मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1429. पर्फेक्ट !

      समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या एका लहानशा गावात एक छान ब्युटी सलून होतं, ‘स्टाईल्स’ नावाचं! गावातले बहुतेक लोक त्या सलूनमधे जात असत. एकावेळी किमान दहा-बारा स्रिया-पुरूष-मुलं वेटिंग रूम मधे कटिंग, फेशियल, कमानदार भुवया वगैरेसाठी बसलेले दिसत. एका लग्नासाठी केस सेट करून घ्यावेत, म्हणून उषा ‘स्टाईल्स’मधे पोहोचली. वेटिंग रूम मधले बहुतेक लोक फोनमधे डोकं खुपसून बसले होते. तेवढ्यात धाडकन दार उघडून एक उंचापुरा तरूण आत आला. गुडघ्यांवर फाटलेली जीन्स व आकाशी रंगांचा टी शर्ट घातलेला तो युवक पंचवीसेक वर्षाचा असावा. उंची सहा फूट व देहयष्टी एखाद्या मॅरेथॅान रनर सारखी दिसत होती. त्या देखण्या तरूणानं सुरूवातीचे तीस सेकंद शांत बसल्यावर स्वत:शीच काहीतरी बोलायला सुरूवात केली. काहीतरी गडबड आहे, हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
उषा त्याच्याकडे बघत म्हणाली, ”एरिक ना तू?”
एरिकनं चमकून तिच्याकडे बघितलं व पळत येऊन तिला मिठी मारली… 
“किती दिवसांनी भेटलीस, मिस उषा!” तो म्हणाला.
उषाला दहावीतला एरिक आठवला… तिच्या गणिताच्या क्लासमधे सतत स्वत:शी किंवा इतरांशी बोलणारा. किती वेळा सतत बडबड करण्याबद्दल तिनं त्याला प्रिन्सिपॅालकडे पाठवलं होतं… पण काही फरक पडत नसे.
‘ऑटिझम’ असलेला एरिक खरतर फार प्रेमळ होता. बुध्दी उत्तम होती पण फोकस नव्हता. त्याला शांत बसताच येत नसे. मुलं त्याला ‘वेडा’ म्हणत. त्याची चेष्टाही करत पण तो फारसं मनावर घेत नसे.
“मिस उषा, कशी आहेस? तुला मागे गुडघेदुखीचा त्रास होता, तो कमी झाला का?”
उषा आश्चर्यानं हो म्हणाली.
तेवढ्यात सलूनमधे आलेली तीन वर्षाची मुलगी पळताना पडली आणि किंचाळून रडू लागली. हा घाईघाईनं तिच्याजवळ गेला व म्हणाला, 
“हे बघ, मी पण पळताना नेहमी पडतो... असा...” 
त्यानं पडून दाखवलं व रडूनही दाखवलं. ती मुलगी त्याचं पडणं व नाटकी रडणं बघून खुदकन हसली. तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला, 
“हे बघ चित्राचं पुस्तक. आपण रंगवुया का हे चित्र?” 
दोघं चित्र रंगवू लागले. एका आजोबांना कटिंग चालू असताना खोकल्याची उबळ आली. एरिकनं मधे उठून घाईनं त्यांना पाणी दिल व तो परत चित्र रंगवू लागला. आता एरिकची नजर एका पस्तिशीच्या तरूणाकडे गेली. 
“तुला ‘टेस्ला’ या इलेक्ट्रीक कार बद्दल काय वाटतं?” एरिकने विचारलं. 
‘टेस्ला’च्या चर्चेत ते काहीवेळ रंगून गेले. आता एरिक एका सत्तरीच्या आजींना आत येताना बघून म्हणाला, 
“हॅलो आजी, मी एरिक ! कुठे दिसली नाहीस बऱ्याच दिवसात !”
“माझा नवरा गेल्यापासून मी फारशी बाहेर जात नाही.” आजी त्याला काहीतरी सांगत होती.
“माझी आई मी दोन वर्षाचा असताना गेली.” एरिक म्हणाला.
डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली, “माहितीये मला, एरिक! I am so sorry. तुझे आजोबा अचानक गेले. आम्ही चाळीस वर्षाचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. खूप लोक आले होते. त्याच दिवशी रात्री तो हार्ट अटॅक येऊन गेला.”
“अरे छान आहे की ! आयुष्यातला महत्त्वाचा दिवस साजरा करून सर्वांना भेटून जाणं ! ” एरिक म्हणाला 
“माझी आई कार ॲक्सिडेंट मधे गेली. कारण तिचं आयुष्य तसंच जायचं होतं. त्यात आपण काही बदलू शकत नाही, असं माझे बाबा म्हणत. पण आता जी आई मिळाली आहे मला, ती खूप चांगली आहे !”
वेटिंग रूममध्ये फोनमधल्या माना वर झाल्या होत्या. सारे नि:शब्द होऊन एरिकचं बोलणं ऐकत होते. त्याला त्याचं काही नव्हतं. तो आत आलेल्या एका पाच वर्षाच्या मुलाला इलेक्ट्रीक कार कशी चालते, हे सांगण्यात मग्न होता.
उषाची हेअर स्टाईल झाली होती. ती पैसे देत असताना एरिक म्हणाला, “मिस उषा, you look so beautiful!“
उषा ‘थॅंक्यु’ म्हणाली व तिनं एरिकला विचारलं, 
“कसे आहेत बाबा?”
“बाबा गेले” हळू आवाजात तो म्हणाला, “त्यांनी चुकीनं औषधाच्या जास्त गोळ्या घेतल्या व त्यात ते गेले. डॅाक्टरांनी खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. हे असच घडायचं होतं. आपण काही बदलू शकत नाही !”
उषाला काय बोलावं कळत नव्हतं. 
एरिक म्हणाला,“मिस उषा, मी गावातल्या वृध्दाश्रमात काम करतो. त्या लोकांना माझं बोलणं खूप आवडतं. ते मला कधीही बोलू नको म्हणत नाहीत. उलट, ‘बोल…’ म्हणतात. मी मॅरेथॅान पळतो, तेव्हा ते मला सपोर्ट करायला येतात. मी त्यांना त्यांचा मुलगा वाटतो!” एरिक अभिमानानं म्हणाला.
“Eric, I am so proud of you… तू किती करतोस रे इतरांसाठी! मी पण येईन तुझ्या मॅरेथॅानला! एरिक, तू क्लासमधे सतत बोलायचास, म्हणून मी तुला कायम प्रिन्सिपॅालकडे पाठवलं. I am sorry!” उषा न राहवून म्हणाली.
“मिस उषा, मला हायपर एडीएचडी आहे..मला कंट्रोल होत नाही बोलणं थांबवणं… actually I am sorry.” जरा थांबून तो म्हणाला, “मला सगळे ‘focus कर’ किंवा ‘pay attention’ सांगायचे पण माझ्यासारख्या मुलांचा फोकस आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत एवढा जास्त असतो… म्हणून तर आम्हाला हवं त्यावर कधीच फोकस करता येत नाही. डॉक्टरच म्हणाले असं !”
उषाला भरून आलं. या मुलाला वेडा का म्हणायचं? जगाला याच्यासारख्याच लोकांची जरूर नाही का?  आबालवृद्धांना हसवणारा, त्यांची चौकशी मारणारा एरिक जगाच्या दृष्टीनं अयशस्वी असेलही. पण स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून इतरांचं सांत्वन करणारा एरिक परमेश्वराच्या दरबारी नक्की यशस्वी झाला असेल!
कारण. हे असचं घडायचं होतं ! आपणच कमी पडलो त्याला समजून घेताना. त्याला ‘नॉर्मल’ जगाचे नियम लावताना, सतत धावणाऱ्या जगाच्या गतीनं त्याला धावायला लावताना. तो तसा धावू शकणार नाही. त्याला हळूहळू पुढं जायचंय, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. शेवटी त्यानं त्याचा मार्ग शोधला. वृध्दाश्रमातल्या विकल व एकट्या पडलेल्यांसाठी तो पर्फेक्ट मदतनीस होता. ते त्याला ‘बोल’ म्हणून सांगत होते. ‘बोलू नकोस’ हे आयुष्यभर ऐकलेल्या एरिकला किती आनंद झाला असेल ते ऐकून! एवढसं पोर ते काय काय सहन करून उभं होतं ! जगानं त्याचं ‘पर्फेक्शन’ कधी समजून घेतलं नाही. एरिकची आई त्याला घ्यायला आली होती. 
“एरिक झाला का हेअरकट? की सगळ्यांशी बोलत बसलायस?” तिनं विचारलं. एरिक एका बाळाला मजेशीर चेहरे करून दाखवण्यात गुंग होता. 
“एरिकला किती वेळा हेअर कटसाठी हाक मारतेय पण तो येतच नाहीये” काउंटर वरची हिरव्या डोळ्याची बाई त्याच्या आईला सांगत होती.
एरिक होता तसाच ‘पर्फेक्ट’ होता. अशा एरिकची जगाला गरज असते; जे धावणाऱ्या जगाची लय बदलतात, जे इतरांची प्रेमानं चौकशी करतात, जे त्यांच्या वेगळेपणानंच ‘पर्फेक्ट’ बनतात.
हे असंच घडायचं होतं. आपण काही बदलू शकत नाही पण त्यातलं सौंदर्य मात्र बघू शकतो. To walk in Eric’s shoes जमणार नाही. पण एखादं पाऊल टाकून त्याचं जग बघू शकू का? या विचारात उषा बाहेर पडली. एरिकच्या मॅरेथॅानची तारीख कॅलेंडरमधे लिहीत !

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...