मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1448. निर्णय

     संगीताने घड्याळाकडे पाहिलं. मग लेकीच्या खोलीच्या बंद दरवाजाकडे तिनं नजर टाकली. उद्वेगाने ती दरवाजा ढकलून आत गेली.
"शुभा, ए शुभा,उठ लवकर. किती वेळ झोपून रहाणार आहेस?" ती आपल्या लेकीला ओरडून म्हणाली.
"झोपू दे ना आई. रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते."
"माहीतेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते ! फेसबुक नाहीतर व्हाॅटस्अप वर चॅटींग या व्यतिरीक्त काय केलं असणार? चल उठ लवकर. नऊ वाजलेत." संगीता कठोर स्वरात म्हणाली
"तू ना बाई अशीच आहे. माहीतेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात." शुभा किरकिरत म्हणाली
"चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करुस. आपल्या कामवालीची मुलगी बघ. सगळं आवरुन सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते."
"ए बाई नको लेक्चर देऊ सकाळी सकाळी. उठते मी" शुभा धुसफूस करतच उठली. बेड न आवरता, चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली. संगीताने हताशपणे तिचं बेड आवरलं.
     हा प्रसंग आता रोजचाच झाला होता. ग्रॅज्युएशन आटोपल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती. म्हणायला ती क्लासेसला जायची पण तिचं अभ्यासात लक्षच नव्हतं. सदोदित मोबाईल घेऊन व्हाॅटस्अप नाहीतर फेसबुकवर तिचं चॅटींग सुरु असायचं. त्याचा कंटाळा आला की टिव्हीवरच्या सिरीयल्स बघणं हेच तिचं आयुष्य बनलं होतं. एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होतं. तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. अर्थात त्यावेळची परीस्थितीही उत्तम होती. रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. संगीता एम.एड असूनही तिला त्याने शुभाचं संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून नोकरी करु दिली नव्हती. तशी गरजही नव्हती. पण म्हणतात ना सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही. रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली. काम कमी आणि भानगडीच जास्त होऊ लागल्या. प्राॅडक्शन ठप्प झालं. पोलिस केसेस जास्त होऊ लागल्या. शेवटी कटकटींना कंटाळून मॅनेजमेंटने कंपनीच बंद केली. हजारो कामगार बेकार झाले. रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरडले गेले. युनियन लिडर्सनी कामगारांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या. पण कोर्टातील प्रकरणं गोगलगाईच्या गतीने पुढे सरकतात. कंपनी बंद होऊन दहा वर्षं होऊन गेली तरी कोणताच निकाल लागला नव्हता. रवीला घरी बसावं लागलं तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली. 'काही महिने मोफत काम करा मग पगार सुरु करु'असं तिला सांगण्यात आलं. संगीताचा नाईलाज होता. कधीतरी पगार सुरु होईल या आशेवर ती शाळेत शिकवत राहीली. रवीनेही खटपट करुन एका सुपर शाॅपीमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवली पण पगार अगदीच कमी होता. पाच वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरु झाला. त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली होती अजूनही ती परमनंट झाली नव्हती.
     रवी नोकरीत असतांना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं. त्याचे हप्ते अजून सुरु होते. दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसातरी सुरु होता. पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती. ती अकरावीत असतांनाच तिला त्यांनी महागडा मोबाईल आणि लॅपटाॅप घेऊन दिले होते. आपली मुलगी माॅडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणीत तिचं हसं व्हायला नको हा त्यामागचा खरा हेतू होता. पण सोशल मिडीयात वावरण्याव्यतिरीक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा कधीच वापर केला नव्हता. बारावीत ती कशीबशी पास झाली होती. बी.एस्सीतही तिला चांगले मार्क्स नव्हते. तिनं रिकामं बसण्यापेक्षा कुठंतरी कमी पगाराची का होईना नोकरी करावी असं संगीता आणि रवीला वाटत होतं. मात्र शुभाच्या डोक्यात एमपीएससी करायचं खुळ कुणीतरी भरवलं होतं म्हणून ती नोकरी करायला तयार नव्हती. पण एमपीएससीचा अभ्यास करण्याऐवजी दिवसरात्र ती मोबाईल घेऊन पडलेली असायची. संगीताला ती कोणत्याच कामात मदत करायची तर नाहीच उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची. त्यामुळे परवडत नसतांनाही संगीताला धुण्याभांड्यासाठी बाई लावावी लागली होती. शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं. त्याबद्दल आईवडीलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं होतं पण तिच्या डोक्यात काहीही फरक पडला नव्हता.
     या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची शक्यता होती. कारण टेंपररी शिक्षकात तीच सिनियर होती. त्यामुळे संगीता आनंदात होती. अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलावून घेतलं.
"मॅडम अभिनंदन. कालच संचालक मंडळाची मिटींग झाली आणि तुम्हांला परमनंट करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला" संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते. संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही. दहा वर्षाच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं.
"खुप खुप धन्यवाद सर"
"पण तुम्हांला माहीत आहे आजकाल फुकट काही मिळत नाही. मॅनेजमेंटने पंधरा लाखांची डिमांड केली आहे"
संगीताचं हवेत उडणारं विमान एकदम जमीनीवर कोसळलं.
"काय्य.....पंधरा लाख? सर मी इतके पैसे कुठून आणू? आणि सर तुम्हांला माहीत आहे मी पाच वर्षे अगदी फुकट शिकवलंय. नंतरची पाच वर्षही मी अक्षरशः पाच हजारात काम केलंय" संगीता रडकुंडीला येऊन म्हणाली.
"मॅडम तो विचार करुनच मी मॅनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले. ते तर वीस लाख मागत होते.आणि तुम्हाला कल्पना नसेल वीस लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये. देणारे आहेत म्हणून तर मॅनेजमेंटचं फावतंय. तेव्हा ही सुवर्णसंधी  चुकवू नका. पुढे परमनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही."
"सर थोडे थोडे करुन दिले तर चालतील?"
"साॅरी मॅडम. तसं शक्य होणार नाही. मात्र चेअरमन साहेब तयार झाले तर शक्य होऊ शकतं. त्याकरता तुम्हांला चेअरमनसाहेबांना भेटावं लागेल"
चेअरमनचं नांव ऐकताच संगीता शहारली. चेअरमन एक नंबरचा स्त्रीलंपट माणूस होता. त्याची नजर अतिशय घाणेरडी होती. तिने त्याचे लंपटपणाचे किस्से तर ऐकले तर होतेच पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षिकांसोबत त्याने केलेली घाणेरडी लगट ती विसरली नव्हती. त्याला भेटायला गेल्यावर तो कशाची मागणी करेल हे तिला चांगलंच ठाऊक होतं. डोळ्यात आलेले अश्रू तिने कसेबसे आवरले.
"सर मी तुम्हांला तीनचार दिवसात कळवते"
"लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हांला तसा निर्णय घेता येईल. तुम्ही नाही म्हंटलात तर दुसरे तयार आहेत हे मात्र लक्षात ठेवा."
तिने मान डोलावली.
घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली. पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. आधीच घराचं कर्ज होतं. त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होतं. इतके पैसे देऊ शकतील असे नातेवाईकही नव्हते आणि असते तरी कुणाच्या उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात ! त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करुन घेणं पसंत नव्हतं. काहीच निर्णय न झाल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही. शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आली. प्रत्येकी वीस लाख घेऊन मॅनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं.
  संताप,अपमान आणि दुःख यांची धगधग मनात घेऊनच संगीता घरी परतली. घराचं दार सताड उघडं होतं. सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं. सगळीकडे पसाराच पसारा होता. तिनं कुत्र्याला हाकललं. शुभाला हाक मारली. कुठलाच प्रतिसाद आला नाही. ती शुभाच्या खोलीत आली.शु भा कानाला हेडफोन लावून मोबाईलवर नेटफ्लिक्सची सिरियल बघत होती. संगीताने तिला दोनतीन हाका मारल्या पण तिनं उत्तर दिलं नाही. संतापून संगीता तिच्याजवळ गेली. तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले. हातातला मोबाईल हिसकावला आणि जमीनीवर जोराने आपटला. त्याचे तुकडे तुकडे झाले. मग तिनं शुभाला हाताला धरुन उठवलं आणि दुसऱ्या हाताने तिला मारु लागली. शुभाला आई एवढी का संतापलीये ते कळेना. मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता
"नालायक. जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल. आईला काय त्रास होतोय, बापाला काय त्रास होतोय काही समजत नाही तुला ! नोकरी कर म्हंटलं तर म्हणते मला अभ्यास करायचाय आणि इथं अभ्यास करायचा सोडून ही थेरं सुचताहेत तुला नाही का?"
शुभा रडायला लागली आणि संगीताच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता थांबली. तिची नजर खाली पार्ट न पार्ट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली. संतापून तिने पायाने तो अजूनच तोडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली. बेडवर पडून ती ढसाढसा रडू लागली. थोड्यावेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली. शुभाच्या खोलीचा तिने अंदाज घेतला. तिथं एक भयावह शांतता पसरली  होती. अचानक एका अनामिक भितीने तिला घेरलं. थोड्याथोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली."बापरे हे काय करुन बसलो आपण ! एका तरण्याताठ्या पोरीला मारलं ! तिने काही जीवाचं बरंवाईट तर करुन घेतलं नसेल ना ?"
जीवाच्या आकांताने ती उठली. शुभाच्या खोलीत धावत गेली. शुभाला बेडवर मुसमुसतांना पाहून तिचा जीव भांड्यात पडला.
    रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करुनही शुभा तिच्याशी एक शब्द न बोलता आणि न जेवताच झोपून गेली. रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकिकत सांगितली. शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला. शुभा जिवाचं काही बरंवाईट करुन घेईल या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही. दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते. रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली. अख्खा दिवस तिच्या समोर होता आणि टाईमपाससाठी मोबाईलही नव्हता आणि लॅपटाॅपचा कीबोर्डही काम करत नाहीये हे तिच्या लक्षात आलं. मनातल्या मनात तिने आईला शिव्यांची लाखोली वाहीली.
  नाश्त्याच्या टेबलवर बसली असतांना रवी तिला समजावू लागला. "बेटा तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी, सुखासाठी असतं. याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याच्या आहारी जावं. बघ इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे. व्हाट्स्अप,फेसबुकवर आपण आपल्याला माहीत असलेली माहीती, फोटो  पटकन शेअर करु शकतो. माणसांना जवळ आणणारी ही माध्यमं आहेत. त्याचा खुप फायदा आपणा सर्वांनाच होतोय. पण होतंय काय की माणसं त्यात नको तितकी गुंतल्याने जवळ येण्याऐवजी दूर होत चालली आहेत. याला कारण आपलं या माध्यमांच्या आहारी जाणं."
रवी बडबडत होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पीत होती. अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती. चहानाश्ता झाल्यावर रवीच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती उठून निघून गेली.  आईवडील दोघंही कामावर निघून गेल्यावर शुभाला काय करावं ते कळेना. घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला. ती उठली. पटापट सगळ्या रुममधला पसारा आवरला. भिंतींवरची जाळी काढली. कपाटं आवरली. पुस्तकांच्या कपाटातली धुळ साफ केली. इतक्या वर्षात वडिलांनी जमवलेल्या या खजिन्याकडे तिचं लक्षच नव्हतं. एक पुस्तक तिने काढून पाहीलं. हिमालयाचं प्रवास वर्णन त्यात होतं. त्यातले फोटो पाहून आणि वर्णन वाचून जग सुंदर असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. मग तिनं इतरही पुस्तकं चाळली. ज्या पुस्तकांकडे तिनं कधी ढुंकूनही पाहिलं नव्हतं ती पुस्तकं तिला इंटरेस्टिंग वाटू लागली. कामवालीचं काम झालं तशी तिने व्यवस्थित भांडी लावून दिली. रात्री उशीरापर्यंत जागल्यामुळे दुपारी तिला झोप यायची. आज झोप येत नसल्यामुळे आणि जवळ मोबाईल, लॅपटॉप नसल्याने तिनं एमपीएससीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे आज वाचण्यात तिचं मन चांगलंच रमलं. संध्याकाळी क्लासमध्येही तिचं मन चांगलं एकाग्र झालं. संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर पाहून आश्चर्यचकीतच झाली. हे काम शुभानंच केलं असावं हे तिच्या लक्षात आलं. लेकीचं कौतुक करावं असं तिला वाटलं पण ती आपल्याशी बोलत नाहीये हे लक्षात येऊन ती चुप बसली.
    शाळांना सुट्या लागल्या. संगीता घरी राहू लागली. पण दोघा मायलेकीत एकतर्फी संभाषण होतं. संगीता बोलायची पण शुभा 'हो''नाही' इतकंच उत्तर द्यायची.  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आल्या. संगीतानं त्यांच्या हातातला पेढ्याचा बाॅक्स पाहूनच काय ते ओळखलं.
"काय गं दहावीचा रिझल्ट लागला वाटतं !किती मार्क्स मिळाले?"
" ९३ टक्के" मुलगी तिच्या पाया पडत म्हणाली.शुभा तिथंच बसली होती .ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
"ताई तुमी तिला शिकवलं नसतं तर ती पास सुध्दा झाली नसती.लई उपकार झाले ताई तुमचे आमच्यावर" कामवालीच्या डोळ्यात अश्रू आले.
"अगं खरी मेहनत तर तिचीच आहे. झोपडपट्टीत राहून, लोकांची धुणीभांडी करुन, कोणतेही क्लासेस न लावता तिनं हे यश मिळवलंय. तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे" हातातला पेढा त्या मुलीच्या तोंडांत भरवत संगीता म्हणाली.
चारपाच दिवसांनी तिघं रात्री डायनिंग टेबलवर बसले असतांना रवी म्हणाला
"मी एक निर्णय घेतलाय. ॲडिशनल इन्कमसाठी मी एल.आय.सी.ची एजन्सी घ्यायचं ठरवलंय. पण यामुळे मी खुप बिझी होणार आहे. बाहेरची कामंही तुम्हालाच करावी लागतील. चालेल?"
"अहो मी पण एक निर्णय घेतलाय. याशाळेत मी परमनंट होण्याचे चान्सेस आता फार कमी आहेत. मला एका नवीन शाळेतून ऑफर आलीये. ते दहा हजार देणार आहेत. मी ती शाळा जाॅईन करायचं म्हणतेय." संगीता म्हणाली.
"अग पण ती बिगर अनुदानीत शाळा असणार. अशा शाळेत कधीच परमनंट करत नाहीत. म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पेस्केल कधीच लागू होणार नाहीत आणि पगारवाढही तशी कमीच राहील." रवी निराशेने म्हणाला.
"मी काय म्हणते बाबा करु द्या आईला तिथे नोकरी" शुभा मध्येच बोलू लागली "आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खुप पब्लिसिटी केलीये. आईच्या अनुपस्थितीत अनेक जण ट्युशनसाठी चौकशी करुन गेलेत. मीही मग चारपाच काॅलनीत फिरले. चाळीस मुलं तयार आहेत आईकडे ट्युशन्स लावायला. मी त्यांना ५००रु महिना फी सांगीतलीये. ते तयार आहेत. अशा रितीने महिन्याला वीस हजार आईला आरामात घरबसल्या मिळत जातील आणि मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरुर वाढेल .मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ क्लाससाठी"
ते ऐकून संगीता हसली.
"अहो मॅडम ते सगळं ठीक आहे. पण घरची, बाहेरची कामं कोण करणार?"
"मी आहे ना !"शुभा आत्मविश्वासाने म्हणाली.
"ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या. आजपासून घर आवरणं, स्वयंपाक करणं, किराणा, भाजी वगैरे बाहेरची कामं मीच करत जाणार आहे"
"अगं पण मग तू एमपीएससीचा अभ्यास कसा आणि कधी करशील?"रवीने शंका उपस्थित केली.
"बाबा एक झोपडपट्टीतली मुलगी दहा ठिकाणी धुणीभांडी करुन ९३%मिळवू शकते तर मी घरातली कामं करुन एमपीएससी क्लियर नाही करु शकत? मनात जिद्द असेल तक्ष आपण काहिही करु शकतो हे माझ्या लक्षात आलंय बाबा."
तिचा आवेश पाहून रवी आश्चर्यचकीतच झाला.
"चला आमची शुभा मॅच्युअर झाली म्हणायची. आता तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हरकत नाही"
"नाही बाबा मीसुद्धा एक निर्णय घेतलाय, जोपर्यंत मी एमपीएससी क्लियर करणार नाही तोपर्यंत मोबाईल, लॅपटाॅपला हात लावणार नाही. आतापर्यंत मी आभासी जगात वावरत होते. गेल्या काही दिवसात मला वास्तव जग पहायला मिळालं आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खुप सुंदर आणि क्रियाशील बनवणारं आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा निर्णय घेतलाय"
आपल्या मुलीचा समजुतदारपणा पाहून संगीताला गहिवरुन आलं. शुभाजवळ येऊन तिने तिला जवळ घेतलं. शुभानेही तिला मिठी मारली. का कुणास ठाऊक तिला आईबद्दल खुप प्रेम वाटू लागलं होतं.

© दीपक तांबोळी
   9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा " या पुस्तकातील आहे. कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

1447. लग्न की करियर-ध्येय

 ज्ञानदा घरात शिरताच तिची आई तिला खूप उत्साहित स्वरात म्हणाली,
"पोरी नशीब काढलंस. अगं एका यशस्वी डॉक्टरचं स्थळ तुला चालून आले आहे. डॉक्टर अजित हे खूपच नामांकित स्त्रीरोग तज्ञ आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा टुमदार बंगला आहे. दारात दोन-तीन गाड्या आहेत.  घरात ते आणि आई-बाबा इतकेच लोक आहेत. नोकर चाकर आहेत.  अगदी राज्य करशील पोरी, सुखात राहशील." ज्ञानदा म्हणाली,
"अग आई मला घरात तरी येऊ दे.  तुला इतका आनंद झालाय की आपल्या लेकीला भूक लागली आहे याचाही तुला विसर पडला का!"
"हो ग चल तू हातपाय धुऊन घे आपण एकत्रच जेवायला बसू."
जेवता जेवता तिची आई तिला म्हणाली,
"स्थळ खूपच चांगले आहे आपण हातातून जाऊ द्यायला नको.  पण त्यांची एक अट आहे." ज्ञानदाने प्रश्नार्थक भुवया उंचावून आईकडे पाहिले.  आई पुढे म्हणाली,
"त्यांची अट आहे की मुलीने लग्नानंतर नोकरी करू नये."
"आई लहानपणापासून मी जे ध्येय उराशी बाळगलं, जे स्वप्न पाहिलं त्याच्यावरच हा आघात आहे की ग.  तुला सुद्धा माहिती आहे की मी स्वतः खूप उच्च शिक्षण घेऊन मराठीची प्राध्यापिका व्हायचं हे ध्येय लहानपणापासूनच बाळगलं आहे. तू आणि बाबांनी पण त्याला प्रोत्साहनच दिलं आहे."
"हो ग ते प्रथित यश डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीने नोकरी केलेली बरं दिसणार नाही ना."
"नोकरी फक्त अर्थार्जनासाठीच केली जाते का? मला त्यात खूप आनंद मिळतो.  माझं ज्ञान मी इतरांना  देते त्यात अलौकिक समाधान आहे."
"अग पण त्यांच्या अटीचं काय.  बाकी लग्न कसं करावं, मानपान याबद्दल त्यांचे काहीही म्हणणं नाहीये.  आपण ज्या पद्धतीने लग्न करू ते त्यांना मान्य आहे."
"आई सर्व नक्की करण्याआधी मी डॉक्टर अजित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटू इच्छिते."
"भेटायला हरकत नाही पण कदाचित त्यांचं तुझ्याबद्दल प्रतिकूल मत होऊ शकतं."
"आई हे बघ कोणत्याही परिस्थितीत मी नोकरी सोडणार नाही आणि मी माझं म्हणणं त्यांना पटवून देण्यात यशस्वी होईन याची मला खात्री आहे."
"बघ बाई तू आणि तुझे बाबा काय ते ठरवा."
"बाबा माझ्या विचारांशी सहमत आहेतच हे तुला माहित आहे."
"ठीक आहे ज्यांनी हे स्थळ आणलं त्यांना मी फोन करून तुझी इच्छा सांगते."
दोन-तीन दिवसांनी डॉक्टर अजित यांच्याकडून ज्ञानदाला उद्याच्या रविवारी संध्याकाळी येऊन आम्हाला भेटू शकतेस असा निरोप आला.  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्ञानदा त्यांच्या घरी गेली.  घर कसलं एक सुंदर बंगला होता. बंगल्याची रंगसंगती आकर्षक होती. समोर फुलझाडे लावली होती.  बाहेर सुंदर सागवानी झोपाळा होता.  सर्वांनी हसून तिचं स्वागत केलं.  थोडेसे बोलणे झाल्यावर डॉक्टर अजितचे बाबा तिला म्हणाले,
"बोल ज्ञानदा काय म्हणणं आहे तुझं.  कोणताही आडपडदा न ठेवता जे काही असेल ते न घाबरता बोल."  ज्ञानदा म्हणाली,
"मला जे सांगायचं आहे ते मी स्वतः जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते म्हणून मी इथे आले आहे.  कृपया काही गैरसमज नसावा. मी मराठी विषय घेऊन एम ए केलं आहे. संतकालीन मराठी साहित्य या विषयात मला पीएचडी करायचं आहे." तिला मध्येच थांबवत डॉक्टर अजित म्हणाले,
" ज्ञानदा तुला पुढे कितीही शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस त्याला आमचा पाठिंबाच असेल.‌आमचं फक्त एवढेच म्हणणं आहे की तू नोकरी करू नये."
"मी नोकरी केवळ अर्थार्जनासाठी करत नाही तर उद्याच्या पिढीला मराठी भाषेविषयी प्रेम, आदर वाटावा, त्यांच्यात मराठीची पाळंमुळे  रुजावीत म्हणून मी नोकरी करते.  सध्या आपण सगळीकडे पाहतोय आपल्या मातृभाषेची खूपच गळचेपी होते आहे.  मराठी शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होतोय .  आपल्या मराठी मध्ये दर्जेदार साहित्य आहे परंतु हल्ली ते वाचणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.  मराठीचा जागर सर्वत्र व्हावा अशी माझी आंतरिक इच्छा आहे.  माझं कॉलेज सकाळच्या वेळेत असतं.  त्यामुळे नंतरचा वेळ मी घरीच असेन.  घरी राहून मी आईंच्या कामात हातभार लावेन,  आल्यागेल्याचे बघेन त्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा." डॉक्टर अजितची आई म्हणाली,
" तुला इथे काही काम पडणार नाही.  इथे सगळ्या कामांसाठी नोकर चाकर आहेत.  तुझी इच्छा असेल तेव्हा तू स्वयंपाकघरात जाऊ शकतेस.  पण सक्ती नाही. तुझे मराठी भाषेविषयीचे प्रेम जाज्वल्य आहे.  आम्ही या दृष्टीने कधी विचारच केला नाही.  आम्हाला पण आपल्या मातृभाषेविषयी कळकळ आहेच.  तुझ्या नोकरी करण्याला माझा तरी काही विरोध नाही.  काय हो तुमचं आणि अजितचं काय म्हणणं आहे." बाबा म्हणाले,
"ही आजच्या काळातील मुलगी असून सुद्धा मराठीचा जागर व्हावा म्हणून ती इतका प्रयत्न करतेय.  तिच्या या कार्यात मी तिला मदत करेनच." डॉक्टर अजित म्हणाले,
"ज्ञानदा तुझा आम्हाला अभिमानच आहे.  माझी निवड योग्य असल्याची मला खात्री पटली आहे. तुझं आमच्या घरात स्वागतच होईल." थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर ज्ञानदाने त्यांचा निरोप घेतला.  रस्ताभर ज्ञानदाच्या मनात विचार येत होते हे खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत.  प्रत्येक मुलीला असा पाठिंबा देणारे लोक भेटतीलच याची काही खात्री नाही.  अशावेळी त्या मुलींचा मानसिक कोंडमारा होतो याचा कोणी विचार सुद्धा करत नाही.  आता ज्ञानदा तिच्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करू शकत होती.

ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार, 
साहित्य उत्सव परिवार.
सीमा गंगाधरे,
प्रस्तुती : साहित्य उत्सव.

