रात्रीचे १२ वाजून गेले होते. पावसाची रिपरिप सुरू होती. सोहम, 'झोमॅटो'चा डिलिव्हरी बॉय, पूर्णपणे भिजला होता. आजची त्याची ही शेवटची ऑर्डर होती. पत्ता शोधताना त्याची खूप चिडचिड होत होती. एक जुनाट सोसायटी, जिचा लिफ्टचा दरवाजाही नीट उघडत नव्हता.
चौथ्या मजल्यावरच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातल्या फ्लॅटची बेल त्याने वाजवली. दार उघडायला खूप वेळ लागला. आतून करकर असा आवाज आला आणि एक ७५-८० वर्षांचे आजोबा काठी टेकत बाहेर आले. अंगावर एक जुना सुती सदरा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा.
"ऑर्डर घ्या आजोबा, खूप उशीर झालाय मला," सोहमने थोडे वैतागूनच पार्सल पुढे केले.
त्या आजोबांनी थरथरत्या हाताने पार्सल घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजीब कळा होती. ते सोहमकडे बघून विनवणीच्या सुरात म्हणाले, "बाळा, एक १० मिनिटं थांबशील का?"
सोहमचा संयम सुटत होता. "अहो आजोबा, रात्रीचे बारा वाजलेत. मला घरी जायचंय. माझे आई-बाबा वाट बघत असतील. पेमेंट ऑनलाईन झालंय ना? मग काय काम आहे?"
आजोबांचे डोळे पाणावले. त्यांनी दरवाजा पूर्ण उघडला. आतल्या हॉलमध्ये भयाण शांतता होती. फक्त एका कोपऱ्यात एक छोटा टेबल लॅम्प सुरू होता आणि त्याखाली एका बाईचा हार घातलेला फोटो होता.
"आज माझ्या बायकोचा, सुमतीचा वाढदिवस आहे," आजोबा भिंतीवरच्या त्या फोटोकडे बघत म्हणाले. "ती असताना आम्ही दरवर्षी रात्री १२ वाजता केक कापायचो. आज ती नाहीये... आणि माझा मुलगा..."
त्यांचा आवाज दाटून आला.
सोहमने विचारलं, "मुलगा? तो कुठे आहे?"
आजोबांनी खिशातून एक महागडा आयफोन काढला. "तो अमेरिकेत असतो. मोठी कंपनी आहे त्याची. त्याने सकाळीच मला फोन करून सांगितलं, 'बाबा, तुमच्या अकाउंटला ५० हजार ट्रान्सफर केलेत. आईच्या आवडीचं काहीतरी ऑर्डर करा आणि सेलिब्रेट करा. मला मिटिंगमुळे जमणार नाही कॉल करायला.'" हे सांगताना आजोबांच्या सुरकुतलेल्या गालावरून एक अश्रू ओघळला.
"बाळा, पैसे खूप आहेत रे... पण हा केक का*पताना 'हॅपी बर्थडे' म्हणायला घरात कोणीच नाही. भिंतींना ओरडून सांगितलं तरी त्या ऐकत नाहीत."
सोहमच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा मघाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून गेला. त्याला स्वतःच्या बाबांची आठवण झाली, ज्यांचा फोन तो 'बिझी आहे' सांगून मघाशी कट करत होता.
सोहम शांतपणे आत गेला. त्यानेच तो केकचं बॉक्स उघडला. तो केक नव्हता, तर एक छोटीशी पेस्ट्री होती.
आजोबांनी थरथरत्या हाताने सुरी पकडली. सोहमने त्यांच्या हातावर हात ठेवला.
"का*पा आजोबा... मी आहे ना !"
त्या भयाण शांततेत, एका अनोळखी डिलिव्हरी बॉयने टाळ्या वाजवून 'हॅपी बर्थडे' गाणं म्हटलं. आजोबांनी केकचा तुकडा फोटोला लावला आणि दुसरा तुकडा सोहमला भरवला. त्या म्हाताऱ्या माणसाने सोहमला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत इतकं दुःख आणि एकाकीपण होतं की सोहमला हुंदका आवरला नाही.
सोहम निघताना, आजोबांनी त्याला १०० रुपयांची टीप देऊ केली.
सोहमने नम्रपणे नकार दिला.
तेव्हा आजोबा दारात उभे राहून, पाणावलेल्या डोळ्यांनी ते वाक्य बोलले, ज्याने सोहमचा आ*त्मा हलवून टाकला:
"पोरा, पुढच्या वेळी येताना दोन पोळ्या कमी आणल्या तरी चालतील... पण थोडा 'वेळ' जास्त घेऊन ये रे ! कारण भूक पोटाला लागते, पण 'घरपण' मनाला लागतं... आणि ते विकत मिळत नाही."
सोहम जिन्यावरून खाली उतरला, तेव्हा पाऊस थांबला होता. पण त्याचे डोळे वाहत होते. त्याने बाईक बाजूला लावली आणि पहिला फोन आपल्या बाबांना लावला.
"हॅलो बाबा... झोपलात का? नाही, काही नाही... फक्त तुमचा आवाज ऐकायचा होता."
कधीकधी पोट भरणाऱ्या ऑर्डरपेक्षा, मन भरणाऱ्या दोन शब्दांची किंमत करोडोंत असते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा