मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2539. सायकल

 सुमे, काय ग सारखे वटवट लावली बापाच्या माग. सायकल घ्या मला सायकल घ्या मला. दिसत नाही का ग तुम्हाला दिवसेंदिवस तुमचा शाळेचा वाढता खर्च, वह्या ,पुस्तक ,कपडे काय म्हणून लागत नाही.नऊ वर्षाच्या सुमीवर तिची आई इंदू थोडसं खेकसूनच बोलली.
तेवढ्यात तिच्या  बापान म्हणजे राघवन तिला जवळ घेतल आणि इंदूला म्हणाला," अगं लहान हाय अजून ती, काय समजतया तिला आणि बापाकडं नाही मागणार तर मग कोणाकड मागणार ग ती? 
घेऊ हा घेऊ तुला सायकल. थोडा दम धर. आई रागावल्यामुळे खाली मान घालून असलेल्या सुमीला तिच्या बापाने समजावलं.
कव्हा घेणार? सुमीने हळूच राघवच्या कानात विचारलं.
दोन महिन्यांनी गुढीपाडवा येणार हाय ना तुझा वाढदिवस बी हाय तेव्हा घेईन बघ नक्की. राघवणेही हळूच आवाजात तिला आश्वासित केलं.
सुमितच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पसरला. दादा ह्या वेळेला नक्की ना .. हसत हसत खेळायला जाता जाता सुमिन आश्वासन अजून पक्क करून घेतलं. 
काय तुम्ही बी, कशाला तिला खोटी आस लावून देता उगीच.. पोटापुरतं मिळवण्याची मारामार अन् सायकल काय सस्त हाय का?
    अगं माहित हाय मला पण लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद लई मोलाचा असतोय बघ"... जास्तीचं काम करीन जरा पण सुमीला सायकल घेईनच बघ.
"करा तुम्हाला काय करायचं ते बापलेक मिळून" इंदू जरा चरफडतच बोलली.
शेतमजूर म्हणून काम करणारा राघव कधी कधी वेल्डिंगची, हेल्पर ची पण काम करायचा अन सुमीला जीवापेक्षा जास्त जपायचा.
सुमीचे शब्द सारखे त्याच्या कानात घुमत होते ,दादा माझी सायकल. दररोज संध्याकाळी उशिरापर्यंत राघव लोकांकडं काम करू लागला. वेळेवर जेवण होईना. झोप होईना... इंदूला मात्र त्याची काळजी वाटू लागली.
अहो तुम्ही आज अर्धीच भाकर खाल्ली, रात्री उशिरा जेवताना इंदू त्याला म्हणाली. भूकच लागत नाही बघ  मला अन कष्ट केल्याने काही होत नसतं माणसाला.  झोप तू आता . राघवणं इंदूला समजावलं. 
आजारी पडल्यावर बी पैका लागतुया डाक्टरला लक्षात ठीवा अन् काळजी घेत चला ती अंथरुणावर पडल्या पडल्या म्हणाली. 
तिचा डोळा लागेना. राघवला फक्त कष्ट आणि कष्टच माहीत होते जन्मापासून.त्यात लेकीच्या सुखासाठी त्यांन जादा मेहनतीच काम सुरू केलं होतं.
गरिबी तर पाचवीलाच पुजली होती पण राघव खूप कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस असल्याने त्याला कामाची कमी नव्हती. 
   लेक कधी हट्ट करत नाही पण पहिल्यांदाच तिने आपल्याकडे सायकल मागितली आणि तेवढ बी मागणं आपण पुरवू शकलो नाही असं व्हायला नको हेच त्याच्या मनात चालू होतं. इंदूला मात्र वाटत होतं असले फाजील लाड केले तर ती आणखी वेगवेगळे हट्ट करेल म्हणून सायकलची काही गरज नाही हेच ती राघवच्या डोक्यात घुसवण्याचा प्रयत्न करत होती. पण तो काही मानत नव्हता. 
  त्याची लेक पण तशी गुणाचीच होती. सगळ्यांची आवडती, मनमिळावू, शाळेत पण चांगले मार्क मिळवून आणणारी, गुरुजींची लाडकी , तिला चांगली शाळा शिकवायची, मोठी कुणीतरी करायची आणि सुखात बघायचं हेच राघवच स्वप्न होतं.
वाढदिवसाचा दिवस जवळ येत चालला होता नुकताच एका सायकलीच्या दुकानात तो चौकशी करून आला .सायकलची किंमत 3000 च्या पुढेच होती आणि त्याच्याकडे दोन हजार रुपये साचले होते अजूनही हजार दोन हजार रुपयाची व्यवस्था करायची होती. 
     उसने पैसे घेणे त्याला मान्य नव्हते त्यामुळे जितकं जास्त काम करता येईल तितकं झिजणं सुरूच होतं. अशातच कामाच्या ठिकाणी अचानक त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. काय रे काय झालं त्याच्या सहकाऱ्यांनी येऊन तोंडावर पाण्याचे हबके मारले. तो थोडा शुद्धीवर आला त्याचा मित्र संत्या त्याला म्हणाला, अरे येळेवर जेवत जा. भाकरी अजून तशाच पडल्यात .चक्कर न्हाय येईन तर काय होईल. ऊन मरणाचा हाय.नुसता कामाच्या मागे लागतुया. 
 त्याची बायको इंदू पण तिथून थोडीशी अंतरावर दुसऱ्या शेतात काम करत होती तिला कळाल्याबरोबर ती लगेच धावत आली..
 तिनं त्याला जेवायला घातलं आणि पुन्हा तिचा रागाचा पारा चढला ह्या सुमीकडच बघते मी आता.
माझी शपथ हाय तुला तिला काही बोलायचं नाही, राघवने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला.
सुमीला या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती .खरंतर तिच्या बापाला काही त्रास झाला तर तिला चालणार नव्हतं. आज घरी आल्यावर दादा शांत शांत वाटतोय आणि लगेच का झोपी गेला या विचारांन ती तिच्या आईकडे बघू लागली पण इंदूनेही उत्तर देण्याचे टाळलं आणि सुमीला, घे शांत झोपून असं रागानेच म्हणाली. आपल्या वडिलांना नक्कीच काहीतरी त्रास होतोय हे लहानगया सुमिन जाणलं.
    वाढदिवस दोन दिवसांवर आला होता .पण तब्येत ठीक नसल्याने राघवला जास्त काम होत नव्हतं अजूनही बरेचशे पैसे कमीच पडत होते.  इंदूकडे तर पैसे साठण्याचं कारणच नव्हतं घरातल्या लागणाऱ्या वस्तूंना येणारा पैसा अपुरा पडत होता.
आता काय करायचं या विचाराने राघव अस्वस्थ झाला. एकदा सायकलच्या दुकानात पुन्हा चक्कर टाकून येऊ असं वाटलं. लांबूनच तो दुकानात डोकावून पाहू लागला. काय हो कोणती सायकल देऊ मग दुकानदार त्याच्याकडे बघत म्हणाला. 
नाही ते.. मी दोन दिवसांनी. राघव थोडा अडखळतच बोलत होता. बर, बर या मग दोन दिवसांनी ,दुकानाचा मालक म्हणाला. व्हय व्हय म्हणत राघव पसंत पडलेल्या एका सायकल कडे नजर टाकत तसाच हळूहळू पुढे ढकलत निघाला. संध्याकाळी सुमी शाळेतून घरी आली .रात्री जेवण झाल्यावर ती राघवच्या जवळ जाऊन बसली. काय रे बबड्या काय म्हणतोस? राघव शांतपणे तिला म्हणाला. 
दादा ते मला एक सांगायचं होतं. ती राघव कडे पाहत म्हणाली 
काय ते सांग की मग ..राघवन  अधीरतेन विचारलं. 
आज ना शाळेतून येताना ती हाय ना माझी मैत्रीण सुरू ती सायकल वरून लई जोरात आपटली बघ. लय लागलय तिला. मला तर नको बाबा सायकल. कशाला उगाच हात पाय मोडून घ्यायचं 
अगं पण सगळीच न्हाय पडत सायकल वरून. मी शिकवीन की तुला चांगली. राघव उसन अवसान आणून तिला म्हणत होता.
न्हाय न्हाय मला नको सायकल सुमी त्याला पटवून सांगू लागली.
"अगं पण तू तर कशालाच घाबरत न्हाय मग काय झालं तुला? "
मला सायकल नको एवढच मला माहित हाय... झोपते मी आता असं म्हणून ती तिथेच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. 
त्यानं इंदूकडे पाहिलं.." मी काहीच बोलले नाही तुम्ही शपथ दिली आहे मला". इंदू हलक्या आवाजात म्हणाली. 
शाळेतून येताना सुमीची मैत्रीण सरिता हिने शेतात घडलेला सगळा प्रकार सुमीला सांगितला होता. सरिताचा बाप राघव बरोबरच कामावर जात होता. आपल्या बापाला आपल्यामुळे खूप त्रास होतोय हे सुमीला समजलं त्यामुळे सायकलच खुळ स्वतःच्याही आणि बापाच्या ही डोक्यातून काढून टाकायचं यासाठी तिने हा सगळा बनाव रचला होता.
     राघवला मात्र समजत नव्हतं इतके दिवस सायकल साठी टूमक लावणारी सुमी अचानक सायकल नको कशी काय म्हणते आहे.
   दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता सुमीचा .सकाळी सकाळी ती आनंदाने उठली आणि राघवच्या गळ्यात येऊन पडली. दादा परत सांगते मला सायकल नको. राघावने प्रेमाने तिला जवळ घेतलं त्याच्या डोळ्यातील उष्ण अश्रू तिच्या गालावर ओघळत होते. 
तेवढ्यात गुरुजी घराकडे येताना दिसले. सुमे अगं सुमे म्हणून लांबूनच आवाज देत होते. काय झालं गुरुजी ? राघवने घाईघाईने विचारलं. 
"काय झालं म्हणून काय विचारता. लेकीचा स्वामी विवेकानंद जयंती निमित्त केलेल्या भाषणात पहिला नंबर आलाय आणि पाहुण्यांनी लई मोठं बक्षीस जाहीर केलय "...’सायकल’
आनंद आणि अश्रू यांचा पुन्हा एकदा संगम झाला . बापलेक एकाच वेळेला उद्गारले ...’सायकल’!
 
दिपाली लोहकरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...