मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1428. विघ्नहर्ता

     गल्लीतल्या कोपऱ्यात असणारं ते छोटंसं गणपतीचं देऊळ. छोटं असलं तरी प्रसन्न वाटणारं. त्या गणेशाला बघताच मन प्रसन्न करणारं. आज अगदी सुनसुन दिसत होतं. चतुर्थीला तर त्याची किणकिण छोटी घंटा सकाळ पासुनच वाजत असायची. बायका, पुरुष, पोरं सकाळ पासून दर्शनाला रांग असायची. हिरव्यागार दूर्वानी सगळं रूप झाकून जायचं. मध्येच डोकावणाऱ्या जास्वनंदीने अजुनच मोहक दिसायचं. ती रुबाबदार छान सोंड आणि तो सुपाच्या कांनांचा ऐटबाज पणा. त्यावर ठेवलेली लाल फुलं त्याला अजुनच शोभून दिसत होती. चतुर्थी म्हटलं की त्याचा थाटच वेगळा असायचा. एरवी तो होताच मोहक गणराया. अगदी करुण दृष्टीने आपल्याकडे बघुन प्रेमाचा वर्षाव करणारा. पण आज कोणी येणार नाही दर्शनाला. आजच काय गेल्या तीन आठवड्यात कोणी आलं नाही. तसं त्याला कुलूप घातलं तरी जाळीच्या भागातून दिसतो तो. पण इथं तर लोकही कुलुपात आहेत मग कोण बघणार? आज तुला एवढीच छोटी जुडी रे बाबा, कुंडीत आलेल्या बारीक दुर्वांची. आणि हे छोटं कण्हेरीचं फुल. मागच्या वाड्यात फांदी आली होती त्याच्या शेंड्यावर होतं, तोडलं ह्या वयात सर्कस करत. काय करणार, तुझा एवढा थाट करतात लोकं आणि तू आमच्याच घरात असून तुझा काही थाट नाही रे बाबा आज. असं म्हणत सुशीलाबाई रडू लागल्या.
पुजेला कद नेसून हळुहळु आलेच आजोबा मागुन. "अग काय बोलतेस, त्याचच त्याला देते आणि वर सुनावते काय? ह्या वयात वर चढून फुल तोडलं म्हणून, तो काही म्हणतोय का? द्याच मला फ़ुल...!
आजी म्हणाली, "तो कशाला म्हणेल आणि त्याला काय दिसत नसेल लॉक डाऊन?"
अग कर्ता करविता तो. त्याला माहित नसायला काय झालं? चल झाली का सगळी तयारी. दुर्वा न्याहाळत आजोबा म्हणाले, "बघ छोटी का होईना जुडी निघालीच कुंडीत आणि वाड्यात झुकलेल्या फांदीलाच फुल असणं ही सगळी त्याचीच कृपा ! आणि तुला स्टुलावर चढून फुल तोडायला बळ देणं ही पण त्याचीच कृपा ! आजी म्हणाली हो आणि मला स्टुलावरून पडू न देणं हि पण...! आजोबांनी हसत वाक्य पूर्ण केलं. त्याचीच कृपा. 
       बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तीन आठवड्यात मंदिर बंद. काही शिधा, दक्षिणा, काही आवक नाही आपल्याला. सध्या तर आपलं धकतय. गणपती कृपेने तो आपल्या गल्लीत फिरणारा पोलिस पण दयाळू, कुलपातून दर्शन घेऊन म्हणायचा सांभाळ रे बाबा. अवघड ड्युटी आहेत सध्या आणि आवर्जून पैसे टाकायचा जाळीतून. त्याने टाकलेल्या पैश्यात निदान पुजेला दूध तरी आणता येत होतं. आपली पण एक वेळ चहाची सोय. पण ह्या चार आठ दिवसात दिसला नाही. मला वाटलं होतं त्याला म्हणू बाबा चतुर्थीच्या आदल्या दिवशी थोडं गुळ खोबरं दे आणुन. पण कुठं गेला की तो आणि आताचा पोलीस तर नुसता रुबाब गाजवतो जाळीतून पण डोकावू देत नाही. लगेच आरडा ओरडा करतो.
       आजोबा पूजा करता करता म्हणाले आहो चालायचंच. त्यांना त्यांच्या नोकऱ्या करायच्या असतात आणि माणसं तितके स्वभाव आणि फार मनाला लावून घेऊ नका गुळ खोबऱ्याचे मोदक नाही म्हणून, "नुसती चार दाणे साखर घालून केली तरी आवडेल हो तुमच्या लंबोदराला आणि हे काय आता सगळ्या चतुर्थीला असं थोडीच असणार. अहो तो विघ्नहर्ता आहे. हे विघ्न बघतोच आहे. कित्येकदा चतुर्थीला किती हजार मोदक असतात पाहिलं आहे ना आपणच मग, एखादी चतुर्थी अशी आणि आपली परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर आहे. चार वर्षांपूर्वी अपघातात गेलेला आपला पोऱ्या काय त्याने पहिला नाही? त्यांनतर आलेलं आर्थिक संकट तोच तर सावरतोय आपल्याला. लोकं त्याला देतात तो आपल्याला देतो. तुमची श्रद्धा ठाम असली की घडतं सगळं. तो असतो त्यामुळे फार विचार करू नका. चला निदान कोरा चहा तरी पाजा आज. उपवासाला. साबुदाणा नाही ए घरात हे माहित आहे मला. चला आज उपवास कोऱ्या चहावर धकवू त्याला आहे काळजी तो बघेल.
      दोघे आत गेले. मंदिराला समोरून कुलूप असलं तरी बाजूची आजोबा आजीची छोटी खोली मंदिरातूनच उघडत होती. छोट्याश्या दुर्वाच्या जुडीने गणेशाचं पण रूप अगदी खुललं होतं. कण्हेराचं फुल डोक्यावर रुबाबात बसलं होतं. समोर छोट्या वाटीत मनोभावे ठेवलेला प्रसाद बाप्पाला आवडलाच होता. म्हणुन तर चार मुंगळे तो खात होते. छोटासा तुपाचा दिवा गणेशाला समाधान देत होता. एकवेळ स्वतः नाही खात पण आपल्यासाठी चतुर्थीला खास थाट करायला आजीबाई आवर्जून ते तुप जपून ठेवतात हे ठाऊक आहे म्हणून तर दिव्याच्या उजेडात ती प्रसन्न  गणेश मुर्ती. काहीतरी चमत्कार घडवायचा विचारात दिसत होती. 
अगबाई कश्याचा आवाज ?आजीने डोकावून पाहिलं मंदिराच्या जाळीतून तो पोलिस अगदी गडबडीत एक पिशवी गजातून घाईने आत ढकलत म्हणाला, आजी तेवढी दुर्वा वहा आणि मोदकाचा प्रसाद दाखवा. पिशवी धुवायला टाका, तुम्ही पण हात धुऊन घ्या..!
     आजीने कुतूहलाने विचारलं पण कशासाठी? आजी चार दिवसा पूर्वी लेकरांला थंडी, ताप, खोकला मला वाटलं आता शत्रु शिरला लेकरात. त्याला तपासणीला नेताना ह्या मूर्तीचा आधार वाटला. म्हंटल बघ आता तुच कर्ता करविता आहेस. आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी बाहेर आणि आमच्याच लेकरावर शत्रूचा हल्ला. पोलीस असलो तरी घाबरलो होतो. पण भीती वाटली की मनाला आधार देणारा देव असतो. पण हाक मनापासुन लागते हे माझ्या आजींन सांगितलंय मला. मग त्या दिवशी तसंच केलं. परवा रिपोर्ट निल आला. बायकोला सांगितलं होतं. आजीचा गणपती पावला ग. तर तिनं आज चतुर्थी म्हणुन मोदक करून पाठवले आणि थोडा शिधा आहे. उपवासाचा. नाही म्हणू नका आणि तो निघून गेला...!
    आजी पुटपुटली नाही कशी म्हणणार. त्याने त्याची सोय पहिली. आजीने पिशवीतून मोदक काढले. एका भांड्यात झाकून ठेवले आता संध्याकाळी आरती केली की मग. असं म्हणत परत पिशवीत हात घातला त्यात साबुदाणा, शेंगदाणे. तुपाची पुडी. आजीचे डोळे पाणावले ! आजोबा म्हणाले बघ, कर्ता करविता तो आहे. आपण निश्चिन्त होऊन त्यावर सोपवावे तो बघतो. नसता मिळाला साबुदाणा तरी उपवासाची ताकद त्याने दिलीच असती. आजीने साबुदाणा भिजवला. या वयात गोळ्या पाठीमागे असल्याने खाणे वेळच्यावेळी लागत होते. संध्याकाळी आरती झाली हळू आवाजात, आजोबांनी पाण्यात ठेवलेली पोलिसाची दुर्वांची जुडी वाहिली. समोर मोदकाचा नैवेद्य ठेवला. आरतीची निरंजन चालूच होती.  आजोबा आजीने खोलीत जाताना मंदिराचा लाईट बंद केला. त्या निरंजनाच्या शांत प्रकाशात बाप्पा मंद हसत होता. पोलिसासारखं तुमच्या सगळ्यांचं संकट लवकर दुर होईल तुम्ही फक्त श्रद्धेने माझ्यावर सोपवा. कारण आता तुमच्या हातात तेच शिल्लक आहे.

©स्वप्ना मुळे(मायी),...औरंगाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...