आज सकाळ पासूनच ती जरा अस्वस्थ होती. कारणही तसंच होत नववा महिना सरत आला होता. पण कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नवऱ्याच्या एकट्याच्या मजुरीवर सारे भागणार नव्हते. खाणारी सहा तोंडे घरात होती. धरसोड करत काम उरकले. आपली आणि नवर्याची शिदोरी बांधली आणि निघाली कामाला. चार ,पाच वाजेतोवर काम केले. शेवटी मालकाला सांगून ,थोडे निंदायचे बाकी ठेऊन निघाली घरी यायला. आल्याआल्या कप भर चहा केला. गुळाचा बिन दुधाचा. पोटात कळा चालूच होत्या. चूल पेटवलीच होती. लगोलग भाकरीचे आधण ठेवले. तोवर एका बाजूने भाजी फोडणी घातली. कश्या बस्यां दहा बारा भाकरी थापल्या आणि पुंन्हा थोडा वेळ आडवी पडली. तेवढ्या सासूची गर्जना झाली .अरे देवा हि काय झोपाची वेळ हाये का? काही लाज शरम. दिवाबत्तीच्या टायमाले कोणी बुहाऱ्या सारखं झोपते का? चाल उठ लवकर. कण्हतच म्हणाले. सासूबाई पोटात खूप दुखत आहे. दिवस पण भरले. तुम्ही आपल्या पारबती मांगिनला बोलावून आणता का? अंगावर पण जात आहे. लगोलग सासूबाई पायात पायताण अडकून गेल्या. जातांना सूचना देऊन गेल्या. कळशी भर पाणी गरम करायला ठेव. आंगपाय धुवाले लागण. पाणी गरम करायला ठेवले आणि पोटातून कळा वर कळा यायला लागल्या. तेवढ्यात सासूबाईपण आल्या पारबती मांगीनला घेऊन. हे पण आले कामावरून. सगळ्यांनी तोवर जेवण आटोपून घेतले. पारबती मावशी मला धीर देत होत्या. मी मात्र आतून खूप हादरून गेली होती. तशी मी काही घाबरायला पहीलट करीन नव्हते. घाबरण्याचे कारण वेगळेच होते. पहिल्यांदा गरोदर होते. तेव्हा मुलगा झाला होता. वंशाचा दिवा म्हणून सगळेच खूप खुश होते. बाळपण मस्त गुटगुटीत होत. पण काय झाले कोणास ठाऊक. तो सहा महिन्यांचा झाला. नुसते दोन दिवसाच्या तापाचे निमित्य झाले आणि बाळ गेलं आणि वंशवेल खुंटली. कारण त्यानंतर सलग तीन मुली झाल्या होत्या.पहिली मुलगी झाली. सगळे खुश होते. पहिली बेटी, धनाची पेटी म्हणत होते. पण नंतर मुली झाल्यावर सासूने आणि नवऱ्याने घर डोक्यावर घेतले होते. आता तर दोघांनी ठाम सांगितले होते. आता जर मुलगी झाली तर आम्ही तिला. तुझ्या आंघोळी साठी जो घरात खड्डा करतात. त्यात टाकून वरून माती टाकून पुरून देणार. देवाला मनोमन प्रार्थना करत होते. देवा मुलाचेच दान घाल रे बाबा पदरात. पुन्हा डोक्यात विचार यायचे. बापरे!मुलगी झाली तर खरच मारून टाकतील का ? देवा नको रे माझी अशी परीक्षा घेऊ.धर्मसंकटातून सोडव रे बाबा. मुलगाच होऊ दे. मिळू दे एकदाचा यांना वंशाचा दिवा. चालवू दे घराण्याचे नाव. तेवढ्यात एक जोराची कळ आलीआणि बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सगळ्यांचे कान त्या बंद दाराकडे होते. खड्डा करून तयार होता. पारबती मावशी बोलल्या पुन्हा मुलगीच.
तस्या सासूबाई तरातरा उठल्या. पुन्हा कार्टीच झाली रे बाबा. तुव्ह नशीबच फुटक त्याले कोणी काय करणार. टाक आता तिले मारून. कितीक पोरी उजवशीन (लग्न करून देशींन) पिचक एकडावची. अन टाक त्या खड्ड्यात आणि पोरीला हातात घेतले. नुकतीच बाळंत झालेली मी कुठून इतके बळ आले कोणास ठाऊक. सासूबाईंच्या हातातून पोरगी घेतली घट्ट पोटाशी धरली आणि सगळ्यांना ठणकावून सांगितले. खबरदार....! माझ्या पोरीला कोणी हात लावेल तर मीही पाहते कोण तिला मारून टाकले तर. मारून टाकायसाठी मी तिला नऊ महिने पोटात नाही वाढवली. मी तसेही कामाला जातेच. अजून जास्त काम करीन पण. पण तिले मारून टाकू देणार नाही. मी, मी, तिले वाढविन. येऊन दाखवा माझ्यापुढे. बघतेच एकेकाला. सगळे जागेवर गप्प आणि माझ्या त्या उग्र रूपाने सगळे शांत बसले. नवऱ्याने आणि सासूने मात्र तीचा लाड केला नाही. मी मात्र सारेकाही करत होती. तिलाही काय समजत होत कोण जाणे. पण तिनेही कधी बाबा म्हणून तोंडातून शब्द काढला नाही का आजी म्हणाली नाही. ती एक वर्षाची झाली आणि दुसऱ्याची मोलमजुरी करणारे आम्ही. तिच्या बाबाला एका कोऑपरेटिव्ह बँकेत ड्राइवर म्हणून नोकरी लागली. गिरगिट रंग बदलत नसेल तशी माणसे रंग बदलतात. लगेच सासूबाई म्हणाल्या भाग्यवान आहे हो माझी नातं. लगेच बापाला नोकरी लागली. लक्ष्मीच्या पावलांन आली. नवरा पण तेच म्हणायला लागला. मी म्हणालेच का मारून टाकणार होते न तिला?.आता बरी लक्ष्मी दिसते ! अजून एक सुखद धक्का मिळाला. ती झाली त्यानंतर तीन वर्षाने पुन्हा दिवस गेले. यावेळी मात्र मुलगा झाला आणि ह्या मुलीचे भाव मात्र वाढले. कारण तिच्या पाठीवर भाऊ पण झाला पण तिला तिचा जन्म झाला तेव्हाच्या गोष्टी कोणी कोणी सांगत होते. तिच्या बाल मनावर याचा मात्र खोलवर परिणाम झाला. तिने वयाच्या तेरा वर्षा परंत बाबांना बाबा म्हणाली नाही कि आजीला आजी. तिचे बाबा मीच, आई पण मीच. काही लागलं तर माझ्याशी बोलणार. तिचे बाबा खूप समजावून सांगायचे. चुकलो बेटा म्हणून म्हणायचे. पण ही हु नाही.. का चू नाही. एक दिवस कोणत्यातरी गावी जात होतो. सोबत हि आणि पाठचा भाऊ होता. बोलतात बोलता बाबाने तिला घट्ट मिठी मारली.बाई चुकलो माँ मी.या बापाला तू कधीच माफ करणार नाही का? एकदाच बाबा म्हण. पाण्याने डबडबले बाबांचे डोळे हीने पहिल्यांदा पहिले. माझ्याजवळ नेहमी आपल्या चुकीची कबुली द्यायचा. पण आज त्यानीं चक्क लेकीजवळ आपल्या चुकीची कबुली दिली होती.काहीतरी बोल. इतकी मोठी शिक्षा नको देऊ माँ आणि ...आणि.….. तिने पहिल्यांदा त्यांना बाबा अशी हाक मारली आणि घट्ट मिठी मारली .दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.....
*** ही सत्य घटना माझ्याच बाबतीत बावन्न वर्षांपूर्वी घडलेली आहे.
10-08-2018 ला 52 वा वाढदिवस साजरा केला आणि आठवले खरच आईने तेव्हा रणरागिनींचे रूप घेतले नसते तर. आज ही प्रभा तुमच्या समोर नसती. पण नंतर माझ्या बाबांनी खूप खूप प्रेम केले. बाई शिवाय कधीच बोलले नाही. ते आता या जगात नाही. पण त्यांच्या मायेची सावली अजूनही आहे असेच भासते.
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा