परवा दादरला एका स्नेह्याकडे गेलो होतो. केन चा जुना झोपाळा छोट्याश्या गॅलरीत बांधलेला. आता मुंबईच्या वन आर के ची गॅलरी तुम्ही समजून घ्या.
'काका अडचण नाही का या झोक्याची? '
'अरे ही तिची आठवण. त्या काळात आमचं love marriage. तिचे श्रीमंत माहेर. तिकडे सुरेख मजबूत झोपाळा. त्याची तिला सवय म्हणून सहा जागा बदलल्या. पण झोपाळा अजूनही आहे रे. तिच्या अपेक्षा तरी काय होत्या? सगळी संसाराची जोडणी तिनं केली. नवी नाती..नवे विश्व...तो झोका तिला रोज नव्या दुनियेत घेऊन जायचा'
'आता मला अवि म्हणतोय, ठाण्यात चला. आठवा मजला...थ्री बी एच के...पण नको वाटतं. ती नाहीए, तुला माहीत आहे. इथे रोज झोके घेतो जरा निवांत बसून. तिचा आवाज येतो, "बसा चहा आणते .."
तिची सकाळची शाळेची नोकरी. माझं ऑफीस - 10 चे. डबे भरून जायची भरभरून जगली. अविनाश पाळणा घरात जायचा. त्याला रोज नवा खाऊ. संध्याकाळ झाली, की छान माझी वाट पाहत ही राणी बसलेली. एक मोगऱ्याचा गजरा दिला की बाईसाहेब खूश. मुलींची फार हौस. पण नको आपली जेमतेम स्थिती. आर्थिक वणवण. दुसरा चान्स नको आणि शाळेतल्या मुली माझ्याच आहेत की ! नवरात्रात त्यांचं फार कौतुक. गोड धोड करी. मुलींना पेन, पुस्तके, बांगड्या. काय काय देई. त्यातली कुणी झोपाळ्यावर बसली की म्हणायची.
"माहेरच्या झोपाळ्यावर मी अशीच झुलायची हो ! बाबा मांडीवर घेऊन बसायचा. त्याच्या मनाविरुद्ध लग्न केले. आता त्याला माझा चेहरा ही नकोसा झालेला. प्रत्येकीचा झोका श्रीमंतीचा असला पाहिजे का? आनंदाचा झोका महत्वाचा. तो लहान असला तरीही चालेल. नको उंच उंच...पुन्हा पडण्याची भीती वेगळीच..." हे असं बोलली की मन भरून येई. आहे त्यात आनंद हे तिच्या जगण्याचं पसायदान. सर्वांना तेच शिकवी सहज. मागल्या महिन्यात मोठी कार घेऊन कुणीतरी पत्ता विचारत घरी आलेली. बहुतेक तिची विद्यार्थिनी... मला नमस्कार केला... तिकडे अमेरिकेत असते हल्ली. बाईंचा झोका कुठेय? त्या झोक्याची गोष्ट सांगायच्या आम्हाला. आम्ही नवी स्वप्ने बघायचो .. तिकडे पण मी छान आनंदाचा झोपाळा जपलेला आहे. असे कितीतरी मनं आनंदाने भिजवणारे अनुभव, या झोक्याचे.
पुढे थोडी बदलली आमची आर्थिक स्थिती. मग हा ब्लॉक घेतला. आनंद कसा जगावा हे सांगितले तिनं.
"आपला झोका आपण जपला पाहिजे. तो उंच उंच हवा असे नाही. पण तो लहान नि झुलणारा. आनंदाचा पाहिजे."
अरे तुला सिंहगड पकडायचीय ना? निघायला पाहिजे. थांब मी चहा करतो. मी शांत... हरवलेला..
'हा घे ...
"काका, मी थोडे झोके घेत चहा घेऊ का?
अरे घे की ...'
तेवढ्यात रस्त्यावरून लहानगी शाळेतून परतत होती. गॅलरीकडे बघून म्हणत होती, 'किती छान झोका !!! ..आई, बघ ना तिकडे ..!!.'
त्या मुलीच्या डोळ्यात काकूचे आनंदाचे स्वप्न हिन्दोळे घेत होते बहुतेक. मी निघालो. आज मला मोकळा माझ्या आनंदाचा झोका मिळाला होता.
'ये पुन्हा ..' काका म्हणाले मला.
योगायोगाने खिडकीची सीट मिळाली. गर्दी होती. त्या गर्दीतही मला झोका आठवत होता. आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हे जरूरी नाही. ज्याचा त्याचा झोका. लहानपणी आमच्या घरी परसदारी लिंबाच्या झाडाला बांधलेला झोका होता. झोपाळा होता. मामाकडे सुंदर लाकडी झोपाळा.चांगले दणकट शिसवी लाकडाचे, छपराच्या नाहीतर माडीच्या तुळयांना पितळी कड्यांनी अडकवलेला.. लाकडावर कोरीव काम. बसायला छान बैठक. दोन लोड. त्याच्यावर ऐसपैस उशी टाकून झोपता पण यायचं. हातात चांदोबा नाहीतर किशोर घेऊन त्या झोपाळ्यावर बसलं की तंद्री लागायची. गंमत म्हणजे त्या झोपाळ्याला झोका द्यायला लागायचा नाही. तो आपला संथ हलत राहायचा. आमच्या वर्गात टाॅम्बॉय मुलगी होती, तिला फार आवडायचं उंच उंच झोके घ्यायला. त्या मुलीचं जरा लवकरच लग्न झालं. खूप वर्षांनी कुठून तरी कानावर आलं. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी स्टोव्हच्या भडक्याने भाजून ती गेली. जाताना पदरात एक तान्ही लेक होती. तिनं चढाओढीनं घेतलेले झोके आठवले. सुन्न झालो. त्या झोपाळ्यावर बाहुला बाहुलीची लग्न. भातुकली सजायची. अजुन एक मुलगी घाऱ्या डोळ्यांची. घरकामाची फार आवडे तिला. सातवीला असताना तिला उत्तम पोळ्या करता येत होत्या ! कुणी तिला मुद्दाम विचारे
"तुला मोठं होऊन काय बनायचं गं ?"
"मला नं , लग्न करायचंय , घर साजवायचं. मला गोरी गोरी मुलं होणार ,मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवेन..."
ऐकणारे जोरात हसायचे. तिचे वडील डॉक्टर होते. पुढे त्यांनी तिला स्वतःच्या हट्टापायी डॉक्टरच बनवलं. बाहेरगावच्या खाजगी कॉलेजात टाकलं. परदेशीही पाठवलं. बरेच वर्षानंतर ती भेटली. प्रॅक्टिस उत्तम चालू होती. कोणीतरी तिच्या झुल्याला उंच झोका दिला आणि तिच्या झोपाळ्याची लयच बिघडली. दिशा बदलली.
'लग्नाचा काही योगच आला नाही रे. आता वय ही वाढलंय . स्थळं येत नाहीत. घाऱ्या डोळ्यात अश्रू. निघताना तिने मला विचारलं,
"तुला झोपाळ्यावरची आपली भातुकली आठवते का रे ?"
मी निःशब्द...
"प्रत्येकाचा झोका वेगळा. त्याची उंची किती हवी हा ज्याचा त्याचा प्रश्न. तो दुसऱ्यांनी का ठरवावा आणि आपणही तो दुसऱ्यांना का ठरवू द्यावा?" असं मनात आलं. गावाकडे मित्राने मोठा बंगला बांधला. खूप आग्रहाने बोलावले, म्हणून गेलो वास्तुशांतीसाठी. बंगला काय? तो राजवाडाच होता ! दुसऱ्या दिवशी लक्ष गेलं त्या घरातल्या प्रशस्त झोपाळा होता. देवासमोर निरांजन तेवत होतं, कुठून तरी मोग-याचा हलका सुवास पसरला होता. शांत , पवित्र वातावरण. त्याचे वडील पूजा करीत होते. सहज हात जोडले गेले.
'अरे तुझी मुलगी पुण्यात शिकते ना इंजिनीरिंग ला?..'
'हो '
'आणि मुलगा '
'आणतो त्याला '
हाताला धरून त्यानं त्याच्या पंधरा वर्षाच्या मतिमंद मुलाला आणलं. झोपाळ्यावर बसवलं. त्यासोबत तो ही बसला.
पाय हलके जमिनीवर टेकवत झोका घेत होता. मी पुन्हा निःशब्द.
'पाचव्या वर्षी ताप आला आणि पुढं हे सगळं झालं.'
'तक्रार नाही. अरे हीच तर देवाची सेवा आहे !'
त्याचे वडील म्हणाले.
आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत असा अट्टाहास कशाला ! म्हणजे उंच झोके घेऊ नयेत असं काही नाही हं. घ्यावेत की, पण तेव्हा हे सुद्धा लक्षात ठेवावं की उंच गेलेला झोका हा कधीतरी खालीही येतोच. तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्या उतरण्याचंही तितक्याच प्रेमाने स्वागत करण्याची मनाची तयारी असायला हवी. बऱ्याचदा, उंचावरच राहण्याचा अट्टाहास आयुष्यात या क्षणात प्राप्त सुख गमवायलाही कारणीभूत ठरू शकतो. संथ हलणाऱ्या झुल्यांनाही त्यांची स्वतःची एक उंची असतेच की. माझ्या मित्रानं त्याच्या मुलाला दिलेल्या झोक्याची उंची मला आठवली. तशी प्रत्येक झोक्याची उंची आपण ओळखली पाहिजे, त्याचंही कौतुक केलं पाहिजे. हो आता मी पण माझ्या घरी गॅलरीत झोका बांधलाय. हो, खूप उंच नाहीये. पण आनंदाचा आहे हे खरंय.
लेखक:
अभिजीत कोळपे पुणे ©
7350005813
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा