काल दुपारचीच गोष्ट. नातवाच्या गाडीतून घरी येत होतो. अंतर जेमतेम दहा मिनिटांचे. गाडीत न कळणारं कर्णकर्कश इंग्रजी गाणं वाजत होतं. मी गाडीत बसल्याबसल्या नाराजी व्यक्त केली.
"ओ मालक आपण दोघेही पुढे बसलो आहोत हे तु विसरलेला दिसतोस" नातू काय ते समजून गेला आणि गाणं मंद आवाजात सुरू झालं. ओव्हरचा पहिला चेंडू व्यवस्थित पडल्यावर मी दुसरा चेंडू टाकला.
"आज खरं तर खुप दिवसांनी आपण भेटतोय. ह्या न समजणाऱ्या गाण्यापेक्षा आपण छानपैकी गप्पा मारल्या पाहिजेत. बोटाचा स्पर्श होऊन गाणं बंद झाले. माझा आनंद मात्र क्षणभंगुर ठरला. कारण पुढच्याच क्षणी नातवाकडून गुगली टाकण्यात आला.
बाबा मला नवीन फ्रेम घ्यायची आहे स्पेस्क्टची. ( नातू त्याच्या वडिलांना पप्पा म्हणतो आणि मला बाबा.)
तू ही सध्या घालतोस ती काय वाईट आहे 😜 माझ्यातला अंपायर जागा झाला नोबाॅल देण्यासाठी.
अरे यार, लाईफ मे कुछ चेंज होना चाहिए 😜 काही हवं असेल तर आम्हाला लगेच यार ही पदवी मिळते. इतरवेळी मात्र आम्ही बोअर करणारे मास्तर असतो. 😂😂😂
पण ह्यावेळी मात्र मी ठामपणे सांगितले त्याला की बाबारे हट्टाची भूमिका आता बदलली आहे. तु काॅलेजला आहेस त्यामुळे त्या हट्टाची भूमिका आता काही तरी मागण्याची नसून काहीतरी करून दाखवण्याची झाली आहे.
बाबा प्लीज पकवू नका. गाडीला मोठा सिग्नल लागलेला माझ्या पथ्यावर पडला. मी त्याला म्हणालो," हे बघ तुला कळायला लागलं त्या दिवसापासून आजपर्यंत तुला हवं नको ते सगळं दिलं तुझ्या आईवडिलांनी. त्यांनी जे दिलं नाही ते माझ्याकडून तू काढून घेतलेस. आता तुझं वय हटृ करण्याचे नसून आयुष्यात काहीतरी हट्टाने बनण्याचे आहे. मिळवण्याचे आहे. स्वतःला घडवण्याचे आहे.
त्या हट्टाची भूमिका आता बदलली असून घेण्यापेक्षा देण्यावर अधिक भर आहे त्या भुमिकेत. आईवडिलांनी आणि घरातील इतर मोठ्या माणसांनी आजवर कष्ट आणि त्याग करून तुला इथवर विनासायास आणले त्या कष्टांची आणि त्यागाची सव्याज परतभेड करण्यासाठी तुला ह्या पुढे प्रयत्न करायचे आहेत. ज्या हट्टाने आजवर खेळण्याच्या व खाण्याच्या गोष्टी, कपडे, शूज, सायकल, घड्याळ, बेल्ट, मोबाईल, स्कुटर सगळं तु मागितलंस. प्रसंगी ते मिळवण्यासाठी घरात थयथयाट केलास. त्याच हट्टाने आज तुला शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर सर्वोच्च स्थान पटकवायचे आहे. आमच्या सगळ्यांच्या नजरा आता त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत.
तेव्हा आहे त्याच चष्म्यातून तुला बाहेरच्या जगाकडे नव्याने बघायचे आहे.
"थोडक्यात तुम्ही माझ्या हट्टाचे टायर पंक्चर करून टाकले आहे" नातवाचा नाराजीचा सूर.
अर्थात. पण हे पंक्चर तुझं तुलाच काढायचे आहे जिद्द आणि चिकाटीची ट्युब लावून. एकदा का हे जमलं तुला की यशाच्या एक्स्प्रेस वे वरून तुझ्या स्वप्नांची गाडी वेगाने सुसाट धावेल.
ओके सर 👍 आपली आज्ञा शिरसावंद्य. पण सध्या तरी आपण आपल्या बाजूचा दरवाजा उघडण्याची कृपा कराल का 🤔
मी मान वळवून डावीकडे बघितले आणि माझ्या लक्षांत आले की बराच वेळ झाला गाडी माझ्या सोसायटीच्या दरवाजा समोर उभी होती.
बोलला पण नाहीस आपण पोहोचल्याचे. मी खजील होऊन म्हणालो.
काय करणार तुमचं फिलाॅसाॅफीचे लेक्चर सुरू होते. मी विचार केला की तुम्हाला न थांबवणं बरं. तेवढा वेळ मघाशी तुम्ही बंद केलेलं गाणं मी इयरफोन लावून ऐकलं 😂😂.
तुमचा मला लेक्चर देण्याचा " हट्ट" मी पुर्ण केला माझी भुमिका बदलून.
नातवाच्या ह्या खुलाश्यावर आम्ही दोघेही पोट धरून हसलो. जीव शांत झाल्यावर मी गाडीचे दार सावकाश उघडले आणि एक पाय खाली टाकला तितक्याच नातू खिडकीतून वाकून मला म्हणाला, " बाबा जोक अपार्ट मी नक्कीच प्रयत्न करीन माझी हट्टाची भूमिका बदलण्याचा आणि तुम्हाला लवकरच माझ्यात सकारात्मक बदल दिसेल."
नातवाचे बोलणं ऐकून मी त्याच्या पाठीवर थोपटत शाबासकी दिली.
"हो पण आता आनंदाच्या भरात गाडीचा दरवाजा जोराने बंद करू नका म्हणजे झालं."
मॅचमध्ये विजयी षटकार मारण्याचा मान मात्र त्यानेच मिळवला शेवटी.
मी एकेक पाऊल सावकाश टाकत जिन्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मागून गाडी सुरू केल्याचा आवाज आला आणि मी जिन्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.
© सतीश बर्वे
०३.०९.२४
टीप: हा स्वानुभव आहे. माझ्या आणि नातवाच्या संवादावर आधारीत ही पोस्ट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा