मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2575. शालू

 मुलीच्या लग्नाला आठवड्याभराची सुटी घेतलेल्या त्याला आज मालकानं असं अचानक तातडीनं पुन्हा दुकानात का बोलवलं याचा कांही केल्या उलगडा होतं नव्हता...बायको मुलगी..लग्नाची कांही खरेदी करायला गेलेल्या..लग्न गावाकडं असल्याने तो सामानाची आवराआवर करण्यात गुंतलेला..पण खुद्द मालकाचा निरोप मिळण्यानं..... काहीवेळात तो शहरातल्या बाजार पेठेतील एका नामांकित साड्यांच्या शोरूम मध्ये..जिथं तो काम करायचा त्या भव्य साडी एम्पोरियमचा काचेचा दरवाजा लोटुन तो आंत प्रवेश करीत होता..लग्नसराई असल्यानं साड्या शालू बस्त्यासाठी आलेल्या ग्राहकांची उसळलेली बेसुमार गर्दी पाहून..कदाचित आपल्याला मदतीसाठी इतक्या घाईनं बोलावून घेतलं असावं याचा कयास बांधीत मालकाच्या केबिनचं दार ढकलून तो आंत गेला आणि बघतंच राहिला..त्यानं पाहिलं...
मालकासमोर अंगचोरून कशीबशी बसलेली त्याची मुलगी..आणि घरवाली समोरच्या डिश मध्ये ठेवलेला सामोसा ढोकळा जिलेबीचा एकेक तुकडा तोंडात टाकीत मधुनच मालकाकडे पाहात भांबावल्या नजरेनं सगळी केबिन न्याहाळीत होत्या.....
ये!ये!आलास का!बघ! बघ! कोण आलं आम्हाला  भेटायला...तुझी बायडी..छोकरी..आपल्या स्टाफच्या पोरींनी बघितलं यांना बाहेर चहा घ्यायला गेल्या तेव्हा.. आणलं इथं...ओळख आहे त्यांची...बस बस तू पण चाय नाश्ता घे!झाली तयारी लग्नाची?अरे बस रे! ए!मुली तुला सांगतो!हा तुझा बाप..आमच्या दुकानातला सर्वात जुना माणस!हा शोरूम नव्हता तेव्हाचा!दिवाळी लग्नसराईत इतकी मेहनत घेतो..एकही ग्राहक तसा परत जातं नाही..उंची साड्या किंमती शालू याची गहिरी पारख असलेला एकमेव विश्वासू पारखी...समोरची नवरीमुलगी तिच्या सोबतच्या बायका कितीही हुशारी दाखवो घासाघीस करो... बारीकसारीक तपशिल विचारो..त्यांचं समाधान होईतो साड्या शालूचे ढीग समोर टाकून..न कंटाळता न थकता चिडचिड न करता..आपलं काम चोख करणारा.. कांही कांही ग्राहक कौंटरला हा असल्या शिवाय खरेदी थांबवून याची वाट पाहतात..आतापर्यंत किती सेल्समन सेल्सगर्ल्सना ट्रेन केलंय यानं..साडी शालूचे कलर कॉम्बिनेशन....पोत.. सुत...पॅटर्न..फॅशन..सगळी अपडेटेड माहिती ठेवणारा..वेळ पडल्यास स्वतः साडी नेसून पदर उलगडून चालून सुद्धा दाखवणारा..ग्राहका सह आमचा सगळ्यांचा आवडता तुझा बाबा..तुला तर माहितेय बायकांची खरेदी म्हणजे? तोबा तोबा..हाचं सहन करो जाणे....खरं म्हणजे आम्हीच बोलवणार होतो तुला शुभेच्छा द्यायला..त्याआधीच आज हा योग जुळून आला..
साक्षात मालकानं चालवलेली आपल्या बापाची..घरवाल्याची  तारीफ ऐकून मायलेकी सुखावल्या होत्या.. तोचं..
चला!माझी बडबड थांबवतो आता!ए पोरी!आता तुला माझं एकंच काम करायचं..तुझ्या बापाला घेऊन आमच्या शोरूमच्या शालू सेक्शनमध्ये जायचं..तुला आवडेल!पसंत पडेल तो शालू निवडायचा..आमच्या कडून लग्नाची भेट म्हणुन..आणि अहो!तुम्ही..आमच्या इथले स्टार सेल्समन!तुम्हाला एक सांगतो..खबरदार!या तुमच्या मुलीला शालूची किंमत सांगितली तर!पगारातून वसुल करील!ती ज्या शालूवर हात ठेवील..तो बॉक्स मध्ये पॅक करुन माझ्या कडे घेऊन यायचं !समजलं....
😢
बुके..शालूचा बॉक्स..प्रेसेंट पाकीट..आणि शोरूम मधल्या इतर सेल्स स्टाफच्या शुभेच्छा स्वीकारत तो..बायको मुलीसह शोरूमच्या पायऱ्या उतरत होता..मालकानं आज त्याच्या कष्टाचं खरोखरच चीज केलं होतं...कामाची कदर केली होती..घरच्यांसमोर मिळालेल्या शाबासकीनं त्याला धन्यता वाटतं असली तरी..दुसरीकडे नववधूच्या वेषातली शालू परिधान केलेली...बापाच्या खाद्यावर डोकं ठेवून पुन्हा पुन्हा हुंदके देतं निरोप घेणाऱ्या त्याच्या लाडक्या लेकीच्या बिदाईचं दृश्य क्षणभर त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जाताना...त्या कल्पनेनं मात्र एका बापाचं काळीज आतापासून डोळ्यातून पाझरायला लागलं होतं....
                         
शेखर वैद्य...नाशिक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...