ज्ञानदा घरात शिरताच तिची आई तिला खूप उत्साहित स्वरात म्हणाली,
"पोरी नशीब काढलंस. अगं एका यशस्वी डॉक्टरचं स्थळ तुला चालून आले आहे. डॉक्टर अजित हे खूपच नामांकित स्त्रीरोग तज्ञ आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा टुमदार बंगला आहे. दारात दोन-तीन गाड्या आहेत. घरात ते आणि आई-बाबा इतकेच लोक आहेत. नोकर चाकर आहेत. अगदी राज्य करशील पोरी, सुखात राहशील." ज्ञानदा म्हणाली,
"अग आई मला घरात तरी येऊ दे. तुला इतका आनंद झालाय की आपल्या लेकीला भूक लागली आहे याचाही तुला विसर पडला का!"
"हो ग चल तू हातपाय धुऊन घे आपण एकत्रच जेवायला बसू."
जेवता जेवता तिची आई तिला म्हणाली,
"स्थळ खूपच चांगले आहे आपण हातातून जाऊ द्यायला नको. पण त्यांची एक अट आहे." ज्ञानदाने प्रश्नार्थक भुवया उंचावून आईकडे पाहिले. आई पुढे म्हणाली,
"त्यांची अट आहे की मुलीने लग्नानंतर नोकरी करू नये."
"आई लहानपणापासून मी जे ध्येय उराशी बाळगलं, जे स्वप्न पाहिलं त्याच्यावरच हा आघात आहे की ग. तुला सुद्धा माहिती आहे की मी स्वतः खूप उच्च शिक्षण घेऊन मराठीची प्राध्यापिका व्हायचं हे ध्येय लहानपणापासूनच बाळगलं आहे. तू आणि बाबांनी पण त्याला प्रोत्साहनच दिलं आहे."
"हो ग ते प्रथित यश डॉक्टर आहेत व त्यांच्या पत्नीने नोकरी केलेली बरं दिसणार नाही ना."
"नोकरी फक्त अर्थार्जनासाठीच केली जाते का? मला त्यात खूप आनंद मिळतो. माझं ज्ञान मी इतरांना देते त्यात अलौकिक समाधान आहे."
"अग पण त्यांच्या अटीचं काय. बाकी लग्न कसं करावं, मानपान याबद्दल त्यांचे काहीही म्हणणं नाहीये. आपण ज्या पद्धतीने लग्न करू ते त्यांना मान्य आहे."
"आई सर्व नक्की करण्याआधी मी डॉक्टर अजित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटू इच्छिते."
"भेटायला हरकत नाही पण कदाचित त्यांचं तुझ्याबद्दल प्रतिकूल मत होऊ शकतं."
"आई हे बघ कोणत्याही परिस्थितीत मी नोकरी सोडणार नाही आणि मी माझं म्हणणं त्यांना पटवून देण्यात यशस्वी होईन याची मला खात्री आहे."
"बघ बाई तू आणि तुझे बाबा काय ते ठरवा."
"बाबा माझ्या विचारांशी सहमत आहेतच हे तुला माहित आहे."
"ठीक आहे ज्यांनी हे स्थळ आणलं त्यांना मी फोन करून तुझी इच्छा सांगते."
दोन-तीन दिवसांनी डॉक्टर अजित यांच्याकडून ज्ञानदाला उद्याच्या रविवारी संध्याकाळी येऊन आम्हाला भेटू शकतेस असा निरोप आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्ञानदा त्यांच्या घरी गेली. घर कसलं एक सुंदर बंगला होता. बंगल्याची रंगसंगती आकर्षक होती. समोर फुलझाडे लावली होती. बाहेर सुंदर सागवानी झोपाळा होता. सर्वांनी हसून तिचं स्वागत केलं. थोडेसे बोलणे झाल्यावर डॉक्टर अजितचे बाबा तिला म्हणाले,
"बोल ज्ञानदा काय म्हणणं आहे तुझं. कोणताही आडपडदा न ठेवता जे काही असेल ते न घाबरता बोल." ज्ञानदा म्हणाली,
"मला जे सांगायचं आहे ते मी स्वतः जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते म्हणून मी इथे आले आहे. कृपया काही गैरसमज नसावा. मी मराठी विषय घेऊन एम ए केलं आहे. संतकालीन मराठी साहित्य या विषयात मला पीएचडी करायचं आहे." तिला मध्येच थांबवत डॉक्टर अजित म्हणाले,
" ज्ञानदा तुला पुढे कितीही शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस त्याला आमचा पाठिंबाच असेल.आमचं फक्त एवढेच म्हणणं आहे की तू नोकरी करू नये."
"मी नोकरी केवळ अर्थार्जनासाठी करत नाही तर उद्याच्या पिढीला मराठी भाषेविषयी प्रेम, आदर वाटावा, त्यांच्यात मराठीची पाळंमुळे रुजावीत म्हणून मी नोकरी करते. सध्या आपण सगळीकडे पाहतोय आपल्या मातृभाषेची खूपच गळचेपी होते आहे. मराठी शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होतोय . आपल्या मराठी मध्ये दर्जेदार साहित्य आहे परंतु हल्ली ते वाचणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. मराठीचा जागर सर्वत्र व्हावा अशी माझी आंतरिक इच्छा आहे. माझं कॉलेज सकाळच्या वेळेत असतं. त्यामुळे नंतरचा वेळ मी घरीच असेन. घरी राहून मी आईंच्या कामात हातभार लावेन, आल्यागेल्याचे बघेन त्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा." डॉक्टर अजितची आई म्हणाली,
" तुला इथे काही काम पडणार नाही. इथे सगळ्या कामांसाठी नोकर चाकर आहेत. तुझी इच्छा असेल तेव्हा तू स्वयंपाकघरात जाऊ शकतेस. पण सक्ती नाही. तुझे मराठी भाषेविषयीचे प्रेम जाज्वल्य आहे. आम्ही या दृष्टीने कधी विचारच केला नाही. आम्हाला पण आपल्या मातृभाषेविषयी कळकळ आहेच. तुझ्या नोकरी करण्याला माझा तरी काही विरोध नाही. काय हो तुमचं आणि अजितचं काय म्हणणं आहे." बाबा म्हणाले,
"ही आजच्या काळातील मुलगी असून सुद्धा मराठीचा जागर व्हावा म्हणून ती इतका प्रयत्न करतेय. तिच्या या कार्यात मी तिला मदत करेनच." डॉक्टर अजित म्हणाले,
"ज्ञानदा तुझा आम्हाला अभिमानच आहे. माझी निवड योग्य असल्याची मला खात्री पटली आहे. तुझं आमच्या घरात स्वागतच होईल." थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर ज्ञानदाने त्यांचा निरोप घेतला. रस्ताभर ज्ञानदाच्या मनात विचार येत होते हे खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. प्रत्येक मुलीला असा पाठिंबा देणारे लोक भेटतीलच याची काही खात्री नाही. अशावेळी त्या मुलींचा मानसिक कोंडमारा होतो याचा कोणी विचार सुद्धा करत नाही. आता ज्ञानदा तिच्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करू शकत होती.
ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार,
साहित्य उत्सव परिवार.
सीमा गंगाधरे,
प्रस्तुती : साहित्य उत्सव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा