आपण जेंव्हा असहाय्य असतो, समोर सगळा अंधार असतो, उद्या काय होणार याची शाश्वती नसते तेंव्हा देव प्रकट होतो. हाडामांसाच्या माणसांच्या स्वरूपात, आपल्याला तारून नेण्यासाठी. देवदूत नसतो तो, प्रत्यक्ष देव असतो आपल्या मदतीला धावून येणारा. आपण देवमाणसं म्हणतो त्यांना, पण नाही, त्या माणसांच्या रूपात तोच उभा असतो. कोणी विठ्ठल म्हणतो त्याला तर कोणी गणराय. कोणी महादेव म्हणतो त्याला तर कोणी रामराय, पण असतो तोच, जो आपल्या मनात असतो आणि वसतो. धावणारा, तारणारा आणि सावरणारा संकटाच्या वेळी. कोण गरीब, कोण श्रीमंत याच्याशी त्याला काही घेणंदेणं नसतं. तो देवळात जातो का नाही याच्याशीही त्याला काही कर्तव्य नसतं. त्याला भक्तिभावाने साद घातली की तो उपस्थित होतो, तुम्हाला आधार द्यायला, तुमच्या ध्यानी मनीही नसताना. मी आणि माझं कुटुंब साक्षी आहे याला. कोविडची दुसरी लाट, ऐन भरात. लाखो माणसं भरडून निघत होती वरवंटयाखाली. एकीकडे हवालदिल शासन आणि प्रशासनाचं दमनचक्र, तर दुसरीकडे त्याच प्रशासनातील पोलिस, डॉक्टर, सफाई कामगार, परिचारिका यांचं अहोरात्र राबणं आणि आधार देणं. याच दुसऱ्या लाटेत आम्हाला या भयानक व्याधीने ग्रासलं. आधी पत्नी आणि नंतर दोन दिवसांच्या अंतराने मी आणि आमची लेक या लाटेच्या तडाख्यात सापडलो. पहिले दोन दिवस काही जाणवलं नाही पण नंतर मात्र या रोगाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली.
सगळीकडेच अवस्था अशी भीषण की फक्त फोनवरून चौकशी शक्य. प्रत्यक्ष मदतीला येणं कोणालाही अशक्य. न्याहारी, जेवण यांचे डबे लावले होते, पण दाराच्या बाहेर ठेवलेले डबे सोडून घेऊन ते खाणं पण हळुहळू कठीण व्हायला लागलेलं. घराची दुर्दशा तर बघवत नव्हती. आम्ही तिघेही त्राण आणि धीर दोन्ही हळुहळू गमावत चाललेलो. हे आता नियंत्रणाबाहेर जाणार याची आता आम्हाला जाणीव होऊ लागली होती आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही इस्पितळात दाखल व्हायचा निर्णय घेतला. इकडून तिकडून मिळवलेले क्रमांक फिरवून इस्पितळांकडे चौकशीचा सपाटा लावला, पण सगळ्यांकडून नन्नाचा पाढा. कुठेही जागा नव्हती आणि एकावेळी तीन जणांना दाखल करून घेणं म्हणजे मोठं दिव्य होतं. आता आमचे प्राण कंठाशी येऊ लागले आणि मग आमच्या विहीणबाईंच्या रुपात देवदूताने दर्शन दिलं. त्या नोकरी करत असलेल्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाय ठेवायला जागा नसतानाही त्या म्हणाल्या, तुम्ही असाल तसे निघून या सगळे, मी बघते काय करायचं ते. पण डोंबिवलीहून भायखाळ्याला जायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न होता. रुग्णवाहिका चालक अव्वाच्यासव्वा, मनाला येईल तो दर सांगत होते आणि आमच्याकडे कुठलाही पर्याय उरला नसताना, मदतीला धावला दुसरा देव माणूस, ओला चालकाच्या रूपात. त्याला आम्ही आमची अडचण सांगितली आणि तो कुठलेही आढेवेढे न घेता तयार झाला. मी एक लस घेतली आहे, काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जातो म्हणत त्याने आम्हाला कस्तुरबाच्या दारात नेऊन सोडलं आणि ते ही कुठल्याही जादा मोबदल्याची अपेक्षा न करता. त्याला देवमाणूस म्हणायचं नाहीतर काय? आमच्या विहीणबाईंनी, सगळे सोपस्कार पुरे करून आम्हाला कस्तुरबामध्ये दाखल करून घेतलं आणि म्हणाल्या आता तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका, मी आहे. आमचे डोळे खरोखर पाणावले त्या वेळेस. नसती ही सोय झाली तर किती भीषण अवस्था झाली असती आमची याचा विचारसुद्धा आज नकोसा वाटतो. PPE किट च्या आत दडलेलं तिथल्या कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचं प्रसन्न दर्शन आम्हाला क्षणोक्षणी घडलं नंतरचे काही दिवस.
बायको आणि लेक चार दिवस आणि मी तब्बल चौदा दिवस तिथे होतो आणि खरोखर, वेगवेगळ्या रूपांमध्ये आणि स्वरूपांमध्ये आम्हाला देव दिसत गेला आणि भेटत गेला, अविरत आणि अव्याहत. कस्तुरबाचे सगळे कर्मचारी प्रचंड तणावात असूनही आम्हाला धीर देत होते, लोकांच्या रोषाला तोंड देत औषधोपचार करत होते आणि त्यांच्या स्वरूपात रोज देव येऊन भेटून जात होता आम्हाला, धीर देत होता सतत. मी आहे पाठीशी, नका काळजी करू असं आश्वासक स्वरात म्हणत. कस्तुरबा म्हणजे महापालिका रुग्णालय. तिथे जेवणाची सोय म्हणजे अत्यंत यथातथा. तुरुंगातले कैदी काय जेवत असतील याची चुणूक दाखवणारं अन्न. दोन वेळा ते घशाखाली उतरवणं म्हणजे महा कठीण काम. रूग्णांना ते अन्न दिल्यामुळे ते कमी जेवून आपोआप पथ्य पाळलं जावं अशी बहुतेक त्यांची अपेक्षा असावी. पण अन्नाचा मान राखूनही ते कदान्न उतरायचं नाही घशाखाली, आणि यावेळी पण परत एकदा देव परत प्रसन्न झाला आम्हाला. माझं कार्यालय इथून अगदी हाकेच्या अंतरावर आणि आम्हा तिघांची अवस्था बघून सहकारी काळजीत. एकदा फोनवर जेवणाची व्यथा त्यांना सहज बोलून दाखवली आणि परत एकदा माणसांतल्या देवाचं अगदी मनमोहक असं दर्शन आम्हाला घडलं. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन आम्हा तिघांना जेवण पोहोचवायची जबाबदारी उचलली आणि मी रुग्णालयात असेपर्यंत म्हणजे तब्बल चौदा दिवस जेवणाचे डबे स्वतःच्या जीवावर उदार होऊन आमच्यापर्यंत पोहोचवले. कुठलाही स्वार्थ नसताना केवळ निरलस बुद्धीने केलेलं हे कर्म म्हणजे तो कुठेतरी आहे याची जाणीव करून देणारं अदृश्य हातांचं अस्तित्व. रात्री सगळं शांत झालं की जवळच्याच एका देवळातून भजनाचे अस्फुट असे स्वर ऐकू यायचे, टाळ वाजायचे आणि परत एकदा, त्या भजनांच्या स्वरांमधून सांगावा यायचा, धीर सोडू नका. मी तुमच्या जवळच आहे सतत. ते गाणारे गळे धीर देऊन द्यायचे त्या शांत वेळी. ते ही देवदूतच, न दिसणारे पण सतत जाणवणारे. त्यांच्या भक्तीने ओथंबलेल्या स्वरांनी आम्हाला आश्वस्त करणारे. घरी आल्यावर विलगीकरणात असताना पुन्हा एकदा हे दैवी हात आमच्यापर्यंत आले आणि तब्बल पंधरा दिवस वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत अन्न पोहोचवते झाले. भयंकर असं ते अरिष्ट माणसात असलेल्या देवाच्या अंशामुळेच आम्ही परतवू शकलो.
तो आपल्याला दिसत नसतो कधीच प्रत्यक्ष पण तो असल्याची प्रचिती मात्र येत असते आपल्या सगळ्यानाच, त्याच्या वतीने आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या माणसांच्या स्वरूपात. देव माणसं नसतात ती, प्रत्यक्ष देव आलेला असतो आपल्या भेटीला, आपल्याला तारायला आणि हाताला धरून पुन्हा उभं करायला. तो आपल्याकडूनही तशीच अपेक्षा करत असतो आणि आपणही कोणासाठी तरी देवमाणूस ठरायचा प्रयत्न करून त्या अपेक्षांची पूर्तता करायची असते आणि हे चक्र असंच फिरत ठेवायचं असतं, परोपकाराच्या अक्षा भोवती, सतत. तोच त्याला अर्पण केलेला प्रसाद.
पराग गोडबोले
९३२३२७७६२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा