मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1433. बाटली मधली गंमत

     त्यादिवशी पुन्हा त्या घरातून संगीता काकुच्या ओरडण्याचा आवाज आला. पण यावेळी तिचा आक्रोश भयंकर होता. सगळी गल्ली तिच्या दारात जमा झाली. मी त्यावेळी आठवीच्या वर्गात होतो. मी सुद्धा त्या गर्दीत आपली जागा धरून आता डोकावून पाहू लागलो. काही बायका आत गेल्या आणि संगीता काकूला घेऊन बाहेर आल्या. काकुच्या ओठातून रक्त येत होतं. डोळा सुजलेला दिसला. तिचा नवरा रमेश काका रोज दारू पिऊन तिला त्रास द्यायचा. पण आज त्याने हद्द पार केली होती. माझ्या आईने संगीता काकूला आमच्या घरी आणली.झा लेल्या जखमेवर हळद लावली. थोडावेळ काकू बसली आणि रमेश काका बाहेर गेलेला बघून तिच्या घरी गेली.
     काका दारू पिऊन आला की ती थरथर कापायची. काकाचा आवाज वाढलेला असायचा. पण काकू पेक्षा काका अंगाने लै बारीक होता. काकूने एक जरी दणका दिला तर काका जिवंत राहीलच याची शक्यता फार कमी. अशी त्याची अवस्था. पण काकुच त्याला घाबरायची आणि माझ्या डोक्यात एकच यायचं की दारूत लै ताकद असली पाहिजे. कधी कधी काकाने फेकून दिलेली बाटली मी हातात घेऊन एकटक पाहत बसायचो. एवढ्याश्या बाटलीत काका वाघ कसा होत असेल याचे नवल वाटायचे. काकुची अवस्था बघवत नव्हती. रोज मार खाऊन खाऊन पार सुकून चालली होती.  
एक दिवस काका घरात नसलेलं बघून मी काकूला बोललो.
”कुठवर हे असं सहन करत राहणार आहेस काकू.?” 
तेव्हा काकू म्हणाली,”काय करणार बाबा त्याच्या दारू म्होरं माझं काय बी चालत नाही.”
मी लगेच म्हणलं, “मग तू पण पी दारू.” त्यावर ती लै खळखळून हसली आणि माझ्याकडे एकदम शांतपणे पाहत बोलली,
” बाईला दारू पिता आली असती तर किती बरं झालं असतं? लोकं काय म्हणतील,तू बी उगाच काहीही बडबड करतो..” 
मी लगेच म्हणलं,” रोज गुरागत मार खाताना लोकं येतात का तुला वाचवायला?" 
काकू शांत बसली. मी लगेच म्हणलं, 
“एकदा पिऊन तर बघ, बघू काय होतंय. तुलाही ताकद येईल आणि काका घाबरून तुला मारायचं बंद करील.” डोकं खाजवत ती माझ्याकडे एकटक बघू लागली. तिचा हात मी घट्ट दाबून धरला आणि म्हणलं,
”होऊन जाऊ दे एकदा काकू काय ते.”
   काकू मला म्हणाली, कुठं मिळते दारू? कितीला असते? मी म्हणलं ते मी बघतो. काळजी करू नकोस आणि मी ताडकन उठलो. पै पाहुण्यांनी दिलेले पैसे मी साठवून ठेवले होते. ते बाहेर काढले. गावात गेलो. देशी दारूच्या दुकानात घुसलो आणि एक बाटली घेतली ती बी देशी..
     संध्याकाळचे पाच वाजले होते.मी खिशात घालून आणलेली बाटली हळूच काकूला देऊन घरी आलो आणि आता काय होणार याची वाट पाहू लागलो. आमची आठ वाजता जेवणं झाली. सगळी गल्ली शांत होती आणि साडे आठ वाजता त्या घरातून काकाचा ओरडण्याचा आवाज आला. असा पुरुषाचा बोंबलण्याचा आवाज मी आयुष्यात आजवर ऐकला नव्हता. सगळी गल्ली अगदी लहान पोरं घेऊन काही गरोदर बायका सुधा पोट सांभाळत पळत पळत जागेवर हजर झाल्या. मी गर्दीतून वाट काढत पुढं झालो आणि पाहतो तर काय? रमेश काका खाली पडलेला. काकू त्याच्या छातीवर पाय देऊन उभी आणि आजवर तिच्या तोंडात कधी अभद्र शब्द आलेला नव्हता. पण अस्सल शिव्या घालून ती रमेश काकाला तुडवत होती. तिचं ते रूप पाहून मी थरथर कापायला लागलो. हळूच दारातून डोकावून आत बघितलं. ती बाटली ताकद देणारी बाटली कुठं दिसतेय का हे पाहत होतो. पण काकुन बाटली फोडली होती. सगळ्या खोलीत काचा पसरलेल्या होत्या. काकाच्या तोंडातून रक्त निघायला लागलं. सगळी माणसं शांतपणे बघत होती. कुणाचं धाडस झालं नाही मध्ये जायचं.
    काकूने काकाला बराच वेळ तुडवला. काका बेशुद्ध पडला. मग काकू शांत झाली. सगळी माणसं आपल्या आपल्या घरी जाताना काकूला नमस्कार करून जात होती. काकू माझ्याकडे एकटक पाहू लागली. मी लै खुश झालो होतो. घरी आलो आणि झोपून गेलो.
    दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून मी दात घासत बसलो होतो. तर काकू दारात हजर झाली. माझ्या आईला तिने हाक मारली. आई बाहेर आली. काकूने आईकडे लसूण मागितला. हातात लसूण घेऊन जाताना तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला. तासाभराने मी तिच्या घराकडे वाकून बघितलं तर रमेश काका शांतपणे सायकल काढून कामाला निघालेला होता. काकू त्याच्या हातात जेवणाचा डब्बा देत होती आणि काका तिला म्हणत होता “घरातच बस बर का. बाहेर जाऊ नकोस. मी संध्याकाळी येताना तुला खायला घेऊन येईल. आता मी दारू पिणार नाही म्हणून गळा चिमटीने धरून बोलत होता. काका शांतपणे सायकल घेऊन निघून गेला आणि काकूने हसत माझ्याकडे  तिरक्या नजरेने बघितलं आणि चार बोटं आत दुमडून अंगठा वर करत एक डोळा हळूच बारीक केला.   तेव्हापासून त्या घरातून कुणाच्याच ओरडण्याचा आवाज आला नाही.नंतर हळूहळू लहान मुलांचा मात्र रडण्याचा आवाज येत राहिला. दारूनेच दारूचा काटा काढला आणि संसार सुखाचा झाला.

लेखक.नितीन चंदनशिवे
कवठे महांकाळ 
सांगली.
70209 09521 
( लेखक दारूचे समर्थन करत नाही. मनोरंजन म्हणून हल्क्यात घ्यावे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...