विजयराव देवाचे स्तोत्र म्हणत होते. सायंकाळचे सात वाजले होते. स्तोत्र म्हणता म्हणता विजयरावांच्या डोक्यात विचार येत होते. थोड्यावेळाने कुकर लावू, दुपारी हॉटेल मधुर मागवलेली आमटी व भाजी आहे. फ्रिजमध्ये दही आहे. विजयरावांची ही नेहमीची पद्धत, सायंकाळी सातच्या सुमारास देवापुढे निरंजन लावायचे, मग स्तोत्र म्हणायचे. वसुधा आजारी पडेपर्यंत देवाचे सर्व तीच पहायची. त्यामुळे रात्र आठ पर्यंत विजयराव पार्कमध्ये फिरत. वसुधा आजारी पडली आणि विजयरावांचे फिरणे थांबले. बाहेर पडायचे ते फक्त बाजारहाट करण्यासाठी, आता बऱ्याच गोष्टी ऑनलाइन होतात, त्यामुळे बाहेर जाणे कमीच, पेन्शन बँकेत जमा होते, सुनील चा फोन रात्र नऊ वाजता नेहमीचाच, तोपर्यंत जेवून घ्यायचे आणि त्याच्या फोनची वाट पाहायची, असा त्यांचा दिनक्रम. सव्वासाच्या सुमारास बेल वाजली, विजयरावांनी होल मधून बाहेर पाहिले, मध्यम वयाचा एक गृहस्थ बाहेर उभा होता.
कोण पाहिजे? विजयरावांनी विचारले.
" दादासाहेब एवढ्या वर्षांनी तुम्ही ओळखणार नाही मला.'
"दादासाहेब ' ही हाकच इंदोरची. इंदूरच्या घरात सर्वजण दादासाहेब म्हणत.
" तुम्ही इंदोरहून आलात का,? दादासाहेबांनी विचारले.
"नाही ', दादासाहेब मी शामू, तुमच्या इंदोरच्या वाड्यात कामाला होतो लहानपणी.
"कोण शामू? अरे तू म्हणजे......., दादासाहेब थोडं थोडं आठवू लागले.
" दादासाहेब मी शामू"पाणक्या ', तुमच्या दातेंच्या वाड्यावर मी पाणी भरायचं, आठवलं नाही का?'
" अरे तो शामू?', दादासाहेबांनी संपूर्ण दार उघडलं,
" कुठे होतास इतकी वर्ष?
शामू आत आला आणि दादासाहेबांच्या पाया पडला.
" अरे एवढा मोठा झालास तू, माझ्या पाया काय पडतोस, येये,बस.
" नाही दादासाहेब पहिल्यांदा तुम्ही बसा '.
" बर बाबा ', म्हणत विजयराव कोचवर बसले. त्याच क्षणी शामू येऊन त्यांच्या पायाकडे बसला आणि त्यांचे पाय चुरू लागला.
" अरे शामू काय करतोस हे? माझे पाय दाबतोस, केवढा मोठा झालास तू.'
" मोठा झालो इतरांसाठी. तुमच्यासाठी नाही दादासाहेब, अजून मी " पाणक्या ' शामूच आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझे अन्नदाते मालक, तुमच्या वाड्यावर मिळणाऱ्या तुकड्यावर माझे बालपण गेले, ते कसे विसरू?
" ते जुने दिवस होते रे बाबा, इंदूर मध्ये आम्ही रावसाहेब, संस्थानिकांचे सरदार पण ते सर्व संपले आता. या मुंबईत आम्हाला कोण विचारतो?'
" कोणी विचारू न विचारू, तुम्ही माझे अन्नदातेच आहात, "
" ते असू दे, तू आधी त्या खुर्चीवर बस पाहू ".
तसा शामू एका लहान च्या स्टुलावर बसला." कुठे होतास इतकी वर्ष? माझ्या अंदाजाने 35 40 वर्षानंतर दिसतोस तू मला.
" हो दादासाहेब, इंदूरला तुमच्या वाड्यावर होतो तेव्हा आठ नऊ वर्षाचा होतो. आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात.
" हो बहुतेक तेव्हा मी एम कॉम ला होतो., मग मी बँकेत लागलो आणि मग भारतभर बदल्या. शेवटी मुंबईत येऊन स्थायिक झालो.
" मग इंदूरचा वाडा आणि त्यातली संस्थानिकांचे सरदार संस्थानिकांचे सरदार एवढी माणसं? नोकर मंडळी? "
" सगळा पोकळ वासा होता तो, संस्थानिकांचे सरदार म्हणून सगळा खर्च सुरू होता,. आमच्या पाच-सहा पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं, तळ्यात साठवलेलं पाणी किती दिवस पुरणार? त्यासाठी झरा हवा असतो, तू झरा तलाव रिकामा करू देत नाही., आमच्या कुटुंबात झराच नव्हता. शेवटी मी निर्णय घेतला, कर्ज अंगावर येत होतं, सगळे डाम दौंल बंद केले. नोकर चाकर कमी केले, आई वडील गेल्यावर मी बँकेत नोकरी धरली.
" आणि दादासाहेब एवढा मोठा वाडा? "
" वाडाही कोसळत होता मागून, तो विकला, आता त्या ठिकाणी मॉल उभा राहिलाय, कालाय तस्समय : नमः
हो दादासाहेब, मी पाहून आलो.
" तू इंदूरला गेला होतास? "
" हो तर, तुमच्या शोधात होतो मी, दोन वर्षांपूर्वी खूप वर्षांनी भारतात आलो, पहिल्यांदा इंदूरला गेलो तर वाड्याच्या ठिकाणी मॉल उभा,, शेवटी तुमचा पत्ता शोधत शोधत या ठिकाणी आलो.
" मग पत्ता मिळाला कसा?
" इच्छा असली तर मार्ग सापडतो दादासाहेब, मी इंदोरहून बाहेर पडलो तेव्हा तुम्ही कोणत्यातरी बँकेत नोकरीला लागला होतात, हे माहीत होतं, मात्र कुठली बँक हे माहीत नव्हतं, मग मी भारतातील प्रमुख बँकांच्या ऑफिसमध्ये पत्र लिहून तुमचा पत्ता विचारला, पण तुमचा सध्याचा पत्ता कोणाला माहित नव्हता. इंदूर मध्ये चौकशी केली तेव्हा कोणी अचलपूर, नागपूर तर कोणी पंढरपूरचा पत्ता दिला, या प्रत्येक शहरात तुमचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही, शेवटी मुंबईत जीपीओ मध्ये या नावाचे पत्र कोणत्या पत्त्यावर देता अशी चौकशी केली आणि हा सांताक्रूझ चा तुमचा पत्ता मिळाला. "
" धन्य आहे तुझ्यापुढे, एवढी आठवण ठेवून तू येथे पोहोचलास याचे मला कौतुक वाटते, तू भेटलास आणि दादासाहेब अशी हाक मारलीस, मी इंदूरला असल्यासारखे वाटले. रम्य आठवणी असतात रे त्या. आता मी मुंबईत एकटाच राहतो, बायको वसुधा चार वर्षांपूर्वी गेली, मुलगा सुनील जर्मनीत स्थायिक झालाय, तिथल्या मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालाय. इंदूरचा वाडा विकला मी कारण कर्ज फार झालं होतं. रावसाहेबांचा तोरा मिरवताना खर्च सुरूच होते. उत्पन्न नव्हते. आता परत इंदूरमध्ये जाऊन छोट्या घरात राहणे कमीपणाचे वाटते, नोकरीत शेवटचा स्टॉप मुंबई होता, सुनील चे शिक्षण पण होते, या दृष्टीने मुंबईत सेटल झालो, पण इंदूर ते इंदूर, तिथली मजा मुंबईत नाही, स्वच्छ शहर, खाण्यापिण्याची लय लूट, गाणे संगीत भरपूर. "
" अरे शामू पण तू मुंबईत राहतोस कुठे?
" दादासाहेब, आता यापुढे मी मुंबईतच राहणार आहे. याविषयी सर्व सांगतो नंतर, पण दादासाहेब, आज मात्र मी या घरी जाणार आहे.
" अरे रहा ना, मी पण इथे एकटाच, कोण बोलायला पण नाही, सुनील चा रोज रात्री नऊ वाजता फोन येतो, त्याची मुलगी आहे पाच वर्षाची ती पण बोलते., कधी कधी सून बोलते, बरं दुपारची आमटी भाजी आहे, दही आहे, भात लावतो थोडा. "
" मी लावतो दादासाहेब, तुम्ही बसा. मला फक्त तांदळाचा डबा दाखवा. ""
" अरे मी करतो भात मला रोजची सवय आहे. "
" नाही दादासाहेब, मी असताना तुम्हाला कसलेही काम करू देणार नाही, तुम्ही बसा. "
विजयरावांनी शामला तांदळाचा डबा दाखवला. त्यातून तोडे तांदूळ घेऊन श्यामने गॅसवर भात लावला. फ्रिज उघडून दही बाहेर काढलं, फ्रिज मधून दोन अंडी बाहेर काढून त्याचे हाफ आमलेट तयार केले. छोट्या पातेल्यात सकाळची आमटी भाजी झाकून ठेवली होती. ती गॅसवर गरम केली. भांड्याच्या स्टॅन्ड वरून ताटे, वाट्या, ग्लासेस बाहेर काढले, आणि दोन ताटे तयार केली. त्यातील एक टेबलावर ठेवले. शेजारी पाणी ठेवले आणि म्हणाला दादासाहेब बसा.
विजयराव टेबलावर जेवायला बसले, त्यांनी पाहिलं दुसरे ताट घेऊन श्याम खाली फरशीवर बसला होता.
" अरे शाम वर व जेवायला.'
नाही दादासाहेब, तुम्ही जेवत असताना याआधी मी कधी तुमच्या सोबत बसलो नाही आणि यापुढे बसणार नाही. "
अरे शाम, ते दिवस गेले, मागचे विसरायचे आता. "
" नाही विसरणार दादासाहेब, एका खेड्यातल्या अनाथ मुलाला तुमच्या घरात आश्रय मिळाला, "पाणक्या " होतो मी, तुमच्या घरात आडा वरून पाणी भरत होतो, रोज प्रत्येकाच्या खोलीत पाण्याचा तांब्या नेऊन ठेवत होतो, तुम्ही कॉलेजमधून किंवा खेळून आलात की मला हाक मारत होतात, मी तुम्हाला पाण्याचा तांब्या आणून देत असे, जेवणाची वेळ झाली की तुमचे ताट तुमच्या खोलीत आणून देत असे, मग तुमच्या खोलीत माझी जेवणाची ताटली घेऊन येत असे आणि खाली बसून जेवत असे."
" होय पण या त्या वेळच्या गोष्टी होत्या, त्यावेळी आम्ही इंदूरच्या संस्थानिकांचे रावसाहेब होतो, सध्याची माझी ओळख म्हणजे एका बँकेतून रिटायर झालेला माणूस ".
" असू दे, पण तुम्ही इंदूरच्या रावसाहेबांच्या पोटी जन्म घेतला हे विसरू नका, माझ्यासारख्या कित्येक
आश्रीतांना तिथे अन्न वस्त्र निवारा मिळाला होता. "
जेवता जेवता विजयरावांचे आणि श्यामचे बोलणे सुरू होते, इंदूरच्या आठवणी काढल्या जात होत्या, मातोश्रींची ( विजयरावांच्या आईची ) आठवण निघाली.
विजयरावांचे जीवन संपले तसे ते नेहमीप्रमाणे आपले ताट घेऊन धुवायला जात होते एवढ्यात श्याम उठला आणि त्याने त्यांचे ताट आपल्याकडे घेतले.
" दादासाहेब मी येथे असताना तुमची ताट भांडी तुम्ही धुवायची नाही.' शेवटी हा काही ऐकायचा नाही म्हणून विजयराव गप्प बसले. श्यामने झटपट भांडी धुतली. पोटावरला आणि तो विजय रावांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारायला आला.
" हं, आता सांग, तू होतास कुठे इतकी वर्ष? "
सांगतो दादासाहेब, " श्यामच्या डोळ्यासमोर सर्व बालपण सरकू लागलं, " दादासाहेब इंदूर जवळच्या एका खेड्यातला एक गरीब मुलगा, घरची अत्यंत गरिबी, वडील देवीच्या साथीत गेले, तुमचे मुनीमजी गावात खंड वसुलीसाठी येत, माझी आई त्यांना हात जोडून म्हणाली" माझ्या मुलाला कुठेतरी अन्नाला लावा, नाहीतर इथे भूक भूक करत मरेल तो ", दिवाणजी मला घेऊन गेले आणि तुमच्या वाड्यावर ठेवले, तुमच्या वाड्यावर मी पाणी भरायचो, तुमच्या मातोश्रींनी मला कधी उपाशी ठेवलं नाही, घराचे शिजायचं तेच माझ्या ताटलीत असायचं, एकदा एक प्रसंग घडला कदाचित तो तुमच्या लक्षात नसेल, पण माझं आयुष्य बदलणारा ठरला.
तुम्ही कॉलेजात गेलात की मी तुमची पुस्तकं वह्या उघडायचो आणि वाचायचा प्रयत्न करायचो. एकदा तुम्ही अचानक घरात आलात, तर माझ्या मांडीवर पुस्तक उघडलेलं होतं आणि मी वाचायचा प्रयत्न करत होतो, तुम्ही ते पाहिलंत आणि मला विचारलंत " श्याम पुस्तक वाचावीशी वाटतात तुला?, शाळेत जाशील का? जाणार असशील तर मी व्यवस्था करतो. " मी हो म्हंटल, मग तुम्ही मुनीमजींना सांगून माझं नाव शेजारच्या शाळेत घातलेत.
आणि मी आनंदाने शाळेत जायला लागलो, शाळेत पालकाचे नाव लिहायची वेळ आली, तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमचं नाव दिलत, केवढे उपकार तुमचे या अनाथ मुलावर.
" त्यात विशेष काही नाही श्याम, गोरगरिबांना शिक्षण द्यायचं हे आमच्या संस्थानिकांचं ब्रीद होतं, आम्ही ते पाळत होतो इतकच.
" दादासाहेब एकदा शाळेत पालकांचा मेळावा होता, प्रत्येकाने आपल्या पालकांना शाळेत आणायचं होतं, मी हे तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉलेजात न जाता माझ्या शाळेत माझे पालक म्हणून आलात. "
" अजून हे सर्व तुझ्या लक्षात आहे श्याम ".
" सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहे दादासाहेब, मी दरवर्षी एक नंबर मिळवत शाळेत शिकत होतो. तुम्ही त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेला होतात. मी दहावीत बोर्डात आलो. स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी रायपूरला गेलो, त्याच वेळी माझी आई निधन पावल्याची बातमी आली, मी तिचे शेवटचे दर्शन घेतले आणि रायपूरला गेलो, त्यावेळी पासून तुमचा इंदूरचा वाडा सुटला, बारावीनंतर स्कॉलरशिप घेत लखनऊला गेलो. लखनऊला "सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लाँग्वेज ' मधून फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये मास्टर्स केले. तेथे पुन्हा स्कॉलरशिप घेऊन फ्रान्समध्ये फ्रेंच तत्वन्यान मध्ये Phd केले, आणि मग केंब्रिज विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवायला लागलो.
श्याम बोलत होता आणि विजयराव आ वासून ऐकत होते. खडतर परिस्थितीत श्यामने घेतलेले शिक्षण ऐकून त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं, त्याचबरोबर आपला जन्म श्रीमंत घराण्यात होऊन सुद्धा आपण बँकेत नोकरी करण्याएवढीच प्रगती केली याचं त्यांना वैशम्य वाटले.
" श्याम कौतुक वाटतं तुझं, आमच्या वाड्यात पाणी भरणारा मुलगा केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर झाला, तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत, मग सध्या तू कुठे असतोस? "
" दादासाहेब, आपलं मुंबई विद्यापीठ फ्रेंच तत्त्वज्ञान विभाग सुरू करत आहे, याकरता मला इथे बोलावून घेतले आहे, पण याआधीची केली दोन वर्षे मी दिल्ली विद्यापीठात मी फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पण पुढील दोन महिन्यानंतर मी मुंबई विद्यापीठाचा फ्रेंच तत्त्वज्ञानाचा विभाग प्रमुख म्हणून जॉईन होईल.
" बापरे शाम तेवढा मोठा माणूस तू, आणि माझ्या घरची भांडी घासलीस आज!"
मी मोठा जगासाठी असेन कदाचित, पण इंदूरच्या दातेंसाठी नाही '
" मग शाम, तुझं लग्न, बायको.....
दादासाहेब माझी बायको इंदोरचीच आहे, ती पण तुमच्या कुटुंबाला ओळखते, साधना तिचं नाव, माझ्यासारखी ती पण लखनऊला जर्मन भाषा शिकण्यासाठी होती,
मग ती पणकेब्रिज ला जर्मन भाषा शिकविण्यासाठी आली, आम्ही त्या काळात लग्न केलं, आम्हाला एक मुलगी आहे, "मिहिरा " तिचं नाव. मिहिरा दिल्लीत दहावी शिकते, माझी पत्नी साधना सध्या दिल्ली विद्यापीठात जर्मन भाषा शिकवते, पण आता ती माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठात येईल. "
एवढ्यात विजयरावांना जर्मनी हून त्यांच्या मुलाचासुनील चा फोन आला. बोलण्यासाठी श्याम हा विषय होता. त्याच्याविषयी किती बोलू मी किती नको असं विजयरावांना झाला, मग शामसुनिलशी बोलला, सुनिलच्या बायकोबरोबर जर्मन मध्ये बोलला, ती दोघेही सुनीलशी बोलून फारच प्रभावी झाले.
रात्री 10 ही विजयरावांची झोपायची वेळ. श्याम म्हणाला " दादासाहेब तुम्ही बेडरूम मध्ये झोपा, मला चटई आणि चादर द्या मी हॉलमध्ये झोपतो, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या आधीच शाम बेडरूम मध्ये गेला आणि त्यांच्या बेडवर त्यांची गादी चादर व्यवस्थित करून दिली, बेड खाली असलेली चट्टे आणि चादर घेऊन तो हॉलमध्ये आला, विजयराव त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकणार नाही हे माहीत असल्याने ते गप्प राहिले.
रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जा घ्यायची, आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला, एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
ती बाहेर आली तर त्यांना त्यांचे घर आज वेगळेच वाटलं, आपले अस्ताव्यस्त घर आज एवढे व्यवस्थित कसे असा त्यांना प्रश्न पडला, कोचा वरील कापड आज व्यवस्थित बसलेले होते, चप्पल बूट चपलाच्या स्टॅन्ड वर ठेवलेले होते. पेपरांची रद्दी बांधून ठेवलेली होती, हॉलमधील फोटोंचे जुने हार काढलेले होते, ते किचनमध्ये गेले, श्यामने सर्व भांडी धुवायला काढली होती, भांड्याचा स्टॅन्ड पुसून ठेवला होता, ची शेगडी बर्नर स्वच्छ पुसलेले दिसत होते, डायनिंग टेबल चक्क चकाचक दिसत होते, फ्रिज आतून बाहेरून स्वच्छ झाला होता, खिडकीवरची जळमटे नाहीशी झाली होती, बाथरूम टॉयलेट स्वच्छ दिसत होते, विजय रावांना वाटले आज किती दिवसांनी एखाद्या बाईचा हात फिरावा आणि घर स्वच्छ व्हावे तसे घर स्वच्छ दिसत आहे.
विजय रावांना पाहता श्यामने त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे समोर ठेवली. " श्याम अरे केवढे व्यवस्थित घर केलेस हे, मला असं व्यवस्थित घर ठेवायला जमायचे नाही, तू गेलास की पुन्हा माझा आजागळ संसार सुरु होईल ".
" दादासाहेब आम्ही मुंबईत आलो की तुम्ही आमच्याकडे जायचं, मला युनिव्हर्सिटी कडून मोठा फ्लॅट मिळेल. "
" बघू बघू, तुला जागा तर मिळू दे!"
" दादासाहेब तुमची भेट झाली आनंद वाटला. आता माझं नऊ च विमान आहे. मला आता जायला लागेल, तुमचा मोबाईल नंबर द्या, बहुतेक दोन महिन्यांनी आम्ही सर्व मुंबईत येऊ, मग तुम्ही आमच्याकडे यायचं. "
दादासाहेबांना नमस्कार करून श्याम निघाला. विजय रवाना तो जाताना वाईट वाटले, जेमतेम एक रात्र शामू राहिला, पण लळा लावून गेला, नाहीतर आपला मुलगा सुनील, रोज रात्री नऊ वाजता फोन करतो पण ते कर्तव्य म्हणून, त्यात ओलावा नसतो, आपल्या जर्मन सुनेने आपल्याला एकदाच पाहिले, तिला आपल्या बद्दल प्रेम कसं वाटणार?
विजय रावांना आपल्या पुढच्या आयुष्याची पण काळजी वाटत होती, सुनील जर्मनीला बोलावतो पण त्याच्या लग्नाआधी आपण दोघे जर्मन ला गेलो होतो, पण पंधरा दिवसात परत आलो, जर्मनीमधील थंडी, जेवण त्यांना मानवेना. आपल्याला भारताची सवय, आपले हात पाय फिरते आहेत तोपर्यंत ठीक, पण नंतर....., एखादा वृद्धाश्रमच शोधायला हवा.
दिल्लीत गेल्यावर सुद्धा श्यामचा रोज फोन येत होता. त्याची बायको मुलगी पण फोनवर बोलायची, आणि दोन महिन्यांनी त्या एक दिवस त्याचा अचानक फोन आला " आम्ही सर्वजण मुंबईत येतोय, कलिना भागात युनिव्हर्सिटीने मोठा फ्लॅट दिलाय. " आणि चार दिवसांनी श्याम त्याची बायको आणि मुलगी मुंबईत आली सुद्धा, दोन दिवसांनी शाम भली मोठी गाडी घेऊन आला आणि विजयरावांना आपल्या घरी घेऊन गेला. त्या अत्यंत पॉश वसाहतीमध्ये युनिव्हर्सिटीने शामला सहा खोल्यांचा फ्लॅट दिला होता. दारात शोफर सह गाडी. बाहेर बगीचा, जवळच मोठे गार्डन, या एरियात आपण मुंबईत आहोत असे त्यांना वाटेना, श्यामच्या पत्नीने आणि मुलीने त्यांना वाकून नमस्कार केला. श्यामची पत्नी साधना विजय रावांना म्हणाली " दादासाहेब मी पण इंदोरचीच, संपूर्ण दाते कुटुंबाबद्दल इंदूर शहराला आदर आहे, दादासाहेब तुम्ही आता इथेच राहायचं, कृपा करून एकटे राहू नका. "
श्याम दादासाहेबांना म्हणाला " काल मी सुनीलशी बोललो, तो पण म्हणाला बाबांनी एकटे राहण्यापेक्षा तुमच्या सोबत राहणे केव्हाही चांगले, त्यांना या वयात सोबत हवीच,' विजयराव गप्प बसले, ती पण एकटी राहून कंटाळले होते, संध्याकाळी शाम ने विजयरावांचे आवश्यक तेवढे सामान त्या घरी आणले.
आता विजयराव मजेत राहू लागले, श्याम आणि साधना रोज युनिव्हर्सिटी जात होते, पण जाताना किंवा आल्यानंतर त्यांची चौकशी करत होते, श्यामची मुलगी त्यांच्या नातीसारखीच गप्पा मारत होती, कॉलेजमधील गमती जमती सांगत होती, श्यामच्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकी होता, इतर कामासाठी माणूस होता, त्यामुळे विजयरावांना काहीच करावे लागत नव्हते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी शाम त्यांना नाटकांना किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात असे, विजय रावांना शास्त्रीय संगीताची फार आवड, मुंबईत इच्छा असूनही त्यांना जाता येत नव्हते, आता त्यांना गाण्याच्या मैफिली ऐकण्यासाठी मुद्दाम गाडी ठेवलेली होती.
आपले बाबा आता एकटे नाहीत श्यामच्या कुटुंबात आहेत हे पाहून सुनील चे फोन अनियमित येऊ लागले. विजय रावांना सुद्धा सुनीलची किंवा सुनीलच्या मुलीची पूर्वीसारखी आठवण येत नव्हती. उलट त्यांना श्यामची मुलगी मिहिरा जास्त जवळची वाटू लागली, आई बाबांना वेळ नसेल तेव्हा मिहिरा त्यांना गाण्याच्या मैत्रिणीला घेऊन जाऊ लागली.
एकंदरीत विजेवरराव दाते आता मुंबईत मजेत होते. इंदूर सुटल्यानंतर एवढे सुख त्यांना कधी मिळाले नव्हते. रोज सकाळी फिरायला जाणे, बागेत मित्रांसमवेत गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन, आंघोळ मग नाश्ता त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या शास्त्रीय संगीतात रमत असत. कधी किशोर ताई ऐकत कधी कुमार गंधर्व कधी शोभा गुरुटू, कधीकधी नव्या गायकांना सुद्धा ते ऐकत. दुपारी जेवणानंतर थोडी वामकुक्षी, सायंकाळी चॅनेलवर इंग्रजी सिनेमा पाहणे, सायंकाळी परत फिरून येणे. रात्र शाम साधना आली की एकत्र बसून जेवण, अजूनही श्याम साधना त्यांच्याबरोबर जेवताना खाली बसून जेवत.
विजयरावांना 75 वर्षे पुरी झाली, या दिवशी श्यामने एका नवीन गायकाला घरी बोलावून त्याचे गाणे विजयरावांना ऐकवले. श्यामची मुलगी मेहरा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. सारं कसं आनंदात छान चाललं होतं.
असेच एकदा रात्र जेवताना विजयराव टेबलावर आणि श्याम साधना खाली बसून जेवत होते. साधनाचे लक्ष गेले दादासाहेबांच्या पायाला सूज आली होती. तिने शामला दादासाहेबांचे पाय दाखवले. शनिवारी श्याम त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी सुजी वरच्या गोळ्या दिल्या. हळूहळू त्यांचे पोट मोठे दिसू लागले. श्यामला शंका आली त्याने दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये नेऊन सर्व तपासण्या केल्या, डॉक्टरनी "लिव्हर सोरायसिस चे निदान केले. पोटात पाणी जमा होऊ लागले होते, ते काढावे लागत होते. श्यामने सुनीलला सर्व कळवले, त्याने बाबांना जर्मनीला नेऊन सर्व उपचार करतो असे कळवले पण विजयराव जर्मनीला जायला तयार झाले नाहीत, पुण्याच्या खडीवाले वैद्यांचे पण उपचार सुरू होते, पण आजार कमी होईना. हळूहळू विजयरावांचे पोट मोठे आणि हातापायाच्या काड्या दिसू लागल्या, त्यांच्या तब्येतीचा वृत्तांत श्याम सुनीलला नियमित कळवत होता, पण सुनीलला भारतात येणे जमेना. कधी त्याच्या मुलीची परीक्षा जवळ येत होती तर कधी पत्नीची तब्येत बरी नसायची, हळूहळू विजय रावांना अन्न जाईना, शेवटी त्यांना लीलावती मध्ये ऍडमिट केले गेले. दर दोन दिवसांनी पोटातील पाणी काढले जात होते. पण विजयराव हॉस्पिटलमध्ये कंटाळू लागले मोक्षामणे घरीच एका खोली त्यांची हॉस्पिटल सारखी व्यवस्था केली. घरीच ऑक्सिजन लावला, एक नर्स दिवस-रात्र घरी ठेवली. पण विजयरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली.
22 जून ची रात्र, मुंबई भरपूर पाऊस सुरू होता, विजयराव अन्न पाणी घेत नव्हते, पोटात असह्य वेदना सुरू होत्या, श्याम आणि साधना त्यांच्या आजूबाजूलाच होते. रात्र 11 च्या सुमारास विजयरावांना घरघर लागली, श्यामने फोन करून लीलावतीच्या डॉक्टरांना घरी बोलावले, डॉक्टर आले त्यांनी विजयरावांची तब्येत पाहिली, नर्सला ऑक्सिजन काढायला सांगितला, विजयराव तोंडाने "पा पा 'करू लागले म्हणून डॉक्टर नी श्याम कडे पाहिले, श्यामने चमच्याने त्यांच्या तोंडात पाण्याचे दोन थेंब टाकले, त्याच क्षणी विजयरावानी प्राण सोडला. श्याम ओकेसा बोक्सि रडत होता, साधना रडत रडत त्याला सांभाळत होती. साधनाने फोन करून सुनीलला जर्मनीला ही बातमी कळवली. असे असे त्याने कळवले, ही बातमी कळताच श्यामचे आजूबाजूचे प्रोफेसर मित्र आणि युनिव्हर्सिटीतील लोक जमा झाली. त्या रात्री श्यामने विजयरावांच्या प्रेताला अग्नी दिला.
घरी अनेक जण शामला साधनाला भेटायला येत होते. युनिव्हर्सिटी चे कुलगुरू श्यामला भेटायला आले, श्यामने त्यांना दादासाहेबांचा इंदूरचा वाडा, त्या वाड्यात आपण "पाणक्या " म्हणून आलो, पण दादासाहेबांनी आपल्याला शिक्षण घेऊ दिले एवढेच नव्हे तर शाळेत पालक म्हणून स्वतः उभे राहिले, ती कृतज्ञता आपल्या मनात सदैव राहिली, आपले आई-वडील आपल्याला फारसे माहित नाहीत पण दादासाहेब आई-वडिलांच्या जागी कायमच राहिले. श्याम पुढे म्हणाला " शेवटची दहा वर्षे दादासाहेब आपल्या सोबत राहिले हे आपले भाग्य, पण त्यापेक्षा दादासाहेबांना शेवटच्या क्षणी या "पाणक्याने " तोंडात पाण्याचे थेंब टाकले, हे माझे परमभाग्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा