मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2588. हुंदकेच ऐकू येत होते पलिकडून

      धाड्डकन दरवाजा आपटतच तो घराबाहेर पडला होता. आजही पुन्हा नेमकं आॅफिसला निघते वेळीच, दोघांचं बेदम भांडण झालं होतं. ती ही फणकार्‍यानेच तिच्या घरातील कामांकडे वळली होती... तणतणतच आवरत होती घर. "एकमेकांच्या मनातून वाढलेला पसारा कसा आवरायचा?" असा विचार तिच्या मनातून डोकावू पहातच होता की, तिचं लक्ष टेबलावरच्या हेल्मेटकडे गेलं. "म्हणजे हा हेल्मेट घरीच विसरला?"... चर्र झालं तिच्या छातीत. "ऊगिच काढलं आपण भांडण तो निघतांनाच... छे चुकलंच आपलं". असं मनातल्या मनात बोलता बोलता, तिच्याच नकळत तिने काॅल लावला त्याला. काहिच प्रतिसाद नाही... एकदम शांत... त्या बाईची टेप ही नव्हती वाजली. तिने पुन्हा फोन केला पाचच मिनिटांत... पण पुन्हा तिच भयाण शांतता. तिने लागलीच आॅफिसच्या लँडलाईनवर फोन केला... पण तिला सांगण्यात आलं की, तो पोहोचला नाहिये अजून, आणि त्याचीच वाट बघतायत सगळे. "ह्याने घर सोडून दिड तास होत आलाय... अर्ध्या तासाचं रनिंग आहे बाईक वरुन आॅफिसपर्यंत... मग हा अजून पोहोचला कसा नाही?"... आता मात्र तिला रडू फुटायला लागलं होतं. तिने तोंडावर पाण्याचे हबके मारले... हातांनीच केस मागे घेत, ते चापात अडकवले... खुर्चीच्या पाठीवरची ओढणी काढून, दोन्ही खांद्यावरुन स्वतःच्या पाठीवर सोडली... चपला सरकवल्या पायांत... ड्राॅवर ऊघडून घराची किल्ली घेतली... दार ऊघडलं जायला नी थबकली ती. पुन्हा पाठी वळत तिने ड्राॅवर ऊघडला... आणि बाईकची किल्ली तिला ड्राॅवरमध्येच दिसली. तिच्या पायांतली ताकदच गेली अचानक, नी मट्टकन खाली बसली ती. "म्हणजे हा आज बाईक घेऊन गेलाच नाहिये?"... ताडकन्न ऊठली ती. घरातील ईंटरकाॅमवरुन सिक्युरिटीला फोन लावला तिने... आणि कन्फर्म केलं त्यांची बाईक खालीच उभी असल्याचं. ढसाढसा रडत होती ती... आणि तिचा मोबाईल वाजला. त्याचाच फोन... "हॅलो... तू फोन केलेलास आॅफिसमध्ये, कळलं... काय झालं बोल... हॅलो... हॅलो... हॅलो अगं बोल... हॅलो... काही होतंय का तुला?... बरं वाटत नाहिये का?... काय झालय अगं?... मी येऊ का घरी?... थांब निघतो मी लगेच". त्याला फक्त हुंदकेच ऐकू येत होते पलिकडून... आणि त्याच्या शेवटल्या वाक्यानंतर तर आणखीनच वाढलेले.

- सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...