1446. पाणक्या

      विजयराव देवाचे स्तोत्र म्हणत होते. सायंकाळचे सात वाजले होते. स्तोत्र म्हणता म्हणता विजयरावांच्या डोक्यात विचार येत होते. थोड्यावेळाने कुकर लावू, दुपारी हॉटेल मधुर मागवलेली आमटी व भाजी आहे. फ्रिजमध्ये दही आहे. विजयरावांची ही नेहमीची पद्धत, सायंकाळी सातच्या सुमारास देवापुढे निरंजन लावायचे, मग स्तोत्र म्हणायचे. वसुधा आजारी पडेपर्यंत देवाचे सर्व तीच पहायची. त्यामुळे रात्र आठ पर्यंत विजयराव पार्कमध्ये फिरत. वसुधा आजारी पडली आणि विजयरावांचे फिरणे थांबले. बाहेर पडायचे ते फक्त बाजारहाट करण्यासाठी, आता बऱ्याच गोष्टी ऑनलाइन होतात, त्यामुळे बाहेर जाणे कमीच, पेन्शन बँकेत जमा होते, सुनील चा फोन रात्र नऊ वाजता नेहमीचाच, तोपर्यंत जेवून घ्यायचे आणि त्याच्या फोनची वाट पाहायची, असा त्यांचा दिनक्रम.  सव्वासाच्या सुमारास बेल वाजली, विजयरावांनी होल मधून बाहेर पाहिले, मध्यम वयाचा एक गृहस्थ बाहेर उभा होता.
 कोण पाहिजे? विजयरावांनी विचारले.
" दादासाहेब एवढ्या वर्षांनी तुम्ही ओळखणार नाही मला.'
 "दादासाहेब ' ही हाकच इंदोरची. इंदूरच्या घरात सर्वजण दादासाहेब म्हणत.
" तुम्ही इंदोरहून आलात का,? दादासाहेबांनी विचारले.
"नाही ', दादासाहेब मी शामू, तुमच्या इंदोरच्या वाड्यात कामाला होतो लहानपणी.
"कोण शामू? अरे तू म्हणजे......., दादासाहेब थोडं थोडं आठवू लागले.
" दादासाहेब मी शामू"पाणक्या ', तुमच्या दातेंच्या वाड्यावर मी पाणी भरायचं, आठवलं नाही का?'
" अरे तो शामू?', दादासाहेबांनी संपूर्ण दार उघडलं,
" कुठे होतास इतकी वर्ष?
 शामू आत आला आणि दादासाहेबांच्या पाया पडला.
" अरे एवढा मोठा झालास तू, माझ्या पाया काय पडतोस, येये,बस.
" नाही दादासाहेब पहिल्यांदा तुम्ही बसा '.
" बर बाबा ', म्हणत विजयराव कोचवर बसले. त्याच क्षणी शामू येऊन त्यांच्या पायाकडे बसला आणि त्यांचे पाय चुरू लागला.
" अरे शामू काय करतोस हे? माझे पाय दाबतोस, केवढा मोठा झालास तू.'
" मोठा झालो इतरांसाठी. तुमच्यासाठी नाही दादासाहेब, अजून मी  " पाणक्या ' शामूच आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझे अन्नदाते मालक, तुमच्या वाड्यावर मिळणाऱ्या तुकड्यावर माझे बालपण गेले, ते कसे विसरू?
" ते जुने दिवस होते रे बाबा, इंदूर मध्ये आम्ही रावसाहेब, संस्थानिकांचे सरदार पण ते सर्व संपले आता. या मुंबईत आम्हाला कोण विचारतो?'
" कोणी विचारू न विचारू, तुम्ही माझे अन्नदातेच आहात, "
" ते असू दे, तू आधी त्या खुर्चीवर बस पाहू  ".
 तसा शामू एका लहान च्या स्टुलावर बसला." कुठे होतास इतकी वर्ष? माझ्या अंदाजाने 35 40 वर्षानंतर दिसतोस तू मला.
" हो दादासाहेब, इंदूरला तुमच्या वाड्यावर होतो तेव्हा आठ नऊ वर्षाचा होतो. आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात.
" हो बहुतेक तेव्हा मी एम कॉम ला होतो., मग मी बँकेत लागलो आणि मग भारतभर बदल्या. शेवटी मुंबईत येऊन स्थायिक झालो.
" मग इंदूरचा वाडा आणि त्यातली संस्थानिकांचे सरदार संस्थानिकांचे सरदार  एवढी माणसं? नोकर मंडळी? "
" सगळा पोकळ वासा होता तो, संस्थानिकांचे सरदार म्हणून सगळा खर्च सुरू होता,. आमच्या पाच-सहा पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं, तळ्यात साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार? त्यासाठी झरा हवा असतो, तू झरा तलाव रिकामा करू देत नाही., आमच्या कुटुंबात झराच नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला, कर्ज अंगावर येत होतं, सगळे डाम दौंल बंद केले. नोकर चाकर कमी केले, आई वडील गेल्यावर मी बँकेत नोकरी धरली.
" आणि दादासाहेब एवढा मोठा वाडा? "
" वाडाही कोसळत होता मागून, तो विकला,  आता त्या ठिकाणी मॉल उभा राहिलाय, कालाय तस्समय : नमः
हो दादासाहेब, मी पाहून आलो.
" तू इंदूरला गेला होतास? "
" हो तर, तुमच्या शोधात होतो मी, दोन वर्षांपूर्वी खूप वर्षांनी भारतात आलो, पहिल्यांदा इंदूरला गेलो तर वाड्याच्या ठिकाणी मॉल उभा,, शेवटी तुमचा पत्ता शोधत शोधत या ठिकाणी आलो.
" मग पत्ता मिळाला कसा?
" इच्छा असली तर मार्ग सापडतो दादासाहेब, मी इंदोरहून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही कोणत्यातरी बँकेत नोकरीला लागला होतात, हे माहीत होतं, मात्र कुठली बँक हे माहीत नव्हतं, मग मी भारतातील प्रमुख बँकांच्या ऑफिसमध्ये पत्र लिहून तुमचा पत्ता विचारला, पण तुमचा सध्याचा पत्ता कोणाला माहित नव्हता. इंदूर मध्ये चौकशी केली तेव्हा कोणी अचलपूर, नागपूर तर कोणी पंढरपूरचा पत्ता दिला, या प्रत्येक शहरात तुमचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, शेवटी मुंबईत जीपीओ मध्ये या नावाचे पत्र कोणत्या पत्त्यावर देता अशी चौकशी केली आणि हा सांताक्रूझ चा तुमचा पत्ता मिळाला. "
" धन्य आहे तुझ्यापुढे, एवढी आठवण ठेवून तू येथे पोहोचलास याचे मला कौतुक वाटते, तू भेटलास आणि दादासाहेब अशी हाक मारलीस, मी इंदूरला असल्यासारखे वाटले. रम्य आठवणी असतात रे त्या. आता मी मुंबईत एकटाच राहतो, बायको वसुधा चार वर्षांपूर्वी गेली, मुलगा सुनील जर्मनीत स्थायिक झालाय, तिथल्या मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालाय. इंदूरचा वाडा विकला मी कारण कर्ज फार झालं होतं. रावसाहेबांचा तोरा मिरवताना खर्च सुरूच होते. उत्पन्न नव्हते. आता परत इंदूरमध्ये जाऊन छोट्या घरात राहणे कमीपणाचे वाटते, नोकरीत शेवटचा स्टॉप मुंबई होता, सुनील चे शिक्षण पण होते, या दृष्टीने मुंबईत सेटल झालो, पण इंदूर ते इंदूर, तिथली मजा मुंबईत नाही, स्वच्छ शहर, खाण्यापिण्याची लय लूट, गाणे संगीत भरपूर. "
" अरे शामू पण तू मुंबईत राहतोस कुठे?
" दादासाहेब, आता यापुढे मी मुंबईतच राहणार आहे. याविषयी सर्व सांगतो नंतर, पण दादासाहेब, आज मात्र मी या घरी जाणार आहे.
" अरे रहा ना, मी पण इथे एकटाच, कोण बोलायला पण नाही, सुनील चा रोज रात्री नऊ वाजता फोन येतो, त्याची मुलगी आहे पाच वर्षाची ती पण बोलते., कधी कधी सून बोलते, बरं दुपारची आमटी भाजी आहे, दही आहे, भात लावतो थोडा. "
" मी लावतो दादासाहेब, तुम्ही बसा. मला फक्त तांदळाचा डबा दाखवा. ""
" अरे मी करतो भात मला रोजची सवय आहे. "
" नाही दादासाहेब, मी असताना तुम्हाला कसलेही काम करू देणार नाही, तुम्ही बसा. "
 विजयरावांनी शामला तांदळाचा डबा दाखवला. त्यातून तोडे तांदूळ घेऊन श्यामने गॅसवर भात लावला. फ्रिज उघडून दही बाहेर काढलं, फ्रिज मधून दोन अंडी बाहेर काढून त्याचे हाफ आमलेट तयार केले. छोट्या पातेल्यात सकाळची आमटी भाजी झाकून ठेवली होती. ती गॅसवर गरम केली. भांड्याच्या स्टॅन्ड वरून ताटे, वाट्या, ग्लासेस बाहेर काढले, आणि दोन ताटे तयार केली. त्यातील एक टेबलावर ठेवले. शेजारी पाणी ठेवले आणि म्हणाला दादासाहेब बसा.
 विजयराव टेबलावर जेवायला बसले, त्यांनी पाहिलं दुसरे ताट घेऊन श्याम खाली फरशीवर बसला होता.
" अरे शाम वर व जेवायला.'
 नाही दादासाहेब, तुम्ही जेवत असताना याआधी मी कधी तुमच्या सोबत बसलो नाही आणि यापुढे बसणार नाही. "
 अरे शाम, ते दिवस गेले, मागचे विसरायचे आता. "
" नाही विसरणार दादासाहेब, एका खेड्यातल्या अनाथ मुलाला तुमच्या घरात आश्रय मिळाला, "पाणक्या " होतो मी, तुमच्या घरात आडा वरून पाणी भरत होतो, रोज प्रत्येकाच्या खोलीत पाण्याचा तांब्या नेऊन ठेवत होतो, तुम्ही कॉलेजमधून किंवा खेळून आलात की मला हाक मारत होतात, मी तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देत असे, जेवणाची वेळ झाली की तुमचे ताट तुमच्या खोलीत आणून देत असे, मग तुमच्या खोलीत माझी जेवणाची ताटली घेऊन येत असे आणि खाली बसून जेवत असे."
" होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस ".
" असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक
आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. "
 जेवता जेवता विजयरावांचे आणि श्यामचे बोलणे सुरू होते, इंदूरच्या आठवणी काढल्या जात होत्या, मातोश्रींची  ( विजयरावांच्या आईची ) आठवण निघाली.
 विजयरावांचे जीवन संपले तसे ते नेहमीप्रमाणे आपले ताट घेऊन धुवायला जात होते एवढ्यात श्याम उठला आणि त्याने त्यांचे ताट आपल्याकडे घेतले.
" दादासाहेब मी येथे असताना तुमची ताट भांडी तुम्ही धुवायची नाही.' शेवटी हा काही ऐकायचा नाही म्हणून विजयराव गप्प बसले. श्यामने झटपट भांडी धुतली. पोटावरला आणि तो विजय रावांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारायला आला.
" हं, आता सांग, तू होतास कुठे इतकी वर्ष? "
 सांगतो दादासाहेब, " श्यामच्या डोळ्यासमोर सर्व बालपण सरकू लागलं, " दादासाहेब इंदूर जवळच्या एका खेड्यातला एक गरीब मुलगा, घरची अत्यंत गरिबी, वडील देवीच्या साथीत गेले, तुमचे मुनीमजी गावात खंड वसुलीसाठी येत, माझी आई त्यांना हात जोडून म्हणाली" माझ्या मुलाला कुठेतरी अन्नाला लावा, नाहीतर इथे भूक भूक करत मरेल तो ", दिवाणजी मला घेऊन गेले  आणि तुमच्या वाड्यावर ठेवले, तुमच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, तुमच्या मातोश्रींनी मला कधी उपाशी ठेवलं नाही, घराचे शिजायचं तेच माझ्या ताटलीत असायचं, एकदा एक प्रसंग घडला कदाचित तो तुमच्या लक्षात नसेल, पण माझं आयुष्य बदलणारा ठरला.
 तुम्ही कॉलेजात गेलात की मी तुमची पुस्तकं वह्या उघडायचो आणि वाचायचा प्रयत्न करायचो. एकदा तुम्ही अचानक घरात आलात, तर माझ्या मांडीवर पुस्तक उघडलेलं होतं आणि मी वाचायचा प्रयत्न करत होतो, तुम्ही ते पाहिलंत आणि मला विचारलंत " श्याम पुस्तक वाचावीशी वाटतात तुला?,  शाळेत जाशील का? जाणार असशील तर मी व्यवस्था करतो. " मी हो म्हंटल, मग तुम्ही मुनीमजींना सांगून माझं नाव शेजारच्या शाळेत घातलेत.
 आणि मी आनंदाने शाळेत जायला लागलो, शाळेत पालकाचे नाव  लिहायची वेळ आली, तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमचं नाव दिलत, केवढे उपकार तुमचे या अनाथ मुलावर.
" त्यात विशेष काही नाही श्याम, गोरगरिबांना शिक्षण द्यायचं हे आमच्या संस्थानिकांचं ब्रीद होतं, आम्ही ते पाळत होतो इतकच.
" दादासाहेब एकदा शाळेत पालकांचा मेळावा होता, प्रत्येकाने आपल्या पालकांना शाळेत आणायचं होतं, मी हे तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजात न जाता माझ्या शाळेत माझे पालक म्हणून आलात. "
" अजून हे सर्व तुझ्या लक्षात आहे श्याम ".
" सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे दादासाहेब, मी दरवर्षी एक नंबर मिळवत शाळेत शिकत होतो. तुम्ही त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेला होतात. मी दहावीत बोर्डात आलो. स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला गेलो, त्याच वेळी माझी आई निधन पावल्याची बातमी आली, मी तिचे शेवटचे दर्शन घेतले आणि रायपूरला गेलो, त्यावेळी पासून तुमचा इंदूरचा वाडा सुटला, बारावीनंतर स्कॉलरशिप घेत लखनऊला गेलो. लखनऊला  "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लाँग्वेज ' मधून फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये मास्टर्स केले. तेथे पुन्हा स्कॉलरशिप घेऊन फ्रान्समध्ये फ्रेंच तत्वन्यान मध्ये Phd केले, आणि मग केंब्रिज विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवायला लागलो.
 श्याम बोलत होता आणि विजयराव आ वासून ऐकत होते. खडतर परिस्थितीत श्यामने घेतलेले शिक्षण ऐकून त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं, त्याचबरोबर आपला जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा आपण बँकेत नोकरी करण्याएवढीच प्रगती केली याचं त्यांना वैशम्य वाटले.
" श्याम कौतुक वाटतं तुझं, आमच्या वाड्यात पाणी भरणारा मुलगा केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर झाला, तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत, मग सध्या तू कुठे असतोस? "
" दादासाहेब, आपलं मुंबई विद्यापीठ फ्रेंच तत्त्वज्ञान विभाग सुरू करत आहे, याकरता मला इथे बोलावून घेतले आहे, पण याआधीची केली दोन वर्षे  मी दिल्ली विद्यापीठात मी फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पण पुढील दोन महिन्यानंतर  मी मुंबई विद्यापीठाचा फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून जॉईन होईल.
" बापरे शाम तेवढा मोठा माणूस तू, आणि माझ्या घरची भांडी घासलीस आज!"
 मी मोठा जगासाठी असेन कदाचित, पण इंदूरच्या दातेंसाठी नाही '
" मग शाम, तुझं लग्न, बायको.....
 दादासाहेब माझी बायको इंदोरचीच आहे, ती पण तुमच्या कुटुंबाला ओळखते, साधना तिचं नाव, माझ्यासारखी ती पण लखनऊला जर्मन भाषा शिकण्यासाठी होती,
मग ती पणकेब्रिज ला जर्मन भाषा शिकविण्यासाठी आली, आम्ही त्या काळात लग्न केलं, आम्हाला एक मुलगी आहे, "मिहिरा " तिचं नाव. मिहिरा दिल्लीत दहावी शिकते, माझी पत्नी साधना सध्या दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा शिकवते, पण आता ती माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठात येईल. "
 एवढ्यात विजयरावांना जर्मनी हून त्यांच्या मुलाचासुनील चा फोन आला. बोलण्यासाठी श्याम हा विषय होता. त्याच्याविषयी किती बोलू मी किती नको असं विजयरावांना झाला, मग शामसुनिलशी बोलला, सुनिलच्या बायकोबरोबर जर्मन मध्ये बोलला, ती दोघेही सुनीलशी बोलून फारच प्रभावी झाले.
 रात्री 10 ही विजयरावांची झोपायची वेळ. श्याम म्हणाला  " दादासाहेब तुम्ही बेडरूम मध्ये झोपा, मला चटई आणि चादर द्या मी हॉलमध्ये झोपतो, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या आधीच शाम बेडरूम मध्ये गेला आणि त्यांच्या बेडवर त्यांची गादी चादर व्यवस्थित करून दिली, बेड खाली असलेली चट्टे आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये आला, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकणार नाही हे माहीत असल्याने ते गप्प राहिले.
 रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जा घ्यायची, आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला, एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
 ती बाहेर आली तर त्यांना त्यांचे घर आज वेगळेच वाटलं, आपले अस्ताव्यस्त घर आज एवढे व्यवस्थित कसे असा त्यांना प्रश्न पडला, कोचा वरील कापड आज व्यवस्थित बसलेले होते, चप्पल बूट चपलाच्या स्टॅन्ड वर ठेवलेले होते. पेपरांची रद्दी बांधून ठेवलेली होती, हॉलमधील फोटोंचे जुने हार काढलेले होते, ते किचनमध्ये गेले, श्यामने सर्व भांडी धुवायला काढली होती, भांड्याचा स्टॅन्ड पुसून ठेवला होता, ची शेगडी बर्नर स्वच्छ पुसलेले दिसत होते, डायनिंग टेबल चक्क चकाचक दिसत होते, फ्रिज आतून बाहेरून स्वच्छ झाला होता, खिडकीवरची जळमटे नाहीशी झाली होती, बाथरूम टॉयलेट स्वच्छ दिसत होते, विजय रावांना वाटले आज किती दिवसांनी एखाद्या बाईचा हात फिरावा आणि घर स्वच्छ व्हावे तसे घर स्वच्छ दिसत आहे.
 विजय रावांना पाहता श्यामने त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे समोर ठेवली. " श्याम अरे केवढे व्यवस्थित घर केलेस हे, मला असं व्यवस्थित घर ठेवायला जमायचे नाही, तू गेलास की पुन्हा माझा आजागळ संसार सुरु होईल ".
" दादासाहेब आम्ही मुंबईत आलो की तुम्ही आमच्याकडे जायचं, मला युनिव्हर्सिटी कडून मोठा फ्लॅट मिळेल. "
" बघू बघू, तुला जागा तर मिळू दे!"
" दादासाहेब तुमची भेट झाली आनंद वाटला. आता माझं नऊ च विमान आहे. मला आता जायला लागेल, तुमचा मोबाईल नंबर द्या, बहुतेक दोन महिन्यांनी आम्ही सर्व मुंबईत येऊ, मग तुम्ही आमच्याकडे यायचं. "
 दादासाहेबांना नमस्कार करून श्याम निघाला. विजय रवाना तो जाताना वाईट वाटले, जेमतेम एक रात्र शामू राहिला, पण लळा लावून गेला, नाहीतर आपला मुलगा सुनील, रोज रात्री नऊ वाजता फोन करतो पण ते कर्तव्य म्हणून, त्यात ओलावा नसतो, आपल्या जर्मन सुनेने आपल्याला एकदाच पाहिले, तिला आपल्या बद्दल प्रेम कसं वाटणार?
 विजय रावांना आपल्या पुढच्या आयुष्याची पण काळजी वाटत होती, सुनील जर्मनीला बोलावतो पण त्याच्या लग्नाआधी आपण दोघे जर्मन ला गेलो होतो, पण पंधरा दिवसात परत आलो, जर्मनीमधील थंडी, जेवण त्यांना मानवेना. आपल्याला भारताची सवय, आपले हात पाय फिरते आहेत तोपर्यंत ठीक, पण नंतर....., एखादा वृद्धाश्रमच शोधायला हवा.
 दिल्लीत गेल्यावर सुद्धा श्यामचा रोज फोन येत होता. त्याची बायको मुलगी पण फोनवर बोलायची, आणि दोन महिन्यांनी त्या एक दिवस त्याचा अचानक फोन आला  " आम्ही सर्वजण मुंबईत येतोय, कलिना भागात युनिव्हर्सिटीने मोठा फ्लॅट दिलाय. " आणि चार दिवसांनी श्याम त्याची बायको आणि मुलगी मुंबईत आली सुद्धा, दोन दिवसांनी शाम भली मोठी गाडी घेऊन आला आणि विजयरावांना आपल्या घरी घेऊन गेला. त्या अत्यंत पॉश वसाहतीमध्ये युनिव्हर्सिटीने शामला सहा खोल्यांचा फ्लॅट दिला होता. दारात शोफर सह गाडी. बाहेर बगीचा, जवळच मोठे गार्डन, या एरियात आपण मुंबईत आहोत असे त्यांना वाटेना, श्यामच्या पत्नीने आणि मुलीने त्यांना वाकून नमस्कार केला. श्यामची पत्नी साधना विजय रावांना म्हणाली  " दादासाहेब मी पण इंदोरचीच, संपूर्ण दाते कुटुंबाबद्दल इंदूर शहराला आदर आहे, दादासाहेब तुम्ही आता इथेच राहायचं, कृपा करून एकटे राहू नका. "
 श्याम दादासाहेबांना म्हणाला " काल मी सुनीलशी बोललो, तो पण म्हणाला बाबांनी एकटे राहण्यापेक्षा तुमच्या सोबत राहणे केव्हाही चांगले, त्यांना या वयात सोबत हवीच,' विजयराव गप्प बसले, ती पण एकटी राहून कंटाळले होते, संध्याकाळी शाम ने विजयरावांचे आवश्यक तेवढे सामान त्या घरी आणले.
 आता विजयराव मजेत राहू लागले, श्याम आणि साधना रोज युनिव्हर्सिटी जात होते, पण जाताना किंवा आल्यानंतर त्यांची चौकशी करत होते, श्यामची मुलगी त्यांच्या नातीसारखीच गप्पा मारत होती, कॉलेजमधील गमती जमती सांगत होती, श्यामच्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकी होता, इतर कामासाठी माणूस होता, त्यामुळे विजयरावांना काहीच करावे लागत नव्हते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी शाम त्यांना नाटकांना किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात असे, विजय रावांना शास्त्रीय संगीताची फार आवड, मुंबईत इच्छा असूनही त्यांना जाता येत नव्हते, आता त्यांना गाण्याच्या मैफिली ऐकण्यासाठी मुद्दाम गाडी ठेवलेली होती.
 आपले बाबा आता एकटे नाहीत श्यामच्या कुटुंबात आहेत हे पाहून सुनील चे फोन अनियमित येऊ लागले. विजय रावांना सुद्धा सुनीलची किंवा सुनीलच्या मुलीची पूर्वीसारखी आठवण येत नव्हती. उलट त्यांना श्यामची मुलगी मिहिरा जास्त जवळची वाटू लागली, आई बाबांना वेळ नसेल तेव्हा मिहिरा त्यांना गाण्याच्या मैत्रिणीला घेऊन जाऊ लागली.
 एकंदरीत विजेवरराव दाते आता मुंबईत मजेत होते. इंदूर सुटल्यानंतर एवढे सुख त्यांना कधी मिळाले नव्हते. रोज सकाळी फिरायला जाणे, बागेत मित्रांसमवेत गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन, आंघोळ मग नाश्ता त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या शास्त्रीय संगीतात रमत असत. कधी किशोर ताई ऐकत कधी कुमार गंधर्व कधी शोभा गुरुटू, कधीकधी नव्या गायकांना सुद्धा ते ऐकत. दुपारी जेवणानंतर थोडी वामकुक्षी, सायंकाळी चॅनेलवर इंग्रजी सिनेमा पाहणे, सायंकाळी परत फिरून येणे. रात्र शाम साधना आली की एकत्र बसून जेवण, अजूनही श्याम साधना त्यांच्याबरोबर जेवताना खाली बसून जेवत.
 विजयरावांना 75 वर्षे पुरी झाली, या दिवशी श्यामने एका नवीन गायकाला घरी बोलावून त्याचे गाणे विजयरावांना  ऐकवले. श्यामची मुलगी मेहरा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. सारं कसं आनंदात छान चाललं होतं.
 असेच एकदा रात्र जेवताना विजयराव टेबलावर आणि श्याम साधना खाली बसून जेवत होते. साधनाचे लक्ष गेले दादासाहेबांच्या पायाला सूज आली होती. तिने शामला दादासाहेबांचे पाय दाखवले. शनिवारी श्याम त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी सुजी वरच्या गोळ्या दिल्या. हळूहळू त्यांचे पोट मोठे दिसू लागले. श्यामला शंका आली त्याने दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये नेऊन सर्व तपासण्या केल्या, डॉक्टरनी  "लिव्हर सोरायसिस चे निदान केले. पोटात पाणी जमा होऊ लागले होते, ते काढावे लागत होते. श्यामने सुनीलला सर्व कळवले, त्याने बाबांना जर्मनीला नेऊन सर्व उपचार करतो असे कळवले पण विजयराव जर्मनीला जायला तयार झाले नाहीत, पुण्याच्या खडीवाले वैद्यांचे पण उपचार सुरू होते, पण आजार कमी होईना. हळूहळू विजयरावांचे पोट मोठे आणि हातापायाच्या काड्या दिसू लागल्या, त्यांच्या तब्येतीचा वृत्तांत श्याम सुनीलला नियमित कळवत होता, पण सुनीलला भारतात येणे जमेना. कधी त्याच्या मुलीची परीक्षा जवळ येत होती तर कधी पत्नीची तब्येत बरी नसायची, हळूहळू विजय रावांना अन्न जाईना, शेवटी त्यांना लीलावती मध्ये ऍडमिट केले गेले. दर दोन दिवसांनी पोटातील पाणी काढले जात होते. पण विजयराव हॉस्पिटलमध्ये कंटाळू लागले मोक्षामणे घरीच एका खोली त्यांची हॉस्पिटल सारखी व्यवस्था केली. घरीच ऑक्सिजन लावला, एक नर्स दिवस-रात्र घरी ठेवली. पण विजयरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली.
 22 जून ची रात्र, मुंबई भरपूर पाऊस सुरू होता, विजयराव अन्न पाणी घेत नव्हते, पोटात असह्य वेदना सुरू होत्या, श्याम आणि साधना त्यांच्या आजूबाजूलाच होते. रात्र 11 च्या सुमारास विजयरावांना घरघर लागली, श्यामने फोन करून लीलावतीच्या डॉक्टरांना घरी बोलावले, डॉक्टर आले त्यांनी विजयरावांची तब्येत पाहिली, नर्सला ऑक्सिजन काढायला सांगितला, विजयराव तोंडाने  "पा पा 'करू लागले म्हणून डॉक्टर नी श्याम कडे पाहिले, श्यामने चमच्याने त्यांच्या तोंडात पाण्याचे दोन थेंब टाकले, त्याच क्षणी विजयरावानी प्राण सोडला.  श्याम ओकेसा बोक्सि रडत होता, साधना रडत रडत त्याला सांभाळत होती. साधनाने फोन करून सुनीलला जर्मनीला ही बातमी कळवली.  असे असे त्याने कळवले, ही बातमी कळताच श्यामचे आजूबाजूचे प्रोफेसर मित्र आणि युनिव्हर्सिटीतील लोक जमा झाली.  त्या रात्री श्यामने विजयरावांच्या प्रेताला अग्नी दिला.
      घरी अनेक जण शामला साधनाला भेटायला येत होते. युनिव्हर्सिटी चे कुलगुरू श्यामला भेटायला आले, श्यामने त्यांना दादासाहेबांचा इंदूरचा वाडा,  त्या वाड्यात आपण "पाणक्या " म्हणून आलो, पण दादासाहेबांनी आपल्याला शिक्षण घेऊ दिले एवढेच नव्हे तर शाळेत पालक म्हणून स्वतः उभे राहिले, ती कृतज्ञता आपल्या मनात सदैव राहिली, आपले आई-वडील आपल्याला फारसे माहित नाहीत पण दादासाहेब आई-वडिलांच्या जागी कायमच राहिले. श्याम पुढे म्हणाला " शेवटची दहा वर्षे दादासाहेब आपल्या सोबत राहिले हे आपले भाग्य, पण त्यापेक्षा दादासाहेबांना शेवटच्या क्षणी  या "पाणक्याने " तोंडात पाण्याचे थेंब टाकले, हे माझे परमभाग्य.

1445. कोणत्याही कामाला लहान मानू नका

     एकदा देव त्याच्या एका गरीब भक्तावर प्रसन्न झाला आणि त्याला मदत करण्यासाठी एका साधूच्या वेशात त्यांच्या घरी आला. त्यांचा हा भक्त जातीने चर्मकार होता आणि गरीब असूनही तो अतिशय दयाळू आणि दानशूर प्रवृत्तीचा होता. अनवाणी पायाने कोणीही साधू दिसला की ते त्यांना कोणतेही शुल्क न देता त्यांनी स्वतः हाताने बांधलेले जोडे किंवा चप्पल घालायला लावत. जेंव्हा तो असहाय्य किंवा भिकारी दिसला तेंव्हा त्याला घरात जे मिळेल ते दान करायचे. त्यांच्या या वागण्यामुळे घरात अनेकदा गोंधळ उडाला. त्याच्या या सवयींना कंटाळून त्याच्या आई-वडिलांनी त्याचे  लग्न करून वेगळे केले, जेणेकरून त्याला घरच्या जबाबदाऱ्या समजून घेता याव्यात आणि त्याच्या सवयी सुधारता येतील. पण त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच लोकांची सेवा करत राहिला. भक्ताच्या पत्नीनेही त्याला पूर्ण पाठिंबा सहयोग देत होती.
     अशा भक्तावर प्रसन्न होऊन देव त्याच्या घरी आले, जेणेकरून त्याला काहीतरी देऊन त्याचे दारिद्र्य दूर होईल आणि भक्त अधिक गरजू लोकांची सेवा करू शकेल. साधू दारात आल्याचे पाहून भक्ताने आपापल्या परीने त्यांचे स्वागत केले सत्कार केला. परत जाताना ऋषींनी पारस दगड भक्ताला दिला आणि म्हणाले - त्याच्या मदतीने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल आणि तुमचे सर्व संकट दूर होतील. तू जपून ठेव. त्यावर भक्त म्हणाला- मग मला हा दगड देऊ नका. त्याचा मला काही उपयोग नाही. असो, मला काही अडचण नाही. बूट बांधून मिळणाऱ्या पैशातून मी माझे काम सांभाळतो. माझ्याकडेही राम नावाची मालमत्ता आहे, ती गमावण्याची भीती नाही. हे ऐकून साधूच्या वेषात असलेले भगवान(देव) परत आले.
        यानंतर भक्ताला मदत करण्याच्या प्रयत्नात तो अयशस्वी झाले, तेव्हा एके दिवशी देव त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले - प्रिय भक्ता! आम्हाला माहित आहे की तुम्ही लोभी नाही. तुम्ही कर्मावर विश्वास ठेवता. तुम्ही तुमचे काम करत असताना आम्हालाही आमचे काम करू द्या. म्हणून आम्ही तुम्हाला जे काही देतो ते आनंदाने स्वीकारा. भक्ताने देवाचे म्हणणे मान्य केले आणि त्याच्या मदतीने आणि त्याच्या परवानगीने मंदिर बांधले आणि तेथे देवाची मूर्ती स्थापित केली आणि तिची पूजा सुरू केली. चर्मकाराने केलेली देवाची पूजा पंडितांना सहन होत नव्हती. त्यांनी याची तक्रार राजाकडे केली. राजाने भक्ताला बोलावून विचारले तेव्हा तो म्हणाला - हे काम मला स्वतः देवानेच सांगितले होते. असो, देवाची भक्ती प्रिय आहे, जात नाही.  त्याच्या नजरेत कोणीही लहान किंवा मोठा नाही, सर्वजण समान आहेत.
राजा म्हणाला- तुम्ही हे सिद्ध करू शकाल का? भक्त म्हणाला - का नाही? जो कोणी उठून माझ्या मंदिरात बसलेल्या देवाच्या मूर्ती ज्यांच्या जवळ येते, त्यालाच खऱ्या अर्थाने त्याची पूजा करण्याचा अधिकार आहे. राजाने होकार दिला. आधी पंडितांनी प्रयत्न केले पण मूर्ती काही हाती आली नाही. जेव्हा भक्ताची पाळी आली तेव्हा त्याने एक श्लोक वाचला - "देवाधिदेव, आयो तुम शरना, कृपा कीजिए जान अपना जना" हा श्लोक पूर्ण होताच ती मूर्ती भक्ताच्या मांडीवर आली आणि ती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी लगेचच तिचा गुरु म्हणून स्वीकार केला.
      या भक्ताचे नाव होते रविदास. होय, तेच ज्यांना आपण संत रविदास जी किंवा संत रैदास जी म्हणून ओळखतो. त्यांचा महिमा ऐकून संत पीपा जी, श्री गुरुनानकदेव जी, श्री कबीर साहिब जी आणि मीराबाईजीही त्यांना भेटायला गेले. दिल्लीचा शासक सिकंदर लोदीही त्याला भेटायला आला. त्यांनी रचलेल्या ३९ श्लोकांचाही "श्री गुरु ग्रंथसाहिब" मध्ये समावेश करण्यात आला आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं होऊनही संत रविदास आयुष्यभर चामड्याची कमाई आणि जोडे बांधण्याचे काम करत राहिले, कारण ते कोणतेही काम छोटे मानत नव्हते. लहान समजले नाही, ज्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह पालन - पोषण चालतो ते काम लहान कसे असू शकत नाही.

बोध :  कोणत्याही कामाला लहान समझू नका.आपले काम प्रामाणिकपणे करा

1444. हट्टाची बदलती भुमिका

 काल दुपारचीच गोष्ट. नातवाच्या गाडीतून घरी येत होतो. अंतर जेमतेम दहा मिनिटांचे. गाडीत न कळणारं कर्णकर्कश इंग्रजी गाणं वाजत होतं. मी गाडीत बसल्याबसल्या नाराजी व्यक्त केली.
 "ओ मालक आपण दोघेही पुढे बसलो आहोत हे तु विसरलेला दिसतोस" नातू काय ते समजून गेला आणि गाणं मंद आवाजात सुरू झालं. ओव्हरचा पहिला चेंडू व्यवस्थित पडल्यावर मी दुसरा चेंडू टाकला.
"आज खरं तर खुप दिवसांनी आपण भेटतोय. ह्या न समजणाऱ्या गाण्यापेक्षा आपण छानपैकी गप्पा मारल्या पाहिजेत. बोटाचा स्पर्श होऊन गाणं बंद झाले. माझा आनंद मात्र क्षणभंगुर ठरला. कारण पुढच्याच क्षणी नातवाकडून गुगली टाकण्यात आला.
बाबा मला नवीन फ्रेम घ्यायची आहे स्पेस्क्टची. ( नातू त्याच्या वडिलांना पप्पा म्हणतो आणि मला बाबा.)
तू ही सध्या घालतोस ती काय वाईट आहे 😜 माझ्यातला अंपायर जागा झाला नोबाॅल देण्यासाठी.
अरे यार, लाईफ मे कुछ चेंज होना चाहिए 😜 काही हवं असेल तर आम्हाला लगेच यार ही पदवी मिळते. इतरवेळी मात्र आम्ही बोअर करणारे मास्तर असतो. 😂😂😂
पण ह्यावेळी मात्र मी ठामपणे सांगितले त्याला की बाबारे हट्टाची भूमिका आता बदलली आहे. तु काॅलेजला आहेस त्यामुळे त्या हट्टाची भूमिका आता काही तरी मागण्याची नसून काहीतरी करून दाखवण्याची झाली आहे.
बाबा प्लीज पकवू नका. गाडीला मोठा सिग्नल लागलेला माझ्या पथ्यावर पडला. मी त्याला म्हणालो," हे बघ तुला कळायला लागलं त्या दिवसापासून आजपर्यंत तुला हवं नको ते सगळं दिलं तुझ्या आईवडिलांनी. त्यांनी जे दिलं नाही ते माझ्याकडून तू काढून घेतलेस. आता तुझं वय हटृ करण्याचे नसून आयुष्यात काहीतरी हट्टाने बनण्याचे आहे. मिळवण्याचे आहे. स्वतःला घडवण्याचे आहे.
त्या हट्टाची भूमिका आता बदलली असून घेण्यापेक्षा देण्यावर अधिक भर आहे त्या भुमिकेत. आईवडिलांनी आणि घरातील इतर मोठ्या माणसांनी आजवर कष्ट आणि त्याग करून तुला इथवर विनासायास आणले त्या कष्टांची आणि त्यागाची सव्याज परतभेड करण्यासाठी तुला ह्या पुढे प्रयत्न करायचे आहेत. ज्या हट्टाने  आजवर खेळण्याच्या व खाण्याच्या गोष्टी, कपडे, शूज, सायकल, घड्याळ, बेल्ट, मोबाईल, स्कुटर सगळं तु मागितलंस. प्रसंगी ते मिळवण्यासाठी घरात थयथयाट केलास. त्याच हट्टाने आज तुला शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर सर्वोच्च स्थान पटकवायचे आहे. आमच्या सगळ्यांच्या नजरा आता त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत.
तेव्हा आहे त्याच चष्म्यातून तुला बाहेरच्या जगाकडे नव्याने बघायचे आहे.
"थोडक्यात तुम्ही माझ्या हट्टाचे टायर पंक्चर करून टाकले आहे" नातवाचा नाराजीचा सूर.
अर्थात. पण हे पंक्चर तुझं तुलाच काढायचे आहे जिद्द आणि चिकाटीची ट्युब लावून. एकदा का हे जमलं तुला की यशाच्या एक्स्प्रेस वे वरून तुझ्या स्वप्नांची गाडी वेगाने सुसाट धावेल.
ओके सर 👍 आपली आज्ञा शिरसावंद्य. पण सध्या तरी आपण आपल्या बाजूचा दरवाजा उघडण्याची कृपा कराल का 🤔
मी मान वळवून डावीकडे बघितले आणि माझ्या लक्षांत आले की बराच वेळ झाला गाडी माझ्या सोसायटीच्या दरवाजा समोर उभी होती.
बोलला पण नाहीस आपण पोहोचल्याचे. मी खजील होऊन म्हणालो.
काय करणार तुमचं फिलाॅसाॅफीचे लेक्चर सुरू होते. मी विचार केला की तुम्हाला न थांबवणं बरं. तेवढा वेळ मघाशी तुम्ही बंद केलेलं गाणं मी इयरफोन लावून ऐकलं 😂😂.
तुमचा मला लेक्चर देण्याचा " हट्ट" मी पुर्ण केला माझी भुमिका बदलून.
नातवाच्या ह्या खुलाश्यावर आम्ही दोघेही पोट धरून हसलो. जीव शांत झाल्यावर मी गाडीचे दार सावकाश उघडले आणि एक पाय खाली टाकला तितक्याच नातू खिडकीतून वाकून मला म्हणाला, " बाबा जोक अपार्ट‌‌‌ मी नक्कीच प्रयत्न करीन माझी हट्टाची भूमिका बदलण्याचा आणि तुम्हाला लवकरच माझ्यात सकारात्मक बदल दिसेल."
नातवाचे बोलणं ऐकून मी त्याच्या पाठीवर थोपटत शाबासकी दिली.
"हो पण आता आनंदाच्या भरात गाडीचा दरवाजा जोराने बंद करू नका म्हणजे झालं."
मॅचमध्ये विजयी षटकार मारण्याचा मान मात्र त्यानेच मिळवला शेवटी.
मी एकेक पाऊल सावकाश टाकत जिन्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मागून गाडी सुरू केल्याचा आवाज आला आणि मी जिन्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

© सतीश बर्वे
     ०३.०९.२४
टीप: हा स्वानुभव आहे. माझ्या आणि नातवाच्या संवादावर आधारीत ही पोस्ट आहे.

1443. शब्दावरुन पारख करावी

 एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. "जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन." अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली.
त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे?
एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे. तो राजाकडे गेला व म्हणाला, राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन.
राजा म्हणाला, दर्शन न घडविलेस तर? दरिद्री म्हणाला, मरणाची शिक्षा मला दे.
राजा म्हणाला, ठीक.
त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती. मुलाबाळांना चांगले कपडे करण्यात आले. त्यांच्या आंगावर दागदागिने घालण्यात आले. त्याची बायको सोन्याने पिवळी झाली. पैठणीने सजली. नवीन घर बांधण्यात आले. शेतीवाडी खरेदी करण्यात आली. गाईगुरे विकत घेतली गेली. घोड्याची गाडी आली. अशी मौज झाली.
सर्वांना सुख झाले. परंतु तो दरिद्री मनुष्य दुःखी होता. त्याच्या डोळ्यांसमोर सारखे मरण होते, साधूपुरुष त्याला कोठे भेटणार, कोठे दिसणार? परंतु जरी मरणाच्या विचाराने त्याला दुःख होई, तरी त्यातल्या त्यात त्याला थोडे समाधान होते. आपण जरी मेलो तरी मुलांबाळांना सुख होईल या विचारानेच त्याने राजाजवळ तसे वचन दिले होते. आपण मेलो तरी मुलांना ददात उरणार नाही, आणि आईही आहे त्यांची, काळजी घ्यायला, असे समाधान तो मानी. 
परंतु मरणाच्या कल्पनेचे दुःख काही कमी होत नसे. त्याचे खाण्यापिण्याकडे लक्ष नसे. तो दुःखी, कष्टी, उदासी दिसे. तो अशक्त झाला. फिक्कट दिसू लागला. तुम्हाला काय होते? नीट जेवत नाही; नीट बोलत नाही, का असे? घरात सारी सुखी आहेत, तुम्ही का दुःखी? असे बायकोने विचारले. आपण सुखी झालो. परंतु कितीतरी गरीब माणसे जगात आहेत. त्यांना कोण देणार पोटभर खायला? त्यांच्या विचाराने मनाला वाईट वाटते. तो म्हणाला. जगात दुःख पुष्कळ आहे. आपण काय करणार? ती म्हणाली.
थोडेपार दुःख दूर करता येईल तर बघावे. तो म्हणाला. मी अडल्यापडल्यास मदत करीन. भाकरीतुकडा कुणाला देत जाईन. मी उतणार नाही, मातणार नाही. गर्वाने दुसऱ्यास कधी हिडिसपिडीस करणार नाही. ती म्हणाली.
देव तुझ्यावर दया करील. तो म्हणाला. परंतु तुम्ही हसा, खेळा, आनंदात रहा. ती म्हणाली. देवाची कृपा होईल तर हसेन खेळेन. तो म्हणाला. तो गरीब मनुष्य दिवस मोजीत होता. एक महिना गेला. दुसरा सुरु झाला. त्याने साधूची सर्वत्र चौकशी केली, परंतु पत्ता लागेना. दुसरा महिनाही संपत आला. शेवटी तोही संपला.
राजाने त्या गरीब माणसाकडे शिपाई पाठविले. मोठा दरबार भरला. हजारो लोकही साधू येतो की काय, ते पाहण्यासाठी जमले होते. शिपायाबरोबर तो गरीब मनुष्य आला. त्याला तेथे उभे करण्यात आले.
"कोठे आहे साधुपुरुष" राजाने विचारले.
"राजा, पुष्कळ हिंडलो फिरलो. परंतु साधूमहाराज दिसले नाहीत. त्यांना ओळखायचे तरी कसे? ते नाना रुपे धारण करितात. अमुकच ते असे कसे समजावे? माझ्यावर कृपा कर. माझी मुलेबाळे आहेत. मला मरणाची शिक्षा देऊ नकोस. मी पाया पडतो. निराधाराला आधार दे." तो गरीब मनुष्य म्हणाला.
राजा संतापला रागाने म्हणाला, तू लफंग्या दिसतोस. तू फसवलेस. तुला का ही गोष्ट आधी माहीत नव्हती? ते साधूमहाराज नाना वेष धारण करतात, नाना रुपात वावरतात हे तुझ्या कानी नव्हते आले? आता क्षमा नाही. तुझी मरणाची शिक्षा टळत नाही. तुला हालहाल करुन मारले पाहिजे. साधे मरण नाही उपयोगी. राजाला फसविले आहेस. त्या राजाचे चार प्रधान होते. त्यांतील तिघांवर राजाची फार मर्जी होती. चौथ्यावर विशेषशी नव्हती. ते चारी प्रधान तेथे बसलेले होते.
राजाने पहिल्या प्रधानाला विचारले, "या लफंग्याला कसे मारावे?"
तो म्हणाला, "महाराज याला कुंभाराच्या आव्यात भाजून मारावे."
इतक्यात सभेतील एक मनुष्य उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
राजाने त्याच्याकडे पाहिले परंतु तो काही बोलला नाही. नंतर त्याने दुसऱ्या प्रधानाला तोच प्रश्न केला. तो दुसरा प्रधान म्हणाला, "राजा, वस्तरा घ्यावा व त्याच्या शरीराचे राईराईएवढे तुकडे करावे."
सभेतील तो मनुष्य पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
राजाने रागाने त्याच्याकडे पाहिले. नंतर त्याने तिसऱ्या प्रधानाला विचारले. तो तिसरा प्रधान म्हणाला, "महाराज, याला भिंतीत चिणून मारावे."
पुन्हा तो सभेतील मनुष्य म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी."
त्या माणसाचे हे उद्धट वर्तन पाहून राजा संतापला. परंतु अद्याप चौथ्या प्रधानाला विचारायचे राहिले होते. शेवटी त्या चौथ्या प्रधानालाही विचारण्यात आले.
चौथा प्रधान म्हणाला, "महाराज, याला मारु नये. या गरिबाला सोडून द्यावे. पहा त्याची स्थिती. दोन महिन्यापूर्वी तो कसा होता व आज कसा आहे? तो केवळ अस्थिपंजर झाला आहे. रोज त्याच्या डोळ्यांसमोर मरण होते. आपण दोन महिन्यांनी मरणार असे सारखे त्याच्या मनात होते. तो क्षणाक्षणाला मरत होता. किती मानसिक वेदना त्याला झाल्या असतील? झाली एवढी शिक्षा त्याला पुरे. त्याला आणखी मारणे योग्य नव्हे. मेलेल्याला मारण्यात काय अर्थ?"
सभेतील तो पुरुष पुन्हा उभा राहिला व म्हणाला, "राजा, शब्दावरुन माणसाची पारख करावी. "राजा त्या माणसाकडे वळला व म्हणाला, "पुन्हा पुन्हा तू हे शब्द उच्चारीत होतास, त्याचा अर्थ काय? नीट काय ते सांग, नाहीतर तुलाही मरणाची शिक्षा देतो."
तो मनुष्य उभा राहून म्हणाला, "राजा, पहिल्या प्रधानाने मडकी भट्टीत भाजतात त्याप्रमाणे या माणसाला भाजून मारावे असे सांगितले. का बरे त्याने असे सांगितले? अरे, तो कुंभार आहे. परंतु तू त्याला प्रधान केलेस. त्याच्या डोळ्यांसमोर नेहमी मडकी असतात. आणि तो दुसरा प्रधान? तो आहे न्हावी. म्हणून त्याने वस्तऱ्याने तुकडे करावे असे सांगितले. त्याच्या डोळ्यांसमोर सदैव वस्तराच असायचा. आणि तो तिसरा प्रधान? तो आहे गवंडी. भिंती बांधणे हे त्याचे काम. म्हणून भिंतीत चिणून मारा असे त्याने सुचविले. कुंभार, न्हावी, गवंडी यांना तू प्रधान केलेस. त्यांचे धंदे वाईट नाहीत. त्या त्या धंद्याने ते समाजाचीच सेवा करतात. परंतु राज्यकारभार कसा त्यांना हाकता येईल? राज्यकारभार चालवायला मोठी दृष्टी हवी. जगाचा खूप अनुभव हवा. 
मनुष्य-स्वभावाचे ज्ञान हवे. खोल पाहता आले पाहिजे. नीट सल्ला देता आला पाहिजे. हा चौथा प्रधान भला दिसतो. किती सुंदर विचार त्याने सांगितले, कसा चांगला सल्ला त्याने दिला परंतु त्याच्यावर तुझा लोभ नाही. राजा, चांगले प्रधान नेम व त्यांच्या सल्ल्याने वाग."
त्या मनुष्याचे ते बोलणे ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. परंतु ते तीन प्रधान खट्टू झाले. त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. राजा म्हणाला, त्या मनुष्याला इकडे आणा. या सिंहासनावर त्याला बसवू दे, त्याची पूजा करु दे. परंतु कोठे आहे तो मनुष्य? कोठे गेला? कोठे बसला?
सारे इकडे तिकडे पाहू लागले. परंतु तो मनुष्य दिसेना. आता होता, क्षणात नाहीसा झाला. तो साधुपुरुषच तर नव्हता? होय. ज्याच्या दर्शनासाठी राजा अधिर झाला होता, तोच तो साधूमहाराज होता. परंतु आता काय? तो चौथा प्रधान राजाला म्हणाला, अनेक वेषात वावरणारे, नाना रुपात दिसणारे ते साधूमहाराज समोर होते. त्यांचे दर्शन तुम्हाला झाले. या गरीब माणसामुळेच शेवटी हे दर्शन झाले. दर्शनच नव्हे तर त्यांचे शब्दही तुम्हाला ऐकायला मिळाले. धन्य झालात तुम्ही, धन्य झालो आम्ही सारे.
राजा म्हणाला, होय, ते साधूमहाराजच होते. या गरीब माणसाला सोडून द्या. शेवटी याच्यामुळे दर्शन झाले. याला आणखी एक हजार नाणी द्या. जा. गरीब माणसा, जा. सुखी रहा.
त्या तीन प्रधानांकडे वळून राजा म्हणाला, तुम्ही आपापले धंदे करायला जा. ते धंदे नीट करा म्हणजे झाले. ज्यांच्यावर माझी मर्जी नव्हती, त्यांना आता मी मुख्य प्रधान नेमतो. राज्यकारभार कसा हाकावा हे तेच चांगले सांगतील.
ते तीन प्रधान निघून गेले. चौथा प्रधान मुख्य प्रधान झाला. राज्याचा कारभार चांगला चालू झाला. आणि तो गरीब मनुष्य? त्याच्या घरात आनंदीआनंद झाला. बाबा परत आले म्हणून मुले उड्या मारु लागली. पत्नीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. तुम्ही आमच्या सुखासाठी मरण पत्करले होते. आमची दैना तुम्हाला पाहवेना? होय ना? किती तुमचे आमच्यावर प्रेम, ती स्फुंदत म्हणाली. त्या प्रेमानेच वाचलो. त्या त्यागानेच देव प्रसन्न झाला. त्याने दया केली. आता मी हसेन खेळेन. आनंदात राहीन. सारीच आनंदात राहू." तो म्हणाला. "हो. सारी आनंदाने राहू, गंमत करु." मुले नाचत म्हणाली.

📍 पांडुरंग सदाशिव साने,

1442. रिकामी

     ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी लंडनला चार वर्षं राहून, सौरभ भारतात परतत होता. सौरभ साठे... मुंबईतल्या एका प्रथितयश इंजिनीरिंग कॉलेजमधून काॅम्प्युटर्समध्ये M.E. करून, अगदी लगेचच एका लंडन बेस्ड साॅफ्टवेअर कंपनीत प्रोग्रॅमिंग हेड म्हणून कामालाही लागलेला. सहा महिन्यांतच सौरभची हुशारी आणि त्याच्यामध्ये असलेला स्पार्क कळून येत, त्याच्या इमिजिएट बाॅसनं केलेल्या शिफारशीवरून कंपनीच्या CEO नं सौरभला, लंडनला प्रोजेक्टवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या लेकाचं हे यश पाहून, श्री व सौ साठेंना अगदी आनंदाचं उधाण आलं होतं. बरेच कष्ट उपसून, बर्‍याच तडजोडी करून सौरभला शिकवलं होतं त्यांनी आणि सौरभनंही आपल्या आई-बाबांच्या निथळलेल्या घामाची योग्य जाण ठेवली होती. चार वर्षांतून फक्त चार वेळा आई-बाबांना भेटलेला सौरभ, आता कायमचं त्यांच्याबरोबरच राहायला मिळणार या विचारानं तर खुष होताच. पण आणिक एका कारणानं प्रचंड एक्साईटेड होता तो  आणि त्या कारणाचं नाव होतं ‘सिया पटवर्धन’. त्याच्या काॅलेजमधल्या खासमखास दोस्ताची, सागरची लहान बहिण. त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेली दिसण्यात प्रचंड आकर्षक, अन् वागण्या-बोलण्यात कमालीची स्मार्ट. पण तरीही आगाऊ नाही. अतिशय हसतमुख आणि सदैव उत्साहानं सळसळणारी अशी सिया. अगदी प्रथम दर्शनीच, सियाच्या प्रेमात पडला होता सौरभ ! 
B.E. पूर्ण केल्याची एक छोटेखानी पार्टी सागरच्या घरी आयोजित केलेली. पाव-भाजी, तवा पुलाव, गुलाबजाम वुईथ व्हॅनिला आईस्क्रीम असा रामसूम बेत होता. वर्गातली पंधरा मुलं तृप्त झाली होती अगदी, या पटवर्धनांच्या पाहुणचारानं. आणि सौरभ… सौरभ चे डोळे मात्र, अक्षरशः खिळा ठोकल्यागत खिळले होते सियावर. सिया वाढत होती म्हणून, चक्क बारा पाव खाल्ले होते सौरभने त्या दिवशी ! दुसर्‍याच दिवशी सौरभनं सागरला, अगदी प्रामाणिकपणे मनातलं सांगून टाकलं होतं. आणि प्राॅमिसही घेतलं होतं त्याच्याकडून, सियाला काहीही कळू न देण्याचं. ठोस असं काही करून दाखवल्याशिवाय सियाला मनातलं सांगायचं नाही, हे पक्कं ठरवलं होतं सौरभनं आणि आता तो दिवस आला होता ! 
मध्यंतरीच्या काळात सागरकडून त्याला हेही कळलं होतं की, सियानंही तिचं MBA पूर्ण केलं होतं. पण कुठंही लठ्ठ पगाराची नोकरी न पत्करता तिनं अनाथ मुलांची देखभाल करणार्‍या एका NGO सोबत पुर्णपणे स्वतःला बांधून टाकलं होतं. तिची सेवाभावी संस्था खेड्या-पाड्यात जाऊनही धडाडीने काम करत होती. सौरभला लहान मुलांची तशीही प्रचंड आवड होती आणि सियाबद्दल हे ऐकून तर सौरभ आणिकच प्रेमात पडला होता तिच्या. पण सियाबद्दल हे कळूनही आता दीडेक वर्ष उलटून गेलं होतं. कारण सागर कामानिमीत्त ऑस्ट्रेलियाला गेल्यावर, दोघांचा काॅन्टॅक्टच तुटला होता. पण आता मात्र अजिबात वेळ दवडणार नव्हता सौरभ. घरी येऊन, आई-बाबांसोबत वेळ काढून, इतरही बर्‍याच नातेवाईकांना भेटून, स्थिरस्थावर झाल्यावर सौरभनं आई-बाबांजवळ सियाचा विषय काढला. पण आई-बाबांचा चेहरा त्याला एकदम पडल्यासारखा वाटला. आई - बाबांच्या चेहर्‍यावर सौरभला कुठलीही उत्सुकता जाणवली नव्हती. अगदी कोरडे, भावनाशुन्य डोळे होते दोघांचेही. ज्यांत ना होकार होता ना नकार ! आई खाली जमिनीकडे बघत, तिच्या अंगठ्यानं लादी खरवडू लागली, तर बाबांनी वाचून झालेला पेपर पुन्हा उघडत, त्यात डोकं खुपसलं. सौरभला त्याच्या आई-बाबांकडून ही अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. त्याच्या अगदी लहानपणापासूनच साठ्यांच्या घरचं वातावरण रोखठोक नी मोकळं होतं. श्री व सौ साठे दोघांनीही यथोचित अंतर राखत, मुलाला अगदी खेळीमेळीत मोठं केलेलं होतं. त्यामुळे आई-बाबांच्या अवाक्षरही न काढता अशा विषयच तोडून टाकण्यानं सौरभ बर्‍यापैकी व्यथित झाला. आजपर्यंत कधीच त्याच्यावर आई-बाबांना असं गळपटलेलं बघायची वेळ नव्हती आली. दोनेक मिनिटं शांततेत गेल्यावर एकमेकांना डोळ्यांनी खुणावत, आई-बाबा त्याच्याजवळ येऊन बसले. बाबा नुसताच घसा खाकरत बसलेले बघून आईनं  बोलायला सुरुवात केली.
“सौरभ बाळा, तू मुलगा आहेस आमचा जीव आहेस ! तुझ्या मनातलं कळलं नसेल आम्हाला, असं वाटलं का तुला? अरे पाच-सहा वर्षांपुर्वीच कल्पना आली होती आम्हाला, की तू गुंतलायस कुणात तरी. पण तुला M.E. करायचं होतं, म्हणून आम्ही काही विचारलं नाही तुला. 
“नंतर तू जाॅबला लागलास, नी सहा महिन्यांतच फाॅरेनलाही गेलास. तुझ्या गुंतलेपणाबद्दल चकारही काढला नव्हतास तू. पण आम्हाला राहवेना. आणि ‘आता सगळं छान चाललंय, तर वेळ का काढा?’ या विचारानं आम्ही तुझ्या खास मित्राला– सागरला बोलावलं घरी, तुझ्याबद्दल विचारायला.
“आणि जेव्हा कळलं की तुला सागरचीच लहान बहिण सिया आवडलीये, तेव्हा तर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग दोन दिवसांनी आम्ही दोघं, पटवर्धनांकडे गेलो. खरंच गोड अन् लाघवी आहे रे सिया ! क्षणार्धात जिंकलं तिनं आम्हाला. वस्तुस्थिती कळल्यावर पटवर्धनांकडचेही सगळे जामच खुष झाले. अगदी तुझ्या सियासहीत !
“पण तिचं MBA चालू होतं, म्हणून मग इतक्यात विषय न काढण्याचं आणि तुझ्यापाठी हे सगळं झालंय, हे तुला कळू न देण्याचंही ठरलं आम्हा सगळ्यांचं. सिया अधेमधे आम्हाला भेटायला यायची. मी कधीतरी चक्कर टाकायचे पटवर्धनांकडे. एकंदरीतच खूप मस्त चाललेलं सगळं. अगदी... अगदी दोन वर्षांपुर्वीपर्यंत. पण...
“…पण दोन वर्षांपुर्वी एक अघटीत घडलं, सौरभ... कुठल्याशा खेडेगावी NGO च्या कामासाठी सिया गेली असतांना, बाल मजुरांना सोडवण्याकरता केलेल्या चळवळीत सिया आणि इतर कार्यकर्त्यांवर तिथल्याच दांडग्या गावकर्‍यांनी प्रचंड निष्ठुर अशी मारझोड केली. पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करेपर्यंत, बरेच कार्यकर्ते जखमी झाले होते. आणि… 
“आणि सिया तर अत्यंत गंभीररीत्या न जाणो किती लाथा-बुक्क्या, लाठ्या तिच्या पोटावर बसल्या होत्या ! सिव्हिअर ब्लिडिंग सुरू झालं तिला. खेडेगावात कुठलीच अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यानं, सियाला तालुक्याला नेण्यात आलं. तिथं तिच्यावर बेसिक उपचार केले गेले.
“पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता... तुझ्या बाबांच्याच ओळखीमुळं गायनॅक सर्जन डाॅ. क्षेत्रमाडे, आमच्याबरोबर तिथं यायला तयार झाले. त्यांनी सियाला तपासलं… आणि… आणि he finally decided to go for ‘Hysterectomy’, since there was no option left behind to keep her alive! 
“तिचं गर्भाशय काढलं बाळा…! वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी एखाद्या बाईपासून तिचं आई होणं हिरावलं जाणं, यासारखं आभाळभर दुःख दुसरं कुठलंही नाही ! तिला मुंबईला आणल्यावर, मी आणि तुझे बाबा भेटायला गेलो सियाला. तेव्हा तिनं आम्हाला हात जोडत, ओक्साबोक्शी रडत असमर्थता दर्शवली तुझ्याशी लग्न करण्याबाबत. आणि विनंती केली पुन्हा कधीही तिला न भेटण्याची, तिच्यासमोर न येण्याची.
“तुला आम्ही सांगणारच होतो, तू नाताळच्या सुट्टीत इथं आल्यावर. पण मागल्या वर्षी तू येऊच शकला नाहीस. तू तिथं एकटा असतांना फोनवर तुला हे सगळं सांगणं, ना आम्हाला योग्य वाटलं ना सागरला आणि आता तू जो येतोयस ते कायमचाच ! 
“तुला लहान मुलांप्रती असलेली ओढ, माहितीये आम्हाला सौरभ... त्यामुळं तुला कधीच मूल न देऊ शकणार्‍या मुलीशी, कळतेपणी तुझं लग्न लावून देणं खरंच कठीण आहे रे बाळा…!”
एवढं बोलून सौरभची आई थांबली आणि स्वतःच्या पायाच्या अंगठ्याकडे बघू लागली. सौरभचे बाबा त्याच्याकडे बघणं टाळत उगीच पंख्याकडे, भिंतीवरच्या घड्याळाकडे, गॅलरीतून बाहेर असं आलटून पालटून बघू लागले. आणि सौरभ त्या दोघांकडे पाहत नजरानजर होण्याची वाट बघत होता. एका पाॅईंटला तिघांचेही डोळे एकमेकांच्या डोळ्यांना भिडले आणि सौरभ बोलू लागला.
“आयुष्यातली ही पहिली गोष्ट असेल, जी तुम्ही माझ्यापासून लपवलीत. मला कायम बरोबरीची, रादर मित्रत्वाचीच वागणूक मिळालीये तुम्हा दोघांकडूनही. त्यामुळंच मला खरंच आश्चर्य वाटतंय, की तुम्ही ही अशी गोष्ट मला सांगितली का नाहीत? 
“मला क्लिअर आठवतंय की मी आठ वर्षांचा झाल्यावर माझ्या वाढदिवशीच, तुम्ही मला सांगितलं होतं की मी… मी… दत्तक घेण्यात आलेला मुलगा आहे ! ॲक्सिडंटमध्ये गेलेल्या, बाबांच्या खूप जवळच्या मित्राचा मुलगा. नवरा-बायको आठ महिन्याच्या लहान बाळाला सोडून, अपघातात गेले आणि त्या बाळाच्या थकलेल्या आजी-आजोबांकडून, तुम्ही घेऊन आलात त्याला या घरी... अगदी रितसर ! 
“एक दत्तक घेतलेलं मूल मग स्वतःबरोबरच घेऊन आलं होतं, एक छाती दडपवून टाकणारी जबाबदारीही आणि म्हणूनच तुम्ही दोघांनीही परस्पर संमतीनं एक निर्णय घेतलात, स्वतःचं मूल होऊ न देण्याचा ! 
“आता बघा... म्हणजे एक मुलगी आहे, गर्भाशय काढून टाकल्यामुळं मूल होऊ न शकणारी आणि एक मुलगी होती; गर्भाशय असूनही, मूल होऊ न देणारी पण मग एक मात्र प्रचंड दुःखी आणि एक कमालीची सुखी…! असं का…? 
“नाही आई... माझ्यासाठी ह्या दोघीही एकाच लेव्हलवर आहेत. ह्या दोघींचंही दुखणं समान पातळीवर आहे माझ्यासाठी ! रादर पहिलीच्या बाबतीत घडला तो अपघात होता, जो टाळणं तिच्या हातात कदाचित नव्हतं पण दुसरीनं स्वखुशीनं, स्वतःच्या सख्ख्या मुलाची आई होणं टाळलं आणि काय वाईट झालं तिचं? काय त्रास झाला तिच्या नवर्‍याला ह्याचा…? absolutely nothing! 
“मग सियाला आणि तिच्याशी लग्न करू पाहणाऱ्या मला त्रास होईल, असं वाटलंच कसं तुम्हाला? त्यातून सिया तर शेकडो अनाथ मुलांसाठी काम करतेय, जी तिचीच तर मुलं आहेत आणि तुम्ही फक्त एका मुलाचं घेऊन बसलायत? मी आत्ताच्या आत्ता पटवर्धनांकडे जातोय, सियाला मागणी घालायला. नाही ऐकलं तिनं, तर पळवून आणेन तिला. पण लग्न करेन तर सियाशीच !”
एवढं बोलून सौरभ जागेवरून उठला. आपल्या खोलीत आवरायला जात असतांनाच, त्याचं लक्ष गेलं शोकेसमध्ये ठेवलेल्या एका अत्तराच्या कुपीवर. सौरभ वळला नी आई-बाबांकडे बघत म्हणाला,
“आई-बाबा, ही अत्तराची बाटली तुम्ही मला माझं काॅलेज सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आणलेलीत. चारेक महिन्यांत ती रिकामी झाली. पण मी ती जपून ठेवलीये आजही ! माझ्या ड्राॅवरमध्ये एका कंपास बाॅक्समध्ये, शंभरच्या वर शाई संपलेल्या रिफिल्स असतील, मी आजही सांभाळून ठेवलेल्या. कधी कुठली गोष्ट ‘रिकामी’ झाली की त्याची किंमत कमी करत, ती फेकून देणार्‍यातला मी अजिबातच नाही आणि इथं तर हाडा-मासांची मुलगी आहे !” 
हे इतकं बोलून, आई-बाबांकडे बघून आश्वासक हसत सौरभ त्याच्या खोलीत आवरायला गेला. सौरभच्या आई-बाबांचे डोळे, आता आनंदाने भरून वहात होते. काहीतरी सुचून आई लगबगीनं उठली नी किचनमध्ये जात जातच बेडरुमच्या बंद दारावर थाप मारत म्हणाली.
“शेवयांची खीर करते पटकन...घेऊन जा ती. माझ्या सुनेला प्रचंड आवडते. आपल्या तिघांचे तीन चमचे, तू तुझ्या हाताने भरव तिला आधी. मग खा म्हणावं पाहिजे तेवढी !”
आई-बाबांसमोर मघापासून अडवून ठेवलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत सौरभ आरशासमोर उभं राहून, तयार होत होता.

- सचिन श. देशपांडे

1441. शहाणं बाळ

    अचानक आलेल्या पावसाने सूनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधातिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते. त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सूनेचा कॉल होता. सुकवण आत घेतले काय विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यानी गॅस वर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरूवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खुप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबूड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफीसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब. त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यु ट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काहीना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफीसला गेले की सोपानराव, मुलगा आणि सूनेला कसं खुश करता येईल हे बघायचे.  आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच कायतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते . तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता. तो ही वैतागत.  त्याची आठवण आज त्यांना झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहीले.
       ते नुकतेच रिटायर्ड  झाले होते. रिटायर्डमेंट नंतर बायकोसाठी त्यांनी खुप काही करायचे ठरविले होते. ती माऊली पण खुप खुश होती. पण ते सुख नियतीला पाहावले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमिन सरकली. ती आता काही दिवसांची सोबती होती. सोपानरावानी रंगवलेल्या स्वनांचा चुराडा झाला. सोपानराव तिची खुप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसलातरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरूवात केली.
" प्रिय सोपान,
माफ करा तुम्हाला एकेरी हाक मारते आहे. पण आज तसं म्हणावसं वाटतय.  खुप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी  एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती. पण कधी हीम्मत केली नाही. मी आता फार जगेन असं वाटत नाही. कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरतरं आज तुम्हाला हे सांगणार होते. पण काल रात्री पासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो, बहूतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी, मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू होते. मला माझी काळजी नाहीये. माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहीली आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आलेय. कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे. मी मेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ नाही लागणार. तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावे लागणार आहे. मुला- सुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय घेत असतील. पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाहीये. थोडे मनकवडे व्हावे लागणार आहे. घरातील छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी करत होते. पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील. मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरूवातीला  कठीण जाईल आणि तुमच्या मनात हे ही आलं असेल हे सर्व करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये? वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल. एक सांगू आपली सुन देखील एक स्त्री आहे. जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड निवड, कल हे सारं जपले कि ती माणसं आपली बनतात. शेवटी माणुस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत सून आणि नातवावर करायचे आहे. त्यांचं मन ओळखून वागायचे आहे. तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करणार?  एक नियम मला माहीत आहे. एखाद्याला प्रेम दिलतं तर ते सव्याज तुम्हाला परत मिळत असते.  तसचं तुम्हाला मिळेल. मी म्हणतेय म्हणुन एकदा शहाणं बाळ बनून बघा. घरं तुमचेच आहे पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे."
तुमची सावित्री..
       सोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकलीये पण किती काळजी करतेय. तिचं पुर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेले. आपण तर कधीच तिचं म्हणण ऐकले नव्हते. आपले ते खरं करत आलो होतो. आज ती गोष्ट करण्याची वेळ आलीये. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावानी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले. पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती. 
       त्या दिवसापासून सोपानराव हळू हळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. दोन महिन्याने सुनेने वृद्धश्रमा विषयी बोलायचा प्रयत्न केला. पण तो शेवटचा होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुला- सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्की वरून दळण आणण्या पासून, घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग , मुड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही. त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तिही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आवडू लागले. तोही त्यांच्याशी मन मोकळे पणाने वागू , बोलू लागला. एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला सुनेने साजरा केला. हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचे शहाणं बाळ घरात चांगलचं रांगू लागले होते. इतक्यात दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सुन आणि नातू चिंब भिजून उभे होते.
" अरे, तुम्ही तर पुर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलत? मी त्याला आणायला जाणारच होतो." असे बोलून सोपानरावानी बाथरूममधला गिझर चालू केला. 
" बाबा, पाऊस खुप पडत होता म्हणून त्याला आणला. परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता." चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला.
बाहेर अजून पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सुन सान्वी गरमगरम भजीने भरलेल्या प्लेटस घेऊन हॉलमध्ये येताना दिसली.
"बाबा खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती" भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली. 
"अगं सान्वी, बाबा ना मनकवडे झालेत " बाबांच्या प्लेट मधली एक भजी उचलत सागर म्हणाला.
हे ऐकल्यावर सोपानरावानी गालातल्या गालत हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहीले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला. अगदी शहाण्या बाळासारखा.
समाप्त...

लेखक - नितीन राणे
सातरल - कणकवली
मोबाईल  नं - ९००४६०२७६८

1440. एक कटिंग असाही

 सकाळी सकाळी मला फोन आला.
"नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?"
"नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?"
"काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. "
"कोणाचा मुलगा?"
"सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात."
"हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली. आता आम्ही कित्येक वर्ष भेटलेलो सुद्धा नाही."
" हो. बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे. तुम्हाला कॉलेजचे जय वीरू म्हणायचे ना?"
सुरेशाच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे पण मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये पहावा तसे माझे बालपण माझ्या नजरेसमोर येत होते. 
      मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच चाळीत जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली मग कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघे एकत्रच असायचो. एकमेकांशिवाय आमचे पान हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्यापुरते. तासादोन तासाच्यावर आमचे भांडण टिकायचेच नाही. आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असे आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघे एकत्रच माझ्या आणि त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो  सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत, अळूच्या फतफद्यासकट सगळे पदार्थ  तो आवडीने खायचा. कॉलेजातही आमची मैत्री फेमस होती. आम्ही कॅंटीनमधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा हा आमच्या दोघांचाही वीक पॉईंट. दिवसभरात दोघांचा मिळून दहाबारा कप चहा होत असे. गप्पा मारताना, अगदी मुलींकडे चोरून बघताना, अभ्यास करताना. आम्हाला चहा हवाच असायचा. आमच्या चहा पिण्याची थट्टा व्हायची. आम्ही दोघे नेहमी म्हणायचो आमची चहाची सवय आणि आमची मैत्री कधीच तुटणार नाही. 
सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे या दोघांची. खरच कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला?  कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांत आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती. जो त्यात यशस्वी होईल त्याला दोन हजार रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते. आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती. आम्ही आमच्याच विश्वात मश्गुल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळविले. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पहायला लागलो. आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. दरवर्षी मी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा किंवा तिसरा असायचा. यावेळी पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला आणि सुरेशचा पहिला. माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितले की सुरेशने कॉपी करुन पहिला नंबर मिळवला आणि मुलींवर पहिल्या नंबरचे इंप्रेशन मारत फिरतोय. तेवढ्यात सुरेश व आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅंटीनमधे आले. तो बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊनसुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय  झाले होते कोणास ठाऊक. मी त्याला वाट्टेल ते बोललो. त्या मुलीवरूनही त्याला बोलायला लागलो. तो सुरूवातीला शांत होता पण नंतर त्याचा ही संयम संपला. आम्ही खूप भांडलो. एकमेकांची उणीदुणी काढली आणि पुन्हा एकमेकांचे तोंडही पहायचे नाही असे मनाशी पक्के करूनच घरी आलो. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या मित्रांनी पैज लावली त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणायचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. प्रेस्टीज इश्यू केला. पुढे मला नोकरी मिळाली. मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमची जुनी चाळ पाडली. सगळी पांगापांग झाली. आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली. सुरेश तिथे असेल म्हणून मी जायचे टाळले. एकदा वाटले की आपण फोन करून सुरेशशी बोलावे. रियुनियनच्या निमित्ताने का होईना पुन्हा भेटावे. पण माझा इगो आड आला. इतकी वर्षे गेली तरी त्यानेही स्वतःहून कधीच फोन केला नाही. तो ही कॉलेजच्या व्हॉटसॲप ग्रुप पासून दूरच राहिला. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन.
"काका ऐकताय ना? मला तुम्हाला भेटायचे आहे. आजच्या आजच. मी दुपारी येऊ का?" माझी तंद्री भंग पावली.
"का? तू का भेटणार आहेस. तुझ्या बाबांनी का फोन नाही केला. त्याला अजूनही माझ्याशी बोलायचे नाहीच ना? तू तरी कशाला येतोयस मग?"
"काका, प्लीज. मी आल्यावर सविस्तर बोलू. मला प्लीज थोडा वेळ तरी भेटा."
 मला त्याच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. मी पण फारसे आढेवेढे न घेता त्याला भेटायला तयार झालो. त्याला माझ्या घराचा पत्ता मेसेज केला. अर्ध्या तासात येतो असा त्याने उलटा मेसेज केला. मी त्याची उत्सुकतेने वाट पहात होतो. अक्षरशः वीस मिनिटात माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझ्या समोर जणू तरूणपणीचा सुरेशच उभा आहे असा भास मला झाला. सुरेशच्या मुलाला मी पहाताक्षणी ओळखले. तो घरात येऊन बसला. गौतमीने माझ्या सुनेने आम्हाला कॉफी आणून दिली.
"काका तुम्ही चक्क कॉफी पिताय?" सुरेशच्या मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. "बाबा म्हणायचे की तुम्ही दोघे कॉफी पिणाऱ्यांची थट्टा करायचा आणि आपण जन्मात कधी चहा सोडून कॉफी पिणार नाही म्हणायचात."
मी पुन्हा जुन्या आठवणीत रमणार होतो पण तेवढ्यात हा सुरेशचा मुलगा सुरेशचा उल्लेख भूतकाळात करतोय हे मला चांगलेच खटकले. मी न रहावून त्याला विचारलेच." तुझे बाबा का नाही आले, अजूनही राग गेला नाही का? "
" तेच सांगायला आलोय काका. मागच्या आठवड्यात बाबा गेले. "
" काय !" 
मला खूप मोठ्ठा धक्का बसला.
"असा कसा गेला. मला न भेटताच. शक्यच नाही. तू मला फसवतोयस. होय ना."
"नाही काका. मी या बाबतीत कसा फसवीन? बाबांना जायच्या आधी तुम्हाला भेटायची आणि तुमच्याबरोबर चहा प्यायची खूप इच्छा होती पण तितका वेळच मिळाला नाही. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला तोच खूप मॅसिव्ह होता. अर्ध्या तासात सारा कारभार आटोपला. काका उद्या बाबांचे दहावे आहे. तुम्ही याल? तुम्ही आला नाहीत. तिथे येऊन चहा प्यायला नाहीत तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. काका याल ना? "
मी पुरता कोसळलो होतो. सुन्न झालो होतो. गौतमीने मला सावरले. तिनेच सुरेशच्या मुलाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि मला तिथे घेऊन ती स्वतः किवा माझा मुलगा येईल असे सांगितले. त्या दिवशी मी काय केले, काय खाल्ले याची मला शुद्धच नव्हती. सतत सुरेश डोळ्यासमोर दिसत होता. मी कितीही मनापासून त्याची माफी मागितली तरी त्याचा आता काहीही फायदा होणार नाही हे सत्य पचवणे मला अशक्य होत होते. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन माझा मुलगा माझ्याबरोबर सुरेशकडे आला. सुरेशच्या बायकोला, गिरिजावहिनींना मी पहिल्यांदाच भेटलो. त्यांना देखील मी अगदी ओळखीचा वाटत होतो. माझ्याबद्दल सुरेश सतत भरभरून बोलायचा.
      थोड्या वेळाने आम्ही गच्चीत गेलो. तिथे सुरेशची सून दोन चहाचे कप घेऊन आली. एक कप माझ्या हातात दिला आणि एक कठड्यावर माझ्यापासून थोडा लांब ठेवला. मी तिला एक कप चहा परत न्यायला सांगितले. पूर्वी प्यायचो तसा अर्धा अर्धा चहा आता आम्ही पिणार होतो. माझ्या चहातला अर्धा चहा एका बशीत ओतून मी गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि मी मनातल्या मनात सुरेशशी बोलू लागलो. कित्येक वर्षांची कसर भरुन काढू बघत होतो. "सुरेशा, बघ मी आलोय तुला भेटायला. बरोब्बर एकोणचाळीस वर्षे सहा महिने बावीस दिवस झाले तुला भेटलो नाही. इतक्या वर्षात तुला माझ्याशी बोलावेसे वाटले नाही ना? माझ्यावर इतका रागावलास. मला मान्य आहे चूक माझीच होती. पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला माहिती आहे. “त्या दिवसापासून आजपर्यंत मी चहा प्यायलो नाही. तुझ्याशिवाय चहा प्यायची कल्पनाच करवत नाही.” आज मात्र तुझ्या सुनेच्या हातचा चहा आपण दोघे मिळून पिणार आहोत. मला माहितीये तू आहेस इथेच कुठेतरी आसपास. तुझे शरीर इथे नसले तरी तुझा आत्मा इथेच आहे. तू ऐकतोयस ना? चल आज आपण पूर्वीसारखाच कटिंग पिऊया."
असे म्हणून मी चहाचा कप तोंडाला लावला आणि भर्रकन एक कावळा आला आणि त्याने कठड्यावर ठेवलेल्या चहात चोच बुडवली.
⚡⚡
मित्रांनो, तुमच्या बाबत अशीच एखादी 'इगोची अढी' निर्माण झालेली असेल तर वेळीच स्वतःला सावरा...🙏

1439. माझी पूजा अपूर्ण आहे

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो.
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो.
पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही.
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो. 
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज मी देवाजवळ दिवा लावतो.
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो.
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना 
चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो.
पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो.  
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही , 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो.
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो.
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही , 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो. 
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद  
परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, 
तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

1438. बघा...तुम्हालाच कसं वाटतंय

रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, 
एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली. 
तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. 
मदत पाहिजेच असेल असं नाही, 
पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच  वाटेल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय..
😊😊😊😊😊😊😊😊😊

भरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा. 
पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर 
त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा 
सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा. 
खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय 
एकाच ठिकाणी असते. 
तिथे पाणी प्यायला गेलो  तर भांडे भरून, 
नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा.
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर 
सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी 
वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. 
त्याचा तर दिवस चांगला जाईलच.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

दिवसभर स्मार्टफोनेला सुट्टी देऊन, 
आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, 
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी 
लहान मुलांनाही ऐकवा. 
पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना? 
तुमचीही उजळणी होईल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं 
रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात.
दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण 
निदान मागच्या गाड्यांना थांबवून 
आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल.
एवढं तरी करून बघा.
रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना? 
फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, 
अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून 
सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन 
वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून:  
‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरं का’
तो मनाशीच हसेल खुळ्यागत ! पण लाजून म्हणेल, 
‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो. 
पर नक्की यायाच’! 
जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. 
व्यावसायिक तर तोपण आहे ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय ..!
😊😊😊😊😊😊😊😊😊

1437. राम हवा की कृष्ण हवा ?

कोणीतरी विचारले मला परवा .
तुला राम हवा की कृष्ण हवा ?

मी म्हणाले किती छान विचारला प्रश्न!
कधी मला पाहिजे राम तर कधी कृष्ण !
 
रामराया  घालेल पोटात माझी चूक.
आणि कृष्ण भागवेल माझी भूक.

रात्रीची शांत झोप रामरायच देतो.
भूक लागली की मात्र कृष्ण च आठवतो !

 भीती वाटली कशाचीही की मला आठवतो राम.
कष्टी दुःखी मन झाले की कृष्णाकडे च मिळतो आराम !

रक्षण कर सांगते मी रामरायालाच.
सुखी ठेव सांगते मी श्रीकृष्णालाच !

विवेक बुद्धीचा रामाशिवाय कोणाकडे मागवा ?
व्यवहारातील चतुरपणा मात्र कृष्णानीच शिकवावा !

सहनशक्ती दे रे माझ्या रामराया !
कृष्ण माझा बसलाय कर्माचे फळ द्याया .

वाटे मज रामाला फक्त शरण जावे .
कृष्णाशी मात्र मनसोक्त बोलावे भांडावे .

मागावी क्षमा रामाला अन
भीक मागावी कृष्णाला !

रामाला स्मरावे ...
कृष्णाला जगावे...

अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला.
पायावर उभे राहताना विनवणी कृष्णाला.

एकाचे दोन होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद !
संसार करताना आवर्जून द्यावा श्रीकृष्णाला प्रसाद.

आरोग्य देणारा राम ..
सौंदर्य देणारा कृष्ण...

राज्य देणारा राम...
सेना देणारा कृष्ण...

बरोबर चूक सांगतो राम .
चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम !

रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम.
कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम.

नाव ठेवताना पाळण्यात गोविंद घ्या गोपाळ घ्या.
अंतिम वेळी  मात्र फक्त रामनाम घ्या.

दोघांकडे  मागावे तरी काय काय ?
हसत बघत माझ्याकडे ते म्हणतात,
अग आम्ही एकच
तु फसलीस की  काय?

कोण हवा हा प्रश्नच नाही
मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही !

दडवून हळवेपण माझे मी म्हणाले ,
दोघेही रहा सोबत माझ्या,
नकोच आता हा प्रश्न !
कोण हवा आहे मला
राम का कृष्ण !
विचारले मला कुणी जरी. 
म्हणेन फक्त मी
जय जय  रामकृष्ण हरी ! 
जय जय रामकृष्ण हरी। 

🙏🙏🙏🙏

1436. देव माणसं

     आपण जेंव्हा असहाय्य असतो, समोर सगळा अंधार असतो, उद्या काय होणार याची शाश्वती नसते तेंव्हा देव प्रकट होतो. हाडामांसाच्या माणसांच्या स्वरूपात, आपल्याला तारून नेण्यासाठी.  देवदूत नसतो तो, प्रत्यक्ष देव असतो आपल्या मदतीला धावून येणारा. आपण देवमाणसं म्हणतो त्यांना, पण नाही, त्या माणसांच्या रूपात तोच उभा असतो. कोणी विठ्ठल म्हणतो त्याला तर कोणी गणराय. कोणी महादेव म्हणतो त्याला तर कोणी रामराय, पण असतो तोच, जो आपल्या मनात असतो आणि वसतो. धावणारा, तारणारा आणि सावरणारा संकटाच्या वेळी. कोण गरीब, कोण श्रीमंत याच्याशी त्याला काही घेणंदेणं नसतं. तो देवळात जातो का नाही याच्याशीही त्याला काही कर्तव्य नसतं. त्याला भक्तिभावाने साद घातली की तो उपस्थित होतो, तुम्हाला आधार द्यायला, तुमच्या ध्यानी मनीही नसताना. मी आणि माझं कुटुंब साक्षी आहे याला.  कोविडची दुसरी लाट, ऐन भरात. लाखो माणसं भरडून निघत होती वरवंटयाखाली. एकीकडे हवालदिल शासन आणि प्रशासनाचं दमनचक्र, तर दुसरीकडे त्याच प्रशासनातील पोलिस, डॉक्टर, सफाई कामगार, परिचारिका यांचं अहोरात्र राबणं आणि आधार देणं. याच दुसऱ्या लाटेत आम्हाला या भयानक व्याधीने ग्रासलं. आधी पत्नी आणि नंतर दोन दिवसांच्या अंतराने मी आणि आमची लेक या लाटेच्या तडाख्यात सापडलो. पहिले दोन दिवस काही जाणवलं नाही पण नंतर मात्र या रोगाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली.
    सगळीकडेच अवस्था अशी भीषण की फक्त फोनवरून चौकशी शक्य. प्रत्यक्ष मदतीला येणं कोणालाही अशक्य. न्याहारी, जेवण यांचे डबे लावले होते, पण दाराच्या बाहेर ठेवलेले डबे सोडून घेऊन ते खाणं पण हळुहळू  कठीण व्हायला लागलेलं. घराची दुर्दशा तर बघवत नव्हती. आम्ही तिघेही त्राण आणि धीर दोन्ही हळुहळू गमावत चाललेलो. हे आता नियंत्रणाबाहेर जाणार याची आता आम्हाला जाणीव होऊ लागली होती आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही इस्पितळात दाखल व्हायचा निर्णय घेतला. इकडून तिकडून मिळवलेले क्रमांक फिरवून इस्पितळांकडे चौकशीचा सपाटा लावला, पण सगळ्यांकडून नन्नाचा पाढा. कुठेही जागा नव्हती आणि एकावेळी तीन जणांना दाखल करून घेणं म्हणजे मोठं दिव्य होतं. आता आमचे प्राण कंठाशी येऊ लागले आणि मग आमच्या विहीणबाईंच्या रुपात देवदूताने दर्शन दिलं. त्या नोकरी करत असलेल्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाय ठेवायला जागा नसतानाही त्या म्हणाल्या, तुम्ही असाल तसे निघून या सगळे, मी बघते काय करायचं ते. पण डोंबिवलीहून भायखाळ्याला जायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न होता. रुग्णवाहिका चालक  अव्वाच्यासव्वा, मनाला येईल तो दर सांगत होते आणि आमच्याकडे कुठलाही पर्याय उरला नसताना,  मदतीला धावला दुसरा देव माणूस, ओला चालकाच्या रूपात. त्याला आम्ही आमची अडचण सांगितली आणि तो कुठलेही आढेवेढे न घेता तयार झाला. मी एक लस घेतली आहे, काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जातो म्हणत त्याने आम्हाला कस्तुरबाच्या दारात नेऊन सोडलं आणि ते ही  कुठल्याही जादा मोबदल्याची अपेक्षा न करता. त्याला देवमाणूस म्हणायचं नाहीतर काय? आमच्या विहीणबाईंनी, सगळे सोपस्कार पुरे करून आम्हाला कस्तुरबामध्ये दाखल करून घेतलं आणि म्हणाल्या आता तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका, मी आहे. आमचे डोळे खरोखर पाणावले त्या वेळेस. नसती ही सोय झाली तर किती भीषण अवस्था झाली असती आमची याचा विचारसुद्धा आज नकोसा वाटतो. PPE किट च्या आत दडलेलं तिथल्या कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचं प्रसन्न दर्शन आम्हाला क्षणोक्षणी घडलं नंतरचे काही दिवस.  
      बायको आणि लेक चार दिवस आणि मी तब्बल चौदा दिवस तिथे होतो आणि खरोखर, वेगवेगळ्या रूपांमध्ये आणि स्वरूपांमध्ये आम्हाला देव दिसत गेला आणि भेटत गेला, अविरत आणि अव्याहत. कस्तुरबाचे सगळे कर्मचारी प्रचंड तणावात असूनही आम्हाला धीर देत होते, लोकांच्या रोषाला तोंड देत औषधोपचार करत होते आणि त्यांच्या स्वरूपात रोज देव येऊन भेटून जात होता आम्हाला, धीर देत होता सतत. मी आहे पाठीशी, नका काळजी करू असं आश्वासक स्वरात म्हणत. कस्तुरबा म्हणजे महापालिका रुग्णालय. तिथे जेवणाची सोय म्हणजे अत्यंत यथातथा. तुरुंगातले कैदी काय जेवत असतील याची चुणूक दाखवणारं अन्न. दोन वेळा ते घशाखाली उतरवणं म्हणजे महा कठीण काम. रूग्णांना ते अन्न दिल्यामुळे ते कमी जेवून  आपोआप पथ्य पाळलं जावं अशी बहुतेक त्यांची अपेक्षा असावी. पण अन्नाचा मान राखूनही ते कदान्न उतरायचं नाही घशाखाली, आणि यावेळी पण परत एकदा देव परत प्रसन्न झाला आम्हाला. माझं कार्यालय इथून अगदी हाकेच्या अंतरावर आणि आम्हा तिघांची अवस्था बघून सहकारी काळजीत. एकदा फोनवर जेवणाची व्यथा त्यांना सहज बोलून दाखवली आणि परत एकदा माणसांतल्या देवाचं अगदी मनमोहक असं दर्शन आम्हाला घडलं. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन आम्हा तिघांना जेवण पोहोचवायची जबाबदारी उचलली आणि मी रुग्णालयात असेपर्यंत म्हणजे तब्बल चौदा दिवस जेवणाचे डबे स्वतःच्या जीवावर उदार होऊन आमच्यापर्यंत पोहोचवले. कुठलाही स्वार्थ नसताना केवळ निरलस बुद्धीने केलेलं हे कर्म म्हणजे तो कुठेतरी आहे याची जाणीव करून देणारं अदृश्य हातांचं अस्तित्व. रात्री सगळं शांत झालं की जवळच्याच एका देवळातून भजनाचे अस्फुट असे स्वर ऐकू यायचे, टाळ वाजायचे आणि परत एकदा, त्या भजनांच्या स्वरांमधून सांगावा यायचा, धीर सोडू नका. मी तुमच्या जवळच आहे सतत. ते गाणारे गळे धीर देऊन द्यायचे त्या शांत वेळी. ते ही देवदूतच, न दिसणारे पण सतत जाणवणारे. त्यांच्या भक्तीने ओथंबलेल्या स्वरांनी आम्हाला आश्वस्त करणारे. घरी आल्यावर विलगीकरणात असताना पुन्हा एकदा हे दैवी हात आमच्यापर्यंत आले आणि तब्बल पंधरा दिवस वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत अन्न पोहोचवते झाले. भयंकर असं ते अरिष्ट माणसात असलेल्या देवाच्या अंशामुळेच आम्ही परतवू शकलो.
    तो आपल्याला दिसत नसतो कधीच प्रत्यक्ष पण तो असल्याची प्रचिती मात्र येत असते आपल्या सगळ्यानाच, त्याच्या वतीने आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या माणसांच्या स्वरूपात. देव माणसं नसतात ती, प्रत्यक्ष देव आलेला असतो आपल्या भेटीला, आपल्याला तारायला आणि हाताला धरून पुन्हा उभं करायला. तो आपल्याकडूनही तशीच अपेक्षा करत असतो आणि आपणही कोणासाठी तरी देवमाणूस ठरायचा प्रयत्न करून  त्या अपेक्षांची पूर्तता करायची असते आणि हे चक्र असंच फिरत ठेवायचं असतं, परोपकाराच्या अक्षा भोवती, सतत. तोच त्याला अर्पण केलेला प्रसाद.

पराग गोडबोले 
९३२३२७७६२०

1435. थोडं बोलावसं वाटलं

प्रिय आई बाबा…
थोडं बोलावसं वाटलं ...!
आज थोडं एकटं एकटं वाटलं
नकळतच डोळ्यात 
थोडसं पाणी साचलं.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून  
थोडं बोलावसं वाटलं !

जन्म माझा झाला, 
कुशीत घेऊन पूर्ण दवाखाना
मिरवत होतात.
चालायला लागल्यावर तुम्हीच
पहिला हात दिला होतात. 
आता मी मोठा झालो 
जणू आजूबाजूला धुक्याचं 
आभाळच दाटलं. 
आज स्वतःच्या पायावर 
उभा असलो तरी 
धडपडल्या सारखं वाटलं. 
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

जेवताना काऊ चिऊ शिवाय
कधी घास पोटात गेला नाही.
मी जेवल्याशिवाय तुमचं पोट
कधी भरलच नाही.
आता तर चिऊ बघायला सुद्धा
मिळत नाही.
काऊ चिऊ साठी पुन्हा 
रुसावसं वाटलं. 
बाकी काही नाही, 
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

लहानपणी तुमच्यासोबत
पावसात भिजताना 
खूप मज्जा वाटायची. 
फाटका रेनकोट तुटकी छत्री
असूनही ती दोघांना पुरायची.
मी भिजायला नको म्हणून
तुमच्या जीवाची घालमेल व्हायची.
आज नवी कोरी छत्री असूनही
पावसात भिजावसं वाटलं.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

एकदा घरात एकटा असताना
सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होतं.
घर खायला उठलं होतं आणि
डोळ्यात पाणी साचलं होतं.
पण तुम्ही धावत पळत येउन मी
आहे असं सांगितलं होतं.
आज स्टेशनच्या गर्दीत सुद्धा
एकटं एकटं वाटलं.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

आठवतंय...एकदां मी पडलो होतो.
मला खूप लागलं होतं.
माझी जखम कमी पण तुमचं
तर काळीजच फाटलं होतं.
त्या दिवशी तर पूर्ण आभाळ
तुमच्यां डोळ्यात दाटलं होतं.
आज उगाचच अडखळून पडावसं वाटतंय.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

रात्री झोपताना तर तुमचा खांदा
माझी उशी असायची.
तुम्ही नसताना आईच्या खुशीत
पण झोप नसायची.
कारण तुम्ही सोबत नसतांना ती
रात्र भयाण वाटायची.
आज पुन्हा एकदा तुमच्या कुशीत
झोपावंस वाटलं.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

तुमचा हात सोडून शाळेत 
जाणे नकोसे वाटायचे. 
तुमचीच वाट बघत डोळे 
वाटेवर असायचे..
पण तोच हात पकडून घरी जाताना 
मात्र कसलेच भान नसायचे.
आता मी मोठा झालो तरी पुन्हां
तो हात पकडून चालावसं वाटलं.
बाकी काही नाही,
बस तुमची आठवण आली म्हणून 
थोडं बोलावसं वाटलं !

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...