मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1417. जीवन आनंद - जॉन अंकल

       साधारण पणे ५ वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. अमेरिकेतून भारतात परत यायला निघालो होतो. लुफ्तान्साची फ्लाइट होती. सॅन फ्रान्सिस्को ते फ्रँकफर्ट  आणि पुढे फ्रँकफर्ट ते मुंबई असा प्रवास होता. तिकीट अर्थातच इकॉनॉमी क्लासचे. आम्ही दोघेही पती पत्नी बरोबर होतो. पण विमानात सीट्स काही शेजारी शेजारी मिळाल्या नाहीत. पुढे मागे मिळाल्या. पुढच्या रांगेत सौ बसल्या, मागच्या रांगेत मी बसलो. थोड्याच वेळात एक जाडजूड  अमेरिकन माझ्या शेजारी येऊन बसला. वय असेल साधारणपणे साठीच्या आसपासचे. केस पांढरे पडू लागलेले , दाढीचे खुंट वाढलेले पण चेहेरा तजेलदार आणि थोडा मिस्कील सुध्दा. अंगात एक ढगाळ , गुढग्याच्या थोडीशी खाली जाणारी बर्म्युडा पॅन्ट , ढगाळ टी शर्ट , पायात चपला, पाठीवर भली मोठी सॅक. सॅक वरच्या ओव्हरहेड लगेजमध्ये टाकून माझ्या शेजारच्या सीटवर बसकण मारली . हाय हॅलो झाले. त्याचा चेहेरा कुठेतरी पाहिल्याचे मला वारंवार वाटू लागले. पण कुठे पहिले आठवत नव्हते . विमानाचे बोर्डिंग झाले, पुशबॅक झाले. विमानाने हळू हळू रनवे च्या दिशेने टॅक्सिंग करायला सुरवात केली आणि एकदम माझी ट्यूब पेटली. मी त्याचा फोटो फोर्ब्स मासिकात बघितला होता. जगातील सगळ्यात  श्रीमंत, म्हणजे अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव बघितले होते. एवढा श्रीमंत माणूस विमानाच्या इकॉनॉमी क्लासने कशाला प्रवास करेल. ते बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने आरामात प्रवास करू शकतात. मला वाटलं माझी काहीतरी चूक होत असेल म्हणून मी गप्प बसलो होतो पण मनाची चुळबुळ चालू होती.  
      विमानाने टेक ऑफ घेतला. विमान हवेत स्थिर झाल्यावर मी आपणहून त्याच्याशी बोलणे सुरु केले. सहसा अमेरिकन माणसे बोलत नाहीत . घुमी असतात. पण हा अमेरिकन चांगलाच बोलणारा निघाला. तुम्ही कोठे जात आहात असे त्याने विचारल्यावर ‘ भारतात ‘ असे उत्तर दिले. ‘इंडिया इज ग्रेट कंट्री ‘तो म्हणाला त्यामुळे जरा बरे वाटले. माझ्या मनातील शंका मला गप्प बसू देत नव्हती. शेवटी माझ्या मनातील शंका विचारण्याचे धाडस मी केलेच. ‘हो मी तोच आहे, पण हे कोणाला सांगू नका’ त्याने मिस्किलपणे उत्तर दिले.  
‘तुम्ही कोठे निघालात?’ मी प्रश्न केला.  
‘केनियाला’ त्याने उत्तर दिले. केनिया एक आफ्रिकन कंट्री. तिथे याचे काय काम असेल? मला प्रश्न पडला. 
इतका धनाढ्य माणूस विमानाच्या इकॉनॉमी क्लासने,  इतक्या साध्या कपड्यात, आफ्रिकेतील एका मागासलेल्या देशात निघाला होता. मला काही ते पचनी पडत नव्हते. पण विचारायची सोय नव्हती. कारण अमेरिकन लोकांना चांभार चवकश्या आवडत नाहीत. मी मंडळी फार रिझर्व्ह्ड असतात. पण त्याने माझ्या मनातील प्रश्न ओळखला ! 
‘केनियाची राजधानी नैरोबी पासून ५० मैलांवर एक छोटे गाव आहे. त्या गावात एक छोटे चर्च आहे. त्या चर्च तर्फे एक छोटी शाळा चालवली जाते . त्या शाळेत गरीब स्थानिक मुले येतात . मी त्या मुलांना फूटबॉल शिकवायला जातो. मस्त मजा येते’ तो अमेरिकन मला सांगू लागला. ‘मस्त मजा येते’ हे सांगताना त्याचे डोळे अश्या काही आनंदाने चमकत होते की जणू काही त्याला तेथे मोठे घबाड मिळाले असावे.  
‘फुटबॉल! म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळता का?’ मी काहीतरी विचारायचे म्हणून विचारले. (अमेरिकेत फुटबॉलला सॉकर म्हणतात)
‘होय तर ! शाळेमध्ये असताना मी चांगला सॉकर प्लेअर होतो. शाळेच्या टीमचा कॅप्टन पण होतो. पण पुढे पैसे कमवण्याच्या ‘रॅट रेस ‘ मध्ये अडकलो आणि माझा छन्द विसरूनच गेलो. काही वर्षांपूर्वी काही आफ्रिकन मंडळी माझ्याकडे एका शाळेसाठी डोनेशन मागायला आली होती. मी त्यांना सहज म्हणालो की मी तुमच्या शाळेला भेट द्यायला आलो तर चालेल का ? फक्त त्यांनी माझे नाव कोणाला सांगायचे नाही अशी अट ठेवली. ती त्यांनी मान्य केली. माझे साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग ला मोठे ऑफिस आहे. तेथे १० हजार लोक काम करतात. माझ्या कम्पनीत एकूण दीड लाख लोक काम करतात. मी जेव्हा जोहान्सबर्ग च्या ऑफिसला व्हिजिट द्यायला गेलो होतो तेव्हा वेळात वेळ कडून मी नैरोबीजवळ असलेल्या या शाळेला भेट द्यायला गेलो. मला तर ती शाळा आवडलीच पण तेथे काही लहान मुले फुटबॉल खेळताना दिसली. ती  मुले पायात काहीच न घालता अनवाणीच फुटबॉल खेळत होती. मी पण त्यांच्या बरोबर फुटबॉल खेळायला लागलो. फक्त एक तासासाठी गेलेला मी चांगला सहा तास रमलो. मुलांबरोबर मस्त धमाल केली. मी मुलांना काही गोष्टी पण सांगितल्या. त्या मुलांना किती कळल्या ठाऊक नाही पण मुले कान देऊन माझ्या गोष्टी ऐकत होती. मला खुप मजा आली. मग मी सरांना विचारले की मी दर वर्षी या मुलांना फुटबॉल शिकवायला आलो तर चालेल का ? मी स्व खर्चाने येईन व स्व खर्चाने जाईन. माझी फक्त राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था त्यांनी करायची. त्याला ते कबूल झाले’  
तशी अमेरीकन माणसे अबोल! रस्त्यात भेटले तरी हाय हल्लो पलिकडे बोलणार नाहीत! माझ्यासारख्या एशियाई देशातून आलेल्या माणसापासून तर चार हात दूरच. पण हा अमेरीकन बाबा भलताच वेगळा निघाला. वेळ मिळेल तसा, अधून मधून छान गप्पा मारत होता. आश्चर्याचे धक्क्यावर धक्के देत होता.  
नेहमी विमानाच्या बिझनेस क्लासने किंवा फर्स्ट कलासने प्रवास करणारा, स्वतःचे खाजगी जेट विमान असणारा या माणसाला विमानाच्या इकॉनॉमी क्लासचा प्रवासच आवडत होता. विमानाच्या बिझनेस क्लासचा आणि फर्स्ट क्लासचा याला उबग आला होता. लक्झरी गाड्यांचे फ्लिट असलेल्या या माणसाला नैरोबी ते 50 मैल अंतरावर असलेल्या गावाचा, कच्या रस्त्यावरून खटारा गाडीत केलेला प्रवास जास्त सुखावह वाटत होता. जगभरातील अनेक महागड्या पंच तारांकित हॉटेलात पुख्खा झोडणारा माणसाला नैरोबी जवळच्या त्या खेड्यातले, चुलीवर शिजवलेले आणि ऍल्युमिनियमच्या थाळीतून दिलेले जेवण जास्त रुचकर, आरोग्यवर्धक आणि हायजनीक वाटत होते. अमेरिकेत १२ घरे असलेल्या आणि स्वतःचे घर पॅलेस सारखे असताना त्याला नैरोबी जवळ असलेल्या खेड्यातील टीचभर असलेल्या खोलीतल्या मोडक्या तोडक्या बेडवर सुखाची झोप लागत होती. आपल्या कंपनीतल्या दीड लाख कर्मचाऱ्यांपेक्षाही त्या खेडेगावात त्याची आतुरतेने वाट पहाणाऱ्या मुलांचे आणि माणसांचे याला जस्त अप्रूप वाटत होते. ऐकावं ते नवलच !  
‘किती दिवस तुमचा हा प्रयोग चालू आहे?’ काहीतरी विचारायचे म्हणुन मी विचारले. 
‘दहा वर्षे!’ त्याने उत्तर दिले. 
‘वर्षातून एक महिना मी चक्क रजा घेतो. या महिन्यात मी कुठे गायब असतो हे माझ्या पर्सनल सेक्रेटरी शिवाय कोणालाही ठाऊक नसते. एक महिना मी या गावात जाऊन रहातो. तिथे मी मुलांना फूटबॉल शिकवतो. त्यांना गोष्टी सांगतो, गाणी म्हणतो. त्या गावातील लोकांच्यात मिसळतो. हा एक महिना मी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, टि.व्ही, पासून दूर असतो. या गावातील लोक तसे गरीब, साधे आणि सरळ स्वभावाचे आहेत. पण अत्यंत हुषार आणि मेहेनती आहेत. गरिबीत नव्हे तर कमीत कमी रिसोर्सेस आणि फॅसिलिटीज मध्ये कसे आनंदाने आणि समाधानानाने रहायचे, प्रगती करायची हे या लोकांपासून शिकायला मिळते. इकॉनॅमी म्हणजे काय असते या लोकांना जेवढे समजते तेवढे कोणालाही समजत नाही. मी लाखो डॉलर्स पगार देऊन अनेक अर्थतज्ञ माझ्या कंपनीत नोकरीवर ठेवले आहेत. पण ते सगळे पोकळ आहेत. खरे अर्थतज्ञ ही मंडळी आहेत. मला दर वेळी यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते. मी येथे फुल्ली चार्ज होतो. अमेरिकेत जाऊन नवीन एनर्जीने कामाला सुरवात करतो. त्या लोकांना एव्हडेच माहीत आहे की एक अमेरिकन बाबा दर वर्षी त्यांच्या गावात फुटबॉल शिकवायला येतो.’ 
आता विमान फ्रँकफर्ट जवळ येत चालले होते.  विमान प्रवासाचा वेळ कमी कमी होत चालला होता. पण अधुन मधुन गॅप्स घेत गप्पा चालूच होत्या. 
‘आपण काय करतो रिसोर्सेच्या मागे लागतो. फॅसिलिटिजच्या मागे लागतो. पैसा, संपत्तीच्या मागे पळतो. पण शेवटी मिळते काय तर असमाधान, टेन्शन. आपण जणु काही समाधान हा शब्दच विसरून गेलो आहोत. जणुकाही हा शब्द आपल्या डिक्श्नरीतुन गायबच झाला आहे.’ 
हे मला कोण सांगत होत? तर स्वतःची अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असलेला माणूस सांगत होता. पैशाच्या, संपत्तीच्या फार मागे लागू नका असे सुचवत होता. थोडक्यात दारू पिणार्‍या माणसाने दारू पिऊ नये असा उपदेश करण्यासारखेच होते. मी पण गंमतीत त्याला तसे म्हणालो खरा, पण उगीचच आपण बोललो असे वाटू लागले. कारण अमेरिकेतले गर्भ श्रिमंत काय किंवा इतर ठिकाणचे गर्भ श्रिमंत काय, ही मंडळी फार व्हिमजिकल असतात, विचित्र स्वभावाची असतात, फार ईगोइस्टिक असतात असे अनेक ठिकाणी वाचले होते. या लोकांची मर्जी राखणे, यांचा मूड संभाळणे कधी कधी फार कठीण जाते. कधी यांची खप्पा मर्जी होईल सांगता येत नाही. अर्थात या अमेरिकन माणसाच्या खप्पा मर्जिशी मला काही देणे घेणे नव्हते. पण आपण उगिचच पुणेरी शालजोडीतला त्याला का हाणला असे वाटत होते. 
पण त्याने ते स्पोर्टिंगली घेतले. माझे बोलणे ऐकून तो प्रसन्नपणे हसला. ‘ यु आर राईट! तुम्ही बरोबर बोललात! पण मी तुम्हाला एक गंमत सांगु? मला मिळालेली संपत्ती हे बाय प्रॉडक्ट आहे. एका विशिष्ट ध्येयाने मी बिझनिसमध्ये आलो. आज माझ्यावर मोठ्या जबाबदार्‍या आहेत. त्या पार पाडता पाडता दमछाक होते. पैसे मिळवणे किंवा संपत्ती मिळवणे हे काम काही फार सोपे काम नाही. या साठी अनेक कुर्बान्या द्याव्या लागतात. मी पण दिल्यात. पण यामध्ये खरे समाधान मिळत नसते हे सत्य समजायला मला अनेक वर्षे लागली. याचा अर्थ कोणी पैसा किंवा संपत्ती मिळवू नये असा होत नाही. गरजेपुरता पैसा आणि संपत्ती प्रत्येकाने जरूर मिळवावी. पण आपली गरज किती आहे हे ओळखावे. उगीचच गरजा वाढवत बसू नये !’ 
आता विमानाच्या लँडिगच्या तयारीला सुरवात झाली होती. आता थोड्याच वेळात आम्ही फ्रँकफर्टच्या विमान तळावर लॅन्डींग करणार होतो. 
‘माझी खरी अचिव्हमेन्ट काय आहे सांगू?’ तो अमिरेकन म्हणाला. 
‘माझी कंपनी, माझी संपत्ती ही माझी खरी अचिव्हमेन्ट नाही. पण माझ्या आफ्रिकेतल्या शाळेतील दोन मुले स्व कर्तुत्वावर अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आली आहेत. त्यांना मी काहिही मदत केलेली नाही. त्यातील एकाला तर कॉलेजच्या फुटबॉल टिममध्ये प्रवेश पण मिळाला आहे. याचा मला अभिमान आहे. ही मुले मला लॉस एंजलसला भेटायला येत असतात. मी अजुनही त्यांना माझी खरी ओळख सांगीतलेली नाही. अजुनही मी त्यांच्यासाठी जॉन अंकलच आहे. मी पण त्यांना कुठेतरी धाब्यावर किंवा कॉफी शॉपमध्ये भेटायला जातो. चक्क पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो. माझे बंगले, गाड्या, विमाने सगळे गुंडाळून ठेवतो. तास दोन सात गप्पा होतात. वेळ मस्त मजेत जातो.’ 
विमानाचे आता लँडींग झाले होते. आम्ही पॅसेन्जर्स हातात सामान घेऊन विमानातून उतरण्यासाठी रांगेत उभे होतो. 
‘तुम्ही पण ट्राय करून बघा’ तो अमेरिकन मिस्कीलपणे म्हृणाला. ‘याला खर्च फार येत नाही पण जो आनंद आणि समसाधान मिळते ते अमुल्य असते’. 
फ्रँकफर्टच्या विमान तळावर हो आम्हाला हाय करून नैरोबीकडे जाणार्‍या विमानासाठी निघुन गेला. माझी खात्री आहे की हे जॉन अंकल अजुनही न चुकता दर वर्षी आफ्रिकेतील त्या खेड्यात जात असातील. असे जॉन अंकल काही फक्त अमेरिकेतच नाहीत तर आपल्या देशात पण आहेत. आपल्या आजुबाजुला पण आहेत. पण हे सगळे छुपे रुस्तम आहेत. त्यांना शोधायचा प्रयत्न करू नका. त्यांच्या आनंदावर विरजण पाडू नका.

उल्हास हरी जोशी., कोथरूड ,पुणे 
मो :- ९२२६८४६६३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...