मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2574. तुम्ही 'आई-बाबा' आहात की बिस्किट कंपनीचे 'सेल्समन'?

 तुम्ही 'आई-बाबा' आहात की बिस्किट कंपनीचे 'सेल्समन'? बाळाला भूक लागली की जेवण द्यायचं असतं, प्रॉडक्ट नाही.
दुपारची ओपीडी संपत आली होती, तेवढ्यात ३ वर्षांचा आरव 'कळा' येऊन रडत आत आला. 😫
त्याचं रडणं इतकं भयानक होतं की वाटलं, आतडं-बितडं फुटलंय की काय!
त्याचे बाबा घाबरून ओरडले, "डॉक्टर, बघा ना पोटात काय झालंय! हात लावू देत नाहीये.
सारखा तडफडतोय. कुणीतरी म्हणालं अपेंडिक्स (Appendix) फुटायची लक्षणं आहेत!"
मी आरवचा शर्ट वर केला.
पोट फुगून 'ढोल' झालं होतं.
मी पोटाच्या डाव्या बाजूला हात लावला, तिथे आतड्यांमध्ये एक 'कडक गोळा' लागत होता.
मला हाताला लागताच अंदाज आला होता की हे अपेंडिक्स नाहीये, हा आतड्यात साचलेला 'जुना मल' आहे.
पण पालकांना तोंडी सांगून पटलं नसतं, त्यांना 'पुरावा' हवा होता.
म्हणून खात्री करण्यासाठी आणि त्यांना डोळ्यांनी दाखवण्यासाठी मी म्हणालो,
"घाबरू नका, आपण एक X-Ray काढूया. सोनोग्राफीपेक्षा यात चित्र जास्त स्पष्ट दिसेल आणि 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल."
१५ मिनिटांनी X-Ray ची फिल्म आली.
मी ती फिल्म लाईटबॉक्सवर लावली. ती बघून आरवच्या बाबांचे म्हणाले,
"डॉक्टर, हे पोटात पांढरे ढग काय दिसतायत? पू (Pus) झालाय का?"
मी म्हणालो, "नाही ओ... ती 'शी' (Stool) आहे!
आरवच्या आतड्यात मल अक्षरशः 'दगडासारखा' कडक होऊन साचलाय (Fecal Impaction).
त्यामुळेच त्याला पोटात कळा येतायत."
बाबा अवाक झाले. "पण डॉक्टर, हे एवढं कडक का झालं? आम्ही तर त्याला रोज सकाळी कपभर 'दूध-बिस्किट' देतो. दूध तर चांगलं असतं ना?"
मी कपाळावर हात मारून घेतला. "अहो, हाच तर मोठा गैरसमज आहे!"
मी त्यांना X-Ray कडे बोट दाखवून समजावलं:
"तुम्ही पोटात 'सिमेंट' (मैदा) आणि 'पाणी' (दूध) एकत्र करताय, आणि अपेक्षा करताय की पोट साफ होईल?
१. दूध (Milk): यात 'फायबर' नावाचा प्रकार शून्य असतो. जास्त दूध प्यायल्याने शी कडक होते.
२. बिस्किट (Maida): हा वाळलेला मैदा आतड्यात गेल्यावर 'स्पंज' सारखा वागतो. तो आतड्यातलं उरलेसुरले पाणी शोषून घेतो.
जेव्हा तुम्ही हे दोन्ही एकत्र करता, तेव्हा पोटात त्याचा 'चिकट चिखल' (Sludge) तयार होतो.
हा चिखल आतड्याला असा 'काँक्रीट' सारखा चिपकतो की तो पुढे सरकतच नाही.
तुम्हाला वाटतंय तुम्ही 'अमृत' देताय, पण तुम्ही त्याच्या पचनसंस्थेला 'जाम' (Choke) करताय."
बाबांनी मान खाली घातली. "पण डॉक्टर, भूक लागली की तो मागतो... आणि दुसरं काही खात नाही."
मी त्यांचं वाक्य तोडलं:
"कारण त्याची खरी भूक त्या 'दूध-बिस्किटाने' मारून टाकलीये!"
"बिस्किटातल्या साखरेमुळे मेंदूला 'खोटा सिग्नल' जातो की पोट भरलंय.
त्यामुळे आरव जेवत नाही. आणि जेवला नाही तर शरीर पोसणार कसं?"
मी आरवला जवळ घेतलं आणि म्हणालो, "फक्त पोटच नाही बिघडलं, जरा नीट बघा मुलाकडे..."
मी आरवचे डोळे खाली ओढून दाखवले.
"चेहरा बघा कसा 'पांढराफटक' पडलाय. अंगात रक्त एकदम कमी झालंय (Anemia).
का? कारण भूक नसल्यामुळे हा जेवत नाही आणि वरून बिस्किटाचा मैदा अन्नातल्या लोहाचं(Iron) शरीरात शोषण च होऊ देत नाही."
मी आरवला "आ कर" म्हणालो.
"हे दात बघा... ३ वर्षाच्या वयात काळेभोर होऊन सडलेत.
बिस्किटाची साखर रात्रभर दाताला चिकटून बसते आणि तिथेच किडे करते."
"आणि हे बघा फाईल... दर महिन्याला याला खोकला-सर्दी होतेच.
कारण प्रोटिन खायच्या वयात तुम्ही त्याला फक्त साखर आणि मैदा देताय. त्याची प्रतिकारशक्ती (Immunity) तयार होणार तरी कशी?"
त्या ५ रुपयांच्या बिस्किटाने फक्त आरवचं पोटच नाही, तर त्याचं रक्त, दात, भूक आणि इम्युनिटी... सगळं पोखरून काढलं होतं.
आरवचे बाबा सुन्न झाले.
"डॉक्टर, चूक कळली. पण आता काय करू? बिस्किट नाही दिलं तर तो खूप रडतो..."
मी थोडा कठोर झालो, कारण समोर त्या मुलाचं भविष्य होतं.
आणि पालकांचा हा 'तात्पुरता आळस' मोडणे गरजेचे होते.
"रडू द्या!" मी थेट सांगितलं.
"आज त्याला बिस्किट हवंय तर रडू द्या...
नाहीतर उद्या पुन्हा 'पोटात दगड झालाय', 'दात किडलेत' किंवा 'रक्त चढवायचंय' म्हणून याच बेडवर रडावं लागेल.
बाळाच्या तोंडात तो ५ रुपयांचा 'सायलेन्सर' कोंबणे बंद करा.
आज ठरवा— तुम्हाला त्याचे २ मिनिटांचे अश्रू परवडतील की आयुष्यभराचं दुखणं?"
आरवच्या बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला.
त्यांनी खिशातला तो अर्धा फोडलेला 'बिस्किटाचा पुडा' काढला.
क्षणाचाही विचार न करता, त्यांनी तो समोरच्या डस्टबिनमध्ये भिरकावला.
'ठ्ठक!' 🗑️
तो आवाज ओपीडीत घुमला.
माझ्यासाठी तो आवाज कोणत्याही औषधापेक्षा मोठा होता.
कारण आज एका बापाने आपल्या मुलाच्या शरीराला 'काँक्रीट मिक्सर' होण्यापासून वाचवलं होतं.
⚠️ Reality Check:
तुमचं बाळ जेवत नाहीये? पोट साफ होत नाहीये? सारखं आजारी पडतंय?
आधी घरातला हा 'पांढरा व्हिलन' (दूध-बिस्किट) हद्दपार करा.
तुम्ही आज तो 'ठ्ठक' आवाज ऐकवायला तयार आहात का?
की अजूनही प्रेमाच्या नावाखाली बाळाला 'स्लो पॉयझन' देणार आहात?
घरात जे लोक लाडाच्या नावाखाली बाळाच्या हातात बिस्किट कोंबतात, त्यांना हा लेख मुद्दाम फॉरवर्ड करा. प्रेमाची व्याख्या बदलण्याची गरज आहे.

डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे.
(टीप: हा सल्ला सामान्य सुदृढ मुलांसाठी आहे. मुलाला तीव्र पोटदुखी असल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांना दाखवा.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...