. ह्या चिठ्ठीतलं तूला जर पटलंच तर ड्राॅवर उघड. त्यामध्ये अजून एक चिठ्ठी ठेवलीये, ज्यात पत्ता आहे तिचा. जा बाबा. घेऊन ये तिला, माझ्या आईला. ह्या आपल्या घरी. तू ही एकटा आहेस आणि ती ही. आणि तूम्हा दोघांनाही गरज आहे आता, मानसिक आधाराची. एकमेकांच्या निःस्वार्थ सहवासाची. मी बोललेय आईशी ऑलरेडी... and she is waiting for u. She is waiting for u since last 15 years बाबा. प्लिज तूझ्या जिव की प्राण असलेल्या लेकीचं, हे एवढं एकच ऐक... शेवटचं. आयुष्यात आणि काही मागणार नाही, तूझ्याकडे लेक तुझी... पुन्हा कधीच.
तुमच्या दोघांचीही,
सायली
सागर ने भरल्या डोळ्यांनीच, ड्राॅवरमधल्या चिठ्ठीतला 'ती'चा पत्ता वाचला. छातीवर त्या दोन्ही चिठ्ठ्या, नी सायलीचा फोटो ठेऊन तो सायलीच्या बेडवरच डोळे मिटून निजून राहिला, बंद डोळ्यांआत जागत. अंतरातील काळोख सरून गेल्यावर, आता बाहेर तांबडं फुटून येण्याची वाट बघत.
---सचिन श. देशपांडे kk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा