मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2603. बाप कधीच गरीब नसतो

"मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे..." पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ​ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता तो १० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस.​
ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, "बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे."
सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.
"ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण... मी रिस्क घेऊ शकत नाही."
​ईशा संतापली होती.
"तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते."
असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.
तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली.
जाताना तिने बापाच्या तोंडावर पाहिलंही नव्हतं. गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.
​वर्तमान:
ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.
तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.
"ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय."
​ईशाने उपहासाने विचारले, "काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?"
​काका गंभीर झाले. "वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील."
​ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.
काहीवेळाने आलं ते पान - तारीख १० वर्षांपूर्वीची.
"आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो."
​ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. "आज ईशाला अमेरिकेच्या 'ज्ञानदीप ट्रस्ट' ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की 'ज्ञानदीप ट्रस्ट' मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेत. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल... पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती."
​ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला 'स्कॉलरशिप' समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?
ज्या बापाला तिने 'भित्रा' आणि 'कंजूस' म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?
​ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख - २ दिवसांपूर्वीची.
​"ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो... मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला 'बापाच्या पैशावर जगणारी मुलगी' नाही, तर 'स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री' व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.
फक्त एक खंत आहे... मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.
​तुझा 'कंजूस' बाबा."
​ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
"बाबा... बाबा उठा ना... मला माफ करा... मी चुकले..."
तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. ​आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.
पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक 'भेट' आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. ​बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.
त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त 'चटणी-भाकरी' खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.
​ईशाला आता कळलं होतं...
बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.
आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.

~अज्ञात

2602. साहेब मला जगायचंय हो !

 अत्यंत खोल गेलेल्या आर्त आवाजात तो बोलला !
राऊंडवर आलेल्या शिकाऊ डॉक्टरांना तो आपल्या आयुष्याची भीक मागत होता. पण त्याची काहीतरी बोलत, तुला काहीच होणार नाही याची खोटी खोटी शाश्वती देत डॉक्टर त्याची समज काढत होते. नाही म्हणायला एक स्लाईन चालू होती, तीन चार मिनिटाला एखादा थेंब त्यातून वाहताना दिसत होता. नाकाला ऑक्सिजनचा मास्क लावलेला होता.
सगळं वातावरण पाहून मी स्वतःला आवरू शकत नव्हतो. स्टुलवर बसून खाली मान घालून कोणाला थांगपत्ता लागू ना देता आश्रू गाळत बसलो होतो.
... अख्खं त्सुनामी वादळ आज माझ्या समोरच्या बेडवर मरणासन्न अवस्थेत पडलं होतं ! हो वादळंच होतं ते ! 'मित्रांसाठी जीवाची बाजी लावणं शिकावं तर यांच्याकडून ... पक्याच्या भांडणात स्वतः पडून याने पोलीस इन्स्पेक्टरला ठोकलं होतं, भागामाय चे बुडीत दीड लाख रु एका दिवसात याने रंगनाथ मास्तर कडून वसूल केले होते, पोस्टात, तहसीलमध्ये, बँकेत, अन कितीतरी सरकारी ऑफिसमध्ये राडे घालून त्यांच्या मानगूटीत हात घालून करून घेतले होते ! 
रस्त्यावरून जातांना एखाद्यावर अन्याय होतांना याला दिसला की हा भिडलाच ! स्वतःच्या अंगावर भांडण घेत याने अनेक प्रकरणे मिटवली ! अन थोडीशी पोटात पडली तर हा कोणाच्या बापाचे ऐकत नसे, आजपर्यत आम्हा सर्व मित्रांसह आमचे मित्र, नातेवाईक, शेजारी यांची क्लिष्ट प्रकरणे यानेच सोडवली होती !! त्याच्या अंगावरील अनेक जखमांचे व्रण याचे साक्षीदार होते. अशाच स्वभावामुळे त्याला एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी मॅनेजर ची पोस्ट भेटली, चांगला पगार, वरकमाई अन सेटलमेंट मध्ये मिळणारे पैसे अन त्यामुळे हा रोज पार्ट्या करून दारूच्या आहारी गेला होता अन आज त्याच्या किडन्या अन लिव्हर खराब झाल्याने शेवटच्या घटका मोजत होता.....!'
वार्डमध्ये तीन चार पेशंट होते, स्मशान शांतता होती, सरकारी दवाखाना असल्याने शिकाऊ डॉक्टर अधूनमधून टोळक्याने येत अन पेशंटच्या बेड ला अडकवलेला पॅड पाहून काहीतरी इंग्रजीमधून चर्चा करून जात....
 सर्व संपले होते...... उरली होती फक्त चर्चा ! डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वीच याला घरी घेऊन जायला सांगितले होते, पण मृत्यूशीपण शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा जणू त्याने निर्धार केला होता ! तीन दिवसांपासून पाण्याचा एकही थेंब त्याच्या पोटात नव्हता पण तो हार मानायला तयार नव्हता ! आपल्या नावाप्रमाणेच तो खरोखरच एक महान लढवय्या म्हणून जगला होता, या तुफानाचे, झंजावाताचे नाव होते सिकंदर !!
माझ्याकडे बघून तो हसला. काहीतरी बोलायचं होतं त्याला, मी माझा कान त्याच्या तोंडाजवळ नेला, " छोट्या घशाला कोरड पडलीय रे !"
त्याने तीन दिवसांपासून पाण्याचा थेंब पण घेतला नव्हता हे माहित असूनही मी रोज नारळपाणी आणायच्या सवयीने आज पण नारळपाणी आणले होते.
"नारळपाणी देऊ का ?" मी.
"दे !" सिकंदर
जगजेत्या सिकंदरने साध्या सैनिकाला पाणी मागावे अन त्या सैनिकांचा उर आनंदाने फुटून जावा अशी अनुभूती मी अनुभवत होतो !
हॅण्डलने बेडचा अर्धा भाग वर केला अन नारळपाणी हातात धरून त्याच्या तोंडाजवळ नेले, त्याने झटक्यात संपूर्ण नारळपाणी पिऊन संपवले होते !! एक नर्स, मी अन त्याचे नातेवाईक डोळे फाडून त्याच्याकडे पहात होतो !
पिऊन झाल्यावर त्याने क्षणभर डोळे मिटले, पुन्हा डोळे उघडून, " छोट्या, माझ्या चिऊच्या गॅदरिंग पर्यन्त जगेल का रे मी ?"
त्याचा हातात हात घेऊन माझ्या डोक्याला लावत मी त्याला त्याच्याकडे न बघत बोललो, "हो रे ! तिचे लग्न पण तूच करणार आहेस !"
पुन्हा हसला, "छोट्या काहीतरी कर, तुझ्या आयुष्यातले काही दिवस दे मला ! ......मला जगलंच पाहिजे ! चिऊ ची गॅदरिंग याच डोळ्यांनी बघितल्याशिवाय मला मरण येणार नाही !"
आताच पुसून कोरडे केलेले डोळे पुन्हा अश्रू गाळत होते. त्याला पुरेपूर कल्पना होती की त्याचा खेळ संपलेला आहे. पण त्याचं जगण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे त्याची चिऊ !
चिऊ त्याची नऊ वर्षाची मुलगी ! खूप गोड, सालस, चुणचुणीत अन हुशार ! तिचे गायन अन नृत्य अप्रतिम होते अन याच कारणाने तिचे तीन कार्यक्रम गॅदरिंग मध्ये बसवले होते, अगदी सिकंदरला डॉक्टर घरी घेऊन जा म्हणाले त्या दिवशी ती, "बाबा, लवकर बरं व्हा ! माझ्या गॅदरिंग ला यायचं म्हणजे यायचं ! प्रॉमिस करा !!" या तिच्या प्रेमाच्या आग्रहामुळे त्याचा सर्व जीव इथेच अडकला होता ! म्हणूनच तो आजही तग धरून जगण्याची धडपड करत होता !
मनाने खंबीर होता, जगण्याची जबरदस्त इच्छा होती पण शरीर साथ देत नव्हते.
त्याला थोडासा डोळा लागला, मी उठलो तडक मुख्य डॉक्टरच्या केबिनकडे निघालो, डॉक्टर ओळखीचे होते, आत गेलो, "साहेब, काहीही करून त्याला महिनाभर जगवा !" मी दोन्ही हात जोडून त्यांना विनंती केली.
"हे बघ राजा, मी डॉक्टर आहे, देव नाही ! त्याच्या फक्त किडन्या गेल्या असत्या तर आपण एखादा डोनर उभा करून एका किडणीवर त्याला जिवंत ठेवले असते, पण लिव्हर चं काय करणार ?? तो आतापर्यंत जिवंत आहे याचीच मला कमाल वाटतेय ! आजपर्यंतच्या माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी असा मनाने जिद्दी अन खंबीर पेशंट पहिला नाही !" डॉक्टर बोलले.
"आता काहीच शक्य नाही का मग ??" सर्व ऐकून पण माझा एक भाबडा प्रश्न !
"केवळ अशक्य !" डॉक्टरांच्या बोलण्यात निश्चितपणा जाणवत होता ! 
मी खुर्चीतून उठलो, बाहेर जाऊ लागलो तितक्यात डॉक्टरांच्या केबिनमध्ये लावलेल्या एका पोस्टरकडे लक्ष गेले ! अचानक मनात एक वीज चमकून एक विचार उत्पत्तीत झाला ! त्या पोस्टरचा फोटो घेतला, त्याबद्दल सखोल चौकशी करण्यासाठी डॉक्टरांना काही प्रश्न विचारले अन दुःखात सुद्धा एक आनंदाची नजर शोधत बाहेर पडलो. आवश्यक त्या सर्व चौकश्या आता संपल्या होत्या मी एका वेगळ्याच उत्साहात होतो, पण त्यापेक्षा जास्त दुःखात !! 
जड अंतःकरणाने मी सिकंदरच्या वार्ड जवळ आलो, तो शांतपणे झोपला होता, त्याची आई अन पत्नी बाजूलाच खाली बसलेल्या होत्या अगदी खिन्न मनाने ! स्टुलवर बसून त्याचा हात हाती घेतला, डोळे बंद असताना सुद्धा तो बोलला, "छोट्या, कर ना रे काहीतरी ! तूच काहीतरी करू शकतोस !"
"सिकंदर एक पर्याय आहे, चिऊची गॅदरिंग तू याच डोळ्याने पाहू शकशील ! चिऊची गॅदरिंगला अजून महिना बाकी आहे, पण तू ........तू...." माझ्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती अन कंठ दाटून आला होता पुढचे बोलणे अशक्य होते ....!!!
"अन मी जगू शकणार नाही महिनाभर हेच ना .......!" त्याने माझ्या तोंडचे वाक्य पूर्ण केले !
लहान लेकरासारखा मी ढसा ढसा रडत होतो ! त्याची आई अन पत्नी सुद्धा तोंडाला पदर लावून रडत होते ! पुस्तकात वाचलेले धीरगंभीर वातावरण मी प्रत्यक्षात अनुभवत होतो !
"...ते सोड , पर्याय काय तो सांग रे, छोट्या !!"  सर्व दुःखांचा आवंढा गिळत नव्या आशेच्या किरणाकडे तो वळला !
"तुला याच डोळ्याने चिऊची गॅदरिंग पहायची आहे ना ? मग तू 'नेत्रदान' केलेस तर याच डोळ्याने चिऊची गॅदरिंग पाहू शकशील !" त्याच्या खोबणीतील खोल गेलेल्या डोळ्यांकडे पाहत मी बोललो.
.......क्षणभर त्याने डोळे मिटले, त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज पसरले होते, पांढरा पडलेला चेहरा ढगाआडून बाहेर पडणाऱ्या चंद्रासमान उजळत होता, त्याने डोळे उघडले, दिव्याची काजळी झटकावी अन त्याची ज्योत अधिक प्रखरतेने प्रज्वलीत व्हावी तशी त्याच्या डोळ्यात एक चमक दिसत होती.
" वा ! छोट्या, मी भाग्यवान आहे की तुझ्यासारखा मित्र माझ्या पाठीशी आहे !.... 
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घे लगेच. माझ्याकडे वेळ कमी आहे रे !" एकदम स्फुरण आल्यासारखं तो बोलला.
मी ताबडतोब हातातली गुंडाळी केलेल्या कागदाची घडी उघडली अन त्याच्यासमोर धरत खिशातील पेन काढला. मी जिकडे इशारा करेल तिकडे त्याने स्वाक्षरी केली. अगदी संतोषाने तो म्हणाला, " आता मला काही चिंता नाही ! सर्व व्यवस्थित पार पाड अन हे बघ, गदरिंगच्या वेळी माझ्या डोळ्यांशेजारी तू बस अन सांग त्या 'डोळ्यांना' ती स्टेजवर गॉड मुलगी छान छान नाचतेय ती तुझीच चिऊ आहे !"
त्याचे दोन्ही हात हातात घेवुन मी घट्ट पकडले अन माझ्या कपाळावर लावले. एकमेकांना शपथ देण्याची आमची हि जुनी पद्धत होती !
त्याचे दोन्ही हात मोकळे केले अन वार्डमधून बाहेर पडलो, एकटाच रडत रडत हातात ती कागदे घेऊन पळत सुटलो ...!!
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 'आय बँक' ने दिलेल्या कार्ड अन सुचनापत्रकाची घडी करून खिशात टाकली, तितक्यात फोन वाजला ! 
............ जे अपेक्षित होते तेच झाले ! सिकंदरने शेवटचा श्वास घेतला होता !
........धावत धावत त्याचा वार्ड गाठला, त्याची आई अन पत्नी धायमोकळून रडत होते. आता मात्र मला पुढील कामगिरी पार पडायची होती म्हणून मी माझ्या अश्रूंना बांध घालत अगोदर पंखा बंद केला, ओल्या कापसाने त्याचे डोळे भिजवून त्याच्या डोक्याखाली दोन उश्या दिल्या खिशातून मोबाईल काढून कार्डवर दिलेल्या नंबरवर फोन लावला ! अवघ्या दहा मिनिटात डॉक्टर हजर झाले. सर्वांना बाहेर जाण्यास सांगून त्यांनी आम्हाला अर्धा तास बाहेर ठेवले अन बंद डब्यात त्याचे डोळे घेऊन निघाले !
सिकंदर ला घरी नेले, मी अन माझा एक मित्र त्याचे मृत्यूप्रमाणपत्र व इतर गोष्टींची पूर्तता करून घरी पोहचलो, त्याचे अंत्यसंस्कार झाले !
....सिकंदरचे नेत्र कोणाला दिले हे गुप्त ठेवण्याची पॉलिसी त्या 'आय बँक' ची होती पण काही चिरीमिरी देऊन 'मराठवाड्यात प्रसिद्ध अंध गायिका 'आम्रपाली' हिस ते देण्यात आले असे आम्हाला खात्रीलायक कळले अन त्यांचा पत्ता पण कळला !'
पंधरा दिवस गेले ....सर्व गोष्टीवर आमचे लक्ष होतेच !
तिची पट्टि आज काढणार होते ! आम्ही तिथे गेलो ! प्रथम तिच्या वडिलांची अन तिची दृष्टी आल्यावर दुसऱ्या दिवशी तिची भेट घेऊन तिला सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला !
प्रथमच तिच्या म्हणजेच सिकंदरच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ! तिच्याकडून गॅदरिंग ला येण्याचे वचन घेऊन आम्ही परतलो !
गॅदरिंग चा दिवस आला, चिऊ ला सिकंदरच्या अंत्यसंस्कारादिवशी तिच्या मामाकडे ठेवून 'पप्पा अजून दवाखान्यात आहे' असे तिला समजावून सांगण्यात सर्व नातेवाईक अन आम्ही यशस्वी झालो होतो. गदरिंगला 'आम्रपाली' नियोजित वेळेत आली होती, तिचे समाजात एक वेगळे वलय होते, चिऊ विचारत होती की पप्पा कुठे आहेत ? तिला 'येताहेत' सांगत सर्वजण तिची समजूत काढत होते !
कार्यक्रम सुरु झाला, आयोजकांनी सर्वप्रथम चिऊचे स्वागत गीत घेतले ! आम्रपालीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ! मी तिच्या शेजारीच बसलो होतो, तिने मला विचारले, ' हि चिऊ आहे का ?' तिच्या डोळ्यांनी चिऊला ओळखले होते , मी मान डोलावली, तिने डोळे पुसले. 
आयोजकांनी आम्रपाली येथे उपस्थित आहे कळल्यावर अचानक तिचे नाव व्यासपीठावरून पुकारले अन रंगमंचावर येण्याची विनंती केली. आम्रपाली गेली, रंगमंचावर जाताक्षणीच तिने चिऊला आपल्या हातांनी उचलले अन छातीशी घट्ट कवटाळले. तिचे पटापट पापे घेतले अन डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत तिने माईकचा ताबा घेतला.
"आज माझ्या डोळ्यातली ज्योती माझ्या ह्या चिमुकल्या चिऊची देण आहे, आज जग किती सुंदर आहे हे मी फक्त चिऊमुळे पाहू शकत आहे ! जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तो पर्यंत चिऊ माझ्या नजरेसमोरच राहील याची मी ग्वाही देते .........!" माझ्या अन सिकंदरच्या जे मनात होतं ते कार्य तडीस गेलं होतं, ती पुढे काय बोलते किंवा गाते याच्याशी मला काही देणेघेणे नव्हते....... पाण्याने भरलेले डोळे पुसत मी रंगमंदिराच्या पायऱ्या उतरत होतो ..........
बाहेर येऊन आकाशाकडे एक नजर टाकली....
'सिकंदर हात उंचावून प्रसन्न चेहऱ्याने माझे आभार मानत असल्याचा मला भास झाला ...!'
त्याच क्षणी मी पण मनोमनी नेत्रदान व देहदानाचा संकल्प सोडला .....!!!!!!

लेखक: शरद चंद्रजी औरंगाबाद

2601. पाप आणि पुण्य

  गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती.ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला डॉ. जगदाळे बसले होते. मागील बाजूला त्त्यांची पत्नी विजया आणि मोठी मुलगी अश्विनी बसली होती. सर्वजण उसासे टाकत होती. डॉ. सतत मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होते. मागील बाजूला अश्विनी पण मोबाईलवर हळूहळू बोलत होती.. विजयाबाई फक्त हुंदके देत होत्या..
डॉ. जगदाळे यांच्या मुलाला.. हेरंबला ऍक्सीडेन्ट झाला होता.त्याच्या कॉलेजवरुन रूमवर येताना मोटरसायकल स्लिप झाली होती.. आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचे पाय चिरडले होते. तो रुबी नर्सिंगमध्ये ऍडमिट होता.. आणि तातडीचे ऑपरेशन सुरु होते..
रात्री विजयाबाई आणि अश्विनी जेवत असताना पुण्याच्या पोलीसस्टेशनवरुन फोन आला.. विजयाबाई तर बेशुद्ध पडल्या.. रडत रडत अश्विनीने आपल्या वडिलांना बातमी कळवली.. तेंव्हा ते मित्राबरोबर ड्रिंक्सची मजा घेत होते. त्यानी पुण्याला फोन लावले.. त्त्यांचे अनेक जुने सहकारी डॉक्टर्स पुण्यात होते.. त्याच्याशी संपर्क करुंन त्याना रुबीमध्ये जायला सांगितले आणि ते घरी आले..
त्त्यांचा ड्रायव्हर जयदेव आला होता.
भराभर घर बंद करून तिघे गाडीत बसले. गाडी चेंबूरच्या पुढे आली आणि डॉ. देशमाने यांचा फोन डॉ. जगदाळे यांना आला..
'डॉ. मी देशमाने बोलतोय..
'बोला.. पोचलास काय तू रुबीमध्ये? काय परिस्थिती आहे?
'आत ऑपरेशन सुरु आहे.. मुख्य सर्जन स्वतः ऑपरेशन करत आहेत,, या हॉस्पिटलमधील अजून दोन सर्जन त्याना मदत करत आहेत..
'पण हेरंबची काय स्थिती आहे?
'सुदैवाने त्याच्या ब्रेनला काहीही इजा झालेली नाही.. त्यामुळे तो शुद्धीत आहे, पण पाय ट्रकखाली गेल्याने त्याला खूप वेदना होत होत्या.. पण आता त्याला कंपोझचे इंजेकशन दिले आहे.. शिवाय पेनकिलर पण दिले आहे.. त्यामुळे..
'कसा आहे माझा बाळ? एव्हडावेळ साडीचा पदर तोंडात बोळ्यासारखा घेऊन रड आवरलेल्या विजयाबाईंनी हुंदके देत देत विचारले..
'आई.. आता देशमानेकाका म्हणाले ना त्याला झोपवून ठेवलंय म्हणूंन आणि आता ऑपरेशन सुरु केल आहे.. तू रडू नकोस.
आपलं रडू आणि अश्रू आवरत अश्विनी म्हणाली.
गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती.. कितीही घाई केली तरी अजून दोन तास लागणार होते.. रडून रडून विजयाबाई सुन्न होऊन बसल्या होत्या.. पुढील बाजूला बसलेले डॉ. सुद्धा मनातल्या मनात रडत होते.. पण बाहेरून दाखवत नव्हते. अश्विनी विचार करत होती.. माझ्या आयुष्याची दुर्दषा झालीच आहे.. आणि परत सर्वांच्या लाडक्या हेरंबवर आलेले हे संकट?
अश्विनीच्या डोळ्यसमोर मिलिंद आला.. तिचा नवरा.. तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा.आपल्या मनात नसताना बाबांनी आपले लग्न त्याच्याशी लावले.. लग्न लागले आणि दोन दिवसात आपल्याला कळले तो पुरुषच नव्हता. मोठा धक्का होता. त्याचे म्हणणे डॉक्टरी उपाय सुरु आहेत.. म्हणून खोटे हसू तोंडावर आणुन दिढवर्षे आपण राहिलो त्या घरात... पण काहीच प्रगती नाही हे पाहून तो नवरा आणि ते घर सोडले. आईला मोठा धक्का.. बाबा चिडले आपल्या मित्रावर पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. आपले आयुष्य मात्र उध्वस्थ झाले..
आणि आज हेरंब? काय चालले आहे?
मध्यरात्रीनंतर गाडी पुण्यात शिरली आणि थोडयावेळात रुबी नर्सिंगजवळ आली.. डॉ. देशमाने वाट पाहतच होते...
'अजून ऑपरेशन सुरूच आहे.. आपण वर जाऊ..
ती तिघ आणि डॉ. देशमाने ऍक्सीडेन्ट वार्ड मध्ये पोचले. रात्री तीन वाजता मुख्य डॉक्टर बाहेर आले..
थोडयावेळाने त्यानी डॉ. जगदाळेना भेटायला बोलावले.. नको म्हंटले तरी विजयाबाई केबिनमध्ये गेल्याच.. अश्विनी पण सोबत होती..
' डॉ. जगदाळे.. मला कळले तुम्ही डॉक्टर आहात.. त्यामुळे तुम्हाला कल्पना आहेच.. तुमच्या मुलाचा जीव वाचला आहे पण त्याचे पाय..
'पाय कसे आहेत डॉक्टर? विजयाबाईंनी जोरात विचारले.
'मला सांगायला वाईट वाटते ... की त्याच्या दोन्ही पायाचा चुरा झाला होता, त्यामुळे..
'त्यामुळे काय डॉक्टर?
'पाय कापावे लागले दोन्ही.. पुढे त्याच्यातून मार्ग काढता येईल.. डॉक्टर तुम्हाला माहित आहेच.. जयपूर फूटने चालू लागेल.. पण सध्या मात्र..
काय कळायच्या आत विजयाबाई खाली कोसळल्या..
'आई.. आई करत अश्विनी आईला जाग करू पहात होती.. पण तिची आई बेशुद्ध झाली.
अश्विनीची आई खुर्चीवरून छाती दाबत खाली पडली हे पहाताच अश्विनी आणि जगदाळे तिच्याजवळ धावले, त्याचबरोबर त्या केबिनमधील बाकी डॉक्टर्स धावले.. एकाने नाडी पाहिली.. दुसऱ्याने ब्लडप्रेशर चेक केले आणि धावत व्हीलचेअर आणली आणि आयसीयू मध्ये आणले.. मुख्य डॉक्टर आले.. त्यानी कार्डीओग्राम घेतला आणि छातीमध्ये तीन इंजेकशन दिली.
     अश्विनी डोक्याला हात लाऊन बसली होती. काल रात्री तिच्या भावाला अपघात झाला होता, त्याचे दोन्ही पाय कापावे लागले होते आणि मध्यरात्री आईच्या हृदयाला झटका बसला होता.. तिची तब्येत नाजूक होती.
दुसऱ्या दिवशी मुख्य डॉक्टरनी विजयाबाईच्या आणखी टेस्ट केल्या आणि बायपास करायची गरज असल्याचे सांगितले.
आठ दिवसांनी त्याच हॉस्पिटलमध्ये विजयाबाईची बायपास झाली. त्याच हॉस्पिटलमध्ये हेरंब पण उपचार घेत होता.. त्याला आता कुबड्या देण्यात येणार होत्या.
  डॉ. जगदाळे चिंतेत होते.. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी आपण धडपडलो.. बऱ्या आणि बुऱ्या मार्गाने पैसे जमा केले.. मुंबईत श्रीमंतवस्तीत तीन मोठे फ्लॅट घेतले.. सोनेचांदी, गाड्या, बँकबॅलन्स सर्व काही होते.. पण.. आपण हे वैभव योग्य मार्गाने जमवले का? आपण DHO( डिस्ट्रिक हेल्थ ऑफिसर ) असताना औषध खरेदीत.. बरेच पैसे कमिशन मिळविले.. त्या दोन नंबरच्या पैशामुळे तर आपल्या कुटुंबाला त्रास होतोय का?
अश्विनीची झोप उडाली होती... तिचे वैवाहिक आयुष्य संपले होते, तिच्या नवऱ्यापासून तिला वेगळे व्हायचे होते.. त्याचा विचार सुरु असताना भावाला अपघात आणि आईची बायपास..तिचे बाबा अनैतिक पद्धतीने पैसे जमा करत होते... आईला ते आवडत नव्हते... ती वारंवार नवऱ्याला सावध करत होती.. पण तिचा नवरा ऐकत नव्हता..
एक महिना हॉस्पिटलमध्ये राहून हेरंब कुबड्याघेऊन घरी आला.. विजयाबाई बायपास करून नाजूक तब्येत सांभाळत घरी आल्या.. दोन खोल्यात दोन पेशंट. डॉ. जगदाळेची पैशाची गुर्मी उतरली होती. ज्या कुटुंबासाठी त्यानी पैसे मिळविले होते.. त्यापैकी दोघे बेडवर होते आणि कन्या...
तिचे वैवाहिक जीवन अर्ध्यावर थांबले होते..हे कुणामुळे? आपल्यामुळे?
    जगदाळेच्या कुटुंबातील वातावरण गढूळ झाले होते.घरात कामाला माणसे होती.. पैसे होते.. समृद्धी होती.. पण सुख नव्हते.
डॉ. जगदाळे याचे पिणे सध्या वाढले होते. पूर्वी त्यान्च्या पिण्याला त्यांची पत्नी अडथळा आणत होती.. पण आता तीच बेडवर आणि कुटुंबातील सर्वांचीच काळजी.
अश्विनी धावपळ करत होती. आपले वैयक्तिक दुःख विसरून आपल्या आईची, भावाची काळजी घेत होती.
घरातील सर्वांकडे पहाता पहाता अश्विनीला थकायला होई.. शारीरिक आणि मानसीक.. त्यात तिला एका पुरुषाचा वाईट अनुभव आल्याने तिला समग्र पुरुषजातीबद्दल तिटकारा आला होता.. या परिस्थितीत तिची अपेक्षा होती, तिच्या वडिलांनी तिला आधार द्यावा.. पण तिचे वडील डॉ. जगदाळे डोळ्यात पाणी आणत होते आणि बाटली जवळ करत होते. 
    वीस वर्षाचा हेरंब बेडवर झोपून छताकडे पहात राही.. या वयात आपण अपंग झालो.. तर पुढील आयुष्य कसे जाईल?
एका बेडरूममध्ये विजयाताई झोपल्या होत्या.. त्यांना कमालीचा थकवा आला होता..शारीरिक आणि मानसिक.. लाडकी लेक वैवाहिक जीवनात फसली होती आणि मुलाचे दोन्ही पाय कापावे लागले होते.. कुटुंबाची अशी परिस्थिती का व्हावी? आपल्या नवऱ्यामुळे? प्रत्येक वेळी आपण सावध करत होतो, पण आपल्या नवऱ्याने जणू डोळयांवर पट्टी बांधली होती स्वार्थाची.त्या मिळणाऱ्या टक्क्याच्या पुढे त्याला काही दिसत नव्हते..
डॉ. जगदाळे यांच पिणे फार वाढले होते.. ते एकसारखे डोळे पुसत आणि ग्लास तोंडाला लावत.. अश्विनीला ही परिस्थिती बघवेना.. तिला आयुष्यभर आपल्या पित्याचा राग आलेला असे.
पण तिची आई तिला गप्प करी.. पण आता ती गप्प राहणार नव्हती..
      अशीच एक दिवस तिने आपल्या भावाला त्याची औषधे दिली.. मग दुसऱ्या खोलीत येऊन आईची औषधे दिली आणि ती ग्यालरीत आली.. तिने पाहिले तिचे वडील डॉ. जगदाळे शून्य नजरेने बाहेर पहात होते.. आणि एक एक घोट व्हिस्की पित होते.. तिने पाहिले दुपार पासून पिणे सुरु होते आणि बाटली खाली होत आली होती.   
   अश्विनीला संताप आला.. या आपल्या बाबाचे काय करावे तिला समजेना.. घरात तिघेजण अशा परिस्थितीत असताना हा माणूस दुःख झाल्याचे दाखवून बाटली संपवू लागला?
   तिने रागाने आपल्या बाबासमोरची बाटली बाहेर फेकून दिली. ती चिडली... रागाने बोलू लागली..
'आता रडून आणि दारू पिऊन काय उपयोग? मी लहान होते त्यावेळी पण आई कळवळून सांगत होती.. हे बरे नाही.. हे भोगावे लागेल आपल्याला... तुम्ही उस्मानाबादला 
DHO म्हणून बदलून गेलात आणि बिघडलात.. एक सिंधी औषध सप्लायर तुम्हाला भेटायला आला... जिल्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल ची औषध खरेदी तुमच्या हातात..पैशाची बंडले त्याने तुमच्या हातात कोंबली आणि तुम्ही त्याला ऑर्डर दिलात.. त्याने डुप्लिकेट इंजेक्शन्स पुरवली आणि मग एका लहान PHC हॉस्पिटल मध्ये दोन मुले दगावली. बिचारी ती गरीब आईबाबा ची मुले... कुठे तक्रार करणार?  रडली दोन दिवस आणि गप्प बसली. त्या काळी सोशल मीडिया नव्हती की आजच्या सारखी वर्तमान पत्रे नव्हती..फिट येऊन दोन मुले दगावली असा तेथल्या डॉक्टरनी रिपोर्ट लिहिला कारण तो डॉक्टरपण तुम्ही दिलेल्या पैशाने तृप्त झाला होता... आई हे पहात होती.. तिला समजत होते.. आणि मग तुमची अशी औषध खरेदी सुरु झाली. एन्टीबीओटीकच्या कॅपशुल मध्ये हळद पावडर दिसू लागली.. कुणीतरी जालना भागात हे पेपरमध्ये लिहिले.. गुपचूप त्याचे खिसे गरम करून त्याचा आवाज तुम्ही गप्प केलात...
'पण अश्विनी.हे सारे मी तुमच्याच साठी करत होतो ना? तुम्ही दोघांनी चांगले शिक्षण घ्यावे.. चांगल्या घरात राहावे..
माझ्या आईला असले पैसे नकोच होते. एका वारकऱ्याची मुलगी ती.. ती तुमच्या पगारात खूष होती.. पण हे आयते मिळणारे पैसे तुमची नैतिकता बिघडवत होते.. दुर्दैवाने तुम्ही सहीसलामत सुटत होतात.
त्यामुळे गरज नसतानाही तुमची औषधंखरेदी वाढत होती. त्यातून मिळालेल्या पैशाने हे मुंबईतील प्लॅट्स.. गाड्या येत होत्या. तुमचे पाप वाढत होते. आई बेचैन झाली होती.. मग थोडे तरी पुण्य मिळावे याकरिता तिने तुमच्या भावाच्या मुलांना, बहिणीच्या मुलीला आपल्याघरी शिक्षणासाठी बोलावले आणि आमच्याबरोबर त्याना पण शिक्षण दिले. ती माझी चुलत भावन्डे हुशार निघाली आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिली. आई मंदिरात फारशी जायची नाही पण अनाथाश्रमात जायची आणि ज्या मुलांना शिक्षणासाठी ज्या गोष्टीची गरज असेल ते पुरवायची. तुमच्या पापाचे पैसे असे वापरून ती पुण्य मिळवायचा प्रयत्न करायची.
तुमचे पाप जास्त झाले त्यामानाने आईचे पुण्य कमी पडले असेल, त्यामुळे आपल्या कुटुंबाची अशी वाताहात झाली. तुम्ही खरेदी केल्यामुळे किती लोक आंधळी झाली असतील, बहिरी झाली असतील.. काहींच्या किडन्या फेल झाल्या असतील... आठवा उस्मानाबाद मधील दोन बालक.. भेसळ इंजेकशनमुळे फिट्स येऊन ती गेली. सांगलीतील एक आजोबा.. ब्लडप्रेशरच्या गोळया घेत असूनही त्याचे ब्लडप्रेशूर कमी झाले नाही आणि शेवटी ते गेले. किती मुलांचे डायरीय कमीच झाले नाही..शेवटी अंगातील ताकद संपून त्यानी राम म्हंटले.. आठवा.. आठवा..
'पुरे पुरे अश्विनी.. मला मागची आठवण नको..
'तुम्हाला आठवण नको मग त्या पेशंटच्या नातेवाईकांनी काय केल असेल.. एव्हडे करूनही तुम्ही कधी सापडला नाहीत.. निवृत्त होऊन सरकारी पेन्शन घेत आहात.
त्या निरापराध लोकांचा आक्रोश आम्हाला भोवतोय.. माझी, माझ्या आईची किंवा हेरंबची काही चूक नसताना दुर्दैवाचे फटके आम्हाला बसत आहेत... तुमच्यामुळे.. तुमच्यामुळे..
'चूक झाली ग अश्विनी.. कैफ चढलेला मला.. पैसे कमवण्याचा, एका पोस्टमनचा मुलगा मी, कष्टाने डॉक्टर झालो खरा.. पण हॉस्पिटल काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सरकारी नोकरी पकडली. पण आपले  क्लासमेंट हॉस्पिटल थाटून एव्हडे पैसे मिळवितात याचे वैष्मय वाटे मला.. मग DHO या पदावर आलो आणि पैसे कमवण्याचे दार मला दिसलें.. तुझी आई नको नको म्हणत असताना मोह आवरेना.. आणि..
'त्या मोहापाई मन आवरेना.. प्रॉपर्टीज, सोने.. म्हणजे सुख वाटलं तुम्हाला बरोबर?
'होय ग..
'पण तुम्हाला नियतीने धडा दिला.. तुमच्या मुलीला सुख नाही.. मुलगा अपंग केला.. पत्नी अंथरुणाला खिळली..
'त्याचेच मला दुःख आहे.. म्हणून मी..
'म्हणून दारू प्यायची नसते.. खूप पाप केलात ना.. त्याला उतारा म्हणून पुण्य करा..
'काय करू मी?
'तुम्ही डॉक्टर आहात बाबा.. सर्जन.. तुमच्या शिक्षणाचा गरिबांसाठी उपयोग करा.. आपल्या पालघर जिल्ह्यात आदिवासी पाडे आहेत, कोणी डॉक्टर तेथे पोचत नाही.. पाहिजे तर मी माझ्या मैत्रिणीना सांगते, त्या भागात त्या काम करतात.. त्या भागात डॉक्टर्सची गरज आहे.. तुम्ही तिकडे जा.. आईची किंवा हेरंबकडे लक्ष दयायला मी आहे.. तुम्हाला पुण्य मिळेल.. त्यानी तुमचे पाप थोडीतरी कमी होईल.
'मी जाईन अश्विनी.. मी जाईन.. मी त्या गरीब पेशन्टवर उपचार करीन. मला जर त्याने समाधान मिळतं असेल तर मला दारूची काहीच गरज नाही.. 
ठीक आहे.. माझी आई नेहेमी म्हणायची ते वाक्य..'या जन्मीचे पाप या जन्मीच फेडायचं असत..
        
प्रदीप केळुस्कर 9422381299 / 9307521152
17/01/ 26.

2600. साधेपणाचं सौंदर्य

     त्या लहानशा गावात फारसा गाजावाजा नव्हता. पण माणसांच्या नात्यांना अजूनही किंमत होती. तिथे भानुदास पाटील राहायचे. साधी धोतर-बंडी, डोळ्यांत शांतपणा आणि चेहऱ्यावर समाधान. लोक म्हणायचे ते फार सरळ होते, कुणावरही पटकन विश्वास ठेवायचे. 
त्यांचा मुलगा रोहन शहरात नोकरीला होता. सुट्टीत घरी आला की तो नेहमी सांगायचा की आजकाल सगळेच लोक चांगले नसतात, जरा जपून वागायला हवं. पण भानुदास फक्त हसून म्हणायचे की मी माणसांवर नाही तर कर्मावर विश्वास ठेवतो.
काही दिवसांपूर्वी गावात समीर  नावाचा माणूस येऊन राहिला होता. बोलण्यात गोडी, अंगावर नेहमी नीटनेटके कपडे, हातात महाग घड्याळ. तो स्वतःला मोठा गुंतवणूकदार म्हणवायचा आणि गावकऱ्यांना थोडे पैसे दिलेत तर दुप्पट परत मिळतील अशी स्वप्नं दाखवायचा. अनेक जण त्याच्या बोलण्याला भुलले. एक दिवस तो भानुदासांकडेही आला आणि म्हणाला की 
तुमचे पैसे नुसते पडून आहेत, माझ्याकडे दिलेत तर सोन्यासारखे वाढतील. तेव्हा भानुदास शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाले की खरं सोनं असलं की त्याला चमकवायला मुलाम्याची गरज नसते. समीर हसून निघून गेला, जुन्या विचारांची माणसं म्हणून त्यांना हिणवल.
काहीच दिवसांत समीरने गावातून मोठी रक्कम जमा केली आणि एका पहाटे कुठेही न सांगता पळून गेला. गावात एकच गोंधळ उडाला. लोकांच्या डोळ्यांत पाणी, घराघरांत हताश in. कुणाचे मुलीच्या लग्नाचे पैसे गेले होते, कुणाचे शिक्षणाचे. त्या संध्याकाळी भानुदास मंदिरात शांतपणे बसले होते. तेवढ्यात शेजारीण लताबाई रडत आली. तिच्या आवाजात भीती होती. तिने सांगितलं की मुलीच्या लग्नासाठी साठवलेले सगळे पैसे गेले, आता पुढे काय करायचं कळत नाही.
भानुदास काही वेळ गप्प राहिले, मग हळूच उठून घरी गेले. जुन्या लोखंडी पेटीतून त्यांनी आयुष्यभर कष्टाने जमवलेले पैसे काढले आणि लताबाईंच्या हातावर ठेवले. 
तुझ्या मुलीचं नशीब पैशाअभावी अडू देऊ नकोस, एवढंच ते म्हणाले. लताबाईंचे डोळे भरून आले. 
लोक खोटं बोलतात, फसवतात, तरी तुम्ही एवढं चांगलं कसं करता असं तिने विचारलं. तेव्हा भानुदास म्हणाले की कर्माचा हिशोब होतो आणि ज्याचा हिशोब होतो ते जपूनच करायला हवं.
त्याच रात्री रोहन घरी आला. सगळं ऐकल्यावर त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तो वडिलांच्या पाया पडला आणि म्हणाला की आज मला खरं कळलं, धन, सत्ता, सौंदर्य आणि विद्वत्ता हे सगळं मुलाम्यासारखं असतं, थोडा काळ चमकतं पण टिकत नाही. तुमचं साधेपण आणि प्रामाणिकपणा हेच खरं सोनं आहे. भानुदासांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत सांगितलं की या विश्वात आपलं स्थान काय आहे आणि आपण स्वतःला काय समजतोय याचं भान ठेवलं की माणूस कधीच खोट्या दागिण्याला खरं सोनं समजत नाही.
समीरचं नाव हळूहळू विस्मरणात गेलं, पण भानुदास पाटीलांचं नाव आजही त्या गावात आदरानं घेतलं जातं, कारण मुलामा उतरतो, पण चांगल्या कर्माचं सोनं कधीच काळं पडत नाही.
भानुदासांनी लताबाईंच्या हातावर पैसे ठेवले त्या दिवसानंतर गावात एक वेगळंच शांत अवघडलेपण पसरलं. लोक बाहेरून हसत होते, पण आत कुठेतरी विश्वास तुटलेला होता. प्रत्येक जण कुणाकडेही संशयाने पाहू लागला. त्या रात्री भानुदास झोपलेच नाहीत. कौलारू घराच्या ओसरीत बसून ते अंधाराकडे पाहत राहिले. पेटीतले पैसे दिल्यानंतर घरातली पेटी रिकामी झाली होती… आणि त्यांचं मन मात्र अजूनही भरलेलं होतं.
पहाटे उठून ते नेहमीसारखे देवासमोर दिवा लावायला बसले. हात थरथरत होता. दिवा पेटेना. तेवढ्यात त्यांच्या डोळ्यांत पाणी साठलं.
“देवा… मी चूक तर नाही केली ना?”
पहिल्यांदाच त्यांच्या मनात असा प्रश्न उभा राहिला.
दिवसभर अंगात कसंसं होत राहिलं. दुपारी जेवण झाल्यावर अचानक त्यांना चक्कर आली. रोहन धावत आला.
“बाबा… काय होतंय?”
भानुदास काहीच बोलले नाहीत. फक्त छातीकडे हात नेला. डोळे मिटले… आणि क्षणभर सगळं शांत झालं.
गावात बातमी पसरायला वेळ लागला नाही. “भानुदास पाटील पडलेत.” 
लताबाई पहिल्यांदा धावत आली. तिच्या हातात कापडात बांधलेले पैसे होते. ती रडत म्हणाली,
“काका… हे घ्या… तुमचे पैसे परत. मला तुमचं उपकार घेऊन जगायचं नाही.”
भानुदासांनी हळूच डोळे उघडले. तिच्याकडे पाहून त्यांनी डोकं हलवलं.
“नको लता… हे पैसे माझे नाहीत आता. ते तुझ्या मुलीच्या भविष्यासाठी आहेत.”
त्याच क्षणी भानुदासांच्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळले. ते म्हणाले,
“माणसांनी माझा विश्वास तोडला, पण कर्मानं नाही. माझा श्वास गेला तरी चालेल, पण माझं कर्म डागाळलेलं नको.”
त्या शब्दांनी रोहनचं काळीज तुटलं. तो रडत म्हणाला,
“बाबा… तुमच्याजवळ काहीच उरलं नाही.”
भानुदास मंद हसले.
“उरलंय रे… खूप काही उरलंय. माणसांच्या डोळ्यातलं पाणी, तेच माझं खरं धन आहे.”
संध्याकाळी गावातले काही जण एकत्र जमले. ज्यांना समीरने फसवलं होतं, ते सगळे. कोणी भानुदासांसाठी फळं घेऊन आलं, कोणी औषधं, तर कोणी फक्त शांतपणे त्यांच्या पायाशी बसून राहिलं. कुणाच्याही तोंडून शब्द नव्हते, पण सगळ्यांच्या डोळ्यांत अपराधीपणा होता.
त्या रात्री भानुदासांनी रोहनचा हात धरला. हात बर्फासारखा थंड झाला होता.
“रोहन… लक्षात ठेव. धन, सत्ता, विद्वत्ता सगळं संपतं. पण माणूस म्हणून जगल्याचं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतं.”
एवढं बोलून त्यांनी डोळे मिटले.
क्षणभर वाटलं, ते पुन्हा उघडतील… पण तसं झालं नाही.
दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालं. लोक रडत होते, कारण एक माणूस गेला नव्हता… तर विश्वासाचा आधार गेला होता.
लताबाईच्या मुलीचं लग्न ठरलं. रोहनने शिक्षणासाठी एक छोटा निधी सुरू केला—“भानुदास स्मृती निधी.” कुणी पैसे देताना सोनं तपासलं नाही, कारण सगळ्यांना ठाऊक होतं…
इथे मुलामा नाही,
इथे फक्त खरं सोनं आहे.
भानुदास गेल्यानंतर काही महिने गेले. घर तसंच होतं, पण ओसरीवरचा शांतपणा वेगळाच वाटायचा. सकाळी देवासमोर दिवा लावला की रोहनला अजूनही बाबांचा थरथरता हात दिसायचा. कधी कधी वाटायचं, ते अजून आहेत… फक्त बोलत नाहीत.
एक दिवस लताबाईची मुलगी लग्नाच्या वेषात भानुदासांच्या फोटोसमोर उभी राहिली. हात जोडून म्हणाली,
“काका, तुमच्या पुण्याईनं माझं घर बसतंय.”
त्या क्षणी रोहनचे डोळे भरून आले.
हळूहळू गाव बदलू लागलं. लोक पैशापेक्षा माणूस पाहू लागले. कुणी काही सांगितलं, तर लगेच विश्वास ठेवायचा नाही… पण कुणी मदतीचा हात दिला, तर तो नाकारायचा नाही, हे भानुदासांनी शिकवून ठेवलं होतं.
मंदिराच्या ओसरीवर एक छोटी पाटी लावली गेली. त्यावर लिहिलं होतं—
“इथे सोनं तपासलं जात नाही,
इथे कर्म मोजलं जातं.”
रोहन रोज त्या पाटीकडे पाहायचा. डोळे पाणावायचे, पण छाती अभिमानानं भरून यायची. त्याला जाणवत होतं…
भानुदास गेले नाहीत.
ते प्रत्येक प्रामाणिक कृतीत आहेत,
प्रत्येक मदतीच्या हातात आहेत,
आणि प्रत्येक अश्रूत
जे कुणाच्या डोळ्यातून ओघळतात.
कारण खरं सोनं मरणानंतरही झिजत नाही.

©️ कैलास मोरे ✍️✍️✍️ 




2599. नात्यांची उकल 💐💐

     पुण्यातील एका टोलेजंग इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर अद्वैत आणि रिया राहत होते. खिडकी उघडली की अख्खं शहर पायाशी लोळण घेत असल्यासारखं दिसायचं; रात्री दिव्यांची माळ चमचमायची. पण त्या उंचीवरही त्यांच्या मनातली दरी दिवसेंदिवस खोल होत चालली होती. चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. तेव्हा दोघांनाही वाटलं होतं.
आता आयुष्याची सगळी स्वप्नं एकत्र जगायची. पण शहराच्या धावपळीत, ऑफिसच्या डेडलाईन्समध्ये, आणि घरातल्या छोट्या-छोट्या कुरबुरींमध्ये प्रेम कधी रागात बदललं, हे दोघांनाही कळलंच नाही.
अद्वैतचे आई-वडील त्यांच्यासोबतच राहत होते. शालिनीताईंना वाटायचं की सून म्हणजे घराची सगळी सूत्रं हातात घेणारी, पदर खोचून जबाबदारी निभावणारी असावी.
 पण रिया आधुनिक विचारांची आर्किटेक्ट होती. तिचं घराकडे पाहण्याचं, नात्यांकडे पाहण्याचं दृष्टीकोन वेगळा होता. ती जबाबदारीपासून पळ काढत नव्हती, पण तिला स्वतःची ओळखही जपायची होती. ह्याच फरकातून टोमणे, गैरसमज आणि खटके वाढू लागले. 
अद्वैत प्रत्येक वेळी आईची बाजू घेत राहिला. त्याला वाटायचं. 
आपण बरोबर करतोय.
 पण रियाला हळूहळू जाणवू लागलं की या घरात तिच्या भावना ऐकणारा कोणीच उरलेलं नाही.
रिया माहेरी गेली. तिच्या आई-वडिलांनी समजूत घालण्याऐवजी मुलीचा अभिमान जपण्याच्या नादात अद्वैतच्या कुटुंबावर आरोप केले. दोन्हीकडचा अहंकार एवढा वाढला की संवादाचं दारच बंद झालं आणि प्रकरण थेट घटस्फोटाच्या अर्जापर्यंत पोहोचलं.
घटस्फोटाची तारीख जवळ आली होती. अद्वैतचं घर ओकंबोकं झालं होतं. एके दिवशी रिया तिचं उरलेलं सामान न्यायला आली. 
सासू-सासरे दुसऱ्या खोलीत होते. घरात एक विचित्र शांतता पसरली होती—जणू भिंतीही काहीतरी ऐकत होत्या. रिया कपाटातले कपडे बॅगेत भरत होती. अद्वैत दारात उभा राहून तिला पाहत होता, काही बोलायचं असूनही शब्द हरवलेले.
तेवढ्यात रियाच्या हातातून एक जुनी छोटी डायरी खाली पडली. 
अद्वैतने पुढे होऊन ती उचलली. ती त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या वर्षातली होती. डायरी उघडताच दोघांच्या नजरा एका पानावर खिळल्या. 
त्या पानावर त्यांनी मिळून आपल्या नव्या घराचं स्वप्न रेखाटलं होतं. खाली लिहिलं होतं—
“हे घर फक्त सिमेंट-वाळूचं नसेल, तर आपल्या प्रेमाचं असेल. इथे ‘मी’ आणि ‘तू’ नसेल, फक्त ‘आपण’ असू.”
त्या ओळी वाचताच दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं. अद्वैतचा आवाज कातर झाला.
“रिया, आपण काय करतोय? हेच स्वप्न पाहिलं होतं का आपण?”
रिया रडत म्हणाली, “मला फक्त तुझी साथ हवी होती अद्वैत. तू माझा हात धरला असतास, एवढंच पुरेसं होतं.”
अद्वैत ढसाढसा रडला. “माझं चुकलं. आई-वडिलांचा आदर करताना 
मी नवरा म्हणून माझी जबाबदारी विसरलो.”
त्यांचा आवाज ऐकून शालिनीताई आणि प्रमोदराव बाहेर आले. 
त्याच वेळी रियाचे आई-वडीलही घरात आले. मुलांना एकमेकांचा हात धरून रडताना पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत चूक उमटली. त्या दिवशी त्या घरात केवळ घटस्फोट थांबला नाही, तर अहंकारही गळून पडला.
काही दिवसांनी कोर्टाच्या थंडगार व्हरांड्यात अद्वैत आणि रिया समोरासमोर बसले होते. त्यांच्या मधे अंतर होतं, पण मनातली दरी अजून खोल वाटत होती. वकील कागदपत्रं तपासत होते. रियाच्या हातात लग्नाची अंगठी नव्हती, 
पण तिची खूण अजून बाकी होती—अगदी त्यांच्या नात्यासारखी.
अद्वैत उठून तिच्या शेजारी बसला.
“रिया… अजून खूप काही बोलायचं बाकी आहे.”
रिया थरथरत्या आवाजात म्हणाली, “आता काय उरलंय?”
“आपण एकमेकांपेक्षा इगोला जास्त महत्त्व दिलं,” अद्वैत म्हणाला. 
“तू माझी जोडीदार आहेस, स्पर्धक नाहीस.”
आज रियाने त्याचा हात झटकला नाही. दोघंही उभे राहिले. 
पालकांसमोर त्यांनी पहिल्यांदाच ठामपणे आपली भूमिका मांडली. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं—
मुलांच्या संसारात मार्गदर्शक व्हायचं असतं, अडथळा नाही.
रिया पुढे आली. तिने वकिलाच्या हातातून फाईल घेतली आणि सगळ्यांसमोर फाडून टाकली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, पण त्यात दुःख नव्हतं—नवी उमेद होती.
त्या दिवशी पुण्यातील त्या कोर्टाच्या पायरीवर एका नात्याचा अंत झाला नाही, तर एका जुन्या विचाराचा अंत झाला. ‘मी’ आणि ‘तू’च्या भांडणात हरवलेलं
 ‘आपण’ पुन्हा जिंकलं.
 आणि त्या पंधराव्या मजल्यावरील घरात, शहराच्या दिव्यांपेक्षा उजळ असा प्रेमाचा दिवा पुन्हा पेटला.
कोर्टाच्या पायऱ्यांवरून बाहेर पडताना अद्वैत आणि रिया दोघेही शांत होते. हातात हात नव्हता, पण मनातली दरी आता थोडीशी भरून येत होती. बाहेरचा उन्हाचा तडाखा तसाच होता, गर्दी तशीच होती, पण त्यांच्या आयुष्यात मात्र काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती. आज त्यांनी घटस्फोट थांबवला होता, पण त्याहून मोठं आव्हान पुढे उभं होतं—
नात्याला पुन्हा नव्याने उभं करणं.
घरी परतल्यावर ते घर पुन्हा एकदा उघडलं गेलं. पण यावेळी ते घर नव्या संसारासारखं वाटत नव्हतं; ते जखमी नात्यासारखं होतं—जगवायचं असेल तर खूप जपावं लागणार.
 रिया हळूहळू घरात फिरत होती. भिंती, खिडक्या, बाल्कनी… सगळं तसंच होतं, पण आठवणींचं ओझं जड होतं. अद्वैत स्वयंपाकघरात उभा राहिला. अनेक दिवसांनी त्याने स्वतःसाठी चहा केला आणि दुसरा कप नकळत रियासाठी ठेवला.
रिया क्षणभर थांबली. “आजपासून नियम बदलूया,” ती शांतपणे म्हणाली.
अद्वैतने मान डोलावली. “हो. आजपासून आपण एकमेकांशी गप्प बसणार नाही. दुखावलं तरी बोलायचं.”
त्या रात्री दोघंही झोपले, पण झोप लागली नाही. रियाच्या मनात भीती होती—पुन्हा तेच होईल का? अद्वैतच्या मनात अपराधीपणा होता.
मी तिला खरंच समजून घेईन ना? पण या प्रश्नांसोबतच एक नवी जाणीवही होती—यावेळी पळ काढायचा नाही.
दुसऱ्या दिवशी अद्वैतने ऑफिसमधून लवकर येण्याचा निर्णय घेतला. रियालाही ऑफिसमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. संध्याकाळी दोघं बाल्कनीत बसले. शहराचे दिवे पेटत होते. रिया म्हणाली, 
“मला माझं करिअर सोडायचं नाही. पण मला घरही हवंय. दोन्ही शक्य आहेत, फक्त साथ हवी.”
अद्वैतने पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं,
 “आणि मला आई-वडिलांचा आदर करायचाय, पण त्यासाठी तुला कमी लेखायचं नाही. गरज पडली तर मी त्यांच्याशीही ठाम बोलेन.”
काही दिवसांतच पहिली कसोटी आली. शालिनीताई जुन्याच सवयीने रियावर टीका करायला लागल्या. यावेळी अद्वैत मध्येच बोलला. 
“आई, रिया चुकीची नाही. तिची पद्धत वेगळी आहे, आणि ते स्वीकारायला आपल्याला शिकायला हवं.”
शालिनीताई क्षणभर गप्प झाल्या. त्या शब्दांनी त्यांनाही धक्का बसला. पण तो धक्का आवश्यक होता.
रिया हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यांत पाणी आलं, पण यावेळी ते असहायतेचं नव्हतं—विश्वासाचं होतं. त्या रात्री तिने अद्वैतच्या खांद्यावर डोकं ठेवलं. 
“आज पहिल्यांदा मला वाटलं, मी एकटी नाहीये.”
हळूहळू दिवस सरकू लागले. भांडणं झाली नाहीत असं नाही, पण ती मिटवण्याची हिंमत दोघांमध्ये आली.
आणि पालकांनीही अंतर ठेवायला सुरुवात केली. सून-जावईपेक्षा मुलगा-मुलगी सुखी आहेत का, हे महत्त्वाचं आहे, हे त्यांना कळू लागलं.
एके दिवशी रियाने ती जुनी डायरी पुन्हा उघडली. शेवटच्या रिकाम्या पानावर तिने लिहिलं—
“स्वप्नं तुटतात, पण माणसं तुटू नयेत. ‘आपण’ टिकवण्यासाठी कधी कधी ‘मी’ मागे घ्यावा लागतो.”
अद्वैतने ते वाचलं आणि शांतपणे तिच्या शेजारी बसला. बाहेर शहर तसंच धावत होतं, पण त्या पंधराव्या मजल्यावर आता दोन माणसं नव्हती. दोन जखमी, पण सावरत चाललेली मनं होती आणि त्यांना माहीत होतं, हा प्रवास सोपा नाही…
 पण यावेळी ते एकत्र चालणार होते.

©️ कैलास मोरे ✍️✍️✍️

2598. आजोबांच्या व्रताचा वसा

     तीन महिन्यांपूर्वी, कॉलेजात जाणाऱ्या माझ्या मुलाने आमच्या स्कूटरचा अपघात केला. चूक त्याचीच होती. स्कूटर चालवताना हा दीडशहाणा मोबाईल बघत होता. नशीब चांगलं की त्याला फारसं लागलं नाही आणि त्याच्या स्कूटरमुळे दुसऱ्या कोणाला काही झालं नाही. पण स्कूटरचा पार सत्यानाश झाला होता. 
     मेकॅनिकने दुरुस्तीचा खर्च भरमसाट सांगितला होता - ११,००० रुपये. गाडी जुनी असल्याने गाडीच्या विम्याचे काही फारसे पैसे मिळणार नव्हते, आणि स्कूटरची गरज तर आम्हाला खूप होती. 
     करोनामध्ये नवऱ्याची नोकरी गेली होती, मोठ्या मिनतवाऱ्या करून एका इमारतीत रखवालदाराची नोकरी मिळाली होती - दहा हजार मिळायचे, पण दरमहा त्यातले हजार रुपये नोकरी लावणाऱ्या मध्यस्थाला द्यावे लागायचे. मला एका ठिकाणी पार्ट टाईम नोकरी होती, उरलेल्या वेळात मी डबे करायचे, तेच पोचवण्यासाठी स्कूटर लागायची. 
     त्या गॅरेजमधल्या एकाने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले, आजूबाजूला कोणी नाही बघून त्याने हळूच मला एका दुसऱ्या गॅरेजबद्दल सांगितलं, "एक म्हातारा कारागीर आहे तिथं. जुगाड करतो, कमी किंमतीत काम होईल तुमचं. बघा तुम्हाला चालतंय का ते."
     स्कूटर कशीबशी चालवत मी त्या पत्त्यावर पोहचले. एखाद्या  भंगारखान्यासारखं दिसत होतं ते गॅरेज. सगळीकडे गंजलेल्या, तुटक्या फुटक्या स्कूटर्स, मोटार सायकली होत्या. रंग उडालेला, पोपडे निघणारा गॅरेजच्या नावाचा फलक कसाबसा लटकलेला होता.
     मी गाडी मागे घेऊन परतच जाणार होते तेवढ्यात गॅरेजमधून एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याचे वय पंचाहत्तर असावे, कदाचित त्याहूनही जास्त. ग्रीस लागलेले कपडे, हात थोडे थरथरत होते. "स्कूटरला काय झालं मुली ?" त्याने विचारले.
     मी त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्या आजोबांनी गाडीकडे पाहिले, ते काहीतरी पुटपुटले आणि गॅरेजमध्ये गेले. काही मिनिटांनी एका कागदावर कसलासा हिशेब घेऊन ते परत आले, "मी ३,००० रुपयांमध्ये दुरुस्त करून देतो."
     माझा विश्वास बसेना, "अहो, पण सर्व्हिसिंग सेंटरवाले तर..."
    "ते नवीन सुटे भाग आणि महागडा रंग वापरतात, इंग्लिशमध्ये यस फ्यस करतात," आजोबा म्हणाले, "मी नवेकोरे पार्ट्स नसेन वापरत, पण चांगले असले तरच वापरतो. गाडी १००% सुरक्षित असण्याची गॅरंटी माझी. ३,००० रुपये."
     हे बिल नक्कीच कमी होतं, पण माझ्याकडे तेवढेही पैसे नव्हते. "आणि... मी पैसे कधी देऊ?"
      "तुम्ही आता १,००० रुपये देऊ शकाल का? बाकीचे जसे जमतील तसे द्या. काही घाई नाही."
     मी तिथेच उभी राहिले. "तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत आहात?"
      त्यांनी आयुष्य अनुभवलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. "करोनाने माझा तरुण मुलगा माझ्यापासून हिरावून नेला. बायको आधीच वारली होती. लेक लग्न होऊन दुसऱ्या शहरी गेलेली. मी एकटा पडलो. मी सैरभैर झालो होतो. तेव्हा एकाने मला मदत केली. औषधं, जेवणखाण, पैसे - हर तऱ्हेने मदत केली. तो दर दिवसाआड मला भेटायला यायचा. 
      मुलाच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर यायला मला तीन चार महिने लागले. त्या भल्या माणसाने माझ्याकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही. "कोण्या गरजवंताला मदत कर," तो मला म्हणाला. मी काही फार पैसा बाळगून नाही, बजाजमध्ये नोकरी करून निवृत्त झालो होतो. कोणाला नगद पैसे देता येणार नाहीत मला, पण दुचाकी दुरुस्त करता येतात मला. मग तेव्हापासून हेच काम पुन्हा करू लागलो," आजोबा सांगत होते. 
     दोन दिवसांत त्यांनी माझी स्कूटर दुरुस्त केली, एकदम ठणठणीत. मुलाला घेऊन मी स्कूटर आणायला गेले होते, आजोबांनी खोटंच दटावत माझ्या लेकाचा कान धरला, "पोरा, अपघातात स्कूटरचं काही नुकसान झालं, तर मी दुरुस्त करायचा प्रयत्न करेन, पण तुला काही दुखापत झाली, तर तुझ्या आईकडे कोण बघणार ?"
      जसं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा दर दहा पंधरा दिवसांनी मी २०० - ५०० रुपये घेऊन त्यांच्याकडे जायचे. दर वेळी कोणीतरी आपली बिघडलेली दुचाकी आणि विस्कटलेलं आयुष्य घेऊन त्यांच्याकडे आलेलं असायचं. कोणाचं पेन्शन अजून जमा झालेलं नसायचं, कोणाला कामावरून कमी केलेलं असायचं, कोणी परराज्यातून आलेला असायचा - पार मोडकळीला आलेल्या जुन्यापुराण्या गाड्या - आजोबा सगळ्यांना उभारी द्यायचे, नवा आशावाद द्यायचे, आणि हे सगळं कमी किंमतीत, सुलभ हप्त्यावर, किंवा अनेकदा फुकट. 
      जेव्हा मी माझं शेवटचं पेमेंट करत होते, तेव्हा न राहवून, मी त्यांना विचारलं, "हे चॅरिटी वगैरे सगळं ठीक आहे, पण तुमच्या पोटापाण्याचं काय ?"
    "काही जण एकरकमी सगळे पैसे देतात, त्यावर थोडाफार गुजारा होतो. बरेच जण पैसे देऊ शकत नाहीत, त्यामुळे माझी अजून गरज आहे हे जाणवत रहातं."
      मध्ये बराच काळ लोटला, आज आत्ता डबे द्यायला गेलेला मुलगा सांगत आला, तो आजोबांच्या गॅरेजच्या बाजूला गेला होता, तर आजोबा दिसले नाहीत, आणि गॅरेजवर "for sale" असा बोर्ड लागला होता. 
      मी चरकले, मोबाईलमधला त्यांचा नंबर हुडकला आणि फोन केला. फोन त्यांच्या मुलीने उचलला. "बाबा आजारी आहेत, वय झालं त्यांचं. आता घरी आले आहेत हॉस्पिटलमधून. प्रकृती जरा आणखी सुधारली की मी त्यांना माझ्या सासरी घेऊन जाईन. म्हणून गॅरेज विकायला काढलं आहे." 
      मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. ते झोपले होते, अंगात ताकद नव्हती अजिबात. 
      "मी त्यांचे हिशेब पहात होते. बँकेत फक्त १८,००० रुपये आहेत त्यांच्या. त्यांची जमाखर्चाची वही पाहिली. ७२ जणांकडून पैसे यायचे बाकी आहेत - सगळे मिळून पाच लाखांच्यावर येणं बाकी आहे, पण बाबांनी त्या उधारीसमोर नोंद केली आहे - उधारी माफ केली आहे, माझ्या पैशांच्या गरजेपेक्षा ही स्कूटर त्यांना मिळणं जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं होतं."
      मी त्या सगळ्यांची नावं आणि फोन नंबर घेतले आणि सगळ्यांना निरोप दिले. 
     दोन दिवसांनी आजोबांच्या मुलीचा फोन आला, आजोबा वारले होते. 
      आम्ही सगळे अंत्यसंस्काराला गेलो होतो, उधारी बाकी असलेले तर आले होतेच, पण बाकीचेही अनेक जण - त्या सगळ्यांना आजोबांनी वेळोवेळी मदत केलेली होती. 
      आम्ही सगळ्यांनी आम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे गोळा केले होते, आजोबांची उधारी तर पूर्ण जमा झालीच, थोडे आणखी जास्त पैसेही जमा झाले होते. आम्ही ते सगळे पैसे त्यांच्या मुलीला दिले. 
     नंतर, माझ्या मुलाने मला विचारले, “आई, तू का रडत आहेस? तू त्यांना फारसं ओळखतही नव्हतीस.”
     “कारण,” मी त्याला म्हणाले, “त्या माणसाने मला एक अशी गोष्ट शिकवली, जी माझ्या - तुझ्या पिढीने शिकायला हवी. दररोज, आपण लोकांना पाहतो. त्यांच्या अडचणी पाहतो, त्यांच्या बिघडलेल्या गाड्या, त्यांचे रिकामे खिसे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांची बिनसलेली मनं. आता तुला ठरवायचं आहे - यांना तू मदत करणारा होणार आहेस का त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणारा ?”
     मला काय म्हणायचं आहे हे माझ्या मुलाला समजले. गेल्या महिन्यापासून, तो एका अनाथाश्रमात जाऊ लागला आहे - तिथल्या मुलांना तो शिकवतो. त्याबद्दल बडेजाव करत नाही, पण नियमितपणे जातो. आजोबांच्या व्रताचा वसा आता माझ्या मुलाने घेतला आहे.     .

मुळ इंग्रजी कथा लेखक- अनामिक..             .
स्वैर मराठी अनुवाद- श्री. मकरंद पिंपुटकर,
चिंचवड, पुणे.

2597. करोडपती

 शनीपारचा चौक ओलांडून समीरने गाडी सावकाश चितळे बंधू स्वीट समोरून पुढे काढली. 
तोच शेजारी बसलेले अण्णा अचानक" अरे गाडी थांबव, गाडी थांबव". असे ओरडले.
" अहो अण्णा ही काय गाडी थांबवायची जागा आहे का? इथं ट्रॅफीक पोलीस दोन मिनिटं गाडी उभी करू देत नाहीत". 
समीरने थोडं त्रासानेच पण गाडी बाजूला घेत म्हटलं.
" अरे फकत एक मिनिट, मला खाली उतरू दे. तू गाडी पुढे पार्क कर"
अण्णा माघार घ्यायच्या मनस्थितीत नव्हते, हे ओळखून समीरने गाडी तुळशीबागे समोरच उभी केली. 
बाजूनं जाणाऱ्या मोटर सायकल स्वराला अडवतच अण्णांनी गाडीचं दार उघडलं, आणि फुटपाथ वरून उलट्या दिशेने चालायला सुरुवात केली.
अण्णांनी काय पाहिलं? एवढया घाईघाईनं ते कशासाठी चालत गेले? आशा नाना प्रश्नांनी समीरला बुचकळ्यात टाकलं. 
लक्षमी रोड ओलांडून त्यानं गाडी पार्क केली, आणि घाईघाईतच तो मागे चालत आला, आणि त्याचा जीव भांड्यात पडला. 
अण्णा एका जोडप्याबरोबर बोलत उभे असलेले त्याला दिसले. पाध्ये काका काकू होते ते. जवळ जवळ तीन महिन्यांनी समीर त्यांना पहात होता.
" नमस्कार करतो काका ".
असं म्हणून त्याने चक्क फुटपाथवर वाकून दोघांना नमस्कार केला.
पाच एक मिनिटेच त्यांचं बोलणं झालं असेल, तोच चितळे स्वीटमधून बाहेर आलेल्या साधारण पन्नाशीच्या बाई त्यांच्याजवळ आल्या.
" या साधलेताई, आम्ही यांच्याच सिंहगडाच्या आश्रमात राहतो".
त्यानंतर झालेल्या पाच एक मिनिटांच्या गप्पातून एकच गोष्ट अण्णांना जाणवली, की पाध्ये काकाकाकूंनी साधलेताईंना त्यांच्या कुटुंबाविषयी इथंभूत माहिती यापूर्वी दिली होती.
" ताई, मी आज या दोघांना माझ्या घरी मुक्कामाला घेऊन जाणार आहे, अर्थात तुमची काही हरकत नसेल तर".
बरेच आढेवेढे घेतल्यानंतर पाध्ये जोडपे एकदाचे त्यांच्या घरी मुक्कामाला तयार झाले होते.
" एका अटीवर आम्ही दोघे तुमच्या घरी यायला तयार आहोत अण्णा, तिथे गेल्यावर आम्ही अजितकडे जाणार नाही"
काका ठामपणे उद्गारले होते.
" काका, आपली घरं काय वेगळी आहेत का? तुम्ही आपल्याच घरी जात आहात असंच समजा"
समीरने क्षणभर अण्णांकडे पाहुन डोळे मीचकवीत म्हटलं.
वाटेत ताईंना बसस्टॉपवर सोडून ते घरी आले. गाडीचा हॉर्न ऐकून सुजातान दार उघडलं होतं. 
तसा " आबा आले, आबा आले" असं म्हणत सोहम दुडू दुडू धावत आला होता.पाध्ये काकांनी त्याला प्रेमानं उचलून घेतलं होतं. 
सुजताने सगळ्यांना पाणी आणून दिले व ती पाध्ये काकाकाकूंच्या पाया पडली, ते पाहून सोहमदेखील "जय जय" म्हणत त्यांच्या पाया पडला.
सोसायटीतच असलेल्या राममंदिरात भजनाला गेलेल्या माई परत 
स्वयंपाक तयार झाल्यावर हॉलमध्ये गोलाकार बसून जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. 
जेवणाबरोबर हास्यविनोद,काकांचे आश्रमतले किस्से, काकुंच महिला मंडळ आणि साधले ताईंची आश्रमातील आपुलकीची वागनुक हे विषय तोंडी लावायला होतेच.
गप्पाच्या आणि अग्रहाच्या नादात जेवणं कधी संपली त्यांना कळलं देखील नव्हतं.
मग अर्धा तास आवराआवर उरकून सगळे पत्ते खेळायला बसले, खेळ इतका रंगला की झोपायला रात्रीचे अकरा कधी वाजले कोणाच्या लक्षात देखील आले नाही.
---2---
दुपारची जेवणं उरकली होती, अण्णा आणि माई टी. व्ही. पाहण्यात मग्न होते. तर सुजाता जाजमावर बसून सोनूशी खेळत होती. तेवढ्यात पोस्टमन न आवाज दिला होता. 
अण्णांनी गेटवरच्या लेटर बॉक्स मधून एक पत्र हाती घेतलं, आणि त्यांना आश्रयाचा धक्का बसला. 
पाध्ये काका काकूंना घरी येऊन आठ दिवसच झाले होते, आणि त्यांनी आश्रमातून अण्णांना चक्क पत्र लिहिलं होतं. 
माईंना ते दाखवून त्यांनी उत्सुकतेनं वाचावयास सुरुवात केली.
प्रिय अण्णा,
सप्रेम नमस्कार
पत्र पाहून तुम्हास आश्चर्य वाटले असेल. आम्ही नुकतेच तुमच्या घरी येऊन गेलो आणि मी पत्र काय लिहीत आहे म्हणून. 
पण अण्णा, सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात बोलता आल्या नाहीत किंवा संकोचाने त्या बोलू शकलो नाही म्हणा म्हणून लिहावंसं वाटलं. 
आमचं मन मोकळं करायला तुम्हा दोघांशिवाय आम्हाला आता दुसरं कोणी नाही हे तुम्ही जाणताच.
त्यादिवशी आपण गावात भेटलो. चालत्या गाडीतून आम्ही दोघे दिसताच एवढ्या गर्दीतही गाडी थांबवून आम्हाला भेटायला आलात. 
तुमचा समीरही बऱ्याच वर्षांनी भेटल्यासारखा भररस्त्यात कसलाही संकोच न बाळगता आमच्या पाया पडला. 
तुम्ही आग्रहानं आपल्या बरोबर घरी घेऊन गेलात. आजकालच्या मतलबी जगात सख्ख्या नात्याची माणसे ज्या आपुलकीनं करीत नाहीत असं स्वागत तुमच्या सुनेने केलं. तुमच्या गॉडस नातवाला भेटून तर आम्हा दोघांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले होते. 
त्या माय लेकरांच्या निरोप घेताना तर आम्ही उभयतां तिचे सख्खे आईबाप असल्यासारखे भावनाविवश झालो आम्ही.
आमचा अभय सपत्नीक अमेरिकेला गेला , तेव्हा काळजाचा एक तुकडा तुटून गेल्यासारखं झालं आम्हाला. 
एकमेकांस आधार देत त्यातून कसेबसे सावरलो आम्ही. अजितला त्याचे मेल यायचे तेव्हा त्याची खुशाली आम्हाला कळायची. 
त्याची तिथली श्रीमंती, तो थाटमाट सगळं ऐकून आनंद व्हायचा. आपण केलेले कष्ट, प्रसंगी केलेले त्याग ह्या सगळयाच कसं चीज झाल्यासारखं वाटायचं.
ज्याच्याकडून आम्ही उरल्यासुरल्या अपेक्षा बाळगून होतो, त्या अजित बद्दल तर तुम्ही जाणताच. 
लग्नानंतर तो आम्हा दोघांपासून फार दुरावला गेला. अण्णा, चार सहा माणसांनी भरलेलं एकत्र कुटुंब म्हटले की, वादविवाद हे होणारच पण स्वतःच्या स्वार्थासाठी वयस्क आईवडिलांची सासुसासर्यांची जबाबदारी टाळण्यासाठी त्याला भांडणात रूपांतरित करावं ही कुठली रीत हो अण्णा, ह्याला साठ साठ हजार पगार असताना केवळ घरात मांसाहारी जेवण बनवता येत नाही म्हणून वेगळं रहायचं, ही कारण पटण्यासारखी वाटतात का हो अण्णा.
आईवडील म्हणून कधी अजितशी संवाद झाल्याचं आम्हाला आठवत देखील नाही. तुमच्यासारख्या एका हसत्यया खेळत्या कुटुंबाचा कधीच अनुभव घेतला नाही हो आम्ही, आम्हा दोघांच्या मागच्या जन्मीचे पापच असेल की या जन्मी ते सुख आमच्या नशिबी नसेल कदाचित.
अण्णा, जन्मापासून मुलांचे किती लाड पुरवले आपण. त्यांचा हट्टी हेकेखोर स्वभाव सगळं सगळं सहन केलं आपण. आज ते आपल्या बायकांचा, आपल्या सहकारी वर्गाचा स्वभाव, त्यांच्या चुका जशा गोड मानून घेतात तसं वयस्क आईवडिलांना सांभाळून नाही घेता येत का हो अण्णा.
तुम्हीच सांगा, कुठे कमी पडलो हो आम्ही? परिस्थिती नसताना दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केलं, त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी पुरवल्या, ते परदेशातल्या त्यांच्या सुखाकडे पाहत वृद्धाश्रमात दिवस काढायला का हो अण्णा. निवृत्तीनंतर मुलं नातवंडांमध्ये सुखात रहायचं नाशिबतच नव्हतं का हो आमच्या?
तुम्हाला वाटलं असेल स्वकष्टार्जित घराचा मालक मी , अचानक हा वृद्धाश्रमाचा मार्ग मी का स्वीकारला? अण्णा मनात आलं असतं तर अजितला घराबाहेरही काढू शकलो असतो मी, नाही तरी शेवटी शेवटी त्या घरात हिची अवस्था तर पाहवत नव्हती हो माझ्याच्याने. बिचारी पहाटे उठून दूध, पेपर आणण्यापासून घरातली कित्येक कामे निमूट करत असायची. घरातली तरुण पिढी म्हणून मुलासुनांची काहीच जबाबदारी नव्हती का हो अण्णा.
सत्तरीच्या वयाचे झालो आपण आता, कोणीही शांत सुखी आयुष्याची अपेक्षा करतोच हो अण्णा ह्या वयात. आपले कष्ट करून झाले, ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो त्यांनी सुखात ठेवायचं आपल्याला. ते बाजूलाच राहील, तुमच्यासारख्यांकडे पहात हेवा करायचं नशिबात आलंय अण्णा.
पण एक गोष्ट निश्चित, करोडोंच्या बंगल्यात रहाणाऱ्या लाखोंनी पैसा कमावणारी मुलं असणाऱ्या आईबापांपेक्षा आणि त्या ऐशवर्या पेक्षा एका हस्त्या खेळत्या कुटुंबाच्या मायेची ऊब अपेक्षित असते आपल्याला. आणि मी अभिमानानं सांगेन ती ऊब आम्हाला तुमच्या घरात नेहमी जाणवते अण्णा.
आणि म्हणूनच मी म्हणेन हा एकत्रित कुटुंबाच्या मायेचा ठेवा ज्यांच्याकडे आहे ते तुम्ही खरे करोडपती आहात अण्णा.
आज आम्ही खरंच सुखी आहोत. तीन महिन्यात या आश्रमातील वास्तव्यात बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही. आजवर ज्यांना आपले समजत होतो ते परके म्हणण्याच्या योग्यतेचे ही नव्हते हो अण्णा. परक्या माणसांनीच किती जीव लावला हो तीन महिन्यातच आम्हाला. दोन वेळचे सुखाचे घास आणि प्रेमाचे चार शब्दच अपेक्षित असतात ना हो या वयात आपल्याला. ते ज्यांच्याकडून मिळतील त्यांनाच आपलं समजून समाधान मानावं, आणि ज्यांना आपले म्हणत होतो त्याच्या सुखासाठी देवाला प्रार्थना करीत जगावं यालाच म्हातारपण म्हणत असतील कदाचित.
असो, पत्र फार लांबत चाललं असेल तर आता पूर करतो. अधून मधून फोन करीत जाणे, माईंना नमस्कार कळविणे. तब्येतीस जपून असणे.
छोट्यांना अनेक शुभाशीर्वाद,
तुमचाच काका.
पत्र वाचून संपताच अण्णांनी डोळ्यावरचा चष्मा काढला होता, त्यांच्या गालावरून ओघळणारे अश्रू दिसताच माईंचा हात त्यांच्या खांद्यावर गेला होता. 
भरून आलेलं नाक ओढणाऱ्या अण्णांकडे बघत त्या म्हणाल्या "की आपणच खरे "करोडपती "!!!
😊

2596. न बोललेला त्रास

 सकाळी सात वाजता नितीन घराबाहेर पडायचा. पुण्याच्या आयटी कंपनीत काम करणारा नितीन वेळेचा काटेकोर होता, पण माणसांचा नाही, असं कधी काळी त्यालाच कळलं नव्हतं. दार बंद होताच घरात शांतता पसरायची—ती शांतता श्रद्धासाठी बोचरी होती.
श्रद्धा देशमुख, त्याची बायको, स्वयंपाकघरात उभी राहून गॅस बंद करायची. चहाचा कप अजून अर्धा भरलेला असायचा. 
“उशीर होतोय” एवढंच बोलून नितीन निघून जायचा. 
तिच्या “ऐक ना”ला वेळ नसायचा, पण ऑफिसच्या मेल्सना नेहमी वेळ असायचा.
लग्नाला चार वर्षं झाली होती. पहिल्या वर्षी प्रेम होतं, दुसऱ्या वर्षी समजूत, तिसऱ्या वर्षी शांतता, आणि चौथ्या वर्षी—खटके.
नितीनला वाटायचं,
“मी कष्ट करतोय तिच्यासाठी.”
श्रद्धाला वाटायचं,
“तो कष्टात इतका हरवतोय की मीच विसरतोय.”
दिवसेंदिवस शब्द कमी झाले, आणि आवाज वाढला.
“तुला माझं काहीच पडलेलं नाही,” श्रद्धा एकदा रडत म्हणाली.
“तुला समजत नाही माझ्यावर किती जबाबदारी आहे,” नितीन वैतागून ओरडला.
त्या रात्री दोघेही पाठ फिरवून झोपले. एकाच उशीवर, पण दोन वेगवेगळ्या जगात.
श्रद्धा थकली होती—फक्त कामामुळे नाही, तर दुर्लक्षामुळे. तिचा दिवस त्याच्या वाट पाहण्यात जायचा, आणि रात्र त्याच्या मोबाईलच्या उजेडात हरवायची. ती आजारी असली तरी नितीनला कळायचं नाही. कारण तो “मीटिंगमध्ये” असायचा—खरं तर आयुष्यातून बाहेर पडलेला.
एक दिवस श्रद्धेच्या माहेरी फोन आला. वडिलांचा अपघात झाला होता. ती हादरली. नितीनला फोन केला. फोन उचलला गेला नाही. मेसेज टाकला—
“खूप गरज आहे, फोन कर.”
उत्तर आलं—“कॉल बॅक करतो.”
तो कॉल कधीच आला नाही.
त्या रात्री श्रद्धा एकटीच बसने गावी गेली. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न
—“मी खरंच एकटीच आहे का?”
दोन दिवसांनी नितीनला सगळं कळलं. तो गावी पोहोचला तेव्हा 
श्रद्धा अंगणात बसलेली होती. डोळे सुजलेले, चेहरा थकलेला.
ती काहीच बोलली नाही.
आणि तो—पहिल्यांदाच घाबरला.
“माफ कर…,” तो कुजबुजला.
श्रद्धा हसली, पण त्या हसण्यात जीव नव्हता.
“माफी नको नितीन… मला फक्त नवरा हवा होता. कंपनीचा कर्मचारी नाही.”
ते वाक्य त्याच्या छातीत खोलवर घुसलं.
परत पुण्याला आल्यानंतर घर तसंच होतं—भिंती, भांडी, स्वयंपाकघर. पण श्रद्धा बदलली होती. ती कमी बोलायची. तक्रार नाही, अपेक्षा नाही. आणि हीच गोष्ट नितीनला जास्त बोचायला लागली.
एक संध्याकाळी तो लवकर घरी आला. श्रद्धा खिडकीत उभी होती.
“चहा करशील?” त्याने विचारलं.
ती थोडं आश्चर्याने पाहून म्हणाली, “हो.”
चहा करताना तिच्या हाताला चटका बसला. ती काही न बोलता बाजूला झाली. नितीनने तिचा हात धरला.
“दुखतंय ना?”
त्या एका प्रश्नाने श्रद्धा फुटली. वर्षभराचं सगळं दुःख डोळ्यांतून वाहू लागलं.
“मला मोठं घर नको, मोठा पगार नको,” ती रडत म्हणाली,
“मला फक्त तू हवास… वेळेवर घरी येणारा, ऐकून घेणारा.”
त्या रात्री नितीन झोपला नाही. पहिल्यांदाच त्याला कळलं—नातं तुटत नाही, ते हळूहळू गप्प होतं… आणि ती गप्पपणाची वेदना सगळ्यात भयानक असते.
काही महिन्यांत त्याने निर्णय घेतला. नोकरी बदलली. पगार कमी झाला, पण घरी वेळ वाढला.
श्रद्धाच्या चेहऱ्यावर हसू परत आलं—हळूच, भीतभीत, पण खरं.
एक दिवस ती म्हणाली,
“आपण वाचलो नितीन… थोडं उशिरा, पण वाचलो.”
नितीनने तिचा हात घट्ट धरला.
त्याला उमगलं—
नवरा-बायकोच्या नात्यात खटके होतात, भांडणं होतात, त्रास होतो…
पण वेळ दिला नाही, तर प्रेमही दमून बसतं.
त्या दिवशी घरात शांतता होती—
पण ती शांतता रिकामी नव्हती,
ती समाधानाने भरलेली होती.
नोकरी बदलल्यानंतर नितीनला वाटलं होतं की आयुष्य थोडं सोपं होईल. घराजवळची कंपनी, कमी पगार, पण वेळ जास्त—हे सगळं ऐकायला छान होतं. प्रत्यक्षात मात्र संघर्ष वेगळ्याच रूपात उभा राहिला होता.
नव्या कंपनीत नितीन “जुन्या अनुभवाचा” असूनही “नवखा”च होता. बॉसचा ताण, कामाचं ओझं, आणि सतत डोक्यावर लटकणारी भीती—“ही नोकरीही गेली तर?”
पगार कमी असल्यामुळे महिन्याच्या शेवटी आकडेमोड सुरू व्हायची. घरभाडं, वीजबिल, औषधं… आणि आता अजून एक जबाबदारी वाढली होती.
श्रद्धा आई होणार होती.
तो दिवस नितीन कधीच विसरणार नाही.श्रद्धाच्या हातात रिपोर्ट होता. डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू.
“आपण आई-बाबा होणार आहोत,” ती हळूच म्हणाली.
त्या क्षणी नितीन आनंदी झाला, पण त्याच आनंदाच्या मागे एक भीती सावलीसारखी उभी राहिली.
 “मी पुरेसा आहे का?”
दिवस बदलले. श्रद्धाचं शरीर थकत गेलं, आणि नितीनची धावपळ वाढत गेली. ऑफिसमध्ये तासन्‌तास काम करण, कधी बसायलाही वेळ नाही. पाय दुखायचे, डोकं भणभणायचं, पण घरी आल्यावर श्रद्धाचा चेहरा पाहून तो सगळा त्रास गिळून टाकायचा.
एकदा महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे फक्त काहीशे रुपये उरले होते. श्रद्धेने हळूच विचारलं,
“औषधं उद्या आणू का?”
नितीन काही क्षण गप्प राहिला… आणि मग मान हलवली.
त्या रात्री त्याला झोप आली नाही. नवरा म्हणून तो मजबूत दिसत होता, पण आतून तो रोज थोडा थोडा मोडत होता.
आणि मग—ती आली.
लहानशी, गुलाबी, नाजूकशी मुलगी.
तिला हातात घेताना नितीनचे हात थरथरत होते. श्रद्धाच्या डोळ्यांत अश्रू होते.
“हिचं नाव सान्वी ठेवूया,” ती म्हणाली.
नितीन हसला, पण त्या हसण्यात जबाबदारीचं ओझं दडलेलं होतं.
सान्वी रडली की नितीन धावायचा. रात्री तिला झोपवताना तो थकलेला असायचा, पण तिच्या छोट्या बोटांनी त्याचं बोट पकडलं की त्याची सगळी थकवा विरघळायची.
पण संघर्ष संपले नव्हते.
एक दिवस ऑफिसमध्ये चूक झाली. बॉससमोर अपमान झाला.
“इतकं साधं काम जमत नाही का?”
नितीन गप्प उभा राहिला. उत्तर देणं परवडणार नव्हतं—कारण घरी सान्वी होती.
त्या संध्याकाळी तो घरी आला तेव्हा श्रद्धा सान्वीला झोपवत होती. ती हसली.
“आज तू लवकर आलास.”
नितीन काहीच बोलला नाही. बाथरूममध्ये जाऊन तो शांतपणे रडला. आवाज बाहेर जाऊ दिला नाही.
रात्री श्रद्धाने त्याचा हात धरला.
“खूप थकलायस ना?”
त्या एका प्रश्नाने नितीन कोसळला.
“मी प्रयत्न करतोय श्रद्धा… पण कधी कधी वाटतं, मी अपयशी ठरतोय.”
श्रद्धेने त्याचं डोकं छातीशी धरलं.
“तू अपयशी नाहीस. तू रोज आमच्यासाठी उभा राहतोयस. हेच पुरेसं आहे.”
सान्वी झोपेत कुजबुजली. नितीनने तिच्या कपाळावर हात ठेवला.
त्या क्षणी त्याला जाणवलं—
नोकरी त्याला दमवत होती,
पैसा त्याला घाबरवत होता,
पण ही छोटीशी मुलगी त्याला रोज नव्याने उभं करत होती.
आजही नितीन मोठ्या पगाराची नोकरी करत नाही.
आजही महिन्याच्या शेवटी चिंता असते.
पण संध्याकाळी घरी परतल्यावर
सान्वी “बाबा!” म्हणत धावत येते,
श्रद्धा चहा पुढे करते,
आणि त्या घरात—
कोणताही पगार देऊ शकणार नाही असा समाधानाचा पगार 
नितीनला मिळतो.
त्याला आता कळलं आहे—
नोकरी माणसाची परीक्षा घेते,
पण बायको विश्वास देते,
आणि मुलगी…
माणसाला रोज जगायला शिकवते.
सान्वी थोडी मोठी होत चालली होती. तिचं बोलणं अजून नीट जमत नव्हतं, पण “बाबा” हा शब्द मात्र तिला अगदी स्पष्ट बोलता येत होता. नितीन संध्याकाळी उशिरा घरी आला की ती दरवाज्याकडे धावत जायची. त्याचे पाय दुखत असायचे, डोकं भणभणायचं, पण सान्वीचा तो आवाज ऐकला की तो सगळा थकवा एका क्षणात मागे पडायचा.
पण प्रत्येक दिवस असा सुखाचा नव्हता.
नितीनची नोकरी अजूनही सुरक्षित नव्हती. कधी काम कमी, कधी जास्त. बॉस रोज नव्या अपेक्षा ठेवायचा.
“पगार कमी आहे, म्हणून कामही कमी करायचं असतं का?”
हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहायचं.
एका महिन्यात पगार उशिरा झाला. श्रद्धेने काहीच विचारलं नाही. 
पण नितीनला तिच्या शांततेची भीती वाटू लागली. एकेकाळी ती बोलायची, रडायची, भांडायची… आता मात्र ती गप्प झाली होती.
गप्पपणा म्हणजे समजूत नाही, हे नितीनला आता कळत होतं.
त्या दिवशी सान्वी आजारी पडली. ताप जास्त होता. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली. नितीनने पर्स उघडली—त्यात पैसे कमी होते.
श्रद्धाने काही न बोलता कपाटातून तिच्या लग्नात मिळालेली चांदीची साखळी काढली.
“हे घे… औषधं घेऊन ये,” ती शांतपणे म्हणाली.
नितीनच्या डोळ्यांत पाणी आलं.
“हे तुझं आहे श्रद्धा…”
ती हसली, पण डोळे ओले झाले.
“ती आपली मुलगी आहे नितीन.”
तो बाहेर पडला, पण पाय जड झाले होते. त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच वाटलं—पुरुष असणं म्हणजे फक्त कमावणं नाही, तर अपुरेपणाची लाज गिळून उभं राहणं असतं.
रात्री सान्वी झोपली होती. श्रद्धा थकून खुर्चीत बसली होती. नितीन तिच्या जवळ बसला.
“मी तुला खूप त्रास दिला ना?”
श्रद्धा काही वेळ गप्प राहिली.
“त्रास दिलास… पण सोडलंस नाहीस, हे महत्त्वाचं आहे.”
त्या एका वाक्यात नितीनला संपूर्ण नात्याचा अर्थ कळला.
दिवस जात होते. संघर्ष संपत नव्हता, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद वाढत होती. नितीन आता ऑफिसमध्ये अपमान सहन करत होता, पण घरी येऊन तो तसाच राहत नव्हता. तो सान्वीला अंघोळ घालत होता, तिला गोष्टी सांगत होता, आणि श्रद्धाच्या डोळ्यांत परत हसू आणायचा प्रयत्न करत होता.
एकदा सान्वीने वहीत रेघोट्या काढल्या. त्यात एक माणूस, एक बाई, आणि एक छोटीशी मुलगी होती.
नितीनने विचारलं, “हा कोण?”
सान्वी हसून म्हणाली, “आपण.”
तो क्षण नितीन आयुष्यभर विसरणार नव्हता.
त्या रात्री त्याने श्रद्धाला म्हटलं,
“आपण श्रीमंत नाही… पण आपण एकत्र आहोत.”
श्रद्धेने त्याचा हात धरला.
“आणि तेच पुरेसं आहे.”
आजही कधी कधी घरात खटके उडतात. पैशावरून, थकव्यावरून, शब्दांवरून. पण आता ते खटके भांडणात बदलत नाहीत. कारण दोघांनाही माहीत आहे—मौन म्हणजे अंतर, आणि संवाद म्हणजे नातं.
सान्वी झोपलेली असते तेव्हा नितीन तिच्या कपाळावरून हात फिरवतो.
तो मनात म्हणतो—
मी मोठा अधिकारी नाही,
मी श्रीमंत नाही,
पण मी रोज लढतोय…
आणि माझ्या या लढ्याला घरात अर्थ मिळतो.
नोकरी त्याला रोज थकवते,
पण बायको त्याला सावरते,
आणि मुलगी—
त्याला रोज परत माणूस बनवते.
आणि नितीनला आता हे ठामपणे कळलं आहे—
घर टिकवणं हे कोणत्याही नोकरीपेक्षा कठीण काम आहे,
पण ते जमलं तर आयुष्य जिंकता येतं.

©️ कैलास मोरे ✍️ ✍️ ✍️ 





2595. आतुन तुटला तरी....

 एका माणसाने आपली कार रस्त्यावर कडेला पार्क केली
आठ दिवस झाले तरी त्या कारला कुणीही हात लावला नाही.
आठव्या रात्री कारचा दरवाजा उघडून लावताना काहीतरी झालं आणि त्याच्याकडून कारच्या खिडकीची काच फुटली
नवव्या दिवशी तो ट्रेनने तो दुसर्‍या गावाला गेला आणि संध्याकाळी परत आला
बघतो तर काय?
त्या काच फुटलेल्या कारचे एकेक भाग लोकांनी काढून नेले होते
कुणी गाडीतली म्युझिक सिस्टम चोरली तर कुणी टायर काढून नेले तर काहींनी समोरचे बॉनेट उघडून इंजिन पार्ट्स देखील पळवून नेले होते
जो पर्यंत कार बंद होती तोपर्यंत तिला कुणीही हात लावला नव्हता
पण जशी त्याची काच मोडलेली दिसली तसे संधीसाधू लोक त्यावर तुटून पडले
ह्या वृत्तीला “ब्रोकन विंडो थेअरी” म्हणतात. आणि माणसांच्या अशा वागण्याच्या (गैरफायदा घेण्याच्या) मनोवृत्तीला "ब्रोकन विंडो सिंड्रोम" असा म्हणतात.
कुठेतरी छोटासा फॉल्ट दिसला की अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात.
(ह्याच कारणाकरता समाज एकसंध राहणे आणि त्याहीपेक्षा तो दिसणे महत्वाचे आहे. नाहीतर इतर लोक समाजातील भेदांचा किंवा त्रुटींचा लगेच फायदा घेतात)
माणसांच्या बाबतीत हेच खरे आहे ना?
जरा कुठे कुणी मानसिक दृष्ट्या कमजोर दिसला किंवा तुटलेला/खचलेला दिसला की बाकीचे त्याचा गैरफायदा घ्यायला टपलेले असतात.
(लेखक सलीम खान म्हणतात, “आसूं आए तो खुद पोंछलो, अगर पोंछने के लिए लोग आएंगे तो सौदा करेंगे”)
म्हणुन देवा
आतून तुटलात, अगदी कोलमडून पडलात, तरी लोकांना सांगत बसू नका. कुणालाही दाखवू नका. गैरफायदा घेतील.
(जशी काच तुटलेली कार मेकॅनिककडे दुरुस्त होते! त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनाचा एक मेकॅनिक असू शकतो ना? कुणीतरी मित्र, मैत्रीण, नवरा, बायको, सायकॉलॉजिस्ट वगैरे वगैरे. त्याच्याकडून तुमचे मन रिपेअर करून घ्यायचं!)
✍️ विक्रम इंगळे

2594. चिरंजीवी भव… की Exit on time…"

 नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.
अशाच एका भागात एक दहा- बरा वर्षाची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खुश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव.”
ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.
ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,
“Thank you sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले. 
इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,
“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक.”
क्षणभर सगळेच स्तब्ध झाले.
कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल - आजारी व्यक्तिची अणि कुटुंबाची सुद्धा. 
पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.
तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. Netherlands, Belgium, Luxembourg, Canada, Colombia, Spain, New Zealand, Portugal तसेच Australia आणि U.S. मधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबाग च्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष …… 
पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—
एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिम रित्या जगवू नका. 
असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!
यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.
आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?
जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचाररेल.
त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.
उद्या हिच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.
आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू ...
 “बाबू मोशाय ! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं!”

2593. मुलींनी सावध राहायला पाहिजे

 १) खूपच समंजस होता तो. तिच्याशी कायम अदबीने आणि अंतर राखून बोलायचा.तिच्या सुंदरतेमुळे तिच्या मागेमागे फिरणा-या इतर मुलांसारखा नव्हता तो.नकळत ती त्याच्याकडे ओढली गेली. हळूहळू प्रेम फुलत गेले. एकदा बोलता बोलता त्याच्या बोलण्यातले एकदोन शब्द तिला खटकले. ती सावध झाली. त्याच्याबद्दलची माहिती पुन्हा त्याला विचारली.त्यानेही सविस्तर माहिती दिली.आक्षेपार्ह काहीच नव्हते.तरीही तिने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच काही ट्रेस लागेना.तिला वाटले आपण उगाचच संशय घेतला. पण सहज बोलताबोलता तिने जवळच्या  मैत्रिणीला हे सांगितले . ती मैत्रीण तिला एका समाजसेविकेकडे(ताई) घेऊन गेली.ताईने दोन दिवसात तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दोन दिवसानंतर तिला समजले की तो भलताच कोणीतरी होता.त्याचे नाव गाव सारेच वेगळे होते.तिला सुरूवातीला विश्वासच बसेना पण ताईने त्याचे आधारकार्ड तिच्या हातात ठेवले. आपले आयुष्य उध्वस्त होता होता वाचले याची तिला जाणीव झाली.
.....आज ती फावल्या वेळात ताईसोबत काम करते.
२)  एखाद्यासाठी वेड होण काय हे त्याच्यामुळे तिला समजले. तासनतास तिच्या कॉलेजच्या बाहेर उभे राहणे.तिला घरापर्यंत सोबत देणे,तिने सांगितलेले किरकोळ कामही तत्परतेने मन लाऊन करणे.
तिला मनापासून आवडला  तो.पण त्याच्याशी लग्नाला घरून परवानगी मिळणार नाही हे तिला माहित होते कारण ब-याच गोष्टी घरच्यांना पटल्याच नसत्या.
 बरेच दिवसानंतर तिने एकदा विचारले.
"आपण पळून जाऊया का?"
"चालेल.मी केव्हाही तयार आहे."
"आणि लग्न कुठे करायचे?"
"लग्न ? त्याची काय जरूर? आपण लिव्ह ईन मध्ये राहू ना? तुला माझ्यावर भरोसा नाही का?"
तिला ते पटले नाही.तिने त्याच्याशी  संबंध तोडले. संबंध तोडल्यानंतर तो बदलला.आक्रमक झाला.तिला फोनवर धमकी देऊ लागला. सोबत काढलेले काही फोटो सोशल मिडीयावर टाकेल सांगू लागला. लिव्ह ईनसाठी दबाव टाकू लागला.त्याचे खरे रूप बघून ती हादरली.
 ती सैरभैर झाली.घरीही सांगता येईना.आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले.तिने रवीवार आत्महत्येसाठी निश्चित केला.संध्याकाळी घरी कोणी नसते.   तशात कोणीतरी तिला 'ताई' चे नाव सुचवले.ती ताईला भेटली.ताईने तिला धीर दिला. चारच दिवसात  चाव्या फिरल्या.. त्याचे फोनच काय तो स्वतःही गावात दिसेनासा झाला.तिने सुटकेचा निश्वास टाकला.तिने ताईला मदत करणे सुरू केले.
आज सहज तिने कॕलेन्डरवर नजर टाकली.बापरे! ताई भेटली नसती तर आज आपले वर्षश्राद्ध झाले असते....
३) तो खूप श्रीमंत असावा.तिला महागड्या गिफ्ट द्यायचा.महागड्या बाईकवर तिला फिरायला घेऊन जायचा ,ज्या पदार्थाचे नावही कधी ऐकले नाही असे पदार्थ तिला उंची हॉटेलात नेऊन खाऊ घालायचा.  मध्यमवर्गीय असलेल्या तिला हे सगळे स्वप्नवत वाटायचे. एकदा तो तिला पबला घेऊन गेला. सॉफ्ट ड्रींक दिले.तिला ते कडवट लागले म्हणून त्याचे लक्ष नाही बघून तिने ते टाकून दिले. तो सहज म्हणाला
" sex करायचा? वरती रूम आहेत."
  ती थरथरली."नको." तिचे मध्यमवर्गीय संस्कार मध्ये आले.
"ठीक आहे.माझ्याबरोबर थोडा डान्स तर करशील?"
 तिच्याबरोबर नाचता नाचता तो म्हणाला "मला निदान किस तर देशील?"
तिच्या संमतीची वाट न पहाता तो तिला कोपऱ्यातल्या अंधारात घेऊन गेला.चुंबन घेताघेता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले.ती उत्तेजित झाली. 
"रुममध्ये यायचे?" तो तिच्या कानात हळुवारपणे म्हणाला.
ती होच म्हणणार होती तेवढयात तिचा मोबाईल वाजला.
"काय गं किती उशीर?" आईचा आवाज ऐकताच ती भानावर आली.
"मला घरी सोड लगेच." ती म्हणाली
 रात्री कितीतरी वेळ तिच्या शरीरावरचे त्याचे स्पर्श तिला आठवत राहिले,उत्तेजित  करत राहिले. केव्हातरी झोपेत तिच्या  सबकाॕन्शन्स माईंडने तिला सतर्क केले. तू माझे पहिले प्रेम हे तो नेहमी सांगतो मग सहजपणे चुंबन कसे घेतो. शरीरावर त्याचा फिरणारा हात सराईत कसा? हॉटेलच्या वरती रूम मिळतात आणि तिथे **x करता येतो हे याला कसे माहित?  निघतांना याच्या डोळ्यांत सावज निसटून चालले असे भाव कसे? म्हणजे याअगोदरही तो मुलींना घेऊन पबमध्ये?....
 ती थरारली. काहीतरी गडबड आहे.
नंतर दोन तीनदा आईला संशय येतो हे सागून तिने त्याच्याबरोबर जायचे टाळले. एकेदिवशी सकाळीच पेपरला ती ज्या पबमध्ये गेली त्या पबवर पोलीसांची धाड पडल्याची बातमी आली. त्याचा फोटोही होता. मुलींला जाळ्यात ओढायचे नंतर रूममध्ये तिचे व्हीडीओ काढायचे आणि पुढे तिला ब्लॕकमेल करायचे. त्यांना वाममार्गाला लावायचे हा त्याचा धंदाच होता. त्याला त्याचे फंडीगही होते. त्याचे खरे नावही भलतेच होते.  आपण केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो याची तिला जाणीव झाली.  पोलीसांना ह्या पबच्या गैरप्रकाराबाबतची तक्रार समाजसेविका ताई यांच्या संस्थेने केली होती.
तिने ताईचे मनोमन आभार मानले. आपण नशीबाने वाचलो पण भविष्यात अनेक मुली ह्या दलदलीत जाण्यापासून रोखणा-या ताईच्या संस्थेत जाऊन ताईला प्रत्यक्ष भेटायचेही तिने ठरवले....

© ® विवेक चंद्रकांत
* कथा प्रचारकी आणि ढोबळ कथानक असणाऱ्या वाटण्याची शक्यता आहे.पण सावध करण्यासाठी आहेत.

2592. खरा प्रश्न हा आहे की तो आतून काय आहे?

 एक वेश्या मरण पावली आणि त्याच दिवशी तिच्या समोर राहणारा एक वृद्ध संन्यासीही मरण पावला—नुसता योगायोगच म्हणावा.
देवदूत दोघांना घेण्यासाठी आले. संन्याशाला नरकाकडे आणि वेश्येला स्वर्गाकडे नेऊ लागले.
हे पाहून संन्यासी आपला दंड आपटत उभा राहिला 😠
तो म्हणाला,
“हा काय अन्याय आहे? मला नरकात आणि वेश्येला स्वर्गात? नक्कीच चूक झाली आहे. चौकशी करा. स्वर्गाचा संदेश माझ्या नावावर असायला हवा आणि तिच्या नावावर नरकाचा. मला परमात्म्याला भेटू द्या. आयुष्यभर पूजा-पाठ, शास्त्रवाचन केलं… आणि हे फळ?”
त्याला परमात्म्यापाशी नेण्यात आलं.
परमात्मा शांतपणे म्हणाले 🙏 —
“यामागे एक खोल कारण आहे. वेश्या दारू प्यायची, भोगात जगायची; पण तू मंदिरात बसून भजन करत असताना, धूप-दीप लावत असताना, घंटा वाजवत असताना ती मनोमन रडायची.
‘कधी माझ्या आयुष्यात असं सौभाग्य येईल? मीही कधी मंदिरात बसून भजन करू शकेन का?’
तुझ्या धूप-दीपांचा सुगंध तिच्या घरात पोहोचला की ती स्वतःला धन्य समजायची. घंटांचा नाद ऐकून ती आनंदित व्हायची. वेश्यालयात राहत असूनही तिचं मन मंदिरात आणि ईश्वरात गुंतलेलं होतं 🕉️
पण तू पूजा करतानाही मनात काय विचार करायचास?
‘वेश्या सुंदर आहे… तिथे कसं पोहोचता येईल?’
तुला हिंमत झाली नाही, प्रतिष्ठा आड आली. गाव तुला संन्यासी मानत होतं.
ती नाचत असताना, दारू वाटत असताना, तुझ्या मनात वासना जागायची.
ती विवेकाच्या हाकेला प्रतिसाद देत होती, आणि तू वासनेच्या.
ती प्रार्थना करत होती ईश्वराची आणि तू इच्छा धरत होतास वासनेची.
ती चिखलात होती, पण कमळासारखी वर वर उठत गेली 🌸
आणि तू कमळासारखा येऊन चिखलातच रुतून बसलास.
बोध
खरा प्रश्न हा नाही की माणूस बाहेरून काय आहे,
खरा प्रश्न हा आहे की तो आतून काय आहे.
निर्णय आतल्या भावनेवर होतो.
देव भावाचे भुकेले असतात. बाह्य दिखाव्याला ते महत्त्व देत नाहीत.
जिथे हृदय शुद्ध असतं, तिथे देव स्वतः वास करतो.” ✨

2591. काठीच्या आधाराने

 काठीच्या आधाराने चालणाऱ्या वृद्ध पुरुषांचा एक गट एका घरात शिरला आणि आठवड्याभराने ते धावत बाहेर पडले !
ना औषध, ना शस्त्रक्रिया.
फक्त त्यांच्या मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ केल्यामुळे.
कसे?
ही घटना १९७९ साली घडली.
हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय.
त्यांनी जवळजवळ ८० वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले. काहींना काठीशिवाय चालता येत नव्हते, काहींचे हात थरथरत होते, काहींना मोतीबिंदू होता, तर काहींना स्वतःचे नावसुद्धा नीट आठवत नव्हते.
त्यांच्या मुलांना वाटले की त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे.
पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वडिलांना १९५९ साली पाठवले जात होते !
नाही, कोणतेही जादुई जग नव्हते.
डॉ. लॅंगर यांनी बोस्टनमधील एका जुन्या मठाची सजावट पूर्णपणे १९५९ च्या शैलीत केली होती. तिथे १९७९ चा कसलाही मागमूस नव्हता. टीव्ही काळा-पांढरा होता, त्यावर १९५९ मधील बातम्या आणि Ed Sullivan Show चालू होते. रेडिओवर त्या काळातील गाणी होती. मासिके, वर्तमानपत्रे—सगळेच वीस वर्षे जुने !
आता कथेतला पहिला धक्का…
ते आठ वृद्ध पुरुष तिथे पोहोचल्यावर त्यांना वाटले की कोणी तरी येऊन त्यांचे सामान खोलीत नेऊन देईल—जसं त्यांच्या घरी होत असे.
पण डॉ. लॅंगर ठामपणे म्हणाल्या,
“इथे कोणीही तुमची मदत करणार नाही. तुम्हालाच तुमच्या बॅगा उचलून न्याव्या लागतील.”
ते चिडले, कुरकुरले.
पण पर्याय नसल्यामुळे जड सूटकेसेस घेऊन जिना चढले.
आणि तिथेच त्यांच्या मेंदूला पहिला संदेश गेला -
“मी असहाय नाही… मी हे करू शकतो.”

एकच अट होती - या एका आठवड्यासाठी त्यांना असे वागायचे होते की साल १९५९ आहे.
त्यांना भूतकाळात बोलायचे नव्हते, फक्त वर्तमानकाळात.
उदा. “आत्ता राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवर काय करत आहेत?”
किंवा “हवाना मध्ये कास्त्रो काय करत आहेत?”

त्या काळातील राजकारण, खेळ, चित्रपट - सगळ्यांवर चर्चा करायची होती, जणू ते अजूनही तिथेच जगत होते.
ज्या वयात त्यांच्यात जी ऊर्जा होती - ५५–६० वर्षांची -त्याच ऊर्जेने बोलायचे होते.
पहिले दोन दिवस फार अवघड गेले.
पण तिसऱ्या दिवसापासून एक विचित्र जादू सुरू झाली.
संधिवातामुळे सरळ बसू न शकणारा माणूस आता जेवणाच्या टेबलावर ताठ बसून राजकारणावर वाद घालत होता.
ज्याला नीट ऐकू येत नव्हते, तो रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकत होता.
तो संपूर्ण वातावरणच त्यांना सांगत होते.
“तुम्ही म्हातारे नाही… तुम्ही अजूनही मजबूत, मध्यमवयीन आहात.”
सर्वात मोठा धक्का आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बसला.

आश्रमासमोरील मैदानातले दृश्य पाहून डॉ. लॅंगर यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
आठवडाभरापूर्वी बसमधून उतरताना इतरांची मदत घेणारे हे वृद्ध पुरुष आता मैदानात ‘टच फुटबॉल’ खेळत होते!
हो, फुटबॉल !
त्यांना धावताना पाहून असं वाटत होतं, जणू त्यांचे वय खरंच २० वर्षांनी कमी झाले आहे.
प्रयोगाच्या शेवटी जेव्हा त्यांची शारीरिक तपासणी झाली, तेव्हा डॉक्टरही थक्क झाले.

त्यांची पकड (grip strength) वाढली होती, सांध्यांची लवचिकता सुधारली होती, दृष्टी आणि श्रवणशक्तीही सुधारली होती !
चष्म्याशिवाय लहान अक्षरे वाचता येत होती.
त्यांचा IQ स्कोअरही वाढला होता.

सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे—
प्रयोगापूर्वी आणि नंतरचे फोटो जेव्हा अशा लोकांना दाखवले गेले ज्यांना या प्रयोगाबद्दल काहीच माहीत नव्हते, ते म्हणाले,
“नंतरच्या फोटोमध्ये हे लोक खूपच तरुण दिसतात!”

म्हणजे फक्त त्यांची भावना नाही, तर चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी झाल्या होत्या.
जैविकदृष्ट्याही त्यांचे वय मागे गेले होते!

डॉ. एलेन लॅंगर यांनी हे सिद्ध केले की जेव्हा आपण स्वतःला सांगतो—
“मी म्हातारा झालोय, आता माझ्याकडून होत नाही”—
तेव्हा आपले शरीर ते मान्य करते आणि हळूहळू बंद पडू लागते.

आपला समाज आपल्याला शिकवतो की म्हातारपण म्हणजे आजारपण.
आणि आपण तेच स्क्रिप्ट फॉलो करतो.

पण जेव्हा त्या वृद्ध लोकांचे वातावरण बदलले आणि त्यांना अजूनही तरुण आहोत असे वाटायला लावले, तेव्हा त्यांच्या शरीरानेही तसाच प्रतिसाद दिला.

यालाच म्हणतात “Mind–Body Connection” — किंवा अंतिम प्लेसिबो इफेक्ट!

म्हणून मित्रांनो,
कधी कधी म्हणता 
“मूड नाहीये, थकवा आलाय, माझ्याकडून नाही होणार…”

जरा विचार करा 
८० वर्षांचे लोक फक्त विचार बदलून काठ्या फेकून देतात आणि फुटबॉल खेळतात, तर तू काय नाही करू शकणार?

तुझ्या मर्यादा शरीरात नाहीत, त्या मनात आहेत.
जेव्हा तू स्वतःला कमकुवत समजतोस, तेव्हा तू कमकुवत होतोस.
आणि जेव्हा तू स्वतःला सुपरहिरो समजतोस, तेव्हा मेंदू शरीराला तसा सिग्नल देतो.
फोन बाजूला ठेव, आरशात बघ आणि म्हण-
“मी बॉस आहे. माझ्या ऊर्जेला मर्यादा नाहीत.”

माझ्यावर विश्वास ठेव-
तुझं शरीर ते ऐकायलाच लागेल.

सुरुवात कर.
जग तुझी वाट पाहत आहे! ❤️
👍👍🙏🙏🙏

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...