एक पोस्ट वाचण्यात आली. ती अशी की, एकीकडे गाड्या आणि दुसरीकडे त्यांच्या किंमतीचे सोन्याचे किलोप्रमाणे प्रमाण दिलेले होते. खाली लिहिलेले होते. "आपके द्वारा खरीदी गई गाडी की किमत आज जीरो हो सकती है, सोने की नहीं||" सोन्याला अधिक महत्त्व असते अगदी शंभर टक्के मान्य करते.ती पोस्ट अगदी योग्य होती यात दुमत नाही.परंतु मी जरा वेगळ्या अर्थाने त्यावर विचार केला तेव्हा मनातून असे विचार पानात मांडले गेलेत. ते सगळ्यांनाच पटतील की नाही माहीत नाही.यात अपवादही असतील.
बघा हे कलियूग आहे आणि कलियुगात काळाप्रमाणे चालावे लागते. हे मानून चालले तर; सध्यघडिला सुविधांना अधिक प्राधान्य दिले जाते.कारण जीव असे मनसोक्त जगून घ्यावे असे आताच्या पिढीची रीत. आनंदाने मनोकल्पित इच्छा पूर्ण कराव्यात. ज्या आपण खूप वेळेला मारून टाकलेल्या असतात. ज्येष्ठ मंडळींचे यामागचे कारण कशाला वायफळ खर्च, कशाला वेळेचा अपव्यय, इतकीही काही गरज आहे का?" असे आपण आपल्या इच्छांना समजतो व इथेच इच्छा मारल्या जातात. ( एका जन्मात चांगल्या इच्छांची हौस, मौज करून) जगून घेणे हीच सध्याची तरूण मुलांची पिढी. ती जगण्याचा आधार घेत जगत आहेत. त्यांच्या मते वर्तमानातला आनंदच भविष्यातल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचे द्योतक आहे. असे तरूण मानतात. कधी कधी त्यांचे हे वागणे बघून "आम्ही तर कधीच असा उधळमानकेपणा कधीच केला नाही. किंवा मनातल्या इच्छांना मारून पै,पै जोडून ठेवली म्हणून आज सुखाचा घास खातो आहोत. अमूक तमूक ...!!" बोलून ज्येष्ठांनो तुम्ही त्यांच्या समोर नकळत का होईना मुलांच्या मनाला लागेल असे बोलून जातात. खरे सांगायचे तर रोजचा दिवस मनातील अपेक्षित इच्छांना प्रत्यक्षात आणून त्या सुखाने जगून घ्यायच्या ही आताची पिढीची रीत झालेली आहे. मी असे अजिबात म्हणत नाही की, उठ सुट काहीही, कुठेही खर्च करा किंवा खिशाला पेलणार नाही इतका किंवा डोक्यावर उधारी होईल इतकाही खर्च करा अथवा इच्छांच्या आहारी जा. असे अजिबात करू नये, करता कामा नये. एक जुनी म्हण आहे, "आय राखून खर्च करावा." जुन्या पिढीने तो नियम खरंच पाळलाय. परंतु एकच सांगावेसे वाटते की, आजच्या मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार वागले तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा आम्ही तर असे जगलोच नाही तुमच्याच भविष्याचा विचार करून इच्छांना मारले असे रडगाणे गाऊ नका. त्याने मुलांना काहीच फरक पडणार नाही.
उलट तुम्ही जगला नाहीत म्हणून आम्ही सुद्धा आनंद घ्यायचा नाही का? असा ते तुम्हाला प्रश्न करू शकतात. इथे फक्त एकच कळकळीने सांगणे आहे की, पुढच्या पिढीसाठी पै पैशाचा संचय जरूर करावा पण तो इतकाही नाही कि त्याने ते आळशी होतील. कष्टाने कमावण्याची संधी त्यांनाही द्यावी हे यामागचे सढळ कारण. सगळ्याच सुखसुविधा जमवून ठेवल्या तर पुढची पिढी आयते मिळाल्याने, आयधी होऊ शकते. असे माझे वैयक्तिक मत आहे. उरलेल्या आयुष्यात मागे राहिलेल्या मनोकामनांना प्रत्यक्षात आणा. वयानुसार जो ही आनंद घेऊ शकतात तो जरूर घ्या. अहो !! काय सांगावे? करू-करू म्हणत करायचेच राहून जाईल. वरती गेल्यावर मग मागचे म्हणतात, "त्यांच्या की नाही, काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून पिंडाला कावळा शिवला नसेल." असे म्हणतोच ना ! तर असे होता कामा नये म्हणून उतारवयात तरी बायकोच्या, तुमच्या स्वतःच्या ज्या काही + अल्पशाच असणार ( इच्छा उपभोगायच्या राहिलेल्या असतील त्या पूर्ण करायच्या तयारीला लागा बरं..!! तयारीला म्हणजे, अगदी लगेच पूर्ण करायला घ्या. उठा तुमची उमेद अजून संपलेली नाही...अहो. "सर सलामत तो,पगडी पचास..!!"आता वेळ दवडून चालणार नाही. पटतंय ना !! ज्येष्ठांनो घ्या हो मनसोक्त आनंद जीवनाचा, लुटा या अनमोल क्षणांना. हे अनुभवताना एकमेकांच्या चेहऱ्यावरचे क्षण टिपा मग बघा जे आजवर देऊ शकलेलो नाही ते एका सुखद क्षणांनी मिळून गेलेय. काय म्हणता? अहो..सुक्ष्म नजरेने टीपा की, आजवर तिच्या/ त्यांच्या चेहऱ्यावरचा पाहायचा राहून गेलेला खराखुरा आनंद. स्थिरस्थावर मालमत्ता याला सुद्धा म्हणायला काय हरकत आहे...हो..ना..!! अहो कोणी काय सांगावे, उद्याचे?
आता मात्र एक दीर्घ श्वास घेऊन उठा..! एकटे असो वा दुकटे मनातलं पानात मांडाआणि घ्या आयुष्याचा चिदानंद. एकमेव मनुष्य योनीत जन्माला येण्याचा हाच तर चिरकाल टिकणारा सेतू. पुढचा जन्म कोणी पाहिलाय का हो? जन्मलोच तरी तो आठवणार आहे का? नाही ना !! मग? एक कायम लक्षात ठेवा. शेवटी काय तर जन्माला येऊन "वयाने जगायचे, विवादाने नाही."
माझ्या बकेट लिस्टनुसार पती-पत्नीची व्याख्या अशी आहे. "पती+पत्नी =पंचायतन". {"पाच अंगाचा विचार करून, आय राखून, तनाला सुदृढ ठेवणे." } या अनुषंगाने विचार करून चाललात तर गरीब असो वा श्रीमंत जीवन सार्थकी होईल. कारण; आपले छत्र आपल्यालाच शाकारायचे असते. कुणीही कितीही त्यात ढवळाढवळ केली तरीही त्याचे मोजमाप अखेर किती ठेवायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. सल्ले देणारे क्षणभरासाठी असतात, ऩतर ते ढुंकूनही पाहत नाहीत हे लक्षात घ्यावे. तेव्हा ते छत्र सुखासमाधानाने कसे डोईवरती कायम जपता येईल हे पहावे. यज्ञकर्माला आलिंगन देऊन मनसोक्त शतायुष्यासारखे जगून घ्या. यातच खऱ्या स्वानंदाची शाश्वत वाटीका रुजलेली आहे.
सौ.प्रज्ञा कुलकर्णी
# राज्ञी
{दैनिकात प्रकाशित लेख}
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा