मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1431. मला माहेर हवे

    कंपनीचा लंचटाइम झाला तशी अंजली आपला डबा घेऊन कॅन्टीन मध्ये आली. तिच्या आधी बराच स्टाफ कॅन्टीन मध्ये येऊन लंच घेत होता. कुठले टेबल रिकामे आहे हे पहात असताना तिच्या लक्षात आले. स्मिताताई एकट्याच बसल्यात. त्यान्च्यासमोरची खुर्ची रिकामी आहे, त्याबरोबर अंजली स्मिताताई समोर जाऊन बसली.
"स्मिता ताई इथे बसू का?
"अग बस ना, माझी परवानगी कशाला हवी?
"तसे नव्हे, कुणी टेबल राखून ठेवलं असेल तर '.
"कोणी नाही, माझ्या म्हातारी समोर कोण टेबल राखून ठेवणार ग? कोण तरुण देखणी मुलगी असती तर कुणीतरी राखून ठेवलं असत '
"पण स्मिताताई, तुम्ही तरुण नसाल पण देखण्या आहात, बरं का?"
"हो, ते मला माहित आहे, रोज आरश्यात स्वतःला पहात असते ना '
"काय म्हणताय? आज डब्यात काय?
"आज डब्यात साधंच, नवरा गावी गेलाय, त्यामुळे मी एकटीच घरी.
एकटी साठी कोण विशेष करते?
"पण स्मिताताई, तुमचा मुलगा सून कुठे असतांत?
"अग, ती दोघ मुंबईत असतांत, एक शनिवार आड येतात, आम्हाला भेटायला, पण मागच्याच शनिवारी येऊन गेली, आता पुढील शनिवारी येतील '.
"मग या शनिवारी रविवारी तुम्ही एकट्याच घरी?
"हो ग, माझा नवरा गावाकडे घर बांधून घेतोय त्यामुळे तो पण पुढील शनिवारीच येईल, मुलगा सून पण येतील, म्हणजे पुढील शनिवारी आम्ही सर्वजण असू, या शनिवारी रविवारी मी एकटीच '.
अंजलीने डबा उघडला आणि डब्यातील पोळी भाजी खाऊ लागली. तिला पण कंटाळा आला होता, एकट राहायचा, नवरा बोटीवर नोकरीला आणि मुलगा पांचगणीला शाळेत. ती मुलाला पांचगणीला ठेवायच्या विरोधात होती. पण नवरा ऐकायला तयार नाही. त्याच्या मित्रांची मुलं पण पांचगणित शिकत होती ना? आणि नवरा भरपूर पैसे कामावतो मग मुलगा बोर्डिंगमध्ये.
अंजलीच्या मनाची द्विधा परिस्थिती होते होती, "विचारू का नको.. विचारू का नको.., शेवटी मनाची तयारी करून तिने स्मिताताईना विचारले 
"स्मिताताई, धाडस करून विचारते, मी येऊ का रहायला या शनिवारी तुमच्यकडे? स्मिताताई हसून म्हणाल्या 
"अग ये ना, त्यात घाबरायचे कशाला? माझ्या मुलीसारखी तू, मला एकच मुलगा, पण समजा मुलगी असती तर तुझ्याएव्हडीच असती, ये.. मला पण बरं वाटेल, मला पण एकट्याचा कंटाळाचं येतो '.
 "मग, स्मिताताई, मी शनिवारी येते'.
"अग शनिवारी कशाला? आपल्याला शनिवार रविवार सुट्टी असते. मग शुक्रवारी संध्याकाळी एकदमच जाऊ आणि सोमवारी सरळ कंपनीत येऊ, काय?
"चालेल पण तुम्हाला त्रास.
"अग त्रास कसला? मघा म्हंटल ना मी, माझ्या मुलीसारखी तू '.
"हो, बर तर, आपण एकदम शुक्रवारी कंपनीतूनच निघू, माझे कपडे घेऊन येते मी '.
"हो, शुक्रवारी..
शुक्रवारी सायंकाळी ऑफिस सुटलं तशा दोघी अंजलीच्या गाडीवरून सोलापूर रोड वरील स्मिताताईच्या घरी  पोहोचल्या. अंजली पहातच राहिली, स्मिताताईच घर म्हणजे बंगला होता. खाली वर मिळून चार बेडरूम्स मोठा हॉल, मोठे किचन, गॅलरी आणि मस्त बाग. बाग पहाताच अंजली खूष झाली, तिच्या माहेरी अशी बाग होती पण तिचा सहाव्या मजल्यावरील फ्लॅट, त्यात गॅलरीत तिने थोडी झाडें लावली होती, पण स्मिता ताई कडे मोठी बाग. त्यात चिकू, पेरू फणस, मोसंबी, फुलझाडे. ती बागेत रमली, एक एक झाड पहात राहिली, तोपर्यत स्मिताताई घरात जाऊन फ्रेश झाल्या होत्या आणि त्या हाका मारायला लागल्या.
"अंजली, अंजु... ये ग, कॉफी घयायला ये '
किती दिवसांनी कोणी "अंजु 'म्हणून हाक मारत होत.. आई हाक मारायची.. अंजु.. अंजु... आता आई गेल्यावर.. नवरा "सीमा 'म्हणतो, कारण लग्नात त्याने ते नाव ठेवलंय.. सासू होती तेंव्हा "सीमा 'म्हणायची. आपण अजून माहेरचंच नाव लावतो कंपनीत, म्हणून कंपनीत "अंजली मॅडम '. पण अंजु म्हणून कुणीच हाक मारत नाही. अंजली घरात गेली, स्मिताताईनी तिच्या हातात गरम गरम कॉफिचा मग दिला, त्या कॉफीचा एक घोट घश्याखाली गेला मात्र, तिला आईच्या हातची कॉफी आठवली, तीच कडवट चव. तिने प्रेमाने स्मिताताईकडे पाहिले. मग स्मिताताई तिला म्हणाल्या "वॉश घेऊन ये आणि बदलायचे कपडे आणले नसशील तर माझे गाऊन देते '.
"नाही, मी आणले आहेत, वॅश घेऊन येते."
अंजली बाथरूम मध्ये गेली आणि हात पाय तोंड धुवून आली. तोपर्यन्त स्मिताताईनी भिजवलेले वाल सोलायला घेतले होते, त्या वालाकडे पहात अंजली म्हणाली "अरे, तुम्हाला कोणी सांगितलं मला वालाची उसळ फार आवडते म्हणून?
"मला कोणी सांगितलं नाही ग, मी काल भिजत घातले होते. म्हंटले आज त्याची उसळ करू '.
अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं.
"स्मिताताई, खरच वालाची उसळ हा माझा वीक पॉईंट आहे हो. माझ्या आईला ते माहित होत, मी येणार म्हंटले की ती वाल भिजत घालायची.'
"अरे वा, योगायोग म्हणायचा आणि तुला काय काय आवडत ग अंजु?
"मला कांद्याच्या पातीची बेसन घालून केलेली भाजी, कोकणात मिलत तस कुळीथाचे पिठलं, प्रॉन्स बिर्याणी फार आवडत आणि घट्ट दही.'
"अरे वा, माझ्या मुलाला पण प्रॉन्स बिर्याणी फार आवडते. आपण उद्या करू '.
रात्री जेवायला चपाती, वालाची उसळ आणि घट्ट दही होते. अंजली मनापासून भरपूर जेवली. मग कसाटा आइस क्रीम.
जेवण झाल्यावर स्मिताताईनी विचारलं "अंजु, तुला संगीत आवडत ना?
"हो, मी संगीताच्या तीन परीक्षा दिल्या आहेत?
"मग कोण ऐकायला आवडेल? माझ्या कडे सर्व आहेत.
"किशोरीताई''.
स्मिताताईंनी कारवान सुरु केला, किशोरीताई गात होत्या 
"सहेला रे...
कितीतरी वेळ दोघी किशोरी ताईंना ऐकत होत्या. अंजलीला झोप येऊ लागली तशी स्मिताताईनी तिला तिच्या मुलाची बेडरूम दाखवली .
"या खोलीत झोप. अगदी उशिरा उठ. उदया शनिवार आहे. आता दोन दिवस सुट्टीचे '.
"होय, झोप येतेच आहे, गूड नाईट 'म्हणत अंजली झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी अंजली अगदी ऊन वर आलं तशी उठली. तिला स्वयंपाक खोलीतून भांड्यांचे आवाज ऐकू येत होते. ती उठली आणि वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि स्वयंपाकघरात आली, तेंव्हा तिला पॅन वरील आम्लेटचा वास आला. स्मिताताईनी तिला पाहिले आणि "ye, बैस, आम्लेटपाव खा' असं म्हणतं तिच्यासमोर डबलआम्लेट आणि पावाची लादी ठेवली, कपातून कॉफी ठेवली.
"अरे, केंव्हा केलंत हे? मला तरी उठवायचं, थोडी मदत केली असती मी '.
"असुदे ग, दोन दिवस राहायला आलीस ना, मग माझ्या हातच खायचं '. तिच्याबरोबर स्मिताताई पण कॉफी पिऊ लागल्या.
"तुम्ही नाही घेत आम्लेट पाव?
"अग, मी अंड खात नाही. माझ्या नवऱ्यासाठी अंडी घरात आणलेली असतांत त्याचे तुझ्यासाठी आम्लेट काढले झाल'
"कमाल केलीत तुम्ही ताई? असं म्हणूंन अंजलीने दोन्ही हात जोडून ताईंना नमस्कार केला.
कॉफी संपवून स्मिताताई उठल्या. त्त्यांचे अंजलीच्या केसाकडे लक्ष गेले. त्यानी जवळ जाऊन तिच्या केसांना हात लावला. 
"अंजु केसांना तेल लावत नाहीस वाटतं?
"नाही हो कंटाळाचं येतो तेल लावायचा.'
"केस छान आहेत तुझे, कंटाळा करुंन कसे चालेल. केसांची काळजी घ्यायला नको? आज मी तूझ्या केसांना तेल लाऊन देते. सगळी गुंता मोडेल बघ आणि केस मऊ होतील '.
स्मिताताई बाहेर गेल्या आणि तेलाची बाटली घेऊन आल्या. तिच्या पाठी उभ्या राहून त्यांनी तिचे केस सोडले आणि त्या केसांना तेलाने मालिश करू लागल्या. अंजूला खूपच छान वाटतं होते. आई गेल्यानंतर प्रथमच कोणीतरी तिच्या केसांना मालिश करत होते. अर्धा तास केसांना मालिश केल्यानंतर, त्या अंजलीला म्हणाल्या 
"जा आता आंघोळ कर, मी पाणी काढते तुझ्यासाठी. 
अंजली कपडे घेऊन अंघोळीला गेली, किती तरी दिवसांनी तिच्या केसांना तेल लागलं होते आणि ती केस धुणार होती. अंजली अंघोळीला गेली. असे केसांना तेल लाऊन मालिश केंव्हा केले होते? आठ वर्षे तरी झाली. आईच्या आजारपणाआधी आईच करायची, त्यानंतर... अंजलीने पुरा एक तास अंघोळीला घेतला. कितीतरी वर्षांनी अशी मनासारखी आंघोळ झाली. ती आंघोळ करून बाहेर आली तस स्मिताताई म्हणाल्या "अंजु, नाटकाला जायचं का? यशवंतरावला प्रशांत दामले चे "गेला माधव कुणीकडे 'आहे, आता बारा वाजता, मग बाहेरच खाऊन येऊ '.
नाटक म्हणजे अंजलीचा जीव होता पण तिच्या नवऱ्याला नाटकाची ऍलर्जी. त्यामुळे तिचे नाटक पहाणे होतच नव्हते. ती म्हणाली 
"होय ताई, मला नाटक पहावेसे वाटते आणि प्रशान्त दमलेचे नाटक म्हणजे काय?"
ताईंनी "बुक माय शो 'aap वरुन दोन तिकिटे बुक केली आणि नाटकाला जायची दोघी तयारी करू लागल्या. स्मिताताई आणि अंजलीने नाटक पाहिलं. येताना हॉटेल अभिरुची मध्ये त्यानी बटरचिकन आणि रोटी खाल्ली आणि त्या चार वाजता घरी आल्या.   थोडावेळ लोळून स्मिताताई तिला म्हणाल्या "अंजु, तयार हो, आज तुला एका ठिकाणी नेते'. अंजली तयार होऊन दोघी निघाल्या. ताईंनी दिशा दाखवली त्या दिशेने अंजलीने गाडी नेली आणि तिला दिसली अंध शाळा. या ठिकाणी ताईंनी का आणले असा प्रश्न अंजली समोर आला. त्या दोघी त्या शाळेच्या पायऱ्या चढून वर गेल्या आणि तिथल्या व्यवस्थिपकांनी त्त्यांचे स्वागत केले आणि त्यान्च्या सह त्या दोघी एका हॉलमध्ये आल्या. त्या ठिकाणी चाळीस पन्नास अंध स्त्री पुरुष बसले होते. स्मिताताई त्या अंध लोकांनमध्ये मिसळल्या आणि प्रत्येकाची आस्थेने चौकशी करू लागल्य. मग त्या खुर्चीत बसल्या आणि त्यानी त्यान्च्या पर्स मधील पुस्तक काढले आणि त्या बोलू लागल्या 
"कादंबरी महाश्वेता मागच्या वेळी पान 120पर्यत ऐकली आता पुढील भाग....अंजलीच्या लक्षात आलं, या अंध लोकांसाठी ताई पुस्तक वाचन करत असणार. किती छान. ग्रेट, आपण असं काहीच केल नाही आजपर्यत. दिढ तास ताई कादंबरी वाचत होत्या आणि त्या हॉलमधील ते अंध बांधव आणि भगिनीं शांतपणे ऐकत होते. अंजली पण ऐकत होती. तिने ही कादंबरी वाचली होतीच पण आता ताईच्या मुखातून ऐकताना खूपच आनंद वाटतं होता. त्या विलक्षण अनुभवानंतर त्या दोघी घरी आल्या. अंजलीला आता स्मिताताई बद्दल खुप आदर वाटतं होता. रात्री दहीभात आणि तोंडाला पापड असे मस्त जेवणं झाले. मग रात्री दोघी गच्चीवर बोलत राहिल्या. स्मिताताई अंजूला आपले बालपण, कॉलेज, लग्न मग नवरा सासर या बद्दल बोलत राहिली. झोप आली तश्या त्या आपल्या खोलीत झोपल्या. रविवारी मग त्या मॉलमध्ये गेल्या. स्मिताताईंनी अंजलीसाठी ड्रेस मटेरियल, साडी घेतली, अंजलीने स्मिताताईच्या घरातील खिडक्यासाठी पडदे घेतले. सायंकाळी त्या दोघी अंध शाळेत गेल्या, तेंव्हा अंजली म्हणाली 
"ताई, आज कादंबरी मी वाचते, तेव्हडेच मला पुण्य '.
"अग वाच ना, नाहीतरी मंडळी माझा आवाज ऐकून ऐकून कंटाळले असतील, त्यांनाही बदल.
त्या दिवशी अंजलीने महाश्वेता कादंबरी वाचली. स्मिताताई तिच्या वाचनावर खूष झाल्या. दोघी घरी आल्या, स्मिताताईनी झटपट कपडे बदलले आणि प्रॉन्सबिर्याणी करायला घेतली. थोडया वेळाने त्यानी अंजलीला जेवायला बोलावले. अंजली जेवायला बसली.. मघापासून अंजली गप्पगप्प होती. स्मिताताईंनी तिला विचारले 
"अग तुला जेवायला बोलावले मी. तूझ्या आवडीची प्रॉन्सबिर्याणी केली आहे, लक्ष कुठे तुझा? अचानक गप्प का झालीस?
"ताई, माझ्या आवडीची प्रॉन्सबिर्याणी केलीत. दोन दिवस माझ्या आवडीचे जेवणं केलेत. मला फिरवलेत, नाटकाला नेलेत. अंध शाळेत नेऊन वेगळे विश्व् दाखविलेत. पण उद्या पुन्हा माझे रोजचे जीणे सुरु होणार. ताई, मी का आले होते दोन दिवस राहायला माहित आहे?
माझे वडील जाऊन दहा वर्षे झाली. आई सात वर्षांपूर्वी गेली आणि माझे माहेर संपले. आई होती तोपर्यत माहेरी जात होते आणि चार दिवस मनोसाक्त माहेर उपोभोगत होते. उशीरा उठत होते. हवे हवे ते आईला  बनवायला सांगून खात होते. केसाला तेल लाऊन घेत होते, सर्व प्रकारे लाड करून घेत होते. आई गेली आणि सर्व संपले. भावजय आहे ती मला घरात घेत नाही. माझ्या घरी सर्व आहे मोठे घर आहे. पैसे आहेत. नवऱ्याला चांगली नोकरीं आहे. मुलगा हुशार आहे. मी पण नोकरीं करते पण ज्या ठिकाणी दोन दिवस आनंदाने जावे ते माहेर नाही आणि जिच्या कुशीत शिरावे ती आई नाही. त्या दिवशी मी तुमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली कारण का कोण जाणे मला तुमच्यात माझी आई दिसली. तुम्हीही मला घरी आणलंत आणि लेकी सारखे माहेरपण दिलेत. प्रत्येक स्त्री आपल्या घरात कितीही सुखी समाधानी असली तरी तिला माहेरची आस असतेच. ती तिची हक्काची जागा असते. स्मिताताई, तुम्ही मला माहेर दिलंत, दोन दिवस मी माहेरी आल्यासारखं वाटलं.
"अग कधी वाटलं  तर ये इकडे, मला माझ्या मुलीसारखीच वाटतेस तू '
"हो, निश्चित येईन आणि तुमची मुलगी होईन. तुमच्यकडून लाड करून घेईन, पण ताई एक इच्छा होती.
"अग सांग ना.. त्यात विचारायचं काय?
"ताई, तुमच्या कुशीत झोपायच होत, आईच्या कुशीत झोपायची तशी.
"मग ये ना. माझी लेक असती तर नाही का आली असती? आणि आईच्या कुशीत झोपायचे म्हणतेस मग मला ताई का म्हणतेस? आई म्हणेनस. अंजली झेपावली आणि स्मिताताईच्या कुशीत शिरली, ताई तिला थोपटू लागल्या... मंद आवाजात किशोरी ताईचे गाणे म्हणू लागल्या 
"सहेला रे..... सहेला... सहेला..
   दोन मिनिटात अंजली मंद घोरू लागली. स्मिताताई जुने आठवू लागल्या, एक मुलगा झाला आणि नवरा पुरे म्हणाला. आपण अजून एक मुलगी हवी असं म्हणत होतो. नवरा ऐकेना. एक मुलगी हवीच प्रत्येक घरात. मुली शिवाय घर अपूर आहे. तिचे केस विंचरण, केसाच्या दोन शेपट्याना रिबीनी बांधणे. तिचे केस धुऊन देणे. तीच लग्न... बाळंतपण.. तीच माहेरपण करणं.. किती आनंद, समाधान असतो यात. आपली ती इच्छा अपुरी होती. आता आपणहून ही लेक आली घरात. आता तीचच माहेरपण करायच. अत्यन्त प्रेमाने स्मिताताईनी अंजूला जवळ घेतल.
         
प्रदीप केळुस्कर
 9307521152 / 9422381299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